गतिरोधक एक चिंतनिका

ss_sameer's picture
ss_sameer in जनातलं, मनातलं
14 Jan 2018 - 1:00 am

गतिरोधकांचा शोध हा एक क्रांतिकारी शोध मानला जावा हा अमुचा हट्ट आहे. क्रांतीची फळे ही कायम गोडच असतात असे नव्हे परंतु एखाद्या ठिकाणी क्रांतीची ठिणगी पेटून उठत असेल किंवा क्रांतीज्योतीचे रूपांतर क्रांती वणव्यात होत असेल तर मात्र त्या क्रांतीची गळचेपी करणे साठी प्रतिक्रांती(च) घडावी लागते हा अमुचा(च) अनुभव आहे.

भार्येच्या आर्जवपूर्ण (धमकीयुक्त) संदेशास कानाडोळा करून दूरचित्रवाणी वरील चेंडूच्या लाथाळ्या पाहण्यास प्राधान्य देणे ही क्रांतीची ठिणगी आणि ततपश्चात जे घडते ती प्रतिक्रांती.

अर्थात हा वरील अनुभव अनेकांनी अनुभवला असेलच. आणि वरील क्रांतीची फळे जर कोणास (चुकूनही) गोड लागली असतील तर त्या व्यक्तीचे विश्वातील असंख्य चाहतेगण त्याची हजार मीटर उंचीची प्रतिमा अरबी समुद्रात राहू द्या सरळ पॅसिफिक समुद्रात उभी करतील याची आम्हास खात्री आहे.

असो... तर विषय आहे गतिरोधकांच्या शोधाचा.
डोंगरावरून घरंगळत जाणाऱ्या दगडावरून ज्या कोण्या आदिमानवाच्या मेंदूच्या सुरकुतीतून चाकाचा विचार बुडबुडला, त्याच क्रांतिकारकांच्या भावी पिढीतून आपल्या प्रजाजनांच्या अंगावर रथांची चाके घालणाऱ्या राजव्यवस्थेची पुढची अवस्था - सध्या रस्त्यांवर फिरणारी बहुसंख्य वाहने घेऊन पादचाऱ्यांचा जीव अस्वस्थ करणारे आधुनिक क्रांतिकारक होय.
आता या क्रांतिकारकांच्या क्रांतीपूर्ण वाहनचालना बद्दल जितके कौतुकास्पद लिहावे तितके शब्द आणि कागदांचे बहुमजली पानांचे ढिगही कमी पडतील. आता या क्रांतीसुर्यांस अटकाव करावयाचा तर त्यास योजले जाणारे बहुपेडी कासरे देखील क्रांतीपूर्णच असावयास हवेत की नाही? म्हणूनच आम्हास वाटते ते गैर नाही. गतिरोधक हा एक क्रांतिकारीच शोध आहे.

आता या गतिरोधकांचे असंख्य प्रकार आणि वैशिष्ट्ये. मुदलात वाहनांची गती कमी करणे हा त्या गतिरोधकांचा मूळ हेतू नाहीच. त्यांची योजना म्हणजे "नाम कूछ और" आणि "काम कुछ और" असेच आहे. वाहनांचा बेफाम आणि बेफाटपणा कमी करणे बरोबरच आवाक्यापलीकडे असणाऱ्या क्रांतिकारकांस हळुवारपणे रद्दबादल करणे तसेच दुचाकी वा जास्त चाकांच्या त्यांच्या रथांचे सर्व अवयव खिळखिळे करणे (हाच) मूळ हेतू आहे याबद्दल आमची ठाम खात्री आहे.

