उर्वरित खनिजे व लेखमालेचा समारोप

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
18 Sep 2018 - 3:06 pm

(खनिजांचा खजिना : लेखांक ७)

या अंतिम लेखात आपण ५ खनिजांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

मॅग्नेशियम :
हा कॅल्शियम व फॉस्फरसचा हाडांमधला अजून एक साथी आहे.

आहारातील स्त्रोत:
हिरव्या पालेभाज्या, अख्खी धान्ये, वाटाणा, चवळी, बदाम इ. ते भरपूर प्रमाणात असते.

शरीरातील कार्य
मॅग्नेशियम मुख्यतः पेशींच्या आत आढळते. हाडांत त्याचा बऱ्यापैकी साठा असतो आणि तो त्यांच्या बळकटीस उपयुक्त असतो. पेशींत ते जवळपास ३०० एन्झाइम्सचे गतिवर्धक म्हणून काम करते. याद्वारे त्याचे खालील क्रियांत योगदान असते:
१. ऊर्जानिर्मिती
२. DNA व RNA यांच्या उत्पादनात मदत
३. मज्जातंतूंचे संदेशवहन आणि स्नायूंचे आकुंचन
४. हृदयकार्यात मदत
५. पॅराथायरॉइड हॉर्मोन (PTH) च्या कार्यावर नियंत्रण . याद्वारे ते रक्तातील कॅल्शियमच्या पातळीवर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवते.

मॅग्नेशियमचा अभाव
आहारात ते विपुल प्रमाणात असल्याने सहसा त्याचा अभाव होत नाही. खालील विशिष्ट परिस्थितींत तो दिसतो:
१. पचनसंस्थेचे विकार
२. दीर्घकालीन मद्यपान
३. औषधांचे दुष्परिणाम: यांत काही मूत्रप्रवाह वाढवणारी औषधे (उदा. Lasix), जठराम्ल कमी करणारी औषधे (उदा. Esomeprazole) व काही कर्करोग विरोधी औषधांचा समावेश आहे.
*****

क्रोमियम

सूक्ष्म (मायक्रोग्राम) प्रमाणात लागणारे हे खनिज आपल्याला अख्खी धान्ये, मांसाहार, ब्रोकोली आणि द्राक्षातून मिळते. स्वयंपाकात जर स्टीलच्या भांड्यांतून अन्न शिजवले तर त्यातूनही ते मिळते.

शरीरातील कार्य:
आपली रक्तपातळी स्थिर ठेवण्यात इन्सुलिन हे हॉर्मोन महत्वाची भूमिका बजावते. क्रोमियम इन्सुलिनचा पेशींतील प्रभाव वाढवते. वाढत्या वयानुसार ग्लुकोजचा चयापचय मंदावतो. तो टिकवण्याचे बाबतीत क्रोमियम उपयुक्त आहे.

समज-गैरसमज
क्रोमियमचे वरील कार्य बघता त्याने संपन्न केलेली काही खाद्ये बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्टेरॉलने बाधित रुग्णांना फायदा होईल अशी जाहिरात केलेली आढळते. पण, अद्याप असे काहीही सिद्ध झालेले नाही.याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे.
****

सेलेनियम
सूक्ष्म (मायक्रोग्राम) प्रमाणात लागणारे हे खनिज आपल्याला समुद्री अन्न, मांस, अख्खी धान्ये, दुग्धजन्य पदार्थ आणि कठीण कवचाच्या फळांतून मिळते.
शरीरातील कार्य:
ते सुमारे २ डझन प्रथिनांत असते. त्याद्वारे ते खालील कार्यांत मदत करते:
१. DNA चे उत्पादन
२. Antioxidant कार्य
३. जननेन्द्रीयांचे कार्य
४. थायरॉइड हॉर्मोन्सना मदत.

