ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग ३ - ब्रान्तेइ स्रेइ मन्दिरातील शिल्पे.

Primary tabs

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in भटकंती
13 Jan 2018 - 3:46 am

ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग ३ - ब्रान्तेइ स्रेइ मन्दिरातील शिल्पे.
भाग १
भाग २

ह्या भागामध्ये ’बान्तेइ स्रेइ’ (Banteay Srei) ह्या मन्दिरातील शिल्पे पाहू.

अंगकोर वाटच्या आग्नेय दिशेकडे सुमारे २६ किमी दूर असलेले हे मन्दिर त्यातील हिंदु देवदेवता आणि त्यांच्या कथा सांगणार्‍या कोरीव शिल्पांसाठी प्रवाशांचे एक मोठे आकर्षण आहे. कोरीव कामाला अत्यंत उपयुक्त अशा तांबड्या दगडातून ते बांधलेले असून त्या दगडाचा पुरेपूर उपयोग शिल्पांच्या निर्मितीसाठी केला गेल्याचे जाणवते.

मंदिराच्या पडझड झालेल्या दगडांखाली सापडलेल्या स्थापना शिलालेखावरून असे कळते की शक ८८९ (९६७ इसवी) वर्षामध्ये ह्या मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीची स्थापना झाली आणि त्याला ’त्रिभुवनमहेश्वर’ असे नाव देण्यात आले. राजेन्द्रवर्मन् आणि त्याचा अल्पवयीन मुलगा जयवर्मन् पाचवा ह्या राजांच्या काळामध्ये राजगुरु असलेल्या यज्ञवराह नावाच्या ब्राह्मणाने आणि त्याचा धाकटा भाऊ विष्णुकुमार ह्या दोघांनी ह्या मंदिराची स्थापना केली, त्याला उत्पन्न नेमून दिले आणि मंदिराचे प्रशासन कसे चालावे ह्याच्या सूचना शिलालेखाद्वारे देऊन ठेवल्या.

मंदिराचे बाह्यदर्शन आणि त्याचा अन्तर्भाग असे दिसतात -

मंदिराचे बाहेरून दृश्य

मंदिराचा अन्तर्भाग

मंदिराचा अन्तर्भाग

वरील चित्रांपैकी मधल्या चित्रातील मूर्ति गरुड आणि हनुमान आहेत. द्वाररक्षकासारखे ते प्रवेशद्वारांपुढे बसलेले आहेत.
 

मंदिरामध्ये अनेक खरी आणि खोटी दारे आहेत आणि त्यांना स्वत:ची lintels आणि pediments आहेत. (Lintel म्हणजे दाराच्या चौकटीवरील शिलाप्रस्तर आणि Pediment म्हणजे दाराच्या चौकटीवरील त्रिकोणी भाग, ज्यावर छप्पर आधारलेले असते.) ह्यांच्यावर अनेक पुराणकथा कोरल्या आहेत. त्यांपैकी काही आता पाहू.
 

सुन्द, उपसुन्द आणि तिलोत्तमा

पुराणांतील सुन्द, उपसुन्द आणि तिलोत्तमा ह्यांची ही कथा. सुन्द आणि उपसुन्द नावाचे दोन असुर बन्धु पृथ्वीवर फार उपद्रव माजवीत होते आणि त्यांना शासन घडविणे कोणासच जमत नव्हते. म्हणून देवांनी एका अप्सरेस ’तिलोत्तमा’ ह्या नावाने खाली धाडले. तिला पाहताच दोघेहि असुर तिच्यावर मोहित झाले आणि तिने कोणाबरोबर जावे ह्या निर्णयासाठी दोघांनी आपापली शस्त्रे काढली. त्या संघर्षात दोघांनी एकमेकांस मारून टाकले अशी ही कथा येथे दिसते. (हे शिल्प जागेवर नाही. ते पॅरिसमधील Musee Guimet ह्या पौर्वात्य कलेसाठी प्रसिद्ध असलेल्या संग्रहालयामध्ये आहे.
 
