आईचा मुलगा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
8 Jun 2018 - 11:46 am

साठ्ये आजी म्हणत,' काय गं तुम्ही पोरी! रात्रीबेरात्री फिरतां! घरं दारं सोडून इथे शिकायला येता, कि असे गुणं उधळायला येता?' त्यांचे म्हणणे कोsssणी कानात घालून घेत नसे, मनावर तर नाहीच नाही. त्या आठ मुली आपापसांत नेत्रपल्लवी करत आणि निघून जात.

त्या काहीच न बोलता गेल्या, कि आजी आणखी खवळत. ‘अपर्णा गो, अपर्णा, कुठे गेली ही?’ अपर्णा, त्यांची एकुलती एक सून वरच्या मजल्यावर रहात असे. पण आजींच्या लक्षात रहात नसे. आपल्यापासून आपला मुलगा आणि सून वरच्या मजल्यावर वेगळे राहतात, हे त्या विसरून जात. तासभर अपर्णा अपर्णा करीत. जयंता मग तळमजल्यावरच्या ऑफिसमधून आईला पहायला मध्येच डोकवायचा. तिचं अपर्णासत्र चालू झालं, कि तो तिच्यासमोर उभा राही.

‘आई, का ओरडतेस तू? अपर्णा आणि मी इथे राहात नाहीत आता!’ हे तो लक्ष्याव्यांदा तरी तिला सांगत असे. ‘अजून एकदा चहा आणून देऊ का तुला?सांगतो अपर्णाला.’

त्यावर आजी त्याच्याकडे मिटीमिटी पहात. एकदमच उसळून म्हणत, ‘रे जयंता, तू माझाच मुलगा ना रे! माझाच ना! तिघांत थोरला म्हणून किती रे कौतुक तुझें! तुला विचारले का मी कि बाळा, तुला दुध देऊ का अजून एकदा? विचारले का? आज तू मला एका चहाच्या कपासाठी परत परत विचारतोस!’

जयंताला हे पण पाठ झाले होते. आता कुठे तिने त्याला बाळ असताना दुध पाजणे, आणि कुठे याने चहा आणून देऊ का म्हणून विचारणे! कुठून तरी काही तरी जोडून घ्यायच्या आणि बोलत सुटायच्या. आजीना कोण सांगणार? कधी जयंता म्हणे, ‘का सांगायचे तिला? मी मुलगा आहे, बोलेना का! कुणा रस्त्यावरच्या माणसाला तर नाही बोलत! ऐकून घ्यायचे. आई आहे. तिन्ही जगाचा स्वामी आईविना भिकारी होतो कि नाही, माहित नाही, पण मी नक्कीच भिकारी झालो असतो.’

संध्याकाळी बरोब्बर पावणेपाचला जयंता दाराचे छोटेसे कुलूप काढी, ते त्याने दुपारी घातलेले असे. आईच्या सुरक्षिततेसाठी. मग, दरवाज्याच्या फटीतून हात घालून, दाराची आतली कडी काढी आणि दरवाजा उघडे. चहाचा थर्मास बाजूला ठेवी. ‘आई, ऊठ. आज बुवामहाराज येणारेत मंदिरात! जायचंय ना प्रवचनाला?’

‘नको रे! कुठले ते महाराज अन फिराज! सगळे आपलं तेच भागवत सांगतात.’

तिने संध्याकाळी बाहेर जायला नकार दिला कि जयंताला धस्स होत असे. ती घरात थांबणार म्हणजे आणखी बडबड करणार, संध्याकाळी वरती अपर्णाचा गायनाचा क्लास चालतो. हिला पेटीचा आवाज, गाण्याचे सूर चालत नाहीत. म्हणजे ते अपर्णाचे आहेत म्हणून चालत नाहीत. तेच जर चंदूचे असते तर.... तर... जयंताच्या काळजात धाकट्या भावाच्या आठवणींनी बारीकशी कळ उमटे. त्याचा उमदा फोटो पाहिला कि तो मनातल्या मनात म्हणे, ‘चंदू, अरे रहायचास कि रे! आईला दोन गाणी म्हणून दाखवली असतीस! तुझे गाणे घरात राहिले असते, आईचा जीव जीवात राहिला असता.’

