नावातली गंमत

गबाळ्या's picture
गबाळ्या in काथ्याकूट
11 Dec 2017 - 1:29 pm
गाभा: 

मिपावर मी अनेक वेगवेगळी सदस्यनामं पहिली आहेत. काही गंमतशीर, काही गूढ तर काही अतिशय बोलकी. अशी नावं, त्यांचे मतितार्थ, ते निवडण्यामागचे प्रयोजन जाणून घ्यायला सर्वांनाच खूप आवडेल म्हणून ही चर्चा. चला तर जाणून घेऊ या एकमेकांच्या सदस्यनामाबद्दल.

मी मूळचा खेड्यातला. त्यामुळे राहण्या, वागण्या, बोलण्या, लिहण्यामध्ये एकंदरीतच गबाळेपणा (बऱ्याच जणांच्या लेखी खेड्यातील लोक गबाळे असतात). सफाईदार पणा नाही कि तो असल्याचा आव नाही. एकदम रोखठोक. खेड्यातला येरा गबाळा म्हणून मी "गबाळ्या" हे नाव घेतले.

तुमच्या सदस्यनामाची गोष्ट काय?

प्रतिक्रिया

खाली यादीत लिहिलेली सदस्यनामे कमालीची औत्सुक्यपूर्ण वाटतात. तुमच्या सदस्यनामाची कहाणी आम्हाला सांगू शकाल काय ?

अजब
अत्रन्गि पाउस
अनन्त्_यात्री
अनाहूत
अनिंद्य
अलबेला सजन
असंका
आगाऊ म्हादया......
आदूबाळ
आमि तिथे काय कमि
इरसाल
इरसाल कार्टं
ओम शतानन्द
कंजूस
कैलासवासी सोन्याबापु
खाबुडकांदा
खेडूत
गामा पैलवान
गुल्लू दादा
चामुंडराय
चित्रगुप्त
चुकलामाकला
जव्हेरगंज
ज्ञानोबाचे पैजार
टवाळ कार्टा
डायवर
धडपड्या
नर्मदेतला गोटा
नाखु
पगला गजोधर
पुंबा
पैसा
प्रचेतस
फुत्कार
बेसनलाडू
बोका-ए-आझम
भ ट क्या खे ड वा ला
भंकस बाबा
माम्लेदारचा पन्खा
मिसळलेला काव्यप्रेमी
मोदक
येडाफुफाटा
रंगीला रतन
विशुमित
विसोबा खेचर
शब्दबम्बाळ
समयांत
सुखीमाणूस
सूड

चित्रगुप्त's picture

12 Dec 2017 - 5:35 am | चित्रगुप्त

लेखाचा विषय आवडला. अनेकांना याबद्दल कुतूहल असेल, तरी प्रत्येकाने आपापल्या टोपणनावमागील प्रेरणा/कारण वगैरे अवश्य द्यावे.

खूप वर्षांपूर्वी चित्रगुप्त (तोच, पाप-पुण्याचा हिशेबनवीस) पृथ्वीवरील मानवांना (अर्थातच मराठी वाचकांना) उद्देशून एक पत्र लिहीतो आहे, अशी कल्पना करून एक लेख लिहीला होता, तो कोणत्यातरी दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता. पुढे काही काळानंतर त्यात आणखी थोडी भर टाकून मिपावर "पुण्यपत्तनस्थ विद्वज्जनहो, ऐका अध्यात्माच्या कहाणीचा ब्रम्हघोटाळा ..." या नावाने लिहीला.
अशी आहे 'चित्रगुप्त' या नावाची कथा. मी चित्रकार असल्याने अनायासे या टोपणनावातही 'चित्र' आले आहे, हे बघून हेच नाव चालवत आलो.
माझ्या शिरस्त्याप्रमाणे मी या प्रतिसादातही काही दोन चित्रे टाकतो आहे
.
(चित्रकारः Camille Pissarro)

.
(चित्रकारः Pierre-Albert Marquet)

.
(चित्रकारः Ferdinand Knab)

गबाळ्या's picture

12 Dec 2017 - 6:45 am | गबाळ्या

खरे नाव 'गुप्त' ठेवून खरेखुरे 'चित्र' डोळ्यासमोर ठेवणारा 'चित्रगुप्त'. भन्नाट !

समयांत's picture

12 Dec 2017 - 10:37 pm | समयांत

खूपच सुंदर प्रतिसाद आणि चित्रसुद्धा ...

