काही नाजूक स्वप्नं...

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
30 Jan 2019 - 5:01 pm

परवा सहज टीव्ही चाळता चाळता एका चॅनलवर 'कुछ कुछ होता हैं' दिसला. बास्केटबॉल कोर्टवर राहुल आणि अंजलीची बालिश अशी भांडणे सुरु होती. थोडा वेळ बघत बसलो. हा चित्रपट १९९८ मध्ये आला होता आणि तुफान चालला होता. गाणी सगळी हिट्ट झाली होती. मनात विचार आला. हा चित्रपट जर आता आला असता तर चालला असता का? सध्याच्या तरुण प्रेक्षकांची आवड आमुलाग्र बदलली आहे. आमच्यासाठी मात्र हा चित्रपट एक स्वप्न होते. त्या साली मी कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसर्‍या वर्षात शिकत होतो. 'कुछ कुछ...' मध्ये स्वपनवत वाटू नये असे काहीच नव्हते. अभ्यास औषधालाही नसलेले कॉलेज, वर्ग घेण्यात आणि विषय शिकवण्यात वेळ व्यर्थ न दवडणारे शिक्षक, सुंदर सुंदर मुली, बिनधास्त काजोल, मोहक राणी, एखाद्या कॉलेजकुमारासारखा खट्याळ प्रिंसिपल अनुपम, एखाद्या कॉलेजकन्यकेसारखी अवखळ शिक्षिका अर्चना, चित्रपटभर नुसता रोमान्सच रोमान्स...और क्या चाहिये? तुलनेत आमचे कराडचे आयुष्य कसे होते? हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या पायापासून गळ्यापर्यंत पंजाबी ड्रेस घातलेल्या मुली. त्यातल्या आकर्षक म्हणाव्या अशा अगदी एक-दोनच. त्याही 'वासरांत लंगडी गाय शहाणी' ही म्हण पदोपदी सिद्ध करणार्‍या. एक लांबलचक रस्ता आणि त्याच्या एका बाजूला असलेले आमचे कॉलेज हे कॉलेज कमी आणि पुरातत्व विभागाचे कार्यालय जास्त वाटायचे. आमच्यासाठी नाईट लाईफ म्हणजे होस्टेलच्या आपापल्या खोल्यांमध्ये गप्पा ठोकत बसायचे. संध्याकाळी सात-आठनंतर सगळा परिसर शांत व्हायचा. रात्री मिणमिणत्या प्रकाशात आम्ही आपल्या दहा-बाय-दहाच्या मेसमध्ये जेवायचो. होस्टेलपासून मेसपर्यंत अंधारात चालत जाण्याची सवय झाली होती. कपडे इतके बेसिक दर्जाचे असायचे की एखादा विद्यार्थी कॉलेजला चालला आहे की ऊसाला पाणी द्यायला हे सांगणे कठीण वाटावे. आमचा एक मित्र तर दात घासत कॉलेजला यायचा. कॉलेजच्या वॉशरूममध्ये तोंड धुऊन वर्गात बसायचा. वर्ग संपेपर्यंत त्याची झोप उडालेली असायची. वर्ग संपता संपता मागून सटकून बाहेरच्या टपरीवर चहा प्यायला जायचा. त्यावेळेस वाटायचं खरं आयुष्य पुण्या-मुंबईत आहे. इधर साला कुछ दम नही. सगळं एकदम वाळवंट. आणि आपण सगळे या रखरखीत वाळवंटात दात घासत मंदपणे चालणारे उंट! असं वाटायचं की पुण्या-मुंबईमध्ये कशी जिंदगी असेल? एकदम झकपक! स्टायलिश! ग्लॅमरस! शिक्षण लवकरात लवकर संपवून पुण्या-मुंबईला पळायचे असे आम्ही ठरवले होते. ती स्वप्नांची दुनिया मला खुणावत असे. कराडमधून बाहेर पडल्यानंतर पुण्यात आलो. नोकरी मिळवता मिळवता तोंडाला फेस आला. कित्येक महिने बेकार अवस्थेत घालवले. प्रचंड दडपण! मुंबईचं आकर्षण कधीच संपलेलं होतं. कराडचेच दिवस किती मस्त होते असं राहून-राहून मनात यायचं. मित्र, होस्टेल, मौज-मस्ती. हे सगळंच होतं कराडमध्ये. नॉस्टाल्जियाला घडून गेलेली पण त्यावेळेस न उमगलेली स्वप्नं म्हणता येईल का? अनसीन पास्ट ड्रीम्स! ही विरुद्ध दिशेला जाणारी स्वप्नं. त्यावेळेस कळत नाही की जे आपण जगतोय ते पुढे भविष्यात आपल्याला स्वप्नवत वाटणार आहे. मग नंतर स्वप्नांत रमावं तसं आपण त्या आठवणींच्या आसमंतात घडून गेलेली स्वप्नं रंगवत बसतो. "लडकी बडी अंजानी हैं..." ऐकतांना कराडच्या दिवसांचा फक्त सुगंध मनात दरवळतो. काहीतरी वेगळंच वाटतं. काय ते नक्की नाही सांगता येत. बहुतेक त्या काळातल्या आपण पाहिलेल्या स्वप्नांची हूरहूर फक्त जाणवते. आणि जाणवतो त्या काळातला निवांतपणा, आसुसलेपणा, काहीतरी हातात पकडण्याचे प्रयत्न. नकळत भूतकाळात पाहिलेल्या स्वप्नांवर जुन्या स्वप्नांची कल्हई चढत जाते. असा हा आठवणी आणि तरल स्वप्नांचा खेळ मनाचा कॅलिडोस्कोप करून टाकतो. अशी एक स्वप्नांची काल्पनिक दुनिया माझ्या मनात कायम घर करून असते. प्रत्येकाचीच अशी एक स्वप्नांची दुनिया असते. ती प्रत्यक्षात कधीच नसते पण हृदयात मात्र नक्की असते. जीवनाच्या प्रवासात जसे जसे आपण पुढे जातो तशी तशी ही दुनियादेखील पुढे जात राहते. या प्रवासात या दुनियेचे रंग बदलत जातात; अर्थ बदलत जातात; घटक बदलत जातात पण या दुनियेचे अस्तित्व कधीही संपत नाही. माझी अशी स्वप्नांची दुनिया अगदी लहानपणापासूनच माझी सोबत करत आलेली आहे.

