फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १

रा.म.पाटील's picture
रा.म.पाटील in जनातलं, मनातलं
21 Jan 2018 - 11:18 am

फेस्टिव्हल डायरीज..!!
(Decorate Your Love..)
कथा - १
संक्रांत..
(प्रेमाचे उत्तरायण..)

आज तिचा आरशासमोर नेहमीपेक्षा जास्त वेळ जात होता. दररोज ती स्वतःसाठी सजत होती पण आजचा तिचा साजश्रुंगार दुसऱ्या कोणासाठी तरी.. ज्याला तिला आपला करायचं होतं, त्याच्यासाठी होता.

आज ऑफिसमध्ये संक्रात स्पेशल सर्व महिला वर्ग साडी नेसून येणार होता. हीच संधी होती तिला त्याला आकर्षित करण्यासाठी..!
त्यासाठी काल तिने तिचा पूर्ण रविवार खर्ची केला होता. हवी तशी साडी शोधता शोधता तीचे अविरत श्रम झाले होते. पण शेवटी तिला हवी तशी साडी मिळाली होती न तिच्या कष्टाचे चीज झाले होते, जेव्हा ती आरशासमोर साडी नेसून उभी होती.

त्या पारदर्शक साडीमधून तिच्या नाभीचे आणि नाजूक कमरेचे होणारे सौंदर्यदर्शन तिच्याकडच्या आधीच असलेल्या सौदंर्यात आणखीनच भर घालत होते. खरतर तिला अशा सवंग प्रसिद्धीची गरज नव्हती, कारण तिच्या सरकारी ऑफिसमध्ये ती एकमेव इतर महिलावर्गात उठून दिसत होती न वरून तीच एकमेव अविवाहीत. त्यामुळे ऑफिसामधल्या प्रत्येक पुरुषाच्या नजरा तिच्यावर खिळायच्या अगदी विवाहितांच्यासुद्धा..

तिच्या मैत्रीण कम रूममेटसने केलेल्या कौतुकामुळे तीच आत्मविश्वास आणखीनच वाढला होता.
गुलाबी साडी, अपऱ्या बाह्यांचा मॅचिंग ब्लाउज, नक्षीदार टिकली न काळे काजळ, सारं काही जुळून आलं होतं. खरतर डोळ्यातील काजळाचा एक ठिपका गालावर लावून नजर काढावी इथपर्यंत..!

ऑफिसला जाताना तिला वाटत होते कि प्रवासात प्रत्येक पुरुष तिला वळून पाहत आहे. नशीब एवढचं कि थंडीसाठी तिने पूर्ण बाह्यांचा स्वेटर घातला होता जो कमरेपर्यंत व्यवस्थित सर्वकाही झाकून घेत होता. म्हणजेच काय तिच्या आजच्या साजशृंगाराचे पूर्ण नेत्रसुख फक्त त्याला मिळावं असा तिला मनापासून वाटत होतं.

रस्त्याने चालता चालता तिचे लक्ष आकाशात गेले. आकाशात विविध रंगाचे पतंग उडत होते. तिला ते रंगीबेरंगी वातावरण खूप आवडले होते. पण कसे आहे ना ह्या सर्व रंगात ठराविक रंगच तिला आकर्षित करत होते.
तिला जाणवत होते, तो आज तिच्याशी बोलणार, नेहमीसारखे ऑफिसच्या कामापुरते नाही तर स्वतःविषयी न तिच्याविषयी, न त्याच्या भावनांविषयी..

तिने आज मुद्दाम टॅक्सिने ऑफिसला जाणे पसंत केले. टॅक्सिमध्ये मंद आवाजात सिटी रेडिओ स्टेशन चालू होते. रेडिओवर आर जे संक्रातीविषयी काही सुंदर ओळी सांगत होता ..

" आज संक्रात.. आज पतंगोत्सव.. आज आकाशात अनेक पतंग उडत आहेत.. आपल्या मनाच्या आकाशात सुद्धा असेच अनेक पतंग विहार करत असतात.. स्वप्नांचे.. स्वप्न मग ते करिअरचे असेल किंवा प्रेमाचेही.. पण भावनेच्या दोऱ्यानी बांधलेले असल्याने त्या पतंगाना जास्त पुढेही जाता येत नाही..

पण जेव्हा आकाश खुणावत असते तेव्हा मात्र तो आपल्या भावनेला हिसका देतो तेव्हा त्याचे बंध थोडेसे सैल होतात सुद्धा.. पण जेव्हा हा भावनेचा बंध तुटतो तेव्हा मात्र चालू होतो त्याचा परतीचा प्रवास..

