फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : २

रा.म.पाटील's picture
रा.म.पाटील in जनातलं, मनातलं
21 Feb 2018 - 10:04 pm

फेस्टिव्हल डायरीज..!!
(Decorate Your Love..)
कथा – २
व्हॅलेंटाईन..
(प्रेमाची नवी नजर..)

ती- "त्या प्रसिध्द पुस्तकाच्या लेखकाने लिहिले आहे की,
' गुलाब आहेच असा सर्वाना आवडण्यासारखा.. पण प्रेमावर फक्त गुलाबाचीच मक्तेदारी का? कधी तरी मोगरा किंवा चाफ्यालाही उमेदवारी देऊन पहावी.. शेवटी सुगंधी ते पण आहेतच ना..!'"

तो- "बरोबरच लिहले आहे की मग.."

ती- "हो मान्य आहे ते पण मला सांगा प्रेमासाठी गुलाबाचं का निवडला असेल.. कारण पुष्पवर्गात तोच एकमेव असेल की ज्याला मिळवण्यासाठी काटेही टोचून घ्यावे लागतात.. म्हणजे प्रेम मिळवायचे असेल तर तुम्हाला अडथळे येणारच हेच सुचवले जात असेल गुलाबाकडून.. आणि ह्या काट्यांमुळेच गुलाबाला किंमत आहे अगदी तसेच आहे प्रेमाचे, अडचणीत एकमेकाला आधार देते ते खरे प्रेम.."

तो - "म्हणून काय प्रेमात आंधळे बनून काटे का टोचून घ्यायचे.."

ती - "प्रेम म्हणजे गुलाब नव्हे गुलाबाचे रान असते, सुवास धुंद करत असतो न काट्यांचे मात्र भान नसते.. "

तो - "अरे वा छान.. "

ती- "माझ्या नाहीत ह्या ओळी.. कुठेतरी वाचल्या आहेत..
पण प्रेम डोळस असले तर ते प्रेम कसले..?"

तिच्या ह्या शेवटच्या वाक्यावर तो क्षणभर आश्चर्यचकीत झाला..

तो- "म्हणजे तू म्हणतेस की प्रेम आंधळे असावे.."

ती- "प्रेम जर डोळसपणे केले तर तो व्यवहारच ठरेल ना?"

तो- "स्पष्ट कर बघू.."

ती- "आता हेच बघ ना.. आपल्याकडे लग्न ठरवताना मुलाची नोकरी, घराची माणसं, घर, त्याची कमाई, आर्थिक परिस्तिथी, त्याची सुबत्ता ह्या गोष्टी पहिल्या जातात.."
हेच सर्व आपण एखादी नोकरी करताना किंवा खरेदी करताना पाहतो. मग हा व्यवहारच नाही का?
न कधी कधी मुलाकडून प्रश्न पण असे विचारले जातात की आपली नोकरीसाठी मुलाखतच घेत आहेत."

तो- "आणि मुली पण कधी कधी अशी उत्तरे देतात की काहीही करून त्यांना ही नोकरी मिळवायची आहे, मग त्यासाठी त्या खोटेही बोलतात."

दोघेही हसतात.

ती- "मला तर कधी कधी अरेंज मॅरेज ना घरच्यांनी बळजबरीने केलेले लव्ह मॅरेज वाटते. फरक एवढाच कि येथे तुम्ही एकमेकांच्या घरच्यांच्या समोर प्रेमात पडता आणि तेही पाच मिनिटांच्या भेटीत.."
तो मिश्कीलपणे हसत - "पटतंय तुझे म्हणणे पण प्रत्येक अरेंज मॅरेज असं असत नाही.."

ती - "मान्य आहे पण शेवटी तुम्ही आयुष्य त्या अनोळखी माणसाबरोबर व्यतीत करण्यास तयार होता.. मग पहिल्या नजरेत प्रेम करणाऱ्याच्या बाबती पण हेच होते, जर ते प्रेम आंधळे असेल तर असे अरेंज मॅरेज पण आंधळे प्रेमच म्हणावे लागेल ना..!

तो- "पण आंधळे प्रेम हे शेवटी अनोळखी दिशेचा प्रवास.."

ती - "हो आहेच, पण मला सांगा आपण लहानपणापासून किती गोष्टीची सुरुवात माहीत आहे म्हणून केली आहे.. आपल्याला सर्व धोके किंवा फायदे त्या गोष्टी केल्यावर समजले ना.."

तो- "पण जेव्हा समज आली तेव्हा आई वडिलांनी सांगितले त्या गोष्टी टाळल्या.."

ती- "पण प्रत्येक गोष्ट नाही टाळल्या.. काही गोष्टीचा अनुभव घ्यावा वाटला.."

तो- "पण पहिल्या नजरेतील प्रेम म्हणजे सौंदर्यापुढे बुद्धि गहाण ठेवण्यासारखेच नाही का?"

ती- "हो तसेच होते, पण प्रत्येक गोष्ट अशी बुद्धीने तोलून मापून करावी लागली तर तुम्ही कोणावरच प्रेम करू शकणार नाही.."

तो- "मान्य, पण आपण स्वतःहून आंधळे होण्यात काय अर्थ..?"

ती- "मला तर असे वाटते प्रत्येक प्रेम हे आंधळे असते.. कारण आपल्याला आपल्याच आयुष्यात पुढे काय होणार आहे हे माहित नाही तर आपल्या प्रियकराच्या आयुष्याचा प्रवास आपण कसा ठरवणार.. आणि आपले प्रेम आंधळे केव्हा ठरते जेव्हा समोरचा माणूस धोका देतो तेव्हा.."

तो- "हो.."

ती- "मग हा धोका तुम्हाला आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर न प्रत्येक नात्यात व व्यवहारात होऊ शकतो.."

तो- "हो मग.."

ती- "मग हा धोका मिळाला की तुम्ही नाते जोडायचं किंवा व्यवहार करायचं थांबता का?"

तो हसत- "नाही.. पण पुढ्याच्यावेळेस सावधपणे ह्या गोष्टी करतो.."

ती- "मग असेच आहे.. आंधळे प्रेम.. जे तुम्हाला प्रेमाची नवी नजर देऊन जाते.."

तो- "म्हणजे तुला असे म्हणायचे आहे का की आजची तरुण पिढी ज्या प्रकारे प्रेमात वाहत जात आहेत ते बरोबर आहे.."

ती- "मला वाटते ती फक्त प्रवासात आहेत, जशी एखादी नदी वाहते, तिचे पाणी साफ असते पण गढूळ तेच करतात ज्यांची ती तहान भागवते.."

तो - "पण शेवटी तिचा प्रवास पण थांबतो समुद्रापाशी जाऊन.."

ती- "हो तसेच असते ह्या प्रेमाचे, आपल्याला कवेत घेईल तो समुद्र भेटेपर्यंत प्रवास चालूच राहतो.."

तो - "पण ह्या आंधळ्या प्रेमापायी स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या आयुष्याची वाताहत करणाऱ्याबद्द्ल काय म्हणशील.."

ती- "शेवटी इथे प्रश्न संयमाचा आहे, जर मुले पालकांकडून अपेक्षा करतात की पालकांनी त्यांच्या करिअरच्या बाबतीत घाई करू नये तसेच मुलांनी प्रेमाच्या बाबतीत पण संयम ठेवणे अपेक्षित आहे.."

तो- "म्हणजे प्रेमात तेव्हा पडावे जेव्हा ते स्थिरसावर होतील.. हो ना?"

ती- "शेवटी प्रेम ही अनुभूती आहे, एक सुंदर प्रवासाची, जो कधी संपूच नये अशा.. आणि हा प्रवास वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सुरू होऊ शकतो..

