दवणीय अंडी - अंडे ३रे - शाळेची ऊब

आदिजोशी's picture
आदिजोशी in जनातलं, मनातलं
7 Nov 2017 - 3:00 pm

आज कैक वर्षांनी शाळेच्या गॄपने त्यांच्या बॅचचे स्नेहसंमेलन करायचे ठरवले होते. तसा बाब्या इतक्या वर्षांनी सगळ्यांना परत भेटण्यास शष्पभरही उत्सुक नव्हता. प्रत्यक्ष शाळेत असतानाही बाब्याची शाळेत जायची अजिबात इच्छा होत नसे.

एक तर ह्या शाळेच्या गॄपने त्याला वात आणला होता. रोज सकाळी गुरु = देव, शाळा = देवालय, विद्यार्थी = दगड, शिक्षक = मूर्तीकार असले मेसेज वाचून त्याचं डोकं उगाच सरकायचं. लोकांना शाळेच्या आठवणीने भरून वगैरे यायचं, आपण आज आहोत ते शाळे मुळे वगैरे जिलब्या तर नेहेमीच्याच होत्या. पण आपल्या आजच्या कारकुनी आयुष्यात शाळेचे योगदान नक्की काय हे बाब्याला न सुटलेले कोडे होते. बाब्याच्या शाळेच्या आठवणी एक तर अत्यंत त्रासदायक अथवा न्युट्रल ह्या प्रकारात मोडणार्‍या होत्या. सगळ्यात त्रासदायक आठवण म्हणजे तो नववीत असताना शाळेने सुरु केलेला सार्वजनीक रक्षाबंधनाचा आचरटपणा. ज्या वयात वॅलेंटाईन डे साजरा करायचा त्या वयात जबरदस्तीने सगळे सगळ्यांचे वर्गबंधू आणि वर्गभगीनी. पुढे जाऊन ह्यातल्याच २-४ वर्गबंधू-भगिनींनी लग्नही केले होते.

जसजसा दिवस जवळ येऊ लागला तशी गॄपवर स्नेहसंमेलनाची चर्चा जोरात रंगू लागली. अमेरिकेत नोकरीला असलेला एक वर्गमित्र आणि अमेरिकेत नोकरीला असलेल्या मुलाशी लग्न करून अमेरिकेत गेलेली एक वर्गमैत्रीण हे खास ह्या संमेलनासाठी येणार असल्याने खास त्यांच्या सोयीची तारीख ठरवण्यात आली. ह्यावर 'आम्ही काय रिकामे पडलोय काय?' असा प्रश्न बाब्याने अर्थातच मनातल्या मनात विचारला. खरं तर ते दोघं भलत्याच कामासाठी इथे येणार असल्याने एकाच मांडवात दोन्ही लग्न उरकून घेऊ असा विचार करून त्यांनी संमेलनाची तारीख त्यांच्या सोयीने ठरवायला भाग पाडलं होतं.

पण एका गोष्टीसाठी बाब्याला शाळेत जायचं होतं ते म्हणजे मास्तरांना भेटणे. ज्यांनी आपले शालेय जीवन अत्यंत असह्य केले ते सगळे मास्तर लोक आता नक्की कसे आहेत आणि इतक्या वर्षांनी आपल्याला सर ओळखतील का हे त्याला जाणून घ्यायचं होतं. कैक वर्षांपूर्वी एकदा त्याला समोरून येताना बघून मराठीच्या सरांनी रस्ता बदलला होता हे त्याला अजूनही आठवत होतं. गणिताचे सर पाढे विचारतील ह्या भीतीने तो कैक वर्ष त्यांना बघून स्वतःच रस्ता बदलत असे.

होता होता तो दिवस उजाडला. बाब्या तसा शाळेसमोरून बर्‍याच वेळा जात असे पण आज जवळपास २० वर्षांनी त्याने शाळेत पाऊल ठेवलं. सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. ह्या पायरीवर आपटलो होतो, ह्या कोपर्‍यात उभे असायचो, ह्या बाल्कनीमधे ओणवे असायचो, ह्या खिडकीची काच आपण फोडली होती मग सरांनी आपल्याला तडकवले होते...

अमेरिकेहून आलेल्या मैत्रीणीने ऐनवेळी टांग दिल्याने दोन चार मित्र गळले होते. अमेरिकेहून आलेल्या मित्राच्या भोवती सगळे गोळा होऊन सिंदबादच्या सात सफरी ऐकत होते. मित्रही आपल्याला अमेरिकेत असल्याचा अभिमान नसल्याचा आव आणून जसं बोलता येईल तसं बोलत होता.

