पुणे ते लेह (भाग १३ - हेमिस मोनेस्टरी आणि उपशी ते दारचा)

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in भटकंती
5 May 2018 - 8:04 pm

संध्याकाळी ४:३० लाच कारू मध्ये परत पोचलो. इथून हेमिस मोनेस्टरी आहे फक्त ७ किमीवर. ती आजच बघितली तर उद्या सकाळी लवकर निघता येईल असा विचार करून हेमिस कडे निघालो. वाटेत एका लामानी गाडीला लिफ्ट मागितली. लामा म्हणजे बौद्ध धर्मगुरू. एकेकाळी ते हेमिस मोनेस्टरी मध्ये धर्मगुरू होते. पूर्ण लडाख भागात फिरताना जागोजागी आढळणारी एक गोष्ट म्हणजे 'माने'. इथे इतके माने का असावेत ह्याबद्दल त्यांना विचारले.

'पुराने जमाने में लोग ये माने बनाते थे. किसीकी याद में ये बनाने का रिवाज था. ये घर में ख़ुशी, अच्छा भविष्य, सेहत, दौलत लाते है ऐसा माना जाता था. बहुत वक्त लगता था इनको बनाने में. अब समय के साथ सब बदल गया. हमारे लोगों को भी ये बनाने का समय नहीं है.' - लामा

हेमिस मोनेस्टरी (गोम्पा)

१६७२ साली लडाखी राजा सेंग्गे नामग्याल ह्यांनी बांधून पूर्ण केलेली हेमिस मोनेस्टरी ही लडाख मधील सर्वात श्रीमंत, भव्य दिव्य मोनेस्टरी आहे. त्यामुळेच का काय पण मला तितकीशी आवडली नाही. आत एक म्युझिअम देखील आहे. मोनेस्टरी व म्युझिअम मध्ये आतील फोटो काढण्यास बंदी आहे.

मोनेस्टरी पाहून परत कारू मध्ये आलो. गाडीची टाकी डिझेलने पूर्ण भरून घेतली. पुढे कितीही खराब रस्ता असला तरी गाडीच्या टाकीत असलेले अंदाजे ४५ लिटर आणि कॅन मधे असलेले २० लिटर डिझेल आम्हाला कारू पासून ३५० किमी दूर असलेल्या 'तंडी' पर्यंत निश्चित पुरले असते. मुक्कामास गाठले कारू पासून १३ किमीवर असलेले उपशी हे गाव. इथे काही लॉज वगैरे नाहीत. अंग टेकता येईल अशा २ खोल्या असलेले एक छोटे हॉटेल होते. अजून मनाली ४२५ किमी दूर होते आणि ह्या ४२५ किमीच्या प्रवासात पार करायचे होते ५ मोठे 'ला'.

१) टागलांग ला (उंची १७४८० फूट)
२) लाचलुंग ला (उंची १६६०० फूट)
३) नकी ला (उंची १५५४७ फूट)
४) बारालचा ला (उंची १६०४३ फूट)
५) रोहतांग ला (उंची १३०५१ फूट)
#################################################################################

७ सप्टेंबर

लेहकडे निघालेल्या २ बस गावातील चौकात थांबल्या होत्या. ज्या पर्यटकांना फक्त टॉयलेट वापरायचे आहे त्यांना १० रु. घेऊन हॉटेल मधले टॉयलेट वापरू देणे हा एक साईड बिझनेस होता मालकाचा.
'क्या करें भैया. पानी नही है इस गांव में. हमको भी बहुत मुश्किल होती है. इसलिये पैसा लेता हूं.' - मी न मागताच हॉटेल चालकाने स्पष्टीकरण दिले.

सकाळी ६:४५ ला उपशीतून निघालो.

माने

ओळीत ४ 'माने' आणि त्यांच्या भिंतीवर असलेल्या दगडांवर देखील काहीतरी कोरलेले होते.

लगेच टागलांग ला आला.

टागलांग ला

टागलांग ला पार करण्यात कोणतीच अडचण आली नाही. रस्ता अगदी नव्याने केल्यासारखा उत्तम होता. वातावरण देखील चांगले होते. स्वच्छ सूर्यप्रकाश, हवीहवीशी वाटणारी थंडी, निळे आकाश आणि मधूनच डोकावून बघणारे एखादे बर्फाच्छादित शिखर. टॉपवर पोचलो तेव्हा ८:३० वाजले होते. कोणत्याही ला च्या टॉपवर पोचले की एखाद दुसरा माने, मंदिर हे असणारच आणि जोडीला असणार पताका.

