पश्चिम खांदेशातील गिरीदुर्ग

नमिता श्रीकांत दामले's picture
नमिता श्रीकांत दामले in भटकंती
21 Mar 2018 - 5:25 pm

         प. खांदेशातील गिरीदुर्ग

१. आमच्या ट्रेकमधील एक विलोभनीय सूर्यास्त

डिसेंबर महिना म्हणजे भटक्यांसाठी पर्वणीच! नाताळच्या सुट्टीला जोडून नवीन काही किल्ले फिरायचे आणि थंडीचे सोने करायचे असा विचार होताच. प. खांदेश म्हणजेच धुळे; धुळ्याचे प्राचीन नाव रसिका. युथ होस्टेल, कांदिवली बरोबर धुळे ट्रेकला जाण्याचा विचार पक्का केला आणि २२-१२-१७ च्या शुक्रवारी रात्री  सॕक भरून निघालो. झायलो गाडी प्रशस्त आहे आणि गाडीत आम्ही सहाच जण होतो त्यामुळे ऐसपैस जागा होती. नऊच्या दरम्यान मला घ्यायला गाडी ठाण्याला आली आणि नासिक महामार्गावर धावू लागली. अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी सुटत नव्हती. त्यामुळे कल्याण फाटा मागे टाकायला तब्बल दीड तास लागला. मग एका ढाब्यावर थांबून बिर्याणी कोशिंबीर, लोणचे, पापड असे भरपेट जेवण केले आणि कडक चहा पिऊन गाडीनी वेग घेतला. अनिल, संजीव, परेश, वैशाली, मराठे सर आणि मी असा सहा जणांचा चमू होता. हळुहळू सर्वांशी परिचय होऊ लागला. वैशालीनी मागच्या सीटचा ताबा घेतला होता. सामान-सुमान आवरुन आणि पाय लांब करुन ती निद्रादेवीच्या आधीन झाली.
बाबा दा ढाबा कधीच मागे सुटला होता पण मनात मागच्या डिसेंबर मध्ये केलेल्या भास्करगड हरिहर ट्रेकच्या आठवणी रुंजी घालत होत्या. महामार्गावरुन पळणाऱ्या  गाडीच्या वेगात एक-एक गाव मागे पडत होते. धुळ्यामधल्या काही किल्ल्यांबद्दल वाचले होते, काही वाचायचे राहून गेले होते. मन इतिहासात शिरु पाहत होते. इतक्याच एका ढाब्यावर जाग दिसली. तिथे थांबून चहा पिण्याचा ठराव झाला. कडक मसाला चहा पिऊन तरतरी आली. वैशालीनी सगळ्यांसाठी मोठ्या थर्मासमध्येही चहा भरुन घेतला. त्याआधी पेट्रोल पंपावर गाडीची टाकीही पूर्ण भरुन घेतली होती. त्यामुळे आता कुठे थांबण्याचा प्रश्नच नव्हता.

२. स्तब्ध उभे ते स्थाणु

धुळे रिंग रुट आपण कुठून सुरु करणार, पहिला मुक्काम कुठे करणार इ. चर्चा सुरु झाली. साधारण माहिती घेतलेली होती. तसेच बरोबर खाण्याच्या पदार्थांची रेलचेल होती. मुक्कामासाठी दोन तंबू होते. त्यामुळे सगळा कार्यक्रम आखीव-रेखीव नसला तरी काही चिंता नव्हती. पहिला मुक्काम कंकराळ्याच्या पायथ्याशी करावा किंवा झोडगेमधील प्राचीन मंदिरातही मुक्काम करु शकतो अशी एक सूचना मराठे सरांकडून आली. 
 गप्पांमध्ये मधे-मधे डुलक्या घेत प्रवास सुरु होता. गुगल माता मार्गदर्शन करीत होती. 'गुगल माता कभी धोखा नही देती' अशी श्रद्धा असल्यामुळे सगळे निश्चिंत होतो. कंकराळ्याच्या पायथ्याशी दोन मंदिरे आहेत. गाडी आतल्या रस्त्याला वळली. मोबाइलचा सिग्नल क्षीण झाला म्हणून एका वाटसरुला मार्ग विचारला. त्यानी दाखवलेल्या रस्त्यानी गेल्यावर आम्हाला घुमजाव करुन परत यावे लागले आणि योग्य दिशेला चाके वळवावी लागली आणि मग आमचे मुक्कामाचे मंदिर दृष्टिपथात आले.

३. पहिला मुक्काम

विंध्यवासिनी इंदासिनी माता मंदिर येथे पहाटे साडे चारला पोहोचलो आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी चारी बाजूंनी मोकळा पण दोन फूट उंचावर आणि फरसबंद असलेला मंदिराचा सभामंडप मिळाला. प्रथम जाग आली तेव्हा समोर दिसणारा सूर्योदयापूर्वीचा देखावा अतिरमणीय होता. 

