तोच चन्द्रमा नभात.

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in मिपा कलादालन
10 Apr 2018 - 10:13 pm

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी,
एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.
नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे,
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे,
जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी,
एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.
सारे जरी ते तसेच, धुंदि आज ती कुठे,
मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे,
ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी.
एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.
त्या पहिल्या भेटीच्या आज लोपल्या खुणा,
वाळल्या फुलात गंध शोधतो पुन्हा,
गीत ये नसे जुळून, भंगल्या सुरातुनी,
एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.
 
शांता शेळके ह्यांचे हे प्रसिद्ध भावगीत आपणा सर्वांच्या कानावरून अनेकदा गेलेले असेल. मी कोठेतरी वाचल्यावरून आठवते की हे गीत शांताबाईंना ज्या श्लोकावरून सुचले तो मूळ संस्कृत श्लोक मम्मटाने आपल्या ’काव्यप्रकाश’ ह्या अलंकारशास्त्रावरील ग्रंथामध्ये उदाहरण म्हणून वापरला आहे. ’काव्यप्रकाश’ हा ग्रंथ शान्ताबाई स.प. महाविद्यालयात बी.ए.च्या वर्गात असतांना त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये होता.
तो श्लोक असा आहे:
य: कौमारहर: स एव हि वरस्ता एव चैत्रक्षपा-
स्ते चोन्मीलितमालतीसुरभय: प्रौढा: कदम्बानिला:।
सा चैवास्मि तथापि तत्र सुरतव्यापारलीलाविधौ
रेवारोधसि वेतसीतरुतले चेत: समुत्कण्ठते॥
 
अर्थ - (नायिका सखीला सांगत आहे) माझे कौमार्यहरण करणारा प्रियकर तोच आहे, आता तशीच चैत्राची रात्र आहे, फुललेल्या मालतीपुष्पांनी सुवासित झालेले कदंबवृक्षावरून येणारे वारे तसेच आहेत आणि मीहि तीच आहे. तरीहि ह्या रेवाकाठी वेताच्या तळापाशी सुरतक्रीडेच्या कल्पनेने माझे चित्त उत्कण्ठित होत आहे.
हा श्लोक मम्मटाच्या काव्यप्रकाशात उद्धृत केला गेला आहेच, तसाच तो विश्वनाथाच्या साहित्यदर्पणामध्ये मम्मटाशी आपला मतभेद स्पष्ट करण्यासाठी विश्वनाथानेहि दाखविलेला आहे.
मात्र तो ह्या दोघांपैकी कोणाचाच नाही. शीलाभट्टारिका नावाची कोणी एक तशी अज्ञात कवयित्री ७व्या-८व्या शतकामध्ये होऊन गेली. शार्ङ्गधरपद्धति नावाच्या एका जुन्या सुभाषितसंग्रहामध्ये - Anthology - तो तिच्या नावाने दाखविला गेला आहे आणि म्हणून श्लोकाची आणि तिची स्मृति टिकून राहून मम्मटापर्यंत पोहोचली आणि तेथून ती शांताबाईंना मिळाली.
शांताबाईंनी आपल्या गीताची कल्पना जरी ह्या श्लोकातून घेतली आहे तरी गीताचा अर्थ मूळ श्लोकाच्या अर्थाच्या विरोधामध्ये आहे. श्लोकामधील नायिका ’चेत: समुत्कण्ठते’ असे सांगत आहे तर गीतातील नायक ’गीत ये नसे जुळून, भंगल्या सुरातुनी’ असे खेदाने म्हणत आहे हे लक्षणीय आहे.मूळ श्लोक नायिकेच्या तोंडी आहे पण मराठी रूपान्तर नायकाच्या हाहि भेद आहेच.
७व्या-८व्या शतकातील जवळजवळ अज्ञात अशा शीलाभट्टारिका ह्या कवयित्रीची स्मृति ह्या श्लोकाच्या रूपाने अद्यापि आपल्यामध्ये आहे.

प्रतिक्रिया

एस's picture

10 Apr 2018 - 11:16 pm | एस

हे भावगीत अत्यंत आवडते. आणि बाबूजींच्या स्वरात ते आणखीनच सुंदर होते. शांताबाई शेळके यांच्या लेखणीबद्दल काय म्हणावं! इतकं सुंदर आणि तरीही सहज सोपं लिहू शकणारे लोक उरलेतच कितीसे!

