कणेरीमठ येथील सिद्धगिरी ग्राम संग्रहालय - ग्रामीण जीवनाची अनुभूती

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in भटकंती
5 Mar 2018 - 3:37 pm

मी सध्या नोकरीच्या निमित्ताने मुंबईकर झाले असले तरी मूळची कोल्हापूरकर आहे. नुकत्याच फेब्रुवारी महिन्यातील लागून आलेल्या सुट्यांचे सार्थक करण्याकरीता सासरी सडोलीला (ता.करवीर) गेले होते. त्यामध्ये एक दिवस सहकुटुंब कणेरीमठ येथील संग्रहालय पाहण्याचा बेत आखला. कणेरीमठ कोल्हापूरपासून जुना पुणे- बेंगलोर हायवेवर उजवीकडे 12-13 कि.मि. वर आहे. कणेरीमठला जायला बस सुविधा आहेत. आम्ही खाजगी गाडीने कोल्हापूरवरुन अर्ध्या तासात पोहोचलो. येथे प्राचीन काळातील भारतीय संस्कृतीचे दर्शन पुतळ्यांद्वारे उभारले गेले आहे. प्रवेश फी 150 रु. प्रति व्यक्ती असली तरी संग्रहालय पाहून झाल्यावर पैसै वसूल झाल्याचे समाधान मिळते. प्राचीन काळातील ज्ञानी ऋषी-मुनींचे कार्य देखाव्यांच्या रुपात पाहून आपण थक्क होऊन जातो. प्रत्येक देखाव्यासोबतच त्या ऋषींच्या कार्याची माहितीदेखील असल्याने अनेक अजात गोष्टींचे ज्ञान होऊन आपण अचंबित होऊन जातो. देखावे पाहताना त्यातील पुतळे अक्षरश: खरे वाटावेत इतके जिवंत वाटतात. याबद्द्ल आपसूकच आपण पुतळा साकारणाऱ्या कलाकारांना दाद देऊन जातो. बऱ्याचदा आपण पुतळ्याला खरा माणूस किंवा प्राणी समजून फसतो इतके हे देखावे सजीव आहेत. कापडावर पडणाऱ्या चुण्या, वाऱ्याने हलणारी कापडे, केस, डो्ळयातले भाव अगदी हुबेहूब साकारले आहेत. बाराबलुतेदारांची घरे त्याकाळात कशी दिसत असतील हे प्रत्येक घर पाहताना जाणवते व नकळतच आपण त्या जुन्या काळात जाऊन पोचतो. कुंभार, लोहार, कोळी, सोनार अशा प्रत्येक बारा बलुतेदाराचे घर साकारताना खूप बारीक सारीक विचार केला गेला आहे. या संग्रहालयाबरोबरच बारा राशींची शिल्पे, महादेवाचे मोठे मंदीर, मायानगरी(आरसामहल) व आता हॉरर म्युझियम देखील झाले आहे. 7D हॉरर शो साठी 12 माणसांची गरज असते. आम्ही तेवढेजण नव्हतो त्यामुळे तो ऑप्शन कट केला. पण मायानगरी आरसेमहाल चुकवू नये. वैज्ञानिक आधारावर वेगवेगळे प्रयोग येथे केले आहेत. आरशाचे वेगवेगळे प्रकार येथे पाहता येतात. बच्चे कंपनी येथे धमाल करते. येथे खादी भंडार असून उत्तम दर्जाच्या साड्या अत्यंत स्वस्त किंमतीत मिळतात. अगदी मुंबईपेक्षा!मी येेेथे 2 साड्या व 2 कुर्ते घेतले. येथे खाण्यापिण्याची सोय उत्तम आहे. संग्रहालयाच्या पायथ्याशी सिद्धगिरी मॉल आहे. येथून आपण खादी व सेंद्रीय उत्पादनांची खरेदी करु शकतो. एकूणच एकदा अवश्य भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. कुटुबासमवेत मजेत वेळ जातो व वेगळे काही पाहिल्याचे समाधान मिळते.
टीप - खूप मोठ्या परिसरात हे संग्रहालय वसलेले असून पायी चालत जावे लागते. पायाचा प्रचंड व्यायाम होतो. तथापि जागोजागी बसण्याची व्यवस्था केली आहे. संग्राहालय तसेच इतर ठिकाणे पाहण्यात 3-4 तास सहज जातात. शक्यतो सकाळी लवकर पोहोचून संग्रहालय पाहून घ्यावे म्हणजे उन्हाचा त्रास होणार नाही. आम्ही काढलेले काही तसेच Google Images वरुन घेतलेले काही फोटो टाकत आहे.

प्रतिक्रिया

पैसा's picture

5 Mar 2018 - 5:36 pm | पैसा

छान लिहिलंय. पण फोटो हवेत.

श्वेता२४'s picture

5 Mar 2018 - 6:03 pm | श्वेता२४

माफ करा. जमत नाहीय. मी खुप प्रयत्न केला पण सगळी प्रक्रीया खूप किचकट आहे. मिपा वर थेट Brows मधून आपल्याकडे सेव्ह केलेले फोटो टाकण्याची सोय हवी होती. आता लेखन प्रकाशित झाल्यावर फोटो टाकता येतील का?

पैसा's picture

5 Mar 2018 - 8:15 pm | पैसा

http://www.misalpav.com/node/13573
http://www.misalpav.com/node/33685
तरी जमले नाही तर साहित्य संपादक मदत करतील. तुमचे फोटो फेसबुक किंवा गूगल किंवा फ्लिकर कुठे असतील त्या अल्बम ची लिंक इथे देऊन ठेवा. फोटोना पब्लिक शेअर करावे लागेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Mar 2018 - 1:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

लिंक चुकीची आहे. खालील संदेश येत आहे.

404. That’s an error.

The requested URL was not found on this server. That’s all we know.

एक तर लिंक चुकीची आहे किंवा अल्बमला पब्लिक अ‍ॅक्सेस दिलेला नाही.

खरोखरच पाहण्यासाठी अतिशय सुंदर, कोल्हापूरा पासून खूपच जवळ आहे, सुट्टीच्या दिवशी खुपच गर्दी असते,

राहुल करंजे's picture

18 Mar 2018 - 10:41 pm | राहुल करंजे

फोटो टाकायची पद्धत कशी आहे, जरा समजाऊन सांगा, मलाही नेपाळ ट्रीपचे वर्णन द्यायचे आहेत पण फोटो कसे अपलोड करायचे??

श्वेता२४'s picture

19 Mar 2018 - 5:22 pm | श्वेता२४

खूप किचकट पद्धत आहे. मदत पानावर याची सविस्तर माहिती दिली असली तरी संगणकातून, भ्रमणध्वनी द्वारे थेट आपल्याला फोटो टाकणे शक्य व्हावे असे सॉफ्टवेअर मि.पा. करांनी का उपलब्ध करुन दिले नाही याचे आश्चर्य वाटते.

गम्मत-जम्मत's picture

20 Mar 2018 - 11:55 am | गम्मत-जम्मत

Me pan 2 da jaaun aale kaneri mathat. Khup ch chhan prakalp ahe. Ani bail , gaayi ityadi janavare tar itki hubehub banavli aahet ki mazya sasryana patat ch navat te khare nahit!!

तुम्ही दिलेली माहिती उपयुक्त आहे.