मिपाकरांच्या सेलेब्रिटीज, प्रथितयश, मोठ्या लोकांच्या जवळीकतेचा सर्व्हे - २०१८

arunjoshi123's picture
arunjoshi123 in काथ्याकूट
6 Apr 2018 - 5:56 pm
गाभा: 

तर दोस्तानु,
प्रत्येकाची रुची वेगवेगळी असते. छंद वेगवेगळे असतात. अस्मिता वेगवेगळ्या असतात. तसंच प्रत्येकाचं नशीब वेगवेगळं असतं. सर्वसाधारणपणे मी स्वतःला एक सामान्य माणूस मानतो. आपल्यापैकी अनेक मिपाकर देखील असंच मानत असणार असं वाटतं. पण आपल्यापैकी प्रत्येकास प्रसिद्ध, मोठ्या लोकांवद्दल एक कुतुहल असतं. (साहेबांच्या केबिनमधे देखील कोणी बिनकामाचा एक तास जास्त बसला तर इर्ष्या वाटते.). म्हणजे इतकं कि थेट त्यांचेशी भिडायची, भेटायची, वैयक्तिक ओळख करून घ्यायची, इ इच्छा होते. अर्थात आपण ती दाबून टाकत असतो. बिस्मिल्ला खानांची शहनाई ऐकताना त्यांनी एकांतात वाराणसीच्या घाटावर खास आपल्यासाठी एक राग गायला असता तर मजा आली असती असा विचार येऊन जातो. सचिननं आपल्या बॉलवर चौका मारला तर .... अडानी आपल्याला त्याच्या चार्टड फ्लाइटमधे बसवून आला तर ... रामदेवने आपले हातपाय पकडून एक आसन शिकवलं तर... शारुखने आपल्याला एक कश* दिला तर... पण असं कधी होत नाही. तरीही सर्वच जण आपल्यासारखे अभागी नसतात. आणि आपणही स्वतःस समजतो तितके अभागी नसतो.
--------------------------------------------------------------------------------------------
या संदर्भात या धाग्यावर मिपाकरांचा एक सर्व्हे घ्यायचा माझा उद्देश आहे. प्रत्येकाला सिरियल नंबर, आपल्याला भेटलेल्या "प्रसिद्ध" माणसाचं नाव, ० ते १०० या रेंजमधे "भेटीच्या जवळीकतेचा" एक स्कोअर, आणि ब्रिफ डिटेल्स लिहायचेत. अधिक डिटेल्स लिहिणे इज एंकरेज्ड.
याबद्दलच्या सर्वसाधारण गाइडलाईन्स अशा:
१. मोठा माणूस, प्रसिद्ध माणूस हा तुमच्यामते वा काही विशीष्ट लोकांच्या मते वा जनतेच्या मते मोठा वा प्रसिद्ध असला पाहिजे. उदा. सुधीर चौधरी वा राजदीप सरदेसाई तुमच्या डोक्यात जात असला नि (दुर्दैवाने) तुम्हाला भेटला असला, तरी त्याच्या उल्लेख करायचा. नावडता म्हणून उल्लेख टाळायचा नाही.
२. खेळ, राजकारण, सिनेमा, व्यवसाय, उद्योग, वकीली, धर्म, कला, समाजसेवा, अर्थशास्त्र, साहित्य, सोशल मिडिया, गुंडगिरी, सिविलायझेशनची अनेक इतर क्षेत्रे, पुरस्कार विजेते, इ इ इ इ काहीही क्षेत्र चालेल.
३. प्रसिद्धी ही "तुमच्यामते" असली पाहिजे. मग नगरसेवकाचे देखील नाव तुम्ही लिहू शकता.
४. प्रसिद्धीचे ऐवजी तुम्हाला थोरपण आढळले आहे तर ते देखील गृहीत धरू शकता. उदा. आदिवासी क्षेत्रात ५०० शाळा उभारणाराचे नाव कोणालाच माहित नाही पण तुम्ही त्याला भेटला आहात, तर अवश्य उल्लेख करायचा. जगात, देशात, राज्यात, विभागात, जिल्ह्यात, तालुक्यात व्यक्ति 'सामान्य माणसाच्या जिभेवर ' असलाच पाहिजे असं नाही. कर्तृत्ववान नि प्रसिद्धीपरांमुख असला तरी चालेल. कदाचित या धाग्यावर अनेक नविन महान लोकांची माहीती होईल.
५. तो माणूस आत्ता जिवंत हवा असं नाही. पण अजून उत्क्रांत वा उत्पन्न व्हायचेयत ते लोक टाळावेत.
६. जुनी अतिमहान माणसे (म्हणजे टिळक, गांधी, टागोर, नेहरू, सावरकर, पटेल, बोस, इ स्तरावरचे) तुमच्या पालकांना, पॅरेंट-इन-लॉज ना भेटली असली तरी उल्लेख करायला हरकत नाही.

स्कोअरिंगः
७. प्रत्येक भेटीचा जवळीकतेचा स्कोअर टाकणे आवश्यक आहे. नाहीतर ती एंट्री गृहित धरली जाणार नाही. जितकी खास भेट तितका स्कोअर जास्त.