(थोडे अवान्तर - शुंभ आणि उपटसुंभ हे दोन मराठी शब्द सुन्द आणि उपसुन्द ह्या शब्दांचे अपभ्रंश असावेत असा तर्क करता येईल काय?)

खाण्डववनदाह

मन्दिरातील एका pediment वर हे शिल्प दिसते. त्याची आदिपर्वामध्ये दिलेली कथा अशी आहे. श्वेतकि नावाच्या राजाच्या प्रदीर्घ काळ चाललेल्या यज्ञातील हवि भक्षून अग्नीला मान्द्य आले आणि त्यावर उतारा म्हणून खांडव नावाचे निबिड अरण्य आणि त्यातील प्राणी भक्षावे अशी त्याची इच्छा झाली. त्या वनामध्ये इन्द्राचा मित्र तक्षक नाग सकुटुंब राहत असल्याने वनावर पाऊस पाडून अग्नीची इच्छा इन्द्र पुरी होऊ देईना. त्या वनामध्य वनक्रीडेसाठी सहकुटुंब आलेल्या कृष्ण आणि अर्जुनाकडे अग्नि ब्राह्मणाच्या रूपामध्ये गेला आणि वनाचे दहन करण्यासाठी त्याने कृष्णार्जुनांकडे साहाय्य मागितले. इन्द्राशी युद्ध करण्यासाठी आपणाकडे योग्य शस्त्रे नाहीत असे कृष्णार्जुनांनी सांगताच अग्नीने कृष्णास सुदर्शन चक्र आणि अर्जुनास गाण्डीव धनुष्य, बाणांचा अक्षय भाता आणि ध्वजारूढ कपि असलेला अजिंक्य रथ अग्नीने त्यांना दिला. वनदहन सुरू होताच इन्द्राने वरून मोठा पाऊस सुरू केला पण त्याच्याशी युद्ध करून कृष्णार्जुनांनी अग्नीस त्याची इच्छा पुरी करण्यात साहाय्य केले ही कथा ह्या शिल्पामध्ये दाखविली आहे. सर्वात वर अनेकमुखी ऐरावतावर इन्द्र, त्याच्याखाली इन्द्राने पाठविलेले मेध आणि त्यामधून निघणार्‍या पावसाच्या सरी दिसत आहेत. खाली अरण्यामध्ये अरण्यनिवासी असुर आणि अनेक प्राणी भयभीत होऊन इतस्तत: पळतांना दिसतात आणि रथांमधून अरण्याभोवती फेरे मारून त्यांना पळून जाण्यापासून रोखणारे रथारूढ कृष्णार्जुन दोन बाजूस दिसतात. तक्षक नाग आधीच अरण्याबाहेर गेलेला असल्याने वाचतो पण त्याचा मुलगा अश्वसेन इन्द्राच्या कृपेमुळे आगीतून सुटून आकाशमार्गाने बाहेर पडतांना दिसत आहे.

कैलासाला हलविणारा दशानन रावण

वरील शिल्पामध्ये शंकराचे ’रावणानुग्रहमूर्ति’ हे स्वरूप दाखविले आहे. रामायणाच्या उत्तरकाण्डातील कथेप्रमाणे रावण आणि त्याचा भाऊ कुबेर ह्यांच्या युद्धामध्ये रावणाने कुबेराचा पराभव केला आणि त्याचे पुष्पक विमान रावण लंकेकडे निघाला. विमान कैलास पर्वतावरून जाईना. तेथे उपस्थित असलेल्या नंदिकेश्वराला ह्याचे कारण विचारता त्याने सांगितले की कैलास पर्वतावर शिवपार्वती एकान्तात असल्याने तेथे कोणासहि जायची अनुमति नाही. हे ऐकून रावण संतापला आणि कैलासाखाली आपले वीस हात घालून त्याने कैलास पर्वत हलविण्याचा प्रयत्न केला. ह्यामुळे आसमन्तातले प्राणी आणि मुनिगण भयभीत झाले. पार्वती शंकराला बिलगली. सर्व भयभीतांना आश्वासन देत शिवाने आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास आणि त्याच्याखाली रावणास एक हजार वर्षे दाबून धरले. अखेर रावणाने ’शिवताण्डवस्तोत्र’ रचून शिवाची प्रार्थना केली. त्यामुळे प्रसन्न होऊन शिवाने त्याला सोडले आणि अजेय असे ’चन्द्रहास’ नावाचे खड्ग त्याला दिले.
 
