वेदांग शिरोडकर

arunjoshi123's picture
arunjoshi123 in जनातलं, मनातलं
17 Feb 2018 - 4:44 pm

प्रारंभ:
एच् ब्लॉक, रुम नंबर ११७. हॉस्टेलच्या ४-५ मजली इमारतीच्या तळमजल्यावर लोखंडी जाळीच्या गेटपासून पहिलीच रुम मी पसंद केली होती. भूकंप झाला तर सर्वात अगोदर इमारतीपासून शक्य तितक्या दूर धूम ठोकता यावी असा माझ्या लातूरकडच्या भूकंपकंपित मनाचा हिशेब त्यामागे होता. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठवाड्याचा कोटा कमी असल्यानं त्यामानानं चांगले मार्क असूनही मला उशिरा, म्हणजे दुसर्‍या यादीत, १-२ महिन्यांनी, हॉस्टेलरुम अलॉट झाली होती. रुमच्या लोकेशनवर मी खुष असलो तरी मात्र तिथला व्यत्यय नि वर्दळ यांच्यामुळं शिरोडकरला ती आवडत नसे. अलॉटमेंटच्या वेळी केवळ नाईलाजानेच त्याला ती स्वीकारावी लागली होती. त्यात मी उदगीरचा, सानप कोपरगावचा नि शिरोडकर मुंबईचा असं बहुविभागीय त्रिकुट असल्यामुळं रुमला लवकरच कॉमन रुमचं स्वरुप प्राप्त झालं. पाण्याच्या बाटल्या ठेवणे, बॅगा ठेवणे, पायर्‍या चढायचा कंटाळा आला कि बसून घेणे, समोर पीसीओवर लाईन लांब असली कि वाट बघायला ठिय्या मारणे, पत्ते विचारणे, सिटीलाईट्सनी हॉस्टेलमधे भेट घेणे, इत्यादि आमच्या रुमचे उपयोग होते. शिरोडकरच्या मुंबई गँगच्या इंग्रजी न येणार्‍या भैय्यांना मी साऊथ इंडियन आहे म्हणून सांगे नि हिंदी न येणार्‍या मद्रास्यांना मी उत्तर भारतीय आहे म्हणून सांगे. आमचा लातूर जिल्हा सुदैवाने आमचे उत्तर भारतीयत्व आणि दक्षिण भारतीयत्व दोन्ही क्लेम करता येईल इतका स्ट्रॅटेजिकली वसला आहे! लातूरच्या सबंध इतिहासात त्याच्या अशा मोक्याच्या स्थानाचा असा माझ्याव्यतिरिक्त कोणी फायदा घेतला नसेल! पुणेरी मराठी वा शहरी मराठी वा गावठी न वाटणारी मराठी वा बोली हिंदी वा बोली इंग्रजी यांच्यापैकी कोणती एकही भाषा धड न येणार्‍या मला शिरकाव करून घ्यायला तो सर्वात हाय-फाय मुंबई ग्रुप सर्वात सोपा ठरला. वर माझी नि शिरोडकरची ब्रँच एकच- मेटॅलर्जी. १९९४ च्या इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाच्या त्या सुरुवातीच्या सहा महिन्यांत अगदी अन्य मराठवाडाकरांसही भाषेमुळे म्हणा वा बोलण्याच्या पद्धतीमुळे म्हणा वा बोलण्यातील आशयांमुळे म्हणा मी आपल्यातला म्हणायच्या पात्रतेचा वाटत नसे. एक दोन चकमकींनंतर त्यांनी मला बगल द्यायला चालू केले होते. थोडक्यात, परिस्थितीचं सुयोग्य वर्णन करायचं म्हटलं तर ईश्वरानं मला थेट गावाकडनं उचलून शिरोडकरच्या बोकांडी बसवला होता.
वेदांग शिरोडकर अन्य कोणत्याही सुशिक्षित, सुसंपन्न, सुसंस्कारित मराठी मुंबईकराप्रमाणे एक खेळकर, आत्मविश्वासू, मनमिळावू, शहरी, सभ्य, शिष्टाचार माहीत असलेला, स्वच्छ, परिपक्वता आलेला, सामान्य ज्ञान नि वाचन असलेला, इत्यादि, इत्यादि प्राणी होता. अशा अनेक परिमाणांत आम्हा दोघांत अत्यंत शार्प काँट्रास्ट होता. शिरोडकर ५'५" उंचीचा, गोरापान, पातळ बांध्याचा, रंगीत डोळ्यांचा, सहज, कॉस्मो, फॅशनेबल, मॉडर्न मुलगा होता. माझ्यापेक्षा कितीतरी पट हाय-फाय असला तरी त्याच्यामधे आढ्यता नावाचा प्रकार अजिबात नव्हता. त्याचे मुंबईकर हॉस्टेलमेट त्याला लाडानं वेंगी किंवा एक जाडजूड चष्मा होता म्हणून मिश्किलीनं ढापण्या म्हणत. त्याला दम्याचा त्रास होता नि तो मधे मधे नेब्यूलायझर वापरत असे.
किमान सुरुवातीला तरी त्या नवख्या वातावरणात चूका टाळण्यासाठी, आपलं हसं होऊ नये म्हणून, आपलं अज्ञान उघडं पडू नये म्हणून मी अत्यंत अलिप्त आणि अबोल आणि निष्क्रिय राही. आमच्या दोघांत सुस्पष्ट दिसणारे अनंत फरक असले तरी तो माझ्याशी अत्यंत प्रेमाने, विनम्रतेने वागे नि मला चिडवायच्या वा डिवचायच्या संधींचा कोणताही फायदा घेत नसे. तसं बघितलं तर बाकी मंडळी उद्दामखोर वा आढ्य वा स्वकेंद्रित वा लाज आणून त्रास देणारी अशीच जास्त होती. आपल्याला खूप चांगलं वातावरण असलं तरी गरीब घरातल्या, गावाकडनं आलेल्या, एक्सपोजर कमी असलेल्या लोकांना आपण चिडवू नये, त्रास देऊ नये, समान मानावं याची जाण वेंगीला होतीच पण वर ही देखील जाण होती की यांच्या प्रत्यक्ष यांना भांबावून टाकेल इतकं हाय-फाय वागणं, बोलणं किमान सुरुवातीला टाळावं.
वेंगी शहरी शिष्टाचारांनुसार नेहमी एक्सक्यूज मी, प्लिज हे याचनासर्किट, थँक्यू, वेलकम, मेंशन नॉट, माय प्लेजर हे सौजन्यसर्किट आणि सॉरी - डोन्ट माइंड हे क्षमासर्किट वापरे. त्याविरुद्ध मी आजवर एकदाही इंग्रजीतले शिष्टाचारवाचक शब्द प्रत्यक्ष व्यवहारात वापरले नव्हते. 'आई, जेवायला दे' च्या ऐवजी "माते, कृपया अन्न दे." असली इंग्रजी वाक्यांची विचित्र भाषांतरं फक्त शाळेतच केल्यानं प्रत्यक्ष फॉर्मल शब्द बोलायचा म्हटलं कि लाज/रोमांच/काटे येत असत. तेव्हा ह् न् म् अ ऊ ऑ आणि खूप सारे अवग्रह यांची विविध काँबिनेशन्स वापरून मी अनेक प्रकारचे हुंकार भरे पण शिष्ट सोज्वळ इंग्रजी शब्द मुखातून बाहेरच पडायचेच नाहीत.
एकः
३-४ दिवस झाले असतील पण आमचं कधी म्हणावं असं बोलणं झालं नव्हतं.