मुलांचा, आम्ही अजून कसे फिट आहोत हे दाखवण्याचा आणि मुलींचा, आम्ही अजून कशा अवखळ आहोत हे पटवण्याचा आटापिटा सुरु होता.

इतर प्रजा इतस्ततः पसरली होती. आपण इथे का आलो हा एकमेव विचार बाब्याच्या मनात होता.

एका बाजूला सगळे शिक्षक होते. त्यातल्या एक सरांच्या समोर बाब्या जाऊन उभा राहिला आणि त्याने विचारलं...
ओळखलंत का सर मला?
सर अत्यंत आनंदाने म्हणाले... अर्थातच ओळखलं. कसा आहेस? काय चाललंय सद्ध्या? XXXX XXXXX XXXX XX XXXXXX? XXXX XXXXX XXXX XX XXXXXX?
बाजूच्या इतर मुलांनाही त्यांनी तेच प्रश्न विचारल्याने बाब्या काय ते समजला. पुढे दिसले त्यांचे मुख्याध्यापक. इतकं वय होऊनही ते आले होते. ह्यांचं आणि बाब्याचं साताजन्माचं वैर असल्यागत ते बाब्याला कुदवायचे.
त्यांच्या समोर जाऊन बाब्या उभा राहिला आणि त्यांना विचारलं...
ओळखलंत का सर मला?
सरांनी त्याला एकदा न्याहाळलं आणि प्रेमाने विचारलं... कसा आहेस काशी?
बाब्याची तार सटकली. काशी हा शाळेचा घंटा बडवणारा प्यून होत. काशी समजल्याचा राग नाही, पण, ज्याला तुम्ही इतकी वर्ष घंटेसारखं बडवलत त्याला तुम्ही ओळखू नये ह्याचा बाब्याला प्रचंड सात्विक संताप आला. राग आणि अपमान गिळून बाब्या पुढे गेला.

दोन शिक्षिका गप्पा मारत बसल्या होत्या. त्यातल्या एक भुगोलाच्या शिक्षिका होत्या, दुसर्‍या त्याला आठवत नव्हत्या. बाब्याने बाईंना वाकून नमस्कार केला आणि तसाच शेजारच्या बाईंनाही केला. त्या बरोब्बर त्या दुसर्‍या बाई उठून उभ्या राहिल्या, बाब्याच्या पाठीत एक जोरात गुद्दा घातला आणि वैतागून म्हणाल्या 'अरे डुकरा नमस्कार कसला करतोस... वर्गात होते मी तुझ्या...' लगेच त्याच्याही डोक्यात प्रकाश पडला. इतकी वर्ष होऊनही आपल्या वर्गमैत्रीणी तशाच हिंसक आहेत हे जाणवून त्याला जरा बरे वाटले.

नंतर भाषणं झाली. त्यात आपल्याला शाळेने कसं घडवलं, शाळा नसती तर मी नसतो, आई वडिलांपेक्षाही शिक्षकांनी कसं समजून घेतलं, शाळेचा बिल्ला अजून कसा जपून ठेवलाय, एमबिएपेक्षा शाळेत मॅनेजमेंट जास्त शिकलो, शाळेतल्या खेळाची मजा ऑलिंपिक गेम्सनाही कशी नाही... असे कैक मुद्दे मांडले गेले. चॅलेंज गेम मधे एकाने दोन एक्के टाकल्यावर पुढच्याने ३ एक्के म्हणावं तसला प्रकार होता सगळा. एका भाषणात तर इतकी गोल गोल भाषा होती की हे आपले शिक्षक अर्जुनाला गीता सांगणार्‍या कॄष्णाचेच अवतार आहेत ह्याची बाब्याला खात्री पटली. शिक्षकांना हे आधीपासून माहिती होतेच.

एकदंरीत आजचा दिवस फुकट गेला असं बाब्याच्या मनात आलो. त्यापेक्षा ४ तास घरी झोपलो असतो.

संमेलन संपता संपता एक सर भेटले. इतर शिक्षकांप्रमाणेच हे सुद्धा आपल्याला नक्की ओळखणार नाहीत ह्याची खात्री बाळगून बाब्याने विचारलं...
ओळखलंत का सर मला?
त्यावर ते ओळखीचं हसून म्हणाले... अजूनही पेन्सिल खातोस का?