८. सर्वसाधारणपणे ५ ते १० म्हणजे तुम्ही सामान्य प्रेक्षक म्हणून मैफल ऐकली असणे, राजकीय भाषण ऐकले असणे. पण थेट तुमचा संबंध कमी. नंतर ऑटोग्राफ घेतला असेल, एखादे वाक्य बोलले असेल तर स्कोअर वाढव्वा.
९. तुमची एकमेकांची ओळख असेल, नाव माहित असेल, हून बोलावले असेल, चांगला परिचय असेल तर स्कोअर ७० पेक्षा जास्त असावा.
१०. अगदी घरी सहकुटूंब बोलावून खाऊ पिऊ घालून ठेवून घेऊन निवांत गप्पा अनेकवार झाल्या असतील तर ९५ ते १०० स्कोअर द्यावा.
११. कामाच्या निमित्ताने अनेक भेटी झाल्या असतील, गहन चर्चा असतील तर ८० च्या आसपास स्कोअर येईल असं वाटतं. मिटींग मधे तुम्ही एक कोपर्‍यातले भागीदार असाल तरी स्कोअर कमी.
१२. बस, ट्रेन, विमान यांच्यात शेजारी बसल्याने गप्पा, हँडशेक झाल्या तर २० ते ४० असा स्कोअर. नुसतं गल्लीतून जाताना नजरानजर झाली तर कमी.
१३. महान व्यक्तिमत्त्वाची भेट घेऊन विद्युतचुंबकीय क्षेत्रात आल्याप्रमाणे एकतर्फी भारावून जाऊन प्रचंड सद्द्गतित इ इ झाला असाल, पाया पडला असाल, मिठी मारली असेल तर स्कोअर तुमचं तुमी ठरवा.
१४. चप्पल, शाई इ इ फेकलं असलं तर ते ही तुमचं तुम्ही स्कोअर ठरवा.
१५. ५ च्या पटीत स्कोअर देणे टाळा. इतर ८० आकड्यांचे देखील महत्त्व आहे.
१६. काही नावे विसरली असाल तर नवा प्रतिसाद द्या.
१७. इथे प्रतिसाद देणे हि फुशारकी नव्हे वा उलट स्वतःची झाकली मूठ उघडणे नव्हे. शक्य तितका प्रांजळ प्रतिसाद द्या.
१८. ज्या व्यक्तिंचं नाव देणं अनुचित असेल वा कायदेशीर नसेल तिथे काहीतरी सूचक लिहा.
१९. काही काही गंमतशीर, वा महत्त्वाच्या वा भावनिक भेटीचे वृत्तांत लिहाल तर अजूनच रंगत येईल.
२०. जो कोणी ज्याला कोणाला भेटला, भेटली तेव्हा काय करायला पाहिजे होते यावर इतर वाचकांचा टोमणा असेल तर अवश्य लिहा.
२१. मोठ्या लोकांकडून सोशल मिडीयावर (टिवी, रेडिओ, फोन ऑर फ्रेंड, पत्र, इ इ इ) प्रतिसाद किती जास्त मिळतो याप्रमाणे ० ते ४० स्कोअर असेल. फक्त सोशल मिडीयावरचे रिलेशन असेल तर जास्तीत जास्त ४० स्कोअर, मग तो माणूस तुमचा नवरा/बायको का बनणार असेना भविष्यात.
२२. भीमसेन जोशी आणि शेजारसेन दोषी या दोघांच्या मैफिली पहिल्या रांगेत बसून १-२ तास ऐकल्या तर स्कोअर समानच. शेजारसेन तितके प्रसिद्ध नाहीत म्हणून कमी स्कोअर द्यायचा नाही. नावात सगळं आलं, नाव लिहिलं कि कळेल कि किती मोठी हस्ती आहे. स्कोअर हा फक्त जवळीकता मोजण्यासाठीच आहे, व्यक्तिचे मोठेपण मोजण्यासाठी नाही.
----------------------------------------------------
अजून काय शंका असतील तर सांगा. मी जितक्या अडचणी पटकन इमॅजिन करू शकतो तितक्या लिहिल्यात.
------------------------------------------------------
हा धागा खर्‍या माहितीचा असला तरी फुल टू टाईमपास असावा.
---------------------------------------------
वशिलेबाजी इ इ मागताना धाग्याचा संदर्भ देऊ नये.
-------------------------------------------------------------
साईड बिझनेस म्हणून लोकांनी मोठ्या लोकांच्या जवळच्या लोकांकडून ऐकलेल्या त्यांच्याबद्दलच्या गोष्टी सांगीतल्या तर अजून मजा येईल.
------------------------------------------------------------------------
जवळीकता हा भावनिक, वैयक्तिक विषय आहे. स्कोअर कसा द्यावा याचे नियम केवळ मार्गदर्शनपर आहेत. बाकी आप की मर्जी!!
===============================================
*त्या पवित्र संवैधानिक इशारों के साथ.

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

6 Apr 2018 - 6:01 pm | कपिलमुनी

बर्‍याच मिपाकर सेलेब्रिटीना भेटलो आहे .

टवाळ कार्टा's picture

7 Apr 2018 - 3:43 pm | टवाळ कार्टा

मी पण....त्यात तुसुद्धा आलास

विशुमित's picture

6 Apr 2018 - 6:08 pm | विशुमित

सर्वे चे नियम वाचायला थोडा अवधी लागतोय.. मी नियमात बसत असेल तर टंकतो. तूर्तास स्वल्पविराम...

सर्वेचे नियम बंधनकारक नाहीत.
मार्गदर्शनपर आहेत.

सर्वात पहिला प्रतिसाद (म्हणजे नावांसहित) कुणि लिहिला तर बाकीचे लवकर लिहिते होतील.

उपेक्षित's picture

6 Apr 2018 - 6:26 pm | उपेक्षित

मस्त धागा,

मागच्या वर्षी पुण्याच्या पासपोर्ट हापिसात गेलो असताना काम झाल्यावर पार्किंग मध्ये आलो असता एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व दिसले तिथे मुक्तांगणचे आपले डॉ अनिल अवचट.
त्यांना पाहिल्यावर नकळत त्यांच्या पायाला हात लावला तर त्यांनी एकदम जवळ घेत अगदी आपुलकीने विचारपूस केली. फार फार बर वाटल.

(जाता जाता आपले मिपावकर विशाल कुलकर्णी यांना हा किस्सा सांगितला असता ते बोलले वाचलास लेका कारण त्यांना पाया पडलेले आवडत नाही)

त्यांच्या पायाला हात लावला

अमजद अलि खान आणि बाबा आमटे यांच्या पायाला हात लावायची इच्छा आहे. मोठ्या लोकांचे पाय नशीबवंताच्या हाती येतात!

उपेक्षित's picture

7 Apr 2018 - 4:32 pm | उपेक्षित

मोठ्या लोकांचे पाय नशीबवंताच्या हाती येतात! >>>>> काय बोललात जोशी जियो......

जेम्स वांड's picture

6 Apr 2018 - 7:00 pm | जेम्स वांड

आमचं आयुष्य फारच मिडिओकर म्हणावं लागेल

एरियाचा नगरसेवक सुद्धा सार्वजनिक नळाचे उदघाटन करायला आला तर जाता जाता सगळ्यांशी हात मिळवून जातो, पण नेमकं दोन लोकांच्या ढेऱ्यांच्या बेचक्यातून प्राणपणाने शेक हँडसाठी पुढे केलेला हात झिडकारून जातो.

एकदा संघाचे कोणीतरी सहकार्यवाह का कोणीतरी आले होते पाडव्याला, त्यांना खड्या आवाजात नमस्ते सदा वत्सले एकदा म्हणून दाखवावे असे वाटत होते पण तो मान अर्थातच स्थानिक शाखेवर खपणाऱ्या कार्यकर्त्यांचा होता. नंतर चर्चासत्रात चार शब्द बोलावे म्हणून प्रश्नोत्तराला हात खांद्यातून ताण ताण ताणले, माझ्या आजूबाजूला सगळ्यांना माईक रुपी बक्षीस मिळाले, मी मात्र कोरडा, एका मित्राला म्हणले मला भेटव तर त्याने गंभीर (का बद्धकोष्ठ असल्यागत) तोंडवळा करून आत 'चिंता करतो विश्वाची' सुरू असून 'तू जाऊ दे तुला नाही कळणार ते' म्हणत माझी कीव करून मला थड दिली, मग मी घरी जाऊन उंच केल्या हाताला आयोडेक्स लावत बसलो.

