भेट

vikramaditya's picture
vikramaditya in जनातलं, मनातलं
8 Mar 2018 - 5:30 pm

जसा सूर्य मावळती कडे जाऊ लागला, तसा तो सावध झाला... एक अनामिक हुरहुर लागून राहिली आणि तो अस्वस्थ झाला. इकडे तिकडे एक नजर टाकून तो झाडावरून खाली उतरला .दिवस भर लोकांचा आणि रहदारीचा गोंधळ त्याला जीवघेणा वाटे. गल्लीतील अंधाराला कापत तो स्टेशनच्या दिशेने निघाला. कोणीतरी ओळखीचे भेटेल आणि काही अप्रिय विषय निघतील ह्या भीतीने तो लोकांची नजर चुकवत पायऱ्या चढु लागला.
गर्दीला चुकवत तो शेवटच्या प्लॅटफॉर्म कडे निघाला. नेहेमीच्या प्लॅटफॉर्मच्या पायऱ्या उररताना त्याला हायसे वाटले. आता कोणी आडवे येणार नाही ह्याची त्याला खात्री होती. जिना उतरून तो आता त्याच्या नेहेमीच्या बेंच कडे निघाला. रुमालाने बेंच झटकून तो त्यावर बसला. प्लॅटफॉर्म वरील घड्याळाकडे त्याने एक नजर टाकली. आत्ता कुठे ७ वाजत होते. "सिम्रन तर ७,१५ ला येणार", तो स्वतःशी पुटपुटला. रोज लवकर येऊन तिची वाट बघणे त्याला असह्य होई. पण आता हा रोजचा दिनक्रम झाला होता.
१५ मिनिटे त्याला युगांयुगां सारखी वाटली. तेवढ्यात त्याच्या समोर बसलेला काळा कुत्रा सावध झाला आणि त्याने कान टवकारले. म्हणजे सिम्रन येतच असणार. ती त्याला जिन्यावर दिसली. पहिली पायरी उतरण्यापूर्वी तिने त्याला हात हलवून स्मित केले. आता ती पायऱ्या उतरू लागली. काळू उठून तिच्या दिशेने गेला. सिम्रन रोजच्या प्रमाणे त्याच्याशी काहीतरी बोलत होती. तो ही प्रेमाने शेपटी हलवत तिच्या जवळ घोटाळत होता.

शेवटी एकदाची ती जवळ आली आणि बाकावर बसली. त्याच्या कडे बघून गोड हसली व म्हणाली ," आज पण लवकरच आलास ना? राज, तू म्हणजे मुलखाचा उतावीळ!" दिलवाले दुल्हनिया ... बघितल्यापासून ते एकमेकाला राज आणि सिम्रन म्हणत. " अरे, मला यायला उशीर होतो रे... पण तू मात्र लवकरच येतोस .. " ती लटक्या रागाने म्हणाली.

तिने त्याचा हाथ धरला आणि काही काळ ते तसेच बसून राहिले. " मग काय ठरले? तू बोललास का घरी?" तिने विचारले. तो दचकला. जणु ह्याच प्रश्नाची वाट पाहत होता. त्याने घड्याळाकडे बघितले. ७. २० झाले होते. त्याची जीभ जड झाली. " मी...मी...", काय बोलावे त्याला कळेना. " अरे, बोल काय ते... माझ्या मनाची तयारी आहे...." ती म्हणाली.

" अग , घरचे तयार नाहीत. त्यांना परजातीतली मुलगी नको. येत्या रविवारी माझा साखरपुडा पण ठरवलाय." त्याने मनातील मळमळ ओकली. तिने आपल्या भावना चेहऱ्यावर दिसु दिल्या नाहीत.

तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले आणि तशीच बसुन राहिली. काही वेळाने तिने त्याच्या डोळ्यात खोल पाहिले आणि एक अंदाज घेतला. त्याने परत घड्याळाकडे बघितले. ७,२५ झाले होते. तेवढ्यात लांबून एक पोलीस हवालदार त्यांच्या दिशेने येताना दिसला. आता हा काय त्रास म्हणून त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या. सिम्रन मात्र आपल्याच विचारात गढून गेली होती. तो हवालदार चालत आला आणि त्यांच्या कडे रोखून पाहू लागला.
तेवढ्यात रेल्वेची अनाउन्समेंट झाली कि सुपर फास्ट एक्सप्रेस लवकरच पास होणार आहे त्या मुळे सर्वांनी प्लॅटफॉर्म पासून दूर राहावे. पोलिसाने आपला विचार बदलला आणी तो दुसऱ्या दिशेने चालत निघून गेला.

त्याने घड्याळाकडे परत बघितले. ७.२९ झाले होते. आता मात्र त्याच्या हृदयाची धडधड वाढली. छातीवर प्रचंड दडपण येऊन छाती फुटते कि काय असे त्याला वाटू लागले.
सिम्रन त्याच्या कडे एकटक बघत होती.

काही क्षणातच प्लॅटफॉर्म ला सूक्ष्म हादरे बसू लागले आणि गाडी अगदी जवळ येऊन ठेपल्याचे त्याला कळले. सिम्रनने त्याचा हात हातात घेतला आणि हळूच दाबला. गाडी स्टेशनच्या आत शिरली. क्षणार्धात सिमरन उठली आणि प्लॅटफॉर्म च्या कडेला गेली. तोही तिच्या मागे धावला. पण तोवर उशीर झाला. सिम्रनने रुळांवर उडी घेतली होती. मागचा पुढचा विचार न करता त्यानेही खाली उडी मारली.
क्षणार्धात गाडी त्यांना उडवून निघून गेली आणि बेंच वर रक्ताचा सडा उडाला.

काही मिनिटे गेली , त्याने डोळे उघडले. सिम्रन शेजारीच बसली होती. तिच्या कपाळावर एक खोक होती व त्यातून भळाभळा रक्त वाहत होते. त्याने स्वतःकडे पाहिले. त्याच्या छातीचा पिंजरा फुटला होता. सिम्रनने एक क्षीण स्मित केले आणि ती जायला निघाली. त्याने काही बोलायचा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. ती सरळ जिन्याच्या दिशेने चालत गेली, मागे ना वळून बघता. काळू कुत्रा ही शेपटी हलवत तिच्या मागे जात होता. ती संपूर्ण जिना चढली , शेवटच्या पायरीवर थांबून तिने वळून पाहिले आणि उद्या भेटू अशी खूण केली. त्याला हायसे वाटले.

काही वेळाने तोही उठला आणि स्टेशन बाहेर आला. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि तो एखाद्या निवांत झाडाच्या शोधात निघाला. "जेमतेम २४ तास तर आहेत, उद्या भेट होईलच की.... " , तो स्वतःशीच पुटपुटला.

कथा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

8 Mar 2018 - 5:54 pm | प्रचेतस

अगदी ह्याच आशयाची जव्हेरगंज ह्यांची infinity ही कथा वाचली होती.