माझ्या या दुनियेत काय असतं? अलिशान बंगला, महागडी गाडी, उंची कपडे, जगभ्रमंती वगैरे काहीही माझ्या या दुनियेत नसतं. नेमकं त्या दुनियेत काय असतं हे मला अजूनही कळत नाही. आपण आयुष्यात काहीतरी कमवावं अशा प्रकारची स्वप्न नसतात या दुनियेत हे नक्की. काहीतरी निराळंच असतं माझ्या स्वप्नांच्या दुनियेत. लहानपणी 'शान' बघतांना अब्दुलची मिजास बघून मुंबईचं आकर्षण वाटायचं. "ये लफडा कहीं खार के आस-पास तो नहीं हुआ?" असे बेफिकिरीने विचारत असतांना अब्दुल त्याचा बाजा मोठ्या शानमध्ये फुंकतो. त्याआधी "नाम अब्दुल हैं मेरा, क्या?" असे विचारत मुंबईमधल्या उंच उंच इमारती न्याहाळत रस्त्यांमधून फिरतो. अपंग असतो, गरीब असतो, दुर्बल असतो पण स्टायलिश असतो, स्ट्रीटस्मार्ट असतो, थोडासा दिलदारही असतो. हिंदी चित्रपटांच्या नायक-सहनायकाच्या या ठरलेल्या क्वालिटीज होत्या त्या काळात. ज्याने कुणी पहिल्यांदा अशा व्यक्तिरेखा रंगवल्या त्या लेखकाला सलाम! असं वाटायचं की मुंबईमध्ये असं काहीतरी शानदार, हॅपनिंग, इंटरेस्टिंग आहे जे इतरत्र कुठेच नाहीये. अर्थात, सिनेमा हा त्या आकर्षणपरीघाचा मध्यबिंदू होता हे ओघानेच आले. 'तेजाब' बघतांना असंच काहीसं वाटायचं. मोहिनीचं मुन्नावर जीव टाकणं आणि 'एक दो तीन...' मधला तो एक जबरदस्त इंटर्ल्युड! लक्ष्मी-प्यारेंनी या गाण्यात संगीतचा एक अफलातून तुकडा वापरलेला आहे. कुणास ठाऊक का पण हा तुकडा ऐकला की मला असं वेगळंच वाटतं. एकदम ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड! असं वाटतं की आपण कुठल्यातरी वेगळ्याच जगात असायला हवं होतं.

