नेदरलँड्सची सफर भाग -२

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in भटकंती
28 May 2018 - 7:57 pm

नेदरलँड्सची सफर भाग -२

मुळात युरोप पाहायचा तर सहा दिवसात पाच देश किंवा १० दिवसात दहा देश असे करणे मला पटत नाही. कारण सहा दिवसात महाराष्ट्रसुद्धा बघून होणे अशक्य आहे.
अर्थात बरेच लोक केसरी वीणा सारख्या ट्रॅव्हल सर्व्हीसने जाणे पसंत करतात आणि तसे करण्याची कारणे आहेत आणि आपल्या ठिकाणी ती बरोबरही असतील. एक तर जाण्यायेण्याचा खर्च आणि पासपोर्ट व्हिसा ची आणि लांब विमान प्रवासाची कटकट परत परत नको. दुसरे म्हणजे खाण्यापिण्याचे हाल होत नाहीत. विशेषतः शाकाहारी लोकांचे. शिवाय जिकडे तिकडे प्रेक्षणीय स्थळापर्यंत बसने नेले आणि आणले जाते. पण मला ते पटत नव्हते हे खरं.

महत्त्वाची गोष्ट-- तुम्ही यात्रा कंपनी बरोबर गेला नाहीत तर युरोपात सर्वत्र मैलोगणती चालत जावे लागते. तशी तयारी नसेल किंवा काही शारीरिक व्याधी असेल तर यात्राकंपनीतर्फे जावे हेच योग्य.

असो. त्यात सौ चा चुलत भाऊच नेदरलँड्स मध्ये असल्याने स्वतः जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले हि वस्तुस्थिती.

सोमवारी पहाटे पाचचे विमान होते. यासाठी आम्हाला दोन वाजता विमानतळावर पोहोचणे आवश्यक होते. मुंबईतच राहत असल्याने आम्ही रात्री सव्वा वाजता घरून निघालो. इमिग्रेशनचे सर्व सोपस्कार करून तीन वाजेपर्यंत "रिकामे" झालो. पुढे करायला काहीच नव्हते. वेळहि विचित्र होती त्यामुळे धड झोपणेही शक्य नव्हते.

तात्पर्य-- विमानाची वेळ पाहताना आडनिडी वेळ न पाहता रात्री लवकरची वेळ शक्य असेल तर निवडा.एकदा विमानात बसलात कि झोप घेणे शक्य होते.

पहाटे पाच वाजता विमान निघाले. मला खिडकीची सीट मिळाली होती (वेब चेक इन केल्यामुळे) तेंव्हा उड्डाण केल्यावर खाली मुंबई दिसत होती. दिव्यांनी लखलखलेली मुंबापुरी कितीही वेळा पहिली तरी परत परत पाहायला मला फारच आवडते.

विमानात उत्तम नाश्ता मिळाला. इतिहादची खानपान सेवा उत्तम आहे आणि जाताना आणि येताना मिळालेले खाद्यपदार्थ आणि जेवण उत्तम आणि चविष्ट होते.

हे लिहिताना मला एक विनोद आठवला - एक पंजाबी आंटी दुसरीला विचारत होती कि "फोर्टिस अस्पताल बायपास कराने के लिये कैसा है "?
त्यावर दुसरी म्हणाली " बिलकुल बकवास है जी. उनके कँटीन मे "छोले भटुरे" तो मिलते हि नहीं !
असो.

सकाळी स्थानिक वेळ ८ वाजता विमान अबू धाबीत उतरले. तेथे उतरण्यापूर्वी आजूबाजूची मरुभूमी पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे जिकडे तिकडे वैराण असा मातकट खाकी रंग पसरलेला आणि केवळ अबू धाबी शहरातील रस्त्यावर मुद्दाम लागवड केलेली खजुराची झाडे सोडली तर हिरवा रंग औषधाला सुद्धा दिसत नाही.

