अनवट किल्ले ३२ : डेरमाळ ( Dermal )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
11 May 2018 - 12:42 pm

नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला म्हणजे कसमादे ( कळवण-सटाणा-मालेगाव-देवळा ) परिसरात काही अफलातून किल्ले आहेत. मात्र शिअवछत्रपतींच्या साम्राज्याचा इकडे विशेष विस्तार न झाल्याने, तसेच मुख्य मार्गापासून काहीसे आडबाजुला असल्याने हे गडकोट फारचे कोणाला माहिती नाहीत. अगदी क्वचितच दुर्गप्रेमी इथे भेट देतात. यापैकी एक म्हणजे, "डेरमाळ". नुकतीच आपण गाळणा किल्ल्याची ओळख करुन घेतली. या परिसरातील गाळणा हा महत्वाचा किल्ला असल्याने या सर्व डोंगराना गाळणा टेकड्या म्हणतात. मालेगावच्या इशान्येला, नामपुर-ताहराबाद रस्त्याजवळ या गाळणा टेकड्यात एक दुर्गरत्न विसावलेले आहे, "डेरमाळ". काहीसे मुख्य मार्गापासून फटकून आणि बहुतेक कोणतेच गाव याच्या जवळपास नाही, तरीही खडतर वाटचाल करुन या किल्ल्यावर असलेली पाण्यची टाकी आणि डेरमाळला लाभलेला हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यासारखा अर्धगोलाकार आकार असलेला रौद्रभिषण भैरवकडा हे आवर्जून पहाण्यासाठी इथे भेट द्यायलाच हवी. याच रांगेवर पिसोळ हा आणखी एक दुर्लक्षित आणि देखणा किल्ला आहे. नीट नियोजन केल्यास खाजगी वहानाने डेरमाळ किल्ल्याला आणि पिसोळ किल्ल्याला एका दिवसात भेट देता येत.
Dermal 1
पावसाळ्यात वेळ काढून मालेगाव गाठले. यावेळचे लक्ष्य होते, कोणी फारचे न बघितलेले आणि फारचे माहिती नसलेले काही गडकोट पालथे घालण्याचे. त्यापैकी एक म्हणजे "डेरमाळ" या डेरमाळला जायचे तर तीन मार्गाने जाण्याचा पर्याय होता. माझ्याकडे जी माहिती होती ती अशी होती.
१) टिंघरी गावातून :-
नाशिक - सटाणा - नामपूर हे अंतर ११० किलोमीटर आहे. नामापूर मार्गे टिंघरी हे १२ किलोमीटरचे अंतर आहे. टिंघरी मधून डेरमाळ किल्ला दिसत नाही. टिंघरी गावासमोर एक डोंगर आहे. या डोंगराच्या डाव्या बाजूला असलेल्या खिंडीत जावे लागते. प्रथम टिंघरी गावासमोर असलेला डोंगर चढत डाव्या बाजूची खिंड गाठावी लागते. हे अंतर पार करण्यास पाऊण तास लागतो. हि खिंड पार केल्यावर आपण पठारावर पोहोचतो. याठिकाणाहून आपल्याला डेरमाळ किल्ल्याचे पहिल दर्शन होते. हे पठार पार केल्यावर थोडेसे खाली उतरुन आपण दुसर्‍या पठारावर पोहोचतो. हे पठार थेट डेरमाळ किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचलेले आहे. या पठारा वरुन चालत किल्ल्याच्या जवळ आल्यावर झाडीत एक विरगळ आहे. एका ३ फ़ुट उंच दगडावर गोड्यावर बसलेला योध्दा कोरलेला आहे. गावापासून या वीरगळी पर्यंत पोहोचण्यास दिड तास लागतो. या विरगळीच्या मागे एक सुकलेला तलाव आहे. या विरगळीच्या