*‘तो’ परत येईल...*

महामाया's picture
महामाया in जनातलं, मनातलं
5 Mar 2018 - 7:14 pm

हॉलीवुडच्या नायिकेचा आशावाद

नवरा कसाहि असला तरी त्याच्याच सोबत आपलं संपूर्ण आयुष्य काढण्याची भाषा करणारी बायको, फक्त भारतीय चित्रपटांमधेच नव्हे, तर हॉलीवुडच्या चित्रपटांमधे सुद्धा नायिकांनी रंगवली आहे. नवरा बाहेरच्या बाईच्या नादी लागला तरी त्याची सेवा करून त्याला वठणीवर आणण्याची भाषा देखील प्रसंगी नायिका करतांना दिसतात. नवरा किती ही वाईट असला तरी आपल्या चित्रपटांचा शेवट मात्र गोड होतो. हॉलीवुडचं वेगळेपण इथेच ठळकपणे नजरेत भरतं.

1960 सालचा एमजीएमचा (मेट्रो गोल्डविन मेयर) चित्रपट होता-‘बटरफील्ड 8.’ त्याची कहाणी थोडक्यात अशी होती-ग्लाेरिया वॉन्डरस Gloria Wandrous (एलिझाबेथ टेलर) एक हाईप्राइज्ड कॉलगर्ल असून ती दिवसा मॉडेल तर रात्री कॉलगर्ल अशा दुहेरी भूमिकेत सोसायटीत वावरते. मनापासून मात्र तिला या कामाचा तिटकारा असून यामधून तिला बाहेर निघावंसं वाटत असतं. तिचं वेस्टन लिजिट Weston Liggett (लॉरेन्स हार्वे) वर प्रेम जडतं, त्या सोबत ती आपल्या सुखद भविष्याची स्वप्नं रंगवू लागते...पण ‘तो’ शादीशुदा असतो. त्याची बायको एमिली लिजिट (डिना मेरिल Dina Merrill) लक्षाधीश...तो तिचा नोकर...पण तो तिच्या श्रीमंतीचा पुरेपूर उपभोग घेत असतो. ग्लाेरिया जेव्हां त्याच्या बायकोला बघते, तेव्हां तिला पश्चाताप होतो. अाता ग्लोरिया त्याला टाळते...भेटण्यास नकार देते...(उद्देश्य एकच की ‘त्याने’ ग्लोरिया ला विसरून जावे.) पण ‘त्याचा’ गैरसमज होतो. तो ग्लोरिया ला टाकून बाेलतो व रागाच्या भरात निघून जातो. नंतर आपली चूक लक्षात आल्यावर तो ग्लोरियाला शोधून काढतो व दोघं या जगापासून कुठेतरी दूर जाण्यासाठी निघतात. पण ग्लोरियाचं मन यासाठी मुळीच तयार नसतं. मधेच ती त्याला चुकवून कार घेऊन एकटीच भरधाव निघते, तो तिच्या मागे दुसरी कार घेऊन निघतो तिला थांबवायला...वाटेत झालेल्या अपघातात ग्लोरियाचा करुणांत होतो. तेव्हां त्याला ग्लोरियाच्या त्यागाची, प्रेमाची महती कळते...

शेवटच्या दृश्यांत ‘तो’ आपली पत्नी, तिची संपत्ती...हे सर्व सोडून दूर निघून जातो...स्वत:च्या अस्तित्वाच्या शाेधांत...जणू ग्लोरिया त्याला जगण्याचा कानमंत्र देऊन जाते...

एमिलीचा आशावाद...

