गोव्यातला बसवाला

Primary tabs

पिशी अबोली's picture
पिशी अबोली in जनातलं, मनातलं
13 Feb 2018 - 10:39 am

गोव्यातला बस प्रवास, हा एक विशेष विषय आहे. यासंदर्भातला पैसाताईचा भन्नाट लेख माझी प्रेरणा
http://www.misalpav.com/node/14121

तर गोव्यात भरपूर सामान असणं हे बसप्रवास न करण्याचं कारण असू शकत नाही. भरपूर गर्दी असणं हे अपेक्षितच असतं. त्यामुळे ट्रेनने सकाळी लवकर पोहोचवल्यावर बस स्टॉपवर उभी राहिले, तेव्हा मी गोंयकाराला(च) शोभणाऱ्या आरामात उभी होते. बस आली, आणि माझ्याकडचं सामान बघून त्या बॅगांना, आणि त्यांच्यानंतर मला अगोदरच सामानाने भरलेल्या केबिनमध्ये कोंबण्याचा सोहळा झाला. त्यानंतर बस आणि ड्रायव्हरच्या तोंडाचा पट्टा एकत्रच सुसाट सुटले.

'रोखडे दॅर काड आं... (पुढच्या स्टॉपवर ब्रेक लावता लावता) काड काड, चल चल चल... बेगीन बेगीन...'
(लगेच दार उघड, उघड उघड, चल चल चल, लवकर लवकर)

मला बाहेरून कुणीही काय बोलतंय ते ऐकू येत नव्हतं, इतका आवाज होता. पण ड्रायव्हर एकत्र ड्रॅगनच्या स्पीडने गाडी चालवणे, पोरगेल्या कंडक्टरचं प्रशिक्षण करणे आणि अखंड बडबड हे सगळं करत होता...
'तू म्हाका सांग नाका, मागीर म्हाका धावंडायतलो तू..'
(तू मला सांगू नकोस, नंतर मला धावायला लावशील तू)

मागील स्टॉपवर घाई केल्याबद्दल कंडक्टरने तक्रार केली असावी असा अंदाज बांधेपर्यंत पुढची सूचना भिरभिरत आली.
'आता कोणा घेय नाका आं, देवय फकत... फकत देवय सांगता तुका... '
(आता कुणालाच घेऊ नकोस, उतरव फक्त, फक्त उतरवायचं सांगून ठेवतो)

हे वाक्य संपेपर्यंत मधेच धाडकन बस थांबली. मी बसल्या जागी माझ्या सामानात आदळले. माझ्याकडे supreme दुर्लक्ष करण्यात आलं. दुरून एक माणूस धावत येत होता. त्याला घ्यायला बस बराच वेळ का थांबवून ठेवली, हे विचारायची कंडक्टरची टाप नसावी.

इतक्यात गॉडफादरचं थीम म्युझिक जोरात वाजलं. फोन उचलून
'पावलो रे, गुडेर पावलो. कदंबा रेस मारता रे...'
(पोचतोय रे, गुडीला पोहोचलो, कदंबाला रेस मारतोय)

म्हणजे सगळा आटापिटा त्या पुढे चालणाऱ्या सरकारी बस कदंबाला पॅसेंजर मिळू नयेत म्हणून होता हे सिद्ध झालं.

'चंद्रेश्वर कोण देवता?'(चंद्रेश्वरला कोण उतरतंय) हा एक जनरल बसला उद्देशून प्रश्न विचारला गेला, कुणी जे काही उत्तर दिलं ते त्याला ऐकू आलं. त्यावर त्या स्टॉपला किती सेकंद गाडी थांबवायची ते गणित झालं, आणि पुन्हा सुसाट सुटली ती केपेपर्यंत. तिथे कदंबा पुढे उभी होती.

'अँ... पळयले मरे, आता सगले तितून वतले'
(अँ...(याचं भाषांतर होत नाही) बघितलंस ना, आता सगळे त्या बसमधून जातील)
हे नैराश्य क्षणभरच टिकलं. तिथून पुढे पुन्हा स्पर्धा सुरू.

आता मला उतरायचंय हे माझ्या हालचालींमधून त्याने टिपलं असावं.
'खंय देवता बाय, सारके देवय रे ताका बॅग आहा न्हु...'
(कुठे उतरणार बाय? नीट उतरव रे तिला, बॅग आहे ना)
ही काळजी माझ्याबद्दल नसून मला बॅग उतरवण्यात उशीर झाला तर काही सेकंद वाया जातील याची होती हे सांगण्याची गरज नाही.

शेवटी एकदाची या सेनापतीच्या मडगावपासूनच्या सूचना ऐकणारी एकटीच बाय उतरली, तेव्हा हे युद्ध चालू आहे, हे गावीही नसणारी कदंबा मागून रमतगमत येत होती...