तर एकदा वेंगी नि मी संध्याकाळी रुममधे दोघेच होतो. अंधार झाला होता आणि तरी आम्ही बल्ब लावला नव्हता. डोळ्याला सवय झालेला अंधार आम्ही उजेड म्हणून वापरत होती. आम्ही खुर्च्यांत बसलो होतो नि खुर्च्यांची तोंडं एकमेकांकडे होती. अनुल्लेखून, दुर्लक्षून आपल्याच जगात राहणे हे वेंगीचं काम नव्हतं. शिवाय मी देखील घमेंडी नाही नि गांगारलेला आहे हे त्यानं जाणलं होतं. तेव्हा मला एक मानसिक दिलासा मिळावा म्हणून नि शांतता भंग व्हावी म्हणून वेंगीनं मला ४-५ मिनिटांत जुजबी माहिती विचारली - कुठला आहेस, वडील काय करतात, बारावीला किती मार्क होते, इथे का अ‍ॅडमिशन घेतली, इत्यादि. त्याच्या उत्तरादाखल मी माझ्या कुटुंबाचं इंत्यंभूत वर्णन चालू केलं - आमचे सर्वात जुने आठवणारे पूर्वज, आमचे मूळ स्थान, आम्ही कोठे कोठे राहिलो, घरी कोण कोण आहे, त्यांचे स्वभाव कसे कसे आहेत, घरात मला कोण कोण आवडतं, नाही, का, 'सांग, सख्ख्या भावानं असं करायचं असतं का?' अशी मधे मधे जबरदस्तीची सहमतीची मागणी, माझ्या दॄष्टीनं आयुष्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगाचं कथन, इत्यादि इत्यादि. हा इतकं सगळं का सांगतोय, मला का सांगतोय, आत्ताच का सांगतोय आणि व्यक्तिगत माहिती सांगायचे आपल्याला माहित असलेले सगळे संकेत का तोडतोय यातलं काहीही कळालं नसलं तरी वेंगीनं माझं सगळं कथन मनःपूर्वक, लक्षपूर्वक नि सभ्यपणे ऐकून घेतलं. मी जे काही सांगतोय त्यावर त्याच्या चेहर्‍यावर मला अभिप्रेत असे भाव नाही प्रकटले तर ते भाव प्रकट होईपर्यंत मी ती बाब खोदून खोदून सांगतोय हे पाहून त्यानं लवकरच आवरतं घेण्यासाठी आपली भावप्रकटनशैली चतुरपणे पण सभ्यपणे बदलली. नंतर मी त्याची उदगीरी पद्धतीने, तेच संकेत त्याला तोडायला भाग पाडत, अर्धाएक तास इत्यंभूत माहिती काढून झाल्यावर शेवटी या कथेच्या दृष्टीने महत्त्वाचा, जो काय संवाद झाला तो असा -
"तुझं नाव शिरोडकर आहे म्हणजे या शिरोड नावाचं गाव कुठेतरी असणार."
"दक्षिण को़कणात अरबी समुद्राच्या किनार्‍यावर कुठेतरी आमच्या पूर्वजांचं शिरोड नावाचं गाव आहे. पण आमचं तिथे काही नाही आणि मी तिथे कधी गेलो नाही."
"पण म्हणजे तू कोकणस्थ ब्राह्मण असणार. कर प्रत्यय आमच्याकडे बहुधा ब्राह्मणच लावतात."
"मी तसलं काही मानत नाही. पण हो."
"तुझ्या वडीलांनीच तुला मेटॅलर्जी घ्यायला उद्युक्त केलं असणार. द्रव्यांचं महत्त्व अ‍ॅटॉमिक रिसर्च करणार्‍या शास्त्रज्ञांना - तुझ्या वडीलांना - सोडून दुसर्‍या कोणाला कळणारंय?"
"तसं काही नाही रे. मला दुसरीकडे कुठे अ‍ॅडमिशन मिळालं नाही म्हणून इथे घेतलं."
"तुला इतक्या तरुणपणी दमा कसा काय झालाय?"
"तरुणपणी नाही, तो लहानपणीच झालाय. माझे कुटुंब माझ्या जन्माच्या वेळेसच सहकुटुंब अमेरिकेत गेले होते. तिथली भयंकर थंडी मला त्या वयात सहन झाली नाही. तेव्हापासून मला अस्थमा आहे."
"काय्य?" त्याकाळी माझ्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह आहे हे सहज दिसे, पण प्रश्न काय निघेल याचा मोठमोठ्या महाभागांनाही अंदाज घेता येत नसे. थंडीमुळे अमेरिकेतल्या सर्वच मुलांना दमा होत असेल ना, सर्वच स्थानिक दमेकरी असतीला ना, असं मी म्हणेल असं त्याला वाटलं असावं. हा त्यातली त्यात सन्मान्य प्रश्न असला असता.
"?" नुसताच प्रश्नांकित चेहरा म्हणजे उत्तर देता येण्याजोगा प्रश्न कसा काय असा प्रतिप्रश्न त्याने आपल्या चेहर्‍यावर आणला.
"मंजे तू अमेरिकेला गेलेला आहेस??" मी अमेरिका शब्द प्रचंड ठासून उद्गारला.
"हो." त्याला मी संबंधित तिथला पुढचा प्रश्न विचारेन असं वाटलं.
"अरे, ही काय छोटी गोष्ट आहे का?"हा अँगल त्याला नवा होता. एरवी त्यांचं संभाषणकौशल्य उत्तम असलं तरी त्याने अमेरिकेला जाणे मोठी गोष्ट आहे कि नाही या विषयात त्याला विशेष ज्ञान नव्हतं.
"अरे तेव्हा मी कुकुलं बाळ होतो."
"अरे म्हणून काय झालं? तरीही तू अमेरिकेला गेला आहेस हे खरंच आहे ना? आणि ही मोठी गोष्ट नाही का?"
"मी गेलो नाही, बाबा घेऊन गेले. त्यानंतर मी कधी गेलो नाही आणि लहानपणीचं मला काहीही आठवत नाही."
"अरे काय म्हणतो राव तू? मोठी गोष्ट नाही कशी?" त्याला त्या गोष्टीचं काही मोठेपण वाटत नाही हे चूक आहे हे पटवायला मी सरसावलोच होतो पण तितक्यात तो त्याच्या मुंबई गँगसोबत मेसमधे डिनरला गेला. आपला रुममेट स्वतः अमेरिका-रिटर्न्ड आहे या गोष्टीनं मी अर्ध्या हळकुंडांनं पिवळा झालो होतो. ही गोष्ट मोठी आहे हे त्याला पटत नसलं नि न पटणं चूक असलं तरी माझ्या आनंदाच्या संदर्भात गौण होतं.
आणि वेंगीनं एका उदगीरवाल्यासोबत आइसब्रेकिंगची रिस्क घेतली होती.
----------------------
दोनः
आठ-दहा दिवसांनी माझा मोठा, मधला भाऊ माझ्या रुमवर मला भेटायला, कसं चाललंय बघायला आला.
"दादा, हा वेदांग शिरोडकर. हा किनई कोकणस्थ ब्राह्मण आहे. त्याचे वडिल भौतिक शास्त्रज्ञ आहेत. आणि हा किनई अमेरिकेत जाऊन आलाय." एकही क्षण जाऊ न देता मी म्हणालो.
"हॅलो." दादा शांतपणे म्हणाला. दादाच्या चेहर्‍यावर माझ्यासारखं कोणतंही उद्दिपन नव्हतं. माझ्याशी चार गोष्टी बोलला नि दोघांना बाय म्हणून निघून गेला.
दादा गेल्यावर वेंगी मला त्याच्या नेहमीच्या सभ्य नि नम्र सुरात म्हणाला, "अरे, एवढी लांबलचक ओळख करून द्यायची काय गरज आहे?"
"मी काय चूक सांगीतलं?" मी प्रेमळपणे म्हणालो.
"असं सांगणं बरं दिसत नाही. लोकांचा गैरसमज होईल कि मला या गोष्टींची घमेंड आहे."
"घमेंड नाही, पण अभिमान असायच्या लायकीच्या गोष्टी आहेतच या."
मला समजावण्यात काही अर्थ नाही, किमान त्या घाईगडबडीत नाही, म्हणून तो तात्पुरते सोल्यूशन काढत म्हणाला, "प्लिज, तुला अभिमान करायचा असेल तर तू कर. पण इथून पुढे तू कोणालाही माझा असा परिचय तोंडासमोर करून देऊ नकोस."
मी होकार भरला. पण हे सर्व कोणत्या घोंघावणार्‍या वादळाची नांदी आहे याची वेंगीला अजिबात कल्पना नव्हती.
------------------------
तीनः
३-४ दिवस झाले. सकाळचा लख्ख प्रकाश होता. मी नि वेंगी रुममधे शांतपणे आपापली पुस्तके वाचत असावेत. दारावर टकटक झाली. वेंगीनं जाऊन दार उघडलं. ५०-५५ वर्षांचा एक ग्रामीण बांध्याचा गृहस्थ आत शिरला.
मधे येणार्‍या गृहस्थानं दारातूनच वेंगीला विचारलं,"वेदांग शिरोडकर तुम्हीच का?"
"हो. तुम्ही कोण?"
"मी अरुणच्या वडीलांच्या पंचायत समितीतलाच अजून एक ग्रामसेवक आहे."
"या ना बर्मदे काका. बसा. बसा." माझं लक्ष तिकडे गेलं. बर्‍याच दिवसानी बर्मदे काका भेटले म्हणून मी आनंदित झालो. त्यांची विचारपूस करू लागलो. आणि त्या नादात मी वेंगीच्या चेहर्‍यावर काय रिअ‍ॅक्शन चालू आहे हे पहायचं विसरलो. बहुधा तो अरुणच्या काकाने रुममधे आल्याआल्या आपली चौकशी का करावी याचे कोडे सोडवत असावा.
"भारतातल्या सगळ्या शास्त्रज्ञांचा आपल्याला फार भारी अभिमान आहे. त्यातली त्यात अणूबाँम्बवाल्यांचा सगळ्यात जास्त! पाकिस्ताननं कै जास्त खूडबूड चालू केली की टाकून द्यायचा एक!" बर्मदे काका अजूनही मला उद्देशून एकही वाक्य बोलले नव्हते. अशा प्रसंगी अगदी फिलर म्हणून का होईना काय शब्द बोलायचे असतात, वा कसले हुंकार भरायचे असतात वा चेहर्‍यावर कोणते भाव आणायचे असतात याची अजिबात काही माहिती वेंगीला नव्हती हे सुस्पष्ट दिसत होतं.
"अशा महान लोकांची पोरं जाणारच हो अमेरिकेला. कोण थांबवू शकतंय त्यांना? बामनांची पोरं असतेतच हुशार." बर्मदेकाकांना मी पाणी देत होतो. वेंगीला आपल्यासोबत काय चाललंय हे माहित नसल्यानं तो भयंकरच गोंधळलेला होता पण आपल्या सभ्य, शिस्तबद्ध, शहरी संयमाचा परिचय देत तो शांत राहिला. खाऊन, पिऊन, दुपारची ताणून देऊन, संध्याकाळी बसस्टँडपर्यंत माझ्या खांद्यावर गाठोडं देऊन बर्मदे काका उदगीरला रवाना झाले. बर्मदे काका जाता वेंगीकडे निर्देश करत मला म्हणाले, "मोठ्ठ्या लोकांमधे पडलायेस. तू ही काहीतरी मोठं करून दाखव. जोशीकाकांचं नाव काढून दाखव." मी रुममधे परतलो.
वेंगी मला आव न आणलेल्या, ओरिजनल शांतपणे म्हणाला, "माझी ओळख तू तुझ्या पाहुण्यांना देऊ नकोस असं मी म्हणालो होतो नि तू ही हो असं म्हणाला होतास."
"हो."
"मग?"
"मग काय?"
"मग या काकांना इतकं सगळं कसं काय माहीत?"
"मी सांगीतलं नाही त्यांना."
"दादांनी सांगीतलं?" संभवतः चूक करणार्‍या मंडळीसाठी मी एरवी कधीही एवढे आदरार्थी अनेकवचन वापरले नसते.
"दादाला हे अनेक वर्षे भेटले नाहीत. हॉस्टेल शिवाजीनगर बसस्टँडला जवळ आहे म्हणून इकडेच आले. दादाकडे कोथरुडला कोणी नाही जात."
"मग कोणी सांगीतलं?"
"अण्णांनी सांगीतलं असणार." मी म्हणालो.
"..."
"काय झालं?"
"माझ्याबद्दल तू तुझ्या वडिलांना सांगीतलंस?"
"एवढी मोठी गोष्ट मी त्यांना सांगणार नाही असं कसं होईल?" माझा प्रांजळपणा पाहून त्याला पुढे काय बोलावं ते सुचेना. शेवटी एक मिनिट शांत राहून, महत्त्वाचे मुद्दे अगोदर या तत्त्वावर, म्हणाला,"माझे वडील बी ए आर सी मधे नक्की काय काम करतात हे मलासुद्धा माहित नाही, मग तू तुझ्या वडीलांना ते अणुबाँब बनवतात असं का म्हणालास?"
"मी असं काही म्हणालो नाही. पण त्यांना मी जे काही द्रव्यांच्या भौतिक गुणधर्मांच्या संशोधनाबद्दल म्हणालो त्याचा अर्थ अण्णांनी असा काढला असावा." त्याकाळात
१६ रुपये प्रतिमिनिट (म्हणजे ५% महागाईदराने २०१८ मधे ५६ रु प्रतिमिनिट इतक्या दराने!) एसटीडीचे पैसे मोजून लोक गावाकडच्या ग्रामसेवक बापाला भौतिकशास्त्र शिकवताहेत हे त्याला पचेना.
"आणि त्यांनी हे सगळं बर्मदे काकांना सांगीतलं? त्यांच्या जिगरी दोस्ताला?" बर्मदेकाका माझ्या वडीलांचे जिगरी दोस्त आहेत असे उल्लेख ते वेंगीसमोर करत होते.
"तसं नाही. अण्णा काल कौतुकानं म्हणत होते कि हे त्यांनी सगळ्या पंचायत समितीमधे सांगीतलं आहे."
"...." वेंगी किंबहुना उदगीर परिसर कसा दिसत असेल नि तिथे सध्याला काय खळबळ चालू असेल याची आपल्या मनचःक्षूंनी कल्पना करत असावा.
"काय?" ती स्तब्धता पाहून मी विचारलं.
"म्हणजे आता किती लोकांना हे कळलं असेल?"
"१००-१२५ ग्रामसेवक, तितकेच तलाठी, एक बीडीओ. एक तहसीलदार. यांच्या दुप्पट कारकून नि या सर्वांच्या घरचे." मी प्रामाणिकपणे हिशेब जोडला. माझे वडील पंचायत समितीत खूप लोकप्रिय आहेत हे सांगायला जातो तोच त्याने मला बोटाने थांबायची खूप केली. सेलेब्रिटी स्टॅटस मिळवायची आपली सर्वसाधारण शहरी इच्छा असतेच. पण फार विचित्र मार्गाने पूर्ण होत आहे याचं वेंगीला टेंशन आलं होतं. त्याच्यामते परिस्थिती चिघळत होती नि काहीतरी करणं आवश्यक होतं. अर्थातच त्याच्या सुसभ्य, सुसंस्कारित, निर्मळ नागरी मूल्यांच्या आधारे मला त्याच्या कोकणस्थ, शास्त्रज्ञपुत्र आणि अमेरिकायात्रा तिन्ही प्राप्ती फार काही विशेष नाहीत आणि त्यांचा डंका पिटणे त्वरित थांबवले गेले पाहिजे असं पटवून द्यावं असं त्यानं ठरवलं.
"कोकणस्थ ब्राह्मण असण्यात विशेष काय?" वेंगीनं विचारलं.
====================
(अवांतरः.........................
हे अवांतर वाचल्याशिवाय या लेखाचा पुरता आनंद तुम्हाला येणार नाही. लातूर नि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या ज्या ज्या गावांत मी राहिलो तिथे ब्राह्मणाचे आमचे तेवढे एकच कुटुंब होते. त्यामुळे बालपणीची मूळ संकल्पना ब्राह्मणांचे वर्गीकरणच नसते अशी असायची. त्यानंतर आम्हाला वेगवेगळे पाहुणे भेटले तेव्हा जोशी, कुलकर्णी आणि देशपांडे अशा तीन मूळ आडनावांचे ब्राह्मण हे एक वर्गीकरण करता आलं. तर ते कधी कधी गावाचं नाव + कर असं आडनाव लावतात असं कळलं. त्यानंतर एका भागवत सप्त्याला निलंग्याला गेलो होतो. तिथे आईकडच्या एका प्रतिष्ठित काकांनी मला माझे गंध निरखीत विचारलं, "मला काय रे तुम्ही शैव का?"
"आईला विचारून सांगतो." मी म्हणालो.