४. कंकराळ्याच्या पायथ्याशी झुंजू-मुंजू

सगळेच जरा आळसावले होते. पण उठल्यावर गरम चहा तयार होता हे फार मोठे सुख होते. मग चहा- चिवडा खाऊन कंकराळ्यावार चढाई केली. कंकराळा गावात किल्ल्याच्या पायथ्याशी तळ्याच्या काठी हिंगलाज माता मंदिर आहे. कंकराळ्याच्या खिंडीच्या दिशेनी साधारण दहा-पंधरा मिनिटे चालले की खोदलेली पाण्याची टाकी दिसतात. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. जवळच एक पीराचे थडगेही आहे. पुढे गेल्यावर बाजू-बाजूला दोन व खालच्या बाजूला दोन पाण्याची टाकीही वाकून बघितले की दिसतात. पाण्याच्या टाक्यांजवळ प्रकाशाचा अंदाज घेत स्थिरचित्रण व चलतचित्रणही झाले. एका ठिकाणी मोकळ्या आभाळाखाली शिवलिंग, नंदी आणि हनुमान गुजगोष्टी करीत होते. त्यांचे दर्शन घेऊन गडफेरी पूर्ण केली. किल्ल्याचा विस्तार बेताचा असल्यामुळे गडफेरीला फार वेळ लागत नाही. उजवीकडच्या पठारावर उध्वस्त प्रवेशद्वार पण बऱ्यापैकी तग धरुन उभी असलेली तटबंदी आहे. या पठारावर काही उध्वस्त वास्तूंचे अवशेषही आढळतात. तटबंदीचे निरीक्षण करुन पुढे निघालो. 

५. तटबंदीचे अवशेष

आता गाडीकडे येऊन सगळ्यांनी नाश्ता केला आणि गाळणा किल्ल्याकडे आगेकूच केले. किल्ल्याच्या पायथ्याशी आश्रम आहे. आश्रमात जाऊन दर्शन घेतले. दुपारच्या जेवणाची काही तजवीज होईल का याचा अंदाज घेऊन पुढे निघालो. गाळणा किल्ल्यावर जुने बांधकाम बरेच आहे आणि दुरुस्तीची कामेही व्यवस्थित झाली आहेत.

६. गाळणा किल्ल्यात प्रवेश

वनखात्याच्या हद्दीत हा किल्ला येतो. काही शिलालेखही बघता येतात, कारण वाचणे अवघड आहे. किल्ल्याचे बुरूज, तटबंदी यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.

७. गाळणा किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून

बदलापूरहून आलेल्या रॉकहार्टस् ग्रुपचे ट्रेकर्स इथे भेटले. तेही २३-२४-२५ डिसेंबरला धुळे पट्ट्यातील किल्ल्यांना भेटी देणार होते. झोडगेमधील मंदिर अवश्य बघा असे त्यांनीही आवर्जून सांगितले. एका ठिकाणी जुन्या वाड्याचे अवशेष बघायला मिळाले; हे बांधकाम राजवाड्याइतकेही मोठे नाही.

८. गाळणा किल्ल्यावर फेरफटका

दरवाजे, बुरुज, पायऱ्या, तटबंदी, सारे आपल्याला प्राचीन काळात घेऊन जातात; पण पायाखालचा कचरा मात्र भानावर आणतो. यासाठी नक्कीच काहीतरी करायला हवे अशी चर्चा झाली; युनिटचा कार्यक्रम ठेवू या, किल्लेसफाईचा आणि नंतर वनअधिकाऱ्यांना पत्र देऊ या ज्यामुळे लोकांच्या कचरा टाकण्यावर आळा बसेल. पण पर्यटकांची सुंदर स्थळाला विद्रुप करण्याची ही मानसिकता बघून मन उद्विग्न होते. दुपारी बरोबार आणलेल्या पुरणपोळ्या, फळे इ. खाऊन पिसोळकडे जायला निघालो. 
वाटेत एका ठिकाणी भेळ व पाववडा मिळाला. पाववडा म्हणजे अख्खा पाव डाळीच्या पीठात बुडवून तळून काढण्याचा प्रकार प्रथमच बघितला. भेळेवर मग गरमागरम चहा झाला. नांदिन म्हणजेच वाडी पिसोळला पोहोचेपर्यंत संध्याकाळचे पाच वाजले. आता पिसोळवर जाऊन पुन्हा खाली उतरावे की पिसोळवर मुक्कामी जावेअसा विचार पडला. पिसोळवाडीत लक्ष्मण पवारांच्या घरी राहून पहाटे निघून पिसोळ बघावा आणि नऊ वाजेपर्यंत खाली उतरावे हेही शक्य होते. पण 'किल्ल्यावर रात्री जाऊ नका आणि किल्ल्यावर राहू नका वाघिणीनी पिल्लं घातली आहेत तिचा वावर असतो' असे पिसोळवाडीतील लोक सांगत होते. पण मग सर्वानुमते ठरले की किल्ल्यावरच मुक्काम करु या, त्याप्रमाणे सामान घेऊन किल्ल्याकडे निघेपर्यंत सहा वाजले. डोंबिवलीच्या ट्रेक क्षितिजचे ट्रेकर्स किल्ला उतरत होते. ते सकाळी डेरमाळला जाऊन दुपारी पिसोळला गेले होते. आम्ही पिसोळवर मुक्काम करणार हे ऐकल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे भाव टिपण्यासारखे होते. पिसोळची वाट तशी सोपी आहे. पाण्याच्या टाक्यांकडून दोन वाटा फुटतात. एक वाट सरळ जाते व दुसरी वाट उजवीकडून वर चढते. उजवीकडच्या वाटेनी वर गेलो. अंधार पडल्यामुळे सगळेजण विजेरीच्या प्रकाशात एकत्र वाटचाल करत होतो. वर गेल्यावर एका जागी सगळे थांबलो व दोघे जण मुक्कामासाठी निवारा शोधायला गेले. एका जागी थांबल्यावर थंडी बोचत होती.