अबूधाबीत इतिहादचे कर्मचारी अतिशय अगत्याने सेवा देत होते. आम्हाला अबूधाबीत विमान बदलायचे होते. तेथे शारीरिक आणि सामानाची तपासणी अतिशय शिस्तबद्ध तर्हेने आणि पटकन झाली. आता पुढच्या विमानासाठी १ तास होता तेंव्हा आम्ही मुखमार्जन करून घेतले आणि तेथे पहिल्यान्दा चहा घेतला. तेथे असलेल्या इंडियन कॅफे मध्ये एक आले घातलेला फक्कड गरमागरम चहा मोठ्ठा मग भरून मिळाला. किंमत फक्त ३३० रुपये (५ डॉलर्स) पण असा उत्तम चहा पूर्ण युरोपात नंतर कुठेही मिळाला नाही हि वस्तुंस्थिती.

काही वेळाने आम्ही पुढच्या विमानात बसलो हे विमान जास्त आरामशीर होते. काही वेळाने विमान युरोपावरून उडत असताना परत एक गोष्टीची जाणीव झाली ती म्हणजे आता जमीनच रंग खाकी वरून पूर्ण हिरवा झाला आहे.

स्थानिक वेळ दुपारी २ ला आम्ही ऍमस्टरडॅम च्या शिफॉल या विमानतळावर उतरलो तेथे उतरताना सर्वत्र लांबवर हिरवी हिरवी शेते आणि असंख्य पाणथळ जागा सरोवरे नदी इ. निळाई हे पाहून डोळ्याचे पारणे फिरते.

ऍमस्टरडॅमला उतरल्यावर तेथे इमिग्रेशनचे सोपस्कार पार पाडून बाहेर आलो. या विमानतळातच रेल्वेचे स्टेशन पण आहे आणि बाहेर पडलो कि लगेच बसही मिळते. विमानतळाचा इतर भागांशी संपर्क फारच छान आहे.

ऍमस्टेलव्हीनच्या बस स्थानकावर एक बस बदलून दुसरी बस घेतली आणि तीन स्टॉप नंतर आमचे स्थानक आले तेथे आमचे पेटारे घेऊन उतरलो. बस मध्ये पुढचे स्थान कोणते याचा डिस्प्ले असतो शिवाय गुगल मॅप्स वर आपण कुठे जात आहोत याच्याकडे लक्ष होतेच. नेदरलँड्स मध्ये एक ९२९२ नावाची साईट आहे यात आपण आता कुठे आहोत आणि कुठे जायचे आहे हे टाकले कि मिनिटाबरहुकूम कुठली बस किंवा रेल्चे, कुठे जायचे कुठे बदलायचे हे सर्व येते.

आम्ही दोघांनी आमच्या एअरटेलने आंतरराष्ट्रीय रोमिंग पॅक घेतले असल्याने सौंच्या भावा आणि वहिनी बरोबर सतत संपर्क होताच. एअर टेलचा १० दिवसाचा पॅक २९९९ रुपये होता. अर्थात परत आल्यावर बिल ३९९८ आले कारण खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. मूळ बिल ४०० रुपये, २९९९ रोमिंग पॅक आणि ६०० रुपये कर. परंतू दोन्ही मुले आणि आईवडील भारतात असताना त्यांचा आमचा सतत संपर्क होता येणे हा एक मोठा मानसिक आधार होता शिवाय लाखात खर्च करायचा तर हजारात चिकू पणा करू नये.

यथावकाश ऍमस्टेलव्हीन या ऍमस्टरडॅमच्या उपनगरात असलेल्या त्यांच्या घरात पोहोचलो. त्यांचे घर सहाव्या मजल्यावर आहे तेथून काढलेले फोटो मागच्या भागात टाकले आहेत.