हे ऐकल्यावर मात्र बाब्याचा बांध फुटला. तो हमसून हमसून रडायला लागला. 'ओळखलंत का सर मला?' ह्या प्रश्नाचं उत्तर त्याला एकदाचं मिळालं होतं.

आपला,

आदि जोशी

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

7 Nov 2017 - 3:44 pm | पद्मावति

मुलांचा, आम्ही अजून कसे फिट आहोत हे दाखवण्याचा आणि मुलींचा, आम्ही अजून कशा अवखळ आहोत हे पटवण्याचा आटापिटा सुरु होता. खिक्क..एक नंबर लिहिलंय हो. मस्तं चाललीय मालीका.

पुंबा's picture

7 Nov 2017 - 3:45 pm | पुंबा

हाहाहा.. मस्त!!

बाब्याच्या पाठीत एक जोरात गुदा घातला

हे भलतंच म्हणायचं..

मंजूताई's picture

7 Nov 2017 - 4:03 pm | मंजूताई

मस्त हलकीफुलकी लेखमाला :)

प्राची अश्विनी's picture

8 Nov 2017 - 8:30 am | प्राची अश्विनी

+11

अनन्त्_यात्री's picture

7 Nov 2017 - 4:19 pm | अनन्त्_यात्री

दिवस आठवून सदगदित झालो.

स्वाती दिनेश's picture

7 Nov 2017 - 4:50 pm | स्वाती दिनेश

हे अंडे पण मस्तच!
स्वाती

एस's picture

7 Nov 2017 - 4:52 pm | एस

साला आमचा प्रॉब्लेम उलटा आहे. झाडून सगळे हयात शिक्षक-शिक्षिका आणि तेव्हाची मुले-मुली मला अजूनही कुठेही भेटले तरी ओळखतात. पण मला चार-दोनजण वगळता काही म्हणजे काही केल्या आठवत नाही ही व्यक्ती कोण ते! ;-) त्यामुळे शाळेच्या असल्या कार्यक्रमांना जाणं बंद केलं! :-P

बाकी लेख एकच नंबर!

किसन शिंदे's picture

7 Nov 2017 - 5:42 pm | किसन शिंदे

आदि, तुझी अंडी दवणीय न होता वाचनीय होत चालली आहेत असे सांगू इच्छितो.

लेखातल्या काही पंचेसवर जोरजोरात दात काढलेयंत इथे ऑफिसातच बसून. =))

सूड's picture

7 Nov 2017 - 5:44 pm | सूड

लेख एकच नंबर!!

आनन्दा's picture

7 Nov 2017 - 5:48 pm | आनन्दा

मस्त.

सिरुसेरि's picture

7 Nov 2017 - 5:57 pm | सिरुसेरि

दवणीय साहित्याचा संदर्भ न घेताही हा लेख मस्त झाला आहे .

टवाळ कार्टा's picture

7 Nov 2017 - 6:07 pm | टवाळ कार्टा

आवडेश

धर्मराजमुटके's picture

7 Nov 2017 - 6:07 pm | धर्मराजमुटके

तिनही लेख छान ! मस्तच !
आमचेही असेच कैक वर्षांनी शाळेच्या गॄपचे स्नेहसंमेलन भरले होते मागे एकदा. वर्गातील काही मुली तेव्हा सुंदर होत्या आणि जवळपास अर्धा वर्ग त्यांच्यावर फिदा असायचा.मात्र त्या कोणाच्याही हाती लागल्या नाही. त्या आठवणी जाग्या झाल्या पोरांच्या.

मुलींसमोर कोणी बोलले नाही पण मुलामुलांत (म्हणजे बाप्याबाप्यांत) चर्चा चालूच होती. मला बोलायला मिळाल्यावर मी हा चान्स सोडणे शक्यच नव्हते. मी म्हणालो 'की आम्ही मुले तुम्हा मुलींपेक्षा अधिक भाग्यवान आहोत. आम्हाला लेटेस्ट मॉडेलच्या बायका मिळाल्या पण तुम्हाला मात्र तुमच्यापेक्षा जुनी मॅनीफॅक्चरींग डेट असलेले नवरे मिळाले !'

