सर्वोच्च चढाईचा, कुलंग ( Kulang)

Primary tabs

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
9 Feb 2018 - 8:12 pm

सरासरी सातशे मीटर उंची असलेल्या सह्याद्रीतील किल्ल्यावर चढाई म्हणजे कमीत कमी दोन ते अडीच तासाची निश्चिती. पण सह्याद्रीतील सर्व गडात सर्वाधिक वेळ लावणारी, म्हणजे तब्बल पाच तासाची चढाई असणारा किल्ला म्हणजे, "कुलंग". हेच ह्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल. सह्याद्रीच्या एन रांगेत स्थान पटकावलेल्या सर्वाधिक उंचीच्या पाच शिखरात याचा क्रमांक लागतो ,ज्याची उंची ४८२२ फुट आहे असा कुलंगगड.
Kulang1
अलंग, मदन चढायला सर्वात कठीण आहेत, कारण त्यावर जाण्याच्या वाटा तोडल्या गेल्या आहेत आणि प्रस्तरारोहणाचे कौशल्य व साहित्य असल्या शिवाय तिथे जाता येत नाही, मात्र कुलंगगडावर फक्त पायी चालत जाता येते.
Kulang2
कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला आणि इगतपुरीच्या दक्षिणेला १०-१२ किमीवर कुलंग उभा आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटातून जातो. या महामार्गावर इगतपूरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची कळसुबाई ही बेलाग रांग आहे. या पुर्व पश्चिम रांगेवर कळसूबाईचे सर्वोच्च शिखर आहे. या रांगेची सुरुवात कुलंग गडापासून होते. या रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई चढणाऱ्याचा कस काढणारी आहे. कुलंगगडाच्या उत्तर पायथ्याला कुरंगवाडी नावाचे गाव आहे. येथुन तसेच आंबेवाडीकडूनही कुलंगगडाचा पायथा गाठता येतो.
स्वप्नवत असणारा मदनगडचा ट्रेक संपवून, आम्ही खाली खिंडींत आलो. आता पुढचे लक्ष्य होते, कुलंग. मात्र पराग व निखील दमल्याने दोघांनी कुलंगला येण्याचे रद्द केले. आम्ही चौघाजणांनी जाण्याचे नक्की केले.
Kulang3
मदनगडावरुन थेट कुलंगला जाण्याची वाट आंबेवाडीकडून अलंग आणि मदनच्या खिंडींकडे येणार्‍या नाळेत मधेच फुटते. या वाटेच्या खाणाखुणा आम्ही काल आंबेवाडीत विचारुन घेतल्या होत्या. हि वाट ओळखण्याची खुण म्हणजे मदनगडाच्या बरोबर खाली नाळेतून उतरताना डाव्या हाताला एक कातळाची टेकडी आहे, वाट या टेकडीला वळसा घालून जाते, त्यामुळे उतरताना आमचे लक्ष सतत डाव्या हाताला होते.
Kulang4
( वरच्या फोटोत दिसणार्‍या टेकडीला वळसा घालून वाट कुलंगकडे जाते. )
साधारण टेकडी संपल्याचे लक्षात आल्याबरोबर झाडीतून आत घुसणारी वाट सापड्ली. वाट स्पष्ट नाही, यासाठी काळजीपुर्वक पहाणे आवश्यक आहे, अन्यथा नाळेतून आपण तसेच खाली उतरत जातो.
Kulang5
मात्र वाट सापडली याची खात्री झाल्याबरोबर आम्ही पराग, निखीलचा निरोप घेतला आणि कातळाच्या वाटेवरुन खाली सरकू लागलो. सुरवातीला अस्पष्ट असणारी वाट नंतर मात्र बरीच ठळक झाली. एके ठिकाणी वाटेला दोन फाटे फुटले होते, उजवी वाट खाली उतरत होती, तर डावी सरळ जंगलात शिरत होती. उजव्या वाटेने मी थोडे अंतर खाली उतरलो आणि एकुण लाकुडतोड्यांच्या वावराच्या खुणा पाहून हिच वाट बरोबर आहे याची खात्री केली आणि बाकीच्या सोबत्यांना बोलावून घेतले.
Kulang6
आता आमची वाटचाल अलंग, मदन आणि कुलंग सामावणार्‍या सलग पठारावरुन सुरु होती.
Kulang7
मदनाची मागची बाजु आणि त्याचे नेढे स्पष्ट दिसु लागले. मात्र या पुर्ण वाटचालीत एकही माणुस भेटला नाही.
