दोसतार - १२

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
19 Jun 2018 - 10:04 am

मागील दुवा https://www.misalpav.com/node/42737

शाळेची घंटा हे प्रकटन संपायचीच जणू वाट पहात असावी. तास संपला. शाळा सुटली.
आठवड्यापुरती का होईना पुस्तकांची काळजी मिटली होते. अर्थात आम्हाला कोणालाच ही काळजी पडली नव्हती. हा भाग वेगळा....

वर्गात पुस्तके नसतील तितके दिवस शिक्षक काही शिकवणार नव्हते. निदान इंग्रजी मराठी आणि इतिहासाचे शिक्षक तरी. गणीताच्या सराना पुस्तक नसले तरी चालायचे. त्यांची बहुतेक सगळी पुस्तके पाठ होती. दर वर्षी तीच तीच गणीते शिकवायची म्हणजे ती पाठ झालेली असणारच की उत्तरासकट.
शाळेतून बाहेर पडतानाच टंप्याला काहितरी आयडीया सुचली असावी. त्याचे अंधारात डोळे बॅटरी चमकावी तसे एकदम चमकले. त्याचा चेहेरा काहीतरी भारी सापडल्यासारखा चमकू लागला . त्याला विचारण्यात अर्थ नव्हता. त्याने एल्प्याला काहितरी खुणावले.आणि कानात काहीतरी सांगितले. दोघानीही एक जोराची टाळी दिली आणि लगबगीने दप्तरे सावरत निघाले. टम्प्या जाताना मला म्हणाला की उद्या बघ गम्मत आणतो की नाही वर्गात .
शाळा सुटतानाची ही गडबड त्यात तो काय म्हणाला ते नीट ऐकू पण आले नाही. पण उद्या शाळेत काहितरी धमाल होणार होती हे त्याच्या बोलण्यावरून समजले.
मी काय काय विचारायच्या आत एल्प्या आणि टम्प्या दोघे सुसाट पळत रस्त्याच्या कोपर्यावरून वळत दिसेनासे झाले होते.
मी एकटाच . नाही म्हणायला योग्या , रमेश, शिर्या सोबत होतेच. पण एल्प्या आणि टम्प्याची गोष्टच वेगळी. टम्प्याची अगदी नवीनच ओळख झाली होती अगदी दोनच दिवसा अगोदरची. तरीही ते दोन दिवस आम्ही रस्त्याने जाताना जांभळी चौकापर्यंत बोलत बोलत गेलो तेथून तिघांच्या घरच्या वाटा वेगळ्या व्हायच्या . चालत असताना टम्प्या कधीच सरळ चालायचा नाही. म्हणजे तसा तिरपा वगैरे नाही. पण तो बोलता बोलता तो आपल्या समोर येवून कधी बोलायला लागेल हे त्याला ही सांगता यायचं नाही. म्हणजे बघा समजा तिघेजण चालत असलो ना तर त्यातला एक जण बोलताना दोघांच्या समोर येवून उलटा चालत बोलायला लागला तर कसे वाटेल? तसंच वाटायचं म्हणजे आम्हाला नाही पण रस्त्यावरच्या इतरांना तसे वाटायचे. अर्थात शाळेतून सुटणार्‍या प्रत्येक घोलक्यात कोणीतरी उलटा चालत असायचाच . प्रत्येक घोळक्याच्या गप्पा वेगल्या असायच्या , भारताची ढाण्या वाघ कपील देव , आईने केलेलं शिकरण, मे महिन्यातली कोरड्या नदीत वाळूत शेकलेली रताळी. विहीरीत पोहताना मारलेली जोरदार उडी. किंवा कुणाला त्याच्या काकाने त्याला पोहायला शिकवताना विहीरीत कसे ढकलून दिले ते. या विहीरीच्या गोष्टीची एक गम्मत असते. प्रत्येक वेळेला ती सांगणार्‍या मुलाच्या इयत्तेगणीक विहीरीची खोली बदलते. कधी पाच पुरूष खोल तर तीच विहीर कधी सात पुरूष खोल. मला एकदा बघायचंय की ही खोली मोजताना ते पाणी असलेल्या विहीरीत पुरूष कसे उभे करत असतील . आणि उंची मोजण्याचे एकक हे फक्त पुरूषच का असते. कोणी कधीच एखाद्या विहीरीची खोली आमची विहीर पाच काकू खोल आहे असे सांगत नाही. पण जर असे सांगायला लागले तर तो एक मोठा गोंधळच होईल. आंजीच्या शारदा आत्याची उंची आणि आंजीची दुर्गा मावशी यांच्या उंचीत इतका फरक आहे की आंजीची तीन दुर्गामावशी खोल असलेली विहीर पाच शारदा आत्या इतकी खोल म्हणूनही सांगता येईल.
उद्या काय गम्मत आणतो याची सगळ्यानाच काहीवेळ उत्सुकता होती.
या टंप्याचं काही खरे नाही. तो गम्मत म्हणून नक्की काय आणेल ते सांगता येणार नाही. गेल्या वर्षी म्हणे त्याने वर्गात कोमेंट्री ऐकायला रेडीओ आणला होता.शिर्‍या म्हणाला. काय की असेल बुवा. काय या सातारच्या पोरांचं काही सांगता येत नाही. पण एवढा मोठठा रेडीओ दप्तरातून कसा नेता येईल? मला शंका पडली.
अरे तो तसला मोठठा रेडीओनाही काय. पाकीट रेडीओ पाकीट . शर्टाच्या खिशात मावतो इतका छोटा असतो. येडाच आहेस.
