धोकेबाज

Primary tabs

aanandinee's picture
aanandinee in जनातलं, मनातलं
13 Feb 2018 - 12:19 pm

प्रिय आई,

काय सांगू आणि कुठून सुरुवात करू? कशी आहेस? पाच सहा महिन्यांत एकदा तुझी खुशाली कळते. जग कुठल्या कुठे गेलं पण आपलं गाव अजून तसंच . मोबाईल नेटवर्कच नाही. माणसाने कॉन्टॅक्ट ठेवावा तरी कसा! आणि तू आणि तुझे विचार तर त्या गावापेक्षाही जुने. आठवतं, मी पहिल्यांदी गोव्याला आलो, मला नोकरी मिळाली, तुला गोव्याला घेऊन आलो. तूसुद्धा खूष होतीस पण जेव्हा तुला कळलं की मी बिअर बारमध्ये नोकरीला लागलोय तशी तू त्याच रात्रीच्या एसटीने निघून गेलीस. दारूच्या पैशाने चालणार्या घरात पाणीसुद्धा पिणार नाही म्हणालीस. किती दुखावलंस मला. आजकाल कुणी असं नसतं. या धंद्यात पैसे कमावून लोक करोडपती होतात, त्यांचं काय वाईट होतं? असंच मला वाटायचं. तू म्हणालीस त्यापेक्षा घराघरांत जाऊन दुधाच्या पिशव्या टाक. मला हसूच आलं. दूध देणार्याला कोणी टिप देतं का कधी! कशी गं वेडी तू? आज या वळणावर वाटतंय, वेडी तू, की वेडा मी?

