बदमाश अँथनी स्मिथ भाग २

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
4 Sep 2018 - 3:23 am

शिवाजी महाराजांच्या सुरतच्या लुटीच्या कारवाईची मोहीम

पाद्री रेव्हरंड एल इस्कालियट एका पत्रात म्हणतो, 'अँथनी स्मिथ सुटून आल्यावर सांगत असे कि काय आणि किती लूट केली होती शिवाने. तो म्हणाला, मी पाहिलं ना, अश्शा थप्प्या लागल्या होत्या पैशांच्या राशींच्या! २० - २५ (हंड्रेड थाउजंड) लाख तरी रोकड लुटले रोकड! शिवाय ३०० हमालांकरवी मोठ्या पिशव्यात, पोत्यात हिरे, मोती, माणके, असे जड जवाहिरे गच्च भरायच्या कामाला लागले होते त्यांचे सैनिक. विरजी व्होरा, जो त्या वेळी जगातला सर्वात श्रीमंत व्यापारी होता त्या एकट्या कडून ८० लाखाचा माल जप्त केला होता. दुसरे दोन व्यापारी हाजी झाहिद बेग, हाजी कासीम, शिवाय डच, पोर्तुगाली, इंग्रज, अरब, ज्यू, तुर्की, इराणी, पारशी असे अनेक व्यापार उद्योगात असलेल्यांच्या पेढ्या, गोडाऊनातील बाहेरून आलेला व चाललेला माल तीन दिवसात भरभरून लुटून नेला गेला. विचार करता १० दशलक्ष रुपये (एक कोटी) लूट मिळाली हे गणित बरेच बरोबर असायची शक्यता आहे असे मेहेंदळे यांचे म्हणणे सत्यतेच्या आसपास असेल असे संकेत देतात. असो.
मुगलांचा सरदार इनायतखानला शिवा ५० किमीवर असताना सूरतकडे येतोय असे समजले होते. पण तो १० हजार सैन्य घेऊन अहमदाबादला मुघल बादशहाच्या बाजूने लढायला जात आहे या त्यांच्या जासूसांच्या बोलण्यावर विसंबून गप्प बसून राहिला. तो शिवा खरोखरच मुघलांच्या बाजूने लढायला येऊ शकतो यावर त्यांचापैकी काही लोकांचा विश्वास बसत नव्हता! पण ८ किमी अंतरावर उधना गावात ५ जानेवारी १६६४ ला तो आलाय हे कळताच सर्वांची गाळण उडाली.
एकदम घाबरून धावाधाव सुरू झाली. इंग्रज आणि डच वखारीतील बंदरातून आलेल्या व चाललेल्या मालाला वाचवायला त्यांच्या उंच उंच भिंती, त्यावर तोफा ठेवायची सोय, ४० हत्यारबंद सैनिक, असे होते. त्या वेळी सर जॉर्ज ऑग्झेंडेन नेव्हीतील कमांडर कमांड करत होता. त्याला सुरतच्या मुख्य कार्यकारी संचालकांनी सांगितले की इथून सुवाली (स्वाली हा इंग्रज लोकांचा उच्चार) च्या बंदरावर पळून जायचे नाही कारण जर आपण म्हणजे डच व इंग्रज, देखील गेलो तर स्थानिक लोकांचा आपल्यावरील विश्वास नष्ट होईल. म्हणून ते जॉर्जच्या नेतृत्वाखाली शस्त्रे सरसावून बसले. त्या जॉर्ज ऑग्झेंडेन याने पळपुट्या सुरतकरांना धीर दिला. आपल्या जागेतून मराठ्यांच्या सैनिकांच्या हल्ल्याला प्रतिउत्तर देऊन आपल्याकडील मालसामान व लोकांना बचावले. या त्यांच्या धैर्य आणि साहसाची सर जॉर्ज ऑग्झेंडेनना सन १६६८ साली कंपनीने गोल्ड मेडल व २०० पौंड तर अन्य सहकार्‍यांना व तेंव्हा नांगरलेल्या जहाजावर काम करणाऱ्या नोकरांना रोख, रक्कम देऊन गौरविण्यात आले. इनायत खानची गच्छंती झाली. सुरतच्या भोवती दगडी कोट उभा करण्याचा निर्णय घेतला गेला. औगजेबाने इंग्रज आणि डचांना एका वर्षाचा कस्टम्स कर न भरण्याची सूट दिली.