टागलांग ला वर १० मिनिटे थांबून पुढे निघालो. टागलांग ला उतरून थोडे खाली गेले की आपण येतो मूर प्लेन्स वर. हा जवळपास ३५-४० किमीचा भाग समुद्र सपाटीपासून १६००० फूट उंचीवर असून पूर्ण भाग एक पठार आहे. एवढ्या उंचीवर इतके मोठे पठार हे एक आश्चर्यच आहे. ना कसली वस्ती ना झाडे. फक्त बाजूने सुंदर डोंगर, थोडेफार खुरटे गवत आणि त्यात चरणाऱ्या हजारो बकऱ्या व मेंढ्या.

मूर प्लेन्स

इथे एक डेब्रिन्ग नावाचे गाव येते. त्याच्या थोडे पुढून एक छोटा रस्ता 'त्सो कार' ह्या तलावाकडे जातो. त्या रस्त्याने 'त्सो कार' ला निघालो. त्याच्या जवळ पोचलो आणि ह्याच्यात फारसे पाणी शिल्लक नाही ह्याचा अंदाज आला. त्यामुळे लगेच मागे फिरून परत मूर प्लेन्स वर आलो. त्सो कार वरून तसेच पुढे गेल्यास त्सो मोरिरी येतो. अंतर आहे अंदाजे ८० किमी. पण हा रस्ता कितपत चांगला आहे ह्याची कल्पना नाही.

मूर प्लेन्स

सुमखेल लुंगपा नदी आली आणि नजरेस पडले हे विचित्र आकार.

सुमखेल लुंगपा नदीच्या किनाऱ्याला लागून असलेल्या डोंगरावर असलेले हे दगडाचे आणि वाळूचे आकार नैसर्गिकरित्या तयार झालेले आहेत.

इथून पुढे या रस्त्याची किरकोळ अपवाद वगळता लक्तरे निघाली होती. गेल्या वर्षी विक्रमी बर्फ वृष्टी झाल्याने लेह मनाली महामार्ग खूप खराब झालाय हे माहित होते. पण इतकी ह्याची अवस्था बेकार असेल असे वाटले न्हवते. बहुतेक ह्या भागाची काहीच डागडुजी केली नसावी. इकडे प्रवास करताना गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जास्त असणे हे त्यासाठीच खूप महत्वाचे आहे. सप्टेंबर मध्ये ही परिस्थिती तर जून/जुलै काय असेल ह्याचा केवळ अंदाजच केला. रस्त्याच्या बाजूने निसर्ग सौंदर्य मात्र उत्तम आहे.

पांग गाव मागे टाकून लाचलुंग ला वर आलो आणि समोरून आली एक रिक्षा. रिक्षा सारख्या अतिशय अन्स्टेबल वाहनातून ह्या भागात प्रवास करणारे हे महाभाग आले होते न्यूझीलंड वरून. २ मिनिटे एकमेकांची विचारपूस करून पुढे निघालो.

लाचलुंग ला ओलांडताच लगेच नकी ला सुरु होतो.
नकी ला

नकी लाच्या पायथ्याशी असलेल्या एका धाब्यावर जेवून पुढे निघालो. पांग सोडल्यानंतर फक्त इथेच खाण्याची सोय आहे. अधे मधे काहीच नाही. उध्वस्त झालेल्या नकी लाने आमचा चांगलाच दम काढला. नकी ला ओलांडताच आले गाटा लूप्स.

गाटा लूप्स

हे गाटा लूप्स म्हणजे २१ हेअर पिन टर्न्स आहेत. लेह वरून येताना जिथे ते चालू होतात तिथली उंची आहे १५३०२ फूट आणि सगळे २१ लूप्स पार करून आपण खाली पोचतो तेव्हा आपण १५०० फुटापेक्षा जास्त उतरून आलेलो असतो १३७८० फूट उंचीवर. रस्ता अगदी आत्ताच उदघाटन केल्यासारखा नवीन होता. खूपच मजा आली गाटा लूप्स वर गाडी चालवायला.

गाटा लूप्स पार करून पुढे आलो आणि लगेच एक लोखंडी पूल आला.

