जानेवारीमध्ये लदाख़मध्ये सायकलिंग

Primary tabs

मार्गी's picture
मार्गी in भटकंती
2 Jan 2018 - 10:36 pm

जानेवारीमध्ये लदाख़मध्ये सायकलिंगची‌ योजना

जानेवारीमध्ये जम्मू- कश्मीर राज्यातल्या लदाख़ क्षेत्राचं‌ तपमान -२० ते -२५ इतकं‌ कमी होतं. तेव्हा ह्या प्रदेशाचं मुख्यालय असलेलं‌ लेह फक्त विमानाने जगाशी‌ जोडलेलं‌ असतं. अशा वातावरणातही काही पर्यटक तिथे जाऊन तिथल्या हिवाळ्यात फिरतात. लेह आजवर दोनदा बघितलं आहे, पण ते तिथल्या उन्हाळ्यात. त्यामुळे एकदा ते हिवाळ्यामध्ये जाऊन बघायचं आहे. अशा प्रतिकूल वातावरणामध्ये जितकी शक्य असेल तितकी सायकल तिथे चालवायची आहे. लेहच्या जवळपास रस्ते सुरू‌ असतात. त्यामुळे लेहवरून निम्मू आणि शक्य असेल तर खार्दुंगला इथेही‌ सायकल चालवता येऊ‌ शकते. खार्दुंगला रस्ता मिलिटरीसाठी अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे तो नेहमी सुरू ठेवला जातो. ५३०० मीटर उंचीचा खार्दुंगला हिवाळ्यातही सुरू राहतो. अर्थात् मध्ये मध्ये मोठ्या बर्फवृष्टीमुळे तो तात्पुरता बंदही होऊ‌ शकतो.

अशा वेळेस लदाख़मध्ये जाण्यामागचे काही हेतु असे आहेत-

१. हिवाळ्याच्या प्रतिकूल हवामानात तिथे लोक कशा प्रकारे राहतात, जवान आणि सेनेचे अन्य लोक तिथे कशा प्रकारे काम करतात, हे जवळून अनुभवणे.
२. तिथले लोक व सैनिकांशी २६ जानेवारीच्या कार्यक्रमात अनौपचारिक प्रकारे संवाद करणे.
३. शरीराच्या क्षमतांना आव्हान देणे व त्या क्षमतांची पारख करणे.
४. सायकलिंग नेहमी काही‌ संदेश देतच असते- पर्यावरणाप्रती संवेदनशीलता आणि फिटनेसबद्दल जागरूकता.


फोटो स्रोत: http://travel.paintedstork.com/blog/2013/02/leh-ladakh-winter.html

तयारी

अलीकडेच केलेल्या सायकलिंग मोहीमेनंतर ह्याची इच्छा झाली. पूर्वी जे घाट कठिण वाटायचे ते आरामात जमले तेव्हा वाटलं की, ह्याहून मोठ्या पर्वतावर सायकल चालवू शकेन. तेव्हाच हा विचार सुरू झाला. ह्यासाठी तयारी अशा प्रकारे केली-

- नियमित सायकलिंग; घाट रस्त्यावर सायकल चालवण्याची सवय
- सायकलिंगमधला स्टॅमिना वाढवण्यासाठी रनिंग सुरू केले व त्याचा मागच्या मोहीमेत बराच फायदा झाला. हळु हळु रनिंग वाढवून २१ किलोमीटर पळता आलं. त्यानंतर ग्रेड १ चा घाट असलेल्या सिंहगडावरही रनिंग करता आलं. त्यामुळे सायकलिंगसोबत रनिंग हाही तयारीचा भाग राहिला.
- योगासन आणि प्राणायाम

इतक्या थंडीसाठीची तयारी अजून सुरू आहे. कमीत कमी कपड्यांचे तीन- चार लेअर्स वापरावे लागतील. थर्मल आणि इनरसह तीन सॉक्स आणि रस्त्यावर चालताना गम बूट आणि नाक सोडून संपूर्ण शरीर झाकण्याची व्यवस्था करावी लागेल. आणि थंडीची खरी तयारी मानसिक असेल. थंडीचं इतका भीषण नाही, पण छोटा अनुभव पूर्वी घेतलेला आहे. डिसेंबरमध्ये बद्रीनाथजवळ गेलो असतानाची थंडी आठवते. पण तिथे उंची बरीच कमी होती; पण तरीही संध्याकाळी‌ साडेपाच वाजता रात्र होत होती. आणि थंडीमुळे एक प्रकारचा आळस येत होता.

