‘स्त्री – पुरूष संबंधांची गीता’

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Aug 2018 - 5:20 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ हे पुस्तक वाचल्याने कोणाचाही तथाकथित वंशाभिमान समूळ डळमळल्याशिवाय राहणार नाही. या विषयावरची इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांची टिपणे 1923 साली पुण्याच्या ‘चित्रमयजगत’ नियतकालिकात छापली गेली. टिपणांच्या आधाराने त्यांचे या विषयावरील विस्तृत निबंध ‘संशोधन’ मासिकात 1925 साली छापायला सुरूवात झाली. पुढे एका पुस्तकाच्या संदर्भान्वये कॉ. एस. ए. डांगे यांनी सुचवल्यामुळे हे पुस्तक 31 डिसेंबर 1976 ला डांगे यांच्या दीर्घ, विस्तृत, चिंतनशील आणि विवेचक प्रस्तावनेसह पुण्याच्या प्रागतिक पुस्तक प्रकाशनाने (नंतर लोकवाड्‍.मय गृहाने) प्रकाशित केले. मात्र हा ग्रंथ परिपूर्ण नाही आणि अपूर्णही नाही. राजवाडे यांनी या विषयावर लिहिलेले अजून काही मौलिक निबंध होते, परंतु ते उपलब्धन न झाल्याने या पुस्तकात समाविष्ट होऊ शकले नाहीत. आणि पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते अजूनही सापडले नाहीत.
निबंध लिहिण्यासाठी राजवाडे यांनी काढलेली प्राथमिक टिपणे, स्त्री- पुरूष समागम संबंधातील कित्येक अतिप्राचीन चाली, स्त्रियांचे वंशप्रवर्तकत्व व प्रजापतिसंस्था, आतिथ्याची एक आर्ष चाल, अग्नि व यज्ञ, लग्नसंस्था : एक टिपण, विकार- विचार प्रदर्शनाच्या साधनांची उत्कांती आदी विषयांच्या निबंधात वैचारिक मंथन करून साधार असे योग्य ते निष्कर्ष वाचकांसमोर ठेवले आहेत. राजवाड्यांनी इतरत्रही इतिहासशास्त्र, भाषाशास्त्र, साहित्यशास्त्र, समाजशास्त्र आदीत अष्टपैलू क्रांतीकारी संशोधन केले आहे.
आर्ष कालीन शरीर- संबंधांची मांडणी वेदसंहिता व महाभारतातील पुराव्यांवर आधारलेली आहे. अनिर्बंध शरीर संबंधांची कालांतराने पुढे प्रगती होत त्याची परिणती विवाह संस्थेत झाली, हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. वर्ण आणि जाती- संस्था आर्यांनी का, कशा आणि कधी निर्माण केल्या असाव्यात याचे चिंतनही ग्रंथात येते, ते मुळातून वाचले पाहिजे.
श्वेतकेतूने परपुरूषसंग निषिध्द ठरवत परस्त्रीसंग त्याग करावा असा उठाव केला होता. यावरून विवाहमर्यादा ही प्राचीन प्रथा नाही, ती एक कृत्रिम आणि अलीकडील समाजमान्य व्यवस्था असल्याचे राजवाडे यांनी साधार दाखवून देण्याचे धाडस विसाव्या शतकाच्या सुरूवातीला केले. म्हणून भारतीय विवाह संस्थेचा स्थापक हा श्वेतकेतू ठरतो. यावरून तात्कालिक समाजाच्या जीवन- जाणिवा आजच्या काळातील जीवन जाणिवांपेक्षा पूर्णपणे विरूध्द होत्या हे अधो‍रेखित होते. आजच्या काळात कोणी एका स्त्रीने वा पुरूषाने असे वागणे म्हणजे शुध्द व्यभिचार ठरेल.
सरमिसळ समागम, अतिथीला स्वस्त्रीसमर्पण, पशूसमागम, गुरूपत्नीगमन, बहुपतित्व, अल्पकालीन वा अटींचे विवाह अतिप्राचीन काळात होते. दासी वा स्त्री इतरांना भेट दिली जायची. यज्ञाच्या आजूबाजूला बसून उघड्यावर यभनक्रिया केली जात होती. यज्न्च‍ हे वाक्य होते. त्याचा अर्थ ते जमतात व यभनक्रिया करतात, असा होतो. कालांतराने यज्ञ हे नाम झाले आणि त्याचा अर्थ बदलला. पवित्र झाला.
राजवाड्यांनी धार्मिक ग्रंथातील पुराव्यांसह लिहिलेल्या या संशोधनातील अवतरणे आज एकविसाव्या शतकात सुध्दा जसेच्या तसे उदृत करायची हिम्मत होत नाही. राजवाड्यांनी 1923 च्या आसपास हे सर्व निर्भिडपणे कसे मांडले असेल याचे आश्चर्य वाटते. या पुस्तकातले पहिले प्रकरण ‘चित्रमयजगत’ मध्ये प्रकाशित होताच वाचकांत भयंकर वादळ उठले. पुढचे भाग छापाल तर छापखाना जाळून टाकू, अशी संपादकाला धमकी मिळाली होती.