अभावाचे परिणाम: हे फारसे दिसत नाहीत. जगाच्या काही भागांत त्याच्या अभावाने हृदयस्नायूचा दुबळेपणा आणि पुरुष वंध्यत्व झाल्याची नोंद आढळते.
समज-गैरसमज

काही कर्करोग, करोनरी हृदयविकार आणि थायरॉइडच्या आजारांत ते प्रतिबंधात्मक असते का यावर उलटसुलट संशोधन निष्कर्ष आहेत. त्यामुळे सध्या कोणतेही मत देता येत नाही.
***

आयोडीन

याचे शरीरातील एकमेव कार्य म्हणजे थायरॉइड हॉर्मोन्सचा घटक असणे हे होय. यावर मी यापूर्वीच स्वतंत्र लेख लिहीला आहे (https://www.misalpav.com/node/41949).
***
कोबाल्ट

याचे शरीरातील एकमेव कार्य म्हणजे कोबालामिन(ब-१२)या जीवनसत्वाचाचा घटक असणे हे होय. यावर मी यापूर्वीच स्वतंत्र लेख लिहीला आहे (https://www.misalpav.com/node/42982).
***
तर अशी ही शरीरास उपयुक्त खनिजे. त्यांची अनेकविध कामे आपण आतापर्यंत पाहिली. पेशींतील मूलभूत कामकाज, शरीरसांगाड्याची बळकटी आणि अनेक प्रथिनांचे घटक असणे ही त्यापैकी महत्वाची. याबरोबरच उपयुक्त खनिजांचे विवेचन संपले.
***

आता दोन शब्द निरुपयोगी व घातक खनिजांबद्दल. ही खनिजे आपल्या अन्नपदार्थांतून, काही तयार पदार्थांच्या पॅकिंगमधून, प्रसाधानांतून तर अन्य काही नकळतपणे आपल्या शरीरात जातात. त्यापैकी काहींची ही यादी:

अ‍ॅल्युमिनियम, अर्सेनिक, ब्रोमिन, कॅडमियम, शिसे, पारा, चांदी आणि स्ट्रॉन्शियम.

जर ही दीर्घकाळ जास्त प्रमाणात जात राहिली तर त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. त्यांत प्रामुख्याने कर्करोग, मेंदूविकार, मूत्रपिंडविकार आणि हॉर्मोन्सचा बिघाड यांचा समावेश आहे. याबाबतचे विवेचन मी मिपावरील यापूर्वीच्या अन्य काही लेखांत केलेले आहे.
*****************************************

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Sep 2018 - 3:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

अत्यंत किचकट विषयावरची सर्वसामान्य माणसाला समजेल अश्या साध्या सोप्या भाषेतल्या या लेखमालेने सगळ्यांच्या ज्ञानात नक्कीच भर घातली आहे आणि बर्‍याचश्या शंकांचे निरसन केले आहे, यात संशय नाही.

आरोग्यासारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर अजून एक उपयुक्त लेखमालिका लिहिल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद !

टर्मीनेटर's picture

18 Sep 2018 - 4:06 pm | टर्मीनेटर

अ‍ॅल्युमिनियम, कॅडमियम, शिसे, पारा, अर्सेनिक ह्यांप्रमाणेच 'क्रोमियम' देखील शरीरासाठी घातक असते असा माझा गैरसमज होता, तर ब्रोमिन आणि स्ट्रॉन्शियम बद्दल काहीच माहिती नव्हती. चांदी पण शरीरासाठी घातक आहे हे आश्चर्यजनक आहे.

अनिंद्य's picture

18 Sep 2018 - 4:19 pm | अनिंद्य

@ कुमार१,

आधी कर्करोग, इन्सुलिन, कोलोस्ट्रॉल, हिमोग्लोबिन, थायरॉईड, रसायने, चाळणी चाचण्या, जीवनसत्वे आणि आता खनिजे....

तुमच्या आरोग्यविषयक लेखनाने मिपामंच समृद्ध केला आहे.

तुमच्या लेखनाच्या उत्साहाला नमन. _/\_

अनिंद्य

कुमार१'s picture

18 Sep 2018 - 4:20 pm | कुमार१

सा सं
विनंती सादर

अनेक आभार .

चांदी : त्याच्या भांड्यातून पाणी पिणे इतपत अतिसूक्ष्म प्रमाणात च ठीक. अन्नातून जाणे अयोग्य.
काजूकतलीला जो वर्ख लावतात ते बिलकुल अयोग्य.