त्याला आईची समजून काढून तिला दोनेक तास बाहेर घेऊन जायचे असायचे.

‘आई मी काय म्हणतो, मंदिर नको तर नको, पण परवादिवशी स्नेहुलीचा वाढदिवस आहे. जरा तिच्यासाठी काहीतरी खरेदी करावी म्हणतो... चल तरी माझ्या सोबत!’

नातीचे नाव काढताच आजीबाई एकदम सावरीचे पीस होते, हे जयंताला माहित. आईच्या विस्मृतीचा फायदा घेत त्याने, स्नेहलचे एका वर्षात किमान शंभर सव्वाशे वाढदिवस तरी असेच साजरे केले होते. आजी मग उठे. जयंत कपाटातून तिचे एखादे चांगले पातळ काढून ठेवी. सहज म्हणे, ‘आई, आज बाजारत गेलो कि तुझ्यासाठी एखादी चांगली नऊवार घेऊ!’

‘मला मेलीला कशाला रे आता नवे पातळ!’

‘असू दे गं, मेलीला तर मेलीला...’ जयंत असला स्टार्क विनोद करे पण मुलाचे आपल्याकडे इतके लक्ष आहेसे पाहून आजीचा जीव सुपाएवढा होई.

ती म्हणे, ‘मेले एकदाची कि मग नवे पातळ येणारच! जुन्या कपड्यांत कोण जाळेल मला? एवढ्या मोठ्या इमारतीची मालकीण मी! कोण मला जुनेर नेसवून जाळेल? म्हणून म्हणते, नवे पातळ राहू दे, येईल उपयोगी...’ मुलापेक्षा हातभर पुढचं आजी बोलायच्या. जयंताला हे ही पाठ होतं.

आई तयार होईपर्यंत तो बाकीच्या रूम्स मध्ये चक्कर टाकून येई. कुठे तिने सुटकेस उघडलेली असे, कशासाठी? तिचं तिलाही माहित नसायचं. बंद करायची विसरलेली असे. कुठे कपडे ओले करून ठेवलेले असत, ते वाशिंग मशीनमध्ये टाकून, मशीन लावून देत असे. कुठे चक्क स्टीलच्या डब्यातली चिल्लर उपडी करून तशीच ठेवलेली असे. एकएक, दोनदोन, पाचपाचची नाणी वेगवेगळी करायचा अर्धवट प्रयत्न केलेला दिसे. नंतर मिक्स नाण्यांच्या राशी दिसत. जयंता नाण्याचा आवाज न करता सावकाश ती परत भरून ठेवी. खिडक्या अर्धवट उघड्या असत, त्या तो नीट बंद करी.

एवढे करून बाहेर येईपर्यंत, त्याची आई तयार झालेली असे. त्याच्या मनाप्रमाणे घडलेले असे. हातात नेहमीची फुलांची परडी असे. तिचा मऊ, सुरकुतलेला, दोनच सोन्याचे बिल्वर घातलेला हात तो हातात घेई, आणि पायऱ्या उतरू लागे. बाहेर येताच, पावले आपोआप मंदिराकडे वळत. आईला मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात, इतर बायकांमध्ये सोडले, कि जयंताचा जीव भांड्यात पडे. मनात म्हणे, ‘ती अशीच तर आपला हात धरून शाळेत सोडवायला यायची. एकदा का आपण आपल्या वर्गात बसलो, कि तिचाही जीव असाच भांड्यात पडत असणार!’