तू तर निघूनच गेलीस. त्यानंतर लग्न करून मंजू आली. पण तीही वर्षभरात मला कंटाळून निघून गेली. तिला रामासारख्या एकनिष्ठ नवर्याची अपेक्षा होती आणि मी तर असला छंदी! तुझ्या सात्विक गुणांपेक्षा बापाचं रक्त जास्त आलं माझ्यात. रक्तं उरलं तरी होतं का त्याच्यात शेवटी? किती प्यायचा, कसा वागायचा, तू कसं काय सहन केलंस त्याला? मी तर सतराव्या वर्षीच घर सोडलं. असं वाटलं आपलं आता कोणीच नाही. आणि अचानक एक दिवस बापाला कंटाळून बारक्यासुद्धा माझ्याकडे आला. त्याला आता बारक्या म्हटलेलं आवडत नाही. नीट नावाने रघू हाक मारावी लागते, मोठा झालाय ना तो! किती वर्षांनी माझा एकटेपणा कमी झाला. गेल्या पंधरा वर्षांत किती नोकर्या बदलल्या. हॉटेलात वेटर वरून होत होत असिस्टंट मॅनेजर झालो. किती जण भेटले पण एक रघू सोडून कोणावर जीव नाही लावला मी. अगदी गेल्या दीड वर्षापर्यंत, आणि मग मिनी आली, मिनी म्हणजे मीनाक्षी, लग्नानंतरची मिनी परेरा. आमच्या हॉटेलजवळच त्यांचा बंगला आहे. आमच्या क्लबचे रेग्युलर कस्टमर्स. ओळख वाढली. पैसेवाल्यांकडे जास्त लक्ष देणं तर आमचं कामच आहे. त्यात मिनी तरुण, सुन्दर आणि श्रीमंत नवर्याची इन्सिक्युअर ...म्हणजे कसं सांगू तुला, नवर्याचं लक्ष नाही म्हणून दुःखी अशी बायको. नकळत आम्ही एकमेकांकडे खेचले गेलो. जवळीक वाढू लागली. तिचा नवरा आम्हांला आता काट्यासाराखा बोचू लागला होता. मग मिनीनेच सुचवलं की काटा बाजूला काढूया. मी हबकलो. असं काही करणं माझ्या स्वप्नातही नव्हतं. पण मिनीची आणि परेराच्या पैशांची मला भुरळ पडली होती. त्यात मिनी मला तेच तेच सांगून रोज पढवत होती. परेराच्या खुनाचा एक फूल प्रूफ प्लानच तिने बनवून दिला. त्याप्रमाणे मी पुढचे सहा महिने मिनीशी लोकांदेखत बोलणं, भेटणं पूर्ण बंद केलं, परेराशी मात्र मैत्री वाढवली. दरम्यान मी शहरापासून दूर अशी एक एकांडी जागा शोधली, तिथे एक खड्डा सुद्धा खोदून ठेवला. तयारी पूर्ण झाली. सोमवारी दुपारी कट अमलात आणायचं ठरलं. मी मुद्दाम सोमवारी संध्याकाळी दोन मित्रांना घरी बोलावलं. सकाळी ११ ला मी रघूला मला रात्री जागरण झालंय, मी झोपतोय म्हणून सांगितलं. दार आड करून खोलीतल्या खिडकीतून मी गेलो. गाडी आधीच हायवे जवळ नेऊन ठेवली होती. परेराला घेऊन मी निघालो. त्या जागी आल्यावर मी गाडी बंद पडल्याचं नाटक केलं. काय झालंय बघायला परेरा गाडीतून उतरला. मी गाडी मागे घेऊन जोरात त्याच्या अंगावर गाडी घातली. तो रक्तबंबाळ होऊन खाली पडला. अजून जीव गेला नव्हता. भयचकित डोळ्यांनी तो माझ्याकडे बघत होता. मी चान्स घेऊ शकत नव्हतो. बाजूला पडलेला मोठा दगड मी त्याच्यावर टाकला. खड्डा तयार होताच. तीनचार तासांत सगळं आटपून मी परत खिडकीतून खोलीत येऊन झोपण्याचं नाटक केलं. मित्र आले तेव्हा रघू मला उठवायला आला. मित्रांच्या समोरच आळोखे पिळोखे देत मी खोलीतून बाहेर आलो. त्यामुळे पोलिसांसमोर माझ्याबद्दल फक्त भावानेच नाही तर माझ्या मित्रानीही साक्ष दिली की मी झोपलो होतो. शिवाय माझ्यावर संशय यायचं तसं काही कारणही नव्हतं. परेराच्या मरण्याने माझा काहीच फायदा होत असल्याचं कोणाला दिसत नव्हतं. कारण खरोखरीच माझा काही फायदा होतच नव्हता. काम झाल्यावर मिनीने माझं नावच टाकलं. भेटीगाठी दूर, ती मला ओळखही दाखवत नव्हती. दारू पिऊन रिकामी झालेली बाटली फेकून द्यावी तसं तिने तिच्या आयुष्यातून मला दूर फेकून दिलं होतं. संताप आणि निराशा दोन्हींनी मी होरपळून जात होतो. त्यात पोलिसांच्या नजरेत येईल असं काहीही वागणं महागात पडलं असतं. त्यामुळे माझा संतापसुद्धा मला मिनीला दाखवता येत नव्हता. मी आतल्या आत धुमसत होतो. परेराला ‘मिसिंग’ होऊन आता तीन महिने झाले होते. पण त्याची बॉडी सापडली नव्हती. त्यामुळे तो मेला आहे असं पोलीस गृहीत धरत नव्हते. मिनीकडचे पैसे संपत आले होते. परेराच्या अकाऊनट्स मधून तिला पैसे काढता येत नव्हते. त्याची बॉडी लवकर बाहेर येणं तिला जरूरी झालं होतं. आणि तो हुकमी पत्ता माझ्याकडे होता. परेराची बॉडी कुठे आहे हे माझ्याशिवाय कोणालाच माहीत नव्हतं. मिनीलासुद्धा. माझ्या अपेक्षेप्रमाणे काही दिवसांनी मिनी पुन्हा मला भेटायला आली. पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून माझ्याच काळजीने ती इतके दिवस मला भेटत, बोलत नव्हती अशी सबबही तिने दिली. पण आता मी मूर्ख बनणार नव्हतो. मी प्रेमाने बधत नाही म्हटल्यावर तिने धमक्यांची भाषा सुरू केली. मी त्यालाही काहीच भीक घातली नाही आणि निघून गेलो. एका आठवड्याने ती पुन्हा आली. पुन्हा प्रेमाचं अस्त्र चालवून मला भुलवण्याचा तिने प्रयत्न केला. मलाही तिच्या या खेळाची आता गंमत वाटू लागली होती. आत्ता पायात घोळणारी ही मांजर क्षणात पंजा मारायला कमी करणार नाही हे मी चांगलं ओळखून होतो. मधेच समोर ठेवलेला तिचा मोबाईल वाजला. RS असं नाव दिसलं. तिने झटक्यात फोन बंद केला. ‘मिनीचा नवा बकरा’ म्हणून मी मनात हसलो.