९. पिसोळवरील मुक्काम

मुक्काम करायला पडकी मशीद सापडल्यावर जाताना सगळ्यांनी सरपणासाठी काटक्या, सुकी लाकडे गोळा करुन नेली. कारण थंडीपेक्षाही वाघिणीला दूर ठेवण्यासाठी रात्रभर थोडा जाळ ठेवणे आवश्यक होते. प्रथम जाळ करुन सॕक व्यवस्थित लावल्या.मग दगडगोटे बाजूला सारून आणि माती सारखी करुन निवाऱ्याची जागा जरा समतल करुन घेतली. मग कॕरी मॕट पसरुन जेवणासाठी सगळे सुसज्ज झाले. जाळ करतानाच सकाळच्या चहासाठी तीन दगडांची चूल मांडून ठेवली होती. मग ब्रेड-बटर-काकडी-टोमॕटो आणि लोणचं असा बेत झाला. येतानाच सगळ्यांनी पाण्याच्या बाटल्या भरुन आणल्या होत्या. त्यामुळे आता पाण्यासाठी पुन्हा खालच्या टाक्यांकडे जाण्याची गरज नव्हती. मशीदीला तीन बाजूंनी भिंत होती पण एक बाजू पूर्ण मोकळी होती आणि एका भिंतीला वाघिणीला सहज शिरता येईल एवढे मोठे खिंडार होते. आपण मोकळ्या बाजूकडे पाय करुन झोपावे म्हणजे वाघीण आली तरी पायाकडून पकडेल आणि तोंडानी ओरडता येईल अशी व्यूहरचना करण्यात आली. रात्रीच्या नीरव शांततेत आता फक्त निद्रेचे तालबद्ध संगीत सुरु झाले. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी कोणीतरी झोपेत घाबरुन जोरात ओरडले. सगळेच जण दचकून जागे झाले. जनावराच्या चाहुलीची भीती मनाला चाटून गेली. पण परेशच्या पायाशी कोणीतरी चपला ठेवल्या होत्या आणि झोपेत त्याचा त्या चपलांना पाय लागला; एवढेच त्याच्या ओरडण्याचे कारणा होते. या प्रसंगानी पुढे ट्रेकमध्ये बरीच करमणूक झाली पण क्षणभर सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. 

१०. पिसोळवरील रम्य पहाट

            सूर्योदयापूर्वीच सगळे जण एकेक करुन उठले, समोर दिसणाऱ्या डोंगर रांगा तांबूस-पिवळ्या दिसू लागल्या. इकडे मराठ्यांनी आलं घालून कडक चहा तयार केला. चहा बिस्किट खाऊन आणि पटापट सॕक भरुन किल्ला बघण्यासाठी त्वरेने निघालो. कोवळ्या सूर्यप्रकाशात न्हाणारी हनुमान आणि विरगळ अशी जोडी पाठीला पाठ लावून उभी होती. गडावरील वाड्याचे अवशेष दरवाजाचा भक्कम पुरावा मागे ठेवून होते. जागोजागी पाण्याची टाकी होती. मध्येच एका ठिकाणी वाघिणीनी शिकार केलेल्या बैलाचा सांगाडा कोणीतरी उंचावर मांडून ठेवला होता. पुढे गेल्यावर पावसाळी पाण्याचे सुकलेले आणि भरलेले तळे, गडाचे बुरुज, धोडपसारखी खाच इ. सारे खुणावत होते. मागच्या वेळी तळ्याकाठी त्या तरुतळी बसून भेळ खाल्ली होती, त्याची खमंग आठवण आली. गडफेरी वेगानी करुन आम्ही उतरणीला लागलो. टाक्यांकडे जाऊन थंडगार पाण्याचा मनसोक्त आनंद घेऊन ते बाटल्यांमधून भरुन घेतले. साडे नऊच्या दरम्यान पिसोळवाडीत पोहोचलो.