पण पतंग उंच उडत असतो कारण त्याला माहित असते की तो खाली पडल्यावर त्याला खाली कोणीतरी झेलणारा असतो..
तर उडू द्या तुमच्या स्वप्नाचा पतंग असाच आकाशात उंच उंच.. तुमची मकरसंक्रांत होऊ द्या गोड गोड..

नंतर सुंदर गाणे चालू झाले ..
" पंछि बनू उडती फिरू मस्त गगन में ..
आज मैं आझाद हूँ दुनिया कि चमन में.."

ती पुन्हा विचार करू लागली, जर तो माझ्या आयुष्यात आला तर मी तितकीच स्वतंत्र असेन का जितकी आता आहे..
पण हा नंतरचा विचार आहे आधी त्याला जाणून तर घेऊ या..!

विचारांच्या प्रवाहात ती ऑफिसमध्ये पोहोचली. भेटल्या भेटल्या सर्व महिला वर्गानी तिच्या साडीचे कौतुक करण्यास सुरुवात केली.
हिकडे पुरुष वर्गात चुळबुळ वाढली होती. ती ऑफिसमध्ये पहिल्यांदाच साडी नेसली होती न तिला नखशिखान्त साडीमध्ये पाहायला मिळावे हि सर्वाची आज ईच्छा होती. पण तिने थंडीचे कारण सांगत स्वेटर काढला नव्हता.

हळू हळू सर्वानी आणलेले तिळगुळ व मिठाई वाटण्यास सुरुवात केली पण तिची नजर त्याला शोधत होती. ऑफीस सुरु होऊन एक तास होऊन गेला पण तरीही तो दिसला नव्हता.. नाईलाजाने तिने तिच्या गावाहून खास आणलेली मिठाई शिपायाकडे वाटण्यास दिली.

दुपारपर्यंत तिला कळले होते कि आज काय तो येणार नाही म्हणजे काय तिने केलेली एवढी मेहनत वाया जाणार होती.
म्हणजे काय सकाळपासून तिच्या मनाच्या आकाशात उडणारा तिचा स्वप्नाचा पतंग दणक्यात खाली आला होता. पण तो आज का आला नसेल? काय कारण असेल? तिचे कशातच लक्ष लागेना..

दिवसभर तिच्या मनात फक्त त्याचेच विचार येत होते. तो.. एक सव्वा वर्षांपूर्वी ऑफिसला जॉईन झाला होता ऑफिस असिस्टन्ट म्हणून, तीच्या जॉइनिंगच्या बरोबर दोन अडीच महिन्यांनी..
त्या दिवशी ती कामाचा कंटाळा येऊ लागला म्हणून ऑफीसच्या मैत्रिणीसोबत कॉफी पिण्यास कॅन्टीनमध्ये आली होती. कॉफी येईपर्यंत तिची नजर समोरच्या टेबलावरील तरुणावर खिळली होती . तो एक देखणा, ऐन पंचविशीतला पाणीदार डोळ्यांचा तरुण होता. क्षणभर तिला काही वाटले नाही पण जेव्हा तो हसला तेव्हां त्याचे चमकलेले डोळे पाहून ती त्याच्या प्रेमात पडली..

कोण म्हणतं.. पहिल्या नजरेतील प्रेम फक्त पुरुषालाच होते म्हणून.. कदाचित हेच का ते प्रेमाचे उत्तरायण..!!
पण आता तिचे वय आकर्षण वाटतंय म्हणून प्रेमात पडायचं असे नव्हते, सारासार विचार करूनच ती निर्णय घेणार होती. म्हणूनच गेली सहा महिने ती घरच्यांना लग्नासाठी थांबवत आली होती.

ऑफिसमध्ये तिच्या डोळ्यासमोरून त्या तरुणाचा चेहरा जाईना. पण त्या नंतर सलग आठवडाभर तो तिला दिसत होता, ऑफिसमध्ये, कॅन्टीनमध्ये आणि ऑफिसबाहेरही. मग तिला समजले कि तो आता तिच्या ऑफिसामधील कर्मचारी आहे.