हीच कथा येथे दिसत आहे. भारतातहि अनेक ठिकाणी ह्या कथेची शिल्पे दिसतात. वेरूळच्या कैलास लेण्यात तिचे चित्रीकरण करणारे शिल्प प्रसिद्ध आहे. वरच्या शिल्पामध्ये भीतीपोटी शिवाला बिलगलेली पार्वती, भयभीत झालेले प्राणी, शिवाची प्रार्थना करणारे मुनिगण, वीस हातांनी कैलास हलवू पाहणारा दशानन रावण आणि आपल्या अंगठ्याने कैलास आणि रावणास दाबून ठेवणारा शिव असे चित्रीकरण आहे.

शंकरावर आपले बाण सोडणारा कामदेव

 
हिमालयकन्या पार्वती शंकर आपणास पति म्हणून मिळावा अशी इच्छा धरून होती आणि घोर तप करीत असलेल्या शिवाची सेवा करीत होती. तारकासुरामुळे त्रस्त झालेल्या देवांना शंकराचा होणारा पुत्र तुमचे रक्षण करील असे ब्रह्मदेवाने आश्वासन दिले होते. शंकराचे तेज धारण करण्यास पार्वतीच योग्य आहे अशी खात्री असल्यामुळे शंकर आणि पार्वती ह्यांचा संयोग घडून यावा अशी सुरप्रमुख इन्द्राचीहि इच्छा होती. इन्द्राच्या आज्ञेवरून हे घडवून आणण्यासाठी कामदेव सिद्ध झाला आणि ध्यानस्थ बसलेल्या शिवावर आपल्या पुष्पबाणाचा नेम त्याने धरला. शंकराच्या हे ध्यानी येताच त्याने आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला भस्म करून टाकले. हे कथन करून कुमारसम्भव काव्याच्या तिसर्‍या सर्गामध्ये कालिदास सांगतो:

क्रोधं प्रभो संहर संहरेति यावद्गिर: खे मरुतां चरन्ति ।
तावत्स वह्निर्भवनेत्रजन्मा भस्मावशेषं मदनं चकार ॥ कुमारसम्भव ३.७२
हे प्रभो, क्रोध आवर असे देवांचे शब्द आकाशामध्ये घुमत असतानाच शंकराच्या नेत्रामध्ये निर्माण झालेला अग्नि मदनाला भस्मावशेष करून टाकता झाला.

 

हे कथानक वर दाखविलेल्या शिल्पामध्ये दिसत आहे. तपश्चरण करणार्‍या शंकराच्या उजव्या बाजूस पार्वती आहे तर डाव्या बाजूस आपले पुष्पधनुष्य ताणलेला कामदेव आणि त्याच्या मागे त्याची सखी रति दिसत आहेत. शंकराच्या आसपास त्याचे गण भक्तिभावाने बसलेले दिसतात.
 