प्रकटनव्यक्तिचित्र

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

13 Feb 2018 - 11:56 am | विजुभाऊ

झकास. एकदम मस्त वर्णन आहे. डोळ्यापुढे उभे राहिले

प्राची अश्विनी's picture

14 Feb 2018 - 8:56 am | प्राची अश्विनी

+111

उपेक्षित's picture

13 Feb 2018 - 12:00 pm | उपेक्षित

सुशेगात लेख :)

दोनचार कामाची गोयची कोकणी वाक्य द्या हो. जायचय तिकडे मडगावला.
बसनेच फिरणार. आणि आताच लेख दिलात. छान.
मजा येणारे.
( उलेलो = बोललो?
सांगता = सांगता?)

पिशी अबोली's picture

15 Feb 2018 - 12:29 am | पिशी अबोली

अरे वा! खरं सुशेगाद शहर मडगाव म्हणजे...
तुम्ही दिलेले शब्द तर आहेतच, पण बसमधले महत्वाचे लक्षात ठेवायचे शब्द म्हणजे 'फुडें' आणि 'फाटी'. तुम्ही जिथे उभे असाल तिथून कंडक्टर तुम्हाला हलायला सांगणार म्हणजे सांगणार... 'राव' म्हणजे थांब आणि 'देव' म्हणजे उतर. त्यामुळे एरवी अरे-तुरे करूनच बोलणारे कोंकणी भाषक अचानक राव-देव वगैरे करायला लागले म्हणून दचकू नका. उतरायचे स्टॉप हे 'वडाकडे' 'बांयकडे(विहिरीकडे)' असलेही असतात. आपल्याला उतरायचा स्टॉप आला, आणि कंडक्टर तंद्रीत असेल, कुठेतरी बसमध्ये हरवलेला असेल, तर 'राव रे' अशी हाळी दिली की ड्रायव्हर थांबतो. अजून कोंकणीपणा करायचा असेल तर मध्येच कुठेतरी बस बराच वेळ थांबवून ठेवली असता 'अँ, कोणा रावला रे?' हे किंचित त्रासिक स्वरात, आणि घामेजून जायला झालं की 'आय स्सायबा' असे उद्गार काढत राहावेत. :D
तिकीट वगैरे देणे असल्या भानगडीत कदंब वगळता सहसा कुणी पडत नाही. बसस्टँडवर घसा फोडून कंडक्टर कुठे जाणार हे सांगत असले, तरी आपल्याला माहीत असलेली शहरांची नावं, त्यांची स्पेलिंग्ज आणि त्यांचे या लोकांचे उच्चार यांचा ताळमेळ बसणं बऱ्याचदा कठीणच. पण सगळे मदत करतात अगदी नीट.

बसमध्ये भक्तीसंगीतापासून ते कोंकणी कांतार, आणि दर्दभऱ्या गझलांपासून ते हिमेश रेशमियापर्यंत कुठचीही गाणी लागू शकतात. ती ऐकून पचवायला फक्त तुम्हाला शुभेच्छा... :D

अनिंद्य's picture

13 Feb 2018 - 12:45 pm | अनिंद्य

Such sweet language :-)

पद्मावति's picture

13 Feb 2018 - 2:15 pm | पद्मावति

मस्तच.

पैसा's picture

13 Feb 2018 - 4:24 pm | पैसा

फुडे वोस, फाटीं वोस! ही मज्जा!
कांतारां किंवा तियात्राची सीडी नव्हती का जोरजोरात लावलेली? =))

पिशी अबोली's picture

15 Feb 2018 - 12:30 am | पिशी अबोली

माझं नशीब जोरावर होतं त्या दिवशी... :D

manguu@mail.com's picture

13 Feb 2018 - 4:53 pm | manguu@mail.com

माजे रानी माजे मोगा !!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2018 - 10:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

पिवळा डांबिस's picture

14 Feb 2018 - 2:49 am | पिवळा डांबिस

(अँ...(याचं भाषांतर होत नाही)

हा हा हा! गोयंकार प्रोजेचो आवाज!
आणि तो आवाज काढायचं ट्रेनिंग बाळपणीच घरच्या वडील मंडळींकडून मिळतं!!! :)

पिशी अबोली's picture

15 Feb 2018 - 12:32 am | पिशी अबोली

जुस्त हा शब्द किती जुस्त आहे हे नव्याने जाणवलं... :D

सुबोध खरे's picture

15 Feb 2018 - 9:37 am | सुबोध खरे

(अँ...(याचं भाषांतर होत नाही)
बाडीस
हा आवाज एखाद्या "माकापाव" कडूनच तो सुद्धा गोव्यातील एखाद्या गावात ऐकण्यासारखा आहे

आदूबाळ's picture

14 Feb 2018 - 7:00 pm | आदूबाळ

मस्त लिहिलं आहे!

