वेळेवर!

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
4 Feb 2019 - 10:41 am

"बोला काय हवंय?"

साधारण पन्नाशी उलटलेल्या काकांनी नितीनला अपादमस्तक न्याहाळत विचारलं.

अं? नाव नोंदवायचं होतं लग्नासाठी!

"अच्छा! मुलगा,मुलगी कोणासाठी? की दोघे?"
जाडजूड वह्या वरखाली करत काकांनी विचारलं.

नाही नाही!मी स्वत:च आहे लग्नाचा!

"बरं बरं! या बसा!"

एक जाडशी वही कम रजिस्टर काढून काकांनी विचारायला सुरुवात केली,

हं सांगा,

नाव?

"नितीन आत्माराम कुलकर्णी"

राहणार?

पुण्यातच!

बरं!

नोकरी?

गोरक्षनाथ पतसंस्था मौजे....

अंहं! त्याची गरज नाही.बरं वय काय?

३८ चालू आहे.

घर स्वत:चं?

नै भाड्याचं आहे.दोन खोल्या आहेत खरंतर!

घरी कोणकोण?

लहान बहीण होती.तीच लग्न झालं ५ वर्षांपूर्वी.आता आई,वडील आणि मी तिघेच!

वडील काय करायचे? नोकरी/व्यवसाय? शेतीवाडी काही आहे का?

शेती आहे सातार्‍याला पण फार नाही.फक्त १.५ एकर! वडील गावाकडेच पौरोहित्य करायचे.नंतर मग मीच कामानिमित्य पुण्यात आलो.सुरुवातीला कॉट बेसिसवर राहिलो.मग वडिलांच्याच अोळखीचे दुसरे एक गुरुजी मुळचे पुण्याचे होते.सध्याच्या खोल्या त्यांच्याच!

पगार किती तुम्हाला?शिक्षण?

११ हजार महिना.१२ वी कॉमर्स.

बाकीचं काही साधन उत्पन्नाचं?

नाही.

करायचं नं काहीतरी.काही जोडधंदा!वडीलांसारखं पौरोहित्य तरी?

पूर्वी करायचो.मग बघायला येणार्‍या मुली नकार द्यायच्या.भटजी मुलगा नको म्हणायच्या! घरी सोवळं बर्‍यापैकी असल्याने दुसर्‍या जातीतली मुलगी नाही चालणार!

"ह्मं! ठिकै! सांगतो कोणी असेल तर" फोन नं लिहा इथे तुमचा.काकांनी रजिस्टर पुढे सरकवलं.

अहो पण माझ्या अपेक्षा विचारल्याच नाहीत तुम्ही मुलीबद्दलच्या?

"अपेक्षा???"

काकांनी भुवया उंचावल्या.

"राहायला पुण्यात,घर भाड्याचं,शेती दीड एकर,पगार ११ हजार महिना,रंगानेही सावळेच दिसता.तरीही तुमच्या अपेक्षा आहेत?"

म्हणजे? मी अपेक्षाच ठेवायच्या नाहीत?

ठेवा.पण त्या पूर्ण होण्याची अपेक्षा नका ठेवू.

अहो पण मी निर्व्यसनी आहे.सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही मला!नावासारखांच नितीनं वागणारा माणूस आहे मी!

"त्याचा काय संबंध इथे?"

म्हणजे? निर्व्यसनी असणं ही लग्नाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट नाही का?

"तुम्ही निर्व्यसनी आहात याबद्दल तुमचं कौतूक! पण त्याचा लग्न लवकर जमण्याशी काहीही संबंध नाही."

म्हणजे?

"इतके भोळे कसे हो तुम्ही? पुण्यात राहूनसुध्दा!"
अहो मुलींचे आईबाप मुलाचं इन्कम आधी बघतात.समजा तुम्हाला महिना ३०-४० हजार पगार आहे,पण सोबतंच असंही आहे की तुम्ही रोज संध्याकाळी किंवा रात्री घरी आल्यावर थोडीशी घेत असाल आणि कोणालाही म्हणजे कोणालाही कसलाही त्रास देत नसाल,आरडाओरड करत नसाल आणि सकाळी उठून फ्रेश होऊन व्यवस्थित कामावर जात असाल तर तुमची बायको किंवा सासू सासरे कशाला तक्रार करतील? मुलगा निर्व्यसनी असावा म्हणजे काय याचा अर्थ आज बदललाय साहेब! मुलानं घेतली तरी त्यानं दंगा करु नये,अतिप्रमाणात पिऊ नये हा अर्थ आहे सध्याचा निर्व्यसनी असण्याचा.निर्व्यसनी म्हणजे शून्य व्यसन हा मागच्या जमान्याचा ट्रेंड होता.आता बदलला तो!"
"म्हणूनच मी तुम्हाला मंडळाची फी वगैरे सांगितली नाही.कारण तुम्हाला स्थळ मिळणंच फार अवघड आहे मालक!"

नका हो असं बोलू! फार आशेनं आलोय तुमच्याकडे.

"नितीनराव! लग्न होण्यासाठी आवश्यक बदल योग्य वयात न केल्याचे दुष्परिणाम भोगताय तुम्ही! थोडं स्पष्टंच सांगतो."

"खरंय!"

"हरकत नाही.संपर्कात रहा.आलंच कोणी गरजू तर नक्की सांगतो.माझ्याकडून होईल तितकं करतो."

"आभारी आहे."

"धन्यवाद!"

(सदर घटना काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी.)

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

वकील साहेब's picture

4 Feb 2019 - 11:01 am | वकील साहेब

यापूर्वी कुठेतरी वाचल्याचे स्मरते आहे

उपयोजक's picture

4 Feb 2019 - 11:46 am | उपयोजक

लेखक म्हणून माझे नाव असेल तर ठीक आहे.वाङमयचौर्य आढळल्यास संबंधिताचा पत्ता द्या.बघतोच त्याच्याकडे/तिच्याकडे! :)

विनिता००२'s picture

4 Feb 2019 - 1:52 pm | विनिता००२

छान लिहीलय :)

वास्तव हेच आहे :(

समीरसूर's picture

4 Feb 2019 - 3:07 pm | समीरसूर

छान आहे.

वन's picture

4 Feb 2019 - 5:58 pm | वन

छान आहे.

उपयोजक's picture

5 Feb 2019 - 12:21 am | उपयोजक

विनिता ००२,समीरसूर,वन _/\_