जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १३. अकोला ते रिसोड

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
25 Dec 2018 - 9:35 pm

जे सत्य सुंदर सर्वथा....: १३. अकोला ते रिसोड

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१. चाकण ते केडगांव चौफुला

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):२. केडगांव चौफुला ते इंदापूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):३. इंदापूर ते पंढरपूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):४. पंढरपूर ते बार्शी

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):५. बार्शी ते बीड

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):६. बीड ते अंबेजोगाई

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):७. अंबेजोगाई ते हसेगांव (लातूर)

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):९. अहमदपूर ते नांदेड

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१०. नांदेड ते कळमनुरी

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):११. कळमनुरी ते वाशिम

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१२. वाशिम ते अकोला

२४ नोव्हेंबरची पहाट. आज अकोल्यातून निघायचं आहे. शेवटचे दोन दिवस बाकी आहेत आणि ह्या दोनही दिवशी शतक करायचं आहे. आज रिसोडपर्यंत १०५ किलोमीटर होतील. पण त्यात बरंच अंतर चढ असणार आहे. काल संध्याकाळची चर्चा अजून आठवते आहे. शिवराज पाटील सरांनी म्हंटलं होतं की, महाराष्ट्रात एचआयव्ही असलेल्या मुलांची १९ बाल गृहे आहेत. त्यातली काही बंदही पडली आहेत. ही सर्व खाजगी आहेत, एकही सरकारी नाही. अर्थात् सरकारकडून ह्या बाल गृहांना काही प्रमाणात मदत दिली जाते. काल श्रीकांत कुलकर्णीजींसोबत भेट झाली होती. आजही सकाळी सकाळी ते मला रस्ता दाखवायला आले. इथून वाशिम हायवेला जाण्याचा शॉर्टकट ते दाखवतील. त्यांच्यासोबत सायकल चालवायला सुरुवात केली. काही वेळ मुंबई- नागपूर हायवेवर सायकल चालवली. थोडं धुकं आहे आणि अजूनही गाड्यांचे दिवे सुरू आहेत. थोड्याच वेळात वाशिम हायवेच्या रस्त्याला आलो. मला रस्ता दाखवून श्रीकांतजींनी निरोप दिला. थोडं अंतर कच्च्या रस्त्यावरून पुढे गेलो आणि हायवेला आलो. मालेगांव जहांगीरपर्यंत कालचाच रस्ता असेल. आज शनिवार असल्यामुळे तसं निवांत वाटतंय. चढामुळे जास्त वेळ लागला तरी हरकत नाही. आज वाटेतही काही जण मला भेटतील, छोट्या भेटी होतील.

आपण कोणतंही काम करत असतो, तेव्हा त्यामध्ये मनाची भुमिका फार मोठी असते. मनाचं सहकार्य अतिशय आवश्यक असतं. ह्याला संमोहन असं म्हणता येईल. जर मन तयार असेल, तर कोणतंही कठीण काम करता येतं. त्यामुळे मनाचे सहकार्य मिळवण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात. जर अभ्यास करायचा असेल तर एकटा करण्याच्या ऐवजी गटात केला जातो. त्यामुळे एक संमोहन बनतं, प्रवाह तयार होतो. किंवा खेळांमध्ये सामुहिक स्पर्धा किंवा रेस असतात, ज्यात लोकांना एकमेकांकडून प्रेरणा मिळते. आता ह्या मोहीमेचा तेरावा दिवस असल्यामुळे मन अगदी राज़ी आहे, सहमत आहे! त्यामुळे आज जरा जास्त किलोमीटर चालवायचे आहेत, हे जाणवतच नाही आहे. आणि पायांमध्ये असं काही वारं संचारलं आहे की बस्स! प्रत्येक पेडल मारताना खूप जास्त फोर्स मिळतोय. इतक्या दिवसांच्या मूमेंतममुळे नेहमीपेक्षा २०% जास्त सायकल पळते आहे. चढही आरामात जमत आहेत. पहिला ब्रेक पातूरच्या जवळ घेतला. इथे सायकलचा बोर्ड बघून एकाने फुकटात चहा पाजला. डबल चहा घ्यावा लागला. असे लोक पूर्ण प्रवासात भेटत राहिले.