आता त्याचाशी बोलण्याचा योग कधी येईल ह्याची ती वाट बघत होती. तसे तर तिच्या ऑफिसमध्ये वेगळ्या विभागात दोघे काम करत असल्याने त्यांचा संपर्क होणे फारच कमी होते.
तरीपण एका कामाच्या निमित्ताने दोघात संवाद होऊ लागला पण तो संवाद कामाच्या पलीकडे जात नव्हता. तो पण मितभाषी असल्याने स्वतःहून काही विचारेना आणि तिने स्वतःहून हे धाडस करणे शक्यच नव्हते. आणि एवढ्याच संवादावर समाधान मनात एक वर्ष निघून गेले पण ह्या वर्षात तिला त्याच्याविषयी इतरांकडून बरीच माहिती मिळाली. ती अशी कि-

तो एक मितभाषी मुलगा आहे, तो दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात जास्त रस दाखवता नाही आणि स्वतःविषयी कोणाजवळ जास्त बोलतही नाही. तो एक विवाहयोग्य मुलगा असून निर्व्यसनी, देखणा आणि हुशारी ह्या सर्व गोष्टी आहेत त्याच्याकडे. घरी आई वडील आणि एक लहान भाऊ असून गावाकडे बऱ्यापैकी शेती आणि घर आहे. शहरात मात्र त्याच्याकडे स्वतःचे असे काही नाही. ऑफिसमध्ये इतरांना मदत करण्यास नेहमी तयार असतो. सदैव नम्र. पण ऑफिस सुटल्यावर बाहेर जास्त वेळ रेंगाळातही नाही.

तिला त्याची घरची परिस्थिती फारशी अडचण वाटत नव्हती, तर अडचण होती त्याचा तेवढाच अबोल चेहरा जो त्याच्या हृदयाचा ठाव घेऊन देत नव्हता.
त्याच्या विचाराच्या तंद्रीत, ती कधी ऑफीस सुटल्यावर बस स्टॉपला आली तिला कळलेच नाही.
बाहेरची थंडी वाढली होती. आता तिला त्या साडीच्या देखणेपणापेक्षा स्वेटरची उब जास्त महत्वाची होती. तोच तिचा फोन वाजला.
तिच्या घरून आईचा फोन होता. दिवसाची खुशाली विचारून आईने मूळ मुद्दा पकडला. येत्या रविवारी तिने तिला गावाकडे घरी बोलावले. एक स्थळ बघायला येणार होते.

पुन्हा लग्नाचा विषय. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. आजच्या दिवसभरातील तिच्या कष्टाचे न मिळालेल्या फळाचे रागरंग तिने आईवर काढण्यास सुरुवात केली. सुरुवातही नेहमीप्रमाणे म्हणजेच तिने 'मला आत्ता लग्न करायचे नाही' असे म्हणण्यापासून झाली न शेवटही 'बघू जमले तर येईन !' ह्या वाक्यावर झाला. तेही फोनची बॅटरी संपत आल्यामुळे..
पण आजच्या संवादात तिला आईकडून एक वेगळे वाक्य ऐकायला मिळाले ते म्हणजे " तू तरी कुठे प्रयत्न करत आहेस तुझ्याकडून, मुलगा शोधण्यासाठी !"
मग आज दिवसभर केला हा खटाटोप कशासाठी होता, हे तिला तरी कसे कळणार, विचाराधीन होत ती पुन्हा बसची वाट पाहू लागली.

तोच त्यावेळी तिच्यासमोर एक बाईक येऊन थांबली. त्या व्यक्तीने हेल्मेट घातल्यामुळे तिला ओळखत येईना. त्याने तिच्याकडे पहिले, पण स्टॉपवर इतर कोणीही नसल्याने हा नक्की माझ्यासाठी थांबला असेल असे तिला वाटत होते.
त्या व्यक्तीने हेल्मेट काढले न तो चेहरा पाहून ती अवाक झाली. तोच त्या व्यक्तीने विचारले कि, "ओळखलंत का?"

ज्या चेहऱ्याला ती इतका वेळ, इतके दिवस, इतके वर्ष विसरू शकत नव्हती, त्या चेहऱ्याला तो 'ओळखलंत का?' असे विचारत होता. ह्या प्रश्नाने तिला हसू आले कि त्याला पाहून तिला आनंद झाला हेच तिला कळेना. पण हे मात्र खरं कि तिच्या स्वप्नाचा पतंग पुन्हा आकाशात उडाला होता.
तिने होकारार्थी मान हलवताच त्याचा पुढचा प्रश्न, " कुठे सोडायचे आहे का?". ती मानेने नाही म्हणाली पण तिचे अवघडलेपण ओळखून त्यानेच विचारले, " कुठे जाणार आहात?". तीने सांगितले, "लोकमान्यनगर."
तो म्हणाला. " अरे व्वा ! मी पण तिकडेच निघालो आहे, चला सोडतो तुम्हाला." नाही - हो करत ती त्याच्या गाडीवर बसली.