११. ही वाट दूर जाते....

हवा स्वच्छ नसल्यामुळे गडावरुन, मांगी-तुंगी, डेरमाळचा भैरवकडा यांचे दर्शन मात्र हुकले. पिसोळवाडीत पवारांच्या घरी गरमागरम बाजरीच्या भाकरी, शेवेची रस्सा भाजी, भात, लोणचं, पापड, कांदा अशी मजबूत न्याहरी केली आणि रायकोटकडे प्रस्थान केले. खरं तर पिसोळनंतर जवळच असलेला डेरमाळ किल्ला करायचा असा बेत होता. म्हणून मग मधल्या काळात डेरमाळ बघण्यात कमीत -कमी अर्धा दिवस जाईल आणि त्यामुळे पुढचे २-३ किल्ले बघायचे राहतील, हे आमच्या मोहीमेचे लीडर्स संजीव आणि अनिल यांना मराठ्यांच्या मदतीने मोठ्या हिकमतीने पटविण्यात मला यश आले. त्यामुळे नवीन किल्ले बघायला मिळणार म्हणून बराच हुरुप आला. 

१२. रायकोटवरुन पाहणी

सूरत-बु-हाणपूर या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कोंडाईबारी गावात रायकोट किल्ला बांधण्यात आला.  रायकोटला आम्ही भर दुपारी पोहोचलो. सर्व प्रदेश सपाट दिसत होता. किल्ला नक्की कुठे आहे तेच काही कळत नव्हते. काही माणसे शेतात काम करत होती. कुणाचे मातीच्या विटा पाडून भाजण्याचे काम चालले होते. त्यांना विचारुन किल्ल्याच्या दिशेनी निघालो. वाटेत एक विरगळ दिसली. तसेच इतर काही पुरातन अवशेषही आढळले. रायकोटच्या पठारावरील  बुरुजावर चढून आजूबाजूच्या प्रदेशाची टेहळणी केली. तळ्याकाठी पक्षी मजेत विहार करीत होते त्यांना टिपले. मग शेतात काम करणारे दादा बरोबर आले. थोडी घसाऱ्याची पायवाट उतरुन गेल्यावर पाण्याचे टाके व दरवाजाचे भग्नावशेष त्यांनी दाखवले.

१३. रायकोटवरील पाण्याचे टाके

येथून खाली उतरुन गेल्यावर मोरकगंज गाव असावे. परतीच्या वाटेवर डावीकडे अतिशय  खोल असे नैसर्गिक खंदक आहेत. या खंदकांनी रायकोटच्या तीन बाजूंना वेढा दिला आहेव एका बाजूला तासलेले उभे कडे आहेत. त्यामुळे रायकोट अतिशय बळकट व सुरक्षित किल्ला होता. या बाजूला एक छोटेखानी मंदिरही आहे. पूर्वीच्या काळी इथे कसे असेल, हा किल्ला संपूर्ण नष्ट का झाला, इथे लढाया झाल्याची दप्तर दरबारी किंवा बखरींमध्ये वगैरे काही नोंद आढळते का अशा अनेक प्रश्नचिह्नांना मनात ठेवून रायकोटचा निरोप घेतला. मग थंडगार खरबूज, भडंग, सफरचंद इ. खाऊन जठराग्नी शमविला. 

१४. भामगिरीचा किल्ला

           आता भामेरच्या दिशेनी प्रवास सुरु झाला. वाटेत एका गावात बाजार भरला होता. तिथे ताजी केळी, चिकू, पपई अशी फळे आणि भेळेसाठी कांदा वगैरे मिळाला. आदिवासींच्या मिरवणुकीनी रस्त्याची कोंडी झाली होती; तिथे बराच वेळ कौतुकानी त्यांची वेशभूषा, नृत्य न्याहाळण्याचा आणि त्यांची  लोकगीते ऐकण्याचा योग आला. वैशालीला आठवण म्हणून त्या आदिवासी स्त्रियांसारखी लाल चुनरी हवी होती. तिचाही त्या बाजारात शोध घेतला. मग वैशालीला ती ओढणी मिळवून देण्याची जबाबदारी तिच्या भावावर म्हणजे  परेशवर नैसर्गिकरित्या येऊन पडली. वाटेत एका ठिकाणी गाडीत बसूनच झटपट चहा घेतला आणि वेगाने भामेरकडे प्रयाण केले. भामेरची माहिती वाचली. भामगिरी किंवा भामेर हा धुळे जिल्ह्यातील सर्वात देखणा परंतु अपरिचित गडकोट. हे पूर्वीचे भद्रावती नगर; भद्रावतीचा अपभ्रंश होऊन त्याचे भामेर झाले. अतिशय प्राचीन इतिहास असलेल्या या स्थळी बघण्यासारखे खूप काही आहे.