५ फेब्रुवारी १६६४ ला शिवाजी लुटीच्या मालासकट राजगडावर परतला. तो किनार्‍यालगतच्या वाटेने येताना पोर्तुगीजांच्या अखत्यारीतील वसई भागातून गेला असावा कारण निदान असा संशय घेऊन मोगलांनी चिडून पोर्तुगीजांवर हल्ला केला.
पुढे बरीच वर्षे सुरत ची सूरत बिघडलेल्या अवस्थेत होती. शिवाजी महाराजांच्या बद्दल इंग्रजीतून पत्रात म्हटले आहे की शिवाजी हा आपल्या 'नटोरियस' चोर्‍या करण्यासाठीच्या कुप्रसिद्ध कामाने इतका प्रसिद्ध आहे (so famously infamous for his notorious thefts) कि त्याला पंख असावेत, तो हवेतून जात असावा कारण नाहीतर एकाच वेळी अनेक ठिकाणी तो असतो यावर विश्वास ठेवणे कठीण आहे! असो.
अँथनी स्मिथ याने दोन बंगाली इतिहासकारांच्यामधे काही शे वर्षांनंतर भांडण लावून दिले! सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाईम्स पुस्तकात म्हटले की एक तरुण इतिहासकार (अँथनी) स्मिथच्या गोष्टीला मानत नाहीत. ते म्हणाले की स्मिथने वेगवेगळ्या वेळी व संदर्भात थापा मारल्या होत्या व त्याला शिक्षा झाली होती. पण नंतर ती ही पुराव्यात टिकली नाही. नोकरीकरून तो नंतर तीन वर्षे उजळमाथ्याने सुरतेत बायको पोरांना घेऊन राहात होता! शिवाय रुस्तुम कैकुबाद या पारशाने आपल्या पुस्तकात हीच गोष्ट घडली असे म्हटले आहे! वगैरे वगैरे...
मेहेंदळे यांनी म्हटले आहे की तो तरूण इतिहासकार डॉ सुरेंद्र नाथ सेन होते. अँथनी सुरतेत तीन वर्षे राहिला हे खरे पण त्याला नोकरीवरून डिसमिस केले गेले होते हेही तितकेच खरे होते. रुस्तुम माणेक पुस्तकाची साक्ष खरी नाही. जमशेद कैकोबाद हे रुस्तुम मानक यांच्या मुलाचे शिक्षक होते. त्यांनी ६१० श्लोकात काव्य रचून नंतर त्याचा गुजरातीत भाषांतर करून सन १९०० मधे प्रकाशित केले. शिवाने १० हजार रुपये घेऊन रुस्तुम ला सोडून दिले असे काव्य सुचवते. शिवाय जे स्मिथ म्हणतो की माझ्या समोर अनेकांना माझ्या समोर मारले ते कैकोबाद म्हणत नाहीत!
सुरतच्या कुठल्या लुटीच्या बद्दल लिहिले होते ते नक्की कळत नाही! वगैरे डॉ सेन यांच्या टीकात्मक आरोपात मेहेंदळे यांना तथ्य वाटते. सर जदुनाथ सरकार काही गोष्टी मानतात. म्हणून ते बरोबर असे नसते. असो...
भाग २ समाप्त. पुढे चालू...

मांडणीआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

4 Sep 2018 - 9:18 am | आनन्दा

अजून तरी बऱ्याच गोष्टी डोक्यावरून जातायत.. कदाचित पुढील भागात उलगडा होईल.

खटपट्या's picture

4 Sep 2018 - 12:45 pm | खटपट्या

अजुन येउद्या !!

दुर्गविहारी's picture

4 Sep 2018 - 8:21 pm | दुर्गविहारी

मस्तच ! अतिशय रोचक ईतिहास लिहीत आहात. शिवाजी महाराजांच्या स्वारीच्या वेळीच ईनायतखान सुरतेच्या किल्ल्यात लपून बसला होता. शहर त्याने अक्षरशः वार्‍यावर सोडले होते असे म्हणायला हरकत नव्हती.मात्र याच काळात ईंग्रजांनी परेड काढून अनोख्या धैर्याचे प्रदर्शन केले. अर्थात महाराज केवळ संपत्तीसाठी आले असल्याने वेळ वाया जाउ नये यासाठी ईंग्रजांच्या नादी लागले नाहीत. याच स्वारीच्या वेळी शिवाजी महाराजांचे एक पेन्सील स्केच काढले गेले.
अजून एक संदर्भ धाग्यात यायला हरकत नव्ह्ती, तो म्हणजे बहिर्जी नाईकांचा. कदाचित तो पुढच्या धाग्यात येईल अशी अपेक्षा करतो. आणखी असेच धागे येवोत या प्रतिक्षेत.

शशिकांत ओक's picture

5 Sep 2018 - 12:24 am | शशिकांत ओक

शिवाजी महाराजांच्या संदर्भात बहिर्जी नाईक यांच्या हेरगिरीच्या कथा प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ते महाराजांच्या सैन्यामधे जेम्स बाँड च्या धर्तीवर काम करत असावेत. असा विचार मनांत येतो. प्रत्यक्षात हेरगिरी हे विशेष प्रशिक्षित तज्ज्ञ लोकांचे सामुहिक कार्य आहे. ते करायला वेगवेगळ्या गटांना, कामाला लावून त्याच्याकडील माहितीची छाननी करून एक्शनेबल डेटा तयार करून मग तो कमांडरच्या हाती दिला जातो. त्यावर विचार विनिमय करून पुढील कारवाईसाठी आखणी किंवा योग्य ते बदल करून आपले ध्येय, लढाई वगैरे जिंकायची असते.
बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाखाली अशी मोक्याच्या क्षणी व ठिकाणी लोकांची पेरणी केली गेली असावी. व त्यांच्या बातम्यांचा लढाई नियोजनात भरपूर उपयोग झाल्याचे स्पष्ट दिसून येते. म्हणून शेवटी जरी बहिर्जी नाईक यांच्या नावाचा श्रेय म्हणून उल्लेख झाला तरी त्यांच्या खाली खूप लोक कामाला लागलेले होते असे मानायला हरकत नसावी.
या सूरत लुटीच्या पेक्षा १६७० मधील लुटीत हेरगिरीचे नियोजन जास्त प्रभावी झाल्याचे दिसून येते. कारण १६६४ च्या लुटीनंतर शहाणे होऊन अनेक पेढ्यांचे जडजवाहीर आणि रोकड सुरतेत न ठेवता आसपासच्या परिसरातील खेडेगावात लपवून ठेवली जात होती. ती ठिकाणे, गढीवजा चौक्या, बंदरात कुठली जहाजे व माल जमा आहे याची बितंबातमी महाराजांच्या सेनेला मिळाल्याने ते जाळपोळीच्या नादी न लागता, हव्या त्या ठिकाणी जाऊन माल मिळवून परत परत खेपा करून जमा केलेल्या मालाला स्थानिक मालवाहू बैल, गाढवे, घोडे आणि काही उंट यांचा तांड्यांना कामाला लावून मालाचा उठाव करून भराभर जायच्या तयारीत होते.... असो या लुटीवर चर्चा नंतर कधीतरी.
.

नुकतेच लोकसत्तामधे "जो आला ओ रमला" या सदरामधे काही रोचक माहिती मिळाली. त्याच्या लिंक देतो.
सर जॉन चाइल्ड (१)

जे आले ते रमले.. : सुरतच्या वखारीचा अध्यक्ष जॉन चाइल्ड (२)

जे आले ते रमले.. : सुरतच्या वखारीचा अध्यक्ष जॉन चाइल्ड (२)

शशिकांत ओक's picture

6 Sep 2018 - 12:34 pm | शशिकांत ओक

लेख माला ाआवडली

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2018 - 12:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेखमाला ! नेहमीच्या (शालेय) इतिहासात न दिसणारी बरीच रोचक माहिती समजत आहे. लिहित रहा.