लेख नेहमीप्रमाणेच आवडला हेवेसांनल.

सिरुसेरि's picture

11 Apr 2018 - 8:08 am | सिरुसेरि

माहितीपुर्ण लेख आवडला .

हे गाणे माझे अत्यंत फेवरेट गाणे आहे. पूर्वप्रेयसीची भेट झालीच तर ती धुंदी, प्रिती आणि स्वप्ने आता नसल्याचं सांगणारा प्रियकर विरळाच. पण हे सगळं का नाही याची कवयित्रीला अभिप्रेत असलेली कारणे नि सामान्य लोकांची कारणे एकच आहेत का याबद्दल कुतुहल आहे.

चौकटराजा's picture

11 Apr 2018 - 2:04 pm | चौकटराजा

स्वत: शांता बाईंचे असे म्हणणे असे की ओरीजीनल असे काही नसते .प्रत्येक कवी काहीतरी वाचतो काहीतरी अनुभवतो तेच एका नव्या स्वरूपात येते .

नाखु's picture

11 Apr 2018 - 2:46 pm | नाखु

आहे,अता इथल्या काकवींना* गूळ लावावा लागणार माहीतीसाठी!!!!

धागालेख वेचक आणि संदर्भ पूर्ण आहे.

तळटीप काकवी म्हणजे कार्यरत कवी

खुलाश्यातील साक्षीदार नाखु

भीडस्त's picture

12 Apr 2018 - 1:50 pm | भीडस्त

एक छान सदर असे लोकसत्तात. वाचक आपली माहिती शेअर करीत .आठवड्यातून एकदा. कात्रण पण काढलेलं याच .
बहुधा टिकेकर संपादक असतानाच्या काळात हे सदर येत होतं

पैसा's picture

12 Apr 2018 - 2:03 pm | पैसा

अजून अशी गाणी आठवत आहेत. एक लेखमालिका येऊ दे!

यनावाला's picture

13 Apr 2018 - 9:32 pm | यनावाला

तेव्हा आणि आज
शीला भट्टारिका यांच्या "य: कौमारहर:...। " या श्लोकाचा अरविंदजींनी जो अर्थ दिला आहे, त्यात कांही त्रुटी आहेत. " स एव हि वर:।" याचा अर्थ त्यांनी दिलाच नाही. मूळ श्लोकात "मालतीसुरभय:।" आणि "प्रौढा: कदम्बानिला:। " यांचा कांही संबंध दाखविलेला नाही. पण अरविंदजींनी "मालतीफुलांच्या वासामुळे सुगंधित झालेले वारे." असा अर्थ केला आहे. "प्रौढा: कदम्बानिला: ।" यातील प्रौढा: चे भाषांतर केले नाही. तसेच शांताबाईंच्या गाण्यातील भाव हे मूळ श्लोकाच्या अर्थाविरुद्ध आहेत असे म्हटले आहे तेही पटण्यासारखे नाही.
श्लोकाचा अर्थ कळण्यासाठी एका प्रसंगाची कल्पना करूया:
१) शीला भट्टारिका यांचा श्लोक
साधारण वर्षभरापूर्वी लग्न झालेले एक जोडपे आहे. सायंभोजनोत्तर आपल्या घराजवळच्या उपवनात ती दोघे एकांतात बोलत बसली आहेत. बराच वेळ झाल्यावर तो म्हणतो,"चल आता जाऊ या."
ती म्हणते, "थांब .जरा" आणि तिच्या मनात श्लोक उद्भवतो,: "य: कौमारहर:..."
अर्थ :
(तेव्हा)ज्याने माझ्या कौमार्याचा भंग केला तोच तरुण आज माझा पती आहे. (तेव्हा) जशी चैत्रातील चांदणी रात्र होती तशीच आज आहे. (तेव्हा) उत्फुल्लित मालती पुष्पांचे परिमल जसे दरवळत होते तसेच आजही दरवळत आहेत.(तेव्हा)जसे कदंबवृक्षांवरून वाहणारे भन्नाट वारे होते (प्रौढा: कदंबानिला:) तसे आजही वाहात आहेत. तेव्हाची मीसुद्धा आज तशीच आहे. तरी पण तेव्हा नर्मदातीरावरील वेळूच्या बनातील वृक्षाखाली आम्ही जी रतिक्रीडा केली तिकडेच माझे मन अजूनही ओढ घेत आहे. (आता शयनगृहात घडेल तिकडे नाही.)
.....
२) शांता शेळके यांचे गीत :
वर्षभरापूर्वी लग्न झालेले एक जोडपे आहे. सायंकाळच्या जेवणानंतर आपल्या घराजवळच्या बागेत ती दोघे एकांतात बोलत बसली आहेत. बराच वेळ झाल्यावर ती म्हणते,"चल आता जाऊया."
तो म्हणतो, "थांब. जरा" आणि त्याच्या ओठी गीत येते,
"तोच चंद्रमा नभात.."
.....यनावाला

