राजस, सुकुमार, मदनाचा सुळका ( Madangad )

Primary tabs

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
2 Feb 2018 - 1:00 pm

मदनगड हा सह्याद्रीतल्या सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या अलंग, मदन व कुलंग मधला एक गड. अलंग, कुलंग व मदन रांगेतला हा सगळ्यात छोटा किल्ला आहे. तसा हा किल्ला बराच प्राचीन आणि तेवढाच दुर्गमसुद्धा आहे.
जगातला एकमेव "लँड ऑफ फोर्ट" असलेल्या महाराष्ट्रात सुमारे चारशे किल्ले आहेत. यात नैसर्गिक वरदान लाभलेल्या सह्याद्रीत बेलाग कड्यांची कवचकुंड्ल धारण केलेले अनेक गड आहेत. संपुर्ण भारत ईंग्रजांनी पादाक्रांत केल्यानंतर त्यांना खरा विरोध झाला, तो या महाराष्ट्र देशी. कातळांचे बेलाग कडे असलेल्या गड किल्ल्यांचा आश्रय घेउन मराठ्यांनी प्रखर प्रतिकार केला. अखेरीस इ.स. १८१८ मधे हा प्रतिकार संपविण्यात ईंग्रजांना यश लाभले. मात्र पुन्हा एखादा शिवाजी जन्मायचा आणि या गडांचा आधार घेउन सत्तेला धोका निर्माण होउ नये म्हणून ईंग्रजानी मार्ग काढला. गड नष्ट तर करता येत नाहीत, मग त्यावर जायचे मार्गच उध्वस्त करायचा निर्णय घेतला आणि अंमलात सुध्दा आणला. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील गडगडा उर्फ घरगड, चावंड, औंढा, अलंग आणि मदन अश्या गडावर जाणारे मार्ग सुरुंग लावून उध्वस्त करण्यात आले. मात्र पायथ्याच्या गावातील गावकर्‍यांची पुर्वापार चालत आलेली दैवत गडावर होती, त्यांच्या वार्षीक यात्रा, बापजाद्यांनी बोललेले नवस फेडायचे असल्याने इथल्या सह्यपुत्रांनी या गडावर जाण्याचा मार्ग काढला, कुठे लाकडाच्या बेचक्यावर चढून , कुठे वेलींची दोरी वापरून या काटक आणी चिवट लोकांनी गडावर राबता कायम ठेवला. आज या गडांवर जायचे याच पायथ्याच्या गावातील लोकांची मदत घेउन आपण या दुर्गयात्रा करु शकतो.
अलंग पाहून झाला, मात्र त्यावेळी मदनगडावर जायचा बेत योग्य तयारी आणि वेळेअभावी हुकला. मात्र २४,२५ डिसेंबर २००८ या दोन दिवशी गिरीदर्शन या पुण्याच्या ट्रेकिंग ग्रुपने मदन आणि कुलंग असा ट्रेक आयोजित केला. या ग्रुपबरोबर मी बरेच ट्रेक आणि पायलट ट्रेक केले होते, तातडीने नाव नोंदविले. मात्र गणसंख्येअभावी ट्रेक कॅन्सल झाला, तरीही आम्ही पाच जणांनी स्वतंत्रपणे जाण्याचा निर्णय घेतला. आता मदन हुकवायचा नाही हे पक्के होते.
सदाशिव पेठेतून नितीनची जिप्सी घेतली. शिवाजीनगरला गाडीत ईंधन टाकून निघालो, तो पर्यंत आमच्यातल्या एका धमाल मेंबरने, टारझनने त्याच्या आणखी एका मित्राला, घ्यायचे ठरले. त्याला फोन लावला, तर तो पाषाणमधून घरी परत यायला निघाला होता. ट्रेकसाठी ईतक्या एनवेळी यायला तयार नव्हता, तरी टारझनने त्याला तयार केले. हे कश्यासाठी, तर ट्रेकचे कॉट्रींब्युशन कमी व्हावे म्हणून. त्याने येण्याची तयारी दाखवल्यावर गाडी पुन्हा बाजीराव रोडला घेतली आणि आचार्य अत्रे सभागृहाच्या मागे असलेल्या त्याच्या घरातून त्याला रात्री बारा वाजता, अक्षरशः उचलला आणि गाडीत घालून नाशिक रोडला लागलो. या सदगृहस्थाने रात्री बारा वाजता, 'मी ट्रेकला निघालोय', हे घरी सांगितल्यानंतर घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल याची तुम्ही कल्पनाच करु शकता.