एकदा गावातच एका (खट) म्हाताऱ्या समाजवादी बुडघ्याचे 'रिक्षावाले अन जागतिकीकरण' वर व्याख्यान होते तिथे जाऊन त्यांना खरमरीतपणे रिक्षावाले कसे माजले आहेत अन सोदे बडवल्याशिवाय लायनीवर येणार नाहीत हे सांगायचं होतं पण हाय रे कर्मा, मी मध्यमवर्गीय असल्यामुळे मी तिथे पोचताच एक दोन उग्र दाढीधारी कार्यकर्त्यांनी 'आज तंदुरीत शेकून खायला एक वर्गशत्रू मिळाला' असा लुक दिला मग पाहुणे मंडळींस प्रश्न विचारायचा बेत मी रद्द करून जीव वाचवत साहिष्णूतावादी असहिष्णु लोकांच्या सभेतून सूबाल्या केला.

थोडक्यात मी खालील माणूस आहे, चराचरात लक्ष असणारा, सगळीकडे असून कुठेच नसणारा, सणवार निवडणुकीला वर्गणी अन मते ह्यांच्यापुरता हवा हवासा, आपला पक्ष घेईन म्हणून अर्जुन दुर्योधनाने ज्याची शेजेपाशी सेवा केली त्या युगंधराप्रमाणे माझी सेवा करणारे औटघटकेचे बोके सोडले, तर साक्षात श्रीकृष्ण ह्याच्यासारखाच असणारा मी

एक सामान्य माणूस

.

कंजूस's picture

6 Apr 2018 - 7:30 pm | कंजूस

नवा प्रयोग आवडला.

सर्व्हे पूर्ण झाल्यावर मला कळवा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोहराच्या दारावर कैर्‍या मागनं... [ * काय बाई एका-एकाच वागनं ] :- बबन

त्याच्याकरता धागा बंद पाडायला लागेल.

मदनबाण's picture

7 Apr 2018 - 7:21 pm | मदनबाण

नको... वाचतोय ना ! :)

बा द वे . . . परवाच ट्रप्म तात्यांनी फोन केला होता, हापुस चे भाव विचारत होते ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Super Masss (Sema Masss) :- | Rakshasudu |

टवाळ कार्टा's picture

7 Apr 2018 - 8:11 pm | टवाळ कार्टा

त्याला जोंग्याला पाठवायचे आहेत....मागल्या टैमाला ओबामामामाने नै पाठवले म्हणून रुसला होता...डायरेक्त अनुयुद्द करायची भाषा करत होता =))

अनन्त्_यात्री's picture

6 Apr 2018 - 10:11 pm | अनन्त्_यात्री

पाहून डिट्टेलवार लिहिणे आले....

arunjoshi123's picture

7 Apr 2018 - 8:29 am | arunjoshi123

मीच पैला प्रतिसाद देतो. मंजे बाकीच्यायला थोडा हुरुप येईल.
राजकारणी
१. शिवराज पाटील चाकूरकर, गोपाळराव पाटील, बसवराज पाटील - ८ - समदे उदगीरचे राजकारणी
२. प्रमोद महाजन, नजमा हेपतुल्ला, बिंदू माधव जोशी, शंकरराव चव्हाण, स्वामी अग्निवेश - ४
३. उमर अब्दुल्ला - ४५
४. नितिन गडकरी - ७०
५. अरुण जेटली - ५०
६. नितिश कुमार - ४५
७. पी. चिदंबरम - १०
८. ओइक्रम इबोबी सिंग - १२ - मणिपूरचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री
संगीत
१. पं. भीमसेन जोशी, शिव कुमार शर्मा - ५
२. हरीप्रसाद चौरासिया - ८
३. प्रभाकर कारेकर - ५२
क्रीडा
१. कपिल देव - ४
२. सिद्धू - ८
सिनेमा
१. हेमा मालिनी - ६
विचारवंत
१. सुहेल सेठ - ४
मिडिया
१. बरखा दत्त - २४
२. सुरेश चव्हाणके - ५

कंजूस's picture

7 Apr 2018 - 9:03 am | कंजूस

इंदिरा गांधीचा कारचा ड्रायव्हर आमच्याकडे येत असे. संपूर्ण आचारी टीम साहित्यासह असली तरी ती (त्या) फक्त मुगडाळ खिचडीच खायची. परदेश दोय्रावरती कुणी मंत्री असत ते व्हा ती एकटीच वेगळी जेवत असे. मंत्र्यांना काय हवे ते बनवा सांगायची.

**
बुद्धभूषण गायकवाड हे आईएएस अधिकारी आणि सह्याद्रीवर बातम्याही देत म्हणून माहित. एकदा मित्राच्या फोटो प्रदर्शनाला नवी मुंबईत भेट देण्यासाठी आले. नंतर विजिटर बुक पुढे केलं. तेवढ्यात त्यांना फोन आला. फोनवर बोलताबोलताच दुसय्रा हाताने एक पानभर इंग्रजीत अभिप्राय लिहूनच पेन उचललं. अतिशय सहज सुंदर लेखन होतं.

( मोठ्यांच्या छोट्या मजेदार गोष्टी अभिप्रेत आहेत का?)

( मोठ्यांच्या छोट्या मजेदार गोष्टी अभिप्रेत आहेत का?)

तुमचा, पालकांचा, मित्रांचा, नातेवाईकांचा, इ इ काहीतरी संबंध पाहिजे. जसा वरच्या प्रतिसादात आहे.

नाखु's picture

7 Apr 2018 - 9:33 am | नाखु

जगप्रसिध्द मिपाकराच्या आनंद सोहळा प्रसंगी हजर होतो,आणि सोबत ब्रम्हांड प्रसिद्ध मिपाकरांना कलाकारी करताना पाहिले आहे,
पण त्यांनी ना स्वाक्षरी दिली ना संदेश

फक्त उपदेश मिळालेला बापुडवाणा नाखु

चौकटराजा's picture

7 Apr 2018 - 10:00 am | चौकटराजा

हरेक माणूस मी एक तत्व म्हणून लक्षात ठेवतो. मला फक्त ते तत्व पूजनीय असते व्यक्ती नाही. उदा . मी न्यायव्यवस्था व निवडणुक कायदा हे भारताचे खरे दुखणे आहे हे ज्याना समजले ते अण्णा हजारे. मी लक्षात ठेवेन हा मुद्दा कायमचा .कदाचित मी अण्णाना विसरून जाईन. असामान्य मेलडी निर्माण करणारे ओ पी नय्यर याना मी विसरून जाईन त्यांनी मागे ठेवलेल्या गोडी ला नाही .