वेद आणि महाभारतातील संदर्भ देताना राजवाडे अरब, पर्शियन, टाहीटियन असे जागतिक संदर्भही सहज सांगून जातात. ग्रीक, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, पॉलिनेशिया, मोंगोलिया, युरोप आणि इतर बहुतेक सर्व देशांत- खंडात परपुरूषाला आपली स्त्री अर्पण करण्याची प्रथा होती. म्हणजे थोड्याफार फरकाने ही परिस्थिती जगात सर्वत्र होती आणि या संबंधां‍विरूध्दचे उत्थापन पायरी पायरीने होऊन आज जगात विवाह संस्था स्थिर झाली, असा निष्कर्ष निघतो. म्हणून हे पुस्तक जागतिक विवाह संस्थेचा इतिहास ठरतो.
आर्षसमाजात (अतिप्राचीन काली) आई, भाऊ, बहिण, बाप, मुलगी, पुतणी, मावशी, चुलता, चुलती, मामा, मामी, आत्या, चुलत बहिण इत्यादी बहुविध नाती नव्हती. मात्र आईसाठी जनि ही संज्ञा अस्तित्वात होती. जनि म्हणजे जन्म देणारी. प्राचीनकाळी अपत्यांची आई निश्चित असे. म्हणूनच मुलगा आईच्या नावावरून ओळखला जायचा. बापाच्या नव्हे. उदा. राधेय: कौंतेय:, कार्तिकेय:, दानव:, कालेया: आदी. शरीर संबंधात जसजशी उत्तरोत्तर समज येत गेली असावी तेव्हा विवाह होऊ लागल्यानंतर बाकीची नाती पायरीपायरीने निर्माण झाली असावीत.
याच काळात स्त्रियांवर पुरूषांची सत्ता पक्की झाली. स्त्रियांचे स्वातंत्र्य टप्याटप्याने हिरावून घेतले गेले. अनेक स्त्रिया कोणाच्या तरी मालकीच्या असत. पुढे महिला पुरूषांच्या गुलाम झाल्या. विवाहाने प्राप्त झालेल्या तर काही गुलाम- दासी म्हणून पुरूषाच्या सानिध्यात राहू लागल्या असाव्यात. स्त्रियांपासून होणार्याच अपत्यांतही वर्गवारी होऊ लागली. योनिज प्रजा आणि अयोनिज प्रजा असे ते वर्गीकरण होते. योनि म्हणजे गृह. योनिज म्हणजे घरात जन्मलेले मूल व ‍अयोनिज म्हणजे घरात न जन्मलेले, घराबाहेर जन्मलेले वा यज्ञमंडपात जन्मलेले मूल. यज्ञात ऋत्वि जांकडून प्रजोत्पादन झालेली मुले म्हणजे अयोनिज प्रजा. पुढे आपल्या शारीर आनंदासाठी नियोग, घटकंचुकी अशा गोष्टी चतुर पुरूषांनी शोधून काढल्या असाव्यात.
कोणाची पर्वा न करता- भीडमुर्वत न ठेवता राजवाडेंनी वस्तुनिष्ठ सत्य आपल्यापुढे साधार मांडले आहे. आज हा ग्रंथ मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय आणि मानवी- लोकसंस्कृतीचा दस्ताऐवज ठरला असून याला पारंपरिक स्त्री- पुरूष संबंधाची गीताही म्हणता येईल.
राजवाडेंचे भाषात्पत्तीच्या सदंर्भातले विस्तृत टिपणही या पुस्तकात समाविष्ट झाले आहे. ध्वनींच्या अनुकरणातून भाषात्पत्ती झाली. माणूस त्या त्या प्राण्याला त्याच्या विशिष्ट आवाजावरून नाव देऊ लागला. जसे की, कावकाव करणार्याच पाखराला काक नाव दिले. भृंग आवाज करणार्याल किटकाला भृंग नाव दिले. बर्यााच प्राणीनामांचा शब्दानुकरण जन्म आहेत. ‘विशिष्ट ध्वन्यादी आघातांवरून वस्तूंना नामे देण्याचा शोध माणसाला लाखो वर्षांपूर्वीच लागलेला आहे.’ (पृ. 96)
‘पदार्थदर्शक शेकडो ध्वनींचा साठा मनुष्याजवळ साचतो. मनुष्याचा हाच पहिला शब्दकोश. सजीव पदार्थदर्शक ध्वनीबरोबरच धडपडणे, घोरणे, हुंगणे, फरफटणे, कुरकुरणे, थापणे, थापटणे इत्यादी ध्वनींना तो नामाथू लागतो.’ (पृ. 96)
‘माणसाला भाषेतल्या नाम आणि क्रिया ह्यांच्या दर्शक ध्वनींचा शोध लागतो. येथेच परिपूर्ण भाषा निर्माण झाली. (पृ. 96)
‘भाषा म्हणजे मुखातून निघू शकणार्याा शब्दांनी क्रियांचे व पदार्थांचे आविष्करण करण्याची कला.’ (पृ.96)
ही राजवाडे यांची भाषेसंदर्भातली मौलिक अवतरणे जशीच्यातशी मुद्दाम दिली आहेत. त्यावर वेगळे भाष्य करायची आवश्यकता वाटत नाही. भाषेसोबतच भ्रांत कला, वास्तव कला, देव कल्पना, लोकभ्रम, रेखन, हावभाव, अभिनय, भांडी, नृत्य, गान, चित्रण, काव्य, नाटक, स्थापत्य, वाद्य यांचेही‍ चिंतन राजवाडे मुळातून करतात.
(दिनांक 5-8-2018 च्या ‘महाराष्ट्र टाइम्स’, संवाद पुरवणीतल्या ‘दुर्मीळ’ सदरात प्रकाशित. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाङ्मयसमीक्षा