तिला अवघडल्यासारखे वाटत होते, पण का? पहिल्यांदाच साडी नेसून ती अशी एका बाजूने गाडीवर बसली होती म्हणून कि ती त्याच्या पाठीमागे बसली होती म्हणून. गाडीने रस्ता धरला होता न हवेतील गारवाही वाढला होता. आता अंगातील स्वेटर काढणे शक्य नाही, मग आजच्या साडीच्या काय उपयोग? ती पुन्हा विचारात पडली.

तोच त्याचा प्रश्न , " काय हो खूप थंडी आहे का आज?"
ती- "का?"

तो - "काही नाही तुम्ही बोलत नाही म्हणून म्हटले, एरव्ही ऑफिसमध्ये खूप बोलत असता म्हणून.."
ती - "तुम्हाला काय माहित, मी किती बोलते ते?"

तो - "अहो जसे तुमच्या महिला वर्गात माझ्याबद्दल चर्चा केली जाते, तसेच आमच्या पुरुष वर्गात तुमच्याबद्दल चर्चा होते.."
ती (मनातल्या मनात) – "अजून काय माहित असेल ह्याला माझ्याबद्दल.."

तो - " खरं सांगू मला तुमच्याबद्दल तुमच्याकडून जास्त ऐकायला आवडेल, कारण इतरांकडून कळते त्यात खरं कमी आणि खोटं जास्त असते.."
ती तरीही शांत असते, तिलाच कळत नाही काय बोलावे ते. तिला उलट तिचा आत्ताचा अबोलपणा पाहून आश्चर्य वाटते. आता ऑफिसाच्या उलट गोष्टी घडत असतात. तो जास्त बोलत असतो न ती शांतपणे ऐकत असते.

तो - " कसे आहे, माणसाने एकमेकासमोर स्पष्ट असावे. म्हणजे गैरसमज होत नाहीत. तुमचं काय म्हणणं आहे?"
ती (मनातल्या मनात) - 'जर मी आत्ता स्पष्ट बोलले तर मला माहित नाही कि हा प्रवास चालू राहील कि इथेच थांबेल..?'

तिचा थंड प्रतिसाद पाहून तो हि जरा संवाद थांबवतो. तो काहीच बोलत नाही हे पाहून ती त्याला विचारते, " आज ऑफिसला नाही आलात.?"
तो - "हो जरा अर्जंट काम होते म्हणून सुट्टी घेतली. पण तुम्हाला कसे कळले आज मी आलो नाही हे.?"

तिला समजले कि तिने काय चूक केली आहे ती. तिच्या ऑफीच्या पन्नास - साठ स्टाफ मध्ये त्याची अनुपस्थिती तिला कशी लक्षात राहिली हा प्रश्न त्याला पडणे साहजिकच होते.
ती जराशी सावरत - " नाही ती एक फाईल हवी होती तेव्हा शिपाई काकांनी सांगितले. "

तो - " ओके. मग आज संक्रांत स्पेशल होते ना ऑफिसमध्ये?"
"काही खास नाही. सर्वजण पारंपरिक पोशाख किंवा साडी घालून आले होते आज ऑफिसमध्ये." - ती त्यातील साडी ह्या शब्दावर खास जोर देत म्हणाली.

तो - " काय हो, तुम्हाला काय वाटते, काय असते संक्रांत?"
तिने मोघम उत्तर दिले " संक्रांत म्हणजे एकमेकांतील कटुता विसरून गोडवा वाढवण्याचा सण.."

तो - " हं. वरवर तर संक्रांत ह्याच गोष्टीसाठी साजरी होते, पण ह्या दिवसामागे एक घटना आहे. माहित आहे?"
तिला काहीच सांगता येत नसल्याने ती गप्प राहते.

तो - " संक्रांत म्हणजे सूर्याने दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करणे. म्हणजे बघा ज्यांच्यावर साऱ्या जगाची भिस्त आहे त्या सूर्यालाही आपला मार्ग बदलावासा वाटतो आहे.. मग आपणही त्याच मार्गाने का चालायचं?"
ती - "म्हणजे ?"

तो - "मला सांगा तुम्ही पुढे काय करायचे ठरविले आहे?"
ती - " अजून तसे काही नक्की नाही, पण पुढे संधी मिळत राहिली तर इथेच कायस्वरूपी नोकरी मिळवेन."

