बजेट -- एवढं काय त्यात!!

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
1 Feb 2018 - 5:54 pm

आईची शप्पथ घेऊन सांगतो मला बजेट मधलं काहीही कळत नाही. पण आसपासचे लोकं "बजेट आहे,बजेट आहे" म्हणून अशी काही वातावरण निर्मिती करतात की मी उगाचच एक्ससाईट होऊन त्याची वाट बघायला लागतो. अर्थमंत्र्यांचं दोन- तीन तासांचं भाषण ऐकल्यावर "आपल्याला ह्यातलं काय कळलं?" असा प्रश्न एकांतात मी स्वत:ला नेहमीच विचारतो. आता हा प्रश्न क्षणिक असला तरी "आपल्याला नेमका काय फरक पडला?" हा प्रश्न तर वर्षभर सतावत असतो. बजेटमध्ये अमुक अमुक गोष्टीत स्वस्त झाल्या असं जाहीर करतात. त्या खरंच झाल्यात का हे बघायला मी मुद्दामहून कधीही बाजारात जात नाही. आधी आईने आणि आता बायकोने दिलेली सामानाची यादी बाजारात जाऊन निमूटपणे घेऊन येणे एवढंच आम्हाला माहिती. त्यात आजकाल तर आम्ही मॉल किंवा सुपरमार्केटमध्ये जातो. त्यामुळे सामानाचं बिल जरा जास्त वाटलं तर घेतलेल्या पन्नास टक्के तद्दन निरुपयोगी वस्तूंपैकी दोन-चार काढून ठेवायच्या. इतके सरळसाधे आमचे हिशोब असतात. तरीसुद्धा आम्ही बजेट बजेट करून का नाचत असतो हे माझं मलाच कळत नाहीये!

त्यातल्या त्यात इन्कम टॅक्सच्या मर्यादेत आल्यापासून बजेटच्या त्या भागातलं मला थोडंफार कळतं. सरकारची मेहेरबानी झाली तर वर्षाकाठी दोन-चार हजार रुपये वाचतात. वाचलेले हेच दोन-चार हजार रुपये सरकार इतर गोष्टींचे भाव वाढवून आमच्याकडून दुपटीने नकळतपणे वसूल करून घेते. मला आजवर उमगलेलं बजेट एवढंच आहे. पण मी काय म्हणतो,समजा सरकारने टॅक्स कमी केला आणि भाव वाढवले नाही. तरी त्या दोन-चार हजारात आम्ही नेमके कोणते बंगले बांधणार आहोत?? पण इन्कम टॅक्स हा लोकांच्या इतक्या जिव्हाळ्याचा विषय आहे की, च्यायला सरकारने टॅक्स वाढवला नसता तर फेरारीचं बुक करणार होतो ह्या आवेशात लोकं बोलतात.

बजेट म्हणजे सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक अशी सरळसाधी व्याख्या आहे. आता अंदाज म्हटलं की तो चुकणारच अशी समजूत करून लोकं गप्प का बसत नाहीत? नाहीतरी लोकसंख्येपासून ते हवामानापर्यंत कोणता सरकारी अंदाज बरोबर आलाय आजपर्यंत? बरं सरकार इतकं लाखो कोटींचं बजेट सादर करते. पुढल्या वर्षी त्यातले किती खर्च झाले हा प्रश्न कोणालाच कसा पडत नाही? (तुम्हाला सांगतो,लोकसभेच्या अध्यक्षपदी जर आमच्या गल्लीतला वाणी बसला असता तर त्याने अर्थमंत्र्यांना,"ओ आधी जुना हिशोब क्लियर करा..मग पुढचं बघू." असं ठणकावून सांगितलं असतं.) तसं पाहिलं तर हा प्रश्न आम्हाला महिन्याच्या घराच्या बजेटमध्ये सुद्धा पडत नाही. कारण मुळात तो प्रश्न पडण्याची गरजच पडत नाही. महिनाअखेर अकाउंटमधली शिल्लक रक्कम बघून आपलं बजेट पार बोंबललयं हे दिसूनच येतं. सरकारला फिस्कल डेफिसिट इकडून तिकडून कमी करण्याची सोय तरी असते. आम्हाला ती पण नाही. आमचं फिस्कटलेलं बजेट म्हणजेच आमचं फिस्कल डेफिसिट!!