मंदिरासमोरच त्याची कन्सल्टन्सी होती. अधूनमधून काचेतून मंदिराकडे पाही. साधारण साडेसात वाजता प्रवचन संपे. पण त्याची नजर सतत प्रवेशद्वाराशी असे. आई अवेळी बाहेर आली तर? समोरच्या वाहत्या रस्त्यात चालू लागली तर? तो शांत डोळ्यांनी, अस्वस्थ अंत:करणाने मंदिराकडे पहात राही.... हे असे वर्षानुवर्षे चालले होते....

कोण म्हटलं, केवळ घारच आपल्या पिलांवर नजर ठेवते?

- शिवकन्या

धोरणमांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकथासाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनसद्भावनाप्रतिभा

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

8 Jun 2018 - 11:55 am | पिलीयन रायडर

मस्तच!!

बेवाफा सनम पोरांनी कसे पांग फेडले नाहीत हे सांगणाऱ्या कथांचा कंटाळा आला होता. पोरं सुद्धा आई बापाला खूप जीव लावतात. सुंदर मांडलं आहे तुम्ही हे!

वीणा३'s picture

8 Jun 2018 - 11:16 pm | वीणा३

अतीवेळा सहमत !!!
काये ना, लोकांना बरेचदा गॉसिप करायचं असतं, आणि कोणीतरी काही चांगलं करतंय हे गॉसिप होत नाही. आणि बऱ्याच लोकांना दुसर्याबद्दल त्याच्यामागे वाईट बोलायला आवडतं.
लेख अतिशय हृदयस्पर्शी!!! स्वतःच्या मायेच्या माणसांसाठी, स्वतःहून, मनापासून, मायेने केलेल्या कामात असाच गोडवा असतो :)

शिव कन्या's picture

13 Jun 2018 - 10:32 pm | शिव कन्या

सनम बेवफा .... आवडलं.
होय, सकारात्मक बर्याच गोष्टी असतात, बऱ्याचदा आपले दुर्लक्ष होते.

वाचत असल्या बद्दल धन्यवाद.

रातराणी's picture

8 Jun 2018 - 11:57 am | रातराणी

_/\_ !!

वाह! अशी मुले पाहिली आहेत. त्यामुळे कथा फारच आवडली.

पुंबा's picture

8 Jun 2018 - 12:35 pm | पुंबा

वाह! वाह!
सुंदर कथा..

नाखु's picture

8 Jun 2018 - 12:42 pm | नाखु

राहील अशी "लक्ष"वेधी कथा!!!

पुलेशु

लक्षायनी नाखु

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2018 - 1:31 pm | टवाळ कार्टा

_/\_

यशोधरा's picture

8 Jun 2018 - 1:51 pm | यशोधरा

खूप आवडली कथा..

श्वेता२४'s picture

8 Jun 2018 - 2:37 pm | श्वेता२४

मुलांचेही आईवडीलांवर प्रेम असतेच. त्यांनाही आईवडीलांना जपायचे असतेच. पण जीथे जोडीदार व आई वडील असा संघर्ष येतो त्यावेळी नात्याची दुसरीही हळवी बाजू दाखवणारी तुमची कथा उत्तमच आहे. ही दुसरी बाजू प्रकाशझोतात आणल्याबद्दस बरं वाटलं.

शिव कन्या's picture

13 Jun 2018 - 10:33 pm | शिव कन्या

होय, बऱ्याचदा एकांगी चित्रण होते.

वाचत असल्या बद्दल धन्यवाद.

अनिंद्य's picture

8 Jun 2018 - 2:53 pm | अनिंद्य

कथा आवडली, मन सावरीचे पीस झाले.

