थोडेसे गीतेबद्दल ...

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
3 Jan 2018 - 6:33 pm

अनेकविध स्रोतांतून गीतेबद्दल मला उमजलेले थोडेसे, अल्पसे ज्ञान आपल्यासोबत शेयर करण्यासाठी माझे दोन लेख येथे एकत्रितरीत्या देत आहे.
चूकभूल द्यावी घ्यावी! त्यानिमित्ताने एक चर्चा होईल आणि एकमेकांचे अध्यात्मिक ज्ञान वाढण्यास मदत होईल!! - निमिष सोनार

* * * || लेख क्र १ || * * *

कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध करण्याचे अर्जुनाने नाकारले तेव्हा त्याला समजावताना आणि विविध वैदिक उपदेश करतांना म्हणजेच "भगवदगीता" सांगताना एका क्षणी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले,

"कर्म कर पण ते करतांना फलाची अपेक्षा ठेवू नको म्हणजे त्या फलाशी तू बांधला जाऊन तुला ते फळ भोगावे लागणार नाही! म्हणून फळाची अपेक्षा न करता युद्ध (करण्याचे कर्म) कर जे कोणत्याही क्षत्रियाचे कर्तव्य असते! कारण आपल्याला नेमून दिलेले कर्तव्य करावेच लागते. त्याशिवाय आपला आत्मा ज्या शरीरात सध्या वास करत आहे त्या शरीराचा उदर निर्वाह तू कसा करणार?"

अर्जुन म्हणाला,

"पण युद्धाच्या कर्माने मी बांधलो नाही का जाणार? कितीही केले तरी कर्म आले की त्याचे फळ आलेच! आणि या युध्दात माझे नातेवाईक आणि अन्य लाखो लोक माझे हातून मारले जाऊन मला पाप नाही का लागणार?"

श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले,

"हे सगळे लोक विविध अविनाशी आत्मे आहेत, जे शरीर धारण करून समोर उभे राहिले आहेत. त्यांची येथे फक्त शरीरे मरतील, आत्मे नाही.

पण आत्मे मुक्त होतील. त्याची शरीरे मारण्याचे तुला पाप तेव्हाच लागेल जेव्हा तू युद्ध करताना युद्धाच्या फळावर नजर ठेऊन असशील जे चूक असेल. फळावर नजर म्हणजे उदाहरणार्थ - जिंकलास तर सुख आणि अहंकार, तसेच जर तू स्वतःचा काहीतरी स्वार्थ किंवा फायदा बघशील आणि आणखी जास्त जग जिंकण्याची इच्छा धरशील आणि हरलास तर दुःख आणि निराशा तुला घेरतील असा (फळाचा) विचार करत युद्ध करू नकोस!!

त्याऐवजी निष्काम भावनेने कर्म (युद्ध) कर.

मनात युद्धाच्या कोणत्याच भावी परिणामांची चिंता न करता तटस्थ भावनेने युद्ध कर, म्हणजे त्याच्या फळाच्या परिणामांपासून तू मुक्त राहशील!"

अर्जुन म्हणाला,

"पण काहीही केलं तरी कर्माने आपण बांधले जातो म्हणून त्यापेक्षा मी सगळे कर्म करणे यापुढे थांबवून, हे जग त्यागून सन्यास घेतला तर ते युद्ध करण्यापेक्षा चांगले नाही का होणार?"

श्रीकृष्ण म्हणाले,

"अरे पार्थ, असे तुझ्यासारखे धर्माच्या बाजूने असणारे लोक जेव्हा असा कर्म आणि संसार त्यागण्याचा विचार करतात तेव्हा मग दुर्योधनासारखे अधर्मी लोक आपले दुष्कर्म करायला मोकाट सुटतात!

तुझा कर्म त्यागण्याचा विचार म्हणजे जिभेला स्वाद घेऊ द्यायचा नाही म्हणून जेवणच करणे बंद करणाऱ्या माणसासारखे आहे. असा जेवण बंद करणारा माणूस जितके दिवस जेवण बंद करेल तितके दिवस त्याला मनात त्या स्वादाची आठवण पुन्हा पुन्हा जास्त तीव्रतेने येत राहील!!