१५. भद्रावती नगराची प्राचीन कमान

भामेर किल्ला तीन डोंगरांमध्ये विस्तारलेला आहे. तसेच गावातही अनेक प्राचीन अवशेष आहेत. प्रथम वर जाऊन किल्ला बघून येऊ असे ठरले. चार वाजले होते, गतीने पावले उचलली. छायाचित्रण करायला भरपूर वाव होता. या किल्ल्यावर प्राथमिक अवस्थेतील १८४ गुंफा आहेत. पेशवेकाळात येथे कचेऱ्या होत्या. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजवीकडच्या डोंगरावर पांढरा दर्गा, मधल्या डोंगरावर  गुहा व डावीकडच्या डोंगरावर बालेकिल्ला आहे.मधला डोंगर व डावीकडचा डोंगर यांमध्ये एक मानवनिर्मित खाच आहे.

१६. भामेरवरील मानवनिर्मित खाच

शत्रूनी किल्ल्यात प्रवेश केल्यास बालेकिल्ल्यात पोहोचण्यापूर्वी शत्रूवर दोन्ही बाजूंनी मारा करता यावा यासाठी ही खाच आहे. बालेकिल्ल्यावर मातेचे मंदिर आहे.

१७. देवाचिये द्वारी

तसेच पुढेही मोकळ्या जागेत मूर्ती मांडून ठेवल्या आहेत. बालेकिल्ल्याच्या डोंगरावरुन सौरऊर्जानिर्मितीचा अजस्त्र प्रकल्प दूरवर दिसत होता. संपूर्ण किल्ला बारकाईनी बघण्यासाठी भरपूर वेळ हवा. वर मुक्काम करायलाही हरकत नाही. खाली उतरल्यावर प्रवेशद्वाराची भव्य कमान, दोन आकाशाकडे झेपावणारे खांब, मोठी विहीर, विहीरीपाशी गुरांना पाणी पिण्यासाठी केलेली विशेष व्यवस्था सारे स्मृतीपटलावर कोरुन आणि कॕमेऱ्यामध्ये बंदिस्त करुन भद्रावतीमध्ये रेंगाळणारा मुक्काम आवरता घेतला.

 

१८. सांज ये गोकुळी...

            सुवर्णदुर्ग म्हणजेच सोनगिरी; अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेला सूरत-बु-हाणपूर महामार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बाराव्या शतकात बांधलेला टेहळणीचा किल्ला. सोनगिर हे येथील एक मोठे गाव. तांबट आळीत तांब्याची भांडी बनविण्याचा खणखणाट अजून सुरु होता. रात्रीचे आठ वाजले होते. आता किल्यावर जाऊ नका, असा गावातील बाया-बापड्यांनी काळजीनी सल्ला दिलाच. पण नाइलाज होता. कारण किल्ल्याची ओढ जबरदस्त होती. वीस मिनिटात प्रवेशद्वारी पोहोचलो. येथे येण्यासाठी बांधीवा पायऱ्या आहेत. इथे पाण्याचे टाके आहे. वर पोहोचल्यावर जपून चाला, कारण इथे १५-२० पुरुष खोल पाण्याची बावडी आहे. तिची खोली आजमावणे अवघड नव्हे अशक्य होते. ही बावडी चांगली प्रशस्त होती. इथून झेंड्याच्या दिशेनी म्हणजेच बालेकिल्ल्याकडे गेलो. वाटेत उजव्या हाताला पुष्करणीचे व वाड्यांच्या बांधकामाचे अवशेष आढळले. उजवीकडचे टोक गाठत थेट झेंड्याच्या काठीपर्यंत पोहोचलो. इथे एक ग्रुप फोटो काढला. बाकी किल्ला अंधारात फिरल्यामुळे फोटो काढायला वाव नव्हता. खाली महामार्गावर दिवे तेजाळले होते. डावीकडे खाली धरणाचे पाणी दिसत होते. रात्रीच्या भटकंतीची मजा वेगळी असते. वातावरण शांत आणि थंड असते आणि अंधारात खुलणारे त्या स्थळाचे सौंदर्य मन प्रसन्न करते. असे असले तरी आता मात्र सगळ्यांना सपाटून भूक लागली होती. सकाळी भाकरी बांधून बरोबर घेतल्या होत्या. आज मराठे सरांचा वाढदिवस असल्यामुळे ढाब्यावर गरमागरम जेवून तो साजरा करायला सगळेच उत्सुक होतो. उत्तम जेवणानंतर कडक चहा पिऊन थर्मासमध्ये भरुनही घेतला आणि तडक थाळनेर मुक्कामाकडे कूच केले. गुडुप्प अंधारात रात्री अकराच्या सुमारास थाळनेरला पोहोचलो. तापी नदीच्या काठी निसर्गरम्य ठिकाणी हा किल्ला आहे. वाटेत गावकऱ्यांना विचारुन शंभू महादेवाचे देऊळ गाठले. गाभाऱ्यात शंकर बंदिस्त असले तरी गुळगुळीत लादी असलेला स्वच्छ आणि प्रशस्त सभामंडप आमच्यासाठी खुला होता. बाजूला वाहणाऱ्या तापी नदीची सोबत आणि झाडी असलेले हिरवेगार आवार; मस्त झोप लागली.

