एका सायन्स प्रोजेक्टची गोष्ट

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
1 Mar 2018 - 3:46 pm

"अहो बाबा, तुमचे प्रोजेक्ट्स आजी ने बनवले... माझे तुम्ही बनवताय आणि माझ्या मुलांचे मीच बनवणार आहे कि भविष्यात!! ओपन सिक्रेट आहे हो हे, जजेसनाही माहित असतं कि पॅरेन्ट लोकच बनवतात सायन्स प्रोजेक्ट्स, कशाला भाव खाताय? बनवा कि माझा सायन्स प्रोजेक्ट". आमचं कॉन्सेप्ट, तुमचं लेबर वर्क आणि स्नेहा आणि मी प्रेसेंटेशन करणार, म्हणजे डिमांड-प्रोडक्शन आणि मार्केटिंग असं टिमवर्कचं वर्तुळ पूर्ण होईल सिम्पल.

अश्या आर्ग्युमेंट्स करत माझ्या आळशी लेकीने माझ्या गळ्यात एक सायन्स प्रोजेक्ट अडकवला त्याची हि गोष्ट,

मी :- बरं विषय काय आहे?
ती :- ते माहित नाही तुम्हीच ठरवा. मात्र वर्किंग हवं
मी :- ऑ!! म्हणजे कॉन्सेप्ट लेव्हललाच दिवाळखोरी आहे तर..
ती :- सुचवाना... बस्स काय!!
मी :- माझ्याकडे एक विषय आहे, आपण एक काम करू "मॅजिक ऑफ गियर्स" असा मेकॅनिकल ऍडवेंटेजस कसे असतात याचं एक वर्किंग मॉडेल करू... आणि चक्क "प्रभू रामचंद्रांना" प्रोजेक्टमध्ये घेऊन येऊ.
ती :- यु मिन लॉर्ड रामा? धनुष्यबाण वाला? कुल.. पण कसं?
मी :- युरोपातील एका yz (x सायलंट) शात्रज्ञाने इटरनिटी मशीन बनवलीय.... एका फिरणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारवर १:५० रेशोच्या गिअरची जोडी माउंट केलीय ज्याने मोटारचा रोटेशन स्पिड भागिले ५० ने कमी होतो... अजून एक गिअरची जोडी लावून स्पीड परत भागिले ५० ने कमी होतो... अश्या प्रकारे त्याने गिअर्सच्या ८ जोड्या एका मागोमाग लावल्या आहेत. वेळेचा हिशोब केल्यास शेवटचा गिअर "तिन लाख बहात्तर हजार" वर्षांनी फिरतो म्हणून त्याने तो गिअर सरळ भिंतीतच गाडून ठेवलाय. स्वित्झर्लंडच्या लुझर्न शहराच्या एका म्युझिअममध्ये चालू स्थितीत ते मशीन पाहायला मिळतं.
ती :- तिन लाख बहात्तर हजार म्हणजे किती?
मी :- थ्री लॅक सेवंटी टू थाऊजंट.
ती :- काय शेंडी लावताय.. कायपण... दाखवा बघू... आणि लॉर्ड रामाचा काय संबंध याच्यात?
मी :- अगं कसं असतं कि लोकांना "तिन लाख बहात्तर हजार" म्हणजे फक्त एक अंक वाटतो.. इतका मोठा कालखंड लक्षात येत नाही म्हणून आपण रामाला मध्ये आणायचं. ते म्युच्युअल फंडवाले कसे जाहिरात करतात कि २००० साली जर तुम्ही १०,००० हजार गुंतवले असतेत तर आज त्याचे ५ करोड तुम्हाला मिळाले असते वैगरे वैगरे. ५ करोड म्हटले कि ग्रॅव्हिटी लक्षात येतं तसं.
ती : आय सी
मी :- बघ "तिन लाख बहात्तर हजार" वर्षांच गणित दाखवण्यापेक्षा आपण लॉर्ड रामाचा रेफरन्स देऊ. प्रभू रामचंद्रांचा जन्म साधारण ९ हजार ३३९ वर्षांपूर्वी झाला होता. आपण सायन्स फेस्टची तारीख आणि रामाचा पहिला वाढदिवस याचा हिशोब लावून गिअर्सचा रेशो ठरवू... प्रोजेक्ट जरा सुटसुटीत देखील होईल... आणि लिहू कि रामाच्या पहिल्या बड्डेला त्याने जर हि मोटार चालू केली असती तर हा शेवटचा गिअर आजच्या दिवशी फिरला असता.... व्हिजिटर्सनाही कालखंडाची कल्पना येऊन "अय्या- अय्या" करतील. ... बाकी गिअर्सचा वापर, फायदे वैगरे मसाला लिहू एका चार्टवर.

ती :- लुक्स इंटरेस्टिंग, ओके मेक सेन्स, माझ्या बाकीच्या दोन प्रोजेक्ट पार्टनर्सना सांगते आणि कन्फर्म करते.

एक-दोन आठवड्याने,

मी :- प्रोजेक्टची काय खबरबात?
ती :- काही विषय निघाला नाहीये पण टीचर बहुतेक ओके आहेत.
मी :- अच्छा टीचर हो म्हणाल्या आहेत तर मी गिअर्स, मोटर वैगरे ऍमेझॉनवरून ऑर्डर करतो म्हणजे आपली घाई होणार नाही.
ती :- ओके.

२-३ दिवसांनी,
मी :- अगं तुझ्या प्रोजेक्ट पार्टनर्सनि केलं का कन्फर्म?
ती :- तुमचा प्रोजेक्ट रिजेक्ट केलाय आम्ही.
मी :- ऑ... च्याआयला!! पार्ट्स ऑर्डर करायच्या आधी तरी सांगायचं होतं.
मी :- बादवे का बरं रिजेक्ट केला?
ती :- आम्हाला असलं धार्मिक-बिर्मिक गोष्टी सायन्स प्रोजेक्टमध्ये नकोय.
मी :- ऑ!! यात धार्मिक काय?
ती :- लॉर्ड रामा कशाला मोटार चालू करेल?... त्याच्या इरा मध्ये होती का इलेक्ट्रिक मोटार?
मी :- अग अख्या विश्वाचा जो गाडा फिरवतो त्याला एक मोटार फिरवता येणार नाही?
ती :- तो काहीका फिरवत असेना पण माझ्या प्रोजेक्टला मी रामाला हात लावू देणार नाही.
मी :- अग मग येशू ख्रिस्ताला आणू प्रोजेक्टमध्ये.. पाववाला आहे ना तुमचा प्रिंसिपॉल.. आवडेल त्याला.... अल्ला-- मोझेस सगळ्यांच्या बड्डेची तारीख आहे माझ्याकडे... एक काम करू सगळ्यांचेच रेफरन्स देऊन.. रामाने चालू केल्यास हि तारीख, मोझेस ने चालू केल्यास हि तारीख.. वेग-वेगळ्या ग्रहांवर आपलं वजन किती भरेल जसं लिहितात तसं.
ती :- ते नकोच आम्हाला... तुम्ही दुसरा काहीतरी सब्जेक्ट घ्या.
मी :- च्याआयला अडीच हजाराचा चुना लागला ना या सगळ्यात.
मी :- बरं दुसरा सब्जेक्ट कोणता?
ती :- ते तुम्हीच ठरवा. वर्किंग हवंय मात्र.
मी :- च्याआयला त्या प्रोजेक्टच्या!!

तर अश्याप्रकारे पहिल्या प्रोजेक्टमध्ये पुरोगामी विचारांशी डोकेफोड आणि तोंड भाजल्यानंतर दुसऱ्या विषयांसाठी मी तिच्या प्रोजेक्ट पार्टनर्ससोबत आगाऊ चर्चा करण्याचा शहाणपणा केला आणि सार्वानुमते "बायो टॉयलेट्स".. "स्वच्छ भारत-मुफत ऊर्जा- एक कदम स्वयंपूर्ती कि ओर" अश्या घोष वाक्यासहित नवीन प्रोजेक्ट बनवायला घेतला. प्रोजेक्ट कसा दिसतो त्याचे फोटो आणि संक्षिप्त माहिती.

आपल्या "DRDO" (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनाझेशन) ने काही वर्षांपूर्वी "Anaerobic Bacteria" ठासून भरलेली शिट डेव्हलप केली. यातील बॅक्टेरिया मनुष्य विष्ठा खाऊन टाकतात आणि या विघटन क्रिये दरम्यान CO२ आणि मिथेन गॅस तयार होतो... हा मिथेन गॅस, कुकिंग गॅस म्हणून वापरता येतॊ आणि वीजही तयार होते.... राहिलेलं शुद्ध पाणी परत वापरात येतं किंवा बाग, शेतीसाठी वापरता येते.

सार्वजनिक शौच्चालयाच्या खाली भूगर्भात "डायजेस्टर टॅंक" साधारण कशी असते, पाणी आणि गॅसचा वापर कुठे कुठे होऊ शकतो यासाठी गॅस शेगडी, बाग वैगरे कशी दाखवलीय हे फोटो पाहिल्यास जास्त कळून येईल.

आता लेकीने कबूल केल्याप्रमाणे तिच्या मुलांचे प्रोजेक्ट ती स्वतःच बनवणार कि या आजोबालाच कामाला लावणार ते प्रभू रामचंद्रालाच ठाऊक. __/\__

जाता जाता,
प्रोजेक्टसाठी वापरलेलं साहित्य,
१) मिडीयम स्पायसी भेळ:-
होय खरंच!!... कारण माझ्याकडे संडास बनवण्यासाठी पांढरे चमचे नव्हते.. म्हणून मग प्रशांत कॉर्नरमध्ये भेळ खाऊन आलो आणि येतांना चार चमचे सुमडीत ढापले.
२) प्लास्टिक नरसाळं:- डायजेस्टर टॅंकसाठी नरसाळं मधोमध कापून मधलं अर्धवर्तुळ पुठ्याने बनवलं कि टाकी तयार.
३) भांडी घासायचं स्क्रबर :- बॅक्टरीया शीट दाखवण्यासाठी.
४) तीन प्रकारचे/रंगाचे हेअर जेल :- टाक्यांत टाकायला.
५) टूथ पिक काड्या :- दरवाजाच्या कड्या बनवण्यासाठी.
६) बार्बीक्यू स्टिक्स :- पाईपलाईन दाखवण्यासाठी
७) ऍक्वागार्ड पाईप :- पाईपलाईन दाखवण्यासाठी
६) ओरिगामी कागद :- प्रोजेक्टच्या रंगकामासाठी (रंग न लावता कागद चिटकवलेत)
७) बाथरूमच्या प्लास्टिक झाडूच्या २-३ कांड्या :- टॉयलेटचं रेलिंग या कांड्यांपासूनच बनवलंय.
८) काच, पुठ्ठा, फेविकॉल, चायनीज लाईट्स (मोड्युस), बॅटऱ्या, आणि भूगर्भाचे काही रंगीत प्रिंटस.
९) गॅसच्या शेगडीला लावलेलं जिलेटीन फडफडावं म्हणून खालून पंखा आणि खेळण्यातली मोटार.
१०) झाडं वैगरे ऍमेझॉनहुन मागवलेत.

विज्ञानशिक्षणलेखअनुभवमाहितीप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

1 Mar 2018 - 4:28 pm | मार्मिक गोडसे

छान प्रोजेक्ट. चमाच्याचा कल्पक वापर आवडला.
हल्ली बरेचसे विद्यार्थी अरविंद गुप्तांच्या साइट बघून प्रोजेक्ट करतात.

चांगलं आहे. वर्किंग मॉडेल असावं असा आग्रह विज्ञान प्रदर्शनांमध्ये असायचा. इथे ते अर्थातच शक्य नाही. पण मॉडेल चांगलं दिसतंय.

manguu@mail.com's picture

1 Mar 2018 - 8:31 pm | manguu@mail.com

छान

प्राची अश्विनी's picture

1 Mar 2018 - 8:45 pm | प्राची अश्विनी

प्रोजेक्ट आवडला.
रच्याकने ठाणेकर का तुम्ही?

बाजीप्रभू's picture

2 Mar 2018 - 4:52 am | बाजीप्रभू

होय होय... घोडबंदर रोड.तुम्ही देखील का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Mar 2018 - 9:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं प्रोजेक्ट !

तेजस आठवले's picture

1 Mar 2018 - 10:12 pm | तेजस आठवले

मस्त प्रोजेक्ट. मॉडेल मस्त झाले आहे.
व्यवस्थितपणा आणि टापटीप मॉडेलमधून दिसते आहे.
तुमचे आरेखन विषयात शिक्षण झालेले आहे का.आर्किटेक्ट्चर विद्यार्थी असे प्रोजेक्ट बनवतात ना.
कल्पकता हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि तो चांगला वापरला गेला आहे.
रच्याकने, हा सगळा खटाटोप किती मार्कांसाठी? सगळ्याच शाळेत असे सततचे प्रोजेक्ट आता सक्तीचे असतात का आपल्या मराठी शाळा अपवाद आहेत. सतत काही ना काहीतरी प्रोजेक्ट करून दाखवण्यात मुलांचा आणि पालकांचा खूप वेळ आणि पैसा खर्च होतो. जवळजवळ सगळे प्रोजेक्ट हे पालकांनाच करावे लागतात आणि सगळ्यांना ह्याची कल्पना असते. बरं त्यातून फार काही शिकायला मिळतंय असं पण नाही.मग कशाला हा खटाटोप असे वाटते.(माझ्या वेळचे प्रोजेक्ट्स : कलाकुसर,पणत्या, मातीची खेळणी-भांडी,शिवणकाम,लोकरीची तोरणं-फुले करणे, मण्यांची झुंबरं करणे ह्या सगळ्या शालेय जीवनातील कार्यानुभवाचा मला प्रचंड कंटाळा होता. ह्याबाबतीत मी माझा पराभव केव्हाच लिहून दिलेला होता आणि आहे. मी केलेल्या वस्तू बरेचदा डिफेक्टिव पीस असल्यासारख्या दिसत.)
आता शालेय प्रोजेक्ट्स चे काम करून देणारी पण लोक आहेत म्हणे. त्यांना विषय सांगायचा आणि पैसे हातावर ठेवायचे. आई वडील दोघेही नोकरी व्यवसाय करणारे आणि मुलांकडे बघणारे कोणी नाही मग ही प्रोजेक्ट्स करणार तरी कोण? एका वर्गात साधारण ४० ते ६० विध्यार्थी असतील तर प्रत्येकाचे प्रोजेक्ट्स पाहिले तरी जातात का ? आधीच शिक्षकांना कामाच्या ओझ्याने जीव नको झाला आहे.
अवांतर : ठाण्यात कुठे ?
अतिअवांतर : भेळेच्या पैशात ४० प्लास्टिकचे चमचे मिळाले असते.