जंगलातील या वाटचालीत काही ढोरवाटा आत झाडीत घुसत होत्या, मात्र या वाटा लाकुडतोड्यांच्या आणि ढोरवाटा असतात, त्या टाळून रुळलेली वाट पकडायची आणि चालत रहायचे. अचानक समोर एक ओढ्याचे पात्र आले.
Kulang8
आंबेवाडीतुन मदनवर न जाता, थेट कुलंगला यायचे असेल तर ह्या वाटेने येता येते. आंबेवाडी-कुरंगवाडी या मार्गावर ओढ्यावर एक पुल आहे, या ओढ्यातून थेट इथे येता येईल. आंबेवाडी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी आधी दोन तासांची रपेट करावी लागते आणि मग वाट मध्येच एके ठिकाणी डावीकडे जंगलामध्ये वळते. लक्षात ठेवण्याची खुण म्हणजे इथे एका माणसाच्या आकाराचे मोठे वारुळ आहे. तिथेच कुलंग वाडी वरुन येणारी वाट येऊन मिळते. वाट चुकलो नाही ना हे जाणून घ्यायचे असेल तर वर पहायचे म्हणजे आपण मदन किल्ल्याच्या नेढ्याच्या बरोबर खाली उभे असल्याचे समजते. वाट मधुनच जंगलातून तर कधी उघड्या पठारावरुन जाणारी आहे. डिसेंबर पर्यंत वाटेत असणार्‍या ओढ्यामध्ये पाणी मिळते. साधारण दोन तासांच्या चढाईनंतर आपण पठारावर पोहोचतो. ईथेच मदनवरुन निघालेली वाट या वाटेला मिळते. घोटी मार्गे आंबेवाडी गाव गाठण्यास सुमारे एक तास लागतो. घोटीवरुन आंबेवाडीसाठी एसटी बससेवा उपलब्ध आहे.
दोन्ही वाटांची मिलन वाट कुलंगच्या दिशेने निघते. डोक्याच्या वर पाहिल्यावर कुलंगचा खडा पहाड अजुनही ताठ मानेने उभा असतो.
Kulang9
साधारण अर्धा तास चालल्यानंतर कुलंगवर चढणारी वाट दिसली. इथेच कुलंगवाडीकडून येणारी वाट मिळाली.
Kulang10
घोटीहून १० किमी वर कळसुथे नावाचे गाव आहे. इथेपर्यंत जाण्यासाठी खाजगी जीप, ऑटो ची सुध्दा सोय होते. इथे पाय उतार होऊन आपली पायगाडी चालू करायची. येथुन दोन तासांवर कुलंगवाडी नावाचे गाव लागते.कुलंगवाडी गाव जरी किल्ल्याच्या पायथ्याशी असले तरी किल्ल्यावर जाण्याचा मुख्य रस्ता कुलंगवाडीपासून दोन तासांच्या अंतरावर चालू होतो. वाट जंगलामधुन असल्याने उन्हाचा फारसा त्रास होत नाही. कुलंगवाडीकडून येणारी वाट, कुलंगवाडी-आंबेवाडी रस्त्यावरुन फुटते. मध्येच एका ओढ्याच्या काठी जंगलामध्ये आंबेवाडी मधून येणारी वाट येऊन मिळते. येथून सर्व वाटा एकत्र होऊन किल्ल्यावर जातात. एका नाळेतून हि वाट चढते आणि कुलंगच्या पठारावर मदनगडाकडून येणार्‍या वाटेला मिळून एकत्रित कुलंगगडावर चढते. पठारावर पोहोचण्यासाठी कुलंगवाडीतून दोन तासांची पायपीट करावी लागते.
Kulang11
पठारावर आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो. समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. कुलंगच्या उजव्या बाजुने उतरणाऱ्या या डोंगरदांडावरुनच कुलंगची चढाई आहे.या वाटेने जायचे झाले तर तब्बल पाच तास लागतात. सह्याद्रीतल्या कोणत्याही गडावरची हि सर्वाधिक चढाई आहे.
Kulang12
अलंग, कुलंग व मदन रांगेतला हा सगळ्यात मोठा किल्ला आहे. ह्याचे दोन भाग आहेत - कुलंग व छोटा कुलंग. छोटा कुलंग हा पश्चिमेकडील लहान भाग आहे. गडाच्या पूर्वेला मदन व अलंग किल्ले दिसतात.
Kulang13
या दमछाक करणाऱ्या वाटेने चढाई केल्यावर आपण कुलंगच्या कड्याला भिडतो.
Kulang14
कड्याला कातळकोरीव पायऱ्या आहेत. सन १८१८ सालच्या इंग्रजांच्या तोफांनी काही ठिकाणच्या पायऱ्या तोडल्या आहेत त्यामुळे ही वाट अधिकच साहसी होते.
Kulang15
याच्या कातळकोरीव ८० अंशाच्या कोनातल्या पायऱ्या मनात धडकी भरवतात.
Kulang16