एखाद्या दुपारी कार्यालयात बसलेलो असतांना खिडकीबाहेर पाहतो. सगळं शांत असतं. झाडाची पानंदेखील स्तब्ध असतात. कंपनीच्या आवारातले मोठे रस्ते शांत पहुडलेले असतात. क्रिकेट ग्राऊंडवर चिटपाखरू नसतं. फ्लोअरवरदेखील शांतता असते. मनात चलबिचल होते. कुठेतरी काहीतरी अजून मस्त आहे; इंटरेस्टिंग आहे जे आपण मिस करतोय. ते कुठंय माहित नाही. ते नेमकं काय आहे माहित नाही. हे फिअर ऑफ मिसिंग ऑऊट (फोमो) आहे का? नाही. अशी कुठली भीती नाही. दु:ख नाही. खंत नाही. पण मध्येच एक कळ येते. सध्या जे चालू आहे ते वाईट आहे का? तसंही नाही. पण मन असं बुद्धीला बजावत राहतं देअर इज समथिंग मोअर रोमँटिक, इंटरेस्टिंग, अँड एक्सायटिंग ऑऊट देअर समव्हेअर. थोडा वेळ त्या दुनियेत मी रमतो. मजा वाटते. एक चक्कर मारून परत येतो. बरं वाटतं. मला काँशस पातळीवर कळत असतं की असं काहीही नाहीये. पण अशी नुसती चक्कर मारली की बरं वाटतं. ती चक्कर नेमकी कुठे असते हे सांगणं अवघड आहे.

मी जिथे राहतो तिथून जवळच एक छोटीशी गल्ली आहे. त्या संपूर्ण गल्लीवर बांबू आणि इतर झाडांचा गारेगार मंडप आहे. दोन्ही बाजूला दोन-तीन सुंदर बंगले आहेत. मी कधी कधी या गल्लीत जातो. अतिशय शांत आणि निवांत वाटतं. त्या बंगल्यांपैकी एक बंगला खूप मोठा आहे. मोठं आवार आहे. घरासमोर दोन्ही बाजूला बगीचे आहेत. बगीच्यात बसायला निरनिराळ्या ठिकाणी झोपाळे, टेबलं, खुर्च्या आहेत. एक छोटासा कारंजा आहे. बंगल्यात सात-आठ खोल्या सहजच असतील. एक आऊटहाऊस आहे. दुसर्‍या मजल्यावर तीन खोल्या असतील. हा बंगला पाहिला की मला असं वाटतं की अशा ठिकाणी एखादं मस्त गेट-टुगेदर असावं किंवा एखादा समारंभ. पन्नास-साठ नातेवाईक असावेत. दोन-तीन दिवस निवांतपणा असावा. खाण्या-पिण्याचं सगळं काँट्रॅक्ट दिलेलं असावं. सोपस्कार फार नसावेत. सगळे आरामात कुठेतरी अड्डा जमवून गप्पा मारतायेत. मधूनच चहाचे राऊंड्स होतायेत. लहान मुलं धमाल करतायेत. मनमुराद हसणं-खिदळणं सुरु आहे. रात्री सगळे गप्पा मारत जेवतायेत. एखाद्या अठरा-वीसवर्षीय देखण्या 'तो'चं एखाद्या चांदणं सांडल्यागत हसू आणि अल्लड डोळे असणार्‍या हमउमर 'ती'कडे सारखं-सारखं लक्ष जातंय. दोघांची नजरानजर होतेय पण बोलणं होत नाहीये. डोळ्यात झोप नाहीये. रात्र सरत चाललीये पण गप्पा सरत नाहीयेत. दुसर्‍या दिवशी सगळे एखाद्या नाटकाला किंवा बाहेर जेवायला जातायेत. सगळे एकमेकांची आपुलकीने चौकशी करतायेत. काही कार्यक्रमांमध्ये मी असा निवांतपणा अनुभवलेला आहे पण अजूनही त्या बंगल्याकडे पाहिलं की हे विचार हमखास येतात. बारा-पंधरा जवळचे मित्र (सहकुटुंब किंवा एकेकटे) असतील तर मग काय विचारायलाच नको. गाणी, गेम्स, गप्पा, खाणं, पिणं, आणि बरंच काही...