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

15 Aug 2018 - 5:54 pm | जेम्स वांड

लेख अजिबात आवडला नाही. कारण तो अतिशय एकांगी वाटतोय आणि राजवाड्यांच्या पुस्तकाला नको तितके उदात्त स्वरूप द्यायचा प्रयत्न भासला मला तरी. राजवाडे पूज्य असले तरी हे असे खास त्यांना आवडले नसते असे आपले आमचे मत. विवाहसंस्था पुस्तक उत्तम रिसर्च करून लिहिलेलं असलं तरी ते तत्कालीन साधनांवर अवलंबून होते, त्यातले बरेचशे आक्षेपार्ह दावे खोडले गेले आहेत का? ,असल्यास टीकासार कशावर अवलंबून आहे त्याचा बेस काय होता ह्याचाही थोडा मागोवा घेतला असता तर आवडलं असतं.

मला पर्सनली वाटतं लेख म्हणजे विषय प्रवेश गाभा लेखकाची मते लेखकाची साधने लेखावर/पुस्तकावर लिहिली गेलेली टीका आणि लेख लिहिणाऱ्याचे स्वतःचे मत असे असावे.

बाकी मांडणी तर ठीकच!

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Aug 2018 - 5:24 pm | डॉ. सुधीर राजार...

आपले स्पष्ट मत आवडले. आपल्या भूमिकेचे स्वागत. धन्यवाद. इतर दृष्टीकोन असू शकतात वा पुरावेही.

वि का राजवाडे हे सणकी गृहस्थ होते काय?त्यांच्याविषयी अजुन माहिती वाचायला आवडेल. त्यांनी कुठली तरी लुप्त लीपीही शोधली होती व ते हाताने (स्वतःचे ) स्वयंपाक करीत होते असे वाचल्याचं आठवले.

जेम्स वांड's picture

15 Aug 2018 - 7:16 pm | जेम्स वांड

असे असले अन राजवाडे सणकी असले तरी

ते हाताने (स्वतःचे ) स्वयंपाक करीत होते असे वाचल्याचं आठवले.

ह्याच्यामुळे त्यांच्या इतिहासाच्या ज्ञानावर काही खास फरक पडत असेल असे वाटत नाही.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Aug 2018 - 5:25 pm | डॉ. सुधीर राजार...

माहीत नाही. धन्यवाद. पुस्तके वाचूनच परिचय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2018 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>राजवाड्यांनी 1923 च्या आसपास हे सर्व निर्भिडपणे कसे मांडले असेल याचे आश्चर्य वाटते. 

सहमत...!

बाकी पुस्तक खुप माहितीपूर्ण आहे.

-दिलीप बिरुटे

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Aug 2018 - 5:26 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

खरंच पुस्तक माहितीपूर्ण आहे , आणि मिपावर ' असले ' लेख वर्ज्य नाहीत हे पाहून आनंद झाला . सतत शिष्टपणे वाचून , वागून कंटाळा येतो .

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Aug 2018 - 5:26 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद

सोमनाथ खांदवे's picture

15 Aug 2018 - 9:28 pm | सोमनाथ खांदवे

( या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.) या सुचने बरोबरच ( मी हा लेख ऐसी अक्षरे , पॉर्न विशेषांक मधून उचलला आहे ) असं पण टंकवल असत तर बरं झाले असते .

उपयोजक's picture

15 Aug 2018 - 9:39 pm | उपयोजक

मी हा लेख ऐसी अक्षरे , पॉर्न विशेषांक मधून उचलला आहे.

हा काय प्रकार? लिंक द्याल का?उचलेची?

सोमनाथ खांदवे's picture

15 Aug 2018 - 9:58 pm | सोमनाथ खांदवे

माफ करा देवरे जी उर्फ उपयोजक जी ,
'तो' लेख वेगळा आहे , मी चुकून केलेले वादग्रस्त वक्तव्य मिपाच्या संसदीय कामकाजातुन काढून टाकावे ही विनंती .
पण त्या निमित्ताने एक डू आय डी सापडला हे ही कमी नसे .