ह्या सर्व भागात वाहतुकीसाठी असले लोखंडी पूल दिसतील. आम्ही तिथे पोचतच होतो आणि पूल दुरुस्तीसाठी बंद केला गेला. जेमतेम मिनिटाचा उशीर झाला असावा आम्हाला. थोड्या वेळाने एक सरदारजी आले ट्रक घेऊन त्यांच्याशी बोलत बसलो.

'१५ साल हो गये मुझे यहां गाडी चलातें हुए. जब भी ये रोड खुलती है मुझे ट्रक में सामान देकर भेजते है.' - सरदारजी

दुरुस्तीचे काम जवळपास सव्वा तास चालले. ह्या वाया गेलेल्या सव्वा तासाने पुढे आम्हाला खूप धोकादायक परिस्थितीत टाकले. ४:१५ ला पुलावरून वाहनांना जाण्यास परवानगी मिळाली आणि पुढे निघालो.

Tsarap नदीच्या किनाऱ्याने जाणारा लेह मनाली महामार्ग

अधून मधून रस्त्यावरून पाण्याचे प्रवाह सामोरे येऊ लागले.

हा महामार्ग आहे.

सर्चू जवळ

सर्चू आले. सर्चूच्या अगोदर का नंतर हे आता नीटसे लक्षात नाही पण इथे एक मिलिटरी पोस्ट आहे. आपण कुठे जातोय, किती जण आहोत ही सगळी माहिती तिथे द्यावी लागते. बहुतेक जर रात्रीचा उशिराचा प्रवास असेल तर इथून पुढे मनालीकडे जाण्यास परवानगी दिली जात नाही. तिथे बसलेल्या माणसाने पुढे जाण्याची परवानगी दिली. पुढचा रस्ता खूप डेंजर आहे हे सांगण्यास तो विसरला नाही. किलिंगसराई मागे टाकून बारालचा पास चढायला सुरवात केली तेव्हा ५ वाजले असतील. पासच्या अगोदर भरतपूर टेन्ट कॉलोनी आहे जिथे टेन्ट मध्ये राहण्याची सोय होऊ शकते. पण अजून बऱ्यापैकी ऊन होते. इथून झिंग झिंग बार हे हिमाचल मधील गाव फक्त २८ किमीवर आहे. त्यामुळे तासाभरात आपण पार करून जाऊ आणि झिंग झिंग बार मधे काहीतरी मुक्कामाची सोय होईल असे वाटून पुढे निघालो.

बारालचा पास सुरु होताच प्रवासाचा वेग कमालीचा मंदावला. कारण एक गाडी कशी तरी जाईल एवढ्याच रुंदीचा रस्ता होता आणि भयानक उखडलेला. दुसऱ्या बाजूला खोल दरी. समोरून ट्रक येताना दिसले की अगोदरच कुठेतरी जिथे जागा असेल तिथे शक्य तितक्या डाव्या बाजूला थांबायचे, ट्रक गेले की पुढे निघायचे असा प्रकार. साडेपाच वाजले असावेत. दुर्दशा झालेल्या बारालचा पासवर सगळीकडे अंधार झाला. त्यात भर घालायला दोन ट्रक आले एकमेकांच्या समोरा समोर. मग मी आणि मनालीकडे जाणाऱ्या ट्रकवाल्याने काळजीपूर्वक थोडे मागे येऊन दुसऱ्या ट्रक वाल्यास जाऊ दिले. ह्यात १५ मिनिटे गेली. ६ वाजले आणि सुरवात झाली बर्फवृष्टीला. काळोख, बर्फ आणि खराब रस्ता. सगळेच फॅक्टर विरोधात. ह्यामुळे पुढे जावे का परत मागे फिरून भरतपूर ला जाऊन टेन्ट मध्ये मुक्काम करावा अशी द्विधा मनस्थिती. इतका दुर्दशा झालेला सर्चू ते बारलाचा रस्ता उतरून एक वेळ मागे जाऊ पण ह्या बर्फ वृष्टीमुळे दरड वगैरे कोसळून उद्या हा रस्ता बंद वगैरे झाला तर काय हा महत्वाचा प्रश्न होता. त्यामुळे पुढे निघालो.

'जलदी से जाईये. उपर बहुत बर्फबारी हो रही है" - मनाली वरून आलेल्या एक सुमो वाल्याने सल्ला दिला.

'और कितना टाइम लगेगा बारलाचा का टॉप आने के लिये ?' - मी विचारले

'पहूंच ही गये हो आप लोग. और ३ -४ टर्न्स मारने के बाद आ गया.'