"आई, आपण शैव ब्राह्मण आहेत का?" रात्री मी आईला विचारलं.
"नाही रे. आपण स्मार्थ ब्राह्मण आहोत."
"शैवांचा महादेव. मावशीच्या घरच्या वैष्णवांचा विष्णू. आपला देव कोण?"
"कोणीच नाही." आई म्हणाली. आपण बिनदेवाचे ब्राह्मण आहोत हे मला थोडं विचित्र वाटलं. त्या शैव वैष्णवांप्रमाणे कोण भारी हे ठरवायच्या लढाईत आपण कोणता मोर्चा सांभाळायचा हा प्रश्न उभा राहिला.
"आम्ही बिनादेवाचे स्मार्थ ब्राह्मण आहोत." दुसर्‍या दिवशी त्या काकांना मी सांगीतले.
"गाढवा स्मार्थ नाही स्मार्त असतं ते."
"ठिकंय"
"तू कुठल्या नक्षत्रातला आहेस?"
"आईला विचारून सांगतो."
आमच्या घरात आई एकटीच ब्राह्मण आहे, म्हणजे धर्माकर्माने देखील असं म्हणायचंय. या प्रसंगाच्या वेळेस मी ८-१० वर्षांचा असेल. मेट्रोंमधली ब्राह्मणांची पोरं नशीबवान असतात. त्यांना धर्माकर्माचं काही पाठ वा माहीत असणं तितकं अपेक्षित नसतं. गावाकडे, तालुक्यांकडे परिस्थिती वेगळी आहे. सबंध संगत अब्राह्मण असल्यानं, धर्मकर्म काही नसल्यानं ब्राह्मण पाहुण्यांमधे माझा उठता बसता अपमान व्हायचा. तेव्हा मी नम्रपणे आईला विचारुन सांगतो म्हणून सुटका करून घ्यायचो.
--------------------
पुण्यात आल्यावर सुरुवातीला अ‍ॅडमिशनही नव्हतं आणि अर्थातच हॉस्टेलही नव्हतं. त्यामुळं मी भावासोबतच पेठांमधे राहत असे. भाऊ सिएच्या आर्टीकलशिपला गेला कि मी आळसशीर पद्धतीने उठून, तयार होऊन, शनिवार पेठेतल्या नेरकर बाईंच्या मेसमधे जेवायला जाई. मर्यादित पैशांत अमर्यादित जेवण असा अंमल असल्यामुळं मी माझ्या मर्यादित पोटात अमर्यादित अन्न रेटत असे. मेसमधे येणारे सर्वजण खूप घाईत असत नि मी कोणासही एक अक्षरही बोलायला घाबरत असे. मी फक्त अशोक जोशींचा लहान भाऊ आहे इतकंच बाईंना नि एजून ४-५ जणांना माहित होतं. नेरकर बाई प्रेमळ होत्या. कोण किती खातोय इत्यादि निरीक्षणे करायच्या नाहीत. अन्नाचा दर्जा उत्तम होता. इतक्या प्रेमानं खाऊ घालूनही त्या नफ्यात कशा राहतात असा प्रश्न मला अनेकदा सतावत असे.
तर उन्हाळा होता. दुपारची वेळ होती. एक वाजले असावेत. भुकेजलेले सारे ब्रह्मचारी एका गोल सर्कल करून पटापट जेवणं उरकून घेत होते. मी देखील खाली मान घालून दोन हातांनी पोळ्या तोडत गपचूप जेवत होतो.
"काय हो जोशी, तुम्ही देशस्थ का कोकणस्थ?" नेरकर बाईंनी त्यांच्या अतिशय प्रेमळ आवाजात आदरपूर्वक विचारलं.
"आईला विचारून सांगतो." मी हे उत्तर एक जैविक प्रतिक्षिप्त क्रिया असल्याप्रमाणे वेळ न दडवता अत्यंत सहजपणे आणि त्या सर्व लोकांना अनपेक्षित अशा शांतपणे दिलं.
बस्स! तिथे एकच हास्यकल्लोळ माजला. सगळे माझ्याकडे बघायला लागले नि बराच वेळ जोरजोरात खो खो हसायला लागले. तीन-चार जणांना प्रचंड ठसका लागला नि त्यांच्या तोंडातलं अन्न त्यांच्या नि संभवतः शेजार्‍यांच्या ताटांत पडलं. नेरकर बाई आणि त्यांची स्वयंपाकीणबाई देखील डोळे विस्फारून माझ्याकडे पाहू लागल्या. देशस्थ कि कोकणस्थ या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी केलेलं विधान देखील एक पर्याय असू शकतं हे कोणाला पचलंच नव्हतं. आपल्या प्रतिष्ठेला आणि प्रतिमेला काहीतरी प्रचंड गालबोट लागलं आहे आणि दुरुस्तीसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे हे मला लागलीच जाणवलं.
मी पुढाकार घेतला, "देशे स्थियति इति देशस्थ:. भारत देशात राहणारा प्रत्येक जण तो देशस्थ. कोकणे स्थियति इति कोकणस्थ:. कोकणात राहणारा प्रत्येक जण तो कोकणस्थ. त्यामुळं प्रत्येक कोकणस्थ व्यक्ति हा देशस्थ असेलच! तेव्हा तुमचा प्रश्न विसंगत वाटतो." परिस्थिती सावरायची म्हणून मी पुस्तकी भाषा नि स्वर वापरून टाकला. आता मात्र प्रत्येक जण पोट धरधरून नियंत्रणाच्या पलिकडे हसू लागला. नेरकरबाईंच्या डोळ्यातही हसून हसून पाणी आलं. बूट काढून आमची पंगत उठायची वाट पाहत असलेले दुसरे मेसकरी देखील जिन्यात जोरजोरात हसू लागले. शनिवार पेठेत आढळलेला, जोशी आडनावाचा, १८ वर्षांचा, संस्कृत तत्सम समासांचा सुयोग्य विग्रह करणारा, सर्वसाधारण पार्श्वभूमी असलेला, मराठी ब्राह्मण व्यक्ति आपण देशस्थ आहोत कि कोकणस्थ हे सांगू शकत नाही हा त्यांच्यासाठी एक द इव्हंट होता.
"जोशी, तुम्ही ब्राह्मणच का?" एका बेरकी पुणेकराने आता तरी मी लाजून गप्प बसेल या आशेने विचारलं.
"हो." मी पुन्हा त्याच शांततेनं नि संयमानं उत्तर दिलं.
त्या प्रसंगी इतक्या लोकांना इतके ठसके बसले होते की जेवणं चालू ठेवावीत का नविन ताटं घ्यावीत असा एक संभ्रम तेथे निर्माण झाला. क्षणभर शांतता निर्माण झाली तरी तिथे अचानक पुन्हा लोक अनावरपणे हसू लागायचे.
"नेरकर बाई, जेवणं होईपर्यंत या प्राण्याला आता एक अवाक्षरही बोलू नका."बर्‍याच वेळानं वैतागून एक घाईतला नि गंभीर पुणेकर उद्गारला नि तो प्रसंग तिथे संपला.
संध्याकाळी दादा घरी आल्यावर मी त्याला हे काय प्रकरण आहे असं विचारलं. त्यानं मला जुजबी माहीती दिली नि त्याच्या पुण्यातल्या अल्पस्वल्प काळात त्याची कोकणस्थ ब्राह्मणांची देशस्थ ब्राह्मणांबद्दल असलेली मतं नि वागणूका यांच्याबद्दल असलेल्या धारणा अवधारणा सांगीतल्या.
दादामधे नि माझ्यामधे जन्मापासूनच एक मूलभूत फरक आहे. परजातींबद्दल वा परसंस्कृतींबद्दल दादाच्या माझ्या तुलनेत जास्त अवधारणा असतात पण तो स्वतः तिथे जातो तेव्हा तो ज्या परिपक्वतेने वागतो त्यामुळं त्याला ते अत्यंत सन्मानानं वागवतात. याउलट मी सर्व परसंस्कृतींच्या वाईट बाबी पूर्ण दुर्लक्षतो नि या संस्कृतींना डोक्यावर घेतो. मात्र मी प्रत्यक्ष तिथे जातो तेव्हा ती मंडळी एक तर मला गिनत नाहीत वा माझ्या त्यांच्या संस्कृतीला डोक्यावर घेण्याला माझ्यासकट पायदळी तुडवतात. गांभीर्य नि स्वप्रतिष्ठा राखणं प्रत्येकाचा प्रांत नव्हे. असो.