शब्दबम्बाळ's picture

16 Aug 2018 - 5:13 am | शब्दबम्बाळ

तुमचा डुआयडी अनालिसिस गंडला आहे! :D
शोधा बरे कुठे ते...

प्रमोद देर्देकर's picture

16 Aug 2018 - 9:54 am | प्रमोद देर्देकर

पण त्या निमित्ताने एक डू आय डी सापडला हे ही कमी नसे .

हे कसं बुवा तुम्ही जाणलत ?

आता मी हा प्रश्न विचारला की मीही देवरे म्हणून हाकाटी पिटा मग झालं .

उपयोजक's picture

16 Aug 2018 - 10:53 am | उपयोजक

माफ करा देवरे जी उर्फ उपयोजक जी

हा शोध कुठून लावलात? हे देवरे कोण?इतक्या ठामपणे चुकीचा तर्क कसा केलात?

सतिश गावडे's picture

16 Aug 2018 - 12:11 pm | सतिश गावडे

तुम्ही ऐसीवरील कुणीतरी आहात हे या निमित्ताने कळले. :)

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Aug 2018 - 5:27 pm | डॉ. सुधीर राजार...

पण तसं नाही ना म्हणून

सर्व प्रथम हे नोंदवतो कि मी राजवाडेंच्या लेखनाच्या निसटत्या बाजू मांडत नाही., राजेवाडेंचे पुस्तक बरेच मागे वाचले आहे, आंतरजालावर कुठल्याश्या दुव्यावर उपलब्धही असावे. पण या क्षणी मी ते वाचून अथवा तुलना करुन लिहित नाही. केवळ देवरे सरांच्या उपरोक्त लेखाच्या मला जाणवणार्‍या निसटत्या बाजू मांडतो आहे.

१) विवाह संस्था आणि भाषा याचा राजवाडेंनी काही अन्योन्य संबंध दर्शविला होता का कल्पना नाही किमान देवरे सरांच्या लेखावरुन तसे काही दिसत नाही तेव्हा लेखाच्या शेवटी भाषा विषयाच्या चर्चेचे नेमके प्रयोजन पुरेसे स्पष्ट होत नाही. तेव्हा त्याला न वाचताच पास.

२) कोणाची पर्वा न करता- भीडमुर्वत न ठेवता राजवाडेंनी वस्तुनिष्ठ सत्य आपल्यापुढे साधार मांडले आहे. आज हा ग्रंथ मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय आणि मानवी- लोकसंस्कृतीचा दस्ताऐवज ठरला असून याला पारंपरिक स्त्री- पुरूष संबंधाची गीताही म्हणता येईल. त्या आधिच्या एका परिच्छेदात धागा लेखक देवरे सर म्हणतात "... राजवाड्यांनी धार्मिक ग्रंथातील पुराव्यांसह लिहिलेल्या या संशोधनातील अवतरणे.."

पुराणांमधील संदर्भ इतिहासाची प्रमाण साधने म्हणून का स्विकारता येत नाहीत या बद्दल माझा मिपा चर्चा लेख बराच मागे येऊन गेला आहे. वि.का. राजवाड्यांच्या संशोधन आणि ससंदर्भ मांडणीचे मानववंशशास्त्र म्हणजे अँथ्रॉपॉलॉजी च्या दृष्टीने स्वतःचे महत्व नक्कीच आहे. पण वेद असो वा पुराणे त्यातून वि.का. राजवाड्यांनी दिलेले दाखले स्विकार्य संदर्भ असू शकतात पण प्रमाण ऐतिहासिक पुरावे नव्हे, या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला समजायला सोपे जातेय ना मग वापरा 'पुरावा' हा शब्द हा दृष्टीकोण सर्वसामान्य व्यक्तिकडून ठिक अभ्यासकांकडून अपेक्षित नसावा. पौराणिक ग्रंथातील दाखल्यांना पुरावा म्हणून स्विकारणे इतिहासाच्या अभ्यासाबाबतच्या सामाजिक सजगतेते बाधा आणणारे असू शकते हे देवरे सरांसारख्या अभ्यासकांनी लक्षात घावे असे माझे मत आहे.

* आज हा ग्रंथ मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय आणि मानवी- लोकसंस्कृतीचा अभ्यास दस्ताऐवज ठरला आहे

हे वाक्य मान्य आहे.

