शिवकाल-निर्णय

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
10 Nov 2017 - 7:59 pm

शिवकाल-निर्णय

दिनांक १० नोव्हेंबर, २०१७. आज अफ़जलखानाच्या वधाला ३५८ वर्षे पूर्ण झाली. सहज म्हणून 'कालनिर्णय' पाहिलं तर ह्या दिवशी 'कालभैरव जयंती' असल्याचं समजलं. ह्या 'कालभैरव जयंती' खेरीज अफजलखान नावाच्या ‘काळभैरवाची पुण्यतिथी' देखील नमूद करायला हवी होती असं वाटलं.

'कालभैरव जयंती' शिवाय 'पाटीलबुवा गोविंद झावरे पुण्यतिथी' देखील कालनिर्णय मध्ये ह्याच दिवशी लिहिली आहे. गावो-गावच्या लहान-मोठ्या महाराजांच्या जयंती, पुण्यतिथी आणि सणवार इतपत मर्यादित माहिती आपल्या कॅलेंडर्स मध्ये असते.

मावळातील शेतकऱ्यांच्या पोरा-टोरांना घेऊन बलाढ्य मोगल साम्राज्यांशी महाराजांनी लढा दिला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्यासाठी अनमोल असलेल्या निदान काही ठळक घटना कॅलेंडर्स मध्ये लिहिण्यास काय हरकत आहे? केवळ परीक्षेत इतिहासाच्या पेपरात मार्क मिळावे म्हणून तेवढ्यापुरतं ह्या तारखा पाठ केल्याने ह्या घटना लक्षात राहणार नाहीत. कॅलेंडरच्या माध्यमातून ह्याचे स्मरण जास्त चांगल्या प्रकारे राहू शकेल. कालनिर्णय, महालक्ष्मी वगैरे दिनदर्शिकेच्या प्रकाशकांना आमची आग्रहाची विनंती आहे. महाराजांच्या अफाट कार्याची जाणीव आम्हांला राहावी आणि स्फुरण मिळत राहावं ह्यासाठी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आपल्या कॅलेंडर मध्ये हव्यात.

काही लोकांच्या मनात कदाचित असा विचार येईल कि महाराजांच्या जन्मतारखेबद्दलच मतभेद आहेत. त्यामुळे शिवजयंती १९ फेब्रुवारी आणि ६ एप्रिल ह्या दोन दिवशी साजरी केली जाते. ह्या पार्श्वभूमीवर "शाहिस्तेखानावरील 'सर्जिकल स्ट्राईक', पन्हाळगडावरून सुटका, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक” अश्या अनेक घटनांच्या नक्की तारखांबद्दल निष्कारण मतभेद आणि वादविवाद होतील. मात्र मला तर वाटतं कि तारखांबद्दल मतभेद असल्यास दोन्ही दिवस साजरे करावेत. महाराजांनी केलेलं काम इतकं मोठं आहे कि वर्षाचे ३६५ दिवस देखील कमी पडतील!

आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून राजकीय पक्षांना देखील 'शिवप्रताप दिनदर्शिका' काढायची असल्यास जरूर काढावी. प्रकाशनास प्रमुख पाहुण्यांसाठी 'मराठा आरक्षण' असले तरी आमची हरकत नाही. ज्याप्रमाणे 'शूर मर्दाचा पोवाडा, शूर मर्दाने ऐकावा’, त्याचप्रमाणे ह्या कॅलेंडरचे उदघाटन एखादया मराठ्यानेच करावे. मात्र येथे 'मराठा' म्हणजे 'हिंदवी स्वराज्यावर प्रेम करणारा' माणूस असा अर्थ अभिप्रेत आहे. अफजलखानाच्या भेटीसाठी महाराजांबरोबर त्यांचे १० अंगरक्षक होते त्यात 'सिद्दी इब्राहिम' नावाचा 'मराठा' होता. स्वतः अफजलखानाच्या अंगरक्षकात प्रत्यक्ष महाराजांचे २ चुलते (मोहिते) होते आणि त्याचे वकिल कृष्णाजीपंत! हे तिघेही स्वराज्याचे शत्रू म्हणजे मोगलच! ⚔

मोबाईल मधील कॅलेंडर मुळे तारीख-वार बघण्यासाठी रोजचे कॅलेंडर बघण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. केवळ 'भिंतीवरी कालनिर्णय असावे' म्हणून दर वर्षी आपण हौसेने आणतो. मात्र अनेकदा महिना उलटून गेला तरी कॅलेंडरचे पान उलटले जात नाही. संकष्टी चतुर्थी पासून दिवाळीपर्यंत सर्व गोष्टीची आगाऊ सूचना व्हाट्सऍप,फेसबुक इ. वर मिळते. त्यामुळे रोज कॅलेंडर बघण्याची गरज भासत नाही. ह्यासाठी कॅलेंडर खेरीज ह्या ऑनलाईन माध्यमातून देखील महाराजांच्या कार्याबद्दलची जनजागृती व्हायला हवी.