पैसा's picture

13 Apr 2018 - 9:56 pm | पैसा

प्रौढा: कदंबानिला: हे बरोबर वाटतंय. दोन्ही प्रसंग छान लिहिलेत. फक्त "गीत ये न ते जुळून भंगल्या सुरातूनी" ही ओळ या प्रसंगाला विसंगत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Apr 2018 - 10:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

तीच ओळ नव्हे तर शेवटची दोन कडवी तेच सांगत आहेत...

सारे जरी ते तसेच, धुंदि आज ती कुठे,
मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे,
ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी.
एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.

त्या पहिल्या भेटीच्या आज लोपल्या खुणा,
वाळल्या फुलात गंध शोधतो पुन्हा,
गीत ये नसे जुळून, भंगल्या सुरातुनी,
एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.

"आपण दोघे तेच व एकत्र असलो आणि परिसर तसाच असला तरी बरेच काही बिघडले आहे" असाच सरळ अर्थ शांताबाईंच्या गाण्यातून निघतो, जो त्याचा उगम म्हणून सांगितलेल्या मूळ श्लोकाच्या अर्थाच्या विपरित आहे.

अरविंद कोल्हटकर's picture

14 Apr 2018 - 5:57 am | अरविंद कोल्हटकर

" स एव हि वर:।" याचा अर्थ मी दिलाच नाही् हा यनावालांचा पहिला आक्षेप आहे.
हे कसे? "य: कौमारहर: स एव हि वर:" ह्याचा अर्थ मी "माझे कौमार्यहरण करणारा प्रियकर तोच आहे" असा केला आहे आणि त्यात काही चुकीचे आहे असे मला दिस्त नाही.

मूळ श्लोकात "मालतीसुरभय:।" आणि "प्रौढा: कदम्बानिला:। " यांचा कांही संबंध दाखविलेला नाही. पण अरविंदजींनी "मालतीफुलांच्या वासामुळे सुगंधित झालेले वारे." असा अर्थ केला आहे हा यनावालांचा दुसरा आक्षेप आहे.
संबंध नाही हेहि कसे? "कदन्बानिल’ ह्या विशेष्याचे ’उन्मीलितमालतीसुरभि’ हे विशेषण आहे आणि त्याचे मी केलेले ’फुललेल्या मालतीपुष्पांनी सुवासित झालेले कदंबवृक्षावरून येणारे वारे’ हे भाषान्तर जवळजवळ शब्दश: आहे.

नितिन थत्ते's picture

14 Apr 2018 - 9:45 am | नितिन थत्ते

इथे दोन निवेदकांच्या* मनोभूमिकेतला फरक स्त्री - आणि - पुरुष यांच्या मनोभूमिकेतलाच फरक दिसतो.

स्त्री कायम एकनिष्ठ आणि पुरुषाचा इंटरेस्ट संपणे वगैरे !!

*गीत शांताबाईंनी लिहिले असले तरी पुरुषाच्या भूमिकेतून आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2018 - 10:00 am | डॉ सुहास म्हात्रे

स्त्री कायम एकनिष्ठ आणि पुरुषाचा इंटरेस्ट संपणे वगैरे !!