पोरं कसली खुश झाली म्हणून सांगता या वाक्यावर :) :)

सुबोध खरे's picture

7 Nov 2017 - 6:29 pm | सुबोध खरे

तिन्ही लेख सुंदर आहेत आणि ते ही चढत्या भाजणीने.
एक एक वाक्य वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद झाला.
रोज सकाळी गुरु = देव, शाळा = देवालय, विद्यार्थी = दगड, शिक्षक = मूर्तीकार असले मेसेज वाचून त्याचं डोकं उगाच सरकायचं.
लोकांना शाळेच्या आठवणीने भरून वगैरे यायचं, आपण आज आहोत ते शाळे मुळे वगैरे जिलब्या तर नेहेमीच्याच होत्या.
पण आपल्या आजच्या कारकुनी आयुष्यात शाळेचे योगदान नक्की काय हे बाब्याला न सुटलेले कोडे होते.

प्रत्येकाच्या आयुष्यात एक किंवा दोन चांगले शिक्षक येतात बाकीचे बहुतांश पाट्या टाकणारेच भेटतात.

मूकवाचक's picture

8 Nov 2017 - 10:03 am | मूकवाचक

+!

आजचे अंडे अंमळ कडवट आहे असे नमूद करतो

दुर्गविहारी's picture

7 Nov 2017 - 7:57 pm | दुर्गविहारी

हा हा हा !!!!! मस्तच लिहीलय.

गामा पैलवान's picture

7 Nov 2017 - 9:02 pm | गामा पैलवान

अंडं खमंग आहे. पण दवणीय वाटलं नाही.

-गा.पै.

सतिश म्हेत्रे's picture

7 Nov 2017 - 10:28 pm | सतिश म्हेत्रे

सरांनी बाब्याला ओळखले का? का ते ही सर्वांना सारखाच प्रश्न विचारत होते "अजूनही पेन्सिल खातोस का?"

दवणीय दर्जाच्या फार वर राहीला की हो लेख. :)
मस्त खुमासदार झालाय लेख. काही पंचेस तर फारच भारी. पण अगदी शेवटच्या वाक्यापर्यंत अश्रूंचे पाट वगैरे न वाहील्याने दवणीय लेखनाची अनुभूती फारशी आली नाही. ;)

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Nov 2017 - 12:50 am | अमरेंद्र बाहुबली

मस्त

पर्णिका's picture

8 Nov 2017 - 8:02 am | पर्णिका

आवडलं.

नाखु's picture

8 Nov 2017 - 8:56 am | नाखु

नसून (धुवणीय) आहे

उमाळे, उसासे पेष्षल वाल्यांना

बाकीचा साक्षीदार नाखु

मालक, तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुम्हाला तुमच्या लेखनाचा दर्जा खाली आणता येत नाहीये. तुमचे लेखन चांगले होतय दवणीय नाही.

दवणीय लेख वाचुन एक तर ओकारी होण्याची भावना होते किंवा लेखकाच्या तोंडात मारावीशी वाटते.

महेश हतोळकर's picture

8 Nov 2017 - 10:26 am | महेश हतोळकर

असेच म्हणतो.

एवढं वाईट लिहिण्याची कला अंगातच लागती. तुम्हाला नाही जमायचं ते.

आदी अॅडीचा फॅन
महेश

सुबोध खरे's picture

8 Nov 2017 - 10:29 am | सुबोध खरे

असेच म्हणतो.
"राज कुमार"च्या भाषेत
शेर भलेही बूढा हो जाये
घास कभी नही खाता

संजय पाटिल's picture

8 Nov 2017 - 11:22 am | संजय पाटिल

+१०० सहमत...

झेन's picture

8 Nov 2017 - 11:42 am | झेन

एका भाषणात तर इतकी गोल गोल भाषा होती की हे आपले शिक्षक अर्जुनाला गीता सांगणार्‍या कॄष्णाचेच अवतार आहेत ह्याची बाब्याला खात्री पटली. शिक्षकांना हे आधीपासून माहिती होतेच. जबरदस्तच.

छान लिहील आहे. मला आमच्या दहावीच्या बॅचच्या गेट टुगेदरची आठवण झाली.

सानझरी's picture

8 Nov 2017 - 1:43 pm | सानझरी

मस्तं लिहिलंय!!

मोदक's picture

8 Nov 2017 - 1:51 pm | मोदक

ह्या ह्या ह्या. भारी..!!!

"अंडे पेरणारा माणूस" असे एखादे चरित्र लिहिल्याशिवाय आता तुझे अवतारकार्य पूर्ण होणार नाही..!

