अभी ना जाओ छोडकर...

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
4 Apr 2018 - 9:36 pm

आधीच बाहेर रात्र धो धो कोसळत होती.
त्यातून पावसालाही मुहूर्त मिळाला होता. त्याचं तर आज डोकंच सटकलं होतं. अख्ख्या महिन्याचा बॅकलॉग भरून काढायचा निर्धारच केल्यासारखा तो ओतत होता.
दार उघडलं जात नव्हतं. बहुधा पावसामुळेच फुगलं असावं. थोडी खटपट करून त्यानं लॅच उघडलं आणि दोघं आत आले. चिंब भिजले होते. तो जरा जास्तच. तिनं पटकन आत जाऊन त्याच्यासाठी टॉवेल आणला.
``डोकं पुसून देऊ का मी?`` तिनं आस्थेनं विचारलं.
उत्तरादाखल त्यानं फक्त तिच्या हातातून टॉवेल घेतला आणि तो डोकं पुसू लागला.
``कॉफी घेणारेस? की....`` तिनं टेबलावरच्या बाटलीकडे इशारा करत विचारलं.
``नको. कॉफीच कर. गरम बरं वाटेल जरा.``
ती लगेच कॉफी करायला आत वळली.
...
``किती योगायोग असतात नाही, आपल्या आयुष्यात? कुठलीही चांगली गोष्ट मिळायला नशीबच लागतं!`` कॉफीचा मग त्याच्या हातात देत ती म्हणाली.
``कॉफीबद्दल म्हणतेयंस? हो, अशी गरमागरम कॉफी मिळायला नशीबच लागतं.``
``कॉफीबद्दल नाही रे. म्हणजे, खरंच, कुठल्याही गोष्टीचा जरा जास्त खोलात जाऊन विचार केला, तर असंच वाटतं ना?``
``फॉर एक्झाम्पल?``
``आता आपल्या नात्याचंच घे ना. जणू काही आपण एकमेकांच्या नशीबातच लिहिलेले असावेत, अशीच भेट झाली ना आपली! योगायोग, नशीब सगळंच खरं वाटायला लागतं रे अशा वेळी!``
``हं...!``
``कधीकधी वाटतं, की परमेश्वर किंवा जी कुणी नैसर्गिक शक्ती वगैरे असेल, तिच्याही मनात काहीतरी असावं कदाचित. म्हणूनच असं घडवून आणत असेल तो.``
``हं...``
``तुला `हं…`शिवाय दुसरं काहीच म्हणायचं नाहीये का?``
``अं…?``
``झालं! आता `हं…` संपल्यावर `अं…` चालू झालं तुझं!``
``तसं नाही गं.``
``मग कसं?``
``मला बाहेरचं वातावरण बघून काळजी वाटतेय. एकतर रात्र झालेय, बाहेर पाऊस, रस्त्यावर लाइट असतील की नाही, याची खात्री नाही आणि...``
``काळजी करू नकोस रे, होतं असं कधीकधी.``
``हो अगं, पण वाजलेत किती बघ!``
``अगदीच वाटलं तर राहा इथेच आजची रात्र!``
त्यानं चमकून तिच्याकडे बघितलं.
``बघ म्हणजे...तुला शक्य असेल तर. घरी अगदीच काळजी करणार असतील, तर मग...``
``हं. बघू. थोडा वेळ वाट बघेन. होईल कमी पाऊस. असा अवेळीचा पाऊस जास्त टिकत नाही.``
``हो, पण सांगता येत नाही रे. तू निघालास आणि मध्येच पुन्हा कुठे अडकलास तर...?``
``पण जायला तर हवंच ना?``
``उद्या सकाळीही जाऊ शकतोस. बघ ना, फोनसुद्धा बंद पडलेत आपल्या दोघांचे. घरात लाइट नाहीत. अशावेळी...``
``म्हणून तर काळजी वाटतेय. घरी कळवूसुद्धा शकत नाही मी फोनवरून.``
``अरे, हां...तू तर म्हणालेलास की घरचे सगळे गावाला गेलेत ना? मग कळवण्याचा काय संबंध आहे?``
``हो...मी विसरलोच.``
``बघ, मी आठवण करून दिली म्हणून. योगायोग म्हटलं ना, तो हाच. तुझ्याही घरी कुणी नाही, माझ्याही घरी कुणी नाही. विचारणारं कुणीच नाही ना आपल्याला!``
``हं.`` त्यानं पुन्हा थंड प्रतिक्रिया दिली.
``आणखी एखादी कॉफी?``
``नको.`` तो खिडकीतून बाहेर बघत म्हणाला.
``मग ड्रिंक? एक बाटली आहे आमच्या घरात.``
``नाही, नको.``
``का रे?``
``ड्रिंक घेतलं, की कंट्रोल राहत नाही माझा स्वतःवर. ``
``मग बरंच आहे की!``
``काय? ``
``नाही...काही नाही. ``

