बजेट ( आपलेही )

असहकार's picture
असहकार in जनातलं, मनातलं
31 Jan 2019 - 11:00 am

बजेट ( आपलेही )

दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या आधी दोनेक महिन्यापासून देशभरात एका गोष्टीची चर्चा सुरू झालेली असते. ती म्हणजे यावर्षीचे बजेट काय असणार, कसे असणार? कोणत्या सवलती असतील, आयकर कितीने कमी होईल? कोणत्या वस्तूंच्या किंमती कमी होतील, कशाच्या वाढतील? बजेटचा शेअरबाजारावर काय परिणाम होईल? वर्तमानपत्रापासून ते टीवीचॅनेल्सच्या चर्चांपर्यंत सगळीकडे एकच एक शब्द ऐकू येतो. बजेट. बजेट. बजेट.

तर हा बजेट शब्द नेमका आहे तरी काय याचा फार थोडे लोक मागोवा घेतात.
सरकारने सादर करायचा हिशोब, नवे कर लावायची घोषणा, की जमाखर्च मांडण्याची तयारी?
एवढ्या मोठ्या देशाचे बजेट असते , त्यात किती काय काय गोष्टी असतात. सगळं टक्केवारीत मांडलं जातं, लाखो आणि कोटी हजाराच्या आकड्यांची लयलूट असते. सर्वसामान्यांच्या डोक्यावरुन जातं हे सगळं.

आपल्याला काय फायदा होतोय आणि आपलं किती नुकसान होते आहे इतकं समजलं तरी सुटलो अशी अनेकांची बजेटबद्दलची कल्पना असते. आपल्या स्वतःच्या बजेटवर काय परिणाम होतो एवढे बघितले पाहिजे फक्त असेही बहुतेक सर्वांनाच वाटत असते. म्हणजे आपले स्वतःचे ही बजेट असते की?

बरेच लोक स्वतःचं बजेट तयार करतात ,
तुम्हीही करत असाल तर अतिशय उत्तम. करत नसाल किंवा अगदी ढोबळमानाने करत असाल तर तुमचं होणारं नुकसान तुम्हाला कळलेलं नाहीये अजून.
देश किती मोठा आहे, मग त्याचे बजेट असलेच पाहिजे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपलं घर किंवा व्यवसाय हाही आपल्या स्वतःसाठी मोठा असतो, त्याचाही व्यवस्थित काटेकोर आणि टक्केवारीत सुटसुटीत मांडलेल बजेट पाहिजेच.

बजेट म्हणजे अंदाजपत्रक. अंदाजपत्रक म्हणजे भविष्यात घडणार्‍या गोष्टींचा, घटनांचा आढावा भूतकाळात झालेल्या घटनांवरुन घेऊन पुढे काय होऊ शकते याबद्दल अंदाज करुन करावयाच्या गोष्टींची मांडणी करणे.

देशाच्या सरकारला, मोठमोठ्या संस्थांना, कंपन्यांना आपले अंदाजपत्रक मांडावे लागते, कारण अंदाजपत्रकामुळे आपल्याकडे नक्की किती पैसा येणार आहे, तो आपण कसा उभा करणार आहोत, कसा खर्च करणार आहोत. नेमके कोणते खर्च आधी करायचे, कोणते नंतर करायचे, कोणते करायचेनाहीत, किंवा नवीन कामांसाठी निधी कसा उपलब्ध करायचा याविषयीचा उहापोह अंदाजपत्रकात केला जातो.

अगदी असेच आपण आपल्या घरासाठी आणि व्यक्तिगत आयुष्यासाठीही करु शकतो. खरेतर असे करणे ही एक महत्त्वाची बाब आहे.

दर महिन्याला आपल्याला अमूक एक पगार मिळतो, वर्षाचा बोनस, इतर भत्ते मिळून त्याची रक्कम अमूक इतकी होते. ह्या रकमेचा आपल्या जगण्यासाठीच्या आवश्यक गोष्टींमध्ये कसा खर्च करायचा याबद्दल अंदाजपत्रक बांधणे आवश्यक आहे. घरासाठी, कुटूंबासाठी आपल्याला अंदाजपत्रक तयार करणे फायद्याचे ठरते.

जसे की मुलांच्या शिक्षणाला पुढच्या वर्षी किती तरतूद करावी लागेल, काही नवीन क्लासेस लावायचे आहेत का? मुलांनी कोण्या स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवले तर त्यासाठीच्या शिकवणीत, साधनांसाठी, येण्याजाण्यासाठी, विशिष्ट खुराकासाठी खर्च करायला पैसे लागणार आहेत का? घरात कोणी वयोवृद्ध व्यक्ती असेल तर तिच्या नेहमीच्या औषधपाण्यासाठी, किंवा आकस्मिक हॉस्पिटल खर्चासाठी किती रक्कम लागू शकते?

