मा.ल.क.-३

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
24 May 2018 - 7:27 am

एका विद्वान महाशयांचा दिवसाचा बहुतेक वेळ त्यांच्या अत्यंत अद्ययावत असलेल्या ग्रंथालयातच जाई. त्यांच्या ग्रंथसंग्रहात देशो-देशीचे अनेक भाषेतले, अनेक विषयांवरचे ग्रंथ होते. त्यांनी स्वतः लिहिलेल्या ग्रंथांनी एक स्वतंत्र कपाट भरलेले होते. काव्य, शास्र, विनोद, व्याकरण, ज्योतिष सारख्या अनेक विषयात ते पारंगत होते. देशाच्या कोणत्याही भागात कुणी अभ्यासक किंवा विद्वान रहातात असे या 'विद्वानमहाशयांना' कळाले की ते तडक आपली प्रवासाची तयारी करत आणि त्या दिशेला मार्गस्थ होत. मग समोरच्या अभ्यासकाला अथवा विद्वानाला ते जाहीर सभा भरवून वादाचे आव्हान करत. मग काय? विद्वानांच्या त्या सभेत ते समोरच्याचे मुद्दे अत्यंत अभ्यासपुर्ण वक्तृत्वाने खोडुन काढत. देशातला असा एकही प्रांत नव्हता की त्या प्रांतातल्या विद्वानाला या महाशयांनी वादविवाद हरवले नव्हते. त्यामुळे देशातल्या समस्त विद्वज्जनांमध्ये या महाशयांची चांगलीच जरब होती. आज त्यांचा मुक्काम 'विद्वानांची नगरी' असलेल्या काशीत होता. दुपारच्या प्रहरानंतर गंगेपलिकडे रहाणाऱ्या एका वेदांचा अभ्यास असलेल्या पंडीतांबरोबर शांकरभाष्यावर त्यांना चर्चा करायची होती. हे पंडीत म्हणजे या विद्वानमहाशयांचे सर्वात मोठे आणि शेवटचे प्रतिस्पर्धी होते. एकदा त्यांना भर सभेत हरवले की मग त्यांना कोणी स्पर्धक रहाणार नव्हते. सकाळपासुन ते त्याच विषयांवरची टिपने काढण्यात व्यस्त होते. ईतक्यात नोकराने अदबीने निरोप दिला "महाराज, गंगेवर नाव आली आहे." विद्वानमहाशयांनी आपले धोतर, पंचा, डोक्यावरचा रुमाल सर्व व्यवस्थीत केले आणि ते गंगेकडे निघाले.

गंगेचे विशाल पात्र फार सुंदर दिसत होते. सुर्यनारायण मावळतीकडे झुकला होता. गंगेवरुन येणारी हवा प्रसन्न आणि अल्हाददायक होती. होडीही अत्यंत प्रशस्त होती. नावाडी फक्त एका आखुड पंचावर होता. त्याचे काळेभोर पण अत्यंत बांधेसुत, गोळीबंद शरीर ऊघडेच होते. दंडावर करकचून बांधलेला चांदीचा टपोरा ताईत चमकत होता. डोक्याला जुने पण स्वच्छ कापड घट्ट बांधले होते. मानेवर रुळणारे केस वाऱ्यावर भुरभूरत होते. विद्वानमहाशयांना होडीत पाऊल ठेवताना पाहून नावाडी तत्परतेने त्यांना हात द्यायला धावला. पण महाशयांनी त्याच्याकडे तिरस्काराने पहात त्याने पुढे केलेल्या हाताकडे दुर्लक्ष करुन होडीत प्रवेश केला. एका यःकश्चीत नावाड्याचा आधार घेणे त्यांना कमिपणाचे वाटले. महाशय नावेच्या एका टोकाला जावून बसले. दुसऱ्या टोकाला नावाडी ऊभा होता. त्याने हातातल्या बांबूने तळाला रेटा देत नाव हाकारली. थोडी डावीकडे, थोडी ऊजवीकडे कलत, थोडी थरथरत नाव निघाली. पण तेव्हढ्या थरथरीनेही विद्वानमहाशयांचे प्राण भितिने कंठापर्यंत आले होते. पण नाव स्थिर होता होता त्यांनी स्वतःला सावरले.