यंदाच्या वर्षी सुट्ट्या जोडून कधी आल्या आहेत ह्यासाठी कॅलेंडर चाळताना ‘५ एप्रिलला शाहिस्तेखानाची बोटे छाटली' हे वाचून अनेकांना सकारात्मक ऊर्जा मिळेल. रोजच्या टेन्शनचा काही काळ तरी विसर पडेल. क्षणभर कल्पना करा की - १३ जुलैला मुसळधार पावसाने सर्वत्र चिखल झालाय आणि ऑफिसला जाणे जीवावर आलंय. त्याच वेळी व्हाट्सऍप वर मेसेज आलाय की आज ह्याच दिवशी महाराज पन्हाळगडावरून सुटले! १५-१६ तास रात्री पावसात चिखल तुडवीत आणि सिद्दी जोहरचा डोळा चुकवीत पळणारे मावळे समोर पडणाऱ्या पावसात दिसायला लागतील. इतके तास चालूनही अवघ्या तीनशे मावळ्यांसह तीन हजार मोगलांशी सहा तास झुंज देणारे बाजीप्रभू पावनखिंडीत तलवार फिरवताना दिसतील. हयामुळे आयुष्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आणि जगण्याची नवी उर्मी मिळेल.

माझी तर खात्री आहे की; अफजलखानाच्या भेटीस महाराज निघाले तेव्हा त्यांनी वाघनखं घेतली नसावीत. अहो, ज्यांच्याकडे बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी मालुसरे, नेताजी पालकर ह्यांसारखे सह्याद्रीचे 'वाघ' आहेत; त्यांना दुसऱ्या कुठल्या वाघाची नखे उसनी आणण्याची गरजच काय? फक्त पाचशे मावळे घेऊन सव्वा लाख फौजेच्या गराड्यात असलेल्या लाल महालात घुसून शाहिस्तेखानावर भवानीचा वार करणारा जिजाऊंचा हा 'ढाण्या वाघ'!! ह्याने स्वतःच्या नखांनेच अफ़जलखानाचे पोट फाडून आतडी बाहेर काढली असणार!!!

हर हर महादेव

सरनौबत

इतिहासविचार

प्रतिक्रिया

दिन विशेष साजरे करून खरेच त्या महान राज्य कर्त्यांची ओळख होणार आहे का? कॅलेन्डर मध्ये कित्येक गोष्टी असतात, आमक्याची जयंती, तमक्याची पुण्यतिथी आणि काय काय. आपल्याला त्या वरून त्या माणसाच्या कर्तृत्वाची ओळख होते का? मग महाराजांना कॅलेन्डर च्या एका चौकडीत उभे करून आपण काय मिळवणार?

माझे म्हणणे एवढेच कि, पुरस्कार करा, पण योग्य जागी करा. त्यांच्या कार्याची ओळख पुढच्या पिढीला, कॉन्टेक्सट मध्ये करून द्या. नाही तर महाराज केवळ सन सनावळीत अडकून राहतील.

बाकी कॅलेन्डर मध्ये चार ठिकाणी त्यांचे नाव पाहून चांगलेच वाटेल यात शंका नाही.

या उन्हाळ्यात अमृतसरला दुसर्‍यांदा भेट दिली. आताचे हरमंदिर आणि त्याचा परिसर पाहुन कोणीही खुश होईल असे होते. तेथे हिप हॉप बसने मुलांना फिरवले. गोविंदगड किल्ल्यात महाराजा रणजितसिंग यांच्यावरचा छोटा त्रिमितीय चित्रपट दाखवला. अगदी उत्तम आणि प्रभावी वाटला. घोडदौड करतांना खुर्ची तशीच हलत होती. बर्फात वाढदिवसाला फवारतो तसा छिडकाव होता. पावसात पाणी अंगावर पडायचे. तेथे शिखांचा इतिहास पाहतांना अगदी जिवंत वाटतील असे पुतळे होते. अंगावरील लव सुध्दा खरी वाटत होती. आम्हा सगळ्यांना आपला मराठ्यांचा ईतिहास आठवला आणि आपल्या करंटेपणावर लाज वाटली. सगळे हाच विचार करीत होते की अशी कोणत्या प्रकारची लढाई नाही जी मराठ्यांनी लढली नाही? भारतात आपल्या इतकी लढणारी जमात कोणती असेल? पण एक तरी माहिती आपण नव्या पिढीला देउ शकलो का? आहे ते गड किल्ले आपल्याला सांभाळता येत नाहीत. शिवाजी, संभाजी, राजाराम ताराराणी, बाळाजी बाजीराव, माधवराव, महादजी, अटकेपार झेंडा, पानीपत एक ना हजार पण ......