तर या संवादातून मला भारताच्या वा महाराष्ट्राच्या इतिहासात जन्माने कोकणस्थ ब्राह्मण असणार्‍या अनेक व्यक्तिंची नावे कळली. म्हणजे मला या व्यक्ति नि त्यांची कर्तृत्वं अगोदरपासूनच ठावी होती पण या व्यक्ती माझ्यासारख्या बहुसंख्य सर्वस्थ देशस्थ नसून अल्पसंख्य मिस्टिकल कोकणस्थ आहेत हे कळलं. झाल्या प्रसंगामुळं पुण्यात तोंड उघडायचा मी प्रचंड धसका घेतला होता पण सोबत मला डोक्यावर घ्यायला एक परसंस्कृती देखील मिळाली होती.
अवांतर समाप्त..................)
====================================
"तसं मला माहित आहे कि जातीपातीत काही ठेवलं नाही, पण मला अलिकडेच कळलं आहे कि महाराष्ट्रातले जितके कितके महान ब्राह्मण आहेत ते सगळे कोकणस्थ आहेत. गोखले, आगरकर, रानडे, विनोबा, साने गुरुजी, धोंडो केशव कर्वे, टिळक, पेशवे, इ इ." मी वेंगीला म्हणालो.
"मला यांच्याबद्दल फार तर फार जुजबी माहिती आहे. आमच्या कँपसमधे कोण मराठी आणि कोण अमराठी इतकंच आम्हाला कळायचं. आणि देशस्थ ब्राह्मणही महान असणारच ना?"
"उदाहरणं?" मी विचारलं.
त्याला सुचेनात! ही माहिती उपयुक्त असेल असा विचारही त्यानं कधी केला नव्हता.
"अरे पण लाखोंनी कोकणस्थ ब्राह्मण असतात आणि सगळे सर्वसामान्य असतात. तेव्हा तू मला असा वेगळा पाडून कोकणस्थ कोकणस्थ इतक्या कौतुकानं का म्हणतोस?" 'ओंगाळवाण्या कौतुकानं' हा शब्द त्यानं सभ्यपणे टाळला.
"मला व्यक्तिगत रित्या भेटलेला तू पहिलाच कोकणस्थ ब्राह्मण आहेस म्हणून."
"इथून पुढे प्लिज असं करू नकोस." वेंगीला आपल्याला "प्लिज" म्हणावं लागतंय हे काही बरोबर नव्हतं नि मी लगेच त्याचं ऐकायचं ठरवलं.
"वडील शास्त्रज्ञ असणं आणि त्याच्यामुळे मी अमेरिकेत जाणं यात माझं कर्तृत्व काय आहे?" त्यानं दुसरा मुद्दा घेतला.
"वडील शास्त्रज्ञ आहेत याचा तुला अभिमान असला पाहिजे. खरं तर तूच तसं अभिमानानं आम्हा मित्रांना सांगितलं पाहिजे. तू शास्त्रज्ञांच्या कॉलनीत वाढला आहेस म्हणून तुला कौतुक नसलं तरी आम्हाला असणं साहजिक आहे."
"तुमच्या उदगीरला शास्त्रज्ञ नसतील, पुण्या-मुंबईत ढिगानं आहेत."
"आणि अमेरिकेचं तिकिटच कित्ती असतं!" किमान महागडं तिकिट काढणं तरी मोठी गोष्ट हे ठसवायचा मी प्रयत्न केला.
"इथल्या लोकांच्या उत्पन्नाच्या मानानं इतकंही नसतं. आणि कंपन्या देतात मोस्टली तिकिटं आणि खर्च."
प्रत्यक्ष त्यावेळी मला वेंगीच्या बोलण्यामुळं या गोष्टी कमी नवलाच्या अजिबात वाटल्या नाहीत तरी तो म्हणतो तर आपण बोलायचं नाही असं मी ठरवलं. आता त्याला थेट माझ्याकडून कोणता धोका नसला तरी देवानं वेंगीचं नशीब थोडं खडतरच लिहून ठेवलं असावं.
----------------------------
चारः
अजून आठवडाभराने आमचे एक पाहुणे एक दिवस राहायला आले. वेंगीला ते स्वच्छ लखलखित कपड्यातले, व्यवस्थित भाषा बोलणारे, उच्चशिक्षित, सामान्यज्ञान असलेले, तारतम्य असलेले इ इ वाटले. आणि त्यांनी आल्या आल्या दिसला शिरोडकर नि केली आरती असला प्रकार केला नाही म्हणून वेंगी आरामात दिसत होता. मी "हा वेदांत" इतकी देखील ओळख करून दिली नाही. ते ही वेंगीकडे पाहतही नव्हते नि केवळ माझीच चौकशी करत होते, माझ्याशीच गप्पा मारत होते. अर्थातच त्यांच्या अशा वागण्यामुळे वेंगीच्या वागण्यातलं नॉर्मलपण माझे पाहुणे असतानाच्या नॉर्मल मर्यादांच्या पलिकडचं झालंय याची जाणिव त्याला नव्हती. दुपारी जेवण करून आल्यानंतर पाहुणे रुममधे खुर्ची थेट वेंगीच्या टेबलाकडे करून बसले नि एकटक त्याच्या पाठीकडे पाहू लागले. लवकरच वेंगीच्या लक्षात आलं कि आपलं निरीक्षण केलं जातंय. तो काँशस झाला. पण बहुतेक तो आतापर्यंत अपात्र कौतुकांच्या प्रसंगांस कसे सामोरे जावे हे शिकला होता म्हणून त्याचा आत्मविश्वास कायम होता.
"शिरोडकर आपणच का?" खूप मोठ्या शांततेनंतर पाहुण्यांनी अचानक अत्यंत करारी आवाजात विचारलं.
"हो काका."
"तुम्ही अमेरिकेच्या अलिकडच्या किनार्‍यावर गेला होतात कि पलिकडच्या?" प्रश्नांमधला दिशेचा भाग सोपा असला तरी प्रश्नांची दिशा वेंगीसाठी अगम्य होती.
शक्य तितके आपले भाव शांत राखत वेंगी उत्तरला, "अलिकडच्या."
"आमचा राहुल तिकडच्या पलिकडच्या किनार्‍यावर गेला होता." एका रुक्ष, कोरड्या, मोठेपणाच्या आवाजात पाहुण्यांनी जाहीर करून टाकलं. इथे १५ व्या शतकात खंडांचा शोध घेणार्‍या दर्यावर्दींच्या स्पर्धेत वेंगीला इच्छेविरुद्ध ओढून पराभूत केलं जात होतं.
"हो का? छान!" वेंगी गांगारून म्हणाला.
"आणि तुम्ही वडीलांसोबत गेला होतात ना? राहुल स्वतः गेला होता."
इथे कोणता अविर्भाव सुट होतो ते माहित नसल्यामुळं वेंगी सर्वच प्रकारचे अविर्भाव ट्राय करून पाहत होता. पण तरीही तो इतका चांगला, संयमी नि सभ्य होता कि त्यानं ज्याच्यामुळं ही नौबत आली त्याच्याकडं, म्हणजे माझ्याकडं डोळे वर करून पाहिलं देखील नाही.
पाहुण्यांची सूटकेस घेऊन जाताना बसस्टँडवर मी त्यांना विचारलं, "मामा, राहुल कोण?"
"अरे आपला राहुल कासराळीकर. माझा मुलगा दहावीला असताना तो महाराष्ट्रात पहिला आला होता. त्यानं उदगीरचं नाव केलं होतं राज्यात."