          पहाटे पुजारी बुवांच्या घंटानादानी आणि करड्या आवाजातील, 'ॐ जय जय भोलेनाथ' च्या गजरानी सगळ्यांच्या झोपा खाड्कन उघडल्या. त्वरेने उठून स्लिपिंग बॕग गुंडाळल्या आणि गरमागरम चहा पिऊन किल्ल्यावर जाण्यासाठी सज्ज झालो. अजून फटफटत होते पण वर पोहोचेपर्यंत सूर्यनारायणाचे आगमन होईलच; 'अरे हा तर वरपर्यंत गाडीरस्ता दिसतोय' जरा काळजीपूर्वक चालवली तर गाडी जाऊ शकेल; संजीव आणि अनिल जाऊन गाडी घेऊन आले. तोपर्यंत आम्हीही चालत वर पोहोचलो. इ.स.११२८ मध्ये जिवाजी आणि गोवाजी या गवळी अहीर कुटुंबाकडे थाळनेरचा ताबा होता. इ.स. १६०० मध्ये हा किल्ला अकबराच्या ताब्यात गेला. त्यावेळी सूरत-बु-हाणपूर मार्गावरील हा एक भरभराटीला आलेला व महत्त्वाचा गड होता. 
किल्ल्यावर बघण्यासारखे फार काही नसले तरी गावातील जमादार वाडा ही अतिशय देखणी वास्तू आहे. तसेच दहा कबरींपैकी अष्टकोनी कबरही वेगळी आहे. परंतु आधी याबद्दल न कळल्याने या वास्तूंना भेटी देऊ शकलो नाही.
मात्र किल्ल्याचे अवशेष न जपता संपूर्ण सपाटीकरण सुरू आहे ही बाब अस्वस्थ करते.

१९. थाळनेर किल्ल्यावरुन

पठारावरील विहिरीवर मोटेसारखी व्यवस्था व पाइपचे तुकडे दिसले. एका ठिकाणी एक छोटेखानी मंदिरासारखी वास्तू होती. पण आत कोणतीच मूर्ती नव्हती. किल्ल्यावरून खाली बघता विस्तीर्ण पात्र असलेली तापी नदी आणि रमणीय सूर्योदय बघून मन प्रसन्न झाले.

२०. तापी नदी
थाळनेर कडून आम्ही चौगाव कडे निघालो. वाटेत गरमागरम मिसळ व कांदे पोहे असा नाश्ता मिळाला. बरोबर आणलेले चीज- ब्रेड- बटर हेही चहाबरोबर खाल्ले. ताजे तळलेले केळ्याचे वेफर्सही सगळ्यांनी घरी नेण्यासाठी घेतले.

२१. चौगावच्या किल्ल्यावारुन पाहणी

चौगाव किल्ल्याची उंची ६६० मीटर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी त्रिवेणी संगम आहे व एक मंदिरही आहे.

२२. भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती

तिथे घेऊन जाणारा रस्ता कच्चा आहे. किल्ल्याच्या दिशेचा अंदाज घेऊन जात राहिलो. कारण मातीमध्ये रस्ता, पायवाट असे काहीच स्पष्ट दिसत नव्हते. वाटेतही कोणी वाटसरु नव्हते. जंगल आणि परिसर मात्र सुंदर होता. आता मंदिर दृष्टिपथात आले. तिथे मराठ्यांना वनखात्याची माणसे भेटली. त्यांच्यापैकी एक जण आमच्याबरोबर किल्ला दाखवायला आले. वाट तशी सोपी आहे.अर्ध्या तासात वर पोहोचलो. तटबंदीचे अवशेष दुरूनही लक्ष वेधून घेत होते. पाण्याचे टाके मोठे आहे. त्या टाक्याच्या बाजूनी एक भुयारी मार्ग निघतो आणि साधारण ६ किमी दूर असलेल्या लासूर पर्यंत जातो. इथेही मंदिर नाही, परंतु काही मूर्ती मात्र मांडलेल्या होत्या. भव्य प्रासादाच्या भिंती व आतील काही बांधकाम या किल्ल्याच्या प्राचीन वैभवाची साक्ष देतात. या प्रासादातून बाहेर पडून घसरणीची पायवाट उतरून गेल्यावर किल्ल्याचा दरवाजा बघायला मिळतो.

२३. चौगावच्या किल्ल्यावरील द्वारपाल

मग परतीच्या वाटेवर मुख्य प्रवेशद्वारापाशीही फोटो काढले आणि खाली आल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी प्राचीन मंदिर शोधायला बांधा-बांधावरून चालत जाऊन आलो. बरेच पुढे जाऊनही मंदिर काही दिसेना. ते मंदिर बहुतेक समोरच्या टेकाडावर असावे असा अंदाज करून परत फिरलो. मग थोडा फलाहार घेऊन गाडीत बसलो. गाडीमध्ये गुळाच्या पोळ्या आणि भेळ अशा खमंग पदार्थांचा आस्वाद घेतला.