वाळल्या फुलात गंध शोधतो पुन्हा, ही ओळ "पुरुषाचा इंटरेस्ट संपणे वगैरे" च्या विरुद्ध आहे. काही वेगळेच कारण आहे... आणि ते कारण वाचकांच्या / रसिकांच्या कल्पनशक्तीवर सोपवून त्यांच्या मनाला दीर्घकाळ भुंगा लावणे हे तर पट्टीच्या कलाकाराचे काम असते ! :)

यनावाला's picture

15 Apr 2018 - 2:10 pm | यनावाला

भाषान्तरातील त्रुटीविषयी,
अरविंदजी ,
"स एवहि वर: ।" यात वर शब्दाचा अर्थ पती असाच आहे. भाषान्तर "तोच (आता माझा) पती आहे." असे करणेच योग्य आहे. गीर्वाण लघु कोशात पती असा अर्थ दिला आहे. प्रियकर असा नाहीच.
...
*मालतीसुरभय: प्रौढा कदम्बानिला:।
यात मालतीसुरभय: । हा सामासिक शब्द नाम आहे. विशेषण नव्हेच.
तसेच प्रौढा: कदम्बानिला: । यात कदम्बानिला: । या सामासिक शब्दाचे प्रौढा: हे विशेषण आहे. "मालतीपुष्पांच्या परिमलाने सुगंधित झालेले कदम्बानिला:। असे भाषान्तर निश्चितपणे सदोष आहे. कोणाही संस्कृतभाषा तज्ज्ञाला विचारावे. किंबहुना तुम्हीच असे तज्ज्ञ आहात. म्हणून स्वत:लाच विचारावे.
..........
*प्रौढा: चे भाषान्तर केले नाही तरी विशेष अर्थहानी होत नाही. परंतु भाषान्तर प्रामाणिक असावे असा दंडक आहेच. खरे तर प्रथम सर्वपदसमावेशक अन्वय लिहितात. अध्याहृत् पदे कंसस्थ करतात. मग अर्थ लिहितात. त्यामुळे सर्वकाही स्पष्ट होते.
....यनावाला

माहितीपूर्ण लेखन आणि प्रतिसाद आवडले.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rasputin... [ with Lyrics ] :- Boney M

अरविंद कोल्हटकर's picture

16 Apr 2018 - 3:48 am | अरविंद कोल्हटकर

वरील श्लोकाच्या भाषान्तराविषयी वाद घालावा अशी माझी मुळात इच्छा नाही कारण माझ्या लेखाचा रोख एका संस्कृत श्लोकामधून शान्ताबाई कसे एक सुंदर मराठी गीत निर्माण करतात हे दाखविण्याचा होता, मूळ संस्कृत श्लोकाचे शब्दशः भाषान्तर देणे हा नव्हता आणि म्हणून रसग्रहणाला आणि माझा मुद्दा कळेल इतपतच भाषान्तर मी केले होते. तरीहि आहे ते चूक नाही असेहि मला ठामपणे सांगायचे आहे आणि म्हणून यनावालांच्या nitpickingला हे उत्तर.

यनावालांचा पहिला आक्षेप असा की मी 'वर' ह्याचा 'पति' हा स्पष्ट अर्थ न घेता त्या शब्दाचे भाषान्तर 'प्रियकर ' असे केले आहे. संस्कृत शृंगारकाव्यामध्ये अनेकदा असे दिसते की 'पति', 'वर', 'दयित', 'प्राणेश्वर', 'सखा', 'प्रियकर', प्रियतम', 'नायक' आणि तत्सम असे अनेक शब्द समानार्थी म्हणून वापरले जातात. ह्या श्लोकामध्ये वापरलेला 'पति' हा शब्द 'नवरा' असा भाषान्तरित न केल्याने जर अनर्थ होत नसला तर 'पति' ह्याचा अर्थ 'प्रियकर' असा सर्वसामान्य केल्याने काही बिघडत नाही कारण श्लोकामध्ये तो पुरुष नवरा आहे का कोणी यार आहे ह्याने श्लोकाच्या गाभ्याला काहीच फरक पडत नाही.

ह्याला उदाहरण म्हणून 'अमरुशतका'मधील श्लोक क्रमांक ८ पहा:

नार्यो मुग्धशठा हरन्ति रमणं तिष्ठन्ति नो वारिता-
स्तत्किं ताम्यसि किं च रोदिषि पुनस्तासां प्रियं मा कृथा: ।
कान्त: केलिरुचिर्युवा सहृदयस्तादृक्पति: कातरे
किं नो बर्बरकर्कशै: प्रियशतैराक्रम्य विक्रीयते ॥८॥

वरकरणी साध्याभोळ्या दिसणार्‍या पण आतून कारस्थानी अशा ललना तुझ्या प्रियकरावरती आपले जाळे टाकत आहेत आणि त्यांना बाजूस केले तरी त्या आपले वर्तन सोडत नाहीत. तू का स्वत:शी कुढत बसून रडत आहेस? त्यांना जे हवे तेच तू करू नकोस. हे भीरु स्त्रिये, मनाने सरळ असलेला तुझा तरुण प्रियकर प्रेमकूजितांचा भुकेला आहे. आक्रस्ताळ्या कठोर बोलण्याचा काय उपयोग? तू त्याला शंभर गोड शब्दांनी थांबव आणि जिंकून घे.