मल्लिका शेरावत - ४० (एक शून्य अजून वाढवणार होतो, पण सकाळी सकाळी खोटे का बोला ... )

कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना मुली मुली एकदा क्रिकेट मॅच बघायला गेलो होतो तेव्हा त्यावेळी ऐन फॉर्मात असणारा रवी शास्त्री बॅटिंग झाल्यानंतर आमच्या मागच्या रांगेत येऊन बसला. तिथे जाऊन ऑटोग्राफ घेतल्यावर तो मला म्हणाला, 'मॅडम, सुपारी घ्या की.' मी हात पुढे केल्यावर त्याने हातावर रबरी विंचू ठेवला. मी किंचाळले तशी सगळे खो खो हसू लागले .

प्रसाद_१९८२'s picture

7 Apr 2018 - 1:25 pm | प्रसाद_१९८२

तिथे जाऊन ऑटोग्राफ घेतल्यावर तो मला म्हणाला, 'मॅडम, सुपारी घ्या की.' मी हात पुढे केल्यावर त्याने हातावर रबरी विंचू ठेवला. मी किंचाळले तशी सगळे खो खो हसू लागले .

--
--

जबरी किस्सा आहे हा ! :))

रवी शास्त्रीची पुतणी तन्या शास्त्री सिओइपीत आमची एक वर्षाने सिनिअर होती. पंट फॉर्मेशनच्या निमित्ताने तिच्या खूप सूचना ऐकायला लागायच्या. तिची माय गोरी मड्डम असल्यामुळे (मंजे काय काय ते समजून घ्या) तन्याचा मोठा फॅन क्लब कॉलेजात होता.

उपेक्षित's picture

7 Apr 2018 - 4:42 pm | उपेक्षित

मी १२ वीत असताना लक्ष्मी रोड वरच्या गोगटे आय क्लिनिक मध्ये कामाला होतो ऑफिस बॉय म्हणून, तर सांगायचा मुद्दा कि गोगटे क्लिनिक तसे फेमस होते (होते कारण आता तिथे मोठे शोप्पिंग सेंटर आहे) कारण तिथे मी मृत्युंजयकार शिवाजी सावंत/ राघवेंद्र कडकोळ / सुबोध भावे अशा माणसांना बघितले आणि थोडेबहुत बोलणे सुद्धा झाले त्यांच्याशी.

विशेष म्हणजे (इथे थोडी लाल करून घेतु माझी) शिवाजी सावंत यांनी मला त्यांचे पेन दिले होते तेव्हा कारण त्यांना कौतुक वाटत होते कि मी कॉलेज करत करत थोडे कमावत पण होतो. ते आले कि मी त्यांना हाताला धरून खाली जिना उतरवून द्यायचो.

गवि's picture

7 Apr 2018 - 5:28 pm | गवि

अजो'ज एनालिटिका ?? ;-)

सर्वसाधारणपणे मी स्वतःला एक सामान्य माणूस मानतो. आपल्यापैकी अनेक मिपाकर देखील असंच मानत असणार असं वाटतं.

१७. इथे प्रतिसाद देणे हि फुशारकी नव्हे वा उलट स्वतःची झाकली मूठ उघडणे नव्हे. शक्य तितका प्रांजळ प्रतिसाद द्या.

manguu@mail.com's picture

7 Apr 2018 - 6:26 pm | manguu@mail.com

१. लहानपणी शरद तळवळकरांची सही घेतली होती. त्यांचे व्याख्यान होते.

२. गेल्या महिन्यात हॉस्पिटलात राजपाल यादव आला होता. ( त्याच्या ओळखीचा पेशंट पहायला ) भूलभुलय्या is my favorite movie. हे मी साम्गितले. अगदी साधा माणूस आहे. कितीतरी लोकानी फोटो काढून घेतले. सर्वाना फोटो काढू दिले.

raj

मँगु राजपालपेक्षा विनोदी दिस्तय फटूत, सॉरी आग्दीच राहवलं नै मनून लिवलं. कृ. ह.घ्या.

जवळून भेट आणि वन टू वन किमान काही वाक्यं संवाद:

भा.रा. भागवत
अनिल अवचट
एकनाथ सोलकर (माजी क्रिकेटर)
विक्रम गोखले
अभिलाष टॉमी (बिन इंजिनाच्या , शिडाच्या होडीने एकट्याने कुठेही न थांबता एका दमात पूर्ण पृथ्वीप्रदक्षिणा करणारा नेव्ही ऑफिसर)
...
नेक्स्ट

फक्त समोरा समोर अनपेक्षित भेट आणि अभिवादन, म्युच्युअल स्मितहास्य, हैलो.

सुनील गावस्कर
बाळासाहेब ठाकरे

रॉबिन सिंग,

शाहरुख खान -त्याच्या ज्युनियरमोस्ट दिवसांत

(चक्क) माजी राष्ट्रपती वेंकटरामन - हिमालयात भटकंती करताना तिथे ते विश्रांती कम सुट्टीसाठी आलेले.

शिल्पा शेट्टी
...

नेक्स्ट

जवळून दर्शन, जनरल बोलणं (स्टेजवरुन नव्हे पण लहान बैठक / कार्यक्रमात जवळ बसून जनरल संवाद ऐकणं. वन टू वन नाही)

शम्मी कपूर
पु.लं.
मेनका गांधी
मेधा पाटकर

हे सर्व जुनं जुनं. आणि यातल्या कोणाशीही ओळख अशी काही नाही. एकदा कधीतरी यथा काष्ठं च काष्ठं च...

कपिलमुनी's picture

7 Apr 2018 - 8:13 pm | कपिलमुनी

या धाग्यावर केलेल्या संपादकीय कारवाईचे अभिनंदन !
टकाची पोहोच वरपर्यंत आहे राव ! लगेच प्रतिसाद उडाले

टवाळ कार्टा's picture

7 Apr 2018 - 8:25 pm | टवाळ कार्टा

मिपासंपादक किसी सेलीब्रीटी से कम हे के ;)

पैसा's picture

7 Apr 2018 - 9:07 pm | पैसा

http://www.misalpav.com/comment/988724#comment-988724
इथे बघ, आमच्यासारखे लोक कितीही वैतागले तरी मिपाकर सदस्यांना उद्देशून म्हटलेले अवदसा, मुंजा ई अपशब्द अजून झळकत आहेत. संपादकांना तिकडे बघायला वेळच नाही. आमच्यासारख्या लोकांनी इथे राहायचे काही काम नाही आता.

