मागचा जन्म!

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
17 Nov 2017 - 6:14 pm
गाभा: 

काही वेळा आपण आपल्या जीवनात येणार्‍या समस्यांसंदर्भात ज्योतिषीय मार्गदर्शन घेताना ज्योतिषांकडून मागच्या जन्माचा संदर्भ बर्‍याचदा वापरला जातो.ज्योतिषशास्त्रावरच्या बर्‍याचशा पुस्तकांमधेदेखील या पूर्वजन्माचा उल्लेख बर्‍याचदा असतो.

बरेच प्रयत्न करुनही जातकाला एखाद्या गोष्टीत हवं तसं यश मिळत नसेल किंवा जातकाचं अपत्य अपंग असेल,अपत्य कटकटी असेल किंवा एखादा गंभीर आजार असेल तर "मागील जन्मातल्या इच्छा अपूर्‍या राहिल्या असल्याने किंवा मागील जन्मी काहीतरी पाप केल्यामुळे आताच्या जन्मात हा त्रास भोगावा लागतोय" हे कारण बर्‍याचदा सांगितलं जातं.शिवाय ही पूर्वजन्माची थेअरी बरेच ज्योतिषी मानतात.काही ज्योतिषी तर विज्ञान/तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण घेतलेले आहेत.तेही यात मागे नाहीत.

तर खरंच हा मागचा जन्म असतो का? काहीजणांना मागच्या जन्मातल्या काही घटना,ठिकाणं आठवतात म्हणे.पण या घटना काहीजणांनाच का आठवतात? अगदी ती पास्ट लाईफ रिग्रेशनची थेरपी जरी दिली तरी सर्वांना मागचा जन्म आठवत नाही.याचं कारण काय?

ज्योतिषशास्त्रातल्या काही गोष्टींचा(सर्वच नव्हे!)
प्रत्यय बर्‍यापैकी येतो.

उदाहरणार्थ,

१.धनु राशीचा जातक बर्‍यापैकी उंच आणि तब्येतीनं दणकट असा असतो.निदान या दोन्हीतलं एकतरी असतोच.पण उंचीही कमी आहे आणि तब्येतीनं देखील किरकोळ आहे असा धनु राशीचा जातक सहसा मिळणार नाही.

२.रेवती नक्षत्रावर जन्मलेला जातक हा उंचीने कमी शरीराने स्थुल,दिसायला चांगला,गोरा असा असतो.

३.जन्म किंवा लग्नरास मेष असेल तर दात थोडेतरी पुढे आलेले असतात.

४. पत्रिकेत द्वितीय स्थानात केतु असेल तर दातांचा आजार,विकार असतोच.

५. तूळ लग्न असेल तर डोळे काहीसे मोठे व नाकही मोठे,टोकदार असते.

६. तूळ लग्न असेल तर कपड्यांचा(पोषाख)सेन्स चांगला असतो.

७. दशम स्थानात हर्षल असेल तर बर्‍याचदा पितृसुख फार काळ मिळत नाही.तसेच व्यक्ती इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काम करणारी असू शकते.

८. शुक्र-मंगळ एकाच घरात असतील तर प्रेम जुळण्याची शक्यता दाट असते.यातून विवाह होईलच हे निश्चित सांगता नाही येणार पण असा योग असणार्‍याच्या प्रेमात एखादीतरी भिन्नलिंगी व्यक्ती कधी ना कधी पडतेच!

९. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे.चंद्र धारिष्ट्य देत नाही.शिवाय ही जलराशी आहे.त्यामुळे राग आला तर कर्क राशीच्या लोकांचा संयम पटकन् सुटतो.अशावेळी ते फटकळपणे बोलून रिकामे होतात.

