प्रवास

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
19 Jan 2018 - 7:48 am

प्रवास

तो म्हणाला, ‘मोना, प्लान चेंज! अब हम रेलसे नहीं, driving करके जायेंगे!’
त्याने गाडी बाहेर काढली, तेव्हा ती तिच्या कोषातून बाहेर पडली .
गाडी शहरातील धूळधूर अंगावर घेत, गर्दीतून वाट काढू लागली. गाडी शहराबाहेर आली, त्याला तरतरीत वाटू लागले..... आणि स्वच्छ झालेल्या काचेवर तिला स्वतःचेच प्रतिबिंब साजिरे दिसू लागले.
तो पुढे एकटक रस्त्याकडे पाही, तेव्हा नजरेनेच तिला हजार प्रश्न विचारी.
एकदा असेच पाहता पाहता, खट्याळपणे विचारले, ‘घास भरवणार का?’
ती लाजून गप्प झाली, तर खोडीलपणे म्हणाला, ‘अहो, आमचे हात ड्रायविंग मध्ये गुंतलेत, म्हणून विचारले!’
त्यावर ती खळखळून हसली, तर तिकडून कानात म्हणाला, ‘घास मिळाला बरं का!’
अशा प्रवासात कोण तृप्त झालं, कोण लाजून बसलं!?
........... ............ ..............
गाडी हायवेला लागली. दोन प्रशस्त फाटे फुटले.
त्याच्या डोक्यातला भटक्या बेबंद झाला. परत म्हणाला, ‘मोना, मैं पेडपहाडी के रास्तोंसे drive करके जाउंगा! प्लान चेंज!’
............. ...................... ..............
तो संपूर्ण रस्ता तिच्या परिचयाचा. पाचेक वर्षांपूर्वी अनेकदा प्रवास केलेला. भटकलेली.
उजव्या बाजूचे घनदाट जंगल पाहून त्याची नजर निवू लागली, तेव्हा फांद्या होऊन तिचे पाच वर्षां पूर्वीचे हात त्याला hi, hello करू लागले.
पुढे भर जंगलात, अंबिका नावाची एक रौद्र नदी लागली. ती ओलांडण्यापूर्वी तो जरा थबकला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून तिने विचारले, ‘बियास अशीच आहे का?’
तिच्याकडे एकटक पहात म्हणाला, ‘सगळ्या वेगळ्या! एक कुठे दुसरी सारखी?’
पुढे निघाला. आणखी उंच उंच वृक्ष. खोडापर्यंत पसरट पानं असणारी! हिरव्या पानांतून सूर्यप्रकाश सळसळणारा! त्याला पक्षांचे अस्पष्ट आवाज ऐकू येऊ लागले. पण गाडीच्या आवाजात नीट ऐकू येत नाहीत, म्हणून त्याने गाडी बंद केली. काच खाली केली. रानव्यातील शांतता त्याच्या कानामनात शिरली. तिच्या हातातल्या बांगडीवर टिचकी मारीत म्हणाला, ‘अशा पक्षाचा आवाज आधी कधी ऐकला नव्हता!’
ती हात बाजूला घेऊ पाहताच, जवळ ओढत म्हणाला, ‘पंख आहेत म्हणून सारखं का दूर उडून जावं?’
ती लाजून बाहेर पाहू लागली, तर हळुवारपणे कानात म्हणाला, ‘तू लाजून दिलेस, ते जपून ठेवलेय!’
अशा प्रवासात किती पक्षी आले, किती उडाले, धडधडत्या काळजाला माहित नाही!
............. ...................... ..............
जंगल हळूहळू मागे पडले. सावळी शेते. हिरवे रावे. क्षितिजावर पर्वतरांगा. डांबरी रस्त्याकडेला अंतर सांगणारे दगड. मैत्र सांगणारी झाडी. काळ्याभोर रस्त्यावर झाडांची गर्द सावली. आकाशात झाडांची हिरवी कमान. त्याचे मन थांबले. गाडी थांबवली. प्रशस्त रस्त्यावरच्या काळ्या मखमली सावल्यांचा एक क्लिक केला. खूष होऊन गळ्यात हात टाकता टाकता ती थांबली .... त्याने काकुळतीने तिच्याकडे पाहिले. म्हणाला, ‘का थांबलीस?’
तिने रस्त्याकडे बोट करून दाखवले. म्हशींचा दांडगा कळप रस्ता अडवून, शेपट्या हलवत निवांत उभा होता. त्याच्याच गाडीकडे पहात होत्या. तसा तो वरमला, पण लगेच उत्तरला,
‘तुझ्या मैत्रिणी पाहून हुरळलो.... तू वाईट्ट आहेस! बैस गाडीत.’
अशा प्रवासात कुणी कुणाची किती टर उडवली, ते किती हसले, माहित नाही!
............. ...................... ..............
गाडी वळणावळणाच्या डोंगरात शिरली.
ऊन झरझर विरून गेले. काळेनिळे ढग भरभर जमू लागले. वळीवात दोघे किती भिजले, माहित नाही!
...............
सुलोचना बाईंनी डोळ्याला पदर लावत विहीणबाईचा हात धरला. ‘तरी मी त्याला हज्जारदा सांगत होते, बाबा रे अजून हळद उतरली नाही, तर नव्या नवरीला घेऊन इतका दूर जाऊ नको. हे डोंगर, घाट, चढउतार.... शेवटी घात झालाच...’
विहीणबाईनी लेक गमावली होती. कुणी कुणाचे सांत्वन करायचे?
....................
@शिवकन्या शशी.

वावरवाङ्मयकथासाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनप्रतिभा

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

19 Jan 2018 - 10:49 am | सिरुसेरि

अरेरे

माहितगार's picture

21 Jan 2018 - 10:30 am | माहितगार

!!