आज पडलेलं स्वप्न

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
7 Nov 2017 - 1:25 am

आज दुपारी झोपले असताना पडलेलं स्वप्न .. यात काही माणसंही होती पण ते बहुधा निरर्थक होतं ....

सुरुवात अशी झाली की कोणतंतरी नाटक होणार आहे , स्टेज लागलं आहे , माणसं येऊन खुर्च्यांवर बसली आहेत . गर्दी जमली आहे . आणि मी विंगेत नाटकातल्या 2 कलाकