ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग ५ - क्बाल स्पीन, तोन्ले साप सरोवर आणि नॉमपेन्ह

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in भटकंती
15 Feb 2018 - 1:30 am

ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग ५ - क्बाल स्पीन, तोन्ले साप सरोवर आणि नॉमपेन्ह.
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

ह्या मालेच्या पहिल्या भागामध्ये उल्लेखिल्याप्रमाणे ख्मेर साम्राज्याचा प्रारम्भ ’महेन्द्रपर्वत’ नावाच्या पर्वतावर इ.स.८०२ च्या सुमारास झाला. हा महेन्द्रपर्वत म्हणजे अंगकोर वाटच्या उत्तरेस सुमारे ४५ किमी अंतरावर असलेला सरासरी १५०० फूट उंचीचा डोंगराळ भाग, ज्याला आज ’कुलेन टेकड्या’ ह्या नावाने ओळखले जाते. अंगकोर वाटच्या भागातील सर्व पाणी हे ह्या कुलेन टेकड्यांवरून खाली वाहणार्‍या नद्यांकडूनच पुरविले जाते. ह्या सर्व नद्या पुढे तोन्ले साप तलावामध्ये विसर्जित होतात. ख्मेर साम्राज्याची देवळे कुलेन टेकड्यांमधील दगडातूनच बांधली गेली आहेत.

येथे स्थापन झालेले राजधानीचे नगर १००-१२५ वर्षातच सोडून देण्यात आले आणि साम्राज्याचे केन्द्र खाली मैदानामध्ये सरकले. त्या कारणाने प्रत्यक्ष महेन्द्रपर्वताचे अवशेष असे फार थोडे उरले आहेत आणि त्यामध्ये ’सहस्र शिवलिंगांची नदी’ हा एक लक्षणीय अवशेष आहे. ’तोन्ले साप’ नदीच्या उगमापाशी नदीच्या पात्रामध्ये अनेक शिवलिंगे - मोजून एक सहस्र नाही पण बर्‍याच मोठ्या संख्येने असा त्या ’सहस्र’ शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे - कोरलेली आहेत. त्यांच्यावरून नदीचे पाणी वाहात असल्याने ते पवित्र होते अशा भावनेने कोणा प्राचीन भाविकाने हे काम केले आहे. ती शिवलिंगे आणि आसपासचे काही काम पाहू. त्यामध्ये एकटाच पडलेला आणि एका शिळेमधून कोरून काधलेला हत्तीहि आहे.

वरील शिवलिंगाशेजारीच शेषशायी विष्णु, त्याच्या नाभीमधून जन्मलेला ब्रह्मदेव, नन्दीवर आरूढ शिवपार्वती दिसतात.

आणि हा तो हत्ती:

अंगकोर अवशेषांच्या दक्षिणेस ’तोन्ले साप’ हा विस्तीर्ण नैसर्गिक जलाशय आहे. पावसाच्या दिवसांमध्ये १६,००० चौरस किमी इतका फुगणारा हा जलाशय ख्मेर साम्राज्याच्या काळापासून आजपर्यंत कंबोडियाच्या जीवनाचा प्रमुख आधार आहे. पावसाळा गेला की जलाशयाचे पाणी कमी होत होत २७०० चौरस किमी इतके संकोचते. उघडा पडलेला विस्तीर्ण भाग नव्या गाळाने भरलेला असतो आणि प्रतिवर्षी त्यावर भाताची भरपूर लागवड होते. तो तांदूळ आणि तलावातच अथवा नद्यांमध्ये मुबलक मिळणारी मासळी हे कंबोडियन जनतेचे प्रमुख खाद्य आहे. तेथील पुष्कळ प्रजा तलावावरच बोटींवर घर बांधून सारे आयुष्य तशा तरंगत्या घरांमध्ये काढते.

तेथीलच एका बोटीवरच्या रेस्टॉरंटमध्ये तलावातून पकडलेल्या ह्या मगरी ठेवलेल्या आढळल्या. तलावामध्ये त्या शेकडोंनी राहतात. त्यांना तेथे का ठेवले होते हे मात्र कळले नाही. त्य प्रदर्शनासाठी होत्या की कंबोडियन लोक मगरीहि खातात हा तिढा समाधानकारकरीत्या सुटला नाही,



अशा रीतीने अंगकोर परिसरातील ५ दिवसांचा निवास संपवून दीड दिवसांसाठी परतीच्या वाटेवर नॉमपेन्हला दाखल झालो. कंबोडियाच्या राजाचा राजवाडा अणि कंबोडियाच्या राष्ट्रीय संग्रहालयातील काही वस्तूंची छायाचित्रे दाखवून ही मालिका समाप्त करतो.