गतिरोधकांचा अभ्यास करावयास गेले असता त्या गतीरोधकांचे व गतिरोधक तयार करण्याच्या वैविध्यपूर्ण बौध्दीक चढउतारांचे कौतुक करावे तितुके थोडे. काही गतिरोधक हे अगदी पहाडासारखे ठाम रस्त्यांत उभे असतात. तुम्ही अगदी कोणतेही वाहन त्यावरून न्या, ते उधळण्याचे काम गतिरोधक अगदी प्रामाणिकपणे पार पाडतात. काही असतात केवळ उंचवटे - त्यास उतार द्यावयचे ठेकेदार विसरून गेलेला असतो. काही रस्त्याच्या मध्यावर उंच आणि कडेला पसरट तर काही निमुळते, काही नागमोडी आणि काही अगदीच जमिनीलगत. हे सर्वच्या सर्व ठेकेदारांप्रति आणि त्यांच्या अंगावर पडलेल्या कामांप्रति अत्यंत प्रामाणिक असतात. ते येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्याही वाहनास आपपर भाव न बाळगता समान न्याय देत असतात.

आमच्या एका वैद्यक क्षेत्र गाजवणाऱ्या मित्राकडून मिळालेल्या माहिती अन्वये तुम्ही गतिरोधकावरून गाडी भरधाव नेली तर तुमच्या पाठीच्या मणक्यास दुखापत होते आणि हळुवार नेलीत तर कमरेचा मणका दुखावला जातो. एकूणच काय तर हर एक क्रांतिकारक हळूहळू शारीरिक दृष्ट्या नेस्तनाबूत करणे हा या मागचा डाव. बरे वाहन त्या रोधकावरून गेले असता त्या वाहनाचा देखील एखादा सांधा नवा करावा लागतो. या सर्व गोष्टींमुळे वाहन खरेदी विक्री ही अत्यंत जोमाने होते आणि राष्ट्रातील असंख्य बेरोजगारांस रोजगारसंधी उपलब्ध होतात. ईतुका खोलवर अर्थ या गतिरोधकांच्या योजनेबद्दल आहे. वरवर पाहता गतिरोधक योजना ही त्रासदायक वाटत असली तरी राष्ट्राच्या भल्याकरिता, नवराष्ट्रवादाच्या उदयाकरिता आणि नवीन पिढीच्या निर्माणाकरिता गतिरोधक अत्यावश्यकच आहे अशी आमची खात्री पटत चालली आहे.

आपल्याकडील रस्त्यांवर मीटरभर अंतरावर किमान दोन खड्डे असतात, (सरकारदरबारी त्या रस्त्याइतका गुळगुळीत रस्ता उभ्या अमेरिकेत नसतो किंवा सरकारी दफ्तरात खड्डे मोजवयास जाणारे कर्मचारी हे त्यांच्या दुसऱ्या इयत्तेतच अंकगणिताची पुस्तके फाडणारी असल्याने आकडे त्यांच्यापासून इतुके दूर पळतात की त्यांनी मोजलेले खड्डे हे सामान्य नागरिकाने मोजलेल्या खड्ड्यांच्या सहस्रअंश देखील येत नाहीत. रस्त्याच्या मध्यभागी तळे साचून जोवर त्यात बोटिंग सुरू होत नाही तोवर त्यास खड्डा म्हणू नये अशी सक्त तंबी सर्व कनिष्ठ कर्मचाऱ्यास सर्व श्रेष्ठ कर्मचाऱ्यांकडून दिलेली असावी) इतके खड्डे असणाऱ्या रस्त्यांवर देखील गतिरोधके कशासाठी? असे कोणीही विचारू शकेल. परंतु क्रांतीचे महत्व सुरुवातीस केवळ मूठभरांस कळते आणि आपण त्या मुठभरांत नाही हे त्या अज्ञ प्रश्नकर्त्याने समजून घ्यावे. तोवर त्यांस विरोध करणेसाठी आपले वाहन व शरीर दोन्ही गतिरोधकांवरून नेणे बंद करू नये. काळजी नसावी, कोणीतरी एक नक्की संपेल, एक तर प्रश्नकर्ता किंवा गतिरोधक......!

मुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

14 Jan 2018 - 4:46 am | गामा पैलवान

हाहाहा ss_sameer, आवडेश!

ते रस्ते कापणारं मशीन पण असतं ना त्यावरही लिहा ना. त्या मशीनीत बसून क्रांतीशत्रू चढाई करून आले, तर क्रांतीखड्ड्यांनी ते मशीनच गिळंकृत केलं, वगैरे वगैरे. थिसीस आणि आंटीथिसीस मिळून सिंथेसिस कसा झाला ते वाचायची उत्सुकता आहे.