इथुन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा फ़ुटतात. सरळ जाणारी वाट ही किल्ल्याची मुख्यवाट आहे. हि वाट आपल्याला किल्ल्याच्या दक्षिण दरवाजात घेऊन जाते. तर उजव्या बाजूने (तलावाच्या बाजूने) जाणारी वाट फ़ारशी मळलेली नाही पण ही वाट आपल्याला थेट उत्तर दरवाजात घेऊन जाते. वीरगळ ते किल्ल्याचा दरवाजा हे अंतर कापण्यास अर्धा तास लागतो. टिंघरी गावातून किल्ल्यावर पोहोचण्यास २ ते २.३० तास लागतात. किल्ला बघायला २ तास आणि परतीच्या प्रवासाला १.३० लागतो. हे सर्व ध्यानात घेतल्यास रात्री किंवा पहाटे टिंघरीला पोहोचुन सकाळी लवकर डेरमाळ पाहून दुपारी जेवणाच्या वेळी टिंघरी गावात पोहोचता येते.
२) बिलपूरी मार्गे :-
नाशिक - सटाणा - नामपूर मार्गे बिलपूरी गावात पोहचता येते नामपूर पासून बिलपूर हे गाव साधारणपणे १५ किमी वर आहे. गावात सटाण्याहून नामपूर मार्गे मुक्कामाची एसटी सुध्दा येते. जर एसटी नाही मिळाली तर नामपूर- साक्री मार्गावर ‘चिराई’ नावाचे गाव आहे, तिथून ८ किमी वर चालत बिलपूरीला जाता येते किंवा नामपूर तळवडे अशा सहा आसनी गाड्या चालू असतात. तळवडे ते बिलपूरी अंतर ३ किमी पायी गाठता येते. बिलपूरी गावातून डेरमाळ दिसतो, पण तिथपर्यंत जाण्यासाठी सरळ वाट नाही. वाट जरा वाकडी करुनच जावे लागते.
Dermal 2
डेरमाळच्या समोर असणार्‍या डोंगराची सोंड बिलपूरी मध्ये उतरलेली आहे. गावातून पुढे जाताच दूरवर डावीकडे डेरमाळ आणि अगदी समोर एक डोंगररांग दिसू लागते. पण किल्ल्याची वाट थोडी फिरून फिरून गडावर जाते.. समोर दिसणाऱ्या डोंगराला उजवीकडे वळसा घालून आपण पुढे येतो तेंव्हा आणखी मुरुमाचा डोंगर समोर येतो.. इथे समोर दिसणाऱ्या डोंगराच्या नाकाडावर टिच्चून वर आलो की पुन्हा उजविकडे वळसा घालायचा. की आपण एक रुक्ष आणि रखरखीत पठारावर येवून पोहोचतो. आपण पठारावर पोहोचलो की डावीकडे डेरमाळ किल्ल्याचा डोंगर आणि लगतच्या डोंगराला जोडणारी खिंड दिसते. पठारावरून डावीकडे (डेरमाळ किल्ल्याकडे) पाहिल्यास खिंडीच्या वर डोंगरावर एक डावीकडे काळी आडवी पट्टी दिसते, हिच डेरमाळ किल्ल्याची तटबंदी
Dermal 3
किल्ला आणि आपण चालत असणारे पठार यात एक दरी असते. पठारावरुन अर्धा तास चालत गेल्यावर आपण दरी जिथे संपते त्या ठिकाणी इंग्रजी ‘यू’ आकाराचे वळण घ्यायचे आणि समोरच्या पठारावरच्या जंगलात शिरावे. आता डेरमाळचा डोंगर आणि समोरचा डोंगर यांना जोडणारी खिंड आपल्या मागे रहाते. आता डेरमाळची तटबंदी आपल्या डोक्यावर उजवीकडच्या कड्यावर असते. आता वाट चढणीला लागते, वाटेत किल्ल्याच्या तीन पडझड झालेल्या दरवाज्यांचे अवशेष दिसतात. शेवटच्या दरवाज्या जवळून वाट पून्हा ‘यू’ आकाराचे वळण घेऊन डेरमाळच्या माचीवर जाते.
Dermal 4
३ ) प्रतापपुर मार्गे ;-