बाजीप्रभू's picture

2 Mar 2018 - 5:16 am | बाजीप्रभू

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!
तुमचा अंदाज बरोबर आहे... मिशिन डिझाईनमधेच करिअर झालेलं आहे.
मोठा भाऊ सिव्हिल इंजिनिअर पण त्याचे सगळे मॉडेल्स मीच बनवायचो त्यामुळे तसा हा जुनाच छंद आहे.
आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनासाठी प्रोजेक्ट बनवला होता.. यात मार्क्स नाही पण स्पर्धेत भाग घेणं हा एकच उद्देश होता.
यात मुलीला मेडल मिळालं असलं तरी तशी अपेक्षा नव्हती. मॉडेल सादर करण्याचं एक सँण्डर्ड वाढवावं, इतरांनी त्यातून शिकावं आणि लोकांना या नवीन पध्दतीबाबत माहिती देणे इतकाच उद्देश होता.
सध्या वर्क फ्रॉम होम घेऊन भारतात असल्याने मोकळा वेळ मिळतो.

माझ्याकडे चमच्यांचं आधीच एक पाकीट होतं पण ते ट्रान्सपरंट प्लास्टिकचे होतं म्हणून उगाच साठा करून ठेवण्यापेक्षा भेळेचा आनंद घेतला.

ठाण्यात घोडबंदर रोड. पुराणिक होमटाऊन वडवली.

चांदणे संदीप's picture

2 Mar 2018 - 4:59 am | चांदणे संदीप

मान गये... आपके लेख को और आपके प्रोजेक्ट दोनोको. :)

Sandy

शेखरमोघे's picture

2 Mar 2018 - 6:13 am | शेखरमोघे

छान लिखाण, छायाचित्रे आणि अनुभव, विशेष करून पहिल्या फसलेल्या प्रोजेक्टनंतर दुसऱ्या विषयांसाठी सगळ्या प्रोजेक्ट पार्टनर्ससोबत आगाऊ चर्चा करण्याचा शहाणपणा !!

तुषार काळभोर's picture

2 Mar 2018 - 7:04 am | तुषार काळभोर

म्हणजे, अगदी संडास सुद्धा देखणं झालंय!

१) मिडीयम स्पायसी भेळ:-
होय खरंच!!... कारण माझ्याकडे संडास बनवण्यासाठी पांढरे चमचे नव्हते.. म्हणून मग प्रशांत कॉर्नरमध्ये भेळ खाऊन आलो आणि येतांना चार चमचे सुमडीत ढापले.

याचा अर्थ आईशप्पथ लागला नव्हता. खरंतर अनर्थ लागला होता. ;)
मग खाली पहिला प्रतिसाद वाचून परत फोटो पाहिले, मग लक्षात आलं!

संजय पाटिल's picture

2 Mar 2018 - 12:04 pm | संजय पाटिल

लोल!!!
माझं पण असच झालेलं....

मस्त प्रोजेक्ट & मॉडेल.

मराठी कथालेखक's picture

2 Mar 2018 - 1:20 pm | मराठी कथालेखक

छान बनलेत संडास :)
एक सुचवावेसे वाटते ....तुमच्याकडे कौशल्य, कला आणि चिकाटी आहे. ..मुलीच्या प्रोजेक्टचं निमित्त मिळण्याची वाट न बघता सुंदर हस्तकला गोष्टी बनवत रहा. कॉर्पोरेट ऑफिसवाले , मोठ्य बंगल्यातले लोक विकतही घेतील

पद्मावति's picture

2 Mar 2018 - 2:25 pm | पद्मावति

खुप मस्त, प्रोजेक्ट आणि लेखन दोन्ही.

सिरुसेरि's picture

3 Mar 2018 - 12:57 pm | सिरुसेरि

मस्त लेखन . नंबर १ प्रोजेक्ट ( प्रोजेक्ट नंबर १ ).