ह्या श्लोकामध्ये प्रियकराला उद्देशून 'रमण', 'कान्त', 'पति' असे तीन शब्द वापरले आहेत. येथे 'पति' ह्याचा 'नवरा' असा शब्दशः अर्थ घेतला तर काय होईल? ही घटस्फोटाच्या पातळीला पोहोचलेली बाब आहे असे दिसेल. ते योग्य आहे काय? प्राचीन भारतामध्ये रागावलेल्या बायका नवर्‍याला घटस्फोटाची धमकी देत असत काय? तसेच लग्न झालेल्या पुरुषाला अन्य कावेबाज स्त्रिया इतक्या उघडपणे आपल्या जाळ्यात ओढत असतील काय? असला काळाशी नाते नसलेला अर्थ टाळायचा असेल तर 'पति' ह्याचा अर्थ शब्दशः 'नवरा' असा न घेता 'प्रियकर' असा घेणे बरे.

एवं च काय, माझ्या लेखातील भाषान्तरामध्ये मी 'वर' ह्याचे ’पति’ ऐवजी 'प्रियकर' असे भाषान्तर केले तर आकाश कोसळत नाही आणि अर्थाचा अनर्थहि होत नाही. उलट संस्कृत काव्यांच्या चालीप्रमाणे हा विवाहपूर्व प्रेमसंबंध अधिक काव्यात्म होतो.

आता पुढचा प्रश्न म्हणजे ’मालतीसुरभय:’ आणि ’कदम्बानिला:’ ही दोन वेगवेगळी स्वतन्त्र नामे मानावीत (जसे यनावाला सुचवितात) का मी घेतल्याप्रमाणे ’कदम्बानिला:’ चे ’मालतीसुरभय:’ हे विशेषण मानावे. ह्यामध्ये ’मालतीसुरभय:’ हा ’मालतीसुरभि: येषु ते’ असा बहुव्रीहि समास होतो. दोन्ही प्रकार आपापल्या परीने योग्यच आहेत पण मी दुसरा प्रकार स्वीकारतो कारण की:

श्लोकाकडे पाहिले तर त्यात चार वेगवेगळी विधाने आहेत आणि प्रत्येकात एका कोणाच्याविषयी किंवा एका कशाच्याविषयी काहीतरी सांगितले आहे. ही विधाने अशी: १) य: कौमारहर: स एव हि वर: २) ता एव चैत्रक्षपा: ३) ते चोन्मीलितमालतीसुरभय: प्रौढा: कदम्बानिला: ४) सा चैवास्मि. हे सर्व पहिल्यासारखेच असूनहि म्हणजेच सर्व काही सवयीचे आणि परिचित असूनहि नायिकेचे ’चेत: समुत्कण्ठते’ हे अनपेक्षित आहे आणि त्यामुळे ह्या श्लोकाला काव्यत्व येते. ह्या चारी विधानांमध्ये प्रत्येकी एकाविषयी काही विधान आहे हे महत्त्वाचे आहे. त्यापैकी तिसर्‍यामध्ये ’मालतीसुरभय:’ आणि ’कदम्बानिला:’ हे वेगवेगळे मोजल्यास तिसर्‍या विधानात दोन गोष्टी येऊन श्लोकाचा तोल जातो. ह्यासाठी मी ’कदम्बानिला:’ हे विशेष्य आणि ’मालतीसुरभय:’ हे त्याचे विशेषण मानावे असे सुचविले होते.