डेरमाळच्या उत्तरेला दरीत प्रतापपुर हे छोटे खेडेगाव आहे. या बाजुने एक वाट वर चढून टिंघरीला येते.
Dermal 5
या वाटेला "ईंद्रबारी" किंवा स्थानिक नाव "हिंदळ बारी" म्हणतात. बारी म्हणजे घाटवाट. या वाटेने टिंघरीला येउन पहिल्यामार्गे डेरमाळला जाता येते. १९७२ च्या दुष्काळाच्या वेळी इथून रस्ता बनविण्याचा प्रयत्न झाला. पण काम अर्धवट राहिले. प्रतापपुरला जायचे झाले तर धुळ्यावरुन सकाळी ७.०० वा आणि संध्याकाळी ५.०० वा अशा बस आहेत. साक्रीतून बर्‍याच बस आणि खाजगी जीपगाड्या आहेत.
Dermal 6
या बाजूने आपण भैरवकड्याच्या पायथ्याशी असल्याने डाव्या बाजुला त्याचे रौद्र दर्शन सतत होत रहाते.
Dermal 7
आमची स्वताची कार असल्याने पहिला पर्याय म्हणजे टिंघरीकडून जाण्याचे ठरविले. मालेगाव -नामपुरवरुन द्याने-उतराणे-श्रीपुरवाडे मार्गे टिंघरी गाव गाठले. वाटेत मोसम नदी ओलांडली. पावसामुळे नदी एन भरात होती. टिंघरी गाव डोंगर गाभ्यात वसलेले आहे. गावाच्या तिन्ही बाजुने डोंगरांचा गराडा आहे. सरत्या पावसाने निसर्ग अक्षरशः उधाणलेला होता. सर्वत्र हिरवाईचे साम्राज्य होते. डोंगरावरुन फेनधवल पाण्याचे धबधबे स्वताला झोकून देत होते. गावाशेजारीच एक सुळका असलेला डोंगर मी नामपुरपासुन पहात होतो. मला सुरवातीला तोच डेरमाळ किल्ला असावा असे वाटले. मग चौकशी केल्यानंतर तो डेरमाळ नाही हे समजले.
Dermal 8
( वरच्या प्रकाशचित्रात दिसणारा रस्ता ईंद्रबारीतून खाली उतरुन प्रतापपुरला जातो )
त्यानंतर गावातूनच एक ठळक वाट उत्तरेला एका ताशीव कडे असलेल्या डोंगराकडे जात होती. तोच डेरमाळ समजून आम्ही तिकडे निघालो. पण थोडे अंतर गेल्यानंतर तो एक साधा डोंगर असून किल्ला गावातून दिसत नाही, असे शेतात काम करणार्‍या एका मामांनी संगितले. डेरमाळला जायचे असल्यास टिंघरी गावाच्या उजव्या बाजुला, म्हणजे पुर्वेच्या बाजुला जी टेकडी दिसते आहे, त्यावर चढल्यानंतर एक पठार लागेल, त्याच्या मागे डेरमाळ आहे असे मार्गदर्शन केले.
खानदेशाची बोली आहे, "आहिराणी", मात्र इथून गुजरात जवळ असल्याने गावकर्‍यांच्या बोलण्यात खानदेशी आणि गुजराती यांची सरमिसळ जाणवते. त्या मामांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही त्या टेकडीकडे निघालो. मात्र हि टेकडी असंख्य वाटांनी विंचरुन काढली होती. बहुतेकदा आपण या वाटांना ढोरवाटा म्हणतो, इथे मात्र या वाटांना "गायक्यांच्या वाटा" म्हणजेच गुराख्यांच्या वाटा म्हणतात. आम्ही या वाटेने निघालो तेव्हा काही मुले त्यांची गुरे घेउन वर पठारावर निघाली होती. सरता पावसाळा असल्याने वर भरपुर गवत असल्याने ताज्या लुशलुशीत गवताची गुरांना मेजवानी होती. आम्हीही त्यांच्या मागोमाग जाउन वर पोहचलो आणि थक्कच झालो. वर प्रचंड मोठे पठार पसरलेले होते. मुळात डेरमाळ ह्या किल्ल्याचे नाव मी प्रथम वाचले तेव्हा,'याचा माळाशी काही संबध असेल का?' अशी शंका मनामधे आली होती. गंमत म्हणजे नावाप्रमाणेच हा किल्ला एका भल्या मोठ्या पठारावर म्हणजे माळावर वसला आहे.