राजगुरुनगरला एका टपरीवर मध्यरात्री एक वाजता चहा आणि क्रिमरोलचा कार्यक्रम पार पडला. मस्का पाव न आणता, क्रिमरोल आणल्याबध्दल टिम लिडर विकासने टारझनच्या शिव्याही खाउन झाल्या. आळे फाट्यानंतर ब्राम्हणवाडा, कोतुळ मार्गे आम्ही शेंडी ( भंडारदरा ) कडे निघालो. वाटेत भल्या थोरल्या लांडग्याने दर्शन दिले. अखेर प्रवरा नदीचा पुल आला. कडाक्याच्या थंडीतही आम्ही पुलावर उभारून चांदण्यानी भरलेले आकाश पहाण्याचा आनंद घेतला. मधेच एखाडी चुकार उल्का पडताना दिसली. शेंडी गाव ओलांडून घोटी रस्त्याला लागलो. दुसर्‍या दिवशी आमावस्या असल्याने फारसा चंद्रप्रकाश नव्हता. अंधारातच बारी गावाच्या मागे उभे असलेले महाराष्ट्राच्या एव्हरेस्टने, शैल कळसुबाईने दर्शन दिले. भल्या पहाटे साडे पाचला आंबेवाडीत पोहचलो आणि अपेक्षेप्रमाणे कुत्रांनी आमचे स्वागत केले.
Madan1
निवांत सहा वाजता भास्करराव ड्युटीवर आले आणि गावाच्या दक्षिणेला असलेली कळसुबाई आणि अलंग, कुलंग, मदनाची रांग अस्पष्ट दिसु लागली.
Madan2
गावाच्या एका बाजुला पाण्याची टाकी उभी होती. गावातील लहानमुले त्यावर चढू नये म्हणून खालची शिडी काढली होती. मात्र आम्ही गाडी त्या शिडीखाली नेउन टाकीवर चढलो. खाली जेमेतेम काहीशे वस्तीचे आंबेवाडी गाव दिसत होते.
Madan3
AMK ट्रेकची क्रेझ वाढ्ल्याने गावातील काही युवक ट्रेकर्सना या गडावर न्यायचे काम करुन तसेच जेवण-खाण्याची सोय करुन बर्‍यापैकी कमाई करतात. अलंग आणि मदन या गडावर जाण्यास गाईडची नावे आणि संपर्क क्रमांक देतो.
१ ) श्री. लखन गोईकाने: - 7304378941, 8657361131
२ ) श्री. भोरु थावळे:- 8928937415
टाकीवरून थोडे फोटो काढले, मात्र गावात बहुतेक कोणी बसंती नसावी आणि असली तरी तीने आम्हाला भीक न घातल्याने आम्ही उतरुन खाली आलो.
Madan4
आम्ही खाली आलो तोपर्यंत या पुर्ण रांगेवर उगवत्या सुर्याची किरणे पसरली आणि अक्षरशः सोनेरी रंगात न्हाउन निघालेले हे तीन गड म्हणजे निसर्गाच्या रौद्र रुपाचे अनोखे दर्शन आम्हाला देउन गेले. गावतच एका घरात पोहे खाउन जिप्सीनेच मदनाच्या पायथ्याशी निघालो.
Madan5
मदनगडाचा नकाशा
कच्च्या रस्त्यावरून देखील आरामात जाईल असे जिप्सीसारखे वहान सोबत असल्यामुळे बराच आंतर खडबडीत रस्त्यावरुन जाउन आम्ही एका झाडाच्या खाली जिप्सी लावली.
Madan6
डावीकडे अलंगचा उत्ताल कडा तर उजवीकडे मदनाचा राजस, देखणा सुळका दिसत होता.
Madan7
दोघांच्या मधे असणारी खिंड, जिला हल्ली 'शिवखिंड'असे नाव दिले आहे, ते आमचे पहिले लक्ष्य होते. ग्रुपलिडर विकासने यापुर्वी तीनदा हा ट्रेक केला असल्यामुळे आम्ही सोबत गाईड घेतला नव्हता. मदनावर जाण्यार्‍या पायर्‍या उध्वस्त झाल्या असल्यामुळे हा पुर्णपणे टेक्निकल क्लाईंब आहे. त्यामुळे प्रस्तरारोहणासाठी आवश्यक ते साहित्य, म्हणजे हार्नेस ( नायलॉनच्या भक्कम पट्ट्यांपासून बनवलेली चड्डी, यात रोप अडाकविलेला असतो.मात्र हि सुपरमॅन सारखीच बाहेरुन घालायची असते ;-) ), पिटॉन ( दगडात मारायचा खिळा, याला बाहेरून कडी अडकविलेली असते ) कॅरॅबिनर ( दोरामधे अडकविलेली कडी, हि पिटॉनमधे अडकवता येते ), क्लायंबर रोप आणि डिसेंडर ( ईंग्लिश आठ ( 8 ) आकाराची कडी जी रोपवरून उतरताना वापरतात ) हे सर्व साहित्य घेउन आम्ही चढाई करणार होतो.
Madan8
कॅमेरा फक्त मी एकट्यानेच नेलेला होता, सहाजिकच बहुतेक फोटो काढायची जबाबदारी माझ्यावरच आली. एक ग्रुप फोटो काढला, शिवछत्रपतींचा जयजयकार केला आणि चढाईला सुरवात केली.
Madan9