अतिशय शांत अशा ठिकाणी यांचे घर आहे. तुरळक वाहतूक, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि सगळीकडे हिरवळ असे त्यांचे घर आहे. नेदरलँड्स उत्तरेस असल्यामुळे मी महिन्यात तेथे पहाटे साडेपाच च्या सुमारास सूर्योदय होत असे आणि रात्री आठ वाजता सूर्यास्त. तसेच संधिप्रकाश रात्री नऊ साडे नऊ पर्यंत असतो. दिवस जवळ जवळ १५ तासांचा असतो. त्यामुळे संध्याकाळी चहा पाणी करून आम्ही साडे सात वाजता ते राहत असलेल्या जागेपासून जवळच असलेल्या जंगलात गेलो तेथील काही फोटो

हे फोटो भ्रमणध्वनीवरून काढलेले आहेत. one plus ५ T

अ‍ॅमस्टरडॅमच काय पण एकंदर युरोप मध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय उत्तम आहे. या बसेस अतिशय स्वच्छ असतात. त्यात वायफाय पण आहे. शिवाय त्यातून लहान मुलांची बाबा गाडी, सायकल किंवा दिव्यांग माणसांच्या व्हीलचेअर नेण्याची पण सोय आहे. बरीच माणसे घरापासून सायकलवर बस स्थानकावर येतात आणि बसमध्ये किंवा ट्राम मध्ये सायकल घालून आपल्या जायच्या ठिकाणापर्यंत नेतात आणि तेथे उतरून परत सायकलवर बसून कार्यलयात /आपल्या जायच्या ठिकाणापर्यंत जातात. प्रत्येक बस स्थानकावर पुढची बस किती मिनिटानी येते याचा इलेक्ट्रॉन डिस्प्ले असतो त्यामुळे आपली पुढची बस किती वेळात येईल हे आपल्याला नक्की माहिती असते.

bus

अगदी अशीच सुविधा रेल्वेतही आहे.

परंतु भारतीय रुपयात पाहायला गेलात तर तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भयंकर महाग आहे. विमान तळापासून भावाचे घर हे अंतर १३ किमी आहे यासाठी दोघांचे मिळून १५ युरो म्हणजे १२०० रुपये झाले. हे अंतर पुणे विमान तळापासून ते नळ स्टॉप इतके आहे.

तेथे फिरायचा एक दिवसाचा दोन दिवसांचा आणि तीन दिवसांचं पास पण मिळतो जो बस ट्राम किंवा स्थानिक रेल्वेवर कितीही वेळा जाण्यासाठी वापरता येतो. ज्याची किंमत अनुक्रमे १८.५०, २६. ५० आणि ३३.५० युरो माणशी आहे

युरोपात रेल्वे तर भयंकर महाग आहे. मला ऍमस्टरडॅम हुन ब्रसेल्स (कि ब्रुसेल्स)ला (२०० किमी) जायचे तिकीट काढायचे होते. तेंव्हा जालावर पाहिले तर सर्वात स्वस्त रेल्वेचे तिकीट २५ युरो होते (म्हणजे मुंबई पुणे अंतरासाठी २००० रुपये).तेथे रेल्वेला डायनॅमिक प्राइसिंग आहे. आणि गर्दीच्या वेळेस हेच तिकीट ५८ युरो होते. हि गाडी २ तास ४५ मिनिटात जाणार होती.

अशीच थालीस (THALYS) हि अतिवेगवान फ्रेंच गाडी हेच या अन्तर १ तास ४५ मिनिटात जाणार होती त्याचे तिकीट ७५ युरो होते. आणि गर्दीच्या वेळेस हेच तिकीट १०० युरो होते( म्हणजे ८००० रुपये) ४० रुपये किमी साठी.

दिल्ली ते आग्रा या मार्गावर शताब्दी चे तिकीट वातानुकूलित कुर्सीयान ६१८ रुपये (नाश्ता चहा सकट) आणि रुपये १०१९ एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहे आणि हि गाडी २०० किमी २ तासात जाते.

तेथे गंमत म्हणजे आपल्यासारख्या पॅसेंजर गाडीला "स्प्रिंटर" म्हणतात आणि एक्स्प्रेसला "इंटरसिटी"

train

आम्ही आपले १२ युरो च्या बसचे तिकीट काढले जी ३ तासात जाणार होती आणि आमच्या सोयीच्या वेळेत आणि घराच्या जवळून निघत होती सकाळी ०९.१५.