डिस्कोपोन्या's picture

18 Dec 2017 - 12:50 pm | डिस्कोपोन्या

मी डिस्कोपोन्या

:)

गबाळ्या's picture

19 Dec 2017 - 3:51 am | गबाळ्या

डिस्कोपोन्या, यादी ही फक्त प्रतीकात्मक आहे. सर्वांचे स्वागत आहे. सांगा आम्हाला तुमच्या बद्दल.

मजा काही जुण्या नावात सुद्धा होती
विक्षीप्त आदिती
निराकार गाढव
पिवळा डांबीस
छोटा डॉन
सर्वव्यापी प्राजु

ह्यो गबाळ्या चांगलाच तयारीचा वाटतो ब्वा.

गबाळ्या's picture

11 Dec 2017 - 11:34 pm | गबाळ्या

ती नावे सुद्धा रोचक वाटतात. मी फक्त मागील काही दिवसात माझ्या नजरेत आलेली नवे नमूद केली आहेत. हा खुला मंच आहे त्यामुळे सर्वांनाच आपल्या नावाची महती सांगण्याचा अधिकार आहे. मग ती वरच्या यादी मध्ये असोत वास नसोत.

@ईश्वरदास, तुमच्या नावामागची ची काय संकल्पना आहे ?

पिवळा डांबिस's picture

12 Dec 2017 - 11:12 pm | पिवळा डांबिस

आमचं इथलं मिपावरचं प्रोफाईल वाचलंत तर लक्षात येईल!!! :)
-पिवळा डांबिस
मिपा बिल्ला नं. ४०१

टवाळ कार्टा's picture

13 Dec 2017 - 12:14 am | टवाळ कार्टा

आयला तुम्ही येता अजून....धागाकर्ता जूना मित्र आहे काय? ;)

पिवळा डांबिस's picture

14 Dec 2017 - 3:04 am | पिवळा डांबिस

आहे, आहे अजून! :)
आय्डी अपरिचित आहे, पण त्यामागचा धागाकर्ता परिचित असू शकतो, मिपाचा काय भरवंसा? :)

टवाळ कार्टा's picture

14 Dec 2017 - 10:26 am | टवाळ कार्टा

तुमच्या प्रोफाईलमध्ये ल्हिलेली म्हाईती बघ्ता तुम्ही कायमच इथे अस्णार असे वाट्टे ;)

पिवळा डांबिस's picture

16 Dec 2017 - 2:55 am | पिवळा डांबिस

बरोब्बर!!
:)

गबाळ्या's picture

14 Dec 2017 - 12:24 pm | गबाळ्या

आपली ओळख नाही हो. मी मिपा चा नवीन सदस्य आहे आणि कोणालाच ओळखत नाही. म्हणून तर जाणून घेण्याचा हा प्रपंच.

पिवळा डांबिस's picture

16 Dec 2017 - 2:54 am | पिवळा डांबिस

देन नाईस टु मीट यू!
मिपावर स्वागत आहे तुमचं.
:)

गबाळ्या's picture

13 Dec 2017 - 11:10 am | गबाळ्या

लैच भारी लिहिलंय तुमच्या प्रोफाईलमध्ये. खूप आवडलं !

सुखीमाणूस's picture

11 Dec 2017 - 11:51 pm | सुखीमाणूस

तस नाव घेतल आहे.
स्त्री सुद्धा माणुस असते हे चांगले जाणणारा आणि तसेच वागणारा नवरा आहे माझा
म्हणुन मी सुखीमाणुस

गबाळ्याजी सगळयांना बोलत करायचा चांगला घाट घातलाय

गबाळ्या's picture

12 Dec 2017 - 12:19 am | गबाळ्या

तुम्हाला सुखी आयुष्याची शिदोरी मिळाली आणि तुमच्या मनाची जाण असणारा नवरा मिळाला याबद्दल अभिनंदन !
असेच सुखी राहा !

गबाळ्याजी सगळयांना बोलत करायचा चांगला घाट घातलाय

अहो, कोण कुठले आपण मिपा सारख्या निमित्त्तने एकत्र येतो. गप्पागोष्टी, वाद-संवाद करतो. तेही एकमेकांबद्दल काहीच माहिती नसताना. या निमित्ताने तरी कट्ट्यावरच्या एकमेकांबदल थोडेफार जाणून घेता येईल. आणि कट्टा आणिखीनच खुलेल म्हणून हा प्रयत्न.

