फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : १३

रा.म.पाटील's picture
रा.म.पाटील in जनातलं, मनातलं
3 Feb 2019 - 7:29 am

फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १३
(Decorate Your Love)

प्रजासत्ताक.. प्रेमाचा हक्क..

आज प्रजासत्ताक दिन.. म्हणजे प्रजेला त्यांच्या हक्काची जाणीव करून देणारा दिवस..
हक्क जे जन्म घेतल्यावर आपल्याला आपोआप मिळून जातात..
पण खरंच ते हक्क किती वापरता येतात..? हा प्रश्नच आहे..

ती बोलतच होती कारण त्याला तसेच होते.. तिच्या बहिणीचे तिच्या मनाविरुद्ध ठरत असलेले लग्न..

आज खुप वर्षांनी सर्व मित्रमैत्रिणी एकत्र शाळेत भेटत होते.. सर्वजण आल्यावर तिच्या बहिणीच्या लग्नाचा विषय निघाला.. तिच्या बहिणीचेन लग्न ठरले होते.. अरेंज मॅरेज..

'पण तिला तर तिच्या ऑफिसमधला एक मुलगा आवडायचा ना..?' त्यांची एक मैत्रीण बोलून गेली..

हे बऱ्याचजणांना माहिती नसल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.. सर्वांचे कुतूहल जागे झाले.. आणि तिच्या बहिणीला कोण आवडले होते व त्याच्याशीच लग्न का नाही करत.. ह्याची माहिती मिळाली.. उत्तर असे मिळाले की तिला तो आवडत होता पण त्याला ती आवडत होती का? कारण तिने त्याला तसे कधी विचारले नाही आणि त्या मुलानेही विचारले नाही..

त्यावर तो म्हणाला - ' खरंतर तिने विचारायला हवे होते त्या मुलाला, कसे आहे तुम्ही चुकीचे काही करत नसाल तर भीती कशाला वाटायला हवी?, आणि एखादी आवडती गोष्ट मिळवायची असेल तर धाडस हे करायलाच हवे..'

ती- 'पण घरच्यांनी विरोध केला असता तर..?'

तो- 'तिला जर मुलगा सर्व बाजूने योग्य वाटला असेल तर काय हरकत आहे, आणि ती आता तेवढी समंजस वयाची आहे हे पण घरच्यांनी लक्षात घ्यायला हवे..'

ती- 'अरे पण तिला नाही जमायचे आमच्या घरच्यांना समजावून सांगायला..'

तो- 'जर तिला तिच्या घरच्या म्हणजे जे तिच्या अगदी जवळची माणसे आहेत त्यांना समाजवता येत नसेल तर ती तिच्या सासरच्या माणसांना भविष्यात एखादा मुद्दा कसा पटवून देईल..?, ह्याचा तिने विचार करावा..'

ती- 'पटतंय तुझे.. पण मुली ह्या बाबतीत एवढ्या तयार नसतात..'

तो- 'पण भविष्यात अनेक प्रसंगात तुम्हाला असे पुढच्या व्यक्तीला समजावून सांगावे लागणार आहे.. मग आताच हे धाडस केले तर कुठे चुकले..'

ती- 'ते ही खरे, पण घरचे तयारच नाही झाले तर..?'

तो- 'आपण प्रयत्न करायला हवा होता हे ओझे तर मनावर शेवटपर्यंत राहणार नाही.. '

ती- 'पण ती मुलगी तिच्या आई वडिलांच्या, नातेवाईकांच्या नजरेतून उतरली तर..?'

तो- 'नातेवाईकापर्यंत गोष्ट पोहचवणार कोण घरातीलच ना.. आणि राहिला प्रश्न आई वडिलांचा, त्यांना पटले तर ठीक आणि नाही पटले तर आताही ती लग्न करतच आहे ना..'

ती- 'पण घरच्यांचा निर्णय व्यवहारिक असतो आणि तिचा निर्णय भावनिक असतो मग त्यांचा मेळ बसवायचा कसा..'

तो- 'मग तिनेही त्यांच्या व्यवहारिक नजरेतून आपले नाते तपासावे आणि तिच्या घरच्यांनीही तिच्या भावनिक नजरेतून तिचे प्रेम तपासावे.. दोन्हीचा समतोल साधत निर्णय घ्यावा..'

ती- 'पण हक्क मिळवायचा असेल तर बंडखोरी करावीच लागते, मग प्रेम बंडखोरी शिकवते असा समज होतो..'

तो- 'बंडखोरी..स्वातंत्र्य पण बंडखोरीनेच मिळते.. आजकाल अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा मिळवण्यासाठीपण बंडखोरी करावी लागते.. मग प्रेमातही बंडखोरी केली तर कुठे बिघडले.. फक्त आपल्या बंडखोरीमुळे दुसऱ्याच्या हक्कावर गदा आली नाही पाहिजे ह्याचीही काळजी घ्यावी..'