ह्या श्लोकाचा अर्थ इतरत्र कसा गेला आहे ह्याचा मी काही शोध घेतला. त्यामध्ये मला शालिग्राम शास्त्री संपादित आणि मोतीलाल बनारसीदास प्रकाशित ’विमला’ ह्या हिंदी टीकेसहित 'साहित्यदर्पण' येथे मिळाले. त्याच्या पान १६ च्या तळापासून पुढे ’ते चोन्मीलितमालतीसुरभय: प्रौढा: कदम्बानिला:’ ह्या ओळीचा हिंदीमध्ये अर्थ दिला आहे, तो असा: ’खिली हुई मालती (वासन्तीलता) से सुगन्धित वही प्रौढ (अमन्द अर्थात् उद्दीपक) कदम्ब वन का समीर है...’ हा अर्थ मी म्हटल्याप्रमाणे 'मालतीसुरभय:' हे विशेषण आणि 'कदम्बानिला:' हे विशेष्य मानून केला गेला आहे.

अरविंद कोल्हटकर's picture

16 Apr 2018 - 5:30 am | अरविंद कोल्हटकर

आधीच क्लिष्ट झालेल्या माझ्या वरच्या प्रतिसादामध्ये एक छोटी चूक अनवधानाने झाली आहे. ती वेळीच दुरुस्त करतो.

त्यातील दुसर्‍या परिच्छेदातील

"ह्या श्लोकामध्ये वापरलेला 'पति' हा शब्द 'नवरा' असा भाषान्तरित न केल्याने जर अनर्थ होत नसला तर 'पति' ह्याचा अर्थ 'प्रियकर' असा सर्वसामान्य केल्याने काही बिघडत नाही कारण श्लोकामध्ये तो पुरुष नवरा आहे का कोणी यार आहे ह्याने श्लोकाच्या गाभ्याला काहीच फरक पडत नाही."

हे वाक्य असे वाचावे :

"ह्या श्लोकामध्ये वापरलेला 'वर' हा शब्द 'नवरा' असा भाषान्तरित न केल्याने जर अनर्थ होत नसला तर 'वर' ह्याचा अर्थ 'प्रियकर' असा सर्वसामान्य केल्याने काही बिघडत नाही कारण श्लोकामध्ये तो पुरुष नवरा आहे का कोणी यार आहे ह्याने श्लोकाच्या गाभ्याला काहीच फरक पडत नाही."

पुष्कर's picture

10 Jan 2021 - 7:44 am | पुष्कर

श्लोकामध्ये तो पुरुष नवरा आहे का कोणी यार आहे ह्याने श्लोकाच्या गाभ्याला काहीच फरक पडत नाही >> जबरी!

प्रचेतस's picture

16 Apr 2018 - 7:12 am | प्रचेतस

बऱ्याच दिवसांनी संस्कृत श्लोकांवर खूपच सकस चर्चा वाचायला मिळाली.

अगदी. दोन्ही बाजूंकडील प्रतिसाद म्हणजे माझ्यासारख्या वाचकाला पर्वणीच आहेत. अरविंदजींना विनंती की संस्कृत काव्यामधील अशा आणखीही उदाहरणांबद्दल लिहावे.

शशिकांत ओक's picture

16 Apr 2018 - 7:52 am | शशिकांत ओक

लेखनाला ग्रहण लागल्याने रसभंग वाटला. "आता देखील क्रीडा करतो पण त्या रात्रीची मजा काही औरच होती" सुंदर संकल्पना आहे...
जेवण रोज करतो पण त्या दिवशीचा बेत अजूनही जिभेवर रेंगाळतो... असे काहीसे असावे...

यनावाला's picture

16 Apr 2018 - 9:14 pm | यनावाला

साधु ! साधु !
श्री.शशिकांत ओक यांनी, "आता देखील क्रीडा करतो पण त्या रात्रीची मजा काही औरच होती"
जेवण रोज करतो पण त्या दिवशीचा बेत अजूनही जिभेवर रेंगाळतो..." अशा मोजक्या शब्दांत संस्कृत काव्यातील मर्म नेमके व्यक्त केले आहे. " व्हेरी गुड !!

असंका's picture

16 Apr 2018 - 9:38 pm | असंका

सुंदर!!!

धन्यवाद!!!

वरती कुणीतरी लोकसत्ता मध्ये आलं होतं म्हणाले, ते हेच का?

पुष्कर's picture

10 Jan 2021 - 7:42 am | पुष्कर

छान माहिती.

चित्रगुप्त's picture

24 Sep 2023 - 12:26 am | चित्रगुप्त

उत्कृष्ट लेख आणि रोचक प्रतिसाद. असे आणखी लेख मिपावर येत रहातील ही आशा.