म्हणजे न जेवताही स्वादाची इच्छा त्याला कर्म फलात बांधते आहे.
त्यापेक्षा त्या माणसाने स्वादाची इच्छाच मनातून नाहीशी केली तर?

त्याचप्रमाणे कर्म हे फळ निर्माण करतात म्हणून कर्मच करणे बंद करून टाकण्यापेक्षा कर्माच्या परिणामांच्या इच्छा (सकारात्मक किंवा नकारात्मक भावी फळाच्या अपेक्षा) मनातून नष्ट करणे योग्य नाही का?

असे कर्म केल्याने त्याचे फळ निर्माण झाले तरी ते भोगण्यापासून तू मुक्त असशील, म्हणजे ते तुला भोगावे लागणार नाही! त्या कर्मफळाच्या पाप पुण्यापासून तू मुक्त राहशील!"

पण अर्जुनाने आणखी एक शंका उपस्थित केली,

"पण माधव, आपली संस्कृती दया आणि करुणा शिकवते. हे सगळे अधर्मी आत्मे अज्ञानात आहेत. ते अज्ञान असे की सर्व सृष्टी व्यापून उरलेल्या परमात्म्याचे आपण अंश आहोत हे त्याना ज्ञात नाही आणि अधर्म करून आपण परमात्म्याला विसरून त्याचेपासून दूर जात आहोत हे त्यांचे लक्षात सुद्धा येत नाही आहे! मग अशांना मारण्यापेक्षा त्याचे अज्ञान दूर करून त्याचेवर दया दाखवणे योग्य नाही का?"

यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले,

"या सगळ्यांनी तुझ्यासोबतच शिक्षण घेतले आहे, त्यांनाही तुझ्यासोबत हे वेदज्ञान मिळाले आहे (आत्मा परमात्मा याबद्दल). त्यामुळे असे समजू नकोस की ते अज्ञानात आहेत! त्यांना सगळे ठाऊक आहे! म्हणजे ज्ञानी असूनही मुद्दाम अधर्म करत राहणाऱ्यांना दंड देणे हीच एक प्रकारची त्यांना दाखवलेली दया आहे.

लक्षात ठेव - तीन गुणांच्या कमी अधिक मिश्रणाने व्यक्ती बनतो.

"तामसिक" म्हणजे कोणतेही ज्ञान मुद्दाम दुर्लक्षित करून अविचाराने कृत्य करत राहाणे जसे की दुर्योधन, दुःशासन वगैरे.

"सात्विक" म्हणजे हे सगळे वैदिक ज्ञान अंगिकारून त्याप्रमाणे धर्माच्या मार्गावर चालणारे लोक जसा तू, युधिष्ठिर वगैरे.

आणि कळत असून वळत नसणारे मधले लोकं म्हणजे "रजासिक" जसा की कर्ण!

यांचे सगळ्यांचे अज्ञान पुन्हा दूर करण्याची वेळ आता कधीच निघून गेली आहे.
आता युद्ध करून त्यांना दंड दिल्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे मी स्वतः परमात्मा म्हणजे भगवंत तूला सांगतो आहे.

तेव्हा हे अर्जुना, युद्ध कर!"

(वरील संवाद स्टार प्लस वरील 2013 साली गाजलेल्या महाभारतातील गीतेच्या उपदेशावर आधारित आहे)

* * * || लेख क्र २ || * * *

गीतेबद्दल थोडेसे ... - निमिष सोनार

यापूर्वी अनेक विद्वानांनी गीतेवर छान भाष्ये केली आहेत. माझ्यासारख्या सामान्य माणसाला गीता पूर्णपणे समजणे आणि ती मी तुम्हाला पूर्णपणे समजावून सांगणे अशक्य गोष्ट आहे. पण मला वाचून जेवढे काही आणि जसे काही थोडेफार समजले आहे, उमगले आहे ते मी तुमच्यापुढे मांडतो आहे. हा लेख वाचल्यानंतर भगवदगीता वाचण्याची तुम्हाला प्रेरणा मिळाली तर माझ्या लेखाचा उद्देश्य सफल झाला असे मी समजेन.
चूक भूल द्यावी घ्यावी.

भगवंतानी सांगितलेल्या गीतेनुसार पुनर्जन्माला मान्यता असून, मागील जन्माचे काही कर्म ज्यांचे फळ त्या जन्मात मिळाले नव्हते ते प्रारब्ध बनून या जन्मात सोबत येते. त्यालाच आपण नशीब म्हणतो. आपल्या मागील जन्माच्या कर्माच्या प्रारब्धा नुसारच आपला जन्म कुठे आणि कुणाच्या पोटी व्हावा हे ठरत असते.

मानव तीन वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करतो.

त्यापैकी काही कर्म याच जन्मात लगेच फळ देतात.
काही कर्म याच जन्मात पण काही काळानंतर फळ देतात.
तर काही कर्म पुढील मानव जन्म मिळेपर्यंत (अनेक प्राण्यांच्या योनीतून तसेच स्वर्ग नरक यातून काही कर्म भोगून झाल्यावर उरलेले) तुमचे प्रारब्ध बनून तुमच्या सोबत पुढच्या मानव जन्मापर्यंत येतात.

अर्थात ते मागच्या जन्मीचे कर्म आपल्याला आठवत नाहीत म्हणुन त्याचे फळ या जन्मी मिळाल्यावर आपण आश्चर्यचकीत होतो की, आपल्यासोबत इतके टोकाचे चांगले/वाईट का घडले? पूर्ण गीता वाचल्यास आणखी यासारख्या आणि इतर अनेक गोष्टी स्पष्ट होतात.

येथे एक लक्षात घ्या: भगवान किंवा भगवंत किंवा परमेश्वर हे समानार्थी शब्द आहेत.
परम + ईश्वर = सुपर गॉड जे सगळ्या देव देवतांचे बॉस असतात. भगवंत!!

परमेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेतील काही श्लोकात सांगतात की, परमेश्वर म्हणजे ते स्वतः आणि इतर देव देवता यात फरक आहे.

इतर देव देवता यांना तुम्ही काहीही मागाल (नवस, वरदान वगैरे) तरीही ते देव देवता तुमच्या मागील जन्माच्या चांगल्या कर्माच्या शिल्लक असलेल्या (संचित) नुसारच फक्त तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाध्य असतात.

बॅलंस नसेल तर कितीही पूजा करा काहीच उपयोग होत नाही.

जसे बॅंकेतील जमा असलेले पैसे आपण थोडे थोडे वापरले तर जास्त कालावधीसाठी पुरतात आणि एकदम रक्कम काढून घेतली तर तेवढ्यापुरता फायदा होतो पण नंतर च्या काळासाठी रक्कम रहात नाही! अगदी तसेच!!

"भगवंतांच्या मर्जीविरूध्द कोणतेही देव देवता कोणाही मानवाला वरदान देऊ शकत नाहीत", असे भगवान श्रीकृष्णांनी स्वतः गीतेत एका श्लोकाद्वरे सांगितले आहे.

देव देवतांची "पूजा" केली जाते आणि ती आपल्या काहीतरी "भौतिक इच्छांची पूर्ती" करण्यासाठी असते पण भगवंतांची मात्र "भक्ती" केली जाते किंवा नामस्मरण केले जाते ते आपली "अंतिम अध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी"!

देव देवतांच्या पूजेसंदर्भात असलेल्या मंत्रांचे, जापाचे स्थळ काळा विषयी काही नियम असतात पण भगवंतांचे नाव मात्र कुणीही कधीही आणि केव्हाही घेऊ शकतो. त्याला कोणतेही बंधने नाहीत.

भगवंत या ब्रम्हांडातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूत असतात. तसेच ते प्रत्येक सजीव प्राणीमात्रात आणि मनुष्यात परमात्म्याच्या रुपात स्थित असतात. तेच देव देवतांच्या शरीरात सुध्दा परमात्मा रूपाने वास करतात.

प्रत्येक सजीवात एक आत्मा (भगवंतांचे अलिप्त आणि स्वतंत्र रूप) आणि एक परमात्मा (भगवंतांचे रूप) असतात.

