गावाची रचना

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Jan 2019 - 3:35 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

कोणत्याही गावाला पूर्वी शीव असायची. गावातून बाहेर पडायला दरजा असायचा. गावाच्या आजूबाजूला कोट म्हणजे भिंत असायची. अथवा गावांतील घरांची रचनाच अशी असायची की घराच्या पुढच्या दारातून गावात प्रवेश व्हायचा तर मागच्या दारातून गावाबाहेर मळ्यात- खळ्यात वा प्रात:र्विधींसाठी जाता येत असे. या व्यतिरिक्‍त गावाला कुठे कुठे‍ खिंडी असत. या खिंडींमधून पांदीने शेतात बैलगाडीतून जाता येत असे. गावात येणार्‍या व्यक्‍तीला गावाच्या मुख्य दरवाजातूनच गावात प्रवेश करावा लागे. आणि गावाबाहेर जाण्यासाठी सुध्दा.
गावाची शीव वेगळी आणि दरजा वेगळा. गावातून बाहेर पडूनही काही अंतरावर गावाची शीव संपते. दरजा मात्र गावाला लागूनच- खेटूनच असे. गावाचा दरजा (दरवाजा) रात्री बंद करून दुसर्‍या दिवशी सकाळी उघडला जायचा. गावाच्या बाहेर असं म्हणायचं झालं तर लोक ‘दर्जा बाहेर’ असं म्हणायचे. उदाहरणार्थ, ‘दर्जाबाहेर गारूडीना खेळ इयेल शे’ असा उल्लेख होई. गावाच्या या दरवाजाला ‘देवडी’ असंही म्हटलं जायचं.
प्रत्येक गावाला ‘पांढरी’ आणि ‘काळी’ नावाची जमीन असायची. गाव वसलेल्या आणि आजूबाजूच्या जमिनीला ‘पांढरी’ म्हणायचे, तर गावाच्या चहू बाजूला असलेल्या गावातल्या लोकांच्या मालकीच्या शेतीला ‘काळी’ म्हटलं जायचं. (चहू ऐवजी खरं तर गावाच्या तीन बाजूला असं म्हटलं पाहिजे. कारण गावाच्या चौथ्या बाजूला शक्यतो नदी वहायची. आणि नदी हीच गावाची त्या बाजूची वेस ठरायची. अर्थात काही गावांची वेस अजूनही नदीच ठरवते.) गावाची काळी म्हणजे शेत जमीनीची हद्द संपली की दुसर्‍या शेजारच्या गावाची वेस सुरू व्हायची.
आता ग्रामीण भागातल्या कोणत्याच गावाला दर्जा असल्याचं दिसून येत नाही. काही गावांना या दर्जाचे भग्न अवशेष मात्र दिसून येतात. मूळ मुख्य गाव सोडून आता अनेक गावं आडवी- उभी गावाबाहेर वाढली आहेत. अनेक गावातल्या घरांसह रस्त्यांचंही काँक्रेटीकरण सर्वदूर झालेलं दिसेल. शेतीची काळी जमीनही आज नव्या इमारतींखाली दाबली जात आहे.
मात्र पूर्वी असं नव्हतं. गावाला वळसा घातलेल्या कोट भिंतीच्या आत आक्ख गाव गुण्यागोविंदाने नांदायचं. गावातंर्गत अनेक गल्ल्या, वाडे असायचे. कुणबी गल्ली, माळी गल्ली, तेली गल्ली, वाणी गल्ली, धनगर गल्ली, तांबट गल्ली, सोनार गल्ली, पेठ गल्ली, तांबोळी आळी, मधली होळी, भोपळा चौक, चावडी, सुतार वाडा, कुंभार वाडा, लोहार वाडा, खालची आळी, वरची आळी, भिलाटी अशी अनेक नावं राजरोज उच्चारली जात. पोस्टकार्डवर पत्ता म्हणून लिहिले जात. कारण या गल्ल्या- वाड्यांची नावं आज जातीयवादी दिसत असली तरी तशी ती जातीयवादी नव्हती. या गल्लींची नावं सामान्य नावं झाली होती. म्हणून या गल्ल्या- वाड्यांची नावंही कुजबुजत न घेता सार्वजनिकरित्या घेतली जायची. त्यात कोणाला काही वावगं वाटायचं नाही. आपापले भाऊबंद, जातबांधव मिळून एकत्र वस्ती करणे गैर नव्हतं. गावात जाती होत्या पण जातीयता नव्हती. गावातल्या सर्व गल्ल्या आणि वाडे एकमेकांना जोडण्यासाठी काही बोळ असत. बोळीने या गल्लीतून त्या गल्लीत जाता येत असे. मात्र काही बांधव गावापासून थोडं अंतर राखून स्वतंत्र वस्ती करून रहायचे. पारंपरिक चुकीच्या समजूतीमुळे काही लोकांना कमी दर्जाचं समजलं जाई. ते योग्य नव्हतं. ती दरी आज बुजली गेली.
गावात तेली आपली तेलाची घाणी चालवायचा. कुंभार वाड्यात फिरत्या चाकावर मडके बनवताना दिसत. सुतार चौकात करवत- हातोडी तर लोहार चौकात धामण- घणांचे आवाज ऐकू येत. शिंप्याच्या दारासमोरून जाताना शिवण्याच्या मशिनचा आवाज ऐकू यायचा. सोनाराची‍ पिटी पिटी सुरू असायची. या सगळ्या प्रकारच्या आवाजांमुळे गाव जीवंत वाटायचं. गावात दिवसभर सर्वत्र नवीन निर्मिती प्रक्रिया सुरू असायची.
आता गावात सर्वत्र शांतता असते. चावडीवर वा पिंपळाच्या पारावर असलीच तर वयोवृध्द माणसांची वर्दळ असते. अथवा तरूणांचा घोळका टाइमपास करत मोबाईल चमकावत दिसतो. गावातल्या बारा बलुतेदारांचे- कारूनारूंचे पारंपरिक काम आता नव्या शोधांमुळे ठप्प झालेलं आहे. पण नव्याचं स्वागत करत आपली प्रगती प्रत्येकाने करून घेतली पाहिजे.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