काल रात्री असंच मी बजेट- बजेट म्हणून नाचत असताना बायकोने,"एवढं काय त्यात?" असं विचारून मला गप्प केलं. तिला एवढं काय हे समजावून सांगताना मला बजेटचा "ब" सुद्धा समजत नाही अशी माझी अंतरात्मा ओरडून ओरडून सांगत होती. तरीसुद्धा मी जागतिक कीर्तीचा अर्थतज्ञ होऊ शकतो असा गैरसमज थोडावेळाकरिता निर्माण करण्यात मी यशस्वी झालो होतो. पण तेवढ्यात धोब्याकडून पैसे वापस घेताना मी दहा रुपयाची फाटकी नोट घेऊन आलोय हे तिच्या लक्षात आलं. आणि माझ्यातल्या तज्ञाचा त्रिफळा उडाला.

आमचं एक जाऊद्या. (कारण आमचं नेहमीच जाऊ देण्या लायकचं असतं म्हणा!) पण मंत्रालयातले सगळे तज्ञ मिळून बजेट कसं तयार करत असतील हा प्रश्न मला नेहमी पडतो. म्हणजे बघा, अर्थमंत्री असे राजासारखे दरबारात उच्चासनावर बसले असतील. वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी डोळ्यात अत्यंत करुण भाव आणून हात जोडून राजाकडे पैसे मागत असतील. राजा आणि प्रधान आपल्याच तोऱ्यात," का रे रेलव्या, तुला कशाला पाहिजे पाच लाख कोटी? कश्याला नवीन रेलवे लाईन टाकायच्या? आहे त्या सांभाळ आधी..चाल हे घे दोन लाख कोटी..आणि तू रे परिवहन...चारशे कोटीच्या वरती एक रुपया मिळणार नाही सांगून ठेवतो. आणि त्या समाजकल्याणला द्या शंभर कोटी. तो रस्ते विकास बघा कसा लपून बसलाय कोपऱ्यात. xxच्या मागच्या वर्षी सत्तर हजार कोटी दिले तुला ते काय जावयाच्या गावात हायवे बांधण्यासाठी होय रे?? एक रुपया देणार नाही तुला आता. तुला किती पाहिजे रे संरक्षण? तुमचं काय बा तुम्ही मोठी माणसं. तुम्हाला ब्लँक चेकचं द्यावा लागतो. प्रधानजी ह्यांना मोकळं करा लौकर. अहो कृषिताई तुम्ही कशाला रडताय? तुमची वेगळी व्यवस्था आहे. हे बघा..तीन लाख कोटी ठेवलेत दुष्काळासाठी.. ओला की कोरडा ते तुमचं तुम्ही बघा...आणि तो बालविकास राहिला की हो.अहो मुलं म्हणजे आपल्या देशाचं भविष्य.द्या त्याला हजारेक कोटी. दोन-चार तरी बगीचे बांधा हो ह्याच्यात..आणि हो शिक्षणाचं काय तुमच्या? पाच हजार कोटी देतो अन सहा नवीन विद्यापीठं घोषित करुन टाकतो..चालेल का? ..अरेरे जलसंवर्धन करायचं राहिलं ना..आणि आदिवासी वगैरे..प्रधानजी उरलेले वाटून टाका बरं ह्यांच्यात. चला झाले का सगळे...करा हिशोब प्रधानजी अन मारा प्रिंटआउट..अन जरा दोन-चार चारोळ्या वगैरे टाका अधूनमधून ..लोकांना हसवायला बरं पडतं ते"

असो. बजेट जाहीर झालंय.आज बजेट सादर होण्यापूर्वीच हे मनोगत जगासमोर मांडावं असं वाटत होतं. पण नंतर विचार केला, आपली परिस्थिती ही बजेट सादर होण्याआधीही आणि नंतरही तीच असणार आहे. मग नंतरच करू ना...एवढं काय त्यात!!