जॉन ओ हारा च्या 1935 मधील कादंबरीवर आधारित ‘बटरफील्ड 8’ चा दिग्दर्शक होता डेनियल मान. या चित्रपटांतील एक दृश्य आठवणीत कायम घर करुन आहे. ग्लोरिया च्या प्रेमात पडल्यानंतर ‘तो’ बरेच दिवस घरी येत नाही. घरी त्याची बायको एमिली त्याची वाट बघत असते. अशाच एका रात्री एमिली आणि तिची आई असा माय-लेकींचा संवाद घडतो. एमिली ची आई म्हणते-‘...तो फार माजलेला दिसतोय...तुझ्याकडे तो अजिबात लक्ष देत नाहीये...ऑफिसमधे देखील क्वचित येतो...!’ एमिली उत्तरते-‘असेल त्याचं काही खासगी काम...’ यावर आई विचारते-‘आज आठवडा झाला तरी त्याचा पत्ता नाही...खरं सांग बघूं- तो एका दुसरयाच मुलीचा नादी लागलाय, हे खरं आहे ना...? हे बघ...तुझ्या जवळ पैसा आहे...तू समर्थ आहेस...त्याला सोडून कां देत नाहीस...तुला याच्या हून चांगला दुसरा भेटेल एखादा...ज्याला तुझी किंमत नाही, तू त्याच्या करितां इतकं मनाला कशाला लावून घेतेस...?’ इतक्या जिव्हाळयानं आईने केलेल्या उपदेशाकडे दुर्लक्ष करीत एमिली म्हणते-‘असं काही नाहीये मम्मी..., काही अडचण असेल त्याची म्हणूनच नाही येऊ शकला ‘तो’...तू त्याच्याबद्दल असे काही विचारसुद्धा मनांत आणूं नकोस...अगं तो फार गुणी आहे, उगीच नाही तो मला आवडला...तुझ्या म्हणण्या प्रमाणे जर ‘तो’ खरंच वाहवत चालला असेल, तरी माझा विश्वास आहे नाही मला खात्री आहे की तो माझ्यासाठी नक्की परत येईल...मग मात्र मी त्याला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही...’ एमिलीची आई तिच्या त्या आत्मविश्वासानं भरलेल्या करारी मुद्रेकडे कौतुकाने बघतच राहते...

‘बटरफील्ड 8’ मधील सोसायटीत वावरतांना मॉडेल, कॉलगर्लच्या रूपातील एलिझाबेथ टेलरच्या विविध छटा मोहक होत्या, तसंच रात्री उशिरा घरी परत आल्यावर आपल्या स्वत:च्यसा अपार्टमेंट मधील भयाण शांततेत जीव गुदमरतो म्हणून शेजारच्या आपल्या मित्राकडे (एडी फिशर) रात्र घालवतांना त्याच्या घरातील सोफ्यावर झोपलेली तिची ती प्रसन्न, शांत मुद्रा देखील तितकीच मोहक. खरे तर हा सर्वस्वी एलिझाबेथ टेलरचाच चित्रपट होता. (ग्लोरियाच्या भूमिकेसाठी तिला ऑस्कर देखील मिळालं.) पण ‘त्या’ एका दृश्यातील आपल्या आशावादामुळे एमिली ग्लोरियावर मात करते...

लिज ला तीनदा हुलकावणी दिली ऑस्कर ने

1950 च्या दशकात एलिजाबेथ टेलर नावाजलेली कलाकार होती. तिचे चित्रपट बॉक्स ऑफिस वर हिट तर होतेच, तिला तीन सलग एकेडमी एवार्ड नामिनेशन मिळाले होते. चित्रपट होते-रेन ट्री कंट्री (1957), कैट ऑन अ हॉट टिन रूफ (1958) आणि सडनली, लास्ट समर (1959). आिण 1960 सालच्या ‘बटरफील्ड 8’ साठी तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा मान तिच्या पदरांत पडलाच की.

खालील लिंक बघा

https://youtu.be/DBWT6gXi9gg

https://youtu.be/nSaSkMp7-X8

वावरलेख

प्रतिक्रिया

पैसा's picture

5 Mar 2018 - 9:10 pm | पैसा

सिनेमा बघायला हवा.

दुर्गविहारी's picture

5 Mar 2018 - 10:44 pm | दुर्गविहारी

वा ! सिनेमा बघण्याची उत्सुकता वाढली.

सिरुसेरि's picture

6 Mar 2018 - 10:25 am | सिरुसेरि

छान . वेलकम बॅक .

चांदणे संदीप's picture

6 Mar 2018 - 2:06 pm | चांदणे संदीप

+१

लिहीत राहा.

पुलेशु.

Sandy

लौंगी मिरची's picture

7 Mar 2018 - 12:30 am | लौंगी मिरची

उत्तम मांडणी , लिंक्स बद्दल धन्यवाद .

खटपट्या's picture

7 Mar 2018 - 1:09 am | खटपट्या

क्रुष्णधवल आहे की रंगीत?

महामाया's picture

7 Mar 2018 - 6:23 pm | महामाया

1960 चा चित्रपट असून रंगीत आहे...

उत्स्फूर्त प्रतिक्रिये बद्दल आपण सर्वांचे आभार...