कंबोडियामध्ये अजूनहि राज्याभिषेकासारख्या पारंपारिक समारंभांना राजा हत्तीवर बसतो. त्यावेळी हत्तीवर चढण्यासाठी केलेली सोय पुढील चित्रात दिसते.

राजवाड्यातील स्तंभांचे आधार

राजवाड्याला जोडूनच एक छोटे वस्तुसंग्रहालय आहे. त्यातील काही गोष्टी:
सध्याचे राजे सिहामोनी ह्यांच्या राज्याभिषेक प्रसंगी
पूर्वीचे राजे सिंहनूक भारतात. तत्कालीन राष्ट्रपति राधाकृष्णन्, उपराष्ट्रपति डॉ. झाकिर हुसेन आणि काश्मीरचे करणसिंगहि चित्रात दिसत आहेत.
राजे सिंहनूक आणि पं. नेहरू.
आणि अखेर राष्ट्रीय संग्रहातील काही चीजा. ह्यापुढील पहिली दोन छायाचित्रे जगातील सर्वात जुने ’शून्य’ संख्येचे लेखन असलेल्या शिलालेखाची आहेत. ह्या संग्रहालयातील मला विशेष वाटलेली अशी ही चीज आहे. तिच्याविषयी अधिक विस्ताराने माहिती ह्या माझ्या लेखामध्ये मिळेल.
शक ६०५, येथे ’०’ हा आकडा दिसतो. सुदैवाने मोडलेल्या कडेच्या डावीकडे तो असल्याने वाचला असे म्हणता येईल.
त्या लेखाचे जवळून चित्र. पहिल्या ओळीतील ’९-टिंब-६’सारखे दिसणारे आकडे म्हणजे ख्मेर लिपीतील ’६०५’.
संग्रहालयातील काही अन्य निवडक गोष्टी अशा आहेत:
गणेशमूर्तींचा संग्रह
ध्यानस्थ बुद्ध
गोवर्धन पर्वत उचलणारा कृष्ण
विष्णु
वाली आणि सुग्रीव ह्यांचे मल्लयुद्ध
गरुड आणि विष्णु - ब्रॉंझमध्ये ओतीव काम
भीम आणि दुर्योधन गदायुद्ध. बाजूस हलधर बलराम, कृष्ण आणि चार पांडव.
शेषशायी विष्णु.
शेषशायी विष्णु, ब्रॉंझमधल्या ओतीव कामाचा अवशेष.
सीमादर्शक.
जयवर्मन् सातवा.
ता प्रोह्म मंदिरातील शिलालेख.
संग्रहालयावे प्रवेशद्वार.

प्रतिक्रिया

भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा पाहून आनंद झाला. छान झाली लेखमाला.

सुमीत भातखंडे's picture

15 Feb 2018 - 11:18 am | सुमीत भातखंडे

मस्त झाली लेखमाला.

उपेक्षित's picture

15 Feb 2018 - 4:42 pm | उपेक्षित

मस्त माहितीपूर्ण लेखमाला.

निशाचर's picture

15 Feb 2018 - 8:32 pm | निशाचर

छान झाली ही लेखमाला.

हा भागही आवडला. शिल्पांच्या चेहरीपट्टीवर असणारा पौर्वात्य प्रभाव लक्षणीय आहे. पुतळा जयवर्मन सातवा ह्याचा हे नेमके कशावरुन निर्धारित केले गेले आहे? तत्संबंधी काही शिलालेख पुतळ्यावर किंवा इतरत्र आहे का?
त्या मगरींना दोरखंडाने करकचून बांधलेले दिसत आहे, त्यांचे वळ अगदी स्पष्ट दिसताहेत.

अनन्त अवधुत's picture

17 Feb 2018 - 6:19 am | अनन्त अवधुत

त्या मगरींना दोरखंडाने करकचून बांधलेले दिसत आहे, त्यांचे वळ अगदी स्पष्ट दिसताहेत.

मला वाटते ती उन्हाची तिरीप आहे. लाकडावर पण दिसत आहे.