तानू मामा कडे रेडीओ होता . तो काही फार मोठा नव्हता पण खिशात मावेल इतका छोटाही नव्हता. त्याला मामाने चामड्याचे कव्हर शिवले होते . रेडीओत मसाले सेल भरुन तो शेतात घेवुन जायचा कधी कधी. धार काढताना गोठ्यात लावायचा. कधी कधी शेंद्री म्हशीच्या शिंगाला पण बांधायचा. बांधावरुन शेंद्री शिंगाला अडकवलेल्या रेडीओ सहीत यायची. त्या वेळेस सम्ध्याकाळी रेडीओवर काहितरी लोकगीते वगैरे कार्यक्रम चालू असायचे.
रुपये होते पाच , रुपयं होते पाच....आमी वरातीत केला नाच त्याला योक रुपाया खराचला. .......... असलं काहितरी गाणे वाजत असायचं. मागे फुल्ल पिपाणी वगैरे वाद्य वाजत असायची. एखाद्या वरातीत नवरदेवाने यावे तशी शेंद्री म्हैस वाजतगाजत शिवारातून गोठ्यात यायची. तीच्या मागून नागू गवळी करवलीने यावे तसा तीच्या मागोमाग चरवी घेवून यायचा. मला ते बघायलाच मज्जा यायची. कधी कधी कोणी जाड आवाजात गाणे म्हणायला लागला की ते थेट शेंद्री म्हैस च गाणे म्हणतीये असे वाटायचे. हे एकदा मी तानुमामाला विचारले होते. ते आठवून येड्यागत हासायचो मी आणि मामा. शेंद्री म्हशीच्या शिंगात अडकवलेला रेडीओ निदान दिसायचा तरी समजा एखादा माणूस तो खिशात मावणारा बारकुसा रेडीओ खिशात ठेवून रस्त्याने फिरायला लागला आणि असे एखादे गाणे लागलं तर लोकाना ते गाणे तो माणूसच गातोय असे वाटलं वाटेल.
पण मसाले सेल मोठे असतात ते खिशात मावेल इतक्या छोट्या रेडीओत कशे बसणार. मला अजून एक शंका.
अरे त्यातले सेल पण लहानच असतात. पेन्सीली एवढे. पेन्सील सेल म्हणतात त्याला.
मग मला डोळ्यापुढे आले की जर शेंद्रीच्या शिंगाला तो तसला पाकीट रेडीओ बांधला तर कुठनं आवाज येतोय ते कुणालाच समजणार नाही. लोकं खुळी होऊन जातील.
अरे पण टंप्या नक्की काय करणार आहे उद्या? रमेश ची उत्सुकता थांबत नव्हती. खरेतर आम्हा सगळ्यानाच ती होती. बोलत नव्हतो इतकेच.
"अरे ते जाऊ द्या . आमच्या वाड्यातल्या काळी ला तीन पिल्ले झाली आहेत. योग्या.
आयला काय मस्त रे. आई शपथ. तीन तीन पिल्ले म्हणजे.... खूप दंगा करत असतील ना? शिर्‍या.
दम्गा.... काय विचारू नकोस. मी घरी गेलो की सगळी माझ्या मागे मागे येतात.
आम्ही आलो तर आमच्याशी पण खेळतील का ती.
अरे लहान आहेत अजून ती. काळी मला ओळखते म्हणून ती जवळ येवू देते. बाकी सगळ्याना गुरगुरत लांबच थाम्बवते.
तीला सांग की आम्ही तुझे मित्र आहोत.
ती बाबाना पण येवू देत नाही. फक्त मी ताई आणि आई. पण मी सुद्धा अजून हात लावत नाही. आई म्हणते की अजून एका महिन्यानी ती मोठी होतील मग खेळ त्यांच्याशी.
एका महिन्यानी ती रांगायला लागतील का?
आता टंप्याच उद्याची गम्मत या विषयावरुन गाडी योग्याच्या वाड्यातल्या काळी कुत्री वर वळला. आमचं हे असेच होतं जे बोलायला सुरवात केली आहे ते कुठल्या कुठे हरवतं आणि दुसरेच काहितरी सुरू होते. अर्थात जे बोलायचं असते तेही असेच कोणत्यातरी विषयावरुन निघालेलं असतं. याला आवांतर असे म्हणतात हे वाख्या वम्दू ताई नी सांगीतली होती. या वर्षी शाळेत अवांतर वाचन नावाचा एक विषय आहे. माहीत नाही त्यात काय होणार आहे ते. पुस्तक वाचताना आपला सातारा जिल्हा या भुगोलाच्या पुस्तकापासून सुरू करून ते फुरसुंगीचा फास्टर फेणे वर संपणार बहुतेक.
जाम्भळी चौक आला. रम्या शनिवार पेठेकडे , शिर्‍या कमानी हौदा कडे जायला वळाले. मी भवानी पेठेकडे.
घरी आलो तरी डोक्यातून ती योग्याच्या वाड्यातल्या काळी कुत्रीची पिल्ले जात नव्हती. योग्याने त्याना घर करुन दिले असेल का, पिल्लाना थंडी वाजत असेल का, त्याना दूध भाकरी साखर घालून देत असतील का? रात्री झोपताना पिल्ले आईच्या कुशीत झोपत असतील का? कुत्र्याची पिल्ले दात साफ करतात का? ती एकमेकांशी कशी बोलत असतील? लहान पिल्लाना फक्त कुई कुई कुई कुई इतकास आवाज काढता येतो.माझ्या डोक्यात प्रश्नच प्रश्न येत होते.
विनू अरे हात पाय धूवून घे की. आणि हे दप्तर का असे फेकले आहेस? त्या स्लीपर अगोदर नीट कोपर्‍यात काढून ठेव. आई आतून बोलावत होती.
तुला रात्री जेवायला ताम्दळाची खीर चालेल ना?
कुई कुई..........
काय? कुई कुई काय . काय म्हणतो आहेस नीट सांग.
कुई.
परत तेच.
मी त्या काळी कुत्रीच्या पिललांचा विचार करत होतो आणि त्या नादात आईला होय म्हणायच्या ऐवजी कुई कुई म्हणत होतो.
आज बहुतेक ती पिल्ले स्वप्नातही येणार.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