२४. पारोळ्याचा भुईकोट

पारोळ्याचा किल्ला मुख्य बाजारात आहे. चौरसाकार तटबंदी असून किल्ल्याच्या आत गाडी जाते. पूर्वी किल्ल्याच्या आत पोलीस चौकी होती. या पारोळ्याच्या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व म्हणजे या किल्ल्यात झाशीच्या राणीचा जन्म झाला होता. इ.स. १७२७ मध्ये हरी सदाशिव दामोदर यांनी हा किल्ला बांधला. इ.स. १८२१ मध्ये तो इंग्रजांनी हस्तगत केला. किल्ल्याच्या चारी बाजूंना खंदक आहे. तटबंदीच्या बाजूला बांधलेल्या मोठ्या तलावातून त्यात पाणी सोडलेले आहे. अशा तऱ्हेने हा भुईकोट बळकट केलेला होता.

२५. प्रवेशद्वार

प्रवेश द्वाराजवळ नागेश्वर महादेवाचे मंदिर आहे. किल्ल्याचे बुरुज, तटबंदी, ब्रिटिशांनी बांधलेल्या बॕरॕक्‍स, कमानी, वाड्यांचे अवशेष असे बरेच बांधकाम चांगल्या स्थितीत. या किल्ल्याची सफाई करून इथे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे करण्यासाठी नगरपालिकेने तसेच नागरिकांनीही पुढाकार घेतला पाहिजे. तसेच या किल्ल्यात झाशीच्या राणीचे भव्य स्मारक बांधून, त्याला जोडून एक कलादालन तयार करून त्यात १८५७ च्या समर प्रसंगाची चित्रे लावून सुशोभित केल्यास या अप्रतिम दुर्ग पर्यटनाचे सार्थक होईल.


२६. वैभवशाली भूतकाळाचे साक्षीदार

मुंबई-आग्रा महामार्गाला लागूनच धुळे येथे लळिंग किल्ला आहे. या मार्गावरून झोकदार वळण घेत गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी साधारण सुरक्षित ठिकाणी लावून आणि पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन झपाट्याने किल्ल्याच्या दिशेने निघालो. आमच्या तीन दिवसांच्या भटकंतीमधला लळिंग हा दहावा किल्ला होता.

२७. मावळतीचे रंग- किल्ले लळिंग

संध्याकाळी पाचची वेळ होती. उतरायला हमखास अंधार होणार होता. आणि आम्हाला तर गुप्त दरवाजाच्या थोड्या अवघड वाटेने उतरायचे होते; बघू काय काय जमतंय ते. चालता-चालताच फोटो घेत जाऊ लागलो. वाटेत आम्हाला एक कुटुंब भेटले; नवरा बायको आणि ८-१० वर्षांचा एक मुलगा, मुलगा गतिमंद होता. त्याला घेऊन हे जोडपे किल्ले बघायला निघाले होते. कोणकोणते किल्ले बघायचे ही चर्चा झाली आणि त्यांच्याबरोबर एक फोटो काढून पुढे निघालो. पीर बाबाचा दर्गा आला. इथून किल्ल्याची वाट उजवीकडे वळते. प्रवेशद्वार सुस्थितीत नसले तरी गडाची तटबंदी, दारुकोठार इत्यादी बांधकाम बरेच चांगले आहे.

२८, २९. लळिंगवरील बांधकाम

सूर्यास्ताची वेळ होती. त्या कलत्या सूर्य नारायणाच्या साक्षीने किल्ला फिरताना इतिहासाच्या बऱ्याच पाऊल खुणा दिसत होत्या. ललिता मातेला नमन करून प्रार्थना केली. बालेकिल्ला, पाण्याची टाकी वगैरे बघितले. गुहाही बघायला मिळाल्या. ललिता मातेच्या मंदिराच्या पुढेही काही मूर्ती मोकळ्या नभाखाली ध्यानस्थ होत्या. त्यानंतर गुप्त दरवाजाने परत निघालो. वाट जराशी कठीण होती. वाटेत देवीचे छोटे देऊळ आहे. या दरवाजाने खाली उतरलो तर काळी मशीद संधिप्रकाशात धूसर दिसत होती.