१०.जन्म किंवा लग्न रास कर्क असेल तर वैद्यकीय क्षेत्रात किंवा वैद्यक शास्त्राला सहाय्यभूत अशा क्षेत्रात चांगलं करिअर होतं.(उदा.MR,Pharma मधील नोकरी)

"ज्योतिष हे शास्त्र नाही थोतांड आहे असं काही लोक म्हणतात.किमान ९०% वेळा प्रत्यय येणारे साधेसोपे ठोकताळे वर दिले आहेत.हे शास्त्र नसेल तर सर्रास भाकित चुकलं पाहिजे.पण वरच्या बर्‍याचशा ठोकताळ्यांमधून ज्योतिषशास्त्र नावाचं जे काही आहे ते खरं असावं हे पटतं.

पण पूर्वजन्माचे मात्र असे मोठ्या प्रमाणावर प्रत्यय येत नाहीत. जगाची लोकसंख्या ८ अब्ज धरली तरी किमान ६ अब्ज लोकांना तरी आपला पूर्वजन्म का आठवू नये? किंवा ती ८४ लक्ष योनींची थेअरी मान्य केली तरीही किमान २ अब्ज किंवा काही करोड लोकांना तरी पूर्वजन्म आठवायला हवा. पण पूर्वजन्म ज्यांना आठवतो त्यांची संख्या तुलनेने नगण्य म्हणावी एवढीच आहे.

विज्ञानलेखक निरंजन घाटे यांनी अशाच प्रकारच्या अतींद्रिय गोष्टींचा विज्ञानाच्या मार्गे उलगड्याचा थोडा प्रयत्न केलाय.त्यासंदर्भाने लिहिलेल्या 'संभव-असंभव' या पुस्तकात पूर्वजन्म आठवण्याला 'देजा व्हू' असं म्हटलं आहे.या नुसार आपण पूर्वी या ठिकाणी आलोय.इथल्या काही लोकांना भेटलोय असे भास होणं हे यामागचं कारण सांगितलंय.

आता या काथ्याकूटाचा फायदा काय? असाही प्रश्न पडला असेल तर पूर्वजन्म वगैरे नसल्याचे फायदे बघा.

१. पूर्वजन्म नसेलच तर ज्योतिषशास्त्रातून तो विषय वगळून योग्य दिशेने संशोधन करता येऊ शकतं. पूर्वजन्माची आभासी खुंटी पकडावी लागणार नाही.

२. मागच्या जन्माचं पाप म्हणून होणारी बतावणी आणि त्या अनुषंगानं येणारी धार्मिक कृत्ये,कर्मकांड यांना आळा बसेल.(आणि याचं प्रमाण खुप मोठं अ‍ाहे.निदान हिंदू धर्मात तरी!)

किंवा पूर्वजन्म असतो हे मान्य केल्यास त्याचेही फायदे बघा.
१. अनैतिक,समाजाच्या दृष्टीने हानीकारक वर्तन करणारे लोक,गुन्हेगार,राजकारणी हे सुध्दा कधी ना कधी ज्योतिषाकडे जातात.त्यांच्या गैरकृत्यांना काही प्रमाणात आळा घालण्यासाठी याचा उपयोग करता येईल.(अतर्क्य किंवा कायच्या काय वाटलं तरी अपेक्षा करायला हरकत नसावी.)

२.कोणी बघितलाय मागचा जन्म? असला,नसला काय फरक पडतो? सध्याच्या जन्मावर फोकस करा राव! वाट्टेल त्या मार्गानं रग्गड पैसा कमवा.त्या जोरावर कसंही वागा.हवं ते खा,प्या मजा करा.जिंदगी ना मिलेगी दोबारा असं म्हणून काहीजण स्वैराचाराचा परवाना मिळाल्यासारखे वागतात.त्यालाही पायबंद बसेल.

पूर्वजन्म आणि ज्योतिषशास्त्र यांची तुलना करता ज्योतिषशास्त्र हे बर्‍यापैकी प्रत्यय येणारं आहे.भारतातले बरेचसे प्राचीन गणितज्ञ हे ज्योतिषशास्त्राचेही अभ्यासक होते.तरीदेखील ज्योतिषशास्त्र हे थोतांड म्हणणार्‍यांची संख्या कमी नाही.पण पूर्वजन्माची उदाहरणे नगण्य असूनही त्याला मात्र थोतांड म्हणणारे फार कमी लोक आहेत.