भगवंताचे नामस्मरण करून आणि भक्ती करून आपण काहीही मागू नये. फक्त त्याला विनंती करावी की आपल्या आत्म्याची जन्म मरणाच्या फेऱ्यातून आणि विविध योनीतून फिरत राहण्याच्या चक्रापासून सुटका करावी. यालाच "आत्म्याची मुक्ती" असे म्हणतात. मुक्ती म्हणजे आत्म्याची अशी स्थिती ज्यात तो आत्मा पुढे कोणतेही शरीर धारण करण्यास बाध्य होत नाही आणि तो आत्मा परमधामात किंवा वैकुंठात भगवंतांच्या सान्निध्यात कायम रहायला जातो पण त्याचे स्वतंत्र अस्तित्व मात्र कायम रहाते.

यावर कुणी सहज प्रश्न विचारेल की शेवटी आपण भगवंताला सुध्दा काहीतरी मागतोच आहे (जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका आणि आत्म्याची मुक्ती) मग हे मागणे देव देवतांना मागितलेल्या गोष्टींसारखेच नाही का झाले? मग फरक काय राहिला?

याचे उत्तर असे आहे की प्रत्येक आत्म्याची या भौतिक जगतातून मुक्ती व्हावी आणि तो आत्मा कायम भगवंताकडे राहण्यास यावा ही मुळात भगवंतांचीच इच्छा असून यात आपण भगवंतांकडे मानव जन्मातील भौतिक इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणतीही वस्तू किंवा व्यक्तीची मागणी करत नाही आहोत. म्हणूनच या इच्छेला अध्यात्मिक इच्छा म्हणतात जी भगवंत (परमेश्वर) पूर्ण करतात.

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष नुसार मानव जन्माचा अंतिम उद्देश्य मुक्ती हाच आहे (अध्यात्मिक इच्छा).
आत्मा मुक्ती मिळवून कायम भगवंताकडे जाणे यालाच आपण "आत्मा हा परमात्म्यात विलीन झाला" असे म्हणतो!

याउलट इतर देव देवतांना मागितलेल्या इच्छा या अध्यात्मिक नसून भौतिक प्रकारच्या असतात ज्या कर्म फळ यांची साखळी निर्माण करून पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या योनीच्या रूपात आपल्याला भौतिक जगात जन्म घ्यायला भाग पाडतात.

कृष्ण सांगतात की आपला आत्मा सनातन असतो, तो कधीही मरत नाही, एकतर तो मुक्त होतो किंवा अनंतपणे आपल्या कर्मानुसार विविध शरीर प्राप्त करत जातो.

म्हणून भगवंत म्हणतात की -

"जर जन्म मरणाच्या 84 लक्ष्य योनीच्या अनंत सुरु असणाऱ्या चक्रात अडकायचेे असले तर देव देवतांची पूजा करा आणि त्या चक्रातून सुटका हवी असेल तर भगवंतांची "भक्ती" करा. नामस्मरण करा. त्याला काहीही भौतिक इच्छा मागू नका!"

आता प्रश्न पडतो की मनुष्य भगवंताचा अंश आहे आणि भगवंत परमात्म्याच्या रूपाने प्रत्येकाच्या शरीरात रहात असतात मग तो वेगवेगळी चांगली वाईट कर्मे का करतो?

याचे उत्तर गीतेनुसर असे देता येईल की -

"कोणत्याही मनुष्यावर भगवंतांनी निर्माण केलेल्या रजो, तमो आणि सत्व या तीन गुणांचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव असतो. हे गुण देऊन भगवंतांनी मनुष्याला आंशिक स्वातंत्र्य बहाल केले आहे. यातील कोणताही गुण निवडून मनुष्य त्याला पाहिजे तसा वागू शकतो. भगवंत त्यात हस्तक्षेप करत नाहीत. पण त्या वागण्यातून निर्माण होणाऱ्या कर्माच्या फलातून मात्र त्याची सुटका नाही. ते फळ केव्हा, कसे, कधी मिळेल हे ठरवण्याचे स्वातंत्र्य मानवाला नाही. तसेच नमके कोणते कर्म चांगले (पुण्य) आणि कोणते वाईट (पाप) हे ठरवण्याचा अधिकार मानवाला नाही. कारण कोणतेही कर्म व्यक्तीसापेक्ष असते. जेव्हा मनुष्य वाईट वागत असतो तेव्हा परमात्मा (ज्याला आपण आपला आतला आवाज म्हणतो) आपल्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतच असतो. आपण अनेकदा याचा अनुभव घेतला असेलच!"