शंकराकडून पार्वतीचा स्वीकार

 
कुमारसंभवातील ह्या पुढचे कथानक असे आहे. सेवा करणार्‍या पार्वतीची परीक्षा पाहण्याच्या हेतूने एका ब्राह्मणाचे रूप धारण करून शंकर पार्वतीपुढे उभा राहतो. तो ब्राह्मण शंकराची अकिंचन, दिगम्बर, म्हातार्‍या बैलावर बसणारा, श्मशानवासी, रक्त ठिबकणारे गजचर्म पांघरलेला अशी अनेक शब्दांनी निंदा करतो आणि पार्वतीने त्याचा नाद सोडावा असे सुचवितो. पार्वती त्याला धिक्कारते. तिची निष्ठा अजमावलेला शंकर आता आपल्या खर्‍या रूपात तिच्यासमोर प्रगट होतो आणि म्हणतो:

अद्यप्रभृत्यवनताङ्गि तवास्मि दास:
क्रीतस्तपोभिरिति वादिनि चन्द्रमौलौ।
अह्नाय सा नियमजं क्लममुत्ससर्ज
क्लेश: फलेन हि पुनर्नवतां विधत्ते॥
’हे सेवाभाविनि, तुझ्या तपाने विकत घेतलेला मी आजपासून तुझा दास आहे’ असे चन्द्रमौलीने म्हणताच ती क्षणार्धात आपल्या तपाचे श्रम विसरली. फलप्राप्ति झाली म्हणजे श्रमाचे नवीकरण होते.

 
ह्या कथानकाचे दर्शन वरच्या शिल्पामध्ये होते. चित्रातील उजव्या बाजूस उभा असलेला ब्राह्मण शंकराची निंदा करीत आहे आणि ती न ऐकवल्याने पार्वती कानावर हात ठेवत आहे. उजव्या बाजूस प्रसन्न झालेला शंकर पार्वतीला हात देत आहे. तिच्या दोन सख्याहि शिल्पामध्ये आहेत.
 

आपले वाहन नंदीवर आरूढ शिवपार्वती

 

नृत्य करणारा नटराज

 
रामायणाशी संबंधित अशी काही शिल्पे आता पाहू.
 

ब्रह्मदेवाकडून वाल्मीकिला रामायण लिहिण्याचा आदेश

 
वाल्मीकिकडून रामायण कसे रचले गेले ह्याची कथा ह्या शिल्पामध्ये - जे ब्रान्तेइ ख्मार नावाच्या दुसर्‍या एका देवळामध्ये आहे - दाखविली आहे. जगामध्ये पूर्णपुरुष कोणी आहे काय असे एकदा वाल्मीकिने नारदास विचारले. अयोध्येचा राजा राम हा असा पुरुष आहे असे नारदाने उत्तर दिले. तदनंतर काही दिवसांनी तमसा नदीमध्ये स्नान करण्यासागी वाल्मीकि जात असता एका रतिमग्न क्रौंच पक्षियुग्माची पारध करणारा निषाद त्याला दिसला आणि त्याच्या मुखातून उत्स्फूर्तपणे श्लोक बाहेर पडला:

मा निषाद प्रतिष्ठां त्ममगम: शाश्वती: समा:।
यत्क्रौञ्चमिथुनादेकं अवधी: काममोहितम् ॥
अरे निषादा, तुला ह्यापुढे कधीच प्रतिष्ठा मिळणार नाही, कारण की काममोहित क्रौंच जोडप्यातील एकाचा तू वध केलास.
ह्यानंतर ब्रह्मदेव शरीररूपाने त्याच्यापुढे प्रकट झाला आणि ’तुझ्यामध्ये कवित्वशक्ति जागृत झाली आहे ती वापरून तू रामकथा निरूपण करावीस’ असा आदेश ब्रह्मदेवाने त्याला दिला.

 
ह्या प्रसंगाचे चित्रण वर दाखविलेल्या शिल्पामध्ये आहे. चार मुखांच्या ब्रह्मदेवाच्या डाव्या बाजूस धनुर्धारी निषाद आणि त्याच्या बाणाने विद्ध असा क्रौंच पक्षी दिसत आहे. ब्रह्मदेवाच्या उजव्या बाजूस आदेशग्रहण करणारा वाल्मीकि आणि त्याच्यामागे वीणाधारी नारद दिसत आहे.
 