आज रात्रीचा विषय: सरकारने बजेटमध्ये काय काय करायला हवे होते..! एवढं काय त्यात!!

-- चिनार

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

1 Feb 2018 - 9:19 pm | रंगीला रतन

छान जमलय...

चाणक्य's picture

1 Feb 2018 - 11:10 pm | चाणक्य

आवडलं हे बजेट.

रुपी's picture

2 Feb 2018 - 3:28 am | रुपी

हा हा.. भारीच :) "का रे रेलव्या... " पासून पुढे वाचताना हहपुवा =)

कंजूस's picture

2 Feb 2018 - 4:38 am | कंजूस

☺ ☺ ☺ ☺ ☺

नावातकायआहे's picture

2 Feb 2018 - 5:57 am | नावातकायआहे

मस्त!

मनातलं बोललात.
मस्त लिहिलंय..

सुमीत भातखंडे's picture

2 Feb 2018 - 10:19 am | सुमीत भातखंडे

एकदम मनातलं

चौथा कोनाडा's picture

2 Feb 2018 - 10:25 am | चौथा कोनाडा

व्वा, झक्कास ! फर्मास !
सेम पिंच असल्यामुळे लेख मनाला भावलाच !

करू का कायप्पावर शेअर ?

सुखीमाणूस's picture

2 Feb 2018 - 10:40 am | सुखीमाणूस

बर वाटल आपल्या सारखे अजून कोणीतरी आहे हे पाहून
लेख फर्मास विनोदी झाला आहे. वाटप आवडल. :) :) :)

पिवळा डांबिस's picture

2 Feb 2018 - 11:00 am | पिवळा डांबिस

आवडला. विशेषतः ते रेलव्या पासूनचं पुढलं डिस्ट्रिब्यूशन अतिशय आवडलं. :)

संजय पाटिल's picture

2 Feb 2018 - 12:13 pm | संजय पाटिल

असेच म्हणतो...

पुंबा's picture

2 Feb 2018 - 12:02 pm | पुंबा

जबरदस्त लेख. हहपुवा..

प्राची अश्विनी's picture

2 Feb 2018 - 12:27 pm | प्राची अश्विनी

:):)

चिनार's picture

2 Feb 2018 - 1:30 pm | चिनार

धन्यवाद !!

चिगो's picture

2 Feb 2018 - 1:36 pm | चिगो

फर्मास जमलाय लेख, चिनार राव..

जाता जाता एक व्हॉट्सॅपीय जोक : 'बांबू मिशन' म्हणजे ह्या बजेटनी जे मध्यमवर्गीयांसोबत केलंय त्यासाठी नाहीये. ती सरकारची एक वेगळी स्कीम आहे..

मराठी_माणूस's picture

2 Feb 2018 - 2:54 pm | मराठी_माणूस

मस्त

बिटाकाका's picture

2 Feb 2018 - 3:05 pm | बिटाकाका

लै मंजी लै मंजी लैच भारी!

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2018 - 3:23 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

पाटीलभाऊ's picture

2 Feb 2018 - 4:22 pm | पाटीलभाऊ

लेख मस्त जमलाय.

बबन ताम्बे's picture

2 Feb 2018 - 4:44 pm | बबन ताम्बे

आवडला लेख.

पैसा's picture

2 Feb 2018 - 5:29 pm | पैसा

मस्त!!