आणि ह्या प्रवासात अनपेक्षित अशी वळणेही येतात, अपघातही घडतात, कधी वेगही वाढतो अन रस्ताही चुकतो..

पण हा प्रवास चालू राहील तेवढे चांगले.. मग ह्या प्रवासात डोळे गमावले तरी चालतील पण नजर हरवता कामा नये.."

तो- "तू प्रेमाला कसे स्पष्ट करशील..?"

ती- "प्रेम म्हणजे असा अनुभव की समोरची व्यक्ती तुमची आहे जरी तुमचा तिच्यावर काही हक्क नसला तरीहि.."

तो- "उदाहरणार्थ.."

ती- "आता हा गुलाब बघ, तो आहे इथे सर्वांच्या हातात पण सुंगध मलाही मिळतोच आहे ना.."

तो- "पण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीची सोबत न मिळणे म्हणजे त्या प्रेमाची पूर्तता न होणे नाही का?"

ती- "जरी सोबत मिळाली तरी प्रेमाचा तोच टवटवीतपणा टिकून राहील कशावरून?"

तो- "मग अव्यक्त प्रेम म्हणजे आयुष्यभर प्रवासातच राहणे असे म्हणायचे का तुला..?"

ती- "मला असे वाटते की प्रेमाची गोडी अव्यक्त प्रेमात जास्त असते व्यक्त प्रेमापेक्षा.."

तो- "हे म्हणजे असे झाले की तुम्ही गुलाबाचे झाड लावायचे, चांगले जपायचे न जेव्हा गुलाब येतील तेव्हा फक्त सुंगध घ्यायचा.."

ती- "हेच बरोबर, झाडासकट गुलाबाला जपणे हेच खरे प्रेम कारण तोडलेले गुलाब हे काही दिवसातच कोमेजतात.."

तो- "म्हणजे आता जे आजूबाजूला गुलाब वाटले जात आहे प्रेम व्यक्त करण्यासाठी ते पण कोमेजून जातील एक दिवस.."

ती- "हो आणि त्यांचे प्रेमही तेवढ्याच क्षणाचे असेल.."

तो - "असे कसे काय म्हणू शकते तू..?"

ती- "मला आता सांग, ती किंवा तो मिळालेल्या त्या गुलाबाचे काय करत असेल नंतर.. जास्तीत जास्त एक दोन दिवस त्याच्याकडे सारखा बघत राहतील, गोड आठवणींनी गालातल्या गालात हसत राहतील, न मग ते फुल कोमेजले की पुन्हा नवा गुलाब शोधू लागतील.."

तो- "पण एखाद्याने पाकळी न पाकळी जपून ठेवली तर.."

ती- "सुरुवातीचे काही दिवस तो सारखे त्या पाकळ्या उघडून पाहिल, सुंगध घेत राहील.. पण हे रोज नाही घडणार.. न मग काही वर्षांनी नकळत ह्या पाकळ्या त्याला सापडतील न पुन्हा त्या प्रेमाच्या आठवणींना उजाळा मिळेल.. पण क्षणभरच..!"

तो - "मग तू जपून ठेवल्या आहेत का कोणी दिलेल्या गुलाबाच्या पाकळ्या..?"

त्याच्या ह्या प्रश्नावर इतका वेळ चाललेल्या तिच्या संवादात तिने आता घेतलेल्या अल्पविरामामुळे त्याच्या लक्षात आले कि तिला बहुतेक तिच्या प्रेमाच्या प्रवासात पूर्णविराम मिळाला असेल किंवा ..