समाधान राऊत's picture

12 Dec 2017 - 2:08 am | समाधान राऊत

चावडीवर बसल्याचा फील आला
पानसुपारी खात शेजार्याल्या पावणं कंच्या गावच्या म्हणायचं विचारल्यासारखं

कट्टा काय आन चावडी काय, गप्पा रंगतातच. सांगा की तुमच्याबद्दल, आमाला बी समाधान वाटंल!

बाबाहर्षल's picture

12 Dec 2017 - 8:17 am | बाबाहर्षल
बाबाहर्षल's picture

12 Dec 2017 - 8:17 am | बाबाहर्षल
बाबाहर्षल's picture

12 Dec 2017 - 8:17 am | बाबाहर्षल
रमेश आठवले's picture

12 Dec 2017 - 10:06 pm | रमेश आठवले

A rose by any other name would smell as sweet" is a popular reference to William Shakespeare's play Romeo and Juliet, in which Juliet seems to argue that it does not matter that Romeo is from her family's rival house of Montague, that is, that he is named "Montague". The reference is often used to imply that the names of things do not affect what they really are.

समयांत's picture

12 Dec 2017 - 10:44 pm | समयांत

हे माहिती नव्हते. छानच!
धन्यवाद.

समयांत's picture

12 Dec 2017 - 10:50 pm | समयांत

समयांत असे नाव का घेतले, यामागे तशी काही गोष्ट नाही. पण इथे आल्या आल्या अनेकांनी हे काय नाव असे विचारले, तेव्हा काही तरी समजावून सांगितलं असं आठवत आहे. तर समय आणि अंत अशी संधी आहे ह्या नावा, समय म्हणजे काळ वेळ आणि त्याचा अंत. इंग्लिश मध्ये किलिंग ऑफ टाईम म्हणतात तसंही होऊ शकतं पण मला असं वाटतं की आपण सर्व या कालचक्रात अडकलो आहोत आणि या कालचक्राचा शेवट जर का आपण साध्य करू शकलो, आपल्या आवडत्या गोष्टी आणि छंदांमधून, भावनांच्या अभिव्यक्तीतून तर काय हरकत आहे, म्हणून हे 'समयांत'.

गबाळ्या's picture

13 Dec 2017 - 11:12 am | गबाळ्या

मस्त सदस्यनाम तयार केले आहे. अगदी विचारपूर्वक.

टवाळ कार्टा's picture

13 Dec 2017 - 4:07 pm | टवाळ कार्टा

मला वाटले एक समई तसे अनेक समया =))

चांदणे संदीप's picture

13 Dec 2017 - 12:13 am | चांदणे संदीप

बऱ्याच दिवसांनी मिपाकरांना एका चांगल्या अर्थाने 'कामाला' लावणारा किंवा बोलता करणारा धागा.
बऱ्याच आयडीनामांची जन्मकथा वाचण्यास उत्सुक.
खऱ्या नावाऐवजी एखादे दुसरेच नाव घ्यायला पाहिजे होते असे वाटायला लागलेय. (डुआयडीच करून टाकतो)

Sandy

संजय पाटिल's picture

13 Dec 2017 - 12:46 pm | संजय पाटिल

+१
असेच म्हणतो..
आणि तसेच करतो...

ते म्हणजे शरदिनी.....

त्यांच्या कविता अवचित वाचायला मिळाल्या.
काहीतरी गडबड आहे, असं वाटत आहे.
उत्सुकता फारच शिगेला पोहोचली आहे. कुणी उद्बोधन करेल काय?

कुमार१'s picture

13 Dec 2017 - 3:28 pm | कुमार१

माझे नाव साधे असल्याने मी इतरांची गंमत जाणून घेण्यास उत्सुक आहे

कुमार१'s picture

13 Dec 2017 - 3:54 pm | कुमार१

माझे नाव साधे असल्याने मी इतरांची गंमत जाणून घेण्यास उत्सुक आहे

रुपी's picture

14 Dec 2017 - 6:05 am | रुपी

हे घ्या..

त्या धाग्यात इतर काही मिपाकरांचीही ओळखपरेड आहे .. माझीही ;)

गबाळ्या's picture

15 Dec 2017 - 11:06 am | गबाळ्या

जुना धागा इथे जोडल्याबद्दल. बरीच माहिती मिळाली.