साधारण सर्व लोकांचे एकच म्हणणे असते कि तुम्ही युरोपात गेलात तर युरो चे रुपयात रूपांतर करण्याचा प्रयत्न सोडून द्या.
हा युरो चे रुपयात रूपांतर करण्याचा प्रयत्न नाही तर वस्तुस्थिती काय आहे हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आहे. कारण नेदरलँड्स मध्ये एका अभियंत्याचा पगार साधारण तीन ते साडेतीन हजार युरो इतका आहे आणि किमान वेतन दीड हजार युरो इतके आहे. या कारणास्तव तिथे बहुसंख्य मध्यमवर्गीय लोक सायकलने जाणे पसंत करतात.

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

28 May 2018 - 8:02 pm | सुबोध खरे

https://photos.app.goo.gl/w8biqWgL1dMRdYoJ2
फोटो दिसत नसल्यास या लिंकवर पाहू शकता.

फोटो दिसत आहेत ह्या वेळेस.
लेख आवडला.

भयानक महागाई दिसते आहे मग. यावेळी फोटो दिसले. छान भटकंती. पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2018 - 8:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं चालली आहे लेखमाला.

नेहमीप्रमाणे केवळ आकर्षणांची माहिती न देता, इतर माहिती देत असल्याने, आम्हीही तुमच्याबरोबरच तसाच विचार करत चाललो आहोत. त्यामुळे जास्तच मजा येत आहे ! फोटोही आकर्षक आहेत. आमच्या जुन्या नेदरलँड्सच्या भेटीच्या आठवणी जाग्या झाल्या. नेदरलँड्समधील शहरी भाग जितका उत्तमरित्या विकसित केलेला आहे तितकेच जरासे शहराबाहेर पडले की सर्वत्र दिसणारे निसर्गसौंदर्य आकर्षक आहे.

स्वप्निल रेडकर's picture

29 May 2018 - 4:14 pm | स्वप्निल रेडकर

मस्त! जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. ऍमस्टरडॅम अतिशय सुंदर शहर आहे. शिफोल एरपोर्टला उतरल्या उतरल्या वॅन गॉग म्युझियम ला भेट दिलेली आम्ही.

पैसा's picture

29 May 2018 - 9:19 pm | पैसा

वाचत आहे

छान माहिती मिळते आहे. आम्हाला घर बसल्या युरोप टूरचा आनंद मिळतो आहे.
मला फक्त दोन फोटो दिसत आहेत. बाकीचे लीन्कुन बघितले.

सिरुसेरि's picture

30 May 2018 - 8:05 am | सिरुसेरि

छान प्रवास वर्णन .

चौकटराजा's picture

30 May 2018 - 9:49 am | चौकटराजा

आम्ही कोणतेही नेट पॅक विकत न घेता १४ ही दिवस रोज मुलीसोबत विडिओ कॉल वर बोलू शकलो . आहे की नाही गम्मत ? असो भारत देशात गरीब रेल्वेत बसतो तर श्रीमन्त वोल्वो मधे. युरोपात उलटे आहे .कारण ८० टक्के रेलेवे सेवा खाजगी मालकीची आहे . तरीही उत्तम संशोधन केल्यास रेल्वेनेही युरोप पहाता येतो कमी खर्चात. डॉ, फोटोचे एक्स रे इमेज तरी दाखवा ! ;)

सुबोध खरे's picture

30 May 2018 - 11:14 am | सुबोध खरे

चौ रा साहेब
आमचा पण डेटा संपल्यावर( ३ GB असून संपला कसा यावर एअरटेल कडे उत्तर नाही) आम्ही बस आणि इतर ठिकाणी असलेल्या फुकट वाय फाय वर नेट चालवले. मेहुण्याच्या घरात वाय फाय तर होतेच.
परंतु माझ्याकडे कित्येक रुग्ण (ज्यात गरोदर महिला हि असतात ज्यांचे माहेर मुलुंडला आहे) आंबिवली बदलापूर कांदिवली सारख्या ठिकाणहून येतात. हे लोक अगोदर मला फोन करून येतात. अशा लोकांना माझा फोन उपलब्ध असणे हे आवश्यक आहे यासाठी आंतराष्ट्रीय रोमिंग घेणे आवश्यक होते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 May 2018 - 10:13 am | ज्ञानोबाचे पैजार

लेखमाला वाचतो आहे
पुभाप्र
पैजारबुवा,

सुधीर कांदळकर's picture

2 Jun 2018 - 6:59 am | सुधीर कांदळकर

किंमतींचे रुपयेकरण केले ते बरेच झाले. महागाईमुळे लोक सायकलवरून जातात हे ठाऊक नव्हते. अ‍ॅम्स्टलवी ते अ‍ॅमस्टलवीन५ फोटो दिसत नाहीयेत.