आता या गोष्टीलाही तीन महिने होऊन गेले. मला एक नवीनच त्रास सुरु झाला होता. जरा डोळा लागला, की मी धोंडा मारतानाचा परेराचा भयचकित चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा. ‘धोकेबाज’ म्हणून त्याने मारलेली किंचाळी माझ्या कानात वाजत राहायची. झोप लागणं मुश्कील झालं होतं. माझं काहीतरी बिघडलंय हे रघूला कळत होतं. तो आता जरा जबाबदारीने वागू लागला. भावाभावापेक्षा आम्ही आता मित्र झालो. त्याने खूप काळजीने मला काय होतंय, डॉक्टरकडे जाऊया का, म्हणून विचारलं. तेव्हा शेवटी मी त्याला माझ्या या खुनाबद्दल, सगळं सांगितलं. बॉडी कुठेय तेसुद्धा. तो म्हणाला त्याच्या मित्राच्या ओळखीचा एक तांत्रिक बाबा आहे. तो अश्या सगळ्या गोष्टी नीट करतो. माझा फारसा विश्वास नव्हता पण करून बघायला काय हरकत आहे म्हणून मी हो म्हणालो. आज तो त्या बाबाकडून कसलंसं औषध घेऊन आला. झोपण्यापूर्वी घ्यायचं होतं. त्याच्या आग्रहाखातर मी घ्यायचं ठरवलं. आता संध्याकाळी रघू कुठे बाहेर गेला, मी एकटाच घरी, झोपून आढ्याकडे बघत माझ्या आयुष्याचा विचार करत होतो. असं कसं झालं? माझ्या आयुष्याची माती झाली. दारू विकून बर्यापैकी पैसा आला खरा पण समाधान? शांती? बाईच्या मोहाने, पैशाच्या मोहाने मी इतका घसरलो की मी एका माणसाचा जीव घेतला. तोही मैत्रीचं नाटक करून! इतका धोकेबाज कसा झालो मी! आतल्या खोलीत रघूचा मोबाईल वाजला त्या आवाजाने माझी विचारांची तंद्री भंगली. हा फोन विसरून गेला वाटतं म्हणून मी आत बघायला गेलो. टेबलवर पडलेला त्याचा मोबाईल वाजत होता. आणि स्क्रीन वर त्याच थेरडीचा फोटो होता!! ही मिनी माझ्या भावाला कशाला फोन करतेय! मी फोन कट होईपर्यंत थांबलो. नंतर मी रघूचे मेसेज उघडले. वरच त्या दोघांचे मेसेजेस होते.

“सगळी माहिती तर मिळाली. आता त्याला औषध कधी देतोयस?”
“आज रात्री. उद्या सकाळी तो उठणार नाही. उद्यापासून आपल्याला अशी लपवा छपवी करावी लागणार नाही.”

माझा भाऊ तिच्याच प्रेमाच्या जाळ्यात पडून मलाच मारायला निघाला होता.