पाहुण्यानं वेंगीला दाखवलेला ताठरपणा मला आवडला नव्हता पण तो विषय माझ्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर पडत होता. एकतर ह्या पाहुण्याचा नि राहुलचाच काही एक संबंध नव्हता. राहुलचा लहान भाऊ ययाती नि मी एकदा दोनदा भेटलो होतो. राहुल म्हणजे उदगीरची शान इत्यादि होता नि त्याचं नाव असं वापरायचं पटण्यासारखं नव्हतं. वाटलं परत आल्यावर वेंगी झापणार. पण त्याची मानसिक तयारी फार उच्च प्रतलावरची दिसली. तो एकदम शांत होता. मी किंवा माझे भेटकर्ते काही चूक करतोय असं अजूनही मला फार काही वाटत नव्हतं हे त्याला उमगलं होता.
थोड्या वेळ्याने तो मला म्हणाला, "तू तुझ्या जागी बरोबर असशील. पण तुला एक गोष्ट निक्षून सांगतो. तुझ्या कोणत्याही पाहुण्याने आपल्या रुममधे येऊन माझ्याबद्दल किंवा माझ्यासोबत गप्पा करता कामा नये."
"ठीक आहे." मी वचन दिलं.
--------------------------------------
पाचः
यानंतर एखादा महिना अतिशय प्रसंगहीन पद्धतीने गेला. त्यानंतर उदगीरवरून एक तरूण, होतकरू, हुशार, अभ्यासू, निर्व्यसनी, सुसंगतींत वाढलेला, प्रत्येक मुलीच्या नावामागे ताई लावणारा, चांगले मार्क्स घेणारा, आमच्यासारख्या प्रथितयश ज्येष्ठांचे मार्गदर्शनकण वेचणारा, पालकांनी रॉकेटावलेला, इ इ प्रकारचा एक गावबंधू ३-४ दिवस रुमवर राहायला आला. मध्यंतरीच्या काळात खूप सगळे कोकणस्थ ब्राह्मण, शास्त्रज्ञ आणि वारंवार अमेरिकेचा उल्लेख करणारे लोक भेटल्यामुळे माझेही बर्‍यापैकी प्रबोधन झाले होते. त्यामुळे या गावबांधवाला मी जवळजवळ दरडावलंच कि वेंगीला कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब करायचं नाही. म्हणजे नक्की काय काय करायचं आणि काय काय नाही त्याची फ्रेमवर्क समजावून सांगीतली. वेंगीदेखील त्याला टाळून असे, पण त्यानं त्याच्या सभ्यतेच्या गुणवत्तेचा कोणताही दर्जा घसरू दिला नाही. शेवटच्या दिवशी गावबांधवाला बसस्टँडला सोडून मी बिनधास्त रुमवर आलो. पाहतो तर काय, वेंगी भडकणार होता. आता भडकला होता ऐवजी भडकणार होता यासाठी म्हणायचं कि प्रत्यक्ष कसं भडकायचं असतं याची त्या अतिसभ्य प्राण्याला अजिबात कल्पना नव्हती. सात्विक संताप त्याच्या चेहर्‍यावर अवतरत आणि विरत होता.
"काय रे हे तुम्ही असले कसले?" वेंगी आपल्या आवाजाचा पीच वर घेत म्हणाला.
"काय झालं?"
"तुझा गावबंधू"
"त्यानं काहीच केलं नाही. मी त्याला सोडूनही आलो."
"तू त्याला घेऊन गेलास तेव्हा तो एकटाच परत आला दोन मिनिटांनी" मला आठवलं, तो चहाही पित नसे नि मी चहासाठी टपरीवर थांबलो असताना तो जाऊन देवाच्या पाया पडून येतो म्हणून पाच मिनिटं गेला होता.
"मग?"
इथे वेंगीला एक क्षणभर भडकता आलं. "तो काय म्हणाला माहीतंय?"
"काय?"
"तो म्हणाला, 'जीवनात मोठे कर्तृत्व गाजवण्यामधे दम्यासारख्या तुच्छ गोष्टी आड येऊ शकत नाहीत. तुमच्या वडीलांना माझ्याकडून अभिनंदन सांगा आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा.' त्याला माझा दमा काढायची काय गरज होती? मूर्ख आहे का तो? कळत नाही का त्याला? असं बोलतात का?" वास्तविक वेंगी जेव्हा बोलत असे तेव्हा आमचा गावबंधू त्याचे नि त्याच्या मित्रांचे बोलणे भयप्रद अशा भावभक्तीने आणि एकाग्रतेने ऐकत असे हे आमच्या दोघांच्याही नजरेतून सुटलं होतं.
"सॉरी यार वेंगी. तो निघताना खूप इमोशनल झाला होता. त्याच्या मनात जे होतं ते त्यानं अगदी शेवटपर्यंत रोखलेलं दिसतंय. लहान आहे तो, कळलं नसेल."
मला कळल, मी "सॉरी" म्हणालो हे बघून वेंगी गावबंधू विसरला, भडकणं विसरला आणि खुष झाला. आम्ही दोघे वडापाव खायला पुन्हा टपरीवर गेलो.
त्यानंतर माझ्या शहरीकरणाचे इतके मोठे झटके खुद्द वेंगीला कधी बसले नाहीत. पहिल्या वर्षानंतर माझी ब्रँच बदलली. नंतर कंपनीत अर्धावेळ सँडविच इंजिनिअरिंग असल्यानं कॉलेजात वा हॉस्टेलवरही मी तितका नसे. १९९८ ला पासाऊट होताना वेंगीची व्यक्तिगत भेट घेऊन निरोप दिला असं सुद्धा आठवत नाही.
--------------------------------------------------
सहा:
३-४ वर्षांखाली अचानक एका फेसबूक पोस्टखाली "यू अँड वेदांग शिरोडकर लाईक्ड धिस पोस्ट" असं लिहून आलं. त्याची प्रोफाइल उघडली, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ती कधी कन्फर्म झाली माहित नाही पण फेसबुकच्या चालीरितीप्रमाणे १-२ वर्षेतरी आम्ही फोन असो कधी पर्सनल मेसेज देखील केला नाही. पण मधेच एकदा सवडीत असताना वेंगीची एक पोस्ट दिसली. तो नेहमीप्रमाणे अमेरिकेतल्या कोणत्यातरी अभयारण्यात गेलेला. खूप सारे फोटो काढलेले. प्रत्येक फोटोखाली निसर्गाची खूप सारी जालावर असलेली, नसलेली माहीती लिहिलेली. मला निसर्गाचे असे फोटो काढणारे लोक आवडतात. अनप्रोफेशनल का असेनात मी देखील आवर्जून काढतो. त्याला एक कमेंट लिहिली. 'फोटो फार सुरेख आहेत. तुझी लिहायची पद्धत खूप आवडली. लोक टिपिकल बोरिंग पर्यटनाच्या जागी जातात. ब्ला ब्ला ब्ला.' फेसबूक बंद करून
पटकन कामाला लागलो. संध्याकाळी घरी जाताना बायकोचा फोन आला, 'माझी एक कॉलेजची मैत्रीण आलीय. लवकर आलास तर तूही भेटशील'. कॉलेजची मैत्रिण म्हटल्यामुळं मला दुपारी केलेल्या कमेंटची आठवण आली. माझी कमेंट कामापेक्षा सविस्तर आणि स्तुतिपर होती हे क्लिक झालं आणि मनात एक असह्य खजिलतेची भावना प्रकट झाली. वेंगी नक्कीच वैतागला असेल. माणसं चाळीशीत पोचून सुधरत नाहीत, त्यांना अक्कल येत नाही असा तो विचार करत असेल असं वाटलं. त्याचा रिप्लाय आला असेल का, काय आला असेल याची हुरहुन्नरी होती. रात्री मैत्रीण गेल्यावर फेसबुक उघडलं. वेंगीचा मेसेज होता. "जोश्या, हाच खरा टुरिझम आहे. अमेरिकेत नॅशनल पार्क खूप नि खूप वैविध्यपूर्ण आहेत. त्यांचं सौंदर्य .... ब्ला ब्ला ब्ला..." प्रतिसाद माझ्या कमेंटपेक्षा दुप्पट मोठा होता. जीव भांड्यात पडला नि बिनघोर झोप लागली.
(सत्यकथा)

