ग्रामीण करमणूक-मनोरंजन

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 May 2018 - 3:30 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

उत्तर महाराष्ट्र ग्रामीण वासियांची करमणूकीची साधनंही इतर गावांप्रमाणे पारंपरिक होती. अनेक लोकपरंपरा सादर करत आणि त्यांचा आस्वाद घेत गाववासी आपली करमणूक करून घेत असत. दिवसभर अंग दुखेपर्यंत कष्ट केल्यानंतर वेळ उरला की ग्रामीण लोक आपल्या मनोरंजनाकडेही वळत.
भोवाडा, डोंबार्‍याचा खेळ, गारूडीचा खेळ, तमाशा, सर्कस, गावातल्या लोकांनीच बसवलेले नाटक, गणपतीच्या काळात गावात मागवलेले एखादे कलापथक वा ऑक्रेस्ट्रा, भारूड, कीर्तन, प्रवचन, भजन, लळित, खंडोबाचं आढीजागरण, होळी, आखाजीचा बार, झोके, पतंग, गौराई, कानबाई, रानबाई, भालदेव, जादूगार, टिंगरीवाला, रायरंग, बाजार, जत्रा, अनेक मैदानी खेळ, विहिरीत वा बंधार्‍यात पोहणे आदीत मन घालून ग्रामीण लोक मनसोक्‍त जीवन जगत. लोकजीवनातून पारंपरिक पध्दतीने गावकरी देव भजत असत. देव भजण्यातून विधी केल्या जात. आणि या सर्व प्रक्रियेतून अनायासे गावकरी आपले मनोरंजनही करून घेत असत.
आखाजीच्या बारात ऐकू येणार्‍या अश्लील गाळ्या कोणत्याही गावकर्‍याला त्या काळात अश्लील वाटत नव्हत्या. (शहरात या शिव्यांना अश्लील समजलं जायचं.) आता अलीकडच्या काळात त्या गाळ्या (शिव्या) ग्रामीण लोकांनाही अश्लील वाटू लागल्या. आखाजीच्या दिवशी दिवस कलला की गावातले लोक हटकून वेळ काढून बार खेळण्याच्या जागेवर जाऊन बसत. हातात दगडी घेऊन गोफणीने वा हातानेच दुसर्‍या गावातल्या तरूणांवर धाऊन जात दगडी मारत. एक तर दुसर्‍या गावातल्या माणसाचं तो डोकं फोडत असे वा आपलं डोकं फोडून घरी परतत असे. काही लोक बारची फक्‍त दुरून गंमत पहात असत. आज मात्र या गावकर्‍याला ते प्रतिष्ठितपणाचं वाटत नाही. (बारात डोकी फोडणं हे त्याकाळीही चुकीचंच होतं.) शेतीची वा नेहमीची कामे करत गाववासी दोन मसाल्यांवर चालणार्‍या रेडिओवरची गाणीही ऐकत असे.
कबड्डी,‍ चिलापाटी, आट्यापाट्या, पावसाळ्यात ओल्या जमिनीत जोरात सळई खुपसणे, भोवरा, भोवर्‍यातली पाच कोची, दगड का माती, लपाछपी, डीबडीब, हत्तीची सोंड, गो गो राणी, खोपाखोपी, कुस्त्या, कोयी कोयी, गोट्या गोट्या, आळे चिपी, आंधळी कोशींबीर, आळीसुळी अशा प्रकारच्या अनेक मैदानी खेळात ग्रामीण तरूण आपली करमणूक करून घेत असत.
वर सांगितलेल्या करमणूक- मनोरंजनाऐवजी आज खेड्या पाड्यातले लोक टीव्हीवर सिरियल पाहतात, मुव्हीज् पाहतात, क्रिकेट मॅच पाहतात, आयपीएल पाहतात. आज प्रत्येकाच्या हातात आलेला मोबाईलसुध्दा एक करमणुकीचे मुख्य साधन झाला आहे. ज्यांच्या घरी कधी टेबलावर ठेवण्याचा लँडलाईन फोन आला नाही, अशा घरातही आज प्रत्येकाजवळ मोबाईल फोन आहेत.
मोबाइलवर गेम खेळणे, व्हीडीओ पाहणे, ‍व्हीडीओ चॅट करणे, व्हॉटस अप मेसेज फॉरवर्ड करत राहणे, गाणे ऐकणे, सेल्फी घेणे, फोटो काढणे आदी प्रकारचा टाइमपास मोबाईलवर केला जातो.
होळीच्या अश्लील आरोळ्या मारायला आज गावातला माणूस सरमायला लागला. भोवाडा तर आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तमाशा आज चोरून लपून पाहण्याच्या पंगतीत जाऊन बसला. अशा प्रकारच्या लोकपरंपरा आजच्या पिढीला भावत नाहीत. झोक्यावर बसणं आज कोणाला आवडत नाही. झोक्यावर बसून झोक्यावरची गाणी म्हणणं तर फार लांबची गोष्ट झाली. रेडिओवरच्या बातम्या वा जुनी गाणी ऐकणंही आज कालबाह्य झालं आहे.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

1 May 2018 - 4:13 pm | मार्मिक गोडसे

पावसाळ्यात ओल्या जमिनीत जोरात सळई खुपसणे,
ह्या खेळास शिगरुपी म्हणतात.
भोवाडा तर आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
भोवाडा म्हणजे काय?

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 May 2018 - 6:37 pm | डॉ. सुधीर राजार...

भोवाडा म्हणजे देव देवतांचे मुखवटे लावून रात्रभर नाचणे.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

2 May 2018 - 6:38 pm | डॉ. सुधीर राजार...

शिगरूपी असे कोणत्या भागात म्हणतात

मार्मिक गोडसे's picture

2 May 2018 - 6:46 pm | मार्मिक गोडसे

ठाणे जिल्ह्यात