"तू तू हैं वही, दिल ने जिसे अपना कहा, तू हैं जहां मैं हूं वहां, अब तो ये जीना तेरे बिन हैं सजा" हे माझं खूप आवडतं गाणं आहे. हे गाणं ऐकलं की मी दुसर्‍याच विश्वात जातो. असं वाटतं एखादी प्रेयसी आणि प्रियकर अशाच एका विश्वात आहेत जिथे त्यांना गॅस सिलिंडर बुक नाही करायचाय, गवारीच्या शेंगा नाही तोडायच्यायेत, फुटका नळ नाही बदलायचाय, गहू दळून नाही आणायचेत. ते फक्त सुंदर दिसणार आणि छान छान गाणी म्हणणार. पंकज उधासचं "एक तरफ उसका घर, एक तरफ मयकदा" ही गजल माझ्या खूप आवडीची. खूप वर्षांपूर्वी युट्युबवर ही गजल मी रोज बघायचो. "तेरी निगाह से ऐसी शराब पी मैने..." अशी पंकज उधासने सुरुवात करतांना त्या व्हिडिओमध्ये फक्त दोन डोळे दिसायचे. हा व्हिडिओ कुणीतरी असाच बनवून टाकला होता. ते डोळे कमालीचे सुंदर होते. माझ्याकडे रोखून बघायचे. निळसर-घारे. असं वाटायचं की या डोळ्यांमध्ये खरोखर नशा असली पाहिजे. "के फिर ना होश का दावा किया कभी मैने" पुढची ओळ. डोळे अजून माझ्या डोळ्यात रोखून बघतायेत. मी घायाळ झालोय. किती प्यायची? "वोह और होंगे जिन्हे मौत आ गयी होगी, निगाह-ए-यार से पाई हैं जिंदगी मैने" काय सुंदर कल्पना! तुझे डोळे माझा श्वास चालवतात. तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या हैं? ते डोळे बघून जीव त्या निळाईमध्ये हरवून जायचा. "ए गम-ए-जिंदगी कुछ तो दे मश्वरा, एक तरफ उसका घर, एक तरफ मयकदा". खरंच, किती व्यवधानं आहेत या जगात! तू, तुझा सहवास हवाहवासा खरा पण जिंदगी और भी कुछ हैं तेरे आंखों के सिवाय. पोट आहे. समाज आहे. "हुस्न से भी हसीं हैं ख्वाब मेरी जिंदगी के, इस खुशी से परे हैं मोड और भी खुशीके, मैं देखता नही कभी इधर उधर, बस अपने मंजिलों पे हैं मेरी नजर, देख मुझको मेरे हमसफर" हे ही तितकंच खरं! स्वप्नं बरीच आहेत. आयुष्य एकच आहे.