अनिंद्य :
लेखनाचे निम्मे श्रेय येथील सर्व जाणकार वाचक व प्रतिसादकांना आहे !

लई भारी's picture

18 Sep 2018 - 5:05 pm | लई भारी

आपल्या लेखन सातत्याला आणि विषय समजावून सांगण्याच्या हातोटीला सलाम!
थोडा वाचन बॅकलॉग राहिलाय खनिजांचा, तो संपवतो लवकरच :)

ट्रम्प's picture

18 Sep 2018 - 9:59 pm | ट्रम्प

कुमार साहेब ,
आपल्या शरीरात असलेल्या इतक्या प्रकारच्या अपाय व उपायकारक खनिजांची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद !!!
आता मला प्रश्न पडलाय की युरोनियम आपल्या शरीरात असते का ? गंमत नाही पण खनिजांची इतकी माहिती वाचल्या नंतर युरोनियम बद्दल उत्सुकता वाढली आहे .

कुमार१'s picture

19 Sep 2018 - 7:47 am | कुमार१

ल भा व ट्रम्प , आभार.
युरेनियम हे किरणोत्सर्गी मूलद्रव्य आहे. ते शरीरात नसते .

कुमार१'s picture

19 Sep 2018 - 10:02 am | कुमार१

@ टर्मिनेटर:

ही संबंधित व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांना होऊ शकते. त्यामुळे शरीरातील विविध पेशींत चांदीचे थर साठतात. याला Argyria म्हणतात. चित्र पाहा (सौजन्य :विकिपीडिया)

pict

शलभ's picture

19 Sep 2018 - 11:44 am | शलभ

खूप खूप धन्यवाद डॉक.

दुर्गविहारी's picture

19 Sep 2018 - 12:08 pm | दुर्गविहारी

अतिशय उत्कृष्ट लेखमाला. पार्‍यासंदर्भात काही किस्से सांगतो. स्पेनमधे सिन्नाबारपासून पार्‍याचे निष्कर्शण करणारे कारखाने आहेत. पार्‍याचे दुष्परिणाम ईतके गंभीर असतात कि ते मजुर मेल्यानंतर त्यांच्या हाडावर तांबडे ठिपके दिसतात. आतड्याला पीळ पडला कि पुर्वी पारा गिळायला लाउन त्याचा अपयोग करुन तो पीळ काढण्याचा प्रयत्न केला जाई. अर्थात अशा उपचाराचा परीणाम रोग्याच्या मृत्युने होई. पारा शरीरात गेला कि तो पुन्हा बाहेर काढता येत नाही. अर्थात मकरध्वजमधे हाच पारा वापरला कि तो औषधी होतो हे विषेश.

कुमार१'s picture

19 Sep 2018 - 12:38 pm | कुमार१

नियमित प्रतिसादाबद्दल आभार .

पार्‍याचा किस्सा वाचून वाईट वाटले. अलीकडे वैद्यकात पार्‍याची रक्तदाब उपकरणे बंद करण्याकडे कल आहे. चांगल्या उद्योगांनी तसे निर्णय घेतले आहेत.

प्रमोद देर्देकर's picture

19 Sep 2018 - 1:40 pm | प्रमोद देर्देकर

अतिशय उपयुक्त लेखमाला डॉ साहेब
धन्यवाद .

निशाचर's picture

20 Sep 2018 - 1:54 am | निशाचर

उपयुक्त आणि माहितीपूर्ण लेखमाला. धन्यवाद!

कुमार१'s picture

20 Sep 2018 - 10:15 am | कुमार१

प्रमोद व निशाचर,
सातत्यपूर्ण प्रतिसादाबद्दल आभार.

• मला व्यनितून ‘गंधका’ संबंधी काही लिहिण्याची सूचना आलेली आहे. त्याबद्दल काही माहिती:

गंधक(S) :
१. हे शरीराच्या विविध पेशींत असते. मुख्यत्वे ते काही अमिनो आम्लांचा घटक आहे. यांच्यापासूनच आपली प्रथिने बनतात.