Kulang17
कातळातच पहारेकर्‍यांच्या ओवर्‍या कोरुन काढल्या आहेत. रात्रीचा मुक्काम ईथेही करता येईल.
Kulang18
एका बाजूला कुलंगची दरी आणि उजव्या बाजूस कातळ, मध्येच थोडासा मातीचा घसारा अशा तर्‍हेने साधारण दोन तासाने आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजात पोहोचतो.
Kulang19
या चढणीत पहिला १०-१२ फुटाचा कडा आहे तो ओलांडून पुढे गडाचे मुख्य दरवाजा समोर येतो.
Kulang20
पहिल्या दरवाज्यापर्यंत पोहोचल्यावर थोडा जीवात जीव आल्या सारखा वाटतो. तरी शेवटच्या दरवाज्या पर्यंत पोहोचण्यासाठी अजुन १०० पायर्‍या चढून जाव्या लागतात. पहिल्या दरवाज्यापाशी छोटीशी गुहा आहे. इथुन अलंग, मदन आणि कुलंग मधील दरीचे सुंदर दर्शन होते.
या पायऱ्या चढून आपण गडप्रवेश करतो. कुलंगचा दुसऱ्या क्रमांकचा दरवाजा आजही चांगला शाबुत आहे. याची तटबंदी अजुनही चांगल्या स्थितीत उभी आहे.
कुलंगच्या माथ्याचा आकार एखाद्या पंख पसरुन वर झेपावणार्‍या पक्षासारखा आहे. दरवाजातून किल्ल्यावर पोहोचल्यावर एक वाट उजवीकडे वळते.
Kulang21
या वाटेने थोडे पुढे गेल्यावर कातळकड्या मध्येच दोन ते तीन गुहा आहेत. यापैकी सर्वात मधली गुहा मोठी असुन त्याला आत मध्येच दोन दालने आहेत. या गुहा मुक्कामासाठी योग्य आहेत. गुहे जवळच्या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर पाण्याची २-३ टाकी लागतात. यातील टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य नाही .
Kulang22
ही टाकी बऱ्यापैकी मोठी असून ती पूर्णपणे कातळात कोरलेली आहेत. या टाक्यांच्या वरील बाजूस २ उध्वस्त वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात.या टाक्यांचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यभागी चौकोनी खांब आहे. या खांबाचा उद्देशही समजत नाही. असेच खांब साल्हेर, मुल्हेरच्या टाक्यात पहायला मिळतात.
दोन दिवसाच्या पायपीटीने दमलेले माझे तीनही मित्र, पाण्याने भरलेले टाके पाहून आंघोळीचा मोह आवरु शकले नाहीत. मला मात्र गड पहायचा असल्याने , मी एकटाच पश्चिम टोकाकडे निघालो.
Kulang23

Kulang24
वाटेत पडक्या वाड्यांची बांधकामे दिसली.
Kulang25
या वाड्यांच्या आकारमानावरुन येथे मोठ्या प्रमाणात वस्ती असावी असे वाटते.या वाड्याच्या भोवती खंदक खणलेला दिसतो. बहुधा पावसाळ्यात पडणारा महामुर पाण्याने वाड्याच्या बांधकामाला धोका होउ नये यासाठी हे असावे. वाडे पाहून कुलंगच्या पश्चिम टोकावर जायचे. इथे एक मोठा बुरुज आहे.
Kulang26
तिथून ‘छोट्या कुलंग’ नावाच्या डोंगराचे दर्शन होते. समोर लांबवर घाटघर गावातून येणारी वाट नजरेस पडते. दूरवर विल्सन डॅमचा जलाशय दिसतो. आता कुलंगचा पश्चिम कडा पाहून दरवाजापाशी यायचे आणि डाव्या हाताची वाट धरायची.
Kulang27
पाच मिनीटातच आपण कुलंगवरील दहा टाक्यांच्या समुहापाशी येऊन पोहोचतो. त्यातले पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य आहे.
Kulang28

Kulang29
येथेच कातळात शिवलींग कोरलेले आहे.
Kulang30

Kulang31
टाकी पाहून समोरची दिशा धरायची २० मिनीटात आपण कुलंगवरील एका घळीपाशी येऊन पोहचतो. कुलंगच्या या घळीत दुर्गस्थापत्याचा सर्वात मोठा अविष्कार पाहायला मिळतो.
Kulang32
या घळीत वरील बाजूने येणाऱ्या धबधब्याचे पाणी अडवून ठेवण्यासाठी बांधारा घातलेला दिसतो.
Kulang33
या बंधाऱ्याचे पाणी अडविण्यासाठी वरच्या बाजूस अनेक टाकी बांधलेली दिसतात. जेणेकरुन आधी धबधब्याचे पाणी या टाक्यांमध्ये जमा होईल, मग ही टाकी पूर्ण भरल्यावर त्यातील पाणी बाहेर काढण्यासाठी बांधार्यागमधूनच एक वाट काढून दिली आहे.
Kulang34
हे पाणी एका गोमुखातून खाली पडते आणि दरीत फेकले जाते.
Kulang35
हे गोमुख सद्यस्थितीत तुटुन बाजुला पडले आहे. ज्याने कोणी ही सुंदर रचना केली आहे, त्या स्थापत्यकाराचे नाव अज्ञात आहे. किल्ल्यावर रहाणाऱ्याच्या पाण्याची निकड भागवण्यासाठी ही सोय करण्यात आली होती.
Kulang36
हा बंधारा पाहून किल्ल्याच्या पूर्व टोकापाशी जायचे.
Kulang37
येथे अनेक घरांची जोती पहायला मिळतात.
Kulang38
या पाताळवेरी कड्यावरुन कळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते.
Kulang39
हाकेच्या अंतरावर असलेला बेलाग मदनगड ( उंची- ४९०० ) आपल्याला खिळवून ठेवतो. त्याच्या उजवीकडे प्रचंड विस्ताराचा अलंगगड ( उंची:- ४५०० ) आपल्याला खुणावतो. दूरवर कळसूबाईचे शिखर दिसते. पाबरगड, रतनगड, कायाबाई, भैरवगड, हरिश्चंद्र, सिद्धगड तसेच स्वच्छ हवामानात माथेरान पेण चंदेरी, मलंगगड तसेच माहुलीची रांगही न्याहाळता येते. बळवंतगड, भिंगलवाडी तसेच कावनाई आड, पट्टा याचेही सुरेख दर्शन होते.
Kulang40
कुलंगगडाचे भौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंढ्या घाट, मेंढ्या घाट तसेच कसारा घाट मार्गावर टेहाळणी करणे सोयीचे जाते.
प्राचीन काळात घाटरस्त्यांनी होणारे दळणवळण कोकणातील बंदरांमधून घाटावर होत असे. असेच खूप जुनेघाट सह्याद्रि रांगांमध्ये होते आणी अजूनही आहेत. महत्वाचे व्यापारी केंद्र हे जुन्नर, पैठण आणी नाशिक होते. प्राचीन काळापासून या प्रदेशात होणारे व्यापारी दळणवळण पैठण-जुन्नर, पैठण-नाशिक, नाशिक-नगर, नाशिक-पुणे-मुंबई, मुंबई-नगर हे गोदावरी आणी प्रवरेच्या सुपीक प्रदेशातच उदयाला आले आणी त्यासाठी व्यापारी मार्गही तयार झाले. पारनेर, भंडारदरा, इगतपुरी कल्याण हा राजमार्ग होता. येथून कलकत्यापर्यंत माल जात असे. नेवासे ते रतनगड हा महामार्ग त्याकाळात महत्वाचा