Dermal 9
ती मुले थोड्या अंतरावर विश्रांतीसाठी एका जागी बसली.
Dermal 10
त्यातील एका मुलाने पावा काढून वाजवायला सुरवात केली. असा अधुनिक किसनदेव आम्हाला कधी भेटेल असे वाटले नव्हते. पण त्याचे बासरीवादन अक्षरशः मोहून गेले. आजुबाजुला मस्त हिरवा निसर्ग फुललेला आणि त्या निसर्गाचे खरे सुर जाणवून देणारे त्याचे बासरीवादन हा आयुष्यभर आठवणीत ठेवावा असा क्षण. ह्या आडवळणाच्या गावी ईतकी सुंदर शिकवण त्याला कशी मिळाली? बर ती बासरी म्हणजे चक्क पि.व्ही.सी. पाईपपासून बनविलेले ओबडधोबड वाद्य होते. कला हि रक्तातच असावी लागते हेच खरे. एखादी चांगली बासरी खरेदी करण्यासाठी त्याला थोडे पैसे दिले आणि निरोप घेउन निघालो. प्रचंड मोठ्या गवताळ पठारावर भरपुर वाटा फुटलेल्या होत्या.
Dermal 11
या माळाच्या टोकाशी डेरमाळचे पहिले दर्शन झाले.
Dermal 12
वर्षभर हा माळ काहीसा उजाड असतो.
Dermal 13
मात्र पावसाळ्यात ईथले रुप असे काही पालटून जाते. किमान पाच-सहा गोल्फ कोर्स उभारता यावेत इतकी मोठी सपाटी इथे आहे. एरवी केव्हा एकदा गडमाथा गाठतो हि घाई असते. आता मात्र एका टोकाशी जाउन मला आधी भैरवकडा बघायची उत्सुकता वाढलेली होती. जसा हरिशचंद्रगडाचा अर्धवर्तुळाकार "कोकणकडा" तसाच हा डेरमाळचा "भैरवकडा". मात्र मुख्य मार्गापासून आडबाजुला असल्याने अजिबात प्रसिध्द नाही.
Dermal 14
टोकाशी जाउन आम्ही खाली डोकावलो आणि एक क्षणभर श्वासच अडकला. प्रचंड मोठ्या कड्याच्या मधोमध आम्ही अभे होतो. हरिश्चंद्रगडाचा कडा आपण फक्त वरुन बघू शकतो. इथे मात्र खाली जितला खोल तितकाच डोक्यावर कडा उभा होता.
Dermal 15
भान हरपून आम्ही हा नजारा पहात होतो. दोन डोळे सुध्दा अपुरे पडावे असा या कड्याचा विस्तार. त्याच्या मधोमध एक पाउलवाट खाली उतरलेली दिसली. त्यावरुन जायचे म्हणजे वाघाचे काळीज हवे. अखेरीस भानावर येउन आम्ही माथ्याकडे निघालो.
Dermal 16
पुन्हा पठारावर येउन गडमाथ्याकडे निघालो. या पठारावरुन चालत किल्ल्याच्या जवळ आल्यावर झाडीत एक विरगळ आहे. एका ३ फ़ुट उंच दगडावर घोडयावर बसलेला योध्दा कोरलेला आहे. या विरगळीच्या मागे एक सुकलेला तलाव आहे. या विरगळी पासून किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा फ़ुटतात. सरळ जाणारी वाट ही किल्ल्याची मुख्यवाट आहे. हि वाट आपल्याला किल्ल्याच्या दक्षिण दरवाजात घेऊन जाते. तर उजव्या बाजूने (तलावाच्या बाजूने) जाणारी वाट फ़ारशी मळलेली नाही, पण ही वाट आपल्याला थेट उत्तर दरवाजात घेऊन जाते.
Dermal 17
( डेरमाळ गडाचा नकाशा )