लेखमाला आवडते आहे.

दुर्गविहारी's picture

2 Jun 2018 - 1:24 pm | दुर्गविहारी

मस्तच लिहीला आहे. सध्या गडबडीमुळे मि.पा.वर फार वाचन होत नाही. पण तुमचा धागा म्हणल्यावर आवर्जुन उघडणे आलेच. माहिती अतिशय सविस्तर लिहीली आहे. मुख्य म्हणके रुपये-युरो रुपांतरणामुळे युरोप बराच खर्चिक आहे हे समजले. हि माहिती नंतर जाण्यारांना निसंशय उपयोगी पडेल.
पु.भा.प्र.

विअर्ड विक्स's picture

2 Jun 2018 - 2:51 pm | विअर्ड विक्स

लेखमाला आवडत्ये . वाचतो आहे. याआधी हि तुमचे लिखाण वाचले आहे पण का कोण जाणे हे प्रवास वर्णन वाचताना कंजूस काका च प्रवास वर्णन लिहितायेत असे वाटले ;)

१)धन्यवाद विअर्ड विक्स. कुठे काय आहे आणि माहिती , फोटो जालावर भरपूर असते ते गाळून इतर माहितीच पुढे कुणास उपयैगी पडते.
२) one plus ५ T चे फोटो खूपखूप चांगले आलेत. फोकसिंग स्सालिड. दूरवरचंही दिसतय. फक्त एक सूचना - निसर्ग दृष्यांत क्यामरा कमी उंचीवर धरून पाहा. ऊंच माणूस हा साहजिकच उंचावरून - साडेपाच फुटांच्यावर क्यामरा धरतो. तो अडीच - तीनला धरून पाहा.

अभ्या..'s picture

3 Jun 2018 - 9:45 pm | अभ्या..

मस्त एकदम

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2018 - 10:13 pm | टवाळ कार्टा

आपला अँम्सटरडॅम कट्टा हुकला काही कारणाने

ट्रेड मार्क's picture

6 Jun 2018 - 10:56 pm | ट्रेड मार्क

फोटो मस्त आलेत आणि प्रवास करताना लागणाऱ्या गोष्टींची सविस्तर माहिती दिल्याने धागा नुसता प्रवासवर्णन न राहता उपयुक्त पण झाला आहे.

अवांतर: १५०० ते ३५०० युरो मिळकत असणारे मध्यमवर्गीय लोक एवढे प्रचंड महाग रेल्वे/ बस भाडे असूनही संप वगैरे करत नाहीत का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jun 2018 - 11:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

१५०० ते ३५०० युरो मिळकत असणारे मध्यमवर्गीय लोक एवढे प्रचंड महाग रेल्वे/ बस भाडे असूनही संप वगैरे करत नाहीत का?

विकसित देशांच्या नागरिकांच्या नशीबाने, त्यांना फुकटेपणाची सवय लावून आपले मिंधे बनवणारे नेते मिळाले नाहीत. त्याशिवाय, त्या देशांच्या नशीबाने, "हात पसरून नाही तर आपल्या धमकीवर कमवून खाऊ" अश्या विचाराची जनता मिळालेली आहे. नेत्यातल्या आणि जनतेतल्या या अश्या मानसिकताच देशाला विकसित बनवतात.