कथाअनुभव

प्रतिक्रिया

आमोद's picture

17 Feb 2018 - 5:33 pm | आमोद

छान

अमोल काम्बले's picture

17 Feb 2018 - 5:37 pm | अमोल काम्बले

मस्त मजेशिर अनुभव !!!!!

अमितदादा's picture

17 Feb 2018 - 6:59 pm | अमितदादा

भारीच....आवडले

पैसा's picture

17 Feb 2018 - 7:40 pm | पैसा

मस्त!

गवि's picture

17 Feb 2018 - 8:27 pm | गवि

लव्हली..

arunjoshi123's picture

18 Feb 2018 - 9:25 pm | arunjoshi123

गविंचा पण धन्यवाद.

आनंदयात्री's picture

17 Feb 2018 - 8:45 pm | आनंदयात्री

वाह! जबरदस्त मजा आली जोशीबुवा. तुमचे ललित लेखन नेहमीच आवडते. हे इतके आवडले कि सौना वाचुन दाखवले. अर्थात या अश्या आठवणी वाचल्यावर माझे सगळे नवे जुने (जालीय-नॉन जालीय) वेंगी आठवले नाही तर नवलच!

-
(गावाकडचा)
आंद्या जोशी

arunjoshi123's picture

18 Feb 2018 - 2:19 pm | arunjoshi123

धन्यवाद.
गावाकडची पार्श्वभूमी म्हणजे एक औरच चीज आहे. नै का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Feb 2018 - 9:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मनोगत !

एखाद्या गोष्टीचे कोणाला काय वाटते, कोणाला काय. एकदा बोलून/लिहून झाल्यावर बर्‍याचदा आपणच विचारांना नसते फाटे फोडत "त्याला काय वाटले असेल ?" याची शंभर (आणि त्यातली बहुतेक सगळी प्रतिकूल) उत्तरे तयार करकरून आपले डोके खराब करू घेतो. :)

arunjoshi123's picture

18 Feb 2018 - 2:22 pm | arunjoshi123

धन्यवाद.
समोरच्याला काय वाटत असेल याचा विचार अनेकदा जरुर करावा असं वाटतं. आपण देखील अनेकांचे समोरचे असतोच ना?
आणि समोरच्याचा अजिबात विचार न करता जगायला एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास देखील आवश्यक असतो.

सुखीमाणूस's picture

17 Feb 2018 - 11:07 pm | सुखीमाणूस

गावाकडच्या मुलांच भावविश्व आणि त्यातल्या गमतीजमती छान लिहिल्या आहेत.
लेख दोन भागात लिहायला हवा होतात.

दोन भागात लिहीणं अवघड काम आहे. एकदा पूर्ण दोन भागांत प्रकाशित करणं कदाचित शक्य आहे. यावेळेस व्याकरण, फ्लो, वाक्यरचना, वेलांट्या, उकार इ इ करता ३-४ पुन्हा पुन्हा वाचून पोस्ट केला तरी ७-८ चूका दिसतच आहेत.
-----------------------
वाचकांच्या प्रतिक्रिया दोन भागांत हाताळणं अवघड वाटलं. असो. हमने फुरसत से पढने वालों के लिए ही लिखा था.

सुखीमाणूस's picture

19 Feb 2018 - 10:10 am | सुखीमाणूस

शुद्ध लेखनासकट संगणकावर लिहिणे वेळ खाऊ काम आहे.
तुमची लेखनशैली खूप मस्त आहे.

शाम भागवत's picture

19 Feb 2018 - 2:20 pm | शाम भागवत

मोठा लेख असेल तर manogat.com वर शुध्दलेखन सुविधा वापरणे सोपे जाते. नंतर येथे चिकटवता येते.

ते बंद आहे असं ऐकलंय. बंद स्थळांचा नविन मेंबर बनतो का?

शाम भागवत's picture

19 Feb 2018 - 10:44 pm | शाम भागवत

बंद नसावे. लोक वापरत नसावेत इतकेच. पण सदस्य होता येते.आत्ताच प्रयत्न केला. नव्याने सदस्य होता येते.

शाम भागवत's picture

19 Feb 2018 - 10:49 pm | शाम भागवत

आता हे सदस्यत्व रद्द करायचे काम करायला लागणार आहे.

कापूसकोन्ड्या's picture

18 Feb 2018 - 10:41 am | कापूसकोन्ड्या

खुप छान लेख, कथा, प्रकटन किंवा मुक्तक काहीही म्हणा
प्रत्यय मात्र एक कविता वाचल्याचा आला.
खूप छान

चला आमच्या साहित्यात एका कवितेचा देखील समावेश झाला. धन्यवाद.