शब्दबम्बाळ's picture

11 Nov 2017 - 12:42 am | शब्दबम्बाळ

लेख आवडला!
कालच एका ग्रुपवर एकाने, "शिवप्रताप दिनाच्या शुभेच्छा! खानाला कसे ठार मारले" वगैरे लिहिल्यावर काही जणांनी "कृपया जातीय मेसेज पाठवू नका" असा रिप्लाय दिला! खूप बेक्कार वाटलं... तिथं पण हेच बोललो कि हा इतिहास आपल्या सर्वांचा आहे या प्रदेशाचा आहे त्याला जर आपण केवळ धार्मिक/जातीय अंगाने बघू लागलो तर आपल्या सारखे करंटे आपणच!
पण हे हि तितकंच खरं कि या दिवसांची आठवण ठेवायला काहीतरी खूणगाठ असावी. बऱ्याच वेळा आपण आपल्या कामात व्यस्त असतो कि दिनविशेष ध्यानात देखील येत नाही. मग अशाच एखाद्या ग्रुपवरून ध्यानात येते. थोडावेळ इतिहासात रमता येते.

पण इतिहासात झालेल्या घटना आता कितीही रम्य वाटत असल्या तरी वर्तमानात आपण कुठे चाललोय याकडे देखील लक्ष असणे गरजेचे आहे! तर त्या इतिहासाला आपण न्याय देऊ शकू असे वाटते...

जेम्स वांड's picture

11 Nov 2017 - 11:20 am | जेम्स वांड

एकीकडे तुम्ही कॅलेंडर वर शिवप्रताप महिमा छापला गेला पाहिजे म्हणता, दुसरीकडे कॅलेंडर वाचायची पद्धत पण कमी झाली आहे असं नमूद करताय..... भाई कहना क्या चाहते हो??

सरनौबत's picture

12 Nov 2017 - 5:57 pm | सरनौबत

ही कल्पना मुळात कॅलेंडर बघताना सुचली म्हणून तो विचार प्रथम मांडला. ह्या तारखा स्मरणात ठेवण्याचे इतर उपाय ह्यावर विचार करीत असताना फेसबुक, कायप्पा इ. सुचलं म्हणून जाता-जाता ते मांडलं.

माहितगार's picture

11 Nov 2017 - 8:00 pm | माहितगार

तत्वतः थीम कॅलेंडर्स शालेय आनि स्पर्धा परिक्षांना बसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी उत्तम कल्पना आहे. तिथ्यांचे तारखांमधले कनव्हर्शन पद्धत हा मुद्दा विवाद्य राहू शकतो पण त्या काळात आजची प्रमाण ग्रेगोरीयन तारीख काय राहीली असती हे प्रमाण स्विकारण्याची एक उजवी बाजू एका विशीष्ट तारखेस जगातल्या कोणत्या कोपर्‍यात कोणत्या वर्षी नेमके काय घडत होते हे लक्षात घेणे आणि तारखा लक्षात ठेवणे सोपे जावे. जसे २ ऑक्टोबर लाल बहादूर शास्त्रींचा जन्म दिवस आणि महात्मा गांधींचा मृत्यू दिवस तसेच ३१ ऑक्टोबर बबत सरदार पटेल - इंदिरा गांधी अशा जोड्या लक्षात ठेवणे विद्यार्थ्यांना सोपे जावे.

डिजीटल की छापील ? मला वाटते दोन्ही माध्यमात उपलब्ध असण्यास हरकत नसावी . अर्थात इतर समस्या आहेत जसे इतिहासाच्या अभ्यासात प्रमाण साधनांच्या आग्रहा बद्दल सर्वसाधारणपणे महाराष्ट्रीय माणूस कच्चा राहीला आहे. इतिहासाकडे प्रेरणेपेक्षा अस्मीतेला अधिक मोल दिले जाण्याच्या समस्या, सर्वसामान्य माणूस मानसिक दृष्ट्या इतिहासात जगू लागणे आणि आजच्या परिस्थितीस केवळ तत्कालीन उपाय योजना करण्याचे आग्रह प्रेरणादायक रहाण्या एवजी आजच्या परिस्थितीतील निर्णय आजच्या प्रमाणे घेण्या आड बेड्या होणार नाहीत हे पहाणेही गरजेचे असावे. असो.

माहितगार's picture

13 Nov 2017 - 11:17 am | माहितगार

दोन ऑक्टोबर गांधी चा जन्मदिन आहे !

सरनौबत's picture

12 Nov 2017 - 5:49 pm | सरनौबत

धन्यवाद. तुमच्या विचारांशी सहमत

सांरा's picture

12 Nov 2017 - 6:28 pm | सांरा

कोणी मला तारखांचे संकलन करून देत असेल, तर मी अँप बनवू शकतो.

दोन ऑक्टोबर गांधी चा जन्मदिन आहे .

माहितगार's picture

13 Nov 2017 - 11:16 am | माहितगार

:) सॉरी अशी पण चूक झाली . क्षमस्व !