होता, अकोले, संगमनेर आणी सिन्नर ह्या मार्गावरचे महत्वाचे थांबे होते. याच मार्गावर भव्य शिवमंदिरे, बाजारपेठा याची पाऊलखुणा देतात. सातवाहन काळापासूनच हे राजमार्ग प्रचलित होते. यादवांच्या काळात या परीसराला चांगले दिवस आले. रतनगड, अलंग, मदन आणी कुलंग गड यादवांच्या काळातच निर्माण झाले. यादवांच्या साम्राज्यात संपत्तीची मोठ्या प्रमाणावर वाढ असल्याने संरक्षणाची गरज निर्माण झाली आणी त्यासाठी व्यापारीमार्गांचे संरक्षण हया दुर्ग आणी गडांवरून होत असे. या परिसरात दुर्गांचे महत्व शिवकाळात वाढले. राजांनी गडांचे व्यवस्थापन आणी सुरक्षेची जबाबदारी स्थानिक महादेवकोळी आणी आदिवासी जमातीवर टाकली.
ई.स. १६७० मधे मराठ्यांनी हे बळकट जोड किल्ले घेतले. पुढे ई.स. १६८६ मधे औरंगजेबाने हा किल्ला जिंकण्याचा ठरविला. मोगल सरदार मातबरखान याने गडाला वेढा घातला. हा मोठा हुशार होता. त्याला हा अवघड किल्ला सहजा सहजी जिंकता येणार नाही हे माहिती होते. म्हणुन गडावरच्या काही सैनिकांना त्याने फितुर करुन घेतले. तसेच गडाखालच्या रहिवाश्यांची मदत घेतली. जाण्या येण्याच्या वाटेवर चौक्या बसविल्या, तरी मराठ्यांचा चिवट प्रतिकार चालुच राहिला. शेवटी त्याला समजले कि गडावरच्या सैनिकांची कुटूंब कोकणात प्रबळगडाच्या पायथ्याशी आहेत. त्याने त्या गावावर हल्ला करुन बायका पोरांची कत्तल केली. कुलंगगडावर दोर लाउन फितुर सैनिक चढले व मोठा हल्ला केला. मराठ्यांचा प्रतिकार कमी पडला. त्यात त्यांना समजले कि त्यांच्या बायका, मुलांची हत्या झाली आहे. त्यानी नाईलाजाने गड मोगलांच्या हवाली केला. ई.स. १७६० मधे ईतर किल्ल्याबरोबर हे किल्ले मोगलापासून पेशव्यांनी जिंकुन घेतले. त्यानंतर सन १८१८ मध्ये कर्नल मॅकडोव्हेलच्या सैन्याने हा जिंकला व त्यानंतर गड कायमचा निकामी करण्यासाठी गडाच्या पायऱ्या सुरंग लावून उडवल्या.
इंग्रज अम्मल येईपर्यंत या व्यवस्थेत बदल झाला नाही. मराठ्यांची शक्ति ही गडावर असल्यामुळे इंग्रजांचा अंमल येताच हेतुपूर्वक त्यांनी गडांची नासधूस केली. ह्याचेच परिणाम अलंग आणि मदनगडांना भोगावे लागले. इंग्रजांनी यात बदल करताच याचे पडसाद स्थानिक जमातीं मध्ये उमटले. इंग्रजांनी दुर्ग जिंकून स्थानिकांच्या परंपरागत हक्कांवर गदा आणली. जुन्नर येथे काळा चबुतरा याच आदिवासी लढ्याची आठवण करून देतो. महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेविरूद्ध लढ्याचा आरंभ आदिवासी लढ्यापासून आणी तोही प्रवरा खोऱ्यापासून सुरू झाला. १८१८ साली महादेवकोळी आणी भील्ल जमातीने पहिला लढा स्वत:च्या हक्कांसाठी उभारला. या लढ्याचे नेतृत्व रामजी भांगरे आणी रामा किरवा यांनी केले. रामजी भांगरे याने इंग्रजांविरुद्ध जोरदार उठाव केला. नेहमी प्रमाणे फितुरीचा शाप या लढ्यालाही लागला आणि शेवटपर्यंत अपयशी ठरला. पुढे हा वारसा भागोजी नाईकाने सुरू ठेवला.
अलंग आणि मदनगड हे त्यावरील तुटलेल्या कातळकड्यामुळे सर्वसामान्य ट्रेकर्सना अवघड झाले आहेत, तरी निदान याच रांगेतील कुलंग हा त्यावरील पायर्‍या अजुन सुस्थितील असल्याने कोणताही दुर्गारोही त्यावर जाउ शकतो. अगदी एन पावसाळ्यात जाणे योग्य नसले तरी, सरत्या पावसात म्हणजे सप्टेंबरमधे इथे गेल्यास कुलंगच्या पठारावर गवताचा हिरवागार गालीच्या आणि त्यावर उमलेली लक्षावधी फुले पहाण्यास मिळतात.
Kulang41

Kulang42

Kulang43

Kulang44
एकुणच या परिसरातील निसर्गाचे भव्य रुप आणि सह्याद्रीचे रौद्रभिषण कडे मनाला नेहमीच भुरळ घालतात. दुर्ग भटक्यांना नेहमीच आकर्षित करणारा कुलंगगड पहाण्यासाठी दोन दिवसाचे नियोजन आवश्यक आहे. ह्या भटकंतीसाठी एखादा वाटाड्या घेण गरजेचं आहे, कारण येथल्या पायवाटा नवख्या माणसांना गोंधळवून टाकतात. अलंग-कुलंगच्या पोटातून जाणारा मार्ग हा घनदाट जंगलातुन आणी कारवीच्या जंगलातून जातो त्यामुळे रस्ता चुकण्याची दाट शक्यता आहे.
उपलब्ध गाईड आणि त्यांचे संपर्क क्रमांकः-
१ ) श्री. दत्ता भांगरे ( साम्रद) :- 86005151641
२ ) श्री. कमा ( बेलपाडा ) :- 9209615136
3 ) श्री. लखन गोईकाने: ( आंबेवाडी )- 7304378941, 8657361131
4 ) श्री. भोरु थावळे ( आंबेवाडी ) :- 8928937415
यानंतर आम्ही उतरण्यास सुरवात केली. सुरवातीला कुलंग उतरुन पठारावर आलो, तो खाली उतरायची वाटच सापडेना. अखेरीस मदनगडाच्या वाटेला लागलो आणि ओढ्याच्या पात्रातून खाली उतरण्यास सुरवात केली. चक्क कातळकोरीव पायर्‍या लागल्या. याचा अर्थ हा नक्कीच जुना मार्ग होता. ओढ्यात खाली उतरतोय तोपर्यंत अंधारुन आले. विशेष म्हणजे एकमेव टॉर्च माझ्याकडे होती. त्यामुळे मी मागे चालत राहून उजेड पुढे पडेल असे पाहीले. हा सर्व परिसर हरिश्चंद्रगड-कळसुबाई अभयारण्याचा आहे. या परिसरात बिबटे मोठ्या संख्येने आहेत. त्यातल्या एखाद्याला आत्ता भुक लागु नये, इतकी प्रार्थनाच आम्ही करु शकत होतो. वाट थोडा वेळ ओढ्याच्या पात्रातून जाउन पलीकडच्या तीरावर झाडीत शिरली. आमावस्येचा रात्र त्यामुळे पुर्ण काळोख, आजुबाजुला किर्र दाट झाडी, नक्की वाट कशी ते कोणालाच माहिती नाही , अश्या परिस्थितीत चालणे भाग होते. भरीतभर म्हणजे आमच्याकडचे खाणे पुर्णपणे संपले होते, जे काही थोडे पदार्थ होते, ते जीपमधे होते आणि जीप आमच्या सुचनेनुसार परागने याच ओढ्याच्या पुलावर आणुन उभी केली होती, तेव्हा तो पुल येईपर्यंत चालणे भाग होते. चालत रहावे तो दमल्याने उकडायचे आणि जरा टेकावे तो हाडे गोठवणारी थंडी. कसेबसे त्या ओढ्यातून चालत पुलावर पोहचलो. तो विकासकडून धक्कादायक बातमी समजली, कि क्लायंबिंगचा रोप वाटेत कोठेतरी विश्रांती घेताना विसरलाय. जवळपास पंधरा हजाराचा रोप सोडून जाणे शक्यच नव्हते. अखेरीस सॅकमधले थोडे फार श्रीखंड संपवले आणि विकास, नितीन रोप शोधायला, त्या ओढ्याच्या पात्रातून निघून गेले. मात्र घाईघाईत त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली नाही, त्या ओढ्याला पुढे डाव्या बाजुला फाटा होता आणि रोप शोधायला उजव्या बाजुला जाणे आवश्यक होते. त्यामुळे शोधाशोध करुनही सहाजिकच रोप सापडला नाही. अखेरीस विकासने त्या रात्री त्या पुलावर झोपायचे आणि बाकीच्यांना नोकरी, व्यवसाय असल्याने पुण्याला परत यायचे असे ठरले.
आम्ही आजुबाजुची वाळलेली झाडे तोडून विकासभोवती रचली आणि ती पेटवून त्यात तो झोपला, म्हणजे रात्री पाणी पिण्यासाठी वन्यजीव आले, तरी तो सुरक्षित राहु शकत होता. आम्ही जिप्सीतून परत निघालो. शेंडीच्या रस्त्याला लागलो, तो गाडीतील पेट्रोल संपले. आजुबाजुला ६ अंश तापमानाची थंडी आणि गाडीत स्वत:ला पुर्णपणे बंद करुन आम्ही ती रात्र कशीबशी काढली.
सकाळी लक्षात आले कि जेमतेम दोन कि.मी.वर पेट्रोलपंप होता. एका गाडीवरुन लिफ्ट घेउन नितीनने पेट्रोल आणले. आता पुरेसा उशीर झाल्याने कोणालाच नोकरीवर वेळेवर पोहचता येणार नव्हते. सहाजिकच "एक उनाड दिवस" घालवायचे एकमताने ठरले. विकासचे काय झाले ते पहाण्यासाठी गाडी पुन्हा आंबेवाडीला घेतली, तो पहाटेच्या पहिल्या बसमधे ड्रायव्हरशेजारी बसून आलेला विकास दिसला. घाईघाईने बस थांबवून विकासला गाडीत घेतले आणि एकच जल्लोष केला. आता वेळचवेळ असल्याने गाडी टारझनच्या मामांकडे म्हणजे राजुरला घेतली. तिथे गरम गरम कांदापोहे आणि तळव्याच्या आकाराचे गोल, मोठे पेढे आले. नाष्टा करून पुणे-नाशिक रोडला लागलो आणि नारायणगावची वायनरी, भोसरीला गोटी सोडा अशी मनसोक्त टंगळमंगळ करीत पुण्यात परत आलो. आणि एका चिरस्मरणीय ट्रेकची सांगता झाली.