तो - " उदरनिर्वाहासाठी हि गोष्ट ठीक आहे, पण स्वतःची एक आवड म्हणून किंवा स्वतःची एक ओळख म्हणून काय करणार आहात?"
ती निरुत्तर होती, कारण तिने ह्या बाबतीत कधी विचार केलाच नव्हता.

तो - "बहुतेक इथेच आपल्याला थांबायचं आहे ना?"
गप्पाच्या ओघात प्रवास कधी संपला हे तिला कळलेच नाही.

गाडीवरून उतरताना तिने त्याला कॉफीसाठी विचारले. पण कॉफीसाठी नेहमी मुलेच पहिल्यांदा विचारतात पण इथे उलटेच घडले.. कदाचित प्रेम मार्ग बदलत होते.. कदाचित हेच का ते प्रेमाचे उत्तरायण..!!
त्यानेही फारसे आढेवेढे न घेता हो म्हटले. दोघेही शेजारच्या कॉफी शॉप मध्ये गेले.
हीच संधी साधून तिने अंगावरचा स्वेटर काढला.

आता मात्र स्तब्ध होण्याची वेळ त्याची होती. तिच्याकडे पाहताना त्याची पापणीही मिटली नाही. पण आजूबाजूच्या नजरा त्यांच्याकडे खासकरून तिच्याकडे वळल्या, तेव्हा मात्र त्याने तिच्यावरचे नजर हटवली. पण ती आतून मात्र खुश होती, शेवटी तिच्या कष्टांना अर्थ आला होता.
त्यांनी कॉफी ऑर्डर केली. तो काहीच बोलत नाही हे पाहून ति म्हणाली - " संक्रांतीचे अजून एक विशेष आहे. पंतग ! आकाशात उंच उडत असतो पण त्याची ओळख हि त्याच्या धाग्यांमुळे असते. जर हा धागाच तुटला तर त्याची उंची राहणारच नाही."

तो - " तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण तुम्ही उंच उडताना आपले बंध सैल होणार नाहीत ह्याचीही काळजी घ्यावी. "
ती - "मग तो पतंग मनसोक्त विहार तरी कसा करू शकेल ?"

तो - "तुटून जाण्यापेक्षा कुठेतरी थांबणे जास्त चांगले नाही का !"
ती - "पण प्रश स्वातंत्र्याचा असेल तर ?"

तो - " पतंगासाठी स्वातंत्र्य म्हणजे धाग्याचे बंधन नसणे हे नाही, तर त्या पतंगाला जास्तीत जास्त उंची गाठता यावी हे आहे."
तोच कॉफी टेबलवर आली. कॉफीबरोबर त्यांचा संवादही चालू होता.

ती - " मग तुम्ही काय करणार आहात पुढे ?"
तो - " मी आता यू पी एस सी ची तयारी करणार आहे. मला समाजसेवेची खूप आवड आहे. परीक्षा पास झालो कि मिळणाऱ्या नव्या नोकरीतून शक्य होईल तेवढी लोकांची मदत मी करत राहणार आहे"
त्यावेळी त्याच्या डोळ्यात आलेली चमक पाहून तिला त्याची पहिली नजर आठवली.

ती - " वा, हि तर खूप चांगली गोष्ट आहे !"
पण मनातल्या आकाशात तिचा स्वप्नाचा पतंग हेलकावे खाऊ लागला होता. आता तर कुठे संवाद सुरु झाला होता न -

तोच कॉफीचे बिल आले. तो पैसे देणार एवढ्यात ती म्हणाली - " आजची कॉफी माझ्याकडून.. पुढच्यावेळी हवी तर तुम्ही द्या"
तो - " पुढच्यावेळीही द्यायला आवडेल पण आपण परत कधी भेटू काहीच सांगता येत नाही.." न त्याने पैसे दिले.

ती - "म्हणजे उद्या ऑफिसला भेट होईलच कि.."
तो - "मी आजपासून रजा काढली आहे पंधरा दिवसाची न त्यानंतर मी जॉब सोडत आहे एक तारखेपासून.. यू पी एस सी ची तयारी करण्यासाठी.. त्यामुळे आपले भेटणे अवघड आहे."

आता तिच्या स्वप्नाचा पतंग जमिनीच्या दिशेने सरकू लागला .
बोलत बोलत दोघे गाडी जवळ पोहचले.

"तुमचा मोबाइल नंबर मिळेल का ?" - तिने दबकतच विचारले. हाही प्रश्न नेहमी मुलेच करतात. पण इथेही उलटेच घडले. कदाचित हेच का ते प्रेमाचे उत्तरायण..!!