Madan10
वाटेत एका दगडावर योध्याचे हे शिल्प होते. मात्र त्याचा अर्थ समजला नाही आणि ते कशासाठी कोरलयं त्याचा उद्देशही कळत नाही.
Madan11
वर चढणारी वाट एका ओढ्यातून जात होती.जड सॅक पाठीशी अडकवऊन दगडावरुन चढणे जिकीरीचे होते. सकाळच्या थंडगार वातावरणात आणि दुतर्फा असलेल्या दाट झाडीमुळे तितका त्रास झाला नाही. एकदा आंबेवाडी सोडले कि मदनाच्या माथ्याशिवाय पाणी मिळत नाही, त्यामुळे आंबेवाडीतच भरपुर पाणी सोबत घेणे आवश्यक आहे.
Madan12
सुरवातीला सौम्य असणारा चढ नंतर चांगलाच खडा होतो.
Madan13
मधे मधे कातळाचे मोठे टप्पे लागतात. छोटे छोटे धबधबे दिसतात. त्यावर एका बाजुने चढून जायचे. मदनावर सरपणासाठी लागणारी झाडी नाही, त्यामुळे ओढ्यातुन वाटचाल करतानाच आजुबाजुला सापडणार्‍या वाळक्या फांद्या, ओंडके बरोबर घेउन चढावे लागते. हे ओझे त्रासदायक आहे, पण त्याला पर्याय नाही. हल्ली बरेचजण गॅसच्या छोट्या शेगड्या बरोबर घेतात, त्यामुळे हा त्रास वाचतो.
Madan14
( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )

झाडीतुन उजवीकडे मदनाचा सुळका डोकावु लागला आणि खिंड जवळ आल्याची खुण पटली.
Madan15
खिंडीपाशी पोहचताना शेवटचा चढ उभा आणि घसार्‍याचा आहे. कसेबसे ढोपर घासत एकदाचे वर चढून आलो.
Madan16
खिंडीतच सपाटी बघून बरोबर आणलेला चिवडा चापला. सावली पाहून थोडी विश्रांती घेतली. मला मात्र अलंगचा कातळकडा खालून पहायचा होता, जो मागच्या अलंग भेटीच्या वेळी वरुन निरखला होता. या बाजुला अलंगच्या कातळकड्यात एक भली मोठी नैसर्गिक गुहा आहे. मात्र त्यात दगडांच्या कपारींचा खच पडलाय.
अलंगच्या कड्यावरून एक ग्रुप वर क्लांईम्ब करत होता, ते पाहून मी पुन्हा मदनच्या खिंडीकडे आलो. इथून एक वाट खाली उतरून अलंगवर चढणार्‍या उडदवणेच्या वाटेला मिळते. हि वाट अलंगच्या कड्यावरुन एखाद्या कंबरपट्ट्यासारखी जाते.
Madan17
( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )

अशीच वाट समोर दिसणार्‍या मदनच्या कड्यावरून कातळात कोरलेल्या पायर्‍याकडे जात होती.
Madan18
मागच्या बाजुला औंढा, पट्टा आणि त्यावरच्या पवनचक्क्या स्पष्ट दिसत होत्या.
Madan19
( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )

मदनगडाच्या कड्यावर उभ्या कोरुन काढलेल्या पायर्‍या प्राचीन बांधकामाचा जबरदस्त अविष्कार म्हणायला हवा. मात्र यावर चढताना तोल सांभाळावा लागतो, कारण याला कठडे नाहीत. विशेष काळजी घ्यायची ती सॅकवर अडकविलेल्या कॅरी मॅटच्या नळकांड्याची. कारण डाव्या हाताच्या कातळकड्याला घासून तोल जाण्याची शक्यता असते. अर्थात पुढे जे दिव्य करायचे आहे त्याची हि चुणूकच असते.
Madan20
( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )

यानंतर आणखी एक खडतर टप्पा येतो. इथे सरळ असणारी वाट ईंग्रजानी सुरूंग लाउन फोडल्याने आव्हानात्मक बनली आहे.
Madan22
( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )

अक्षरशः ८० अंशाच्या कड्यावर खोबण्या आहेत, त्यात पाय रोवून एका दगडावर टांग टाकून पलिकडे जावे लागते. यात सुरुंगासाठी जे नळीसारखे छिद्र आहे त्यात बोट रोवून हा थरार पार पडतो. मागे शंभर मीटरचा कडा थरकाप उडवत असतो. पण मन निश्चल ठेवुन हा टप्पा पार पाडता येतो.
Madan23
आम्ही फक्त सहा जणच होतो आणि बर्‍यापैकी अनुभवी होतो. त्यामुळे कोणताही रोप वगैरे न वापरताच केवळ पकडीचा वापर करुन हा टप्पा पार करुन पलिकडे आलो.यामुळे आमचा वेळही वाचला.
मात्र दॄष्टीभय वाटत असल्यास रोप वापरणेच चांगले. शेवटी 'जान है, तो जहान है'.
Madan24
यानंतर येतो तो टप्पा ज्यासाठी मदनगड ट्रेकर्समधे प्रसिध्द आहे. साधारण पन्नास फुटी कातळकडा ज्यावरच्या पायर्‍या ईंग्रजांनी उध्वस्त केल्याने क्लायबिंग शिवाय पर्याय नाही. या पायर्‍या सुस्थितीत असताना कश्या दिसत असतील याची आज आपण केवळ कल्पनाच करु शकतो.
Madan25
इथे विकास आधीच येउन पोहचला होता, आणि त्याने रोप हार्नेसला अडकवून कातळकडा चढायला सुरवात केली होती.
Madan26
ईंग्रजानी सुरुंग लावताना केलेली छिद्रे आणि थोडेफार नैसर्गिक होल्ड यांचा वापर करीत तो कडा येंगत होता.
Madan27
वाटेत दोन ठिकाणी मेखा मारल्या होत्या, त्यात रोप अँकर करून स्वत:ला थोडे सुरक्षित करुन तो वर वर सरकत होता. इथे थोडीहि चुक करायला परवानगी नव्हती. मागे साधारण दोनशे मीटरचा थेट कडा कोसळला होता.
Madan28
बघता बघता तो वर पोहचला आणि वर एका दगडावर मोठी मेख मारली होती त्याला रोप फिक्स केला आणि दगडात कोरलेल्या भोकात रोप ओवून खाली सोडला.
Madan29
आता बाकीचे भिडू एक एक करुन वर चढू लागले. माझी पाळी आल्यानंतर कपारीत बोटे अडकवून मी क्लांईब सुरु केला. जस जसा वर सरकत होतो, तस तसा विकास वरून दोर ओढत असल्याने, मी दोरावर एखाद्या कोळ्यासारखा लटकतो आहे हे लक्षात आले. जरी माझा हात सटकला असता तरी मी जागेवरच लोंबकळत रहाणार होतो. अर्थात काहीही वेडावाकडा प्रकार न होता आम्ही सर्व जण वर पोहचलो.
Madan30

यानंतर थोड्या कातळात कोरलेल्या पायर्‍या चढून आम्ही एका छोट्या सपाटीवर पोहचलो. मुख्य परिक्षा पार पडली तरी अजून आव्हान संपले नव्हते.
Madan31
( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )

हा पॅच कसा आहे आणि त्याच्या मागे किती खोल कडा आहे याची या कुलंगच्या बाजूने घेतलेल्या फोटोतून तुम्हाला कल्पना येईलच.
Madan32
यानंतर उभ्या कातळकड्यात ट्रॅव्हर्स आहे. जेमतेम पाउलभर रुंदीची हि वाट आहे. उजवी कडे वर पाहीले तर टोपी मागे पडेल असा कडा तर डावीकडे टोपी पुढे पडेल अशी दरी दिसते.
या वाटेवरून अत्यंत जपून चालावे लागते. एखाद्या छोट्या चुकीला इथे क्षमा नाही. अर्थात नवख्यांच्या सोयीसाठी कातळकड्यात एका ठिकाणी पिटॉन मारुन ठेवलाय, त्यात रोप ओवून हि वाटचाल सुरक्षितपणे करता येईल. एखाद्या लहानबाळासारख्या बेबीस्टेप घेत आम्ही या वाटेच्या टोकाशी पोहचलो. मातीच्या घसरड्या वाटेने वळण घेउन वरच्या थोड्या सपाटीवर पोहचलो.
Madan33
खाली आपण चढून आलो तो संपुर्ण रुट दिसत असतो. मागच्या बाजुला अलंगचा उत्ताल कडा दिसत असतो.
Madan34
अलंग आणि मदनच्या कड्यामधले अंतर जेमतेम चारशे फुट असावे. याचा फायदा घेउन इथे व्हॅली क्रॉसिंग केले जाते. हा एक आगळाच रोमहर्षक अनुभव आहे.सह्याद्रीमधे रायगडाजवळील लिंगाणा- रायलिंगचे पठार व पनवेलजवळील प्रबळगड- कलावंतीण या दरम्यानसुध्दा व्हॅली क्रॉसिंग केले जाते.
Madan35
आम्ही यायच्या आदल्या आठवड्यात एक दिव्यांग व्यक्तींचा ग्रुप मदन वर येउन व्हॅली क्रॉसिंग करुन गेला असे आम्हाला आंबेवाडीत समजले होते. त्यासाठी लावलेले बोल्ट दगडात बसवलेले दिसले. हातीपायी धड असलेल्या आम्हाला झालेल्या त्रासाचा विचार करता, या लोकांनी हे साहस केलेले पाहून आम्ही त्यांना मनोमन सॅल्युट केला.
Madan36
या नंतर ' Z' आकारात कातळात कोरलेल्या पायर्‍या आपल्याला माथ्यावर घेउन जातात.
Madan37
( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )

जिथे धड सरळ उभारणे मुष्किल तिथे त्याकाळी कारागिरांनी या पायर्‍या कश्या कोरल्या असतील असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही.
Madan38
या वाटेत एक पहारेकर्‍यांसाठी गुहा कोरली आहे.गुहा छोटीशीच आहे. जास्तीत जास्त दोनच जण यात मुक्काम करु शकतील.
Madan39
पाठिमागच्या बाजुला आ करुन बसलेली पाताळदरी आणि माती,मुरुमांचा थर असणार्‍या पायर्‍या चढणे जीवघेणा अनुभव आहे.
Madan40
या गडावर जेव्हा राजवट चालु होती, तेव्हा त्या काळातले सैनिक, किल्लेदार कसे येथे रहात असतील, कसे ये जा करत असतील याची आज फक्त कल्पना करणेच हाती आहे. या परिसरात पडणारा महामुर पाउस विचारात घेता पावसाळ्यातला काळ त्यांच्यासाठीही खडतर असणार हे नक्की.
Madan41
शेवटी एकदाच्या सर्व परिक्षा पार पडून आम्ही गडमाथ्यावर पोहचलो आणि सुटकेचा भलामोठा निश्वास सोडला. माथा तिरका उतरत गेलाय आणि सपाटीही जेमेतेम त्यामुळे फार बांधकामे नाहीत. एखाद्या ईमारतीचा उध्वस्त चौथरा दिसतो.
Madan42
बहुधा इथे सैन्यबळ कमी असावे, त्यामुळे अलंगसारखी पाण्याची फार टाकी नाहीत. एकाच टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. या एकाच कारणाने मदनगडाचा ट्रेक करण्याचा योग्य कालावधी नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा आहे. मार्च महिन्यात टाक्याच्या एका कोपर्‍यात जेमेतेम पाणी शिल्लक रहाते.
खरे तर दुर्गसंवर्धन करुन, मदनावर आवश्यक तेथे शिड्या आणि हे पाण्याचे टाके साफ केले तर असंख्य दुर्गयात्रींची चांगली सोय होईल.
Madan43

Madan44
कातळावर काही शिवपिंड कोरलेल्या दिसल्या. पण हे कशासाठी याचा उलगडा झाला नाही. अशाच पिंड कुलंगवर आहेत. कदाचित गड उभारणी करताना आधी या पिंड कोरुन त्यांची पुजा करुन बांधकामाला सुरवात केली असावी.
Madan45
माथ्यावरची गुहा प्रशस्त आहे. थोडा भाग दगडी विटांनी बंद केला आहे. इथे तीस-चाळीस जण आरामात झोपु शकतात. बरोबर आणलेले सरपण आम्ही गुहेच्या दारात टाकले आणि गुहेत प्रवेश केला.
Madan46
आत जाउन सॅक एका कोपर्‍यात ठेवल्या आणि अचानक पाच-सहा गलेलठ्ठ उंदिर इकडे तिकडे पळताना दिसत होते. हि जत्रा डोक्याशी घेउन झोपणे शक्यच नव्हते. नितीनने हँडग्लोव्हज घालून एकेक उंदराला पकडले आणि चेंडू फेकावे तसे लांब फेकून दिले. आणखी उंदीर आसपास नाहीत याची खात्री केली आणि मदनाच्या माथ्यावर निघालो.
Madan47
मदनगडाच्या नैऋत्य टोकाशी नेढ आहे. रतनगड, हरिश्चंद्रगड, कण्हेरा या गडाप्रमाणेच हे प्रशस्त आहे. या नेढ्यावर जाता येते, मात्र घसारा आहे. आम्ही अलिकडे सपाटीवर बसून सुर्यास्त पाहू लागलो.
Madan48
समोर कुलंगचा बेलाग कडा आणि त्याच्या समोर डाईकसारखा असणारा सुळका दिसत होता.
Madan49
कुलंगच्या कड्याच्या मागे सुर्यास्त झाला. मदनाच्या कड्याला चिकटून समोरच एक टोकदार सुळका दिसतो, याचे नाव आहे, 'मदनबाण'.
Madan50
इथून बरोबर समोर पश्चिमेला अर्नाळ्याची खाडी आहे, त्यात सुर्य बुडाला.
अंधार पडल्याबरोबर खाली उतरुन आलो आणि रात्रीच्या खिचडीची तयारी सुरु केली. या खिचडीची चव घरी कधीच येत नाही. जेवण करून गुहेबाहेर शेकोटीसमोर बसलो. अलंगच्या पठारावर दुपारी चढलेल्या ग्रुपने मुक्काम केलेले दिसत होता. बॅटरीने उघडझाप करुन संकेत दिला, तो त्यांच्याकडूनही तशीच बॅटरीची उघडझाप झाली. हा शब्देविन संवाद मजेशीर होता. शांत वातावरणात परागच्या मोबाईलवरच्या गझला आर्त स्वर लावून गेल्या.
अखेरीस आत जाउन झोपलो. मध्यरात्री आवाजाने मला अचानक जाग आली. शेजारी पट्टीचे घोरासुर झोपल्याने त्यांचा आवाजाने गुहा भरून गेली होती. नाईलाजाने डोक्यावर पांघरून ओढले आणि नंतर केव्हातरी झोप लागली.
Madan51
दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे उठलो, तो अलंगच्या कड्यामागून उगवलेल्या सहस्त्ररश्मीने स्वागत केले.
Madan52
मदनगडाच्या तोकड्या माथ्यावर जाउन उभारलो, तो नजरेला थक्क करणारे दृष्य समोर आले. सकाळच्या धुक्यातून डोंगर नुसतेच माथे बाहेर काढून जागे होत होते.
Madan53
आम्ही नाशिक आणि अ.नगरच्या सीमेवर होतो. पण एक एक गड निरखत आणि ओळखत होतो. त्रिंगळवाडी, हत्तीसारख्या आकाराचा हर्षगड उर्फ हरिहर, प्रशस्त पसरलेला अंजनेरी, सातमाळा रांगेतले सप्तश्रॄंगी, मार्किंडा, धोडप, कांचन ओळखता आले.
Madan54
जवळच कळसुबाई आपल्या सर्वोच्च माथ्याचा टेंभा मिरवत होती.
Madan55
ईतक्यात लांब क्षितीजावर मला साल्हेर आणि सालोटा ओळखता आले. सगळ्यांना वर बोलावून ते मी दाखवले. नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरुन आम्ही उत्तर सीमेवरचा परिसर पहात होतो.
Madan56
खाली कुरंगवाडी परिसर दिसतो. भावली गावचा पाझर तलाव आणि घोटी, इगतपुरी परिसरही ओळखता येतो.
Madan57
मनसोक्त आसंमत दर्शन करुन खाली परत आलो तो, नाष्ट्यासाठी मॅगी तयार करायचे सुरु होते.
Madan58
आता मदन उतरुन पुन्हा कुलंग चढुन जायचा होता. खाणे केव्हा मिळेल याची खात्री नव्हती. सहाजिकच भरपेठ खाउन घेतले.
Madan59
ट्रेकमधे तर्‍हेतर्‍हेचे प्रकार होत असतात. दोन काटक्यांनी मॅगी खाण्याचा विकासचा हा प्रयत्न असाच आहे. ;-)
Madan60
उतरायला सुरवात केली. या ठिकाणी उध्वस्त दरवाजा असावा.
Madan61
काल पायर्‍या चढताना कडा समोर असल्याने आरामात चढून आलो होतो. मात्र आज उतरताना नजरेसमोर खोल दर्‍या भिती दाखवत होत्या.
Madan62
ग्रुप मोठा असेल आणि नवखे ट्रेकर्स असतील तर इथे रोप बांधून उतरवलेले चांगले.
Madan63
आम्ही मात्र रोप बांधण्यात वेळ न घालवता, थोडे जपून उतरत, प्रसंगी पायर्‍यावर बसून उतरलो. मात्र यानंतर मातीचा घसारा असलेला टप्पा होता. हा टप्पा पुर्ण नव्वद अंशात वळत होता. पाय घसरत असताना हा उतरणे अजिबात सोपे नव्हते. बरं डाव्या हाताला आधारालाही मातीची ढेकळे असलेला कडा. धरायला जावे तो ढेकूळ नाहीतर गवताच्या मुळ्या हातात यायच्या. कसेबसे हा ट्प्पा पार करुन खाली उतरलो. यापुढे नंतरचा ट्रॅव्हर्स सोपा वाटला. अखेरीस थेट तुटलेल्या कातळकड्या समोर येउन उभे राहिलो.
Madan64
काल क्लांईम्ब केलेला हा कडा आता, रॅपलिंगच्या तंत्राने उतरायचा होता.
Madan65
मागे जवळपास पाचशे मीटरची खोल दरी आ वासून उभी असते. तिकडे लक्ष न देता पाय कड्यावर रोवायचे, शरीर कड्यावर नव्वद अंधात ठेवून एका हाताने रोप लुज करत खाली उतरायचे, हा प्रकार रॅपलिंग.
Madan66
पोटात गोळा येण्याची प्रत्यक्ष अनुभुती येते मिळते. मात्र एक जादाचा सुरक्षा दोर ( सेफ्टी रोप) इथे अडकविलेला असल्याने फारसा धोका नसतो. फक्त मन स्थिर ठेवता आले पाहिजे.
सगळेजण खाली उतरुन आले. शेवटी सेल्फ अँकरींगचा उपयोग करत विकास खाली उतरुन आला. शेवटचे काही फुट राहिले असताना अचानक तो सटकला, पण खाली एका पिटॉनला अँकर करुन उभ्या असलेल्या नितीनने त्याला पटकन सावरले.
पुन्हा एकदा कातळात तुटलेला कडा पार करुन आम्ही सर्व जण खिंडित परत आलो आणि कित्येक दिवस उराशी बाळगलेले मदन सर करायचे स्वप्न सर केल्याच्या आनंदात कुलंगच्या दिशेने निघालो.
आम्ही जरी मदनावर आंबेवाडीच्या बाजुने गेलो असलो तरी कुलंग पाहून किंवा थेट कुरंगवाडीवरुन मदनगड पहाणे शक्य आहे.
Madan67
अलंगवरुन दिसणारा मदनाचा भेदक सुळका.

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
२ ) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्रा. प्र.के. घाणेकर
३ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

2 Feb 2018 - 1:48 pm | कपिलमुनी

ह्रुदयाचे ठोके चुकवणारी वाट आहे !

इतिहासात या गडाबद्दल काय माहिती आहे ?

त्वरीत प्रतिसादाबध्दल धन्यवाद ! अलंग, मदन आणि कुलंग असे सलग धागे लिहीतो आहे. मागच्या आठवड्यात अलंगची माहिती लिहीताना ईतिहासतील उल्लेख लिहीले होते. मदन तुलनेने छोटा असल्याने याचा ईतिहासात वेगळा उल्लेख नाही. पुढच्या आठवड्यात कुलंग गडाची माहिती येईल, त्यात ईतिहास सविस्तर लिहीण्याचा प्रयत्न करेन.

मस्त लेख आणि माहिती. ट्रेक ग्रुप बरोबर जाऊन आलोय इकडे, तरीही काही फोटो बघून फाटली :))

पाटीलभाऊ's picture

2 Feb 2018 - 4:50 pm | पाटीलभाऊ

नेहमीप्रमाणेच मस्त वर्णन आणि फोटो

प्रसाद_१९८२'s picture

2 Feb 2018 - 5:26 pm | प्रसाद_१९८२

मी दोन वेळा मदनगडाचा ट्रेक आधी केला आहे. तेंव्हा इतका अवघड वाटला नव्हता.
पण तुमच्या लेखातले फोटो पाहून 'अतीकठीण' श्रेणीतला हा ट्रेक आहे याची खात्री पटते.

विशुमित's picture

2 Feb 2018 - 5:44 pm | विशुमित

सचित्र मस्त वर्णन.

एस's picture

2 Feb 2018 - 6:03 pm | एस

शीर्षक आवडले. :-)

थरारक वाचनानुभव.

मदनगड तुफ्फान आहे. हे तीनही गड अचाट आहेत, ह्या किल्ल्यांवर गेलो नाही, जाणे शक्यही नाही पण पायथ्यापासून ह्यांचे रौद्र दर्शन घेतले आहे. मानाचा मुजरा आहे ह्यांच्या दुर्गस्थपतींना.

किमान कुलंग बघून यायला हरकत नाही.

सिरुसेरि's picture

2 Feb 2018 - 7:52 pm | सिरुसेरि

थरारक वर्णन आणि फोटो

निशाचर's picture

2 Feb 2018 - 7:57 pm | निशाचर

मस्त लिहिलंय.

प्राची अश्विनी's picture

3 Feb 2018 - 8:48 am | प्राची अश्विनी

अतिशय रोमांचक वर्णन. शीर्षक आवडले.

चाणक्य's picture

3 Feb 2018 - 11:35 pm | चाणक्य

भारी आहे वाट. तुम्ही मस्त लिहिता दुवि.

मुक्त विहारि's picture

4 Feb 2018 - 1:50 am | मुक्त विहारि

दंडवत...

तेजस आठवले's picture

4 Feb 2018 - 5:50 pm | तेजस आठवले

फारच छान लिखाण.