असेलच मागचा जन्म तर तो सगळ्यांना/बहुतांश जणांना का आठवत नसावा?पूर्वजन्म सगळ्यांनाच आठवला तर ते त्रासाचं होईल वगैरे म्हणण्यात काही तथ्य असेल असं वाटत नाही.कारण आपल्या सध्याच्या आयुष्यातील वाईट घटनासुध्दा आपल्याला आठवतातच की!

तळटीपा
१.सदर धाग्याचा विषय दशक्रिया सिनेमा आणि त्याला होणारा विरोध इकडे वळवून धागा भरकटवू नये.

२. माझा मागचा जन्म अमुकतमुक होता वगैरे गंमतीची विधाने करुन वेळ आणि धाग्याची लांबी अकारण वाढवू नये.धाग्यावर गंभीर चर्चा अपेक्षित आहे.

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

17 Nov 2017 - 8:17 pm | टवाळ कार्टा
मराठी_माणूस's picture

17 Nov 2017 - 8:23 pm | मराठी_माणूस

जातक म्हणजे काय ?

उपयोजक's picture

18 Nov 2017 - 6:47 am | उपयोजक

जो भविष्य जाणून घेण्याच्या इच्छेने ज्योतिषाकडे जाणारी व्यक्ती

गावठी फिलॉसॉफर's picture

17 Nov 2017 - 8:50 pm | गावठी फिलॉसॉफर

पुनर्जन्म असतो का नाही हे माहीत नाही पण त्यावर विनाकारण संशोधन कशाला करायचे? तुम्ही एवढ्या लोखासंख्येचे बोलताय, अहो मागील काही दिवसातील घडामोडी आठवत नाहीत तर मागील जन्मचे काय आठवणार? ह्या सगळयांच्या मागे लागणे म्हणजे पूर्णपणे फालतुगिरी

उपयोजक's picture

18 Nov 2017 - 6:49 am | उपयोजक

या संशोधनाचा काय फायदा आहे ते निवेदनात दिलं आहे.

गॅरी ट्रुमन's picture

17 Nov 2017 - 8:56 pm | गॅरी ट्रुमन

पुनर्जन्म असला पाहिजे हे आजूबाजूची परिस्थिती बघून मला तरी वाटते . अगदी एका घरी जन्माला आलेल्या, एकाच आईवडिलांनी वाढवलेल्या दोन भावंडांच्या वाटा अनेकदा अगदी परस्परभिन्न असतात. काहींना सगळ्या गोष्टी विनासायास मिळतात तर काहींना अगदी पूर्ण झगडूनही मिळत नाहीत. काहींचा जन्म तोंडात सोन्याचा चमचा घेऊन होतो तर काहींचा झोपडपट्टीत. ही आणि अशी कित्येक उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसतात. पूर्वजन्मातील भरपाई झालेली कर्मे हे मान्य केले नाही तर हे का होत असावे याचे उत्तर देता येणे कठिण आहे. त्यामुळे पूर्वजन्मातील प्रारब्ध आणि पुनर्जन्म असावा ही शक्यता मला वाटते.

पूर्वजन्माविषयी डोलोरेस कॅनॉन , ब्रायन वाईस , मायकेल न्यूटन यांनी बरेच काम केले आहे. एखाद्या महत्वाच्या घटनेविषयी दोन किंवा अधिक लोकांकडून पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये एकमेकांना पुष्टी देणार्‍या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पुनर्जन्माविषयी अगदी कट्टर ख्रिश्चन किंवा मुस्लिम (म्हणजे पुनर्जन्म न मानणारे) यांच्याकडूनही तशाप्रकारचेच सांगितले गेले आहे असेही त्यांनी म्हटले आहे. मी डोलोरेस कॅनॉन यांचे एक पुस्तक वाचले आहे. त्यांनीच A Soul Remembers Hiroshima हे पुस्तक लिहिले आहे त्यात हिरोशिमामध्ये अणुहल्ल्यात मारल्या गेलेल्या एका व्यक्तीने पुनर्जन्म घेतला आणि त्या व्यक्तीने पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये हिरोशिमा हल्ल्याची आठवण सांगितली असा उल्लेख आहे. हिरोशिमाचे ते पुस्तक मला वाचायचेच आहे. युट्यूबवर मी काही व्हिडिओ बघितले आहेत. सध्या याविषयी त्याहून जास्त मला माहित नाही.या विषयात मला नव्याने रस उत्पन्न झाला आहे.

मुळातले संस्कार आणि श्रध्दा यामुळे पुनर्जन्म असतो ही एक शक्यता मी नक्कीच विचारात घेतो. त्यात आणखी वाचन करून जर खात्री पटली तर त्यावर विश्वास ठेवायचा अन्यथा सोडून द्यायचे असा (इतर सगळ्या गोष्टींविषयी असतो तोच) माझा दृष्टीकोन या गोष्टीविषयीही आहे. दुसरे म्हणजे सगळ्यांना आपले पूर्वजन्म का आठवत नाहीत याचे उत्तर मला माहित नाही. एखादी गोष्ट आपल्याला समजली नाही या कारणावरून मला तरी टर उडवायला आवडणार नाही.

पूर्वजन्माविषयी डोलोरेस कॅनॉन , ब्रायन वाईस , मायकेल न्यूटन यांनी बरेच काम केले आहे.

या तिघांचे काम धंदेवाईक आणि काहीसे संशयास्पद आहे. मात्र
या क्षेत्रातील (चांगल्या अर्थी) आवर्जून घेण्यासारखे नाव म्हणजे Dr. Ian Stevenson.

गॅरी ट्रुमन's picture

17 Nov 2017 - 9:23 pm | गॅरी ट्रुमन

धन्यवाद. Ian Stevenson हे नाव माहित नव्हते.

डोलोरेस कॅनॉन , ब्रायन वाईस , मायकेल न्यूटन यांचे काम संशयास्पद आहे हे मतही मला माहित नव्हते. या विषयात नव्यानेच रस उत्पन्न झाला आहे त्यामुळे हल्लीहल्लीच वाचायला लागलो आहे. तरीही इतर कोणीही संशय घेतला तरी मला जोपर्यंत त्यांची मांडणी संशयास्पद वाटत नाही तोपर्यंत मी तरी त्या संशयावर विश्वास ठेवणार नाही.

सतिश गावडे's picture

17 Nov 2017 - 9:55 pm | सतिश गावडे

तरीही इतर कोणीही संशय घेतला तरी मला जोपर्यंत त्यांची मांडणी संशयास्पद वाटत नाही तोपर्यंत मी तरी त्या संशयावर विश्वास ठेवणार नाही.
सहमत.

मी पुनर्जन्म या विषयावर खूप वाचलंय. डॉ. स्टीव्हनसंनपासून परमहंस योगानंद ते अगदी पु ना ओक यांच्या लेखनापर्यंत. रूढार्थाने मी नास्तिक आहे. मात्र तरीही पुनर्जन्म याविषयात रस आहे.

जे साहित्य वाचलंय त्यात काही सामाईक मुद्दे असे आढळले:
१. ज्या मुलांना आपला पुनर्जन्म आठवतो ती मुलं त्यांना बोलता येऊ लागल्यापासून साधारण सहा सात वर्षांची होईपर्यंत त्यांना मागील जन्माच्या गोष्टी आठवतात. नंतर ही मुलं हळूहळू मागच्या जन्माच्या गोष्टींबद्दल बोलायचे बंद करतात.
२. पुनर्जन्माचा लिंगाशी संबंध नसतो. मागच्या जन्मी पुरुष असणारी व्यक्ती या जन्मी स्त्री म्हणून जन्माला येऊ शकते किंवा यांच्या उलटही होऊ शकते.
३. ज्या मुलांना आपला मागील जन्म आठवतो त्यातील बहुतेकांचा अपघाती किंवा हत्या होऊन मृत्यू झालेला असतो.
४. पुनर्जन्म झालेल्या व्यक्ती काही वेळा आपल्याच घरात जन्म घेतात तर काही वेळा मैलो दूर जन्म घेतात. यात निश्चित असा नियम नाही.
५. काही वेळा मागील जन्मी ज्या कारणामुळे मृत्यू झाला त्याच्या दृष्य खुणा शरीरावर चालू जन्मात दिसतात.
६. काही भारतीय लेखकांचे लेखन वगळता इतरांच्या लेखनात कुठे "अतृप्त आत्मा" किंवा "भूत योनी" असलं काही आढळलं नाही. आत्मा मागील जन्माचा मृत्यू आणि पुढील जन्म यातील संधिकाळात केवळ निरीक्षक असतो.
६. पुनर्जन्माच्या उदाहरणातील लहान मुले याआधीच्या जन्माविषयी इतर कुणीही माहिती न देता आपल्या पूर्वीच्या जन्मातील व्यक्ती, ठिकाणे आणि खाणाखुणा ओळखतात.

हे निष्कर्ष नाहीत. मी गेल्या चार पाच वर्षात पुनर्जन्मावर जे लेखन वाचले त्यातील काही सामाईक मुद्दे आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

17 Nov 2017 - 10:01 pm | गॅरी ट्रुमन

धन्यवाद. हो यातील काही मुद्दे (विशेषतः १, २ आणि ५) मी जे काही थोडेथोडके वाचले आहे त्यात आले आहेत.

याविषयी बरेच वाचायची इच्छा आहे.

उपयोजक's picture

18 Nov 2017 - 7:22 am | उपयोजक

माझा रोख आहे तो पुनर्जन्म सगळ्यांना का आठवत नाही या गोष्टीकडे.

अपघात,हत्या असं झालं तरच पुनर्जन्म आठवतो असं असेल तर याचाच अर्थ हा पुरेसा पुरावा म्हणता येणार नाही.पुनर्जन्म आठवणे या गोष्टीला एवढ्या मर्यादा असतील तर पुनर्जन्म या गोष्टीचा व्यवहारात फारसा उपयोग करुन घेता येणार नाही.सृष्टीतल्या काही अपवादात्मक गोष्टींपैकी एक! एवढेच तिचे महत्व राहील.

लेखक आणि पुस्तकांच्या माहितीबद्दल आभारी आहे.

उपयोजक's picture

18 Nov 2017 - 6:52 am | उपयोजक

खात्री पटली तर त्यावर विश्वास ठेवायचा अन्यथा सोडून द्यायचे.

त्याच उद्देशाने धागा काढला आहे.

या लेखकांबद्दल माहिती नव्हतं. आभार!

राही's picture

19 Nov 2017 - 3:51 pm | राही

पहिल्या परिच्छेदातल्या शंकेला कदाचित उत्तर देता येईल. एक म्हणजे रंग रूप स्वभाव हे अनुवंशाने ठरते, पण हा वारसा सर्व प्रोजेनीला सारख्या प्रमाणात मिळत नाही. तो डिस्ट्रिब्यूट होतो. जन्मदात्यांपैकी एक जण जर तापट आणि निळ्या डोळ्यांचा असेल तर ही वैशिष्ट्ये दोन मुलांकडे विभागली जाऊन एक मूल निळ्या डोळ्यांचे व दुसरे तापट असे होऊ शकते. जीन्समध्ये डॉमिनन्ट आणि रिसेसिव असे प्रकार असतात. ही निसर्गयोजना आहे. नाहीतर जीनसमुच्चयात वैविध्य न राहून एकाच साच्यातली एकसारखी सन्तती निर्माण झाली असती. देशकालानुसार जातकाला/मानवाला जीवनसंघर्षात टिकून राहाण्यासाठी वेगवेगळ्या कौशल्यांची, कसब आणि हुनर याची गरज निर्माण होत आली आहे. उत्क्रांती म्हणतात ती हीच. संस्कृतीच्या विकासात बार्टर सिस्टीम यामुळेच निर्माण झाली. मी एकट्याने शेती आणि कापडनिर्मिती दोन्ही करण्यापेक्षा माझ्याकडे शेतीची समज जास्त आहे आणि तुला वीणकाम चांगले जमते तर मी शेती करून तुला धान्य देतो आणि तू मला वस्त्र पुरव ही शांततामय सहजीवनाची युक्ती जीवनसंघर्ष सुसह्य करते. हे यदृच्छया (रॅन्डम) गुणवैविध्य राखणे ही निसर्गयोजना आहे. वारसा मिळतोच पण एकाला घरदार तर दुसर्‍याला दुकान अशी वाटणी होते.
दुसरे म्हणजे मानवाला बुद्धीनामक एक खास हत्यार, उपकरण (टूल), साधन मिळाले आहे. बुद्धीचा सदुपयोग करून कर्म करावे म्हणजे ते सत्कर्म होते. ही बुद्धी सतत परजलेली असावी लागते. स्थिर असावी लागते. ही स्थिरसावधचित्तता अंगी बाणवण्याचे अनेक मार्ग सांगितले गेले आहेत. (क्रोधादि सहा शत्रूंवर विजय मिळवणे इ.) अशा स्थिरतेने केलेकी कृत्ये सत्कृत्ये असतात. विपरीतबुद्धीने वर्तन केल्यास दुष्कृत्ये घडतात. सावधानता असेल तर संधीचा फायदा घेता येतो, अडचणी, माणसे ओळखता येतात आणि लौकिक यश मिळते. पारलौकिकाचा विचार करायचा झाला तर तेही मिळते. पण मानवप्राणी बुद्धी कशी वापरतो यावर सारे अवलंबून आहे. दुर्दशा की सुदशा हे बर्‍याच प्रमाणात मानवाच्या कृतीवर अवलंबून आहे. 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार' किंवा 'तुझे भविष्य तुझ्याच हाती' वगैरे संतवचने हेच सांगतात. आपले अपयश हे आपल्याच करणीमुळे आले आहे हे स्वीकारणे माणसाला जड जाते आणि मग तो पूर्वसंचित, पूर्वकर्म अशी पळवाट शोधतो.

मराठी कथालेखक's picture

17 Nov 2017 - 9:48 pm | मराठी कथालेखक

पुर्वजन्म मानण्याकरिता आत्म्याचे अस्तित्व मानावे लागेल. ते सिद्ध झालेले नाही. त्यामुळे पुनर्जन्मावर विश्वास ठेवता येत नाही. आत्म्याच्या थिअरीशिवाय पुनर्जन्माची थिअरी कुणी मांडली आहे का ? असल्यास वाचायला आवडेल.
पण एका जन्मातल्या स्मृती दूसर्‍या जन्मात नक्की कशा प्रवास करतात .. आत्म्याचे अस्तित्व नाकारल्यावत मूळात दूसरा जन्म म्हणजे काय हाच प्रश्न आहे?

उलट दीशेने विचार केल्यास, पुनःर्जन्म हा आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करतो असे म्हणता येइल.

मराठी कथालेखक's picture

20 Nov 2017 - 4:55 pm | मराठी कथालेखक

हो.. पण आत्म्याचे अस्तित्व मान्य करायचे तर आत्म्याची स्वतंत्र अशी तत्वशुद्ध थिअरी मांडावीच लागेल.
१) एक तर आत्मा जड म्हणजे काही वजन असणारे (अगदी काही मिलिग्रॅमसुद्धा) असे मानले तर ते कसे बनले आहे , पेशींनी की केवळ अणू रेणूंनी, त्याची रचना कशी आहे, तो स्वतः सजीव मानायचा (पेशींचा बनलेला , डीएनए असणारा ) की निर्जीव ? शरीरात नेमका कुठे असतो ? गर्भात नेमका कसा व कधी प्रवेश करतो ? शरीर सोडून कस्सा जातो म्हणजे कुठून बाहेर पडतो ?सजीव असल्यास तो शरीराच्या बाहेर जिवंत कसा रहातो, किती दिवस राहू शकतो. पुढचा जन्म मिळेपर्यंत नेमका कुठे व कसा तग धरुन रहातो.
२) जर आत्मा जड नाही, म्हणजे एखाद्या सॉफ्टवेअर प्रमाणे, एखाद्या ज्ञानाप्रमाणे केवळ आज्ञावली/स्मृतींचा एक संच आहे तरी ज्याप्रमाणे सॉफ्टवेअर वा ज्ञान साठवण्यास हार्डडिस्क/मेंदूच्या पेशी यांची गरज भासते किंवा त्यांच्या वहनाकरिता एखादे दृष्य/अदृष्य माध्यमाची गरज पडते तसेच, वहनासाठी काही उर्जा लागते तशी आत्म्याच्या बाबत अशी उर्जा कशी प्राप्त होते. शेकडो / लाखो किमीचा प्रवास हा आत्मा कसा करतो किंवा पुढचा जन्म मिळेपर्यंत कसा टिकतो ह्याची उत्तरे द्यावी लागतील.

त्याचप्रमाणे आत्म्याच्या अस्तित्वाशिवाय जर पुनर्जन्माची संकल्पना मांडली जात असेल तरी त्या प्रकारात सुद्धा पुनर्जन्माची तार्किक मांडणी करावी लागेल. लक्षात घ्या मी इथे फक्त तार्किक मांडणी म्हणत आहे, पुरावे नसले तरी एकवेळ चालू शकेल, एखाद्या थिअरीचे पुरावे भविष्यात शोधता येवू शकतात पण तार्किक मांडणी अतिशय आवश्यक ठरते. त्याशिवाय अभ्यास करणे अशक्य आहे.

उपयोजक's picture

18 Nov 2017 - 6:54 am | उपयोजक

मान्य करण्याइतका भक्कम आणि पुरेसा पुरावा मिळायला हवा.

जर ज्योतिषी (विज्ञान तंत्रज्ञानातलं उच्चशिक्षण घेतलेले ज्योतिषीसुध्दा) 'मागच्या जन्मात' हेच एक कारण त्यांच्याकडे येणार्‍या जवळपास प्रत्येक जातकाला सांगत असतील तर ते कशाच्या आधारावर? येणार्‍या प्रत्येक जातकाच्या समस्येच्या मुळाशी मागच्या जन्मातील पापकर्मेच जबाबदार असतात का? आणि असतील तर स्वत: जातकाला मागच्या जन्मातलं काहीही आठवत नसताना ज्योतिषाला कसं कळू शकतं? किंवा पत्रिकेतली अमूक स्थानं ही मागच्या जन्माबद्दल मार्गदर्शन करतात असं म्हटलं तरी हे खरं कशावरुन? म्हणजे पत्रिका पाहून तुमचा मागचा जन्म अमूक अमूक होता किंवा मागच्या जन्मी तुमच्याकडून असं असं पाप घडलं म्हणून या जन्मात असं असं दु:ख तुम्हाला भोगावं लागतंय असं ज्योतिषी म्हणतात या म्हणण्याचा खात्रीशीर पुरावा काय? मागचा जन्म कुठे झाला,कधी झाला या गोष्टी महत्वाच्या नाहीत का? आणि हे जर अंधारात दगड मारणं असेल याच अनुषंगानं येणारी धार्मिक कृत्ये,कर्मकांडे तरी का करावी? का वेळ आणि पैसा वाया घालवावा?

मिपावरच्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं यावर मत वाचायला आवडेल.

सन्घमित्रा's picture

18 Nov 2017 - 5:33 pm | सन्घमित्रा

मागील जन्म का आठवत नाही हे सांगता येत नाही पण ,पत्रिकेतील केतू आणि त्याची प्लेसमेंट हा मागच्या जन्मात आपण कश्यात मास्टर होतो हे सांगतो असे यूट्यूब वरील विडिओ वरून कळाले . पंचम स्थान हे पूर्व पुण्याईचे असते . अष्टम स्थान आणि राहू वरून पूर्वजांविषयी माहिती मिळते .

नाखु's picture

18 Nov 2017 - 7:22 pm | नाखु

पुनर्जन्म या बाबतीत कै.ग.ना.कोपरकर हिरीरीने आणि परदेशी संदर्भासहीत लेख लिहित असत साल १९७५ ते १९८५

त्यांची या विषयावर काही पुस्तके आहेत

दुर्गविहारी's picture

20 Nov 2017 - 11:51 am | दुर्गविहारी

काही मुलभुत शंका विचारतो. मुळात कुंडली हि जन्मवेळेवरुन ठरते. पण नेमकी वेळ बरोबरच आहे याची खात्री काय? कारण नेमक्या त्याच वेळी नक्षत्र बदलणार असल्यास थोड्या सेकंदाच्या फरकाने एखाद्या जातकाचे चुकीचे भविष्य सांगितले जाणार नाही का? त्यामानाने हस्तसामुद्रिकशास्त्र जास्त योग्य वाटते, कारण हाताच्या रेषाच वाचायच्या असल्याने चुकायचे फारसे कारण नाही. अत्यंत अचुक हस्तसामुद्रिक तज्ञ असणारे किरो यांचे उदाहरण आहेच.

बरेच प्रयत्न करुनही जातकाला एखाद्या गोष्टीत हवं तसं यश मिळत नसेल किंवा जातकाचं अपत्य अपंग असेल,अपत्य कटकटी असेल किंवा एखादा गंभीर आजार असेल तर "मागील जन्मातल्या इच्छा अपूर्‍या राहिल्या असल्याने किंवा मागील जन्मी काहीतरी पाप केल्यामुळे आताच्या जन्मात हा त्रास भोगावा लागतोय" हे कारण बर्‍याचदा सांगितलं जातं.शिवाय ही पूर्वजन्माची थेअरी बरेच ज्योतिषी मानतात.काही ज्योतिषी तर विज्ञान/तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण घेतलेले आहेत.तेही यात मागे नाहीत.

हे जे धाग्यात सांगितले आहे त्यावरून एक शंका, जेव्हा एखाद्या जातकाला साडेसाती चालू होते असे सांगितले जाते, त्याचा अर्थ शनि महाराज त्याच्या या जन्मातल्या कर्माचा न्याय करून त्याचे अकाउंट क्लिअर करणार असे असताना, मागच्या जन्मातल्या चुकाचा भुर्दंड पुन्हा पुढच्या जन्मात का?

उपयोजक's picture

21 Nov 2017 - 3:40 pm | उपयोजक

BRTअर्थात बर्थ टाईम रेक्टीफिकेशनने जन्मवेळ निश्चित करता येते.

साडेसातीत शनी अकाऊंट क्लिअर वगैरे करत नाही.

इतक्या नक्षत्रांबद्दल लिहीलंत जरा पूर्वाफाल्गुनीबद्द्ल काहीतरी लिहा की!

श्रीगुरुजी's picture

22 Nov 2017 - 3:54 pm | श्रीगुरुजी

श्री श्री परमहंस योगानंद यांच्या "योगीकथामृत" या आत्मचरित्रात "काशीचा पुनर्जन्म व त्याचा शोध" या शीर्षकाचे एक रोचक प्रकरण आहे. स्वामींकडे शिक्षणासाठी आलेल्या काशी नावाच्या १०-१२ वर्षाच्या मुलाचा अकाली मृत्यु होतो. आपल्या मृत्युनंतर आपल्या नवीन जन्मातून आपल्याला शोधून पुन्हा अध्यात्म मार्गावर नेण्याचे वचन तो स्वामींकडून घेतो. आपल्या आध्यात्मिक शक्तीने त्याच्या पुनर्जन्मानंतर ते त्याचा शोध कसा घेतात याचे सविस्तर विवेचन या प्रकरणात आहे. याच आत्मवृत्तात ज्योतिष/भविष्य यावरही एक मोठे प्रकरण आहे. जिज्ञासूंनी ते अवश्य वाचावे. पुनर्जन्म, ज्योतिष इ. वर ज्यांचा अजिबात विश्वास नाही त्यांनी पुस्तक विकत घेऊन वाचण्यात आपले पैसे व वेळ व्यर्थ खर्च करू नये.