नाव किनाऱ्यावरुन जरा खोल पाण्यात येताच नावाड्याने बांबू बाजुला ठेवून दोन्ही हातात वल्ही घेतली आणि तो लयीत नाव वल्हवायला लागला. नावाड्याच्या हालचाली पहात बसलेल्या विद्वानमहाशयांनी आवाजात शक्य तितका कोरडेपणा, तुसडेपणा आणत विचारले "काय रे कोळ्या? किती वेळ लागेल पैलतिर गाठायला?"
नावाड्याने दोन्ही हात वल्ह्यांसहीत कपाळाजवळ नेत सांगीतले "महाराज आम्ही नाविक, गुहाचे वंशज. कोळी न्हाई. पल्याड जायला निदान दिड तास लागतो जी"
नावाड्याच्या ऊत्तराने महाशय अजुनच चिडले. त्यांच्या पहिल्याच वाक्यात नावाड्याने चुक काढली होती. अहंकारी मानसाचा अहंकार दुखवायला बरोबरीचाच मानूस लागतो असं काही नाही. नावाड्याचा पुर्ण पाणऊतारा करायचा या हेतुने महाराजांनी प्रश्नमालीका सुरुच ठेवली.
"काय रे नावाड्या, काही काव्य वगैरे जाणतोस का?"
"नाही महाराज"
"विस टक्के आयुष्य वाया गेले की रे तुझे. बरं, काही ग्रंथवाचन करतोस?"
"नाही महाराज"
"अरे वेड्या, तुझे तर चाळीस टक्के जीवन व्यर्थ गेले. निदान काही संतसाहीत्य वाचलेस?"
"नाही महाराज"
"अरे रे, तुझे साठ टक्के जगणे निरर्थक झाले. असो, निदान विद्वानांच्या सभेला तरी हजर रहातोस की नाही?"
"नाही महाराज"
"मुर्ख मानसा, तुझे ऐंशी टक्के आयुष्य हकनाक वाया गेले. किमान प्राकृतातील अभंग तरी गेलेत कानावरु की तेही नाही?"
"नाही महाराज"
"तुझ्या ईतकी मुढमती व्यक्ती मी आजवर पाहीली नाही. तु जगतो कसा आणि कशाच्या आधारावर मुढा?"
एवढा अपमान होऊनही नावाडी अत्यंत शांत हसला आणि त्याने त्याचे वल्हवणे एकाग्रतेने सुरुच ठेवले.

होडी गंगेच्या पात्रात मधोमध, खोल पाण्यात पोहचली होती. हळूहळू वातावरणाचा रंग पालटू लागला. पश्चीमेकडून काळ्या ढगांची फळी पुढे सरकू लागली. मंद वहाणारा वारा सोसाट्याने वाहू लागला. संथ वहाणारी गंगामाई खवळू लागली. पाण्यात जागोजाग भोवरे तयार होवून त्यांचा आकार वाढत चालला. गंगेचे रुप रौद्र होवू लागले. होडी आता दिशाहीन भरकटू लागली. क्षणात वर तर क्षणात पाताळात गेल्यासारखी वरखाली हेलकावू लागली. नावेच्या तळाच्या लाकडी फळ्यांनी एकमेकांची साथ सोडायला सुरवात केली. पाणी आता होडीच्या आत यायला लागले. नावाड्याने डोक्याचे फडके काढून परत घट्ट बांधले. घाबरगूंडी ऊडालेल्या अभ्यासू, बुद्धीमान, सर्व विद्यांमध्ये पारंगत असलेल्या विद्वानमहाशयांना नावाड्याने विचारले
"महाराज, पोहता येते का"
"नाही हो नावाडीमहाराज"
"माझे किती टक्के आयुष्य कुठे कुठे वाया गेले ते जावूद्या महाराज, पण तुमचे शंभर टक्के आयुष्य आता गंगार्पण होणार. राम राम घ्या आमचा." म्हणत नावाड्याने वल्ही टाकून पाण्यात ऊडी मारली.