पद्मावति's picture

18 Feb 2018 - 2:13 pm | पद्मावति

मस्तं लिहिलंय.

सर्व वाचकांचा धन्यवाद.

Nitin Palkar's picture

18 Feb 2018 - 7:20 pm | Nitin Palkar

वाचकांचा धन्यवाद असं मुद्दाम लिहिलयत का? 'वाचकांना धन्यवाद'...वाचकांचा धन्यवाद असं नाही म्हणू .... (थोडीशी गम्मत) लेखन लैच आवडल्यालं हाये.

उदगीरला असंच मंतात हो. काय राव, लोकांनी धन्यवाद देणं पण अवघड करून ठेवलंय.

लक्षात घ्या, इथे लोकांनी मंजे वाचकांनी मला धन्यवाद असं अभिप्रेत नाही. लोकांनी मंजे तुम्ही अवघड करून ....

बा द वे, पुण्याच्या मराठीचं उदगीरीकरणं करणं हा आमचा एक क्लँडेस्टाईन अजेंडा आहे.

Anand More's picture

18 Feb 2018 - 7:24 pm | Anand More

लेखकांचा धन्यवाद ;-)
गोड लिहिलंय. मी हॉस्टेलात कधी राहिलो नाही पण तुमच्याबरोबर होतो असं वाटलं.

arunjoshi123's picture

18 Feb 2018 - 9:21 pm | arunjoshi123

तुमचा धन्यवाद

आमोद, अमोल, अमितदादा, पैसा, पद्मावती यांचे अनेक धन्यवाद.... हा हा

प्रदीप's picture

18 Feb 2018 - 9:57 pm | प्रदीप

स्वतःकडे कमीपणा घेऊन, जग पहातांना जे काही घडले त्याचे अतिशय प्रांजळ टिपण तुम्ही येथे केले आहे. हे सोपे नव्हे, आणि त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तितके थोडेच. तसेच तुमची लेखनशैली अतिशय सहजरीत्या चटपटीत आहे. वाचतांना मजा आला.

नावावरून व्यक्तिचित्रण -'एन भागात' क्रमशः वगैरे देऊन, व येथील आबालवृद्धांची वाचतांना आसवे काढणारे -असावे असे वाटले होते, त्या मिपाच्या 'व्यक्तिचित्रण- परंपरेस' छेद दिल्याबद्दल आभारी आहे. पण त्याचबरोबर, लिहीतांना पुढे काहीही नोंदवण्यासारखे नाही, हे स्वतःला माहिती असतांनाही उगाच 'क्रमशः' टाकून, नंतर अनेक दिवस/महिने/वर्षे, '"शिरोडकर"चा पुढला भाग केव्हा टाकताय?' असे विचारायची आम्हास सोय न ठेवल्याबद्दल निषेध! :)

स्वतःकडे कमीपणा घेऊन, जग पहातांना जे काही घडले त्याचे अतिशय प्रांजळ टिपण तुम्ही येथे केले आहे.

प्रतिसादांत माणसाला कधी कधी काही ओळींची अपेक्षा होते. ती पूर्ण केल्यानं प्रतिसाद खूप आवडला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Feb 2018 - 10:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त आवडला शिरोडकर,
त्याला वाचायला दिलात की नाही हा लेख?
पैजारबुवा,

arunjoshi123's picture

18 Feb 2018 - 10:55 pm | arunjoshi123

देणार नाही तर कसं हो?
गडी लै गहिवरून आलेला. त्याला एवढ्या डीट्टेलवारी मी लक्षात ठेवला असेल असं असं बापजन्मी वाटलं नव्हतं.

चामुंडराय's picture

18 Feb 2018 - 11:08 pm | चामुंडराय

छान लिहिलंय अजो सर !

मी देखील कधी हॉस्टेलला राहिलो नाही परंतु होस्टाइल मित्रांकडे पडीक असायचो त्यामुळे काही गोष्टी रिलेट करता आल्या.
बादवे, या सुंदर लेखासाठी तुमचा धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Feb 2018 - 11:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

होस्टाइल की हॉस्टेलाईट ? या दोन शब्दांचे अर्थ फार वेगळे आहेत.

चामुंडराय's picture

18 Feb 2018 - 11:41 pm | चामुंडराय

:)

त्या हॉस्टेलाईट मित्रांमधला एक गावाकडचा रांगडा गडी होता. सुरवातीला त्याची भाषा आणि एकंदरीत पर्सोना बघून आम्ही त्याला जरा बिचकून असायचो मात्र पुढे त्याच्याबरोबर ग दोस्ती झाली (हा त्याचाच शब्द). केवळ त्याच्या साठी तो शब्दप्रयोग :)

नाखु's picture

18 Feb 2018 - 11:34 pm | नाखु

लेख
अजो एक विनंती "त्या" आखाड्यात जाऊच नका? आपला वेळ वाया घालवून फुकटचा मनस्ताप कशाला घ्यावा असं आमचे हे म्हणतात.
पुन्हा मिसामा

निव्वळ साडी नंतर थेट नीरव मोदींवर माईंचा धागा आला आहे

लक्ष्यात असलेला नाखु वाचकांची पत्रेवाला

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Feb 2018 - 11:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

लक्ष्यात असलेला नाखु वाचकांची पत्रेवाला यात एक शब्द कमी आहे आणि एक जरा वेगळा हवा. ते असे पाहिजे...

लक्षात एक असलेला, नाखु वाचकांची पत्रेवाला :) ;)

नाखु's picture

19 Feb 2018 - 8:46 pm | नाखु

अगदी समर्पक आहे

नित नेट वाचक नाखु

हो खरं आहे. तो माईंचा एकमेव द्वितीय धागा आहे.

मात्र प्रतिसादाचे बेअरिंग धाग्यात नाही, असं आमचे मत.

माहितगार's picture

19 Feb 2018 - 12:17 am | माहितगार

रोचक

छानच लिहिले आहे. यावर जर चित्रपटासारखा ( दृकश्राव्य ) फित बनविता आली तर पहा. ५ / १० लाख खर्चात चांगले काम होईल.

कोणास ठावुक एका नव्या सैराटाचा जन्माचे भाकित मी करित असेल.

गांभिर्याने कृपया विचार व्हावा.

अभ्या..'s picture

19 Feb 2018 - 5:13 pm | अभ्या..

एकच नंबर लिखाण जोशीबुवा,
लेखनाबद्दल लै काही शिकता येईल हे वाचून.

विशुमित's picture

19 Feb 2018 - 5:28 pm | विशुमित

मस्त लिहलंय अजो जी...!!
प्रतिसादात लिहता तशी लेखनाची शैली वाटली नाही. साधे सरळ सिम्पल आणि लाईव्ह वाटले.

arunjoshi123's picture

21 Feb 2018 - 7:53 pm | arunjoshi123

धन्यवाद.
---------------
दुसरिकडचे प्रतिसाद पण मी गंमत म्हणूनच लिहित असतो.

अभिजीत अवलिया's picture

19 Feb 2018 - 7:27 pm | अभिजीत अवलिया

चांगलं लिहीलय.

निशाचर's picture

20 Feb 2018 - 5:24 am | निशाचर

मस्त!

चिगो's picture

21 Feb 2018 - 4:11 pm | चिगो

आवडला की हो तुमचा वेदांग शिरोडकर..

उशिरा वाचन करणार्‍या उरलेल्या सर्वांचे आभार.

बापू नारू's picture

23 Feb 2018 - 5:26 pm | बापू नारू

मस्त