प्रातःस्मरण

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
8 Dec 2017 - 7:53 am

प्रात:स्मरणम्

पूर्वी सकाळी उठल्यावर प्रथम पुढील श्लोक म्हणावयाची सवय होती

समुद्रवसने देवी पर्वत:स्तनमंडळे !
विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पाद: स्पर्शं क्षमस्व मे !!

आता सकाळी उठल्यावर सोडाच पण दिवसाभरात सुद्धा भूमीला पादस्पर्श होत नाही.तेव्हा हा श्लोक संपला.

सकाळी उठोनी देवाला भजावे !
गुरूला नमावे प्रेमभावे !!

हे काही प्रात:स्मरण नव्हे व ही कविता आम्हाला नव्हती. लक्षात कशी राहिली देव जाणे. तेव्हा तीही नाही. पुढे संस्कृत वाचावयास सुरवात्र केली आणि विष्णु, श्रीराम, शिव, सूर्य इत्या॒दि अनेक देवांची प्रात:स्मरणे वाचनात आली. पण
श्रीमत शंकराचार्यांचे पुढील परब्रह्माचे प्रात:स्मरणस्तोत्र म्हणावयाची सवय लागली.
गेली कित्येक वर्षे मी सकाळी हे प्रात:स्मरण म्हणतो एक म्हणजे कोणा एका देवाचे स्मरण / पूजा यात नाही व दोन म्हणजे फलश्रुति म्हणून कोणतेही ऐहिक आमिष यात दाखविलेले नाही.
"आठ ब्राह्मणांना ह्या दहा ओळी खरडून द्या म्हणजे गणेशाच्या प्रसादाने तुम्हाला सर्व विद्या मिळतील " असली तद्दन खुळचट फलश्रुति या प्रातस्मरणात नाही. " कुठलीच फलश्रुति कधीच म्हणू नये " हे माझे मत पण इथे काय म्हटले आहे ते पाहून तुम्ही तुमचे मत बनवू शकता.

चला तर या तीन श्लोकात काय म्हटले आहे ते आता बघू. श्रीमत् शंकराचार्यांना आपले अद्वैत मत सांगावयाचे असणार हे उघडच ." ब्रह्म सत्य जगन्मिथ्या .. " या एका ओळीचा विस्तार बारा ओळीत करतात कीं दुसरे काही मांडतात एवढेच येथे पाहू.
.

प्रात: स्मरामि हृदि संस्फ़ुरदात्मतत्त्वं
सत्चित्सुखं परमहंसगतिं तुरियम् !
यत्स्वप्नजागरसुषुप्तिमवैति नित्यं
तद्ब्रह्म निष्कलमहं च च भूतसंघ: १! १ !!

आत्मा हृदयात वास करतो असे उपनिषदात अनेक ठिकाणी म्हटले आहे; अपवाद फक्त तैत्तिरीय उपनिषदाचा. तेथे आत्मा मेंदून असतो असे म्हटले आहे. तर सुरवातीला हृदयात स्फुरण करणार्‍या आत्मतत्वाचे स्मरण केले आहे. सत्, चित्, आणि आनंद ही आत्म्याची तीन वाचक लक्षणे. सत् म्हणजे सत्ता, सर्वत्र, सदा काळ असणे; चित् म्हणजे जाणिव किंवा ज्ञान. जाणिव नसेल तर नुसत्या "असण्याला" अर्थच राहणार नाही .सुख हा शब्द इथे वापरला असला तरी सुख म्हणजे आनंद नव्हे. कुठल्यातरी अवयवाचे तर्पण किंवा दुखा:चा निरास म्हणजे सुख. आनंद हा दुसर्‍या कशावर तरी अवलंबून नसतो. हंस किंवा परमहंस म्हणजे अंतर्बाह्य विरक्त सन्यासी. तर अशा सन्याशाचे परमधाम म्हणजे त्याची गति म्हणजेच ब्रह्म. जागृति, स्वप्न, सुषुप्ति व तुर्या या मनाच्या चार अवस्था. माणुस जागा असतो तेव्हा तो इंद्रियानी उपभोग घेत असतो. झोपेत त्याला स्वप्न पडतात तेव्हाही ही क्रिया चालूच असते. प्रश्नोपनिषदात निद्राचिकित्सा केली आहे. पहिल्या दोन अवस्थेत आत्मा /जीव अनुभव घेत असतो. गाढ निद्रेत , जेव्हा स्वप्नही पडत नसतात तेव्हा, तिला म्हणावयाचे सुषुप्ति. तेव्हा आत्मा ब्रह्माची भेट घेत्र असतो. या तीन अवस्थांपलिकडील चवथी अवस्था म्हणजे तुरिया/तुर्य. येथे स्वरूपाची ओळख पटून ’अहं ब्रह्मास्मि " याची जाणिव होते. तर या सर्वांचे ज्ञान असलेले, त्या पलिकडाचे जे ब्रह्म, ते मी आहे.
मनाच्या या चार अवस्थांना उपनिषदांमध्ये महत्व दिलेले दिसते. मांडुक्य उपनिषदात प्रणवाच्या चार मात्रा म्हणजे या चार अवस्था मानल्या आह्त.
(१) अ ...जागृति आत्म्याच्या या अवस्थेत आत्म्याला बाह्य स्थूल वस्तूंचे ज्ञान असते.
(२) उ ,,,, स्वप्न " " " " सूक्ष्म " " "
(३) म ... सुषुप्ति आत्म्याला निद्रावस्थेत्र कोणतीच इच्छा होत नाही. इथे आत्मा स्वकेंद्रस्थ, विज्ञानघन, आनंदमय असून केवळ आनंदाचा उपभोग घेत असतो.
(४) तुरिया स्वसंवेद्यता या अवस्थेत आत्म्यास अंत:सृष्टी वा बहि:सृष्टीचेही ज्ञान होत नाही.
अशी मांडणी केली आहे.
निष्कल म्हणजे उपाधीरहित किंवा ज्याचा र्‍हास होत नाही असा. ब्रह्म वा आत्मा यांस हे बिशेषण नेहमी लावले जाते.
पंचमहाभूतांपासून बनलेले हे शरीर, .भूतसंघ, म्हणजे मी नव्हे. "मी" म्हणजे "शरीर" नाही हे परत परत अधोरेखित केले जाते

प्रातर्भजामि मनसा वचसामगम्यं
वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेण !
यन्नेतिनेतिवचनैर्निगमा अवोच
स्तं देवदेवमजमच्युतमाहुरग्र्यम् !! २ !!

दुसर्‍या श्लोकाची सुरवात तैत्तिरीय उपनिषदातील " यतो वाचो निवर्तंते अप्राप्य मनसा सह " याची आठवण करून देते. वाणीने किंवा मनाने ब्रह्माचा शोध लागणे शक्य नाही. त्या साठी श्रद्धा व गुरूकृपा हाच मार्ग आहे असे उपनिषदांचे ठाम मत आहे. त्यामुळे वाणीला किंवा मनाला ते अगम्य आहे हे सांगितल्यावर आचार्य म्हणतात या सर्व वाचा त्याव्या कृपेनेच प्रकाशित होतात. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाचा. प्रणव या मूलध्वनीपासून त्या निर्माण झाल्या. .त्यांची अनुक्रमे नाभी, हृदय, कंठ व मुख ही शरीरांतर्गत स्थाने होत. त्यांची लक्षणे निरनिराळी सांगितली आहेत; सोडून द्या. वाचा जरी आत्म्याची ओळख करून देण्यास असमर्थ असली तरी व जरी माऊलीने परादिका वाचा अविद्यात्मक आहेत असे म्हटले असले तरी त्यांचे ऋण मोठे आहे. अनुभवामृतात त्याचे फार सुरेख वर्णन वाचावयास मिळते.
शब्द आत्म्याचे वर्णन करावयास असमर्थ असल्याने वेदांनी त्याचे वर्णन नकारात्मक केले आहे. "त्याला जन्म नाही", "मरण नाही"....., अशा निरुपणास म्हणतात ":नेति नेति "
ज्या देवदेवेश्वर, अजन्मा, अच्युताला आदि पुरुष म्हणातात त्याचे मी प्रात:काळी भजन करतो.

प्रातर्नमामि तमस: परमर्कवर्णं
पूर्णं सनातनपदं प्रुरुषोत्तमाख्यम् !
यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्तौ
रज्ज्वां भुजंगं इव प्रतिभासितं वै !! ३ !!

" ब्रह्म सत्य व जग मिथ्या " हे सांगतांना एक उदाहरण दिले जाते ते "सर्प-रज्जु" याचे. अंधारात एक दोरी पडली आहे, आपल्याला भास होतो की हा सर्प तर नव्हे ? दिवा आणून पहिल्यावर सत्य कळते की " ही तर दोरी."
सूर्याचे किरण ज्या प्रमाणे अंधाराचा नाश करतात, त्या प्रमाणे अज्ञानाचा नाश करंणार्‍या. सर्वस्वरूप परमेश्वराने हा समस्त संसार दोरी-सर्प असा भासमय केला आहे त्या अज्ञानातित, दिव्यतेजोमय, पूर्ण, सनातन परमेश्वराला मी सकाळी वंदन करतो.

श्लोकत्रयमिदं पुण्यं लोकत्रयविभुषणम् !
प्रात:काले पठेद्यस्तु स गच्छेत्परमं पदम् !! ४ !!

या प्रात:स्मरणाची फलश्रुति परमपदाची प्राप्ति दिली आहे. बाकी या संसाराला असार म्हणाणारे ऐहिक लालुच काय दाखविणार म्हणा !

शरद

धर्ममाहिती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

8 Dec 2017 - 8:47 am | प्रचेतस

सुरेख

यशोधरा's picture

8 Dec 2017 - 11:52 am | यशोधरा

सुरेख!
हे श्लोक म्हणायला हवेत. धन्यवाद!

पद्मावति's picture

8 Dec 2017 - 12:24 pm | पद्मावति

सुरेख!

सिरुसेरि's picture

8 Dec 2017 - 1:28 pm | सिरुसेरि

सुरेख माहिती

ज्योति अळवणी's picture

8 Dec 2017 - 10:14 pm | ज्योति अळवणी

छान माहिती

babu b's picture

8 Dec 2017 - 10:33 pm | babu b

छान.