असंच काहीसं आयुष्याचं असतं बहुतेक. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ. सगळं कसं एकमेकांत मिसळून जातं. आत्ताचा क्षण लगेच पुढचा क्षण घेऊनच येतो. त्या क्षणाचा लुत्फ घेता घेता त्यापुढचा क्षण केव्हा येऊन ठेपतो लक्षात येत नाही. अरे, हे करायचं होतं. अरे, ते करायचं राहूनच गेलं. दिवस, महिने, वर्षं भराभर पुढे जत राहतात. स्वप्नांची दुनिया तशीच राहते. किंबहुना तिचा विस्तार वाढतच असतो. भूतकाळातली स्वप्नं, वर्तमानकाळातली पण भूतकाळात रुंजी घालणारी जुनी, मिठ्ठास स्वप्नं, आणि भविष्यकाळातली अधांतरी तरंगत असलेली स्वप्नं...सगळी स्वप्नं मिळून आपले एक संस्थान बनवतात. या स्वप्नांना अटींचा जाच नसतो. तारखांचा फास नसतो. अपेक्षाभंगातून निर्माण होणार्‍या दु:खाचा वास नसतो. ही वेगळीच स्वप्न असतात. आपापल्यात रंगणारी. कधी कधी मनातच पुरेपूर पूर्ण होणारी. पूर्ण नाही झाली तर उद्बत्तीसारखी जळणारी पण सुवास देणारी. जळतांनादेखील आनंद वाटणारी...

जीवनमानआस्वाद

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

30 Jan 2019 - 5:15 pm | प्रमोद देर्देकर

माझंच मनोगत वाचतोय असं वाटलं.
मला जसं सुचत जातं तसं त्याला लिखाणाकडे घेवून जातो पण शब्द साथ देत नाहीत . आणि शब्दांकन जरी आले तरी मोबाईलवरून लिहण्याचा टंकाळा .

सुबोध खरे's picture

30 Jan 2019 - 6:13 pm | सुबोध खरे

माझंच मनोगत वाचतोय असं वाटलं.

you said it.

माझं आयुष्य मी स्वप्नवत जगलो आहे/ जगतो आहे.

पण तरीही हे काही तरी (काळजात गुदगुल्या करणारं) राहून गेलं आहे हि भावना काही जात नाही.

हे म्हणजे जगजीत सिंह ची गझल ऐकताना आपल्या ( एकही गर्ल फ्रेंड नसताना) चार पाच गर्ल फ्रेंड सोडून गेल्या आहेत अशी भावना होते तसंच काही तरी होतं.

अप्रतिम लेखन

आपल्याला साष्टांग दंडवत__/\__

समीरसूर's picture

1 Feb 2019 - 4:31 pm | समीरसूर

मला आख्ख्या जिंदगीत गर्ल्फ्रेंड नव्हती. त्यावेळी ही प्रथाच नव्हती. (च्यायला, आता त्यावेळी वगैरे म्हणायची वेळ आली म्हणजे कठीण आहे). पण अजूनही 'कोई ये कैसे बतायें के वो तनहा क्यूं हैं, वो जो अपना था वही और किसी का क्यूं हैं, यही दुनिया हैं तो फिर ऐसी ये दुनिया क्यूं हैं...' ही गजल ऐकली की असं वाटतं एकेकाळी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं ती प्रेयसी आता कुणाच्या तरी घरात तिच्या मुलांवर जीवापाड प्रेम करतेय... :-):-)

ही गजल सध्या दिवसातून ८-१० वेळा ऐकणं चाललंय. एक व्हायोलिन इन्स्ट्रुमेंटल पण आहे या गाण्याचं. दीपक पंडित यांचं. दर्द आहे...दर्द! प्युअर, बावनकशी, सुगंधी दर्द!

समीरसूर's picture

1 Feb 2019 - 4:32 pm | समीरसूर

धन्यवाद, डॉसाहेब! :-)

खूप छान श्टाईल आहे लिखाणाची.
कोसला मधला पांडूरंग सांगवीकर पुन्हा आठवला.

श्वेता२४'s picture

31 Jan 2019 - 12:53 am | श्वेता२४

खूप आवडलं

पद्मावति's picture

31 Jan 2019 - 2:59 am | पद्मावति

खुप सुरेख लिहिलंय.