भंकस बाबा's picture

2 Feb 2018 - 5:40 pm | भंकस बाबा

झक्कास

प्रकाश घाटपांडे's picture

2 Feb 2018 - 5:47 pm | प्रकाश घाटपांडे

हो ना लोक बुडगेट ला उगीच बजेट म्हण्त

भंकस बाबा's picture

2 Feb 2018 - 5:50 pm | भंकस बाबा

अजून येऊ दे

जव्हेरगंज's picture

2 Feb 2018 - 9:31 pm | जव्हेरगंज

कडक!!

पगला गजोधर's picture

2 Feb 2018 - 9:40 pm | पगला गजोधर

मला तर ही सत्यकथा वाटली...

मित्रहो's picture

2 Feb 2018 - 9:56 pm | मित्रहो

फर्मास लेख

चिनार's picture

3 Feb 2018 - 9:36 am | चिनार

धन्यवाद !!

च्यायला सरकारने टॅक्स वाढवला नसता तर फेरारीचं बुक करणार होतो ह्या आवेशात लोकं बोलतात.
ह ह पु वा
लैच झकास

अनिंद्य's picture

3 Feb 2018 - 6:27 pm | अनिंद्य

@ चिनार
मस्त लेख, हसवलं.
छान लिहिता तुम्ही, लिहीत राहा.
- अनिंद्य

नाखु's picture

4 Feb 2018 - 12:30 am | नाखु

या बजेटच्या नावाने पुढचे दोन दिवस बिनसाखरेचा, अणि तीन दिवस बिन दुधाचा चहाची सवय लावलीय आमच्या ह्यांना!!!

विरोधी पक्षाचे अंदाज पत्रकही कह्यात ठेवणरी तुझीच माई

चिनार's picture

4 Feb 2018 - 11:05 am | चिनार

नको ग माई..
"चहावाल्या" लोकांवर वाईट दिवस येतील..

मुक्त विहारि's picture

4 Feb 2018 - 1:35 am | मुक्त विहारि

आमचे बाबा महाराज म्हणतात,"तुट का आली? किंवा तूट का येणार आहे? त्याबद्दल जे काही करतात, त्याला बजेट म्हणतात.अत्र्यांच्या भाषेत सांगायचे तर, येत्या दहा हजार वर्षांत तरी शिलकीचे बजेट येणार नाही.कितीही बजेटी येवो अथवा जावो, आपल्या पोळीवर तूप काही आपोआप पडणार नाही.तस्मात आपण आपले खात-पित रहायचे."

एमी's picture

4 Feb 2018 - 2:05 pm | एमी

लॉल :D

ज्योति अळवणी's picture

6 Feb 2018 - 9:46 am | ज्योति अळवणी

झक्कास. खूप आवडला लेख. आपली अक्कल देखील तुमच्या इतकीच हो बजेट बाबत

खूपच आवडला लेख, फक्त विनोदी म्हणून नाही बराच रिलेट करता आला म्हणूनही जास्त आवडला

बजेटच्या निमित्ताने जुना लेख वरती आणतोय..
धागा जाहिरात म्हटले तरी हरकत नाही..

कुमार१'s picture

1 Feb 2019 - 9:25 pm | कुमार१

यंदाच्या बजेटलाही लागू आहे लेख . आवडला

बजेट हा शब्द ऐकलं कि मला हा लेख नेहमी आठवतो :D

वामन देशमुख's picture

2 Feb 2019 - 7:05 am | वामन देशमुख

हा लेख माझ्या नजरेतून कसा काय सुटला बरं?

लै म्हणजे लैच भारी ल्हिवलंय, चिनार राव तुम्ही, अगदी मनातलं!

प्रसाद_१९८२'s picture

2 Feb 2019 - 12:25 pm | प्रसाद_१९८२

सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि अंतरिम बजेट या दोघांमधे नेमका काय फरक आहे ?
--
कारण काल लोकसभेत सरकारने सादर केलेले अंतरिम बजेट रद्द करा, अशी याचिका सर्वौच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

चिनार's picture

2 Feb 2019 - 12:26 pm | चिनार

धन्यवाद !