नोकरी किंवा व्यवसायाव्यतिरिक्त इतर कोण्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे का, ते किती असेल व ते नेमके केव्हा हातात पडणार?
कुटूंबातल्या कोणाकोणाचे कोणकोणते विमे काढलेत व त्यांच्या हफ्त्यांच्या तारखा व रकमा कोणकोणत्या आहेत ते तपासणे? त्यातल्या काही विमा पॉलिसी घेतल्या तेव्हा विचार न करता घेतल्या गेल्या पण आता योग्य वाटत नाहीत तर बंद करता येतील काय? घरात किराणासामान, जीवनावश्यक सामान, अन्नधान्य, इत्यादी जरुरीच्या सामानाची किती साठवणूक आहे?

पुढे भविष्यात काही सणसमारंभ आयोजित केल्यास, त्यासाठी लागणार्‍या पैशाची तरतूद कशी आहे, किती पाहुणे बोलवले तर आपल्याला परवडण्यासारखे आहे? सहली-पिकनिक-पर्यटनासाठी किती दिवस व कुठे जाणे परवडणारे आहे? एखादा आकस्मिक खर्च आल्यास काही खर्च रद्द करण्याची गरज पडेल काय, असल्यास कोणते? या व अशा असंख्य बाबी आपल्या छोट्याशा कुटूंबातूनच आपल्याला समजतील. अशा सर्व प्रश्नांचा आगावू विचार करुन त्यानुसार जमा खर्चाची योग्य बांधणी झाली तर वर्षभरात आपल्याकडे किती पैसा येईल, किती खर्च होईल व किती शिल्लक राहील याची जवळपास खात्रीची अशी माहिती आपल्याला उपलब्ध होते.

या माहितीचा आपल्याला नक्कीच उपयोग होतो. आपल्या जमाखर्चाचे एक मूर्त रुप आपल्यासमोर उभे राहते. आपली सांपत्तिक परिस्थिती व आपण करत असलेले आवश्यक, अनावश्यक खर्च स्पष्ट समोर दिसतात. त्यामुळे अनावश्यक खर्चात जाणारे पैसे वाचवून आपली शिल्लक वाढवू शकतो.

आवश्यक खर्चासाठी लागणार्‍या तरतूदीसाठी वेळेत उभारणी करु शकतो. जमा, खर्च व शिल्लक दिसल्याने, शिल्लक रकमेचे चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करुन चांगला परतावा मिळवू शकतो.

सर्व चित्र स्पष्ट असल्याने आपल्यावर कोणत्याही क्षणी पैशाशी संबंधित तणाव येत नाही. तणावरहित मानसिकतेत काम केल्याने आपली एकाग्रता वाढते, आपली उत्पादनक्षमता वाढते, त्यातून परत आपलीच संपत्ती वाढते. मानसिक व आर्थिक स्थैर्य लाभते. बजेट आखल्यामुळे एवढे सारे फायदे आपल्याला मिळू शकतात.

समाजलेख

प्रतिक्रिया

ज्ञानव's picture

31 Jan 2019 - 5:43 pm | ज्ञानव

माहिती. पण ज्याचे उत्पन्न कमालीचे अस्थिर आहे त्याने बजेट कसे करावे ?

असहकार's picture

1 Feb 2019 - 5:08 pm | असहकार

उत्प्पन्न जरी अस्थिर असले तरी खर्च मात्र नियमित असतात. त्यामुळे खर्चाचे अन्दाज पत्रक प्रथम करावे लागेल. व त्यानुसार (contingency fund) गंगाजळी म्हणून अडीअडचणी करता किमान रक्कम शिलकी ठेवावी . त्यामुळे वेळोवेळी उधारी करण्याची वेळ नाही , अथवा याची टोपी त्याच्या डोक्यावर करण्याची गरज पडणार नाही व जेव्हा अचानक मोठे उत्पन्न मिळेल तेव्हा प्रथम गंगाजळीत रक्कम ठेवूनच उरलेली रक्कम खर्च करावी. उत्प्पन्न अस्थिरते नुसार ३ ते ६ महिन्यापर्यंत खर्चाची तरतूद गंगाजळीत असावी .

खिलजि's picture

1 Feb 2019 - 3:39 pm | खिलजि

मजा आली बजेट बघून. बजेट मध्यमवर्गीयांसाठी तुफ्फान आहे . आता मजा येणार आहे ती निवडणुकीत .. साहजिकच सत्ताधारी पक्षाने मोठा बॉम्ब लावलेला आहे . आता खरी मजा आहे कि सत्ताधारी परत निवडून आले कि हे सर्व शिवधनुष्य कसे पेलणार आणि जर नाही आले तर विरोधी पक्ष या सर्व गोष्टींना कसे सामोरे जातील ? बघू पुढे काय वाढून ठेवलंय ते ...............

यशोधरा's picture

1 Feb 2019 - 3:53 pm | यशोधरा

चांगलं लिहिलंय.