थोडक्यात, या तीन गुणांच्या प्रभावामुळेच या भौतिक जगतात कोणताही मनुष्य चांगले वाईट कर्म करत असतो. इतर प्राण्यांना मात्र कर्माचे नियम लागू नसतात, म्हणूनच कोर्टात सुध्दा कायद्याने आपण माणसाला खाल्ल्याबद्दल वाघाला खुनाच्या शिक्षेखाली अटक करू शकत नाही!!

ब्रम्हा हे रजो गुणाचे, विष्णू हे सत्व गुणाचे आणि शंकर हे तमो गुणाचे प्रतिनिधी आहेत.

भगवंत वगळता इतर सर्व प्राणी, मनुष्य आणि देव देवता सुध्दा कर्माच्या नियमांनी बांधले आहेत कारण सर्व देव देवता सुध्दा तीन गुणांच्या प्रभावाखाली येतात.

एकूण 84 लक्ष्य योनीमध्ये देव देवता सुध्दा अंतर्भूत असतात.

मात्र भगवंत स्वतः (श्रीकृष्ण) मात्र त्रिगुणातीत आहेत म्हणजे या तीन गुणांच्या प्रभावापलीकडे आहेत.

मानवाला पुढे कोणताच जन्म मिळू नये यासाठी तीन गुणांचा आपल्यावरील प्रभाव नष्ट करावा लागतो. त्यासाठी भगवंतांनी एक मार्ग सांगितला आहे. तो म्हणजे या मानव जन्मातील कर्मे अलिप्तपणे करावी म्हणजे फळाची अपेक्षा न करता! (मनाने अलिप्त किंवा विरक्त होऊन) तसेच सुखात आनंद आणि दुःखात शोक करू नये, म्हणजे तटस्थ राहावे!

पण फक्त हाच एकमेव मार्ग नाही. भगवंतांनी इतरही अनेक मार्ग सांगितले आहेत ज्याद्वारे आपण तटस्थपणे कर्म करू शकतो किंवा कर्मांचा त्याग करू शकतो आणि मुक्ती मिळवू शकतो. उदाहरणार्थ - भक्तीयोग!

हा आणि इतर सगळे मार्ग कोणते हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण गीता वाचणे योग्य होईल.

धन्यवाद!!!

धर्मविचार

प्रतिक्रिया

शब्दानुज's picture

3 Jan 2018 - 7:05 pm | शब्दानुज

तर काही कर्म पुढील मानव जन्म मिळेपर्यंत (अनेक प्राण्यांच्या योनीतून तसेच स्वर्ग नरक यातून काही कर्म भोगून झाल्यावर उरलेले) तुमचे प्रारब्ध बनून तुमच्या सोबत पुढच्या मानव जन्मापर्यंत येतात.

आणि

इतर प्राण्यांना मात्र कर्माचे नियम लागू नसतात, म्हणूनच कोर्टात सुध्दा कायद्याने आपण माणसाला खाल्ल्याबद्दल वाघाला खुनाच्या शिक्षेखाली अटक करू शकत नाही!!

यात कमालीचा विरोधाभास आहे.

निमिष सोनार's picture

3 Jan 2018 - 9:36 pm | निमिष सोनार

प्राणी मागील मानव जन्मातील कर्मांचे फळ "भोगतात" मात्र ते त्यांच्या प्राणी जन्मात जे काही कृत्ये कर्मे करतात त्यांचे फळ त्यांना त्यांच्या जन्मात किंवा पुढील जन्मात (इतर कोणता प्राणी, पक्षी किंवा कीटक किंवा नंतर पुन्हा मानव वगैरे) भोगावे लागत नाही. मात्र मागील मानव जन्मातील कर्मे (जी त्या जन्मात भोगायची राहिली आहेत) ती पुढील मानव जन्म मिळेपर्यंत (स्वर्ग, नरक यात आणि इतर योनींतून भोगून झाल्यानंतर) पुन्हा प्राक्तन बनून सोट येतात. मात्र त्या मानव जन्मात आपण जी नवीन कर्मे करू त्याची पुन्हा फळे निर्माण होतात आणि ती भोगावी लागतात.