किमान या धाग्यावर सर्वच नकोशे प्रतिसाद उडवले ते छान केलं. प्रोवोकेशन आणि रिअ‍ॅक्शन दोन्ही प्रतिसादकांत गट पाडतात.

व्वा, व्वा अजो सर,

मस्त धागा काढलाय.
आता सेलेब्रिटी म्हणून माझे नाव किती मिपाकरस् घेतायेत ते बघायची उत्सुकता आहे :)

(धाग्याला प्रतिसाद दिल्यामुळे झालेली जवळीक चालेल ना?)

arunjoshi123's picture

8 Apr 2018 - 9:57 am | arunjoshi123

चालेल, चालेल.
==========================
जास्तीत जास्त ४० मार्क्स.

चित्रगुप्त's picture

9 Apr 2018 - 6:25 am | चित्रगुप्त

मुंबईच्या 'युसिस' मधे ज्या काळी मंगेश पाडगावकर, जयवंत दळवी आणि रमेश मंत्री नोकरी करायचे, तेंव्हा म्हणजे १९७६ साली माझे जहांगीर आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शन होते. मी मुंबईत अगदी नवखा, आणि इंदौरसारख्या शहरात जन्मापासून राहिल्याने मुंबईकरांसारखे तथाकथित स्मार्टत्व पण माझ्यात नव्हते. इंदुरातून सगळी चित्रे वगैरे ट्रेन प्रवासात बरोबर आणून प्रदर्शन लावणे मोठेच आव्हान होते. त्यातूनही खटपट करून युसिस मधे जाऊन या मंडळींना प्रदर्शनाचे आमंत्रण द्यायला गेलो. पैकी दळवी त्यावेळी नव्हते. मंगूअण्णा आणि रमेश मंत्रींनी येऊ म्हटले पण आले नाहीत. पुढे पुष्कळ वर्षांनंतर मी दिल्लीच्या युसिसमधे प्रदर्शन अधिकारी म्हणून काम करू लागल्यावर कित्येकदा मुंबई युसिसमधे जाणे होऊ लागले. मग पाडगावकरांशी दोस्ती झाली, आणि मी गेलो की मला समोर बसवून ड्रॉवरातून हिरव्या बाईंडीगचे सुंदर रजिस्टर काढून त्यात सुरेख अक्षरात लिहीलेल्या नवीन कविता ऐकवू लागले. मी त्याकाळी दासबोधाच्या शैलीत ओव्या रचायचो, त्या मी त्यांना ऐकवायचो. (माझेही त्या काळचे सर्व लिखाण तश्याच, ऑफिसातून मिळणार्‍या हिरव्या रजिस्टरात व्हायचे)

.

कुमार गंधर्व, चित्रकार - चिंचाळकर, एमेफुसेन, चंद्रेश सक्सेना, बेन्द्रे, वगैरेंशी घडलेल्या भेटीगाठींविषयी लिहीण्यासारखे आहे, पण टंकाळ्यामुळे ते पुढे कधितरी.

यशोधरा's picture

13 Apr 2018 - 6:05 pm | यशोधरा

अरे काय काका, इतकंच लिहून थांबलात! एक वेगळी लेखमाला करा ना. मजा येईल वाचायला.

बिटाकाका's picture

9 Apr 2018 - 2:10 pm | बिटाकाका

अजो, काय भन्नाट आयडिया आहे राव. संपादकांनी हा धागा सदाहरित बनवला तर काय मज्जा येईल. अजून लै लोकांनी लै काही शेअर करायला पाहिजे.

विशुमित's picture

9 Apr 2018 - 5:26 pm | विशुमित

सिने कलाकार :
१. मछिंद्र कांबळी- ३-४ थीत असताना गावातील हायवे ने नाटक कंपनीच्या बस मधून जात होते. एकदम शेवटच्या सीटच्या खिडकीत बसले होते .त्यावेळेस मी जोरात ओरडलो "" मछिंद्र कांबळी"". त्यांनी खिडकीतून तोंड मागे काढून मला हात केला होता.
२. उपेंद्र लिमये - २०१० मध्ये सिंहगड येथे कुटुंबासहित ट्रेकला आले होते. खूप सिम्पल. मी हात केल्यावर स्मित करून दाद दिली.
३. मनोज बाजपेयी- मनाली येथे १९७२ वॉर चे शूटिंग वेळेस. एका जुनिअर सहकलाकाराला २८ रिटेक घेतले तरी शॉट देता येईना. वैतागून मा.वा ने त्या कलाकाराचा रोल करून दाखवला मग कुठे ३० व्या टेक ला शॉट ओके झाला. पण झाले असे की वैतागल्या कारणाने त्याने आम्हाला त्याच्या बरोबर फोटो काढायला मनाई केली. माझा एक मित्र खूप चिढला होता त्याच्यावर.
४. संजय नार्वेकर, भरत जाधव, वर्षा उजगावकर- कारखाण्याच्या गणपतीसमोरील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आले असता माझ्या मामांमुळे बॅक स्टेजला भेटता आले. पण खूप व्यग्र होते.
५. तेजस्विनी लोणारी- सख्या मेहवण्याचा लग्नात मुलीकडून आली होती.
========
सामाजिक व्यक्ती/ लेखक/ वक्ते/ कीर्तनकार :
१. बाबासाहेब पुरंदरे (२००५)- विश्राम बाग वाड्यासमोर. एकटेच उभे होते. कोणीच बरोबर नव्हते. हातात हात दिला होता.
२. संभाजी भिडे- तुळापूर व्यसनमुक्ती चळवळ. एकदम करडा आवाज. पण तिथेच वैचारिक मतभेद देखील झाले होते.
३. शिवाजीराव भोसले- त्यांच्या हस्ते शालेय स्नेहसंमेलनात बक्षीस मिळाले होते. त्यांच्या २ तासाच्या व्याख्यनाने भारावलो होतो. असे वक्ते पुन्हा होणे दुर्मिळ.
४. मृतुन्जयकार शिवाजी सामंत-
५. कीर्तनकार- ह.भ. प. रामराव जी महाराज ढोक, बाबामहाराज सातारकर, निवृत्ती महाराज, बंडातात्या कराडकर, सदानंद गुरुजी, श्री वासुदेव महाराज, कोकाटे महाराज
========
राजकारणी व्यक्तिमत्वे :
१. पवार साहेब/ प्रतिभा ताई - फार पूर्वी घरी येऊन गेले आहेत. साहेब आजोबांना चान्गले ओळखतात.
२. अजित पवार - घरासमोर सभा झाल्या आहेत.
३. सुप्रिया सुळे - २-३ वेळा कामानिमित्त भेटलो आहे. प्रश्न समजून घेण्या इतपत वेळ मिळाला होता. तिसऱ्या भेटीत प्रश्न सुटला होता.
४. उदयनराजे भोसले (२०१५) - माझे चुलत-चुलत सासरे हृदयविकाराने वारले होते तेव्हा उदयनराजे माहुलीत मैतिला आले होते. ते उदयनराजे बरोबर सतत असायचे. उदयनराजे सर्वांच्या मध्ये येऊन बसले होते. ते रडले देखील. मयत व्यक्तीच्या १३-१४ वर्षाच्या मुलाला जवळ घेऊन बसले होते. अग्नी द्यायच्या वेळेस त्यांनी त्या मुलाला जाऊ दिले नाही. ते म्हणाले 'कोवळ्या वयात बापाच्या चीतेला अग्नी द्यायचे दुःख काय असते हे फक्त मला माहित आहे'. बाकी कोणी जास्त हस्तक्षेप न करता, माझ्या संख्या सासऱ्यांनी अग्नी देण्याचे सोपस्कर पार पाडले.
५. प्रकाश जावडेकर (२०११)- पुणे कल्लेक्टर ऑफिस. फाईल घेऊन आवारात उभे होते. नमस्काराला स्मित हास्य करून नमस्काराने प्रतिउत्तर दिले.
====
मागच्या महिन्यात लखनौ मध्ये असता योगी आदित्यनाथ यांना भेटण्याचा योग आला होता. पण मुहूर्त नाही मिळाला. २ महिन्यांनी चान्स मिळेल बहुतेक.

arunjoshi123's picture

9 Apr 2018 - 10:42 pm | arunjoshi123

विशुमितजी,
एक यादगार किस्सा भी हो जाए।

दवणिय भाषा प्रविण, छोटी सो-कुल, प्राजक्ता माळी, मंगेश देसाई यांच्या मुलाखती घेतल्या आहेत,
इंद्रजित भालेराव यांचा कविता वाचन कार्यक्रम होता गावात, त्यावेळी त्यांनी 'जन्माची कविता' ऐकवली मिळेल पहिल्या रांगेत होतो, ति कविता ऐकताना मला खूप रडू आलं, नंतर कार्यक्रम झाल्यानंतर वडील व मी त्यांना भेटलो, तर ते वडिलांना बोलले, हा खुप भावनिक आहे.
विद्या बालन- ईष्किया,अजय देवगण-गंगाजल, लागिरं झालं ची टिम यांचं शुटिंग पाहिलं आहे.
बिग बंड्या, गुरूशांत धुत्तरगावकर (आकाशवाणी​) सोबत कायप्पा समुहात आहे. एव्हरेस्ट शिखर वीर आनंद बनसोडे यांना भेटलो आहे.

सुबोध खरे's picture

10 Apr 2018 - 11:53 am | सुबोध खरे

मी सोनोग्राफी किंवा CT स्कॅन केलेली माणसे. यांच्या बरोबर साधारण १५ मिनिटे ते १ तास पर्यंत गप्पा होत असत( बहुतांशी त्यांच्या प्रकृतीबद्दलच)
१) आशिष विद्यार्थी- नट
२) राजीव शुक्ला - राजकारणी
३)परेश रावळ - नट
४) सयाजी शिंदे - नट
५) मकरंद अनासपुरे- नट
६) जॉनी लिव्हर - नट
७) महेश कनोडिया - नट-राजकारणी
८) श्री म्हैसकर --आय आर बी वाले
९) कॅप्टन नायर --हॉटेल लीला चे मालक
१०) मुकेश ऋषी --- नट
११) कादर खान- नट
१२) व्हाईस ऍडमिरल पी एस दास -नौसेना उपाध्यक्ष
१३) जनरल वेद प्रकाश मलिक-- स्थल सेनाध्यक्ष
१४) डॉ रमाकांत पांडा -- हृदयशल्यक्रिया चिकित्सक आणि व्यवस्थापकीय संचालक -- एशियन हार्ट इंस्टिट्यूट माझे वरिष्ठ २ वर्षे
१५) श्री प्रमोद लेले -- व्यवस्थापकीय संचालक पार्क डेव्हिस नंतर फायझर कॉर्पोरेशन नंतर सी इ ओ हिंदुजा रुग्णालय -- (५२ वर्षांची ओळख कारण सख्खा मावसभाऊ)
नौदलात असताना विक्रांत वरील डॉक्टर म्हणून प्रत्यक्ष भेट झाली
१) डॉ राजा रामण्णा -- संरक्षण राज्यमंत्री
२)श्री शरद पवार --संरक्षण मंत्री
३) श्री देवीलाल -- उप पंतप्रधान
४) अनुप जलोटा आणि सिद्धार्थ काक -- त्यांनी नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्राला १० लाख रुपये दिले त्याबद्दल त्यांना विक्रांतवर पार्टी दिली तेंव्हा माझे पाहुणे म्हणून आले होते
५) ऍडमिरल माधवेंद्र सिंह -नौसेनाध्यक्ष -- काही दिवस विराट वर असताना ते कमांडिंग ऑफिसर होते नंतर राजीनामा दिल्याचे वेळेस मुलाखत झाली
६) ऍडमिरल अरुणप्रकाश -नौसेनाध्यक्ष -- न्यायालयात केसच्या अगोदर यांची मी भेट घेतली होती.
७) व्हाईस ऍडमिरल रवींद्रनाथ गणेश --अणुपाणबुडी चाकरचे पहिले कमांडींग अधिकारी त्यानंतर अणुपाणबुडी प्रकल्पाचे(अरिहंत अरिदमन इ) महानिदेशक ५ वर्षे खास नेमणुकीवर, अध्यक्ष भारतीय तटरक्षक दल.
विक्रांत वर कमांडिंग ऑफिसर होते १ वर्ष रोजच भेट होत असे
८) व्हाईस ऍडमिरल रमण पुरी-नौसेना उपाध्यक्ष- विक्रांत वर कमांडिंग ऑफिसर होते १ वर्ष रोजच भेट होत असे
इतर
१) डॉ - सुब्रह्मण्यम स्वामी -- आणीबाणीनंतर २ वेळेस घरी आले होते जनता पक्षाचे उमेदवार मुंबई ईशान्य
२)श्री प्रमोद महाजन -- आमच्या सासऱ्यांच्या वर्गात होते.
३) श्री राजेश टोपे --आमदार --पूर्व उच्च शिक्षण मंत्री-- बायकोचे वर्गमित्र औरंगाबाद
४) श्री इम्तीयाझ झलील--आमदार --बायकोचे वर्गमित्र औरंगाबाद
५) सीमा देशमुख -- आमदार वडोदरा --माझी वर्गमैत्रिण
६) श्री मंगेश पाडगावकर-- मुलुंला कार्यक्रमाला आले असताना त्यांना आणण्या नेण्याची जबाबदारी मी घेतली होती तेंव्हा काही तास सहवास झाला. घरी पोहोचवल्यावर २ तास गप्पा झाल्या. मी लष्करातील गमती जमती सांगितल्या त्यांनी चहाही पाजला. आपली दोन पुस्तके स्वाक्षरी करून दिली. मी लष्करातील गमती जमती सांगितल्या त्याबद्दल त्यांच्या आग्रही उपदेशावरूनच मी मिपावर लिहायला लागलो.
७) पूर्व पोलीस महासंचालक द शं सोमण यांचा मुलगा माझा मित्र आहे.
८) कै. श्री. त्र्यंबक बेडेकर- पूर्व अध्यक्ष --बेडेकर मसाले -- माझ्या भावाचे सासरे
८) श्री वसंत बेडेकर -अध्यक्ष-बेडेकर मसाले वाले--माझ्या वहिनीचे काका.