रामायणातील विराधाची कथा

 
रामायणाच्या उत्तरकाण्डामध्ये विराधाची गोष्ट येते. विराध नावाचा राक्षस दंडकारण्यामध्ये राहात असतो. सीतेच्या रूपाने मोहित होऊन तो तिला उचलून पळवतो. राम आणि लक्ष्मण त्याचा पाठलाग करून त्याचे हात कापून त्याला पराजित करतात आणि त्याला जिवंत पुरायची तयारी करतात. तेव्हा विराधामधून आपल्या मूळ स्वरूपात गंधर्व तुंबुरु बाहेर पडतो. सेवेत चूक केल्याने त्याचा स्वामी कुबेर ह्याच्या शापानुसार तो पृथ्वीवर राक्षसरूपाने आलेला असतो आणि उ:शापानुसार रामाच्या हस्ते शासन झाल्याने पुन: गंधर्व होऊन अलकानगरीकडे प्रयाण करतो.
 

वाली-सुग्रीव युद्ध आणि वालीवध

 
वानरांचा राजा कोण ह्या प्रश्नाच्या निर्णयासाठी वाली आणि सुग्रीव ह्यांच्यामध्ये मल्लयुद्ध होते आणि सुग्रीवाचा पक्षपाती राम बाण मारून वालीचा वध करतो ही कथा ह्या शिल्पामध्ये दिसत आहे.
 
भागवतपुराणातील काही प्रसंग पाहू.
 

कृष्णाकडून कंसवध

 

कृष्णाकडून कालियामर्दन

 

भीम अणि दुर्योधन ह्यांचे गदायुद्ध. डावीकडे हलधर बलराम आणि कृष्ण

 
नरसिंहाची कथा आणि गजलक्ष्मी ही चित्रे पाहून हा भाग संपवू. पुढील भागामध्ये अंगकोर थोम चार बाजूंना भिंत असलेल्या नगरामधील बायोन नावाचे मंदिर आणि अन्य काही गोष्टी पाहू.
 

आपल्या नखांनी हिरण्यकशिपूला मारणारा नरसिंह

 

गजलक्ष्मी

 

द्वारपाल

प्रतिक्रिया

बान्तेय स्रेइची सुंदर ओळख! बान्तेय स्रेइ बघताना काही जागी कांचीपुरमची आठवण आली होती.

शुंभ आणि उपटसुंभ हे दोन मराठी शब्द सुन्द आणि उपसुन्द ह्या शब्दांचे अपभ्रंश असावेत असा तर्क करता येईल काय?

शुंभ हा शुंभनिशुंभांच्या कथेतील असावा असं वाटतं.

प्रचेतस's picture

13 Jan 2018 - 8:44 am | प्रचेतस

अप्रतिम शिल्पे आणि त्यांचे तितकेच सुरेख वर्णन.
कंबोडियाला जायलाच हवेय.

ससंदर्भ लेख आवडला. शिल्पांवर पौर्वात्य शैलीचा प्रभाव भारतीय नजरेला वेगळाच वाटतो. कलाकुसरीचा अंमळ अतिरेक जाणवतो. पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2018 - 3:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर चित्रे आणि त्यांचे मस्त विवरण ! बान्तेय स्रेई अंगकोरमधील आकाराने लहान पण कोरीवकामात मेरूमणी देऊळ आहे.

सुंदर सफर चालली आहे. पुभाप्र.

पद्मावति's picture

13 Jan 2018 - 3:58 pm | पद्मावति

सुरेख!

अनिंद्य's picture

13 Jan 2018 - 8:54 pm | अनिंद्य

मस्त सफर,
पु भा प्र

Jayant Naik's picture

13 Jan 2018 - 9:12 pm | Jayant Naik

प्रवास वर्णन आणि चित्रे अप्रतिम.असेच लिहित रहा .

या भागात महिना सहा महिने राहायला हवे.
लेख आवडले.