हे वाक्य सगळ्यात महत्त्वाचं.
ते वाक्य वाचेपर्यंत लेख नेहमीच्या-गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी-नॉस्टॅल्जिक मार्गे जातो की काय असं वाटलं. शेवटचा परिच्छेद तिकडे वळला देखील होता.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Jan 2019 - 4:44 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

कपिलमुनी's picture

2 Jan 2019 - 12:10 pm | कपिलमुनी

1.वरील वर्णनाचा काळ कोणता आहे?
2. वरील वर्णनाचे भौगोलिक स्थान कोणते आहे? कोकणात असे कोट दरवाजे पाहायला मिळाले नाहीत म्हणून प्रश्न.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 Jan 2019 - 4:46 pm | डॉ. सुधीर राजार...

1. 1970 -1980
2.उत्तर महाराष्ट्र. बागलाण नाशिक

मार्मिक गोडसे's picture

2 Jan 2019 - 5:01 pm | मार्मिक गोडसे

अशा वेशी प्रत्येक गावात नसाव्यात , तालुक्याच्या ठिकाणी असाव्यात.

तुषार काळभोर's picture

2 Jan 2019 - 5:13 pm | तुषार काळभोर

गाव हिवरे (सासवड-कोंढवा रस्ता)
तालुका पुरंदर, जिल्हा पुणे
पूर्ण तटबंदी, एक वेस (ट्रक आरामात जाईल एवढी) अन त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला तटबंदीत एक दरवाजा(एकावेळी दोन माणसे जाऊ शकतील असा)
*****

गाव हडपसर
पुणे
इथे किंचित तटबंदी आणि एक पूर्ण वेस आहे. वेशीच्या वरती साने गुरुजी वाचनालय आहे.

पैलवान, अगदी हाच प्रतिसाद द्यायला इथे आलो होतो.
हिवरे गावात डिट्टो असे आहे आणि सर्व भिंती शाबूत आहेत अजूनही

तुषार काळभोर's picture

3 Jan 2019 - 7:09 pm | तुषार काळभोर

हिवरे गावाची तुम्हाला कशी काय माहिती??
माझ्या मामाचं गाव आहे ते.

पैलवान, माझे गाव तिथून जवळच आहे. त्यामुळे हिवरे येथे बऱ्याच वेळा पै पाहुण्यांकडे येणे जाणे होते...

अशा आखिव रेखीव गावात रहाण्याची मजा काही औरच असावी. छान लिहीलय.

डँबिस००७'s picture

4 Jan 2019 - 1:32 am | डँबिस००७

पांदीत भैटलस, आंगाक खोटलस, अंधार किनाट, घैतलस हातात हात अकस्मात आणि झालो झिनझानाट !!

हि मालवणी भाषैतली कविता आहै त्या कवितैतील पांदी म्हणजे गावाच्या शैतामधली वाट जी दोन्ही बाजुने गर्द झाडीत वैढलेली असते !!