पिशी अबोली's picture

14 Feb 2018 - 11:58 pm | पिशी अबोली

धन्यवाद! :)

अँ... काय एवढुसा लेख लिहिलाय. जर बसमध्ये चढून टेकलो होतो तोवर 'देवलो' की! फुडच्या वेळेस गोव्याच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत बस प्रवास कर आणि मग बरंय. काय?

बाकी बरा (रा... लांबवलेला) बरंयलंय. बरोबरे का गो बाय? ;-)

अर्रर्रर्र. मला वाटलं आमच्या प्रीमोने लिहिलाय लेख. म्हणून अरेतुरे म्हणालो. पिशीताई, तुमचा लेख छान आहे.

पिशी अबोली's picture

15 Feb 2018 - 12:21 pm | पिशी अबोली

काय एसभाऊ, मी प्रीमोची धाकटी सोल-सिस्टर... मला काय ताई वगैरे म्हणायचं...

धन्यवाद!

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Feb 2018 - 2:38 pm | बिपिन कार्यकर्ते

अँ... प्रीमो तुलाही सोलून काढते??

पिशी अबोली's picture

17 Feb 2018 - 4:19 pm | पिशी अबोली

हँ... प्रीमो मला सोलकढीची रेसिपी देते.

प्रीत-मोहर's picture

26 Feb 2018 - 1:08 pm | प्रीत-मोहर

हा:
अपेक्षित प्रतिसाद

सिरुसेरि's picture

15 Feb 2018 - 1:55 pm | सिरुसेरि

गोव्याच्या निसर्गासारखीच तिथली बस आणी बसप्रवास वैशिष्ट्यपुर्ण आहे . मस्त लेखन .

स्नेहांकिता's picture

15 Feb 2018 - 3:09 pm | स्नेहांकिता

इतकं गोड लिहिलंय आणि एवढास्साच लेख ?
अजून लिव गो बाय माजी.

पिशी अबोली's picture

16 Feb 2018 - 12:35 pm | पिशी अबोली

धन्यवाद लोकहो. :)

काही कामाची,व्यवहाराची कोंकणी - मराठी वाक्ये हवीत.

पिशी अबोली's picture

17 Feb 2018 - 4:29 pm | पिशी अबोली

ही घ्या

यो-ये
वच-जा
उलय-बोल
सांग-सांग
खंय?-कुठे?
केन्ना-कधी?
हांगा, थंय-इथे, तिथे
आसा-आहे
ना-नाही
हांव-मी
म्हाका, तुका, ताका, तिका- मला, तुला, त्याला, तिला

(मध्ये गावाचं नाव टाकून पुढची वाक्यं)

हांव _____वयता- मी ____ जातो/जाते

_____ कशे वचप- _____ला कसं जायचं? (नुसतं नाव चालतं, प्रत्यय जोडायची गरज नाही)

_____केन्ना पावता?- _____कधी पोहोचणार?

अजून काही लागली तर विचारा

देव बरें करूं- धन्यवाद.

किसन शिंदे's picture

16 Feb 2018 - 12:49 pm | किसन शिंदे

झक्कास वर्णन. आणखी सविस्तर लिहिलं असतं तरी चाललं असतं.

लेखाचे शीर्षक पाहूनच पैंच्या लेखाची आठवण झाली.

जागु's picture

16 Feb 2018 - 1:22 pm | जागु

छान लेख. गोड भाषा.

सूड's picture

16 Feb 2018 - 5:17 pm | सूड

सोबित!!

पिशी अबोली's picture

17 Feb 2018 - 4:29 pm | पिशी अबोली

पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद!

सचिन काळे's picture

25 Feb 2018 - 11:34 pm | सचिन काळे

छान लिहिलंय. आवडलं.

इथल्या प्रतिक्रिया वाचायच्याच राहिल्या होत्या. (लेख कस काय अन फेबुवर आधीच वाच हलावता)
मज्जा आली.

कॉपेलाफुडल्या देवतेकडे आसलेल्या पोणसाझाडाफुड्यान देवय रे =)) =))

नाखु's picture

27 Feb 2018 - 1:49 pm | नाखु

अश्याच लेखांची वाखु साठवण्याची सोय दिल्याबद्दल आणि या झक्कास लेखाबद्दल अनुक्रमे सरपंच व लेखकांचे अभिनंदन

वाचनीय खुशमिजाज नाखु

पिशी अबोली's picture

28 Feb 2018 - 11:38 am | पिशी अबोली

धन्यवाद :)

अरे वा, प्रतिसादात दिली आहेत वाक्यं. छान!