सुबोध खरे's picture

7 Jun 2018 - 7:43 pm | सुबोध खरे

डॉ सुहास म्हात्रे
विकसित देशांच्या नागरिकांच्या नशीबाने, त्यांना फुकटेपणाची सवय लावून आपले मिंधे बनवणारे नेते मिळाले नाहीत.
perfect
डच पंतप्रधान आपले सरकार बनवल्यावर स्वतःच्या सायकलवर राजेसाहेबांच्या भेटीला गेले. हि आताची २०१७ ची गोष्ट आहे.
https://www.premiumtimesng.com/news/more-news/246225-photo-netherlands-p...
http://www.cyclingweekly.com/news/latest-news/dutch-pm-forms-new-governm...

सुबोध खरे's picture

6 Jun 2018 - 11:20 pm | सुबोध खरे

तेथे फार मोठ्या संख्येने लोक सायकलवर जातात. रस्त्याला सायकल साठी वेगळ्या लेन आणि सिग्नल आहेत.

पॅसेंजर गाडीला "स्प्रिंटर" म्हणतात आणि एक्स्प्रेसला "इंटरसिटी"

हे कळायला मला बराच वेळ लागला होता. =)

मस्त झालेली दिसतेय ट्रिप!

भंकस बाबा's picture

10 Jun 2018 - 9:16 am | भंकस बाबा

फोटो छान आले आहेत,
युरोचे रूपयात रूपांतर करण्याचा प्रयत्न आवडला, त्यामुळे नक्कीच आम्हाला बाहेर क़ाय चालले आहे याची मोलाची माहिती मिळते, म्हणजे उद्या अगदी आटापीटा करून जरी सफर ठरवली तर बजेट कितिपर्यंत जाऊ शकते याचा अंदाज बांधता येतो

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Jun 2018 - 2:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

ऑफिसच्या कामानिमित्त अ‍ॅम्स्टरडॅमला गेलो होतो तेव्हा तुमच्या फाँडेलपार्क पासुन थोड्या अंतरावर असलेल्या सरफटी पार्क समोर एका हॉटेलमध्ये मी २ आठवडे राहिलो होतो.
एक आठवड्याचा रेल्वे पास काढुन रोज ऑफिसला ट्राम आणि ट्रेन ने ऑफिसला जाणे आणि ईतरवेळी तिथुन आसपास फिरणे फारच सोपे होते. व्हॅन गॉग संग्रहालय, अ‍ॅमस्टरडॅम सेंट्र्ल, अ‍ॅन फ्रँकचे घर, कालव्यातुन बोटीने प्रवास आणि एक दोनदा शहराबाहेरसुद्धा फिरलो होतो.
अ‍ॅमस्टरडॅम चे काम झाल्यावर ट्रेन ने ब्रुसेल्स (विलवुर्ड) ला गेलो आणि तिकडेही एक आठवडा राहिलो, पण ट्रेनचा प्रवास तिकडे तेव्ह्ढा सोपा वाटला नाहि अ‍ॅमस्टरडॅमच्या तुलनेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Jun 2018 - 2:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

ऑफिसच्या कामानिमित्त अ‍ॅम्स्टरडॅमला गेलो होतो तेव्हा तुमच्या फाँडेलपार्क पासुन थोड्या अंतरावर असलेल्या सरफटी पार्क समोर एका हॉटेलमध्ये मी २ आठवडे राहिलो होतो.
एक आठवड्याचा रेल्वे पास काढुन रोज ऑफिसला ट्राम आणि ट्रेन ने ऑफिसला जाणे आणि ईतरवेळी तिथुन आसपास फिरणे फारच सोपे होते. व्हॅन गॉग संग्रहालय, अ‍ॅमस्टरडॅम सेंट्र्ल, अ‍ॅन फ्रँकचे घर, कालव्यातुन बोटीने प्रवास आणि एक दोनदा शहराबाहेरसुद्धा फिरलो होतो.
अ‍ॅमस्टरडॅम चे काम झाल्यावर ट्रेन ने ब्रुसेल्स (विलवुर्ड) ला गेलो आणि तिकडेही एक आठवडा राहिलो, पण ट्रेनचा प्रवास तिकडे तेव्ह्ढा सोपा वाटला नाहि अ‍ॅमस्टरडॅमच्या तुलनेत.