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Feb 2018 - 8:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

लिखाण आणि फोटो दोन्ही उत्तम.
एक एक टप्प्याचे वर्णन वाचुन जुन्या आठवणी जाग्या केल्यात राव. त्या ५० फुटी पॅच वरुन आमच्या पैकी एकाचा मेटॅडोर टॉर्च खाली सटकला होता, एकच ठाप्प करुन आवाज आला आणि तो (टॉर्च) दरीत दिसेनासा झाला. पुन्हा काय तिकडे बघायची हिम्मत झाली नाहि.

दुर्गविहारी's picture

9 Feb 2018 - 8:32 pm | दुर्गविहारी

खुपच खतरनाक पॅच आहे तो. रॅपलिंग करत उतरताना मी सुध्दा टरकलो होतो. ;-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Feb 2018 - 9:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

थरारक लेख आणि फोटो ! लै डेंजर लोक आहात तुम्ही लोक !!

पुलेप्र.

कंजूस's picture

6 Feb 2018 - 6:35 am | कंजूस

अवघड!!

सुमीत भातखंडे's picture

6 Feb 2018 - 11:30 am | सुमीत भातखंडे

जबरा.
त्या २१ व्या चित्रात तो पिवळा शर्ट वाला कसला निवांत उभा आहे. डेंजर आहे.

जागु's picture

6 Feb 2018 - 12:09 pm | जागु

रोमांचक.

कपिलमुनी's picture

6 Feb 2018 - 12:16 pm | कपिलमुनी

हे किल्ले पाहिले की शशी भागवतांच्या मर्मभेद , रत्नप्रतिमा अशा कादंबर्‍यांची आठवण येते .

दुर्गविहारी's picture

9 Feb 2018 - 8:22 pm | दुर्गविहारी

या कादंबर्‍या वाचल्या नाहीत, पण आता उत्सुकता निर्माण झाली आहे. नक्कीच वाचेन.

स्नेहांकिता's picture

6 Feb 2018 - 4:04 pm | स्नेहांकिता

थरारक आणि साहसी सफर !
व्हिडो विशेष आवडला. देखणी दृश्ये आहेत.

स्नेहांकिता's picture

6 Feb 2018 - 5:12 pm | स्नेहांकिता

ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

या ठिकाणी वर्डप्रेसचं फाटक बंद आहे.

दुर्गविहारी's picture

9 Feb 2018 - 8:34 pm | दुर्गविहारी

बहुतेक लिंक चुकत असणार. बघतो काय अडचण आहे ती. प्रतिसादाबध्दल धन्यवाद.

तर्री's picture

6 Feb 2018 - 6:18 pm | तर्री

केवळ भीषण चढाईचे केवळ सुंदर लेखन!

सूड's picture

6 Feb 2018 - 7:29 pm | सूड

क्या बात!!

वीणा३'s picture

6 Feb 2018 - 10:13 pm | वीणा३

जब्बरदस्त !!!

दिलीप वाटवे's picture

7 Feb 2018 - 2:22 pm | दिलीप वाटवे

हा लेखही भारीच झालाय. 'नायलॉनच्या भक्कम पट्ट्यांपासून बनवलेली चड्डी' हा हा हा. हे बाकी झ्याक लिव्हलय. फोटो सुध्दा छान. बाकी लिहित रहा छान वाटतं वाचायला.

कवितानागेश's picture

9 Feb 2018 - 8:47 am | कवितानागेश

जबरदस्त

पैसा's picture

9 Feb 2018 - 11:17 am | पैसा

कसले कसले ट्रेक्स करता रे!

दुर्गविहारी's picture

9 Feb 2018 - 8:20 pm | दुर्गविहारी

सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे आभार. ईतके कौतुक होईल असे वाटले नव्हते. ;-)
पण माझ्या काहीशा वेड्यावाकड्या लिखाणाला तुम्ही सांभाळून घेता आहात आणि दादही देताय, हे खरच खुप सुखावणारे आहे. सर्वांचाच ऋणी आहे. यातील काही जण आमच्या "मिळून मिसळून" या व्हॉटस अ‍ॅप ग्रुपवरचे मित्रच आहेत, त्यांचेही आभार.

श्रीकांत पवार's picture

10 Feb 2018 - 11:27 pm | श्रीकांत पवार

लेखन शैली खूप आवडली,

ट्रेक चे वर्णनं वाचताना व फोटो बघताना सगळं काही आपल्या डोळ्यासमोर घडत आहे असं वाटत होतं.

वरील प्रतिसाद पाहताना शशी भागवतांच्या कादंबऱ्या चा उल्लेख आल्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला,

त्या कादंबऱ्या वाचताना जे चित्र मनात दिसायचं तसंच जाणवलं,,,फक्त कालखंडाचा फरक जाणवला.

चांगल वाचल्याचं समाधान मिळालं.

टवाळ कार्टा's picture

11 Feb 2018 - 2:57 am | टवाळ कार्टा

बाब्बो....फोटो बघुनच डोळे फिरले