पारंपरिक स्त्री- पुरूष संबंधाची गीताही म्हणता येईल

या वाक्यातील गीतेशी तुलना मला दोन दिशांनी खटकते. वि.का. राजवाड्यां चे पुस्तक गेय नाही म्हणून गीता म्हणता येत नाही हे हि मी नाजूस ठेवतो. तशा गीता श्रीमद भगवद गीते शिवाय इतर पण आहेत पण गीता हा शब्द देवरे सर वापरताना श्रीमदभगवद गीतेशी तुलना करत विशेषण अथवा रुपक म्हणून वापरत असावेत असे वाटते. तसे असेल तर 'वंशाभिमान समूळ डळमळवणे' हा देवरे सरांचा उद्देश्य स्तुत्यच आहे पण चातुर्वर्ण्याचे अप्रत्यक्ष समर्थन करणार्‍या ग्रंथाचा विषेषण किंवा रुपक म्हणुन तुलना करणे जरासे नाही म्हटले तरी अडखळते. चातुर्वर्ण्याचा मुद्दा बाजूस ठेवला तर गीता एक मार्गदर्शक ग्रंथाची जागा घेतो, वि.का. राजवाडेंचा ग्रंथ पौराणिक ग्रंथातून माहित होणार्‍या शक्यतांचा अभ्यास अथवा आढावा असेल पण त्यात होते तसे करा असे राजवाडे आणि बहुधा देवरे सरांनाही म्हणायचे नसावे :) देवरे सर आणि मिपा वाचक मित्र म्हणतील कई इथे विपर्यास होतोय, पण मला जाणवलेली विसंगती चर्चा करणे मला युक्त वाटते. ह्याच गीतेशी तुलना करण्याबद्दल सदानंद मोरे सरांना विचारले तर ते कदाचित विसंगतीचा मुद्दा माझ्यापेक्षा अधिक चांगल्यापद्धतीने मांडू शकतील का असे वाटते.

बाकी जन्माधारीत वंशाभिमान डळमळवण्यासाठी मानववंशशास्त्रासोबतच, वैद्यक शास्त्रे आणि जनुकशास्त्राने सुद्धाही बरीच भरारी मारलेली आहे.

आणि जो खरा आस्तिक आहे त्याला इश्वर कुणात जन्माधारीत भेदभाव करणार नाही हे पटत असेल तर वंशाभिमानाचा दंशही झालेला नसेल. असे वाटते.

माहितगार's picture

15 Aug 2018 - 10:05 pm | माहितगार

* 'वि.का. राजवाड्यां चे पुस्तक गेय नाही म्हणून गीता म्हणता येत नाही हे हि मी बाजूस ठेवतो. ' असे वाचावे.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Aug 2018 - 5:32 pm | डॉ. सुधीर राजार...

माहितगार सर, आपले मतं मला पटताहेत. आपण तर्कसुसंगत लि‍हिले असल्याने आपले मुद्दे मान्य करतो.

सुबोध खरे's picture

16 Aug 2018 - 10:20 am | सुबोध खरे

गीता( किंवा कुराण किंवा बायबल) या शब्दाचा लौकिकार्थ ( माझ्या अल्पमतीप्रमाणे) काय आहे?

ज्या गोष्टी आपण आयुष्यात अनुसराव्या किंवा पथदर्शक आहेत अशा गोष्टींबद्दल केलेले मार्गदर्शक पुस्तक.

‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ यात असे कोणते मार्गदर्शक तत्व आहे कि जे अनुसरावे?

मुळात शीर्षकात असे कोणतेही विवेचन नाही. त्यामुळे या लेखाचे शीर्षक गंडलेले आहे.

बाकी विवाह संस्थेच्या एकंदर इतिहासात सर्वात "सोनेरी पान" म्हणजे काय असेल तर "हिंदू विवाह कायदा" ज्यात एका पेक्षा जास्त विवाहाला मान्यता नाही. स्त्रीला समानता देण्यामध्ये हा कायदा एक मैलाचा दगड ठरेल.

बाकी इतिहासात स्त्रियांना काडीचीही किंमत नव्हती.

परपुरूषाला आपली स्त्री अर्पण करण्याची प्रथा होती. अनेक स्त्रिया कोणाच्या तरी मालकीच्या असत.महिला पुरूषांच्या गुलाम झाल्या.

पुढे आपल्या शारीर आनंदासाठी नियोग, घटकंचुकी अशा गोष्टी चतुर पुरूषांनी शोधून काढल्या असाव्यात.( हे कुणाचे वाक्य आहे माहिती नाही पण पुरुषांची किडकी मनोवृत्ती दाखवणारे वाक्य नक्कीच आहे)

हि वाक्ये मूळ पुस्तकात आहेत कि नाही ते माहिती नाही. कारण ते पुस्तक मी वाचलेले नाही( ते वाचायची मुळीच इच्छा नाही.)

येणाऱ्या अतिथी पुरुषाला आपली स्त्री भोगायला देणे यात स्त्रीच्या संमतीचा कोठेही भाग नाही तिला एक व्यक्ती म्हणून सन्मानही नाही.
बाकी यत्र नार्यस्तु पूज्यन्ते इ इ केवळ ग्रंथात लिहिलेले दिसते आचरणात आणलेले असावे असे वाटत नाही.

तेंव्हा असा इतिहास फक्त काळा इतिहास म्हणून विसरून जाणेच योग्य ठरेल.

असे असताना डॉ देवरे हे त्याला उजाळा देण्याचे काम कशासाठी करत आहेत?