आ.न.,
-गा.पै.

तिमा's picture

14 Jan 2018 - 5:09 am | तिमा

उपरोधिक शैलीतला लेख आवडला. भारतात तरी गतिरोधक उभे करणार्‍या मानवांच्या मेंदूत बरेच मतिरोधक देवाने आधीच बसवले असावेत. नाहीतर वळल्याबरोब्बर लगेच गतिरोधक बसवण्याची प्रेरणा त्यांस न मिळती. शिवाय जिथे अपघात होईल त्या जागी लगेचच गतिरोधक बसवला की मृतात्म्यास शांती मिळत असावी. हायवेवर गतिरोधक बसवणे आणि तेही वाहनातल्या प्रवाशांची मान थडथडथडथड होईल असे गतिरोधक बसवून त्यांनी प्रवासी जनतेची जी मानहानि चालवली आहे, त्यास तोड नाही.

ज्योति अळवणी's picture

14 Jan 2018 - 10:38 am | ज्योति अळवणी

सरसकट गतिरोधकांना विरोध करणे बरोबर नाही असं मला वाटतं. शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स याजवळ गतिरोधक असणे आवश्यक असते अस मला वाटतं.

बाकी लेख आवडला आणि काही मतं पटली

वेशीवरचा म्हसोबा's picture

14 Jan 2018 - 1:06 pm | वेशीवरचा म्हसोबा

सरसकट गतिरोधकांना विरोध करणे बरोबर नाही असं मला वाटतं. शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स याजवळ गतिरोधक असणे आवश्यक असते अस मला वाटतं.

गतीरोधक नसतील तर बेफाम दुचाकीस्वार आणि वाहन चालक रोज किती पादचाऱ्यांना उडवतील याची कल्पनाही करवत नाही.

एस's picture

14 Jan 2018 - 11:08 am | एस

:-D

तेजस आठवले's picture

14 Jan 2018 - 3:54 pm | तेजस आठवले

गतिरोधक समोर दिसत असताना ऍक्सलरेटर जोरात देऊन गतिरोधकाच्या आधी ३ मिमी अंतरावर कच्चकन ब्रेक दाबून गियर बदलण्याची गम्मत माहितीय का?
गतिरोधक ओलांडताना चाक वळवून पुढची दोन चाके गतिरोधकाच्या पुढे आली की मग तीच चाके पूर्णपणे विरुद्ध दिशेला १८० अंशात वळवून गतिरोधक पार करण्यात असलेले कौशल्य तुमच्यात आहे का ?
वाहतूक मुरंबा असताना मुद्दामून पुढची दोन्ही चाके गतिरोधकावर नेऊन आपल्या गाडीचे हेडलाईट्स पुढच्या गाडीच्या टेललाईट्सला जवळजवळ चिकटवून मग हॅन्डब्रेक लावून शांतपणे वाहतूक सुरळीत होण्याची वाट पाह्ण्यातली गम्मत अनुभवली आहे का ?

मुळात आपल्याकडे गती,नियम,कायदा ह्या संकल्पना फारश्या पटत नसल्याने गतिरोधक हे काय आणि कशासाठी असते हेच समजत नाही मग अपेक्षा तरी काय करणार ? आमच्या इकडे एका उंच गतिरोधकावर चढल्यावर उत्तरार्धात उतार नसून एक मोठा खड्डा आहे.भले भले मायकल शूमाकर त्या स्थितीत त्या ठिकाणी भ्रांत पडल्यासारखे काय करू या अवस्थेत उभे असतात. गतीज ऊर्जेचे स्थितीज ऊर्जेत रूपांतरण वगैरे काही होत नाही, ती डायरेक्ट नष्ट होते, असला भयंकर प्रकार आहे.

गतीज ऊर्जेचे स्थितीज ऊर्जेत रूपांतरण वगैरे काही होत नाही, ती डायरेक्ट नष्ट होते, असला भयंकर प्रकार आहे.

:D

लेख आवडला.. (पुण्याची ओळख आता गतिरोधक आणि खड्ड्यांचे शहर अशीच करायला हवी..)