खूप छान... खरं तर असले दवणीय मी वाचत नाही, पण तुमची लेखनशैली अफलातून आणि खिळवून ठेवणारी आहे

दवणीय

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Jan 2019 - 10:06 am | ज्ञानोबाचे पैजार

सहज सोपे साधे आणि मनापासून केलेले लिखाण आवडले
पैजारबुवा,

विनिता००२'s picture

31 Jan 2019 - 11:57 am | विनिता००२

सुरेख लिहीलत :)

उपेक्षित's picture

31 Jan 2019 - 12:19 pm | उपेक्षित

अतिशय उत्तम मनोगत

सविता००१'s picture

31 Jan 2019 - 4:34 pm | सविता००१

खूप आवडलं

तुषार काळभोर's picture

31 Jan 2019 - 6:22 pm | तुषार काळभोर

आयुष्य असंच स्वप्नवत, मस्त चाललंय.
पण कधी कधी वाटतं थोडा है थोडे की जरूरत है.
कधी कधी वाटतं, काहीतरी हातातून निसटून चाललंय, पण ते सांभाळण्यासाठी, काय निसटतंय ते तर कळायला हवं ना...

पण मग परत पंचवीस तारखेनंतर तीस तारखेचे वेध लागतात.

समीरसूर's picture

1 Feb 2019 - 4:25 pm | समीरसूर

मन वढाय वढाय...बहिणाबाईंनी अगदी यथार्थ वर्णन केलं आहे मनाचं. सोमवार आला की शनिवारचे वेध लागतात; पंचवीस आली की तीसचे...या नादात महिने कापरासारखे उडून जातात...कित्येक गोष्टी करायच्या राहून जातात. शहराच्या धावपळीत अडकून पडणं कधी कधी त्रासदायक वाटतं. आयुष्य असं तुकड्या तुकड्यात विखुरलेलं राहतं. थोडं कामाच्या ठिकाणी, थोडं घराच्या भिंतींमध्ये, थोडं बायको-पोरं-आई-वडिलांमध्ये, थोडं मित्रांमध्ये, थोडं ट्रॅफिकमध्ये, थोडं मोबाईलमध्ये...आपल्या आत काही शिल्लक राहतं की नाही शंकाच आहे.

एस's picture

1 Feb 2019 - 4:06 am | एस

लेख फार आवडला.

मला काही राहून जातंय असं फारसं कधी वाटलं नाही. उलट हाताशी असलेलं अचानक सोडून द्यावं आणि निर्विकार तटस्थपणे 'इदं न मम' म्हणावं असं बऱ्याचदा घडतं. 'ना खंत ना खेद' असा मृत्यूच्या वेळी हृदयात भाव असावा हीच अखेरची इच्छा. ज्ञानदेव गुहेत ध्यानस्थ झाले आणि शिळा बंद होतानाचा आवाज आला असेल तेव्हा त्यांच्या मनात जी अपार शांतता असली असावी, तशी तृष्णा-दुःख-समाधान-आनंद यांपलीकडे जाणारी निःशब्दता माझिया डोहावर नांदावी!

समीरसूर's picture

1 Feb 2019 - 4:20 pm | समीरसूर

परमोच्च सुखाची अवस्था! इतकं तटस्थ, स्थिर राहता आलं तर सगळेच प्रश्न मिटतील.

सदस्य११'s picture

1 Feb 2019 - 1:37 pm | सदस्य११

अनसीन पास्ट ड्रीम्स! ही विरुद्ध दिशेला जाणारी स्वप्नं. त्यावेळेस कळत नाही की जे आपण जगतोय ते पुढे भविष्यात आपल्याला स्वप्नवत वाटणार आहे. मग नंतर स्वप्नांत रमावं तसं आपण त्या आठवणींच्या आसमंतात घडून गेलेली स्वप्नं रंगवत बसतो.
अगदी नेमकं लिहिलत...खूप सुंदर ! अगदी मनापासून.

मित्रहो's picture

1 Feb 2019 - 3:45 pm | मित्रहो

बरीच जुनी स्वप्न जागी झाली

समीरसूर's picture

1 Feb 2019 - 4:17 pm | समीरसूर

सगळ्यांना मनापासून धन्यवाद!

ज्योति अळवणी's picture

1 Feb 2019 - 9:33 pm | ज्योति अळवणी

आवडलं लेखन. खूपच छान

वीणा३'s picture

1 Feb 2019 - 9:48 pm | वीणा३

सुंदर लिहिलंय, अशी अनेक स्वप्न आठवली, काही पुरी झाली, काही होतील कधीतरी :)

लई भारी's picture

4 Feb 2019 - 11:59 am | लई भारी

अगदी मनातले विचार आहेत हे!
_/\_

ही विरुद्ध दिशेला जाणारी स्वप्नं. त्यावेळेस कळत नाही की जे आपण जगतोय ते पुढे भविष्यात आपल्याला स्वप्नवत वाटणार आहे. 