सनसनाटी साठी असे खेदाने म्हणावे लागेल.

संजय पाटिल's picture

16 Aug 2018 - 10:49 am | संजय पाटिल

सहमत!!!

जेम्स वांड's picture

16 Aug 2018 - 11:13 am | जेम्स वांड

गैरसोयीचा आहे म्हणून का? कोणाची गैरसोय?

उलट हिंदुत्व प्रागतिक आहे हे सिद्ध करायला हा इतिहास होईल तितका अभ्यासाला पाहिजेच. आम्ही कुठं होतो अन कुठवर आलो ह्या सकारात्मक प्रवासाचे जर तितके मार्केटिंग करायचे असेल तर त्यात "काळा इतिहास" आणि त्यातून बाहेर पडून नव्याने तयार केलेल्या "उज्वल परंपरा" दोन्हीवर समसमान स्ट्रेस दिला तरच काम होईल.

बाकी कुराणात आपण आयुष्यात अनुसराव्या किंवा पथदर्शक आहेत अशा काहीच गोष्टी नमूद नाहीयेत, मुस्लिम जीवन पद्धती सगळ्या हदीस नुसारच चालतात, नेमकं कुराणात काय लिहिलंय हे तर कुराण हातात घेऊन मरायला मारायला निघालेल्या लोकांनाही माहिती नसते =))

सुबोध खरे's picture

16 Aug 2018 - 11:32 am | सुबोध खरे

मार्केटिंग करायचे असेल

मार्केटिंग कुणाला आणि कशासाठी करायचे आहे?

बाकी कुराणाबद्दल मला तितके ज्ञान नाही त्यामुळे त्यावर माझा पास.

बाकी मी गीता कुराण बायबल बद्दल लिहिले आहे ते एक प्रातिनिधिक आहे समजा.

जेम्स वांड's picture

16 Aug 2018 - 12:24 pm | जेम्स वांड

बेसिक मदी लोच्या? किमान तुमच्यासारख्या बहुश्रुत मेंबर कडून अपेक्षित नव्हता खरे साहेब, असो.

कुठल्या बेसिकमध्ये लोच्या आहे ते समजेल काय __/\__

त्याबद्दल क्षमस्व,

तर, मार्केटिंग करायची गरज का आहे आणि कोणापुढे?

भारत कायमच इंटेलक्च्युवल हब होता, आजही जेव्हा माननीय पंतप्रधान स्किल इंडिया बद्दल बोलतात तेव्हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा असतो "ट्रेंड मॅन पॉवर" जागतिक लेव्हल वर सप्लाय करणे, म्हणजे थोडक्यात ब्रेनड्रेनला एक सरकारी बॅकिंग देऊन त्याचा उपयोग इकडे राष्ट्रनिर्मितीसाठी करून घेणे (बरोब्बर हाच प्रयोग इमपीरियल जपान ने मेजी रेस्टोरेशन नंतर केला होता असे इतिहास सांगतो, म्हणजे हा उपाय ट्राईड अँड टेस्टेड आहे) , आता वळूयात मार्केटिंगकडे "ब्रँड इंडिया" की सेक्टर्स मध्ये पुढे जायला लागला की पश्चिमी देशांना घालमेल होऊ लागते. मंगळयान किंवा १००+ उपग्रह एका फटक्यात अवकाशात प्रक्षेपित केल्यानंतरची न्यूयॉर्क टाइम्स मधली खोडसाळ व्यंगचित्र आणि संपादकीय वगैरे त्याच्याकडे स्पष्ट अंगुलीनिर्देश करते, एक निर्भया झाल्यावर "इंडियाज डॉटर" काढून त्यात आरोपीच्या वकिलाला मुद्दाम मिसोजिनिस्टिक वक्तव्य करायला (पैसा चारून) भाग पाडून डॉक्युमेंटरी(?) तयार करणारी लेसली उडवीन हे दुसरे उदाहरण, हे सतत चालू असतं. ह्याला काउंटर करायला कायम सॉफ्टपॉवर प्रोजेक्शन गरजेचं आहे, कोणी पैसे चारून आम्हाला मिसोजिनिस्ट वगैरे सिद्ध करत असेल तर डबल पैसा खर्च करून आम्ही तसे नाही हे आपल्याला वर्ल्ड ऑर्डर मध्ये सिद्ध करावेच लागणार, आता सॉफ्टपॉवर प्रोजेक्शन करणार कसलं? तर स्पिरिच्युवलिटी, फिलॉसॉफी, टुरिजम, अतिथ्यशील लोक वगैरे, योग हे ह्यात महत्वाचं टूल सिद्ध झालं आहेच, असंच आपला इतिहास (आधीचा तुम्ही म्हणताय तसा) काळा इतिहास मग तो आपण कसा बदलला ते अन तो बदलून आता आम्ही लै भारी कसे झालोय, हे मार्केटिंग करणे "ब्रँड इंडिया" ची "ब्रँड इक्विटी" वाढवायला भयानक गरजेचे आहे असे मला वाटते.