Dermal 18
विरगळापासून किल्ल्यावर जाणारी वाट प्रशस्त आणि मळलेली आहे. लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे वाट नेहमी किल्ल्याची तटबंदी डावीकडे ठेवत जावे आणि मध्येच कातळात खोदलेल्या पायर्‍या सुध्दा लागतात. ही वाट किल्ल्याच्या पडझड झालेल्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचते. या वाटेने अर्ध्या तासात आपण उध्वस्त दरवाजातून गडावर प्रवेश करतो.
Dermal 19
गडावर प्रवेशकेल्यावर डाव्या बाजूला भैरवकडा आणि उजव्य बाजूल गडाचा विस्तार दिसतो. गड प्रशस्त आहे. यावर फ़ारसा वावर नसल्याने वाटा बुजलेल्या आहेत त्यामुळे गडावरील अवशेष शोधावे लागतात. भैरवकडा डावीकडे ठेवत चढत गेल्यास किल्ल्याच्या टोकावर एक वास्तू दिसते त्या दिशेने चालत जावे. जातांना उजव्या बाजूला दोन पाण्याची टाकी दिसतात.
Dermal 20
इमारतीची दरवाजाची कमान आणि दर्शनी भिंत फ़क्त शाबूत आहे.
Dermal 21
ज्याने हि वास्तु या ठिकाणी उभारली त्याचा सौदंर्यदृष्टीला आणि निसर्गप्रेमाला दाद द्यायला हवी. वास्तविक गड, किल्ले हे संरक्षणाची ठाणी, लष्करी हालचालीची केंद्र. मात्र ती उभारताना एखादा रसिक स्थपती असला कि अशी एखादी कलाकृती गड-किल्ल्यावरही पहायला मिळते.
Dermal 22
दरवाजातून आत शिरल्यावर आपण थेट कड्यावर पोहोचतो.
Dermal 23
येथून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यासारखा अर्धगोलाकार आकार असलेला भैरवकड्याचे रौद्रभिषण रुप आणि आजूबाजूच्या डोंगरदर्‍या फ़ार सुंदर दिसतात. पुर्ण कडा कॅमेर्‍याच्या लेन्समधे मावत नाही. थक्क होउन हा निसर्गाचा कलाविष्कार पहायचा. पार तळाशी काही गुरे चरताना दिसत होती. उत्तरेला पिसोळकडे धावत गेलेली डोंगररांग मोठी मोहक वाटत होती.
Dermal 24
याठिकाणी कड्यावर कातळात दोन पावल कोरलेली आहेत त्यांना आदिवासींच्या बहिरव देवाची (भैरव) पावलं म्हणतात.
Dermal 25
या असल्या उतारावर देखील काही बकर्‍या आरामात चरत होत्या. इथे आम्ही किती वेळ बसलो त्याचे भान राहिले नाही. अखेरीस उरलेला गड बघायचा म्हणून निघालो. इमारतीतून बाहेर पडून आता डाव्या बाजूला जावे.
Dermal 26
थोड्याच अंतरावर कातळात खोदलेल्या सात टाक्यांचा समूह आहे. यातील पाण्यावर शेवाळे साचलेले आहे.
Dermal 27
या टाक्यांच्या वरच्या बाजूला दोन टाकी आहेत. या टाक्यांपासून थोडे पुढे गेल्यावर वाट झाडीत शिरते . याठिकाणी तटबंदीचे अवशेष आहेत. त्यावर चढून गेल्यावर कातळात खोदलेली दोन मोठी पाण्याची टाकी आहेत.
Dermal 28
ती पाहून परत सात टाक्यांपाशी येउन वर दिसणार्‍या टेकाडावर चढायचे, इथले बांधकाम पाहिले कि नक्कीच मोठा वाडा असणार याची खात्री पटते. आज मात्र पडीक अवशेष झाडीने गिळून टाकलेत. तुटक्या तटबंदीतून आत शिरायचे.
Dermal 29