ती - "स्वल्पविराम, त्याचे प्रेम माझ्यासाठी स्वल्पविराम ठरले, माझा प्रेमाचा प्रवास मी अजून चालू ठेवला आहे.. जर असे केले तर एखाद्याने प्रिय व्यक्तीला गुलाब देण्याऐवजी एखादे झाड द्यावे, आणि खरंच जर समोरची व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती त्या झाडालाही तितकेच जपेल जेवढे तुमच्यातील प्रेमाला जपते.. त्यावरून कळेल ना त्यांचा प्रेमातील संयम.. "

तो काही बोलणार इतक्यात एक त्रयस्थ व्यक्ती तिथे येते आणि-

त्रयस्थ - "तुम्ही तेच ना त्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक.. "

तो – "हो.. तो मीच.. "

त्रयस्थ - "ओह माय गुडनेस .. किती छान लिहता हो तुम्ही.. खासकरून तुमचे गुलाबावरील ते वाक्य - " गुलाब आहेच असा सर्वाना आवडण्यासारखा.. पण प्रेमावर फक्त गुलाबाचीच मक्तेदारी का? कधी तरी मोगरा किंवा चाफ्यालाही उमेदवारी देऊन पहावी.. शेवटी सुगंधी ते पण आहेतच ना..!". लाजवाब सर.. "

त्याच्याशी बोलताना त्याची नजर तिच्याकडे जाते. एव्हाना तिला कळलेले असते तो तोच लेखक आहे..

त्रयस्थ - "पण तुम्ही टोपण नावाने का लिहता ?"

तो- "कारण जर पुढच्या माणसाला माझी ओळख कळली तर तो माझ्या सुरात सूर मिसळतो आणि त्याचे विचार माझ्यापर्यंत पोहचत नाहीत. मलाही कळली पाहिजे ना पुढच्या माणसाची नजर.. "

आता मात्र तिच्या चेहऱ्यावर ते अनोळखी भाव त्याला पुन्हा जाणवू लागतात जे पहिल्या भेटीत जाणवले होते.. पण ह्यावेळी त्याचबरोबर एक गोष्ट जास्त दिसून आली.. तिच्या चेहऱ्यावर लाजल्यामुळे आलेली लाली..

तिच्या त्या लाजण्यामुळे आजूबाजूचे आजच्या व्हॅलेंटाईनचे वातावरण त्याला अजून गुलाबी वाटू लागले.. अरेंज मॅरेज करण्यासाठी दोघे एकमेकांना भेटले होते.. दोन तीन भेटीतच त्याच्या संवादातील औपचारिकता गाळून पडली होती.. आणि आज ती तिचे विचार एवढे मनमोकळेपणे मांडत होती कि एवढा मोकळेपणा नात्यात यायलाच हवा..

त्रयस्थ - "तुमच्या पुढच्या पुस्तकाचे नाव काय असणार आहे?"
तो तिच्याकडे पाहत - "आंधळे प्रेम.. प्रेमाची नवी नजर.. "

*******
राही..
*******

सूचना - वरील लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. वरील लेख किंवा त्याचा कोणताही भाग लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रकाशित किंवा मुद्रित किंवा कोणत्याही स्वरूपात वापरता येणार नाही.
संपर्क : ८३७८ ०४५१४५ (राही..)

8378 045145 (Rahi..)

कथालेख

प्रतिक्रिया

फेस्टिव्हल डायरीज..!!: कथा - १ ची लिंक-https://www.misalpav.com/node/42046

फेस्टिव्हल डायरीज..!!: कथा - १ ची लिंक-https://www.misalpav.com/node/41841

आधीच्या पोस्टमधील लिंक ही कथा - २ ची लिंक आहे.

चिर्कुट's picture

22 Feb 2018 - 9:53 am | चिर्कुट

चांगली आहे कथा..

पुलेशु.

रा.म.पाटील's picture

25 Feb 2018 - 8:39 am | रा.म.पाटील

आभारी आहोत..

फेस्टिव्हल डायरीज..!!: कथा - ३ ची लिंक

https://www.misalpav.com/node/42247

रा.म.पाटील's picture

25 Mar 2018 - 9:36 am | रा.म.पाटील

फेस्टिव्हल डायरीज..!!: कथा - ४ ची लिंक

https://www.misalpav.com/node/42507