वानगीदाखल हे पहा (खासकरून शेवटचे वाक्य)-
"लपंडाव, शिवाशिवी, हुतूतू हे नेहमीचेच; पण आमराईत आंब्यांच्या घमघमाटानं वसंत दरवळला की वार्‍याने पडलेले आंबे वेचायला सतीश सर्वांच्या पुढे असे. भीती ही गोष्ट सतीशला माहीतच नसावी. म्हणूनच शाळेतनं येता-जाता एखाद्या उनाड म्हशीच्या पाठीवर बसण्यात त्याला गंमत वाटे. इतर जण पायी चालत असताना जणू निसर्गाने दिलेली ब्लॅक फोर-व्हीलरच! घरचा धाकदपटशा असूनही कष्टाच्या ताकाचं रुपांतर आनंदाच्या लोण्यात होऊन जाई."

ख्या ख्या ख्या!!
ही खरी दवनीयता.

सस्नेह's picture

8 Nov 2017 - 2:47 pm | सस्नेह

दोन शिक्षिका गप्पा मारत बसल्या होत्या. त्यातल्या एक भुगोलाच्या शिक्षिका होत्या, दुसर्‍या त्याला आठवत नव्हत्या. बाब्याने बाईंना वाकून नमस्कार केला आणि तसाच शेजारच्या बाईंनाही केला. त्या बरोब्बर त्या दुसर्‍या बाई उठून उभ्या राहिल्या, बाब्याच्या पाठीत एक जोरात गुद्दा घातला आणि वैतागून म्हणाल्या 'अरे डुकरा नमस्कार कसला करतोस... वर्गात होते मी तुझ्या...' लगेच त्याच्याही डोक्यात प्रकाश पडला. इतकी वर्ष होऊनही आपल्या वर्गमैत्रीणी तशाच हिंसक आहेत हे जाणवून त्याला जरा बरे वाटले.

..लोल !

माझ्या डोळ्यासमोर तो सीन उभा राहिलाय

पैसा's picture

8 Nov 2017 - 7:20 pm | पैसा

मस्त, खुसखुशीत!!

स्मिता.'s picture

8 Nov 2017 - 9:19 pm | स्मिता.

हा लेख दवणीय नसला तरी तो वाचून मनात शाळेबद्दलच्या दवणीय (आणि हळव्या) आठवणी जाग्या झाल्या ;)

मित्रहो's picture

9 Nov 2017 - 9:34 am | मित्रहो

आज एकसाथ तीनही वाचले मस्त आहेत. दवणीय अजिबात नाही. तीनही एकदम मस्त. नात्यांची श्रींमंती आणि हा शाळेची उब मस्त.
शाळेचा व्हॉअॅ ग्रुप म्हणजे वैताग असतो. ते अमेरीकावाले त्यांना तिथे बसून उगाच शाळेच्या नावाने उचक्या लागत असतात. शाळेत असताना एक शब्द न बोललेल्या मुली काय जेवण झाले की नाही असे प्रश्न विचारतात. कुठल्याही ग्रुपचा असतो तो वैताग म्हणजे फॉरवर्ड.

पगला गजोधर's picture

9 Nov 2017 - 9:40 am | पगला गजोधर

आदी जोशी जी,
कृपया बॅटिंग करायला आल्यावर निदान दोन चार ओव्हरा तरी सिंगल घ्या राव,....
काय आहे हे !! पहिल्या बॉल पासूनच चौके छक्के ....
तेही मैदानाबाहेर...

लोकांना शाळेच्या आठवणीने भरून वगैरे यायचं, आपण आज आहोत ते शाळे मुळे वगैरे जिलब्या तर नेहेमीच्याच होत्या. पण आपल्या आजच्या कारकुनी आयुष्यात शाळेचे योगदान नक्की काय हे बाब्याला न सुटलेले कोडे होते ................... +१११११

बबन ताम्बे's picture

13 Nov 2017 - 10:38 am | बबन ताम्बे

आमच्या गेट टुगेदरची आठवण आली.
एक एक पंचेस जबदस्त !!

सुखीमाणूस's picture

14 Nov 2017 - 3:23 pm | सुखीमाणूस

मजा आली वाचताना.

सुबोध खरे's picture

14 Nov 2017 - 3:39 pm | सुबोध खरे

आदी नाथ
चौथा भाग लवकर येऊ द्या राव-_/\_

सुबोध खरे's picture

14 Nov 2017 - 3:39 pm | सुबोध खरे

आदी नाथ
चौथा भाग लवकर येऊ द्या राव-_/\_

अतरंगी's picture

18 Nov 2017 - 1:06 pm | अतरंगी

फारच आवडले आहे....