त्यानेही निःसंकोच दिला पण तिच्या मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे तिने तो कागदावर लिहून घेतला.
तो जात असताना तिने थांबवले, अलगद त्याच्या पुढ्यात गुडघ्यावर बसत केसातील गुलाबाचे फुल काढून तिने त्याच्यासमोर धरले. न म्हणते - " आय लव्ह यू ..!!".
तोच काय आजूबाजूचे लोकही अवाक झाले.. हे काय घडतंय नक्की.. एक मुलगी मागणी घालतेय तेही गुडघ्यावर बसून.. कदाचित हेच का ते प्रेमाचे उत्तरायण..!!
तो हात पुढे करतो आणि..
तो - " खूप उशीर झाला नाही ना तुम्हाला..
..घरी पोहचायला.."

ती भानावर येते, म्हणजे हे स्वप्न होते. तसेही तिच्या सारखे मध्यमवर्गीय मन हे धाडस फक्त स्वप्नातच करू शकते, प्रत्यक्षात नाही ना..!!

तो - " तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला चुकीचे समजू नका. तुम्ही सुंदर आहातच न तुमचे विचारही चांगले असतील. पण पतंगाने अशी उंची गाठावी कि त्याला ठरवता आले पाहिजे कि आपले बंध कोणाच्या हातात द्यायचे ते ..!, न शक्य असेल तर पुन्हा भेटूच.."

असे म्हणून तो निघाला. तो जात होता त्या दिशेने ती पाहत राहिली. हातात त्याचा मोबाइल नंबर लिहलेला कागद होता. जणू त्याच्या पतंगाचा धागा तिच्या हातात आला होता पण त्याचा पतंग दूर चालला होता.

ती रूमवर अली. गॅलरीत येऊन उभी राहिली. संध्याकाळचा थंडीचा तो गार झोत अंगावरून गेला. पण तिला त्याचे काहीच वाटले नाही. कारण ती त्याच्या त्या शब्दांचा विचार करत होती. "स्वतःची ओळख, स्वतःची आवड. पतंगाची उंची न दोऱ्याचे बंध..."

तिच्या मनातल्या आकाशातील तिच्या स्वप्नाचा पतंग जो जमिनीच्या दिशेने सरकत होता, तो पुन्हा आकाशात विहार करू लागला. कारण आता त्याने त्याच्या स्वप्नाचा मार्ग बदलला होता. त्याला आता त्याची उंची गाठायची होती.

तिच्या मैत्रिणीने आल्या आल्या तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. " काय झाले आज..? भेटला का तो..? बोललं का तुम्ही..?"

पण ती पूर्णतः विचारात मग्न होती, कारण आत्ता कुठे तिच्या विचारांचे सुरू झाले होते.. ( प्रेमाचे ) उत्तरायण.. !!

***
.. राही.. !!
***

कथाविचार

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

21 Jan 2018 - 3:03 pm | पद्मावति

मस्तंच. आवडली कथा.

रा.म.पाटील's picture

27 Jan 2018 - 9:03 am | रा.म.पाटील

धन्यवाद..

एस's picture

27 Jan 2018 - 12:52 pm | एस

वाचतोय.

रा.म.पाटील's picture

1 Feb 2018 - 11:26 pm | रा.म.पाटील

लिहतोय.. धन्यवाद..!!

मुक्त विहारि's picture

27 Jan 2018 - 1:51 pm | मुक्त विहारि

पुढचा भाग लवकर टाकाल अशा अपेक्षेत.

रा.म.पाटील's picture

1 Feb 2018 - 11:28 pm | रा.म.पाटील

उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद.. लवकरच भेटू..!!

अमितदादा's picture

2 Feb 2018 - 1:02 am | अमितदादा

सहज..सोपी आणि सुंदर कथा. पुढचा भाग घेऊन लवकर भेटा.

रा.म.पाटील's picture

21 Feb 2018 - 10:17 pm | रा.म.पाटील

धन्यवाद..

पुढील कथा - २ ची लिंक-
https://www.misalpav.com/node/42046

फेस्टिव्हल डायरीज..!!: कथा - ३ ची लिंक

https://www.misalpav.com/node/42247

रा.म.पाटील's picture

25 Mar 2018 - 9:34 am | रा.म.पाटील

फेस्टिव्हल डायरीज..!!: कथा - ४ ची लिंक

https://www.misalpav.com/node/42507