माझं "पलायन" २: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
25 Jan 2019 - 4:49 pm

२: धडपडण्यापासून धड पळण्यापर्यंत

डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

माझं "पलायन" १: ए दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के ये है बम्बे मॅरेथॉन!!

मार्च २०१६ मध्ये एका सायकल मोहीमेच्या तयारीसाठी पहिल्यांदाच रनिंगला सुरुवात केली. त्यामध्ये अनेक अडचणी आल्या होत्या. अनेक वर्षांपासून आई म्हणायची की, पहाटे उठून पळायला जा. पण कधीच जावसं वाटलं नाही. पण २०१३ मध्ये सायकल चालवायला (पुन:) सुरुवात केल्यानंतर हळु हळु फिटनेसबद्दल रस वाढत गेला. नंतर सायकलच्या ग्रूप्सवर अनेक रनर्स दिसायचे. आणि सायकल चालवण्याचा स्टॅमिना वाढवण्याची खूप इच्छा होती. तेव्हा मग रनिंग सुरू करायलाच पाहिजे, असं वाटलं. कारण रनिंगमध्ये कमी वेळेत जास्त ऊर्जा लागते. सोप्या भाषेत रनिंगमध्ये सायकलिंगच्या दुप्पट ऊर्जा लागते. त्यामुळे जर रनिंगचा सराव केला तर स्टॅमिना वाढतो. आणि रनिंग चांगलं येत असेल व रनिंगने स्टॅमिना वाढल्यावर सायकल चालवणं सोपं होतं. कारण शरीराला जास्त थकण्याची सवय असेल, तर ते सायकलिंगमध्ये कमी थकतं. म्हणून मार्च २०१६ मध्ये रनिंगला सुरुवात केली.

पण अडचणी ब-याच होत्या. एक तर लोक काय म्हणतील, रनिंग करताना मी कसे दिसेन असं वाटत होतं. शाळेत असल्यापासून सगळे हसायचे! रनिंग तर लांबची गोष्ट, माझ्या चालण्याबद्दलही लोक खूप काही सांगायचे- असा नको चालूस, सरळ चाल इ. इ. त्या सगळ्या गोष्टी मनात होत्या. त्याची भितीच होती. त्यामुळे सुरुवातीला तर फक्त पहाटेच्या अंधारातच रनिंग करावसं वाटायचं. आणि मग अनेक दिवस आळसामुळे उठणंच व्हायचं नाही. त्यामुळे रनिंग करायचं, हे ठरवल्यानंतर प्रत्यक्ष सुरू करेपर्यंत आणखी वेळ गेला. पण हळु हळु सायकलिंगमुळे अशा प्रकारची लाज दूर ठेवायला थोडा शिकलो होतो, त्यामुळे मग मन तयार झालं. आणि निघालो रनिंगसाठी! पहिल्या दिवशी साडेपाच किलोमीटर चाललो. त्यात जेमतेम पाचशे मीटर रनिंग केलं असेन. कारण शरीराला अजिबात सवय नव्हती. थोडं पळाल्यावर जास्त वेळ थांबावं लागायचं किंवा चालावंच लागायचं. सलग दोन- तीन दिवस असं करत राहिलो. जेमतेम शंभर मीटर रनिंग व मग जास्त वॉकिंगच. कसंबसं पाचव्या दिवशी एक किलोमीटर सलग रनिंग करता आलं. त्याला खरं तर रनिंगही म्हणता येणार नाही. जॉगसारखा तो वॉकच होता. आणि थांबावं तर सारखं लागायचं. घाम फार येत होता. त्यामुळे पाण्याची बाटलीही सोबत ठेवावी लागायची. असं अगदीच विचित्र प्रकारे रनिंग सुरू केलं. आणखी काही दिवसांनी मात्र चालण्याची गरज न पडता सलग पाच किलोमीटर थांबत थांबत पण पळता आलं तेव्हा मस्त वाटलं! पण ह्या जॉगिंगची स्पीड मात्र चालण्यासारखीच होती. कारण मध्ये थांबावं लागायचंच.

मध्ये मध्ये मोठी गॅपही पडायची. एप्रिलमध्ये काही रन्स झाल्यानंतर मात्र सलग दहा किलोमीटर पळता आलं. पण वेळ किती लागला हे मात्र विचारू नका! जवळजवळ पावणे दोन तास!! आज हसू येतं. सुरुवातीला अनेक महिने मी ज्या गतीने पळत होतो, त्यापेक्षा फास्ट आज चालतो! स्पीड बाजूला ठेवली तर रनिंगची मजा मात्र नक्कीच येत होती. कोणतीही विद्या शिकताना सगळ्यांत कठीण टप्पा हाच असतो- गोडी येईपर्यंतचा टप्पा. एकदा चव मिळाली की मग आपोआप आपण ती गोष्ट धरून ठेवतो. हळु हळु मग चढाच्या रस्त्यावर- डोंगरावरही पळण्याची हिंमत आली. घाम फारच यायचा, पण मजाही यायची. पण... ह्या काळात सायकलिंगमध्ये गॅप आली, त्यामुळे परत काही महिने रनिंग बंद झालं. मार्च २०१६ मध्ये रनिंग सुरू करूनही पूर्ण वर्षात फक्त २६ दिवस रनिंग केलं. पण आपण जे करून शिकतो, ते कधी विसरत नाही. रनिंग पुन: सुरू होणार होतं व पुढे जाणार होतं.

पुढील भाग- पलायन ३: मंद गतीने पुढे जाताना

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

जीवनमानअनुभवआरोग्य

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jan 2019 - 9:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक अनुभवांची मालिका ! पुभाप्र.

मार्गी's picture

28 Jan 2019 - 2:49 pm | मार्गी

धन्यवाद सर!

नया है वह's picture

2 May 2019 - 2:44 pm | नया है वह

+१