ती- 'ते कसे शक्य आहे, आपण आपला प्रेमाचा हक्क बजावला तर कदाचित घरच्यांचा आपल्या वरील प्रेमाचा हक्क डावलला जाईल आणि जर घरच्यांची आपल्या प्रेमाला साथ असेल तर कदाचित समाजाच्या जगरहाटीच्या हक्काला बाधा येईल..'

तो- ' हक्क आणि अपेक्षा ह्यात फरक आहे.. जर घरच्यांनी तुम्हाला जपले आहे तर तिथे त्यांचा हक्क नक्कीच आहे.. पण समाजाच्या फक्त अपेक्षा असू शकतात.. हक्क नकीच नाही.. आणि तुम्ही त्यांची एक अपेक्षा पूर्ण कराल तर त्यांची दुसरी अपेक्षा तयारच असते.. आणि त्या कधीच पूर्ण होणार नाहीत.. आणि समाजापेक्षा आपली मुलगी कशी आनंदी राहील हे घरच्यांनी पाहणे जास्त महत्वाचे ठरेल..'

ती- 'पण आपण किती आनंदी आहे ह्यापेक्षा समोरचा किती आनंदी आहे हे जास्त महत्वाचे नाही का..?

तो- 'दुसऱ्याचा आनंद महत्वाचा आहेच की पण तुम्ही स्वतः आनंदी असाल तर दुसऱ्याला आनंदात ठेऊ शकता.. नाहीतर तुम्हाला दुःखात पाहून त्यालाही आनंद कसा होईल..?'

ती- 'आपण खोटे हसून आपले दुःख लपवू शकतो की..'

तो- 'पण त्यावेळी तुम्ही स्वतःलाच नाही तर तुमच्या कुटुंबाला आणि समोरच्या व्यक्तीच्या कुटुंबालापण फसवत असता..'

ती- 'पण कुटुंब योग्य गोष्टी पाहूनच निर्णय घेतात ना..'

तो- 'मान्य आहे पण लग्न ठरविताना तुमचे कुटुंब किती खोलवर जाऊन चौकशी करते.. हे पण महत्वाचे.. नाहीतर पहिल्या प्रेमासारखे तेही वरवरच्या आकर्षणाला भुलू शकते..'

ती- 'हेही खरे..'

तो- 'अजून महत्वाचे असे की तुम्ही मुली स्वतःहून किती चौकशी करता मुलांची.. खासकरून गावाकडच्या.. एवढ्या शिकलेल्या असूनही.. कदाचित तुम्ही लग्नही आंधळेपणाने करता असे म्हणायचे.. प्रेम किंवा लग्न.. जर फक्त आकर्षणाने होत असेल तर ते आंधळे ठरू शकते..'

ती- 'मग ह्याला पर्याय..?'

तो- 'एकमेकांशी बोलणे आणि माणसाच्या बोलण्यातून त्याचे विचार कळतातच की..'

ती- 'खरंच की, ह्याचा विचार आम्ही कधी केलाच नव्हता.. पण जर अति विचार करत राहिलो तर आम्हीच चुकीचे ठरतो.. जास्त अपेक्षा ठेवल्या की जास्त महत्वकांक्षी आहोत असे वाटते..'

तो- 'कसे आहे अपेक्षा वास्तविक असाव्यात अवाजवी नकोत.. आणि अपेक्षांचे आरोप मुलांवरही होतातच की.. फक्त मुलापेक्षा मुलीकडे वेळ कमी असतो हे खरे..'

ती- 'हो ना आणि अशा वेळी समाजही हक्क गाजवत असतो.. तुम्ही समाजाचा भाग म्हणून कसे राहता हे पहायचे असते त्यांना..'

तो- 'हो ना पण हा समाज तुमच्या आनंदात जितक्या हिरिरीने सहभागी होतो.. तितक्याच तीव्रतेने तो समाज तुमच्या दुःखात सहभागी होतो का..? आणि हे वास्तव आहे..'

ती- 'म्हणजे आता असे झाले की, तुमचे कुटुंब समाजाला घाबरते, तुम्ही कुटुंबाला घाबरता पर्यायाने समाजाला घाबरता आणि स्वतःचा प्रेमाचा हक्क नाकारता.. आणि स्वतःला दुःखात लोटून समाजाला आनंदी करता..'

तो- 'आणि प्रेमात तुम्ही स्वतः आनंदी होता आणि इतरांनाही आनंदी करता.. आणि राहिला समाज.. तो काहीही होऊ दे हसणारच तुमच्यावर..'

ती- 'पण प्रेमात फसवणूक होऊ शकते की..?'