आई, तू म्हणायचीस पेरावं ते उगवतं, मला पटायचं नाही. मला वाटायचं, मग तुझं आयुष्य असं का? त्यालाही तुझं उत्तर तयार, की बाबारे हे माझे गेल्या जन्मीचे भोग आहेत. आधीचं काही माहीत नाही पण माझं य जन्माचं कर्म माझ्यापुढे याच जन्मात उभं राहिलंय खरं. असं वाटतंय सगळं जग माझ्याकडे बघून हसतंय. कसं मूर्ख बनवलं म्हणून मिनी हसतेय, धोकेबाजाला चांगला धडा मिळाला म्हणून परेरा हसतोय, दादाला कसं फसवलं म्हणून रघू हसतोय, सगळी दुनिया हसतेय आणि आई तूसुद्धा त्यांच्यातच उभी आहेस आणि म्हणतेयस, “मी सांगितलं होतं राजा तुला, तू पेरशील तेच उगवेल, पेरशील तेच उगवेल” माझं डोकं बधीर झालंय. रघूला सांग आई, त्या मिनीचा नाद सोडून दे. ती बाई नाही, चेटकीण आहे. मी स्वतःच खुनी, मी त्याला कुठल्या तोंडाने सांगू? तू तरी सांग. कुणीतरी सांगायला हवं ना त्याला आणि मी तर आता चाललो आहे. माझ्यासाठी रघूने आणलेलं औषध मी आता पितोय आई. हे आवाज थांबत नाहीत. मला सुटकेचा काहीच मार्ग दिसत नाही. मला चांगलं पेरायचंय. आता खूप उशीर झाला पण नवीन सुरुवात करायला हवी, म्हणून मी चाललो आई. तुला शेवटचा नमस्कार.
तुझा
नंदू

डॉ. माधुरी ठाकुर
http://drmadhurithakur.blogspot.co.uk/

प्रकटनविचारविरंगुळावाङ्मयकथा

प्रतिक्रिया

प्रियाभि..'s picture

13 Feb 2018 - 2:01 pm | प्रियाभि..

सुन्न

पद्मावति's picture

13 Feb 2018 - 2:21 pm | पद्मावति

जबरदस्त!

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Feb 2018 - 3:21 pm | अमरेंद्र बाहुबली

मस्त

कपिलमुनी's picture

13 Feb 2018 - 3:27 pm | कपिलमुनी

बरी कथा !
५/१० .

पुलेशु

manguu@mail.com's picture

13 Feb 2018 - 5:10 pm | manguu@mail.com

गोष्ट अर्ध्यावर आली तेंव्हा अंदाज आला होता.

तिने ह्याला सोडले ... मग दुसरा कोण असेल ?

आणि ह्याच्या भावाशिवाय कथेत दुसरे strong पात्र दिसत नव्हते.

प्राची अश्विनी's picture

13 Feb 2018 - 6:34 pm | प्राची अश्विनी

+१

पुंबा's picture

13 Feb 2018 - 8:24 pm | पुंबा

++११
पुलेशु..
अजून फुलवता आली असती..

मराठी कथालेखक's picture

14 Feb 2018 - 7:23 pm | मराठी कथालेखक

छान...
फक्त दारु विकण्याला इतकं वाईट का ठरवलंय .. ते काही पटलं नाही.. :)

शित्रेउमेश's picture

15 Feb 2018 - 11:35 am | शित्रेउमेश

+१
मस्त...

जिस्म चा थोडा एक्स्टनडेड शेवट. बाकी सेम.

स्नेहांकिता's picture

15 Feb 2018 - 3:16 pm | स्नेहांकिता

कथेची मांडणी वेधक आहे. कथाही चांगली. अजून थोडी रंगवायला हवी होती.
पुलेशु

हतोळकरांचा प्रसाद's picture

16 Feb 2018 - 5:26 pm | हतोळकरांचा प्रसाद

आवडली कथा!!

किसन शिंदे's picture

16 Feb 2018 - 6:15 pm | किसन शिंदे

आवडली कथा !!