प्राणी (आत्मा) मागील मानव जन्मातील कर्मांचे फळ "भोगतात" मात्र ते त्यांच्या सध्याच्या प्राणी जन्मात जे काही कृत्ये/कर्मे करतात त्यांचे फळ त्यांना त्यांच्या जन्मात किंवा पुढील जन्मात (इतर कोणता प्राणी, पक्षी किंवा कीटक किंवा नंतर पुन्हा मानव वगैरे) भोगावे लागत नाही.

मात्र मागच्या मानव जन्मातील कर्मे (जी त्या जन्मात भोगायची राहिली आहेत) ती पुढील मानव जन्म मिळेपर्यंत (स्वर्ग, नरक यात आणि इतर योनींतून भोगून झाल्यानंतर) पुन्हा प्राक्तन बनून सोबत येतात.

मात्र त्या नव्या मानव जन्मात आपण मागच्या जन्माची कर्म फळे भोगता भोगता जी काहे नवीन कर्मे करू (प्रत्येकाला अंशिक स्वातंत्र्य असते) त्याची पुन्हा फळे निर्माण होतात आणि ती भोगावी लागतात.

हे मात्र प्राण्यांना लागू नाही. म्हणजे असे कि ते (प्राणी, कीटक, पक्षी) फक्त फळ "भोगण्यासाठी" आलेले असतात (मागचे हिशोब चुकते करण्यासाठी) मात्र त्यांची नवी कर्मे पुढील साखळीत add होत नाहीत.

हा फरक आहे.

श्रीगुरुजी's picture

3 Jan 2018 - 8:36 pm | श्रीगुरुजी

छान लिहिलंय.

भगवंतानी सांगितलेल्या गीतेनुसार पुनर्जन्माला मान्यता असून, मागील जन्माचे काही कर्म ज्यांचे फळ त्या जन्मात मिळाले नव्हते ते प्रारब्ध बनून या जन्मात सोबत येते. त्यालाच आपण नशीब म्हणतो. आपल्या मागील जन्माच्या कर्माच्या प्रारब्धा नुसारच आपला जन्म कुठे आणि कुणाच्या पोटी व्हावा हे ठरत असते.

मानव तीन वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करतो.

त्यापैकी काही कर्म याच जन्मात लगेच फळ देतात.
काही कर्म याच जन्मात पण काही काळानंतर फळ देतात.
तर काही कर्म पुढील मानव जन्म मिळेपर्यंत (अनेक प्राण्यांच्या योनीतून तसेच स्वर्ग नरक यातून काही कर्म भोगून झाल्यावर उरलेले) तुमचे प्रारब्ध बनून तुमच्या सोबत पुढच्या मानव जन्मापर्यंत येतात.

अर्थात ते मागच्या जन्मीचे कर्म आपल्याला आठवत नाहीत म्हणुन त्याचे फळ या जन्मी मिळाल्यावर आपण आश्चर्यचकीत होतो की, आपल्यासोबत इतके टोकाचे चांगले/वाईट का घडले? पूर्ण गीता वाचल्यास आणखी यासारख्या आणि इतर अनेक गोष्टी स्पष्ट होतात.

वरील गोष्टींवर माझा पूर्ण विश्वास आहे.

अँड. हरिदास उंबरकर's picture

4 Jan 2018 - 5:50 pm | अँड. हरिदास उंबरकर

सुंदर लेख.. लेख वाचून एकदा गीता वाचण्याचा मोह झालाय..

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jan 2018 - 12:35 pm | अत्रुप्त आत्मा

म्हणजे तुम्ही कर्मसिद्धांत मानता, नि. सो.?मंजे टनाटनी आहात तर! हे प्रथमच निदर्शनास आलं!

टनाटनी चा अर्थ समजावून सांगितलात तर बरे होईल म्हणजे "तणातणी" होणार नाही आपल्यांत!! :-)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jan 2018 - 2:21 pm | अत्रुप्त आत्मा

सनातनी शब्दाचं विडंबक रूप आहे ते!