२. रोज अन्नातून शर्रीरात अनेक घातक पदार्थ जात असतात. आपल्या यकृतात त्यांचा निचरा करणारी यंत्रणा असते. त्यासाठी जी रसायने लागतात त्यापैकी active sulphate हे एक महत्वाचे आहे.

३. इन्सुलिन, ब-१ जीवनसत्व यांसारख्या महत्वाच्या पदार्थांत गंधक असते.
आहारातून पुरेसे गंधक मिळण्यासाठी उच्च प्रथिनयुक्त आहार महत्वाचा. लसूण, कांदा व ब्रोकोलीतही ते चांगल्या प्रमाणात असते.

कुमार१'s picture

21 Sep 2018 - 9:43 am | कुमार१

या लेखमालेच्या चर्चेचा समारोप करताना इथल्या चर्चेतली काही निरीक्षणे नोंदवतो.
सोडियम हा मिठाचा घटक आणि मीठ हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे त्यावरील चर्चा रंगतदार झाली. कॅल्शियम व फॉस्फरस हेही माध्यमांतील बहुचर्चित विषय. त्यातील शंकानिरसन हेही छान झाले. रंगीत धातूंत तांबे आणि जलशुद्धीकरण ही चर्चा विशेष रंगली. तांबे व चांदीची तुलनाही रंजक ठरली.

फ्लुओराइड
मात्र काहीसे उपेक्षित राहिले. एकंदर समाजात नजर टाकता एक गोष्ट नेहमी जाणवते. आपण आपल्या ‘शरीरा’च्या समस्यांविषयी जेवढे जागरूक असतो तेवढे त्याचाच घटक असलेल्या दातांविषयी नसतो. वयाच्या ४५ नंतर काही त्रास नसेल तरीही एक वार्षिक चक्कर दंतवैद्याकडे टाकून एक निरीक्षण करून घ्यायचे असते. आपल्यातील कितीजण हे करतात? रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे अत्यावश्यक असते याची जाणीव सर्वांना असते का? दातांकडे विशेष लक्ष वेधण्यासाठीच फ्लुओराइडवर स्वतंत्र लेख लिहीला होता.

एका वाचकाच्या सूचनेनुसार लेखमालेत गंधकाची भर घालता आली.
घातक खानिजांत पारा व चांदी याबद्दल वाचकांचे कुतूहल दिसून आले.

एकंदरीत तुम्हा सर्वांशी समाधानकारक चर्चा झाली त्याचा आनंद वाटतो. तुमच्या पूरक माहितीने माझ्या ज्ञानात भर पडली.
धन्यवाद !

pspotdar's picture

22 Sep 2018 - 1:33 am | pspotdar

Hi Sir,

As per discussion we know Silver (Ag) not needed for our body chemistry, still we have product "Sona-Chandi" Chavanyaprash. Just want to know these elements (in periodic tables) are not needed for us as a medicine

Thanks and Regards

कुमार१'s picture

22 Sep 2018 - 9:04 am | कुमार१

च्यवनप्राश बद्दल काही अभ्यास नाही माझा .

कुमार१'s picture

28 Sep 2018 - 6:46 pm | कुमार१

pict

कुमार१'s picture

28 Sep 2018 - 6:48 pm | कुमार१

क्षमस्व.

सुबोध खरे's picture

28 Sep 2018 - 7:17 pm | सुबोध खरे

असू द्या हो
चित्र फारच छान आहे

कुमार१'s picture

28 Sep 2018 - 7:29 pm | कुमार१

कालांतराने त्याचा उलगडा करेन. अन्य एका लेखाची चाचणी घेताना हा प्रकार झाला आहे !

कुमार१'s picture

23 Dec 2021 - 2:51 pm | कुमार१

पुण्यात बटाटवडा, भजी यासारखे गरम खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून दिल्याचे आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे

वर्तमानपत्र छपाईत वापरण्यात येणाऱ्या शाईत शिसे व अन्य रसायने असल्याने गरम खाद्यपदार्थांच्या संपर्कात आल्यावर ती विरघळतात आणि ते आरोग्यास घातक असते.

अंमलबजावणी कडक व्हावी ही इच्छा !