ह्यावेळी कदाचित हेच आव्हान सगळ्यांत मोठं असेल. त्याशिवाय लेहमध्ये हिवाळ्यात व्यवहार 'थंडावतात.' त्यामुळे सोयी- सुविधांचीही कमतरता असते. सायकल मिळण्यामध्येही अडचणी आहेत. दिवस उशीरा सुरू होतो व लवकर संपतो. सायकलिंगसाठी जेमतेम आठ- नऊ तास मिळतील. ह्या सगळ्यासाठी तयारी करतो आहे. लेहमध्ये मागच्या वेळी जिथे थांबलो होतो- तिथेच चोगलमसर भागात मित्राकडे थांबेन.

सायकलिंगची योजना

पुणे- दिल्ली- लेह विमान प्रवास व २४ जानेवारीला सकाळी लेहमध्ये आगमन
२६ जानेवारीपर्यंत पूर्ण आराम ज्यामुळे शरीर त्या हवामानासोबत जुळवून घेऊ शकेल.
२६ जानेवारीच्या सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती आणि लेह गावामध्ये भ्रमण- सायकल मिळवण्याचा जुगाड
२७ जानेवारी- लेह गावामध्ये १० किलोमीटर सायकलिंग.
२८ जानेवारी- लेह- सिन्धू घाट परिसरामध्ये १० किलोमीटर सायकलिंग.
२९ जानेवारी- लेह ते निम्मू- चिलिंग सायकलिंग (४५ किलोमीटर). चिलिंगमध्ये मुक्काम
३० जानेवारी- चिलिंग- निम्मू- लेह परत (४५ किलोमीटर).
३१ जानेवारी- लेह ते खार्दुंगला रोडवर साउथ पुल्लूपर्यंत सायकलिंग.
१ फेब्रुवारी- खार्दुंगला जाण्याचा प्रयत्न. खार्दुंगला जाणे रस्ता सुरू असण्यावर अवलंबून.

२- ३ फेब्रुवारी राखीव दिवस. आणि ४ फेब्रुवारीला लेह- दिल्ली- पुणे विमानाने परत.

अशी योजना तर बनवली आहे, पण त्यामध्ये खूप जास्तifs and buts आहेत. शरीर इतक्या थंडीला किती सहन करू शकेल, अशा वातावरणात सायकल किती चालवता येईल ह्याबद्दल काहीच सांगता येऊ शकत नाही. ते तिथे गेल्यावरच कळेल. कदाचित हेही शक्य आहे की, सायकल कदाचित मिळणार नाही किंवा खूप जास्त रेट असेल, कारण सर्व दुकाने बंद असतात. सायकल नाही मिळाली तर लेहच्या आसपास पायी पायी‌फिरता येईल. किंवा जर त्सोमोरिरीला गाडी जात असेल, तर तिथेही जाता येऊ शकेल. पण रस्ता कधीही काही दिवसांसाठी बंद होऊ शकतो. त्यामुळे सर्व काही त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.

पण जे काही असेल, हा एक अविस्मरणीय अनुभव नक्कीच असेल. . . .

माझ्या पूर्वीच्या मोहीमांबद्दल इथे वाचता येईल- www.niranjan-vichar.blogspot.in

प्रतिक्रिया

साहसी मोहिमेला शुभेच्छा..

इथे अपडेट देत रहा..!!

वा! तुमच्या मोहिमेला मनःपूर्वक शुभेच्छा!

भ ट क्या खे ड वा ला's picture

3 Jan 2018 - 7:20 am | भ ट क्या खे ड वा ला

शुभेच्छा, फोटो व वर्णन येउद्या झकास

पाटीलभाऊ's picture

3 Jan 2018 - 10:04 am | पाटीलभाऊ

तुमच्या या आव्हानात्मक मोहिमेला खुप साऱ्या शुभेच्छा..!
नंतर आपले अनुभव आणि फोटो नक्की टाका.

मार्गी's picture

3 Jan 2018 - 10:16 am | मार्गी

शुभेच्छांबद्दल धन्यवाद!! इथे नंतर अपडेट देईनच आणि नंतर सविस्तर फोटोसह लिहेनच. :)

कंजूस's picture

4 Jan 2018 - 8:17 am | कंजूस

मजा आहे.

झेन's picture

4 Jan 2018 - 10:45 am | झेन

तुमच्या जिद्दीला आणि सातत्याला सलाम

सिरुसेरि's picture

5 Jan 2018 - 2:25 pm | सिरुसेरि

खुप शुभेच्छा

मार्गी's picture

5 Jan 2018 - 3:11 pm | मार्गी

शुभेच्छांबद्दल सर्वांना अनेकानेक धन्यवाद!!!

दुर्गविहारी's picture

5 Jan 2018 - 7:14 pm | दुर्गविहारी

आत्तापर्यंतचे सायकलिंगचे धागे वाचले आहेत, त्यावरुन तुम्ही हि मोहिमही फत्ते करुन याल याची खात्री वाटते. नक्कीच खडतर आव्हान आहे पण यशस्वी व्हालच. तुम्हाला शुभेच्छा.

मार्गी सर,

हिवाळ्यात लदाख मध्ये सायकल वर मार्गस्थ होण्यासाठी शुभेच्छा.

बर्फात सायकलिंग करणार असाल तर सायकलचे टायर तपासून घ्या. झिजलेले, गोटा झालेले टायर नको (खरेतर विंटर टायरच हवेत). आणि रस्त्यावरचे आईस पॅचेस, ब्लॅक आईस पासून सावध.

सायकल चालवताना विंड चिल फॅक्टर लक्षात घ्या. जर -२० ते -२५C तापमान असेल तर विंड चिल मुळे तापमान आणखी १०C खाली गेल्यासारखे (-३५C) वाटू शकते. या तापमानात केवळ काही मिनिटात फ्रॉस्ट बाईट होऊ शकतो. हात पायाची बोटे, नाक, कान जपा.

टवाळ कार्टा's picture

6 Jan 2018 - 2:45 am | टवाळ कार्टा

गरेट _/\_

मार्गी's picture

6 Jan 2018 - 11:12 am | मार्गी

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

@ दुर्गविहारी जी, खूप खूप आभार!! आणखी प्रेरणा मिळाली!

@ चामुंडराय सर, धन्यवाद! अगदी खरं आहे; त्या दृष्टीने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करतोय. त्या स्थितीचा अंदाज आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jan 2018 - 8:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या सगळ्या सफरी भारी असतात... आणि त्यातही ही सफर तर जगावेगळी आणि धाडसी आहे ! ती यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी अनेक शुभेच्छा !!

तुमच्या सचित्र प्रवासवर्णनाची प्रतिक्षा आहे.

मार्गी's picture

8 Jan 2018 - 12:00 pm | मार्गी

खूप खूप धन्यवाद सर!! अजून उत्साह येतोय आपल्या सर्वांच्या शुभेच्छा बघून!

सर्वांना नमस्कार. परवा माझ्या सासऱ्यांना पॅरालिसिस स्ट्रोक आल्यामुळे हॉस्पिटलला अॅडमिट करावं लागलं. आता ते रिकव्हर होत आहेत. पण ह्या परिस्थितीमुळे मला माझा लदाख़ टूअर कँसल करावा लागला. आपल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद. टूअर कँसल करावा लागला असला तरी ह्या प्रक्रियेमध्ये खूप शिकायला मिळालं. पुढच्या सायकल मोहीमेत त्याचा उपयोग होईल. नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या भ्रमंती व ट्रेकिंगबद्दलची लेखमाला घेऊन लवकरच येईन. खूप खूप धन्यवाद.

काळजी घ्या. हि ट्रिप तर नक्की कारालाच पुढे कधीतरी. तेव्हा वाचूच.
उत्तराखंड च्या लेखमालेच्या प्रतीक्षेत.
शुभेच्छा.