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
२ ) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्रा. प्र.के. घाणेकर
३ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट

प्रतिक्रिया

शब्द नाहीत. शेवटी तो दोर सापडला का?

सर्वप्रथम प्रतिसादाबध्दल आभार. त्या रोपविषयी लिहायचे राहुनच गेले. विकासभोवती आम्ही आगोट्या पेटवून गेलो होतो तरी रात्रभर आजुबाजुच्या जंगलातून येणार्‍या प्राण्यांच्या आवाजाने रात्रभर झोप अशी आलीच नाही. थोडा डोळा लागतोय तोच पहाटे त्याला जाग आली ती रस्त्यावरुन आलेल्या कुलंगवाडीला पहिल्या एस.टी. ने. अंधुक उजेड असतानाच तो ओढ्यातून पुन्हा चालत गेला. रात्री आमची चर्चा झाली तेव्हा त्याला त्या फाट्याविषयी मी सांगितल्याने, या वेळी तो उजवीकडच्या ओढ्याच्या वाटेने गेला. आणि आम्ही सगळ्यात शेवटी जिथे थांबलो होतो, तिथेच तो रोप सापडला. लगेच तो रोप घेउन चालत त्याने आंबेवाडी गाठले, तो घोटीला जाणारी पहिली एस.टी. उभी होती. त्या बसमधे बसून तो घोटी-भंडारदरा रस्त्याच्या फाट्याला आला, तोच समोरुन आमची जिप्सी आली आणि आमच्या भरतभेटीनंतर पुढे काय झाले ते लिहीलेलेच आहे.

राघवेंद्र's picture

10 Feb 2018 - 1:26 am | राघवेंद्र

मस्त हो दुर्गविहारी !!!
आमचा उनाड शुक्रवार तुमचे लेख वाचण्यात गेला. असे नव-नविन गडांची ओळख करून देत राहा.

आणि हो शेवटी तो दोर सापडला का?

( कधी एकदा थंडी संपते आणि घराबाहेर पडता येईलअसे झाले आहे. )

निशाचर's picture

10 Feb 2018 - 5:35 am | निशाचर

( कधी एकदा थंडी संपते आणि घराबाहेर पडता येईलअसे झाले आहे. )

ह्म्म खरंय :(

अर्धवटराव's picture

10 Feb 2018 - 3:19 am | अर्धवटराव

इसी का नाम जिंदगी.

निशाचर's picture

10 Feb 2018 - 5:31 am | निशाचर

मस्त भटकंती सुरू आहे तुमच्याबरोबर आमचीही! कातळात कोरलेल्या पायर्‍या, टाकी सगळंच भारी. फोटोही छान आहेत, पावसाळयातले विशेष आवडले.

प्रचेतस's picture

10 Feb 2018 - 9:07 am | प्रचेतस

जबरदस्त.

हा लेख कळस आहे ह्या लेखमालेचा. तुफ्फान झालाय. हे तीनही गड अचाट आहेत. त्यांच्या दुर्गस्थपतींना मानाचा मुजरा.

सत्याचे प्रयोग's picture

10 Feb 2018 - 10:42 am | सत्याचे प्रयोग

अप्रतिम लेख नकाशसह
बैजवार लिहिले आहे

उपेक्षित's picture

11 Feb 2018 - 12:09 pm | उपेक्षित

जबरी गड आहे आणि तुमची सांगायची पद्धत तर अप्रतिम आहे सलाम तुम्हाला _/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Feb 2018 - 2:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकाहून एक सरस आहेत तुमच्या दुर्गभ्रमणकथा ! नकशे आणि ऐतिहासिक माहितीमुळे तुमची वर्णने अधिकच रोचक झालेली आहेत. त्यांचे एक सुंदर पुस्तक बनवता येईल.

पुढील भ्रमंतीच्या वर्णनाच्या प्रतिक्षेत.

उपेक्षित's picture

11 Feb 2018 - 4:26 pm | उपेक्षित

+ १ म्हात्रे सर

चाणक्य's picture

11 Feb 2018 - 5:26 pm | चाणक्य

जोरदार झाली या त्रिकुटाची मालिका.