पातूरच्या पुढे घाट छोटाच होता. आरामात पार झाला. आता मेडशीपर्यंत उतार आहे. इथे एक मोटरसायकल माझ्याजवळ येऊन थांबवली व मलाही त्यांनी थांबायला सांगितलं. ते विरुद्ध बाजूने जात होते, पण मला बघून थांबले. वाशिमचं सायकलिस्ट जोडपं होतं! पती- पत्नी दोघांनीही २०० किलोमीटरची सायकल ईव्हंट केली आहे. काही क्षण त्यांना भेटून पुढे निघालो. पुढे मालेगांव जहांगीरमध्ये त्या तालुक्यात एचआयव्हीवर काम करणारे काही जण व पत्रकार भेटले. त्यांनी माझं स्वागत केलं, त्यांचे अनुभवही शेअर केले. वाशिम जिल्ह्यात कालच कार्यक्रम झाला होता, त्यामुळे तेही मला भेटायला आले. थोडा वेळ त्यांच्यासोबत भेटलो, चहा- बिस्कीट घेऊन पुढे निघालो. आता रस्ता थोडा छोटा झाला आहे, पण तरीही छान आहे. आता हायवेच्या ट्रॅफिकची काळजी नाही. पूर्वी कधीच जिथे गेलो नाहीय, तिथे जातोय. इथेही रस्त्याचं काम सुरू आहे, पण रस्ता उखडलेला नाहीय. एका जागी विशेष बोर्ड दिसला- तापी खोरे समाप्त व गोदावरी खोरे सुरू! म्हणजे इथून पुढे वाहणारं पाणी गोदावरी नदीकडे जाईल. आणि ह्या दरम्यानच माझे १००० किलोमीटर पूर्ण झाले! वा! रिसोडच्या थोडं आधी शिरपूर गावातही एक परिचित डॉ. जाधव भेटले. इथेही स्वागत झालं, थोडं बोलणं झालं. स्वागतात मला रस नव्हता, पण तिथे मिळालं ते एनर्जाल हवंच होतं. शिरपूर गावातून पुढे जाऊन परत रिसोडच्या हायवेला लागलो. अपेक्षेपेक्षा आधीच रिसोडला पोहचेन. आज चढ असूनही तितका जास्त वेळ लागला नाही.

रिसोडला पोहचल्यानंतरही अनेक जण विचारपूस करत आहेत. दोन वाजता रिसोडला पोहचलो. ह्या मोहीमेतलं पहिलं शतक! १०५ किलोमीटर झाले. रिसोड ग्रामीण रुग्णालयात कार्यक्रम झाला. ह्या कार्यक्रमात डॉक्टर, लॅब टेक्निशिअन्स, एएनएम हेही होते. इथे सांगण्यात आलं की, एचआयव्ही टेस्ट केली जाते, तेव्हा करणा-यांनाही फार टेन्शन येतं. टेक्निशिअन वगैरे तर प्रार्थना करतात की, टेस्ट निगेटीव्ह यावी. इथे एका ताईंनी म्हंटलं की, जर लोकांना व समाजाला एचआयव्ही संसर्ग होण्याचे लैंगिक कारणांव्यतिरिक्त इतर जे कारण आहेत, ते कळाले तर कलंकाचा व भेदभावाचा दृष्टीकोन बदलू शकतो. हे काही प्रमाणात खरं आहे. पण तरीही एचआयव्ही संसर्गाचं मुख्य कारण लैंगिक संबंधांशीच संबंधित आहे. आणि बाकीची जी कारणं आहेत किंवा होती, असं म्हणायला पाहिजे- जसं ब्लड ट्रान्सफ्युजन, आईकडून मुलाला संक्रमण अशी कारणं तंत्रज्ञानामुळे आता संपुष्टात येत आहेत. जर तंत्रज्ञानाचा योग्य वापर व जागरूकता असेल तर ब्लड ट्रान्सफ्युजनमधून होणारा एचआयव्ही संसर्ग टाळता येऊ शकतो. अशाच एका चर्चेत एकांनी म्हंटलं होतं की, प्रत्यक्षात एचआयव्ही व्हायरस जितका धोकादायक नाही, तितका विषमता व भेदभावाचा व्हायरस धोकादायक आहे. कारण एचआयव्ही व्हायरस तर शरीरातच असतो, पण भेदभाव व विषमतेची पाळंमुळं खूप खोलवर जातात. बाल गृहांमध्ये बघितलं तसं भेदभाव, विषमता, जागरूकतेचा अभाव व अज्ञान ह्या मुख्य समस्या आहेत. जर काही चमत्कार होऊन ह्या समस्या दूर झाल्या, तर चुटकीसरशी त्या मुलांच्या समस्याही कमी होतील. रोग हा फक्त रोग असला पाहिजे. शरीराचा अर्थच क्षय होणारं असा आहे. एका ठिकाणच्या चर्चेतही म्हंटलं गेलं होतं की, आज मधुमेहसुद्धा बरा न होणारा आजारच तर आहे. पण त्याला "तशा" नजरेने अजिबात बघितलं जात नाही. असो. चांगली चर्चा झाली. माझ्या मुक्कामाची व्यवस्था रुग्णालयाच्या जवळच्या स्टाफ क्वार्टरमध्ये केली गेली. खूप चांगली व्यवस्था आहे व निखाडेजींशी चांगली भेट झाली.

संध्याकाळी माझे जुने ओळखीचे काका डॉ. गणेश देशमुख मला भेटायला रिसोडला आले. रिसोडपासून जिंतूरपर्यंतच्या रस्त्यावर भरपूर चर्चा झाली. उद्या ह्या मोहीमेचा शेवट परभणीत होईल. पण मध्ये रस्ता बहुतेक ठीक नाही आहे. भरपूर चर्चा झाली तरी सस्पेन्स कायम आहे. मी ठरवलं आहे की, लॉजिकली जो सगळ्यांत जवळचा रस्ता असेल, तिथून मी जाईन. बघू कसं होतं. पण आजची मोठी गोष्ट म्हणजे आज माझे एक हजार किलोमीटर पूर्ण झाले! आता फक्त एक दिवस राहिला, पण प्रवासातला रोमांच व सस्पेन्स टिकून आहे!

पुढचा भाग: जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १४. रिसोड ते परभणी

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

समाजजीवनमानलेखअनुभव