मला वाटतं, मार्केटिंग कशाचं, कुठे अन कोणासाठी करायला हवं ह्यावर आता मी पुरेसा प्रकाश टाकला असावा.

अभ्या..'s picture

16 Aug 2018 - 3:54 pm | अभ्या..

परफेकट वांडोबा,
लोकांना उगीच वाटत असते की काही कशात प्लानिंग नसते, जे परदेशी लोक बोलतात, वागतात ते केवळ प्रतिकियात्मक असतं. अकचुली नसते ते तसे.
उलट जगाने फक्त प्रतिकियात्मकच असावे असे आपले धोरण असायला हवे.
उसके वास्ते ये मार्केटिंग विथ डिप प्लान मंगताईच हय.

एक निर्भया झाल्यावर "इंडियाज डॉटर" काढून त्यात आरोपीच्या वकिलाला मुद्दाम मिसोजिनिस्टिक वक्तव्य करायला (पैसा चारून) भाग पाडून डॉक्युमेंटरी(?) तयार करणारी लेसली उडवीन हे दुसरे उदाहरण,

आरोपीचा वकील काय लायकीचा आहे हे त्या डॉक्युमेंटरीव्यक्तिरिक्तदेखिल दिसले आहे. त्याच्या मिसोजिनिस्टिक वक्तव्यांचे कारण पैसा नसावे असे दिसते.

जेम्स वांड's picture

16 Aug 2018 - 4:13 pm | जेम्स वांड

तुम्ही म्हणता म्हणून ही शक्यताही आपण जमेस धरू.

पण,

असं एखाद्या पुराणमतवादी मिसोजिनिस्टिक वकीलावर आधारित पूर्ण भारतीय लोकांबद्दल ठोकून दिलेली मत, निगेटिव्ह सॉफ्टपॉवर प्रोजेक्शन आपण कबूल करावं का?

हा कळीचा प्रश्न परत जागच्याजागी राहतो, माझ्यामते तुम्ही म्हणता ती शक्यता गृहीत धरली तरी मुख्य प्रश्न इनव्हॅलीड होणार नाही न?

असं एखाद्या पुराणमतवादी मिसोजिनिस्टिक वकीलावर आधारित पूर्ण भारतीय लोकांबद्दल ठोकून दिलेली मत, निगेटिव्ह सॉफ्टपॉवर प्रोजेक्शन आपण कबूल करावं का?

आजिबात नाही.
तुमचे सॉफ्ट पॉवरसंदर्भातील मत पटलेच आहे.

जेम्स वांड's picture

16 Aug 2018 - 4:46 pm | जेम्स वांड

दुसरी मते समजून स्वीकारून रुजू करून घेण्याचा (दुर्मिळ असलेला) स्वभाव प्रचंड आवडला हो पुम्बा भाऊ _/\_

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

17 Aug 2018 - 5:16 pm | डॉ. सुधीर राजार...

धन्यवाद. आपले विवेचन भावले.

माहितगार's picture

16 Aug 2018 - 11:57 am | माहितगार

उलट हिंदुत्व प्रागतिक आहे हे सिद्ध करायला हा इतिहास होईल तितका अभ्यासाला पाहिजेच. आम्ही कुठं होतो अन कुठवर आलो ह्या सकारात्मक प्रवासाचे जर तितके मार्केटिंग करायचे असेल तर त्यात "काळा इतिहास" आणि त्यातून बाहेर पडून नव्याने तयार केलेल्या "उज्वल परंपरा" दोन्हीवर समसमान स्ट्रेस दिला तरच काम होईल.

सर्वच बाबतीत इतिहासाची प्रमाणसाधने उपलब्ध नसलेल्या संहितांकडे केवळ अनेक शक्यतांपैकी एक शक्यता म्हणून पहावे, आणि इतिहास म्हणून संबोधण्याचे आग्रहपुर्वक टाळणे श्रेयस्कर असावे असे मला वाटते. बाकी या परिच्छेदातील आशयाशी बर्‍यापैकी सहमत आहे. टिका मनमोकळेपणाने झेलणे आणि सांगोपांग चिकित्सा करुन प्रबोधनाच्या प्रक्रीयेतून विकसीत होत पुढे जाणे हा भारतीय संस्कृतीचा सकारात्मक गाभा आहे त्यामुळे टिका लपवणे अथवा सेंसॉर करणार्‍या अपेक्षाम्शी सहमत होणे कठीण जाते.