मार्मिक लघु कथा

(कथासुत्र-अज्ञात, शब्दांकन-माझे)

कथा

प्रतिक्रिया

कथा जुनीच आहे. पण छान खुलवून सांगितली आहे. आवडली.

उगा काहितरीच's picture

24 May 2018 - 6:27 pm | उगा काहितरीच

+1

manguu@mail.com's picture

24 May 2018 - 12:05 pm | manguu@mail.com

छान

सिरुसेरि's picture

24 May 2018 - 5:22 pm | सिरुसेरि

जातक कथा , हितोपदेश कथा यांच्या संग्रहामधे मुळ कथा वाचलेली आहे . तुमचाही कथाविष्कार सुरेख आहे .

कथा मांडण्याची पद्धत आवडली.
एक जिज्ञासा: ही कथा बरीच जुनी असावी, विशेषतः या कथेत अभिप्रेत असलेला काळ तर बराच जुना असावा. तर त्याकाळी भारतात 'टक्केवारी' ही संकल्पना होती का ? कथासरित्सागर, पंचतंत्र, बृहत्कथामंजिरी, महाभारत, जातक कथा वगैरेत ८० टक्के, ३० टक्के असे उल्लेख सापडतात का?

दुसरे म्हणजे कथा घडते तो काळ लक्षात घेता "अत्यंत अद्ययावत असलेले ग्रंथालय" जरा विसंगत वाटते. त्याकाळी हस्तलिखित पोथ्या असत. तसेच अश्या प्रकारच्या लेखनात र्हस्व-दीर्घ वगैरेबद्दलचे शुद्धलेखनाचे नियम पाळणे अपेक्षित असते. त्यामुळे 'टिपने'- 'ईतक्यात'-'सुर्यनारायण'- 'यःकश्चीत'-'ऊत्तर' - 'विस टक्के' -'मुर्ख मानसा' - 'संतसाहीत्य' - 'ईतकी मुढमती' - 'तु' -'घाबरगूंडी ऊडालेल्या' वगैरे शब्द वाचताना भातात खडे आल्यासारखे वाटले.

शाली's picture

27 May 2018 - 7:37 am | शाली

@चित्रगुप्तजी,
आपण सुचवलेल्या, सांगीतलेल्या गोष्टींची ईथून पुढील लिखाणात नक्कीच काळजी घेईन. सुचनांसाठी खुप धन्यवाद!

चांदणे संदीप's picture

29 May 2018 - 3:58 pm | चांदणे संदीप

मा.ल.क. कथामाला चांगली आहे.

माझ्याही डोक्यात बरेच दिवसांपासून माझ्या लहानपणी मावशीने/आईने सांगितलेल्या अतिशय जुन्या कथा नव्या ढंगात वाचकांसमोर आणायचा विचार होता. एक-दोन कथा लिहिल्याही पण पुन्हा कार्यबाहुल्या नाचल्या… =)) असो, फक्त माझ्याकडच्या कथा मार्मिक वगैरे नसून रंजक आहेत आणि तुलनेने दीर्घ असतील. बघूया कसे होते ते.

तुम्ही चालू ठेवा. शुभेच्छा!

Sandy

येऊद्या येऊद्या लवकर. आवडेल वाचायला.

शेखरमोघे's picture

29 May 2018 - 6:54 pm | शेखरमोघे

छान लिखाण!!

श्रीमती शाली लिहितायत का या कथा?

श्रीयुत शाली शब्दांकन करत आहेत या कथांचे.

एमी's picture

30 May 2018 - 12:32 pm | एमी

बरं :)
लेखनशैली बदलल्यासारखी वाटली मला म्हणून विचारलं.

ॲमी, ईतका विचार केला जातो लिखाणाचा? बापरे! मी नक्कीच जपुन लिहिन यापुढे. अगोदर मीच बावळटपणा केला म्हणा.

एवढं गंभीरपणे घेऊ नका ओ :)
लिहित रहा.

कुमार१'s picture

17 Jun 2018 - 7:24 pm | कुमार१

आवडली.

कथा छानच,चित्रगुप्तांची सेन्सॉरींग आवडली.