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jan 2018 - 2:22 pm | अत्रुप्त आत्मा

सनातनी शब्दाचं विडंबक रूप आहे ते!

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jan 2018 - 3:26 pm | ज्ञानोबाचे पैजार

गीता समजावुन घेण्याचा प्रामाणीक प्रयत्न आवडला.
पुन्हा एकदा गीतेवरची धुळ झटकायला पाहिजे
पैजारबुवा,

रविकिरण फडके's picture

7 Jan 2018 - 6:53 am | रविकिरण फडके

गीतेबद्दल, म्हणजे गीतेचा मूळ संदेश (message) काय, ह्याबद्दल मतामतांचा गलबला आहे. जिला उत्सुकता असेल त्या व्यक्तीने गीतारहस्य जरूर वाचावे. त्यात नेमकेपणा आहे, बऱ्याच 'आध्यात्मिक' ग्रंथांत असतो तसा घोळ किंवा भोंगळपणा नाही, सगळे वाचून झाल्यावर 'म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे बुवा ह्याला' अशी अवस्था होत नाही. आपण गीतेचा जो अर्थ लावलाय तो तसाच का लावलाय ह्याबद्दलचे टिळकांचे विषयप्रवेश करतानाचे विवेचन तर अप्रतिम असेच आहे.
बाकी, पूर्वजन्मीचे कर्म, संचित इ. विषयांवर खूप बोलून झालेले आहे. आज सर्व जाणतात की आपली बरीचशी वैशिष्टये माणूस जन्मतानाच घेऊन येतो, ती जनुकीय असतात. आणि मनुष्याचे जन्माला आल्यानंतर जे काही होते (जन्म कोठे घ्यायचा हे काही त्याच्या हातात नसते) त्यात त्याच्या व्यक्तिमत्वाचा मोठा भाग असतो. पण जेव्हा हे ज्ञान नव्हते तेव्हा ज्या काही थिअरीज मांडल्या गेल्या त्यातील एक पूर्वजन्म, संचित ही कल्पना. त्यावर आता किती वेळ घालवायचा हे ज्याने त्याने ठरवावे.

टीप: गीता किंवा एकूणच पुराणे, देवदेवता, इ. चे मी फारसे वाचन केलेले नाही. जे काही थोडेसे वाचले, ऐकले त्यामुळे 'हा सगळा बनवाबनवीचा प्रकार आहे' असे मत दृढ होत गेले. गीतारहस्य हा पहिलाच ग्रंथ मला तर्कशुद्ध असा वाटला. (टिळकांनी तो लिहायचे कष्ट घेतले कारण जो समाज आपल्या उन्नतीची कामे सोडून नुसताच टाळकुट्या बनत चाललेला होता - आणि तसे करण्यासाठी गीतादि ग्रंथांचा आश्रय घेत होता - त्यास ताळ्यावर आणावे हा होता.)

स्वधर्म's picture

9 Jan 2018 - 1:55 pm | स्वधर्म

मानला तरच गीतेची चिरेबंदी (इतक्या वर्षांत सर्व फटी बुजवलेली) इमारत उभी राहू शकते, नाहीतर ती ढासळते. दुर्दैवाने ही गोष्ट अनुभवाने सिध्द करता येत नाही. त्यामुळे गीता ही केवळ अाणि केवळ श्रध्दा ठेऊनच वाचणे शक्य अाहे. त्यामुळे अभ्यास सुरू ठेऊ शकलो नाही.

Jayant Naik's picture

11 Jan 2018 - 3:36 am | Jayant Naik

उत्तम प्रयत्न. अठरा अध्यायी गीता दोन भागात सांगायचा प्रयत्न खूप मस्त जमला आहे. अवघड विषय आहे.साक्षीभाव असल्याशिवाय कर्म करा ,फळाची आशा ठेऊ नका हे जमणे अशक्य.हेच जमत नसल्यामुळे या वचनाचा लोकांनी काहीही काम न करता भगवंतावर हवाला ठेवा असा चुकीचा अर्थ लावला आहे.

निमिष सोनार's picture

11 Jan 2018 - 1:37 pm | निमिष सोनार

धन्यवाद