मित्राची बायको

चामुंडराय's picture
चामुंडराय in काथ्याकूट
13 Nov 2017 - 12:37 am
गाभा: 

प्रेर्ना : अर्थातच आम्हा सगळयांचेच मनोगत.

परवा मित्राकडे गेले होते, त्याचं लग्न ठरल्याचं कळलं होतं. त्याने भेटायला सहजचं बोलावलं होतं, पण गाठ पडली त्याच्या भावी बायकोशी. बऱ्याच गप्पा झाल्या. इकडच्या तिकडच्या. मला फार प्रश्न पडले होते पण आता काय बोलायचे. तीला तसले काही प्रश्न पडलेले नसल्याने अखंड बडबडत होती. मुळात स्वत:बद्दलच फक्त बोलायचं असेल तर असले प्रश्न असले काय आणि नसले काय? फिकीर नॉट, नाही का?

त्याच्या आईला भेटले नंतर. काकी एकदम खुश. माझा गालगुच्चा घेत म्हणाल्या, “मग? कशी वाटली आमची सून?”
जे वाटलं ते सांगण्यासारखं नव्हतं आणि त्या ऐवजी वेगळं काही सांगण्याइतकी प्रतिभा नव्हती कारण मी फक्त नावाचीच प्रतिभा. तीच्याशी झालेलं सगळं संभाषण नजरे समोरून जायला लागलं.

पूर्णत: unbiased अशी तीला भेटले. माझ्याशी होणाऱ्या पहिल्याच भेटीत ती बया त्याला अगदी खेटून बसली होती. जणू काही त्याच्यावरचा हक्क मला दाखवत होती. मला ते जsssssरा चांsssssगलंच खटकलं आणि मी biased झाले.
ती- मी अमुक अमुक ठिकाणी तमुक काम करते.
मी- अय्या, छानच. {मग?? विशेष काय त्यात}
ती- मला हे आवडतं, मला ते बनवायला येतं आणि हे फारंच छान जमतं.
मी- वा, अरे भारीचे तुझी नवी मैत्रीण. (त्या क्षणी देखील मी तीला त्याच्या भावी बायकोचा दर्जा दयायला तय्यार नव्हते)
{ते बनवायला येत? लग्नानंतर त्यालाच करायला लावशील ना पण??, छान जमतं? करून दाखव मग, तोंडची हवा कशाला दवडतेस}
हे आणि असं बरंच काही. शेवटी काकींना मी म्हणाले. “तो आनंदात राहील”. कारण ती कशी आहे हे मी सांगूच शकले नसते. का कोण जाणे, ती मला बिलकुल आवडली नव्हती.
पण त्याला हवं ते सगळं देऊ शकेल ती त्याला; अशी एक समजूत मी करून घेतली.

त्यानंतरचा पुन्हा एक प्रसंग. दुसरा मित्र. खूप वर्षांनी लग्न ठरलेला. मस्त स्वभाव. हुशार. मनात आणेल तर कुणीही पट्कन लग्नाला तयार होईल असं एकंदर व्यक्तिमत्व. त्याच्या होणाऱ्या बायकोला भेटले.

अगं, कशी आहे ही?? दुसरी कुणी मिळाली नाही का ह्याला इ. उद्गार नंतरच्या चहापानात मैत्रिणींकडून उमटले (म्हणजे फक्त मलाच ती खटकली नव्हती तर).

म्हटलं असं का होतं? मित्राची बायको कायम व्हॅमपायरच राहणार का आपल्या मनात. मी तीला सहजासहजी accept का करू शकत नाही. तीच्यातला खाचाखोचा का दिसतायत?
बर ह्या मित्राशी माझी फक्त मैत्रीच होती, आजही आहे. त्यामुळे “हृदयावर ठेच” सारखा प्रकार नव्हता.
मग मी जोरदारच विचार सुरु केला, ह्या माझ्या वागण्यावर.
सगळ्या बारीक सारीक गोष्टी मला विचारणारा हा, एक दोन भेटीत तिचा झालाय. तीने सांगितला म्हणून सिगारेटचा ब्रँड देखील बदलला. मागच्या वेळी माझा फोन लागला नाही तर हाच मॉल मध्ये बसून राहिला होता. मी घे म्हणाल्यावरच रेनकोट घेतला. त्याच्यासाठी चांगल्या जिमच्या शोधात मी वेड्यासारखी भटकले होते. मी सोबत आहे म्हणून काकूंनी बिन्धास्त नाईट क्लबला पाठवलं होतं.

आणि हा, रोज संध्याकाळी माझ्याशी चॅटिंग करणारा, वेळ प्रसंगी हक्काने माझी सिगरेट शेअर करणारा, आज काल स्वत:हून एकही मेसेज करीत नाही. उपदेशाचे डोस पाजणारा, सौ. सन्नीतैं, बेवॉच आणि मॅडोना बद्दल बोलणारा आता फक्त तीच्याच बद्दल बोलत राहतो. भेटूया म्हटल्यावर, तिला विचारून आमची वेळ ठरवतो आणि तिला बरोबर घेऊन येतो, एके काळचा माझा ढाण्या वाघ मित्र का त्या कमळीला एव्हढा घाबरतो? अरे आठव. पहाटे ४ वाजता तुला नाईट क्लब मधून उचलून घरी न्यायला सगळ्या मित्रांना फोन केले होते.

छे, जवळच्या मित्राच लग्न ठरणं हे जेवढं त्याच्यासाठी क्लेशदायी त्याहूनही अधिक मैत्रिणींसाठी क्लेशदायी. एक नकोसं, दुराव्याची जाणीव करून देणारं वलय त्याच्याभोवती दिसू लागतं. पूर्वी ज्याच्यासोबत एका गाडीवरून भटकले, त्याच्याशी गळामिठी मारताना जरा कचरायला होतं. “तीला आवडलं नाही तर?”. दुराव्याच्या नियमांची जाणीव करून देणारी घंटा क्षणोक्षणी मनात वाजायला लागते. पूर्वी ज्याला “ए पळ, मला काही सांगू नकोस, आत्ता भेट मला” असं म्हणायचे, त्याला “बघ म्हणजे, भेटावसं वाटतंय तुला, बायकोला विचार, जमलं तर भेटू” असं म्हणावं लागतं.

आता ती पहिल्या प्रसंगातली मुलगी, ती चांगली असेलही पण मनात जो ग्रह झाला तो झालाच. किंवा ही दुसरी पद्मिनी. तीच्यासोबत तो सुखात राहीलही, पण माझ्या मित्राला माझ्यापासून दूर नेणारी रंभा उर्वशी “ही” आहे ही जाणीव कदाचित फार जोर धरते. तीच्या प्रत्येक बोलण्याचा मनात विपर्यास केला जातो, तीची प्रत्येक सवय ही चुकीचीच वाटू लागते.

बाई म्हणून विकसित होताना माझ्या भावभावनांनी सगळं फारच क्लिष्ट करून ठेवलंय. अजून लग्न व्हायचय. नंतर किती त्रास करून घेणारे मी कुणास ठाऊक. ह्यावर सोपा उपाय म्हणजे तो जसा बायकोमय झालाय तसं मी देखील नवरामय होऊन जाणं. हे एक बरं आहे मात्र, एक अत्यंत जवळचा मित्र माझा नवरा होणारे. तेवढाच त्रास कमी.
आता सहज म्हणून त्या दोघींना गळामिठी मारली असती, त्यांच्या मेकअपचं थोडंस कोडकौतुक केलं असतं तर क्षणात हा दुरावा थोडा तरी कमी झाला असता की नाही... पण सुचत नाही असलं काही त्यावेळी.

आणखी एक मित्र लवकरच त्याच्या घरी announcement करणारे. तेव्हा तोही भेटायला बोलवेलच त्याच्या भावी बायकोला. तेव्हा हे सगळं विडंबन वाचून तिला नीट समजावून घेण्याची सुबुद्धी व्हावी.

- (हळवी) मंदा(र) उपाध्ये

प्रतिक्रिया

मूळ लेख लेखकाने अतिशय प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे लिहिला आहे . तुमचा हा विडंबनाचा प्रयत्न मात्र जमून आला नाही ... फसल्यासारखा वाटतो ...नव्हे फसलाच आहे .

आगाऊ म्हादया......'s picture

13 Nov 2017 - 12:32 pm | आगाऊ म्हादया......

माझ्या लिखाणाची तुम्हाला असलेली कदर पाहून भरून आलं.

हरवलेला's picture

13 Nov 2017 - 3:39 am | हरवलेला

छान! विडंबन जमलंय...

आगाऊ म्हादया......'s picture

13 Nov 2017 - 12:39 pm | आगाऊ म्हादया......

मी स्वतः मिपा वर अनेक विडंबने वाचली आहेत, जी खूप आवडली.
मूळ प्रेरणा लिहिली असती तर मला आनंद वाटला असता. पण हे उगाच वाटलं.

बाकी विडंबन करावंसं वाटलं म्हणजे मी मुळात चांगलं लिहिलं असं समज घरून घेऊ का मी?

अहो सर, मूळ प्रेरणा अगदी तुमच्या नावासह (बोल्ड लेटर्स) अगदी सुरवातीलाच लिहिली आहे.

आणि तुमचं मनोगत नुसतं चांगलंच नाही तर अगदी मनाला भिडणारं आहे त्यामुळेच हा अल्प-स्वल्प प्रयत्न करू धजलो.

उपेक्षित's picture

13 Nov 2017 - 1:27 pm | उपेक्षित

नाही जमले,

मूळ लेख अतिशय प्रामाणिकपणे लिहिला होता कुठलाही आव न आणता तो खूप आवडला.

आधीचे लेख बघता, तुम्ही याहून चांगलं लिहू शकता मंदातै.

गामा पैलवान's picture

14 Nov 2017 - 12:26 am | गामा पैलवान

कुठला रेनकोट घेतला होता मग ? एकंच नग घेतला की एकदम तीनचा प्याक ?

-गा.पै.

शांतम पापम ! शांतम पापम !!

अहो गा पै एकदम तीनचा प्याक कशाला?
एक एका सिझनला पुरेसा आहे आणि जपून वापरला तर आणखी काही सिझन्स सहज वापरता येईल.

गामा पैलवान's picture

20 Nov 2017 - 10:52 pm | गामा पैलवान

चामुंडराय,

काय सांगता राव ! एकंच रेनकोट आख्ख्या सीझनभर? बापरे भलतेच धाडसी हो तुम्ही.

आ.न.,
-गा.पै.

नमकिन's picture

20 Nov 2017 - 9:42 pm | नमकिन

ते ढाण्या वाघाचं अन् कमळीचं झ्याक जमवलंय!
शिर्षक वाचून कुतूहल 'चाळवले' होते पण घोर निराशा.
म्हणजे काही शेकोटी वगैरे पेटवून थंडीला कसे पळवून लावले असे विषय सोडून ......
मजा वाटली, विडंबन कोण म्हणतंय याला? फक्त लिंग बदल करपन वाचायची सोय करुन दिलीय म्हणाकी!
आता तेव्हढं लिंगबदलाचं "अॅप" बनवलं का समदं मिसळपाव साहित्य दोहों बाजू सपष्ट करंल बघा.