बाकी डॉ. देवरे यांचा मुळ हेतु (अवास्तव) वंशाभिमान समूळ डळमळवणे असावा. डॉ. देवरेंना भारतीय संस्कृतीच्या उदात्त बाजूंचा व्यवस्थित अभ्यास आणि अभिमान आहे. डॉ. देवरे त्यांच्या भाषाशास्त्र अभ्यासापलिकडच्या विषयात जातात तेव्हा विषयाच्या सर्व परस्पर विरोधी बाजू तर्क इत्यादी सखोल पणे न अभ्यासल्याने कोणत्याही एका दिशेच्या विश्लेषणाने प्रभावित राहून लेखन होत असावे असे काही काही वेळा वाटते. भलावण करताना अतीरंजीत उदात्तीकरण हा भारतीय स्वभावाचा स्थायीभाव आहे, तो अभ्यासकांनी टाळावा त्याच त्याच वेळी डॉ. खरेंनी सनसनाटीचा आक्षेप घेतला आहे तो मात्र ही पटत नाही. प्राचीन वैद्यकशास्त्राचे सर्वच भाग आज आदर्श नसले तरी आपण अभ्यासत नाही असे नाही. अभ्यासकाचे अभ्यासकरणे परिचय करवून देणे आणि प्रसंगी क्षोभक लिहिण्याचे स्वातंत्र्य जपले पाहीजे. कोणतेही लेखन क्षोभक अथवा खुपणारे वाटल्यास त्यातील खुपणार्‍या आणि निसटत्या बाजू अभ्यासपूर्णपणे आवर्जून मांडाव्यात केवळ क्षोभक क्षोभक म्हटल्याने काही साध्य होत नाही असे वाटते.

प्राचीन वैद्यकशास्त्राचे आता केवळ संदर्भ दिले जातात. कारण त्यातील बहुतेक त्याज्य भाग टाकून देऊन शास्त्र पुढे गेले आहे.
प्राचीन संशोधकांनी घेतलेल्या त्रास आणि कष्टाबद्दल कृतज्ञ राहून वैद्यक शास्त्र पुढे जात आले आहे. त्यामुळे आताच्या सर्वच पुस्तकात त्यातील इतिहास हा वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त संदर्भापुरता राहिला आहे आणि तो इतिहास संशोधकांसाठी ठेवला आहे.

पुंबा's picture

16 Aug 2018 - 12:02 pm | पुंबा

++११११११११११

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Aug 2018 - 5:35 pm | डॉ. सुधीर राजार...

आपली मते आपण स्पष्टपणे मांडलीत म्हणून मला आवडले. आपली म्हणजे माणसाची प्राथमिक अवस्था काय होती, याकडे पाठ फिरवून कसे चालेल. इतिहास काळा असला तरी तो होताच ना.

सुबोध खरे's picture

16 Aug 2018 - 10:23 am | सुबोध खरे

नवशिक्षणाची गीता ( संदर्भ आचार्य पर के अत्रे - परसी नन याचें पुस्तक)
किंवा
bible of medicine
हे वाक्य काय दर्शवते.

श्वेता२४'s picture

16 Aug 2018 - 11:19 am | श्वेता२४

आपल्या एकूण एक मतांशी सहमत

भाषात्पत्ती हा शब्द चुकीचा आहे असे वाटते. भाषोत्पत्ती योग्य शब्द आहे.
बाकी, पुस्तक आवडले आहेच. परंतू, ते अपूर्ण आहे आणि इतरही अनेक महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश राहिला आहे. आता, जेव्हा अभ्यासाला प्रचंड संदर्भसाहित्य, महाभारत-रामायण चिकित्सक आवृत्ती इत्यादी सिद्ध साधने उपलब्ध असताना, शिवाय प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासाची शास्त्रीय तत्वे विकसीत झालेली असताना या ग्रंथाची संशोधीत आवृत्ती लिहायला किती वाव आहे! अर्थात सद्य काळात कुठल्याही धर्माच्या कासोट्याला हात घालायला कुणी उत्सुक असेल असे वाटत नाही.

माहितगार's picture

16 Aug 2018 - 4:40 pm | माहितगार

मला वाटते की हिंदू धार्मीक साहित्याची बर्‍यापैकी मनमोकळी चिकित्सा होत आली आहे. उदाहरणार्थ मराठीत रघुनाथ जोशींचे 'अनोखा परिचय ऋग्वेद आणि उपनिषदांचा' हे टिकात्मक पुस्त्तक मागच्याच दशकात आले असावे नेमके प्रकाशन वर्ष आठवत नाही. या पुस्तकाचा मराठी आंजाने दखल घेतल्याचे अथवा प्रकाशित लेखनात कुठे प्रतिवाद झाला असल्यास अद्याप वाचनात नाही. अजूनही असतील.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Aug 2018 - 5:37 pm | डॉ. सुधीर राजार...

हा तात्कालिक शब्द आहे. बाकी आपले मुद्दे महत्वाचे आहेत.

कपिलमुनी's picture

16 Aug 2018 - 4:32 pm | कपिलमुनी

अधिक माहिती साठी
पुस्तका बद्दल
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
राजवाडेंबद्दल
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ...

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

17 Aug 2018 - 5:18 pm | डॉ. सुधीर राजार...

सर्व वाचकांचे खूप खूप आभार

धन्यवाद कपिलमुनीजी. राजवाडे सणकी नव्हे तर ध्येयवेडे होते.