रुद्रम

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
18 Nov 2017 - 3:13 am

श्वेतांबरा ही मराठीतली पहिली सिरियल आठवते. ती बघताना त्यांत अनेक त्रुटी असूनही ती उत्सुकतेने शेवटपर्यंत बघितली. फक्त, त्याचा शेवट झाल्यावर, शेवटच्या भागात जो,'अहो रुपम अहो ध्वनिम' चा कार्यक्रम झाला तो हास्यास्पद होता. पुढे फक्त दूरदर्शनची सद्दी होती तोपर्यंत अनेक चांगल्या-बर्‍या मालिका बघितल्या. नंतर प्रायव्हेट चॅनेल आले आणि काही बर्‍यापैकी सिरियल बघायला मिळाल्या. शेवटची सिरियल बघितल्याची आठवते ती 'या गोजिरवाण्या घरांत'! पण ती फारच पाणी घालून वाढवायला लागल्यावर बघणे बंद केले. त्यानंतर कुठलीही मराठी किंवा हिंदी सिरियल बघायची नाही हे ठरवून टाकले. तो नियम अगदी यावर्षीपर्यंत कटाक्षाने पाळला. पण यावर्षी, रुद्रम नांवाची सिरियल चालू होणार आहे आणि ती बरीच वेगळी आहे असे कानावर आल्याने, काही भाग बघायचे ठरवले. काही भागच अशासाठी की, त्या आधी नुकतीच, 'चूकभूल द्यावी घ्यावी' चे एक-दोन भाग बघण्याची चूक आणि भूलही केली होती! तेंव्हा रुद्रम चांगली असली तरच बघायची, नाहीतर चूभू झाली असं समजायचं, असं मनाशी ठरवलं होतं.

रुद्रम सुरु झाली आणि पहिल्या भागापासूनच त्याने पकड घेतली. या टीमने बाकी मालिकांसारखे प्रेक्षकांना निर्बुद्ध समजण्याची चूभू केली नव्हती हे पुढच्या प्रत्येक भागांत लक्षांत आलं. गोष्ट वेगाने पुढे सरकत होती. मुक्ताचे काम तिच्या नेहमीच्या शैलीनेच चालले होते, त्यांत काही विशेष वाटत नव्हते. किंबहुना, अनेक प्रसंगात वंदना गुप्तेचं काम तिच्यापेक्षा सरस वाटत होतं. शेवटच्या काही भागांमधे मात्र, मुक्ताला फुल स्कोप मिळाला आणि तिने त्याचे चीजही केले. त्याशिवाय अनेक नवे व जुने कलाकार आपापल्या भूमिका चोख वठवत होते. भीमराव मुडे प्रत्येक भाग अत्यंत उत्कंटावर्धक स्थितीला आणून ठेवत होते. थोडक्यांत, मालिकेची चटक लागली होती. एखादा भाग बुडलाच तर, लगेच नेटवर जाऊन तो बघावासा वाटत होता. कित्येक मालिकांमधे, सगळं काही इतकं स्लो मोशन मधे चाललेलं असतं की, एखादा भाग बुडला तरी फारसा फरक पडत नाही. पण रुद्रम चं तसं नव्हतं. खुनाखुनी भरपूर असली तरी ती शिसारी आणणारी नव्हती, तर कथेला धरुनच होती. 'फायनल ड्राफ्ट' नाटकापासून गिरीश जोशींबद्दल आदर आणि विश्वास होता. त्यामुळे मालिका भरकटणार नाही, याची खात्री होती.तर अशी ही मालिका १६ नोव्हेंबरला संपली. त्याची गोष्ट इथे मुद्दामहूनच लिहिलेली नाही. आता यांतही काहीजणांना अनेक चुका दिसतील, नव्हे काही आहेतच. पण तरीही, ज्यांनी ही मालिका बघितली नसेल त्यांनी ती नेटवर बघावी. मराठी मालिकांकडे सुबुद्ध आणि रसिक प्रेक्षकांना परत खेचण्याचं, 'मैलाच्या दगडाचं' काम या मालिकेने केलं आहे.

भारतातील प्रेक्षकांसाठी ओझी या संस्थळावर सर्व भाग आहेत. भारताबाहेरच्या प्रेक्षकांसाठी

http://expertblogz.com/sz6b1605-8566-4611-b085-0fea430a6525/1cd788beae43...

या संस्थळावर अजून तरी सर्व भाग आहेत.

कलाचित्रपटप्रतिक्रियाआस्वादमतविरंगुळा

प्रतिक्रिया

रुद्रम काही पाहिली नाही. परंतु पुन:प्रक्षेपित भाग पाहायचा प्रयत्न करतो.

उमेश येवले's picture

18 Nov 2017 - 4:37 pm | उमेश येवले

रुद्रम खूपच सुंदर आणि वेगवाण घडामोडी असणारी थ्रिलर मालिका होती. हि मालिका वाटलीच नाही असे वाटलं थ्रिलर रहस्यमय सिनेमा रोज बघतोय. मुक्ता बर्वे ची राघिनी ची भूमिका अतिशय जबरदस्त होती.

रुद्रम चे मागच्या भागांच्या लींक साठी धन्यवाद . मागे अशीच ज्योती अलवणींनी "असंभव " सुचवली होती . मला ती खूप आवडली . धन्यवाद ज्योती अलवणी !!
मी खूप पूर्वीक२-३ हींदी मालीकांचे काही भाग बघीतले होते , नंतर मालीकांच्या वाटेलाच गेले नाही. कृपया
जाणकारांनी चांगल्या मराठी मालिका सुचवाव्या.

सिरुसेरि's picture

20 Nov 2017 - 8:20 am | सिरुसेरि

श्वेतांबरा प्रमाणेच व्दिधाता , वेध , एक शुन्य शुन्य , गुंतता ह्रद्य हे अशा थ्रिलर मालिका गाजल्या होत्या .