मग पुढेच जाणे योग्य. बर्फवृष्टीचा वेग वाढला होता. टॉपवर फक्त एक मिनिट थांबून उतरायला सुरवात केली. बारलाचा उतरताना सुरज ताल तलाव येतो. काळोखामुळे तलाव दिसण्याचा प्रश्नच न्हवता.

बारलाचा ला ते झिंग झिंग बार हा रस्ता देखील गाटा लूप्स सारखाच वळणावळणाचा आहे. बारलाचा ला वरून थोडे खाली आलो आणि बर्फवृष्टी संपली होती. त्याची जागा घेतली होती प्रचंड धुक्याने. दृश्यमानता ८-१० फूटांचीच असावी. सावधपणे उतरून झिंग झिंग बार गाठले. पण इथे ना कुठले घर दिसले ना माणूस. हीच गत इथून ८ किमीवर आलेल्या पॅट्सयु गावाची. आता पर्याय दिसत होता जीस्पाचा जे इथून २३ किमीवर होते. पुढे निघालो आणि दूरवर एका ठिकाणी थोडा मिणमिणता उजेड दिसू लागला. हे गाव होते दारचा. एक माणूस गावातील रस्त्यावर उभा होता.

'यहां कोई हॉटेल वगैरा है रहने के लिये ?' - त्यांना विचारले

'है ना. सिधा गाव में जाईये. एक होटल है'

सकारात्मक उत्तर कानावर आल्याने सुटकेचा निश्वास टाकला आणि गाठला दारचा डांगमा कॅम्प नावाचा होमस्टे. बारलाचा ला चढायला सुरवात केल्यापासून जवळपास सव्वातीन तासाने अंग टेकायची सोय झाली.

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

6 May 2018 - 1:21 pm | अभ्या..

एकच लम्बर,
ह्या वेळचे फोटो मस्त आलेत.

कृपया नकाशा टाकता येईल का? फारच छान वर्णन आणि फोटोही. पुभाप्र.

अभिजीत अवलिया's picture

6 May 2018 - 4:02 pm | अभिजीत अवलिया

दोन दिवसात टाकतो एक चांगला नकाशा.
दुर्देवाने आज सकाळीच लॅपटाॅपचे दोन तुकडे झाले. नकाशा त्यातच राहीला. मंगळवारी दुरुस्त होऊन मिळाल्यावर टाकतो.

अभिजीत अवलिया's picture

10 May 2018 - 9:35 am | अभिजीत अवलिया

लेह मनाली महामार्ग नकाशा

दुर्गविहारी's picture

6 May 2018 - 4:39 pm | दुर्गविहारी

जबरदस्त चालली आहे सफर. बारलाचा अनुभव थरारक आहे. चांगला शब्दात उतयवला आहे. मी त्या परिस्थितीची कल्पना करून पाहिली.
बाकी एक विनंती, तुम्ही व्हिडीओ काढले असतील तर टाका.

यशोधरा's picture

6 May 2018 - 5:53 pm | यशोधरा

फोटो फारच उत्तम! सफर झकास चालली आहे.
सर्चू का सारचू? सारचू असे वाचलेय म्हणून विचारते.
देवा, मलापण असे जायला मिळूदेत रे बाबा!
भवानी आई, रोडगा वाहीन तुला!!

अभिजीत अवलिया's picture

6 May 2018 - 10:02 pm | अभिजीत अवलिया

माझ्या मते सर्चू किंवा सरचू.
इथली नावे आणि इंग्रजी स्पेलिंग एकमेकांशी फटकून आहेत.

Tangtse - याला इथे बहुतेकजण टांगचे म्हणतात
Sakti - शक्ती. h कुठे गेला काय माहीत.

@दुवि.
व्हिडीओ नाही काढलेला एकपण.

प्रचेतस's picture

7 May 2018 - 7:48 pm | प्रचेतस

थरारक.
फोटो तर एकाहून एक सरस आलेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 May 2018 - 10:54 am | डॉ सुहास म्हात्रे

फार सुंदर सफर चालली आहे ! फोटो तर एक नंबर !

प्रवासामध्ये आलेले काही अनुभव थरार निर्माण करून गेले असणार... हेच प्रसंग नंतर प्रवासातील सतत आठवणार्‍या आणि इतरांना सांगाव्याश्या वाटणार्‍या सुखद आठवणी बनतात !