30 Jun 2018 - 11:21 pm | विजुभाऊ

पुढील भाग https://www.misalpav.com/node/42919

चौथा कोनाडा's picture

9 Jul 2020 - 5:39 pm | चौथा कोनाडा

"अरे ते जाऊ द्या . आमच्या वाड्यातल्या काळी ला तीन पिल्ले झाली आहेत. योग्या.
आयला काय मस्त रे. आई शपथ. तीन तीन पिल्ले म्हणजे.... खूप दंगा करत असतील ना? शिर्‍या.
दम्गा.... काय विचारू नकोस. मी घरी गेलो की सगळी माझ्या मागे मागे येतात.
आम्ही आलो तर आमच्याशी पण खेळतील का ती.
अरे लहान आहेत अजून ती. काळी मला ओळखते म्हणून ती जवळ येवू देते. बाकी सगळ्याना गुरगुरत लांबच थाम्बवते.
तीला सांग की आम्ही तुझे मित्र आहोत.
ती बाबाना पण येवू देत नाही. फक्त मी ताई आणि आई. पण मी सुद्धा अजून हात लावत नाही. आई म्हणते की अजून एका महिन्यानी ती मोठी होतील मग खेळ त्यांच्याशी.
एका महिन्यानी ती रांगायला लागतील का?

वा, लहानग्यांचे निरागस जग !

विनू अरे हात पाय धूवून घे की. आणि हे दप्तर का असे फेकले आहेस? त्या स्लीपर अगोदर नीट कोपर्‍यात काढून ठेव. आई आतून बोलावत होती.
तुला रात्री जेवायला ताम्दळाची खीर चालेल ना?
कुई कुई..........
काय? कुई कुई काय . काय म्हणतो आहेस नीट सांग.
कुई.
परत तेच.
मी त्या काळी कुत्रीच्या पिललांचा विचार करत होतो आणि त्या नादात आईला होय म्हणायच्या ऐवजी कुई कुई म्हणत होतो.
आज बहुतेक ती पिल्ले स्वप्नातही येणार.

हा ... हा .... हा .. !

मस्त विजुभाऊ !