३०. काळी मशीद

इथे गाळण्यावर भेटलेले रॉक हार्ट्स चे ट्रेकर्स पुन्हा भेटले. आज ते किल्ल्यावर जात होते आणि आम्ही किल्ला बघून निघालो होतो. काळजीपूर्वक जा, कारण अंधार झाला आहे, तुमच्याजवळ टॉर्च वगैरे आहेत ना, कोणकोणते किल्ले बघितले इत्यादी बोलून त्यांचा निरोप घेतला. वैशालीनी आम्हा सगळ्यांचे मनोगत विचारून त्याचे चलतचित्रण केले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तीन दिवसांमध्ये दहा किल्ले बघितल्याचा ओसंडून वाहणारा आनंद तर हा शेवटचा किल्ला, आता ट्रेक संपला यामुळे काहीसे कातर अभाव यांच्या संमिश्र छटा होत्या. हे सर्व प्रत्येकाच्या बोलण्यातून व्यक्त झाले. लळिंग बघून खाली उतरेपर्यंत गडद काळोख झाला होता. गावातील हेमाडपंती मंदिरांमध्ये शंकराचे दर्शन घेतले.

३१.लळिंगच्या पायथ्याचे मंदिर

संजीवनी सगळ्यांच्या सॕक नीट लावून वैशालीला मागच्या सीटवर जागा करुन दिली. आता जरा चालक बदल झाला. प्रथमच अनिलने गाडीचे चक्र हातात घेतले. आता सारेच जण थोडेसे सुस्तावले होते, सैलावले होते. विचारांची तंद्री लागली होती. इतक्यातच माझे रस्त्याच्या डावीकडच्या पाटीवर लक्ष गेले, 'झोडगे'; एकदम क्लिक झाले. आपल्याला झोडगेचे मंदिर बघायचे होते ना? मी विचारले सुदैवाने हायवेवरून डावीकडे गाडी वळवायला जागा मिळाली आणि मराठे सरांच्या दिशा दिग्दर्शनानी आम्ही झोडगेच्या मंदिरी पोहोचलो.

३२.झोडगे येथील प्राचीन मंदिर

मंदिराचे आवार प्रशस्त आणि स्वच्छ होते. चोहीकडे नीरव शांतता भरली होती. आवारात मोजकेच दिवे होते. ऐसपैस दगडी पायावर भव्य काळे पाषाण मंदिर होते. त्यावर दोन-तीन झाडांच्या फांद्यांची व पानांची हिरवी महिरप अतिशय विलोभनीय भासत होती. झाडाखाली विसावलेला नंदी मोठ्ठा होता. गोलाकार शिवपिंडीवर आभिषेक करणारा तांब्या टांगलेला होता.

३३. ॐ नमः शिवाय

मंदिराच्या छतावरील व खांबांवरील नक्षीकाम सुबक व देखणे होते. प्रदक्षिणा घालताना मंदिराच्या बाहेरील कोरीवकामही निरखून घेतले. वातावरणात एक गूढरम्य शांतता दाटली होती, जी हवीशी वाटत होती. देवाचिये द्वारी क्षणभर विसावून व देवाचे आशीर्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो.
आता पुन्हा एकदा संजीवनी चक्र हाती घेतले. गाडी सुसाट पळू लागली. चांदवडला जेवणासाठी एका मोठ्या उपहारगृहात उतरलो. पिठलं भाकरी वगैरे ऑर्डर दिली. मात्र ती मिळायला बराच वेळ मोडला; जेवण मात्र रुचकर होते वर चहाही झाला कारण ट्रेकमध्ये चहाला कधीच नाही म्हणायचे नसते, असा एक अलिखीत संकेत आहे. संजीवनी गाडी जी काही सुसाट पळवली त्याला खरंच 'मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे' याशिवाय दुसरी उपमा नाही.
आवडती गाणी वाजत असूनही सगळ्यांनाच झोपा अनावर झाल्या होत्या. घरून आईचा फोन आल्यामुळे जाग आली, नाहीतर ठाणे कधी आले ते कळलेही नसते. रात्री दीड वाजता आमच्या सॅक घेऊन सगळ्यांचा निरोप घेतला आणि मी आणि मराठे सर दहा मिनिटे चालत जाऊन स्वगृही परतलो.

३४. धुळे ट्रेकचा चमू

         

प्रतिक्रिया

जबरदस्त भटकंती झालीय, ओघवत्या लिखाणामुळे वाचायला मजा येतेय.

शशिकान्त पवार's picture

22 Mar 2018 - 5:49 pm | शशिकान्त पवार

लासूर म्हणजे तुम्ही माझ्या गावा जवळ गेले होते माझं गाव गणपूर आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Mar 2018 - 3:38 pm | अमरेंद्र बाहुबली

खूप छान भटकंती. धुळ्यात असून मिसळपाव माहीत नसल्याने बऱ्याच किल्ल्यांची माहिती खूप उशीरा कळाली. डेरमाळ च्या भैरवकड्या खाली असलेलं प्रतापपूर गाव माझं आजोळ. लहानपणापासून सुट्टीत आजोळी गेल्यावर तो कडा पाहत असायचो. त्यावर किल्ला आहे हे दुवीं मुळे आता कळाले. डेरमाळ आणी पिसोळं ला धुळ्याला घरी येईल तेव्हा जायचंय. तुमच्या लेखाची नक्कीच मदत होईल. धन्यवाद.