आता आठवत आहे तेवढे लिहिले आहे.

त्यांच्या आग्रही उपदेशावरूनच मी मिपावर लिहायला लागलो.

?????
मंगेश पाडगावकरांना देखील मिपा आवडतं? माहित आहे?

मंगेश पाडगावकरांना देखील मिपा आवडतं? माहित आहे?-->
खरे साहेब पाडगावकरांना मिपा आवडत होतं किंवा माहित होतं कि नाही एवढच सांगू शकतात...
मिपा आवडतं किंवा माहित आहे कि नाही हे जाणून घेण्यास हे जाणून घेण्यास कुणालातरी हे मर्त्य शरिर सोडून परलोकात जावे लागेल.

बिटाकाका's picture

10 Apr 2018 - 1:16 pm | बिटाकाका

:O. हि आणि वरील काही याद्या बघून आपुन लै अतिसामान्य आहोत याची जाणीव झाली. थोरामोठ्यांचा सहवास लाभला नाही हो :(. मिपावरील तुमच्या सारख्या काही धुरीणींना भेटून हि कसर भरून काढावी म्हणतोय.

प्रतिसाद थोडा उशीरा टाकतोय. स्वाक्षरी घेण्याचा छंद असल्याने खुपच नामवंतांच्या भेटी झाल्या.
त्यात संगीतक्षेत्रातील नौशाद, ओ.पी.नय्यर, रवि, सोनिक, गुलशन बावरा, बिरजु महाराज, कल्याणजी, लता मंगेशकर, आशा भोसले, ह्दयनाथ मंगेशकर, मीना खडीकर, अरुण दाते, किशोरी आमोणकर, उत्तरा केळकर, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी, सुधीर फडके, रविंद्र साठे, यशवंत देव, गंगाधर महांबरे, भिमसेन जोशी, शांता शेळके, सुरेश भट, मंगेश तेंडुलकर, श्रीकांत मोघे, अशोक पत्की, दत्ता डावजेकर, गजानन वाटवे, बेला शेंडे, मंगेश पाडगावकर, आनंद मोडक, श्रीनिवास खळे, सुधीर मोघे, ना.धो. महानोर, फैय्याज.
अभिनय क्षेत्रातील रति अग्निहोत्री, बिंदु, मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, लक्ष्मीकांत बेर्डे, भरत जाधव, सुनील बर्वे , गिरीश ओक, अशोक सराफ, निळू फुले, श्रीराम लागु, मधु कांबीकर, सुलोचना, चंद्रकांत गोखले, सुधीर जोशी, उषा नाईक, प्रदिप पटवर्धन, अमोल पालेकर, आशालता बावगावकर, रमेश भाटकर, अलका कुबल, विजय चव्हाण, विजय कदम, अविनाश खर्शीकर, जयंत सावरकर, चित्तरंजन कोल्हटकर, युक्ता मुखी, लालन सारंग, स्वाती चिटणीस, शर्वरी जमेनीस, मृणाल देव, मिलींद गुणाजी, प्रशांत दामले, कविता लाड, जयमाला शिलेदार, दाजी भाटवडेकर, मोहन आगाशे, लिला गांधी, स्मिता तळवळकर, शिवाजी साटम, विनय आपटे, जयराम कुलकणी, सोनाली कुलकर्णी ( सिनीयर) राहुल सोलापुरकर, निर्मीती सावंत, जब्बार पटेल वगैरे
तर साहित्य क्षेत्रातील बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, बाबा कदम, रविंद्र भट, अशोक नायगावकर, राम शेवाळकर, श्री.पु. भागवत, विणा देव, व,पु. काळे, आर.के .लक्ष्मण, रामदास फुटाणे, शिवाजीराव भोसले, वसंत बापट, शिवाजी सावंत, मारुती चितमपल्ली, मधु मंगेश कर्णिक,
अजुनही बरेच सेलिब्रिटि राहिलेत. जमल्यास नंतर पोस्ट करतो.
यासर्वांच्या स्वाक्षरीच्या संग्रहाची लिंक देतो.
Autographs

दुर्गविहारीजी, मानलं ब्वॉ तुम्हाला. खूप भाग्यवान माणूस आहात. मिडिया क्षेत्रातच काम करता का?

विशुमित's picture

10 Apr 2018 - 2:27 pm | विशुमित

आरे वाह्ह्ह...!!

पुंबा's picture

10 Apr 2018 - 3:39 pm | पुंबा

भारीच..

shashu's picture

10 Apr 2018 - 3:58 pm | shashu

मेधाताई पाटकर > रेवस (अलिबाग) येथील प्रस्तावित विमानतळास विरोध सभेसाठी आल्या होत्या (साधारण २० वर्ष्यापुर्वी). माझ्या चुलत आजीच्या भावजय नी त्यांचा काही काळ सांभाळ केला होता. आणि त्याही नेमक्या त्यावेळेस गावी आल्या होत्या. त्या आजींना घेवून आम्ही मेधाताईंना भेटायला गेलो होतो. आजींना पाहताच मेधाताईंनी चरणस्पर्श केले.

बाबासाहेब पुरंदरे > जुईनगर (नवी मुंबई) येथे शिवरायांवरील कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळेस गाडीत मागच्या आसनावर बसलेले आणि मी अगदी जवळच उभा होतो.

लक्षमिकांत बेर्डे > लहान असताना (मी :)) आमच्या सासवणे (अलिबाग) गावी मराठी चित्रपटाचे चित्रण करण्यासाठी आले होते. अगदी जवळून पाहता आले.

प्रिया बेर्डे > एका नातलगांच्या लग्नामध्ये उपस्थिती.

जितेंद्र जोशी > मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या खालापूर येथील फूड-मॉल मध्ये.