नूतन's picture

8 Jun 2018 - 3:06 pm | नूतन

आवडली.
आईचा मुलगा आणि बायकोचा नवरा एकाच वेळी असू
शकतात हे सांगणारी कथा

शिव कन्या's picture

13 Jun 2018 - 10:34 pm | शिव कन्या

असा समतोल साधणारी पुरुष मंडळी असतात... मला कौतुक वाटते त्यांचे.

manguu@mail.com's picture

8 Jun 2018 - 3:49 pm | manguu@mail.com

छान

मार्मिक गोडसे's picture

8 Jun 2018 - 4:30 pm | मार्मिक गोडसे

सुंदर

कपिलमुनी's picture

8 Jun 2018 - 7:05 pm | कपिलमुनी

कथा आवडली . छान लिहिता

शाली's picture

8 Jun 2018 - 8:13 pm | शाली

वा! सुरेख!

पद्मावति's picture

8 Jun 2018 - 9:08 pm | पद्मावति

आहा __/\__

शेखरमोघे's picture

8 Jun 2018 - 9:11 pm | शेखरमोघे

छान लेखन ! कथा आणि लिहिण्याची शैली आवडली !!

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jun 2018 - 9:29 am | ज्ञानोबाचे पैजार

गोष्ट प्रचंड आवडली,
पैजारबुवा,

विशुमित's picture

9 Jun 2018 - 9:57 am | विशुमित

<<<‘ती अशीच तर आपला हात धरून शाळेत सोडवायला यायची. एकदा का आपण आपल्या वर्गात बसलो, कि तिचाही जीव असाच भांड्यात पडत असणार!’>>>
==>> अयो. काय जबरदस्त लिहलंय.

शिव कन्या's picture

13 Jun 2018 - 10:35 pm | शिव कन्या

हे चक्रच आहे .

धन्यवाद.

अपश्चिम's picture

9 Jun 2018 - 10:31 am | अपश्चिम

मनापासून आवडली , वेगळी बाजू मांडल्या बद्दल धन्यवाद

अनन्त अवधुत's picture

9 Jun 2018 - 12:00 pm | अनन्त अवधुत

आवडली !!

Topi's picture

9 Jun 2018 - 1:30 pm | Topi

पटला एकदम वास्तव

आईवडीलानी लहानपणी जीव लावला होता, आत्तादेखील 'मुद्दाम' त्रास देत नाहीत असे असेल तर घेतात मुलं काळजी.

नसेल तरी सामाजिक दबावामुळे बऱ्याचदा मिनिमम काळजी घेतातच.

अगदीच दुर्मिळ घटनांत चांगले आईवडील आणि दुष्टकपटी मुलं दिसू शकतात...

शिव कन्या's picture

13 Jun 2018 - 10:37 pm | शिव कन्या

कुणाला आपले आईवडील नको असतात?

सगळ्या प्रकारचे लोक समाजात असतात. चांगले ते दिसते, आणि लिहून होते.

वाचत असल्याबद्दल धन्यवाद.

शित्रेउमेश's picture

11 Jun 2018 - 10:44 am | शित्रेउमेश

खूप सुरेख...

ज्योति अळवणी's picture

13 Jun 2018 - 2:03 am | ज्योति अळवणी

खूप दिवसांनी मिपावर आले आणि पहिलीच कथा हृदयस्पर्शी वाचली. खूप आवडली

काय बोलावं. भिडणारं लिखाण. अतिशय सुंदर.

सिरुसेरि's picture

13 Jun 2018 - 1:49 pm | सिरुसेरि

खुप छान लेखन . +१००

साबु's picture

13 Jun 2018 - 1:53 pm | साबु

भिडणारं लिखाण. +१

माहितगार's picture

13 Jun 2018 - 5:11 pm | माहितगार

छान, आवडला __/\__

किसन शिंदे's picture

13 Jun 2018 - 5:15 pm | किसन शिंदे

वाह !! कथा आवडली

शिव कन्या's picture

13 Jun 2018 - 10:38 pm | शिव कन्या

या कथेच्या वाचकांचे मन:पूर्वक आभार.

रुपी's picture

14 Jun 2018 - 6:29 am | रुपी

सुरेख!