 कुठेतरी काहीतरी अजून मस्त आहे; इंटरेस्टिंग आहे जे आपण मिस करतोय. ते कुठंय माहित नाही. ते नेमकं काय आहे माहित नाही. 

"फारच अप्रतिम लिखाण...फार आवडला लेख!!! त्या दिवसांमधली हुरहुर फार नेमकी आलीये लिखाणात.

" ऐकतांना कराडच्या दिवसांचा फक्त सुगंध मनात दरवळतो. काहीतरी वेगळंच वाटतं. काय ते नक्की नाही सांगता येत. बहुतेक त्या काळातल्या आपण पाहिलेल्या स्वप्नांची हूरहूर फक्त जाणवते. आणि जाणवतो त्या काळातला निवांतपणा, आसुसलेपणा, काहीतरी हातात पकडण्याचे प्रयत्न. नकळत भूतकाळात पाहिलेल्या स्वप्नांवर जुन्या स्वप्नांची कल्हई चढत जाते. असा हा आठवणी आणि तरल स्वप्नांचा खेळ मनाचा कॅलिडोस्कोप करून टाकतो. अशी एक स्वप्नांची काल्पनिक दुनिया माझ्या मनात कायम घर करून असते. प्रत्येकाचीच अशी एक स्वप्नांची दुनिया असते. ती प्रत्यक्षात कधीच नसते पण हृदयात मात्र नक्की असते. जीवनाच्या प्रवासात जसे जसे आपण पुढे जातो तशी तशी ही दुनियादेखील पुढे जात राहते. या प्रवासात या दुनियेचे रंग बदलत जातात; अर्थ बदलत जातात; घटक बदलत जातात पण या दुनियेचे अस्तित्व कधीही संपत नाही.

एखाद्या दुपारी कार्यालयात बसलेलो असतांना खिडकीबाहेर पाहतो. सगळं शांत असतं. झाडाची पानंदेखील स्तब्ध असतात. कंपनीच्या आवारातले मोठे रस्ते शांत पहुडलेले असतात. क्रिकेट ग्राऊंडवर चिटपाखरू नसतं. फ्लोअरवरदेखील शांतता असते. मनात चलबिचल होते. कुठेतरी काहीतरी अजून मस्त आहे; इंटरेस्टिंग आहे जे आपण मिस करतोय. ते कुठंय माहित नाही. ते नेमकं काय आहे माहित नाही. हे फिअर ऑफ मिसिंग ऑऊट (फोमो) आहे का? नाही. अशी कुठली भीती नाही. दु:ख नाही. खंत नाही. पण मध्येच एक कळ येते. सध्या जे चालू आहे ते वाईट आहे का? तसंही नाही. पण मन असं बुद्धीला बजावत राहतं देअर इज समथिंग मोअर रोमँटिक, इंटरेस्टिंग, अँड एक्सायटिंग ऑऊट देअर समव्हेअर. थोडा वेळ त्या दुनियेत मी रमतो. मजा वाटते. एक चक्कर मारून परत येतो. बरं वाटतं. मला काँशस पातळीवर कळत असतं की असं काहीही नाहीये. पण अशी नुसती चक्कर मारली की बरं वाटतं. ती चक्कर नेमकी कुठे असते हे सांगणं अवघड आहे......

फेरफटका's picture

5 Feb 2019 - 1:29 am | फेरफटका

झकास जमलय समीरसूर! मजा आली वाचताना.

माझीही शॅम्पेन's picture

5 Feb 2019 - 6:53 pm | माझीही शॅम्पेन

समीरसूर
दंडवत स्वीकार रावसाहेब __/\__

समीरसूर's picture

6 Feb 2019 - 2:06 pm | समीरसूर

दंडवत वगैरेसारखं काही नाही हो...जे मनात आलं ते लिहिलं. आपल्याला आवडलं यातच मी भरून पावलो. :-)