सतीश राजवाडे > विलेपार्ले ईस्ट नेहरू रोड वरील एका केक शॉप मध्ये भेट.

अरुण कदम (कॉमेडी एक्सप्रेस फेम) > सांताक्रूझ स्टेशन ला नेहमी भेट व्हायची.

संदीप कुलकर्णी (डोंबिवली फास्ट फेम ) > विलेपार्ले वेस्ट कूपर हॉस्पिटल समोर रिक्शा मध्ये होते. आणि मी खूप वेळ निरखून पाहत होतो पण मला नाव आठवत नव्हते. त्यांचेही माझ्याकडे २-३ दा लक्ष गेले. मला एक स्मित देऊन, टाटा करून निघून गेले.

अक्षय खन्ना > आमच्या गाव शेजारी मांडावा या ठिकाणी यांचा बंगला व वाडी आहे. संध्याकाळी सायकल वरून आजूबाजूच्या गावात रपेट मारत असतो. काही लोकांना तर ओळखू हि येत नाही. मी मांडव्याला काही कामानिमित्त जात होतो तर हे महाशय काही गवंडी लोकांसोबत स्वतःच्या कंपाउंड गेट चे बांधकाम करत होते म्हणजे स्वतः विटा रचून माल थापत होते. अगदी साधा माणूस.

गौतम सिंघानिया (अध्यक्ष्य रेमंड ग्रुप) > यांचा सुद्धा प्रशस्त बंगला, वाडी, ह्याली-प्याड, गाड्यांचा रेसकोर्से आणि बरेच काही आहे आमच्या गावाशेजारी. सुट्टीच्या दिवशी गावी जाणे झाले कि बहुतेक यांचे दर्शन होतेच. (थोडे अवांतर, यांच्या अर्धांगिनी कातरवेळी जॉगिंग साठी निघतात. मागे एक चारचाकी गाडी असते. गाडीत २-३ लोक असतात. एक गार्ड हातात दंडुका व बंदुका घेवून तिच्या सोबत धावत असतो कारण धावताना अंगावर कुत्रे आले तर गार्ड रक्षण करेल. कारण या बाईंचा जॉगिंग करताना अवतारच तसा असतो रंगीबेरंगी कपडे कधी कधी (अगदी)छोटीशी शॉर्ट, कानात भले मोठे हेडसेट आणि जॉगिंग करताना मोठं मोठ्याने गाणी म्हणत असते. अगदी ८-१० कि.मी. सहज पळते. कधी थकलीच तर गाडीत बसून पुन्हा बंगल्यात येते. माझे काही चुलत भाऊ व मित्र यांच्या व इतर शेठ लोकांच्या वाडीत कामाला असतात ते या शेठ लोकांचे असे एकेक किस्से सांगतात कि आपणास खरेच वाटणार नाहीत, अतिशोयोक्ती वाटेल. त्यासाठी एक वेगळा धागा काढावा लागेल. खूप सारे सेलिब्रेटी आमच्या आजूबाजूला वास्तव्यास आहेत. मांडावा जेट्टी वरून स्पीड बोटीने या सर्वांचे येणे-जाणे कायम चालूच असते)

रविना टंडन > गौतम सिंघानिया यांच्याकडे हिचे वरचेवर येणे जाणे होते. गावात फेरफटका मारताना दिसली होती.

दिया मिरझा > अबुधाबी विमानतळ. बाजूनेच चालत होती पण त्यावेळीस ओळखता आले नाही. कारण चेहऱ्यात इतका फरक होता कि मी लगेच ओळखू शकलो नाही.

सध्यातरी इतकेच आठवतेय...

त्यासाठी एक वेगळा धागा काढावा लागेल

नेकी और पुछ पुछ..
काढून सोडा बघा धागा..

धाग्याला मस्त रंग चढला आहे. बाकी लोगां भी कूदो भै।

तिमा's picture

10 Apr 2018 - 5:00 pm | तिमा

प्रसिद्धी आणि प्रसिद्ध लोकांची मला अ‍ॅलर्जी आहे.

कधीपासून झालीय हि लागण...

सुमीत भातखंडे's picture

11 Apr 2018 - 10:57 am | सुमीत भातखंडे

मिपाकरांच्या एवढ्या मोठ्या-मोठ्या लोकांशी भेटी-गाठी झालेल्या वाचून असुया मिश्रित कौतुक वाटलं.

विवेकपटाईत's picture

12 Apr 2018 - 7:02 pm | विवेकपटाईत

मोठ्या लोकांबाबत मी काहीच बोलणार नाही. सामान्य माणसे अधिकांश मोठ्या लोकांपेक्षा फार चांगली असतात.

पण तुम्ही बोलतात तर तुमची लिस्ट सर्वात भारी असेल. चॅलेंजच नाही, नै का?

मिस इंडिया-युनिव्हर्स, आणि नंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता कॉलेजात माझ्या वर्गात होती.

एका मित्राचा आणि तनुश्रीचा किस्सा लय फेमस झाला होता. प्रस्तुत मित्र अत्यंत बुजरा. मुलगी समोर आली की त्याची जी वाचा बसायची, ती थेट ती मुलगी दृष्टिआड झाल्यावर परतायची. कॉलेजात तनुश्री सौंदर्यवतींत गणली जायची, पण 'द सौंदर्यवती'** मानली जात नव्हती.

एकदा कॉलेजला अचानक कसलीतरी सुट्टी जाहीर झाली. काही लोकांपर्यंत हा निरोप पोचला नाही, त्यामुळे ते गाफील राहून कॉलेजला पोचले. त्यात हा मित्र आणि तनुश्री होते. दोघेही वर्गात जाऊन बसले. मास्तरही येईना आणि इतरही कोणी येईना. आपण एका सुंदर मुलीबरोबर - पब्लिक प्लेसमध्ये का होईना, पण - एकटेच आहोत या कल्पनेने मित्र प्रचंड अवघडलेला.

शेवटी तनुश्री स्वतःहूनच मित्रासमोर आली, आणि फर्ड्या इंग्रजीत "आज सुट्टी आहे का कॉलेजला?" असा वट्ट सवाल केला.

मित्राची दातखीळ उचकटेना. तिने बिचारीने तीनचार वेगवेगळ्या प्रकारे त्याला बोलतं करायचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी ती कंटाळून निघून गेली.

ती पार दृष्टीआड झाल्याची खात्री करून साहेब जीव मुठीत धरून तिथून खचकले. पीडी कट्ट्यावर चार मित्रांच्या कम्फर्ट झोनमध्ये आल्यावर त्यांना वाचा फुटली आणि हा किस्सा समजला.

**कॉलेजच्या भाषेत : जगाचा टप्पा.