पुन्हा काही क्षण असेच गेले. तो खिडकीतून बाहेर बघत सारखा अंदाज घेत होता.
``चल, मी निघतो आता. पाऊस कमी झालाय. थांबेल असं वाटतंय. ``
तो आवरायला लागला.
``निघालास एवढ्यात? जाऊ शकशील तू नीट? ``
``हो, करेन मी मॅनेज. ``
``बघ, तरी पण... ``
``नाही, निघतो. ``
``बरं. `` तिनं दीर्घ सुस्कारा टाकला. ``तुला जायचंच असेल, तर मग... जा.``
``हं. `` तो लगबगीने बाहेर पडला. चपला पायात सरकवतानाच नेमका बंद तुटला.
``अर्रर्रर्र...!`` तो वैतागला.
``बघ. म्हटलं होतं ना तुला, नियतीच्या मनात काहीतरी असतंच. तू घरी जावं, असा योगच नाहीये आज. ``
``नाही गं, खरंच जाईन मी. एक बंदच तर तुटलाय!``
``बरं. `` आता मात्र तिचा नाइलाज होता.
तो बाहेर पडला. खाली जाऊन त्यानं बाइकला किक मारली. ती त्याला बाय करायला खिडकीत उभी राहिली. तो दिसेनासा होईपर्यंत ती बघत राहिली, मग आत वळली.
थोड्या वेळानं पुन्हा बेल वाजली, तशी ती वाऱ्याच्या वेगानं दार उघडायला धावली. दारात तोच उभा होता. तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिला त्याच्या जागी `अनफेथफुल`मधली डायना लेनच दिसायला लागली.
``काय झालं?``
``बाइक बंद पडलेय माझी. ``
``बघ. शेवटी माझं म्हणणं पटलंच ना तुला?`` तिला चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नव्हता.
``कसलं म्हणणं? ``
``हेच, नियतीच्या मनात काही वेगळंच आहे ते!``
``हो!`` तो उत्साहाने आत येत म्हणाला, ``तू आल्यापासून तेच म्हणत होतीस, पण मला काही लक्षात येत नव्हतं. खरंच, काही गोष्टी नियती स्वतः घडवून आणत असते. बघ ना, अचानक पाऊस येणं, मी तुझ्या घरी अडकणं...त्यातून माझी बाइक बंद पडणं... ``
तो सलग बोलत होता आणि ती त्याचे डोळे वाचत होती. आता तिला काहीच बोलायचं नव्हतं. फक्त त्याच्या डोळ्यांत हरवून जायचं होतं. एवढ्यात त्याच्याच शब्दांनी ती भानावर आली.
``त्या मेकॅनिकचं गॅरेज इथेच कुठेतरी आहे ना? ``
``कोण मेकॅनिक? `` चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली.
``तोच गं...तू म्हणाली होतीस ना, तुझ्या बिल्डिंगच्या शेजारीच आहे? बाइकची उत्तम दुरुस्ती करतो! आज काय योगायोग आहे बघ! नेमकी इथेच बंद पडली माझी बाइक. आज त्याला गाठून त्याच्याकडून दुरुस्त करूनच घेतो. तो कुठल्याही वेळी काम करून देतो. चल, दाखव मला. मी खाली आहे!`` तिच्या प्रतिक्रियेचीही वाट न बघता तो जिने उतरू लागला आणि तिनं वैतागून खिडकीतून खाली बघितलं. रस्त्यावरचं एक कुत्रं तिच्याकडेच बघून कुईईईई करून रडतंय, असा भास तिला झाला!

कथाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

4 Apr 2018 - 10:10 pm | दुर्गविहारी

मस्तच लिहीलसं रे ! अनपेक्षित शेवट.

एस's picture

4 Apr 2018 - 11:42 pm | एस

हॅत तेरी की! :D

सिरुसेरि's picture

5 Apr 2018 - 8:01 am | सिरुसेरि

विनोदी कलाटणी .

बिचारी ती स्त्री.. आणि त्याला अशा मौसमातही बाइकचीच पडलेली ..

बाकी "बाइक"ऐवजी "बायसिकल" असा बदल केला तर इकडे मिपावर भरपूर अगदी असेच पुरुषलोक्स सापडतील. ;-)

दुर्गविहारी's picture

5 Apr 2018 - 11:28 am | दुर्गविहारी

LOL !!!! नेमका बाण मारलात कि हो गवि. ;-)
बाकी बुलेटही चालेले.

अभिजीत अवलिया's picture

5 Apr 2018 - 11:17 am | अभिजीत अवलिया

फारच 'बावळट' वाटला कथानायक.

पद्मावति's picture

5 Apr 2018 - 11:44 am | पद्मावति

मस्तच. शेवट खुप आवडला.

सस्नेह's picture

5 Apr 2018 - 12:34 pm | सस्नेह

बिच्चारा !

किल्लेदार's picture

5 Apr 2018 - 8:17 pm | किल्लेदार

कथानायक बाईलवेडा नसून बाईकवेडा निघाला ........ :) :) :)

शिव कन्या's picture

5 Apr 2018 - 9:28 pm | शिव कन्या

शं. ना. नवरे यांची 'शहाणी सकाळ' आठवली.
कलाटणी मस्त.

नाखु's picture

6 Apr 2018 - 10:53 am | नाखु

शहाणी सकाळ माझ्या आवडत्या कथांपैकी एक आहे.

नितळ संयत भाषेत सांगायचे ते सांगितले आहे

ही कथाही गमतीदार कलाटणी मुळे आवडली

मिपाकर वाचक नाखु पांढरपेशा

धर्मराजमुटके's picture

6 Apr 2018 - 9:48 am | धर्मराजमुटके

शेवटी काय तर 'तो' पुरुष असला तरी 'तृतियपुरुष' च :)

श्वेता२४'s picture

7 Apr 2018 - 3:04 pm | श्वेता२४

शेवट वाचून हसू आवरेना अगदी. शेवट धमाल आहे.

आपला अभिजित's picture

8 Apr 2018 - 8:55 pm | आपला अभिजित

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद.