मराठी भाषा दिन विशेषांकातील माझा लेख

आदिजोशी's picture
आदिजोशी in जनातलं, मनातलं
5 Mar 2018 - 12:58 pm

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने 'झी युवा' ह्या साप्ताहिकाने विशेषांक काढला होता. त्यात सोशल मिडिया आणि युवा पिढीची मराठी ह्या विषयावर लेख लिहायची मला संधी मिळाली. तो लेख इथे देत आहे. कार्यबाहुल्यामुळे लेख टाकायला उशीरच झाला आहे. तरी, ह्या विषयाची जाण येण्यासाठी माझा मराठी ब्लॉग्स, संस्थाळं, फेसबुक कट्टे ह्यावरील वावर आणि प्रामुख्याने मिपावरील आमचे सुवर्णदिन फार्फार महत्वाचे ठरले आहेत.

--------------------------------------------

MYबोली मराठी

सद्ध्या महाराष्ट्रात आणि एकुणातच मराठीची परिस्थिती ही बर्‍याच जणांसाठी सांप्रत समयी घनघोर समस्य आहे.

नवी पिढी मराठीत बोलत नाही, रोजच्या जगण्यातून आणि व्यवहारातून मराठी हद्दपार होत आहे अशी ओरड सुरु आहे. आणि ही ओरड मराठीतच सुरु आहे. पण खरंच तशी परिस्थिती आहे का? काही वर्षांपूर्वी थोड्याफार प्रमाणात होती. आणि आता बर्‍याच प्रमाणात नाही. पण हे जे काही मागच्या काही वर्षात होतं ते मराठी माणसाच्या मराठी विषयीच्या आटत चाललेल्या किंवा पातळ होत असलेल्या मायेमुळे नव्हे.

सामान्यपणे व्यक्त व्हायला गरज असते माध्यमाची आणि पूर्वी ती फारच कमी प्रमाणात उपलब्ध होती. म्हणजे एखाद्याला काही लिखाण करायचं असेल तर डायरी, कवितांची वही ह्या पलिकडे शक्यता नसायची. जगापर्यंत पोचायचं तर काही मासिकं आणि वाचकांचा पत्रव्यवहार हीच साधनं होती, पण ती ०.०१ लोकांनाही सहज उपलब्ध नव्हती. स्वतःला वेगवेगळ्याप्रकारे सिद्ध करून, खपेल असं लिखाण करून, प्रकाशकाच्या नाकदुर्‍या काढून, पुस्तक विकले जाण्यासाठी नवस बोलून लेखक होणे ही प्रक्रिया अतिप्रचंड वेळखाऊ आहे.

पण काही काळापूर्वी क्रांती झाली. संवाद माध्यमांची क्रांती. आंतरजालाने केवळ माहितीचा रूक्ष स्त्रोत हे स्वतःचे रुपडे पालटून मनोरंजनाचे साधन हा अवतार धारण केल्यापासून लोकांना व्यक्त होण्यासाठी विविध माध्यमं उपलब्ध झाली. त्यात भर पडली फोनेटिक युनिकोड फाँट्सची. इंग्रजी किबोर्ड वापरून मराठी अक्षरं उमटायला लागल्यावर लोकांच्या प्रतिभेला अक्षरशः नवा बहर आला.

पूर्वी आंतरजालाची भाषा जी मुख्यत्वे इंग्रजी होती ती आता प्रत्येकासाठी वेगळी झाली. सोशल मिडियाने केवळ लोकांना एकत्रच आणले नाही तर त्यांना त्यांच्या भाषेत संवाद साधायचाही पर्याय दिला. आणि हे झाल्यावर जनता सुटलीच. जगाच्या कानाकोपर्यात वसलेल्या मराठी जनांना ह्या www ने मराठी भाषेच्या झेंड्याखाली पुन्हा एकत्र आणलं.

ह्या जगात वावरणारी लोकं बघितली, नवी पिढी अथवा जुनी, तर एक गोष्ट सहज लक्षात येते की इथे मराठी माणूस मुख्यत्वे मराठीतच व्यक्त होतो. अनेक संस्थाळं, ब्लॉग्स, फेसबुक पेजेस ह्यांनी मराठी माणसाला मराठीतून संवाद साधायला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. लोकांना व्यक्त व्हायला आणि त्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोचवायला नवी माध्यमं उपलब्ध झाली. आता एखाद्याला त्याची कथा, कविता, संपादकांकडून साभार परत यायची धाकधूक न बाळगता आपल्या फेसबुक पेज, ब्लॉगवर लगेचच टाकता यायला लागली.

अनेक वर्षांनी माळे साफ करताना एखादी जुनी वही सापडून साक्षात्कार व्हायचा 'अरे, आपली आई किती छान कविता करायची'. मराठीत अशा उत्तम लेखक, कवयित्री असलेल्या अनेक जणी आहेत. पण हे त्यावेळी स्वतःपुरतं मर्यादीत होतं कारण दुसरा पर्यायच नव्हता. मासिकं आणि पेपरवाले तरी कुणाकुणाचं आणि किती छापणार? साहित्य सेवा करायचा उदात्त हेतू असला तरी आर्थिक गणित जुळवताना नवोदितांपेक्षा प्रस्थापितांना झुकतं माप मिळणं स्वाभाविकच होतं. क्षमता असूनही संधी न मिळालेले अनेक लेखक आणि त्यांच्या लिखाणाला डायरीतून बाहेर काढायला ही क्रांतीच कारणीभूत आहे.

महत्त्वाचं म्हणजे 'राजहंसाचे चालणे जगी झालीया शहाणे, म्हणोनी काय कवणे चालोची नये?' ह्याप्रमाणे प्रत्येकालाच उत्तम लेखक होता येत नसले तरी व्यक्त होणे ही प्रत्येकाचीच गरज असते. त्यामुळे 'सुघटीत लिहिता येत नाही म्हणून लिहूच नये की काय?' ह्या प्रश्नाला सामोरे जायचे बळही सोशल मिडियानेच दिले. वर्तमानपत्र अथवा अजून कुठे लिहून ते लोकांना आवडेल का? लोकं काय म्हणतील? ही भीड चेपली जाऊन नवे प्रयोग करून बघायचा आत्मविश्वास वाढीला लागला. अक्षरास हसू नये टाईप लाज जाण्याची भीती चेपून माझ्या वॉलवर मी न लाजता काहीही लिहेन हा आत्मविश्वास निर्माण झाला. थोडक्यात मुक्तछंदाने अनेक कवींची जी सोय केली तीच सोय ह्या नव्या माध्यमाने लेखकांची केली.

आज मराठी साहित्य विश्वात ही नव्या लेखकांची, नव्या वाचकांची पिढी फार मोठे बदल घडवत आहे. एक वैयक्तीक ब्लॉग लेखक ते प्रत्यक्ष पुस्तकांचे लेखक हा प्रवास बर्‍याच जणांनी परंपरेने चालत आलेल्या पायर्‍या ओलांडून अल्पावधीत पार केला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पुस्तकांची विक्रीही सुद्धा पूर्णपणे ह्याच माध्यमातून होत आहे. उदाहरणार्थ, आपल्या फेसबुकवरील ललित कथांचे पुस्तक ते भयकथा आणि गुन्हेगारी कथांचे संग्रह प्रकाशीत करणारे सचिन परांजपे ह्यांनी आपले लिखाण लोकांपर्यंत पोचवून आपला स्वतःचा असा वाचक वर्ग ह्याच सोशल मिडियातून उभारला आहे. मंदार जोग ह्यांनीही ह्याच माध्यमाच्या ताकदीचा प्रभावी उपयोग करून आपल्या पुस्तकांचे लेखन, जाहिरात आणि प्रकाशन केले. पुस्तकांच्या अर्ध्याहून अधीक प्रती प्रकाशनापूर्वीच ह्याच माध्यमातून विकल्या. आणि ही दोन केवळ प्रातिनिधिक उदाहरणं झाली.

सार्वजनीक लेखनाचा श्रीगणेशा इथून करणारे जसे अनेक इथे आहेत तसेच नवोदित लेखकांना समजून घेऊन चार युक्तीच्या गोष्टी सांगणारे ज्येष्ठ लेखकही आहेत. लेखकांसोबतच अनेक नवे वाचकही इथे निर्माण झाले कारण त्यांनाही आता साहित्य सहजपणे उपलब्ध होऊ लागले. फेसबुक, ब्लॉग्ज, वेबसाईट्स ह्यांनी लेखक आणि वाचक ह्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर उभे केले. पूर्वी लेख लिहिला तर वाचकांचे पत्र येईपर्यंत तो लोकांना कसा वाटला हे लेखकाला समजायची सोय नसे. आता मात्र लेख वाचला की लगेच तो कसा वाटला हे सांगण्याचीही सोय निर्माण झाली आहे.

आणि एकदा इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठीतून संवाद होऊ लागल्यावर नव्या पिढीली ही आपली भाषा आहे आणि आपणच ती जपायला हवी हे सुद्धा मनापासून पटले. त्यामुळेच स्वतःच्या ब्लॉगवर आवर्जून फक्त आणि फक्त मराठीतच लिहिणे असो की मराठी दिनानिमित्त वाचक कट्टे भरवणं असो, सगळं काही इथे नव्याने सुरू झालं. नवी पिढी भलेही जुन्या पिढीसारखं खिडकीत बसून कादंबर्‍या वाचत नसेल, पण ह्या आंतरजालाच्या खिडकीत आवर्जून मराठीच वाचली जाते.

अर्थात ह्या सगळ्या मंथनातून सुंदर सुप्रभातचे रतीब घालणारे, J1 झालं का? च्या जिलब्या पाडणारे, बॅनर मंत्री, मीम सम्राट अशी रत्नही बाहेर आली हा वेगळा भाग. पण लोकं मराठीत लिहिती झाली, बोलती झाली ही फार मोठी गोष्ट आहे. लोकं आपल्या मातॄभाषेत व्यक्त होऊ लागली. संवादाच्या माध्यमाचा बोळा निघाला, पाणी वाहतं झालं.

-
आदि जोशी

वावरविचार

प्रतिक्रिया

पैसा's picture

5 Mar 2018 - 4:31 pm | पैसा

डिजिटल होताना रोमी कोकणी सारखी रोमी मराठी हल्ली बघावी लागते हा एक वैताग.

मराठी मागे जाते का पुढे, अभिजात का आधुनिक याचा कीस न पाडता लिहीत सुटावे हे उत्तम!

मित्रहो's picture

5 Mar 2018 - 9:17 pm | मित्रहो

बोळा निघाला याचेशी सहमत.

काळासोबत काही गोष्टी बदलल्या
- आजचा वाचक फक्त पुण्या मुंबईत राहीला नाही तर तो लहान गावापासून ते पार अमेरीकेपर्यंत पोहचला. अशा मोठ्या वाचकापर्यंत पोहचायला इंरटनेटसारख प्रभावी, सोप आणि आणि कार्यक्षम माध्यम दुसर नाही.
- आज मोबाइल इंटरनेट घरोघरी पोहचले त्यामुळे वाचनारे वाढले. लोकांना मराठी वाचायले हवे होते परंतु त्यांना ज्या प्रकारचे वाचायला आवडते ते मिळत नव्हते.
- इंटरनेटवरील लेखक बहुदा पैशासाठी लेखन करीत नाही किंवा त्यांचे पोट लिखानावर अवलंबून नाही. (काही अपवाद असतीलही). लेखक म्हणजे झोलावाला असे समीकरण राहीले नाही.
- लेखकाला लेखन लोकांपर्यंत पोहचविणे सोपे झाले. तसेच प्रयोग करने सोपे झाले. जर इंटरनेट माध्यम नसते तर मिपावर मराठी दिनासारखा सुंदर प्रयोग होऊ शकला नसता. बोलीभाषेतील लिखाण झाले आणि हजारो लोकांपर्यंत पोहचले. गेल्या वर्षी यात तंजावरी मराठीत सुद्धा लेखन झाले.

इतके असले तरी काही गोष्टी इंटरनेटवर तितक्या प्रभावी नाही उदा. मोठे लिखाण (जसे कादंबरी, नाटक). तसेच इंटरनेटवर ज्ञानप्रबोधिनी प्रकारात मोडनारे लिखाण वाढले. हल्ली सर्वत्र लिखाण हे कसला तरी अभ्यास असतो. ते चुकीचे आहे असे नाही.