तो- 'ती लग्न झाल्यावरही होऊ शकते की, शेवटी प्रेम किंवा लग्न चुकीचे नाही तर समोरची व्यक्ती चुकीची असू शकते.. आणि पारख त्या व्यक्तीची झाली पाहिजे..'

ती- 'आणि पुढचा माणूस सहवासातूनच जास्त कळतो.. अनोळखी माणसापेक्षा ओळखीची व्यक्ती केव्हाही चांगली.. पण तरीही कोणी आवडेलच नाही प्रेम करायला तर..'

तो- 'तेव्हा निर्णय लग्न प्रक्रियेतून घ्यायचा.. पण तोही सखोल विचार करून..'

ती- 'प्रत्येक गोष्ट परिपूर्ण भेटेल असेही नाही..'

तो- 'तेही खरे पण दोघे मिळून ती परिपूर्ण करू शकतात, एवढे स्वातंत्र्य आणि पाठिंबा दोघांनी एकमेकांना दिला पाहिजे..'

ती- 'त्यासाठी एकमेकांचे विचार जाणून घेतलेही पाहिजेत..'

तो- 'जर फुलांना व्यक्त होण्याचा हक्क असता तर त्यांनी त्यांचा सुंगध कोणाला वाटला असता.. फुल तोडणाऱ्याला की फुल झाडावर जपणाऱ्याला..? निदान आपल्याला तो हक्क आहे व्यक्त होण्याचा.. मग आपण ठरवायचे की आपण कोमेजून जायचे की टवटवीत फुलायचे..!'

त्यांची मैत्रीण- 'पण कधी कधी मुलींनी उशिरा लग्न करण्याचे कारण त्यांना आयुष्यात बनून दाखवायचे असते.. प्रत्येक वेळी प्रेमच असेल असे नाही..'

तो- 'हो हे ही खरे, आयुष्यात करीअर आणि लग्न हे दोनच निर्णय महत्त्वाचे असतात जे आपल्या आयुष्याची दिशा व दशा ठरवतात.. म्हणूनच ते निर्णय आपण स्वतः घ्यावेत..'

ती- 'मुलाना जरी करीअरचा निर्णय स्वतः घेता नाही आला तर ते लग्नाच्या निर्णयावेळी सावध तरी होतात, पण बहुतांशी मुलींना पहिल्यांदा लग्नाचा निर्णय घ्यावा लागतो आणि तोही स्वतःला घेता येत नाही, आणि राहिला करीअरचा निर्णय तो बऱ्याचदा सासरच्या आणि नवऱ्याच्या मतानुसार ठरतो..'

तो- 'अशावेळी सुंगध त्यांनाच दया जे फुल जपू शकतात..'

ती- 'अगदी बरोबर. आणि हा हक्क मिळवायला मुलीच घाबरतात की मुलेही घाबरतात..?..' त्याचवेळी तिला तिच्या बहिणीचा फोन येतो.. ती बाजूला होऊन बहिणीशी बोलू लागते..

त्याचा एक मित्र बोलतो- 'खरंच पटले तुमचे, कोणाच्याही दावणीला आणून बांधायला आपण मुकी जनावरे थोडीच आहोत..'

त्यांची मैत्रीण- 'तरीही मला एक कळत नाही मुले अशा मुलीशी लग्न कसे करतात की जिला बळजबरीने हे लग्न करायला लावले जात असते..'

तो- 'कदाचित मुलाची परिस्थिती किंवा हतबलता.. तरीही कोणताही निर्णय घेताना तारतम्य हवेच.. मग तो प्रेमाचा असो किंवा लग्नाचा.. कोणत्याही भावनिक दबावाखाली न येता तो घेतला जावा..'

ती फोन ठेवल्यावर येऊन सांगते- ' बहिणीचा फोन होता, त्या मुलाने लग्नाला नाही म्हटले आहे कारण त्याचे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि त्याला कोणाला फसवायचेही नाही.. आतापर्यंत तो घरातल्यांच्या दबावाखाली येऊन निर्णय घेत होता..'

तो - 'बरं झाले वेळीच सांगितले आता तुझ्या बहिणीलाही सांग तुही उशीर करू नकोस तुझे प्रेम व्यक्त करायला..'

ती- 'हो तेही मी सांगितले आहे तिला.. एव्हाना तिलाही जाणवला असेल त्या मुलासारखा तिला स्वतःलाही आहे.. 'प्रेमाचा हक्क'..!'

***
राही..©
***

सूचना - वरील लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. वरील लेख किंवा त्याचा कोणताही भाग लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रकाशित किंवा मुद्रित किंवा कोणत्याही स्वरूपात वापरता येणार नाही. तसेच परवानगी घेऊन वरील लेखाचा वापर करताना त्यात लेखकाच्या नावाचा आणि मोबाइल नंबरचा उल्लेख करावा.

संपर्क : ८३७८ ०४५१४५ (राही..)

8378 045145 (Rahi..)

कथालेख