प्रचेतस's picture

13 Dec 2017 - 4:12 pm | प्रचेतस

'नाखु' ह्या आयडीमागची गंमत जाणून घेण्यात स्वारस्य आहे.

नाखु's picture

13 Dec 2017 - 4:24 pm | नाखु

उल्लेख केला आहे गोड माणून घेणे

खुलासा

अखिल मिपा खुलाश्यातील खलाशी नाखु वाचकांची पत्रेवाला

गबाळ्या's picture

15 Dec 2017 - 11:08 am | गबाळ्या

आपण बुआ फॅन झालो तुमचा !

चौथा कोनाडा's picture

13 Dec 2017 - 5:24 pm | चौथा कोनाडा

णिषेद !
आमचे नाव नसल्याबद्दल झ्याईर णिषेद !

चौथा कोनाडा's picture

15 Dec 2017 - 9:03 pm | चौथा कोनाडा

बबन ताम्बे साहेब, शेवटी बसवलेच ना तुम्ही आम्हाला कोनाड्यात ?
जरा कुटं कोनाड्यातून बाहेर यायला बगतोय की बसवतात लगेच कोनाड्यात !

गबाळ्याजी, काय सांगांयचं आमच्या नावामागचं दु:ख ?

गबाळ्या's picture

13 Dec 2017 - 8:54 pm | गबाळ्या

चौथा कोनाडा, माफी असावी.
तुमचे नाव माझ्या नजरेतुन सुटले असावे. हा धागा वरील यादीमधील नावांपुरताच मर्यादित नाही हे मी नमूद करतो. तुमचे नाव ही खूप रोचक आहे. कृपया त्याची कहाणी सांगा.

टवाळ कार्टा's picture

14 Dec 2017 - 10:28 am | टवाळ कार्टा

आधीचे ३ आल्यावर तुमचा नंबर येईल्च :)

चौथा कोनाडा's picture

26 Dec 2017 - 2:37 pm | चौथा कोनाडा

:-)))

आधीचे तीन येणार कधी ? :-)

गबाळ्या's picture

15 Dec 2017 - 11:12 am | गबाळ्या

एकदम कवितेवर आधारित नाव. छानंच !

अनन्त्_यात्री's picture

14 Dec 2017 - 10:42 am | अनन्त्_यात्री

प्रवासाच्या प्रत्येक
वाकणा-वळणावर
तुझ्या
भेटीचे भास

खात्री होती........
तू
गहन ग्रन्था॑तून गवसशील,
भोळ्या भक्तीतून भेटशील,
उपभोगाच्या उबगातून उमजशील,
कठोर कर्मकाण्डातून कळशील,
प्रखर प्रज्ञाचक्षू॑ना प्रतीत होशील,
प्रकाण्ड प्रमेया॑तून प्रकटशील....

तू मात्र..
श्रद्धेच्या सोनसाखळ्या सैलावून
तर्काच्या तटब॑द्या तटातट तोडून
... नि:शेष निसटलास

....मला
अपेक्षाभ॑गाच्या आघातात
व॑चनेच्या वावटळीत
भ्रमनिरासाच्या भोवऱ्यात
भोव॑डत भरकटत ठेवून........

पण आता
स्वतःला सावरून
आस्तिकता अव्हेरून
नास्तिकता नाकारून
निघालोय.....
अज्ञेयाच्या अनन्त यात्रेला

अनन्त अवधुत's picture

14 Dec 2017 - 10:47 pm | अनन्त अवधुत

आवडलं

सौन्दर्य's picture

15 Dec 2017 - 4:20 am | सौन्दर्य

खरंच खूप छान धागा काढलात आपण. अगदी लिहिण्यास उद्युक्त करणारा. मग आपण देखील काहीतरी टोपणनाव घेतले पाहिजे होते असे वाटू लागले. हो, सौंदर्य हेच माझे खरे नाव आहे व मी एक पुरुष आहे. 'पुरुष' असा मुद्दाम उल्लेख करण्यामागचे कारण म्हणजे बहुतेक मंडळी 'सौंदर्य' नाव ऐकल्याबरोबर हे एखाद्या स्त्रीचे नाव असेल असा समज करून घेतात. ह्या नावावरून खूप गमती-जमती घडल्यात, कधीतरी त्यावर लिहीन म्हणतो. माझे हे नाव माझ्या आईने ठेवले आहे आणि माझ्या इतर भावंडांची नावे वाचल्यावर तुम्हाला माझ्या आईच्या रसिकतेची कल्पना येईल. स्वरूपा, सुनेत्रा, सौन्दर्य, स्वाती, स्मृती व सौजन्य (हा सर्वात धाकटा भाऊ) ही आमची नावे. आहेत की नाही जरा हटके नावं ?

गबाळ्या's picture

15 Dec 2017 - 11:14 am | गबाळ्या

तुमची आई खूपच रसिक वाटते.

अनिंद्य's picture

15 Dec 2017 - 9:16 am | अनिंद्य

@ गबाळ्या,

लिष्टीत माझेही नाव ?

सांगतो, सांगतो -

अनिंद्य चा अर्थ - ज्याची निंदा होऊ शकत नाही असा जो तो (बहुव्रीही समास). मुळात अनिंद्य एक बंगाली / संस्कृत नाव आहे.

माबदौलत पृथ्वीतलावर अवतरण्याची वाट बघत मातृकुक्षीत असतांना मातोश्री प्रख्यात बंगाली लेखकांची ढिगाने पुस्तके वाचीत असत. त्यापैकी शंकरच्या एका पुस्तकातल्या नायकाचे नाव होते अनिंद्य.... झाले, आम्हाला जन्मतःच हे नाव मिळाले. तस्मात - अनिंद्य हे माझे फष्ट नेम आहे, तेच सदस्यनाम घेतले आहे :-)

- अनिंद्य

तुमच्या नावाच्या उगम समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

15 Dec 2017 - 9:06 pm | चौथा कोनाडा

सुंदर नाव ! पहिल्यांदाच ऐकलं / वाचलं !

बाकी बंगाली नावे सुंदर्च असतात ! एक सुरेख ठेवा आहे तो.

जागु's picture

15 Dec 2017 - 10:21 am | जागु

छान इंटरेस्टींग धागा.

चित्रगुप्तची व्याख्या मस्त आहे.

माझ माहेरच नाव जागृती आणि माझ्या बर्‍याच मैत्रीणी जागु म्हणून हाक मारतात म्हणून मी माझा आयडी जागु ठेवला.

गबाळ्या's picture

15 Dec 2017 - 11:17 am | गबाळ्या

चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि तुमच्या सदस्यनामाच्या माहिती बद्दल ही.

पगला गजोधर's picture

15 Dec 2017 - 12:26 pm | पगला गजोधर

मी पुण्यपत्तनस्थ असलो तरीही विद्वान नाही,
प्रत्येकवेळा मला, का ? कसं काय ? असे अनेक प्रश्न पडतात...
जगभर फिरलो आणि २ बुकं जास्त शिकलो तरीही, जगात आजूबाजूचे आजही खूप काही शिकवून जातात...
अजूनही मला माझ्यातल्या अज्ञानाची जाणीव सहज करून देतात.
लोकांनी 'उत्तर' असे म्हटले, की मला 'दक्षिण का नाही ?' हा प्रश्न विचारावासा वाटतो.... .. म्हणून मी 'पगला'...
आणि मध्यंतरी राजू श्रीवास्तव ने गजोधर हे गावंढळ काल्पनिक पात्र उभे केलेले, ते आवडले म्हणून 'गजोधर'

गबाळ्या's picture

16 Dec 2017 - 1:04 am | गबाळ्या

वाह वा ! तुम्ही स्वतःला जरी "पगला" म्हणवून घेत असला तरी तुम्ही खरे साधक वाटता. सत्य आणि माहितीच्या शोधात असलेले.

टर्मीनेटर's picture

15 Dec 2017 - 2:15 pm | टर्मीनेटर

मला हे नाव घ्यावेसे वाटण्याचे कारण असे कि, मी अनेक वर्षे मिपा चा वाचक होतो त्यामुळे अनेक जणांचे रोचक व हटके आयडी परिचयाचे होते. पण एकदा कुठल्या तरी धाग्यावर मला प्रतिसाद द्यावासा वाटला त्यासाठी सदस्यत्व घेणे भाग होते.फॉर्म भरत असताना नेमका त्यावेळी कुठल्यातरी चॅनल वर आर्नोल्ड श्वार्झनेगर चा "द टर्मिनेटर" हा चित्रपट सुरु होता.मग काय आधी लिहिलेले स्वतःचे नाव काढून घेतला मी 'टर्मीनेटर' हा आयडी.

गबाळ्या's picture

16 Dec 2017 - 1:05 am | गबाळ्या

"द टर्मिनेटर" भारी चित्रपट आहे.

मराठी कथालेखक's picture

15 Dec 2017 - 6:54 pm | मराठी कथालेखक

माझ्या आयडी बद्दल फारसे काही सांगण्यासारखे नाही.. साधा सरळच आहे.. मिपावर एक कथा प्रकाशित करण्याच्या हेतूने आलो होतो मग पुढेही लिहित राहिलो.

गबाळ्या's picture

16 Dec 2017 - 1:05 am | गबाळ्या

तुमच्या कथा नक्कीच वाचू.

गबाळ्या,

अस्मादिकांना काय नाव घ्यावं ते सुचेना. मग मनाला भावणार्‍या वैशिष्ट्यांची एक यादी बनवली. त्यानुसार सदस्यनाव कसं असावं याचे ठोकताळे बांधले.

१. नाव प्रसिद्ध असावे, पण सर्वतोमुखी नको. बाजीराव, शिवाजी, इत्यादि बाद.
२. नाव शक्यतो भारतीय असावे. आईन्स्टाईन, नील्स बोर, इत्यादिंना गौणप्राधान्य.
३. नावातून क्षात्रवृत्ती सूचित व्हावी. त्यामुळे सेनानी, क्रांतिकारक, खेळाडूंना प्राधान्य.
४. या नावाने आचरटपणा करण्यास शरम वाटू नये. त्यामुळे स्वातंत्र्यसेनानी (टिळक, सावरकर, इत्यादि) बाद. भारतीय शास्त्रज्ञही (सत्येंद्रनाथ बसु, जगदीशचंद्र बसु, चंद्रशेखर व्यंकट रामन, श्रीनिवास रामानुजन, इत्यादि) बाद.
५. नाव फार प्राचीन नको. शक्यतो अर्वाचीन असावे. कारण प्राचीन नावे खूपदा सर्वतोमुखी असतात.

या सर्व चाळण्यांतून शेवटी सेनानींची ३ नावे उरली. जर्मन विद्युच्चढाईचा (ब्लिट्झक्रीग) जनक हाईन्झ गुडेरियन, फ्रेंचांना (१९५४) आणि अमेरिकनांना (१९७६) व्हियेतनामात धूळ चारणारे जनरल ङ्गुयेन गियाप आणि राघोबादादा उपाख्य राघोभरारी.

राघोबादादा फार बदनाम आहेत. जनरल ङ्गुयेन गियाप यांची मराठीतली आद्याक्षरे गुंगी अशी काहीशी होतात. हाईन्झ गुडेरियनची आद्याक्षरे तर विचारायलाच नकोत!

मग क्रीडाक्षेत्राकडे काही मिळतंय का ते बघूया म्हंटलं. सुदैवाने पारंपारिक भारतीय मल्लविद्येचा मानकरी सापडला. तो आयुष्यात एकही लढत हरला नव्हता. इंग्लंडच्या दौर्‍यात अनेक नामवंत युरोपीय मल्लांना सहज धूळ चारली. जगप्रसिद्ध कुस्तीगीर होऊनही तो शेवटपर्यंत उतला नाही, मातला नाही, घेतला वसा टाकला नाही.

त्याचं नाव गामा पैलवान. अशी आहे अस्मादिकांच्या सदस्यनामनिवडीची चित्तरकथा!

ही कथा आगोदर मायबोलीवर प्रकाशित झाली आहे.

आ.न.,
-गा.पै.

गबाळ्या's picture

16 Dec 2017 - 2:31 am | गबाळ्या

वाह! गामा पैलवानजी वाह !
मिपाकर नाव निवडताना इतका विचार करून नाव निवडतात हे आमच्या समोर आणून दिल्याबद्दल धन्यवाद !!!
हि कथा तुम्ही आम्हाला सांगितली नसती तर कधीच कळाली नसती.
तुमची निवड मस्त आणि प्रेरणादायी आहे.

चौथा कोनाडा's picture

27 Dec 2017 - 2:33 pm | चौथा कोनाडा

भारी आहे स्टोरी, तुमच्या नावा मागची !
अन नाव हटके, युनिक आहे, आवडलं हे सांगायला नकोच !

चामुंडराय's picture

18 Dec 2017 - 7:04 am | चामुंडराय

गबाळ्या साहेब,

आमच्या नावाचे जाऊ दे पण तुम्ही तुमचे नाव सार्थ केले बर्का.
स्वतःला खेड्यातला येरा गबाळा म्हणवताय पण अंतरी नाना कळा - इतरांना छान लिहायला लावलेत.

माझ्या नावाचे म्हणाल तर माझ्या माहितीप्रमाणे मराठीतील पहिला शिलालेख चामुंडरायाने लिहिला म्हणून त्यापासून प्रेर्ना घेऊन आंजावर पांढऱ्यावर काळे करण्यासाठी तेच सदस्य नाम घेतले.

पगला गजोधर's picture

18 Dec 2017 - 7:13 am | पगला गजोधर

मराठीतील पहिला शिलालेख चामुंडरायाने लिहिला

माफ करा, पहिला "लिहिला", हे सयुक्तिक वाटत नाही,
तर आतापर्यंत "आढळलेल्या" पुराव्यात, हा शिलालेख सर्वात जुना. त्याही पेक्षा जुना शिलालेख जर उद्या पुरातत्व विभागाला सापडला, तर सदर उल्लेखलेला शिलालेख सेकंड लास्ट जुना होईल....
तुमच्या माहिती साठी, बहुतेक कर्नाटकातच कुठेतरी,एका मंदिराच्या भिंतीवर मराठी वाक्य आहे त्यापेक्षाही जुने. .
पण मला खात्री नाही, कोणी जाणकारच सांगु शकतील.

गबाळ्या's picture

19 Dec 2017 - 3:49 am | गबाळ्या

चामुंडराय, आपला आभारी आहे.

चामुंडराय's picture

19 Dec 2017 - 12:25 am | चामुंडराय

पग साहेब,

मी देखील या बद्दल मिपावरच वाचल्याचे स्मरते परंतु ती माहिती किती खरी आहे या बद्दल साशंकता आहे म्हणूनच माझ्या माहितीप्रमाणे असा उल्लेख केला आहे =)

ओरायन's picture

19 Dec 2017 - 11:18 pm | ओरायन

वा चांगलाच धागा आहे, आयडी जन्मकथांसाठी..
लहानपणी , आम्हीं मुले, वडील, भाऊ किंवा अन्य नातेवाईक उन्हाळ्याच्या दिवसात, राञी उकाड्यामुळे गच्ची वा टेरेसवरी झोपत असु. डोळ्यांसमोर विस्तीर्ण आकाश ..व त्यातील अगणित तारे..मग कोणी जाणकार ग्रह,तारे, नक्षञ..यांची नावे सांगत.कशी ओळखायची ते सांगत..मृग नक्षत्र.ओळखू यायला लागले.व गंमत ,कुतूहल वाटु लागले.ज्या मृग नक्षत्राने मला प्रधमच ओळख करून दिली..त्याची मोहिनीै अजुनपण तेवढ्याच प्रमाणात आहे..जसे इंग्रजीतील अल्फाबेटस् मधील ऐ प्रधम, तसेच आकाश न्याहाळतांना, ओरायन किंवा मृग नक्षत्र प्रथमच...म्हणून माझा आयडी तोच.

गबाळ्या's picture

23 Dec 2017 - 1:36 am | गबाळ्या

ओरायन, खूपच सुंदर!
लहानपणीचे खेड्यातले माळवदावर झोपण्याचे दिवस आठवले.

शब्दानुज's picture

20 Dec 2017 - 3:35 pm | शब्दानुज

आमची कथा

मी लहान असताना (अजुनही लहानच आहे.. लहान म्हणजे खुप लहान ) आम्हाला प्रसिद्ध लेखक आणि त्यांची टोपणनावे पाठ करावी लागायची.

त्यात कुठले तरी बापु होते. (बघा आमचे पाठांतर ) मग शाळेत आम्ही आमचे नाव कुबड्याबापु असे ठेवले आणि काहीबाही लिहित गेलो.

पण मग कॉलेज करत असताना असले नाव ठेवले असते तर 'इंप्रेशन' कसे पडणार म्हणून नाव बदलायचे ठरवले.

(अर्थात अभियांत्रिकीच्या गदारोळात असाइनमेंटचे लिखाण देणाराच प्रसिद्ध होत असे आणि आमचे टोपणनाव जाणून घेण्यासाठी अजुनपर्यंत कुणीच आले नाही..हाय रे कर्मा..)

शाळेत खुपसे अनुज आणि अग्रज होते. मग तेच लावू असे ठरले. पण यात मेख अशी की मी एकूलता एक. त्यामुळे अग्रज वा अनुजच्या शक्यता नव्हत्या.

शेवटी शब्दांनाच आपले भाऊ मानले आणि आम्ही झालो शब्दानुज..

मिसळपाववर तेच नाव वापरत आहे

आणि पुढे.. पुढे काही नाही. एवढचं..!

गबाळ्या's picture

23 Dec 2017 - 1:37 am | गबाळ्या

शब्द खरोखरच तुमचे भाऊ आहेत असे वाटायला लागले.

गावठी फिलॉसॉफर's picture

20 Dec 2017 - 3:47 pm | गावठी फिलॉसॉफर

गावात कोणालाही फुकटचे सल्ले देत फिरणारा आणि नवीन फिलॉसॉफी मांडणारा.... गावठी फिलॉसॉफर

गबाळ्या's picture

23 Dec 2017 - 1:38 am | गबाळ्या

आमच्या गावातल्या काही लोकांची आठवण आली.

वकील साहेब's picture

25 Dec 2017 - 5:25 pm | वकील साहेब

व्यवसाय, पेशा अथवा चरितार्थाचा एकमेव उद्योग वकिली हाच आहे.
कधीही कुठेही गेलो की नावाने कुणी हाक मारल्यावर मागे वळून पाहण्याच्या शक्यते पेक्षा कुणी वकील साहेब म्हणून हाक मारली तर अस्मादिकांनी मागे वळून पाहण्याची शक्यता अधिक.
पेशा मुळे हे नाव शरीरालाच चिकटले म्हणायचे म्हणून आम्ही
वकील साहेब

मिपाकरांची नावे वाचताना असे लक्षात आले की यातली बरीच नावे ही अनावश्यक आणि आचरट आहेत. त्यातून कुणाला काही बोध होण्याची तीळमात्र शक्यता नाही. मी इंटरनेटवर सतत नवीन काहीतरी शोधून वाचन असतो .हे वाचता वाचता वरील नावाचे एक संकेतस्थळ पाहण्यात आले. ते बनवणार्‍यांनी खरच मेहनत घेऊन हजारो पुस्तके त्याच्यावर उपलब्ध केलेली आहेत, असे लक्षात आले. त्यामुळे असे ठरवले की हेच नाव घ्यावे ,त्यानिमित्ताने कोणालातरी उत्कंठा उत्पन्न होऊन ,जाऊन दे संकेतस्थळ तरी पाहतील आणि फायदा होईल त्यांचा.
खरच एकदा सर्वांनी जाऊन ते संकेतस्थळ पहावेच. दरम्यान लोकांनी मलाच या संकेतस्थळाचा कर्ता म्हणून टाकले ! असे ना हरकत नाही !

माहितगार's picture

27 Dec 2017 - 3:10 pm | माहितगार

शीर्षक आणि वस्तुस्थितीत फरक असतो कधी कधी ;) हार्ड अँड फास्ट नाही पण दिस्क्लेमर आधीच प्रोफाईल पानावर टाकले की दिशाभूळ होणे टळते. असो.

पुंबा's picture

29 Dec 2017 - 2:54 pm | पुंबा

तसं माझं आधीचं नाव 'सौरा' होतं, पण सौंदर्य सारखीच कुचंबणा माझी पण झाली, सगळ्यांना तो मुलीचा आयडी वाटलेला. म्हणून मग बदलून पुंबा घेतलं.
पुंबा हे माझे सर्वात आवडते कॅरेक्टर आहे. तसा लायन किंग हा चित्रपटच मला महत्प्रिय आहे पण यातले टिमॉन अँड पुंबाची जोडी अफाट आवडते. शक्तिशाली पण अतिशय निरागस असणारा, कुणाच्याही मदतीला धावून जाणारा, स्वार्थी अश्या टिमॉनच्या मैत्रीचे मोल जाणणारा, 'हाकुना मटाटा' असा मंत्र जगणारा करूणामयी पुंबा. मला आवडतो आणि म्हणून तेच सदस्यनाम घेतलं.

नाखु's picture

29 Dec 2017 - 10:59 pm | नाखु

मी ही कुठली तरी आद्याक्षरे असावी असे समजत होतो

नित्यानंद नाखु

गामा पैलवान's picture

30 Dec 2017 - 2:58 pm | गामा पैलवान

मलाही ते पुंडलिक बारटक्के वाटलेलं. नर्मदाबाईंचे बंधू असावेतसा अंदाज होता.
-गा.पै.