Dermal 30
इथे एके ठिकाणी उघड्यावर हनुमानाची आणि गणेशाची मूर्ती आहे.
या दुर्लक्षित किल्ल्याला ईतिहासही फार नाही. पण याचे खानदेश-सुरत बंदर जोडणार्‍या रस्त्यावरचे मोक्याचे स्थान बघता हा मध्ययुगीन ईतिहासात एक नक्कीच महत्वाचा किल्ला असणार. गवळी राजाने १४ व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती केली, त्यामुळे त्याचेच या गडावर वर्चस्व होते. इ.स. १३४० च्या दरम्यान राठोडवंशीय राजा नानदेवाने हा गड जिंकून घेतला. त्यानंतर पुढे मोगलांच्या ताब्यात हा गड गेला. दुर्दैवाने हा इतका ईतिहास सोडला तर पुढचा फार ईतिहास आपल्याला ज्ञात नाही. थोडे फार मोगल शैलीची बांधकामे आपण आजही गडावर पाहू शकतो.
Dermal 31
इथे आपण सर्वोच्च माथ्यावर म्हणजे ३५२६ फुट उंचीवर असतो. उत्तरेकडे पायथ्याशी प्रतापपुर दिसते. तर दुर क्षितीजावर भामेर लक्ष वेधून घेतो. हि भामेरची रांग आणि डेरमाळची रांग यांच्यामधून पांजरा नदीचे खोरे आहे.
धुळ्यावरुन नवापुरमार्गे सुरतला जाणारी वाट याच दोन किल्ल्यांच्या मधून जाते.
Dermal 32
पुर्वेकडे दरीत बिलपुरी गाव दिसते.
Dermal 33
हनुमानाच्या मूर्तीच्या बरोबर डावीकडून एक वाट खाली उतरते.इथेच एक भूमीगत गुहा खोदलेली आहे. ही गुहा ७ ते ८ लोकांच्या मुक्कामा करीता योग्य आहे. गुहेच्या समोरुनच एक वाट खाली माचीवर जाते.
Dermal 34
इथेच वाटेत एक भलेमोठे टाके लागते. याचे नाव आहे ‘समुद्री’ टाके. फक्त याच टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. किल्ल्याच्या उत्तर भागातले हे अवशेष पाहून झाल्यावर दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवावा.
Dermal 35
या टाक्यांच्या पुढून एक वाट जाते, तीच बिलपूरीला जाणारी वाट आहे. या रस्त्याने खाली उतरले कि काही कातळकोरीव गुहा लागतात.
Dermal 36
किल्ल्याच्या मध्ये असलेल्या उंचवट्याला वळसा घलून खाली उतरल्यावर द्क्षिणेकडील उध्वस्त दरवाजाचे अवशेष पाहायला मिळतात. याठिकाणाहून वाट खाली उतरते पण घसार्‍याची आहे.
Dermal 37
या गुहा पाहून पुन्हा माथ्यावर आलो, तर इथे एक पावसाळी तलाव दिसला. त्याच्या काठावर काही गुराखी शिदोरी सोडून बसले होते. एकदंरीत गड अप्रसिध्द असल्याने चुकलेमाकले ट्रेकर्स सोडले तर गडावर नियमित राबता फक्त गुराख्यांचा असतो.नाही म्हणायला, बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गावकरी लोकांची इथे जत्रा असते. लोकं इथल्या टाक्यात मनसोक्त डुंबतात. गडावर देव नाही पण मजा करायला गावकरी इथं येतात असं कळलं.
गडमाथा तसा झाडीभरला आहे. गडावर घोस्ट ट्रि मोठ्या संख्येने आहेत. या झाडांची साल सोलवटली म्हणजे हि झाडं चंद्रप्रकाशात चमकतात.म्हणून यांना घोस्ट ट्री असंही म्हणतात
एकदंरीत गडमाथ्याचा विस्तार ध्यानी घेता गड फिरायला किमान तीन तास हवेत. गडावर फारसा राबता नसल्याने तसेच वाटा मोडलेल्या नसल्याने किल्ला पाहाण्यासाठी गावातून वाटाड्या घेऊन जावा. एकुण वातावरण आणि पाण्याची उपलब्धता विचारात घेता जुलै ते फेब्रुवारी हा इथे येण्यासाठी उत्तम कालावधी.
खरे तर डेरमाळ पाहून पिसोळ बघायचे प्लॅनिंग होते, मात्र डेरमाळ मनसोक्त पहाण्याचा नादात ईतका वेळ गेला कि पिसोळला जाणे अशक्य होते. अर्थात मिळाळेला आनंद ईतका मोठा होता कि, पिसोळला जायला मिळाले नाही याची खंत न बाळगता, रमतगमत आम्ही पुन्हा टिंघरीकडे निघालो.

(तळटिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) नाशिक जिल्हा गॅझेटिअर
२ ) दुर्गभ्रमंती नाशिकची:- अमित बोरोले
३ ) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५ ) आव्हान- आनंद पाळंदे
६ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
७ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
८ ) www.durgbharari.com हि वेबसाईट

प्रतिक्रिया

या धाग्याच्या लिखाणात मि.पा.कर अमरेंद्र बाहुबली यांची मोलाची मदत झाली, किंबहुना त्यांच्या आग्रहाखातर हा धागा मला लिहावा लागला. ;-)
त्यांनीच मला प्रतापपुरकडून येण्यार्‍या वाटेची माहिती आणि त्याबाजुने घेतलेले फोटो पाठवले जे मी धाग्यात वापरु शकलो, त्याबध्दल मी त्यांचा आणि त्यांच्या मामांचा अत्यंत ऋणी आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 May 2018 - 4:53 pm | अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली's picture

11 May 2018 - 4:56 pm | अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली's picture

11 May 2018 - 5:26 pm | अमरेंद्र बाहुबली

"खुप छान लेख. माहीत नसलेल्या किल्ल्यांबद्दल इतकी सखोल माहिती क्वचितच कुठे मिळेल.
दुवी साहेब, खरं तर असे आडवळणावरचे, फारसे प्रसिद्ध नसलेले किल्ले फिरून त्यावर लेख लिहून तुम्ही प्रसिद्धीस आणताय त्या बद्दल खरं तर संपूर्ण खानदेश तुमचा ऋणी असावा.
तुम्ही करत असलेल्या कार्याला सलाम."

हिरवळ, तळी पाहून जीव सुखावला!
मस्त फोटो व वर्णन.

शाली's picture

11 May 2018 - 8:41 pm | शाली

सुंदर फोटो, मस्त लेख.
आम्हाला भटकने शक्य नाही पण तुम्ही छान सफर घडवली.

बॅटमॅन's picture

12 May 2018 - 1:58 am | बॅटमॅन

लेख खूप आवडला, अपरिचित किल्ल्याची उत्तम माहिती दिलेली आहे.

सिरुसेरि's picture

15 May 2018 - 5:48 pm | सिरुसेरि

उत्तम माहिती आणी फोटो

सर्वच वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

प्रचेतस's picture

18 May 2018 - 10:29 am | प्रचेतस

तपशीलवार लेखन फारच आवडले.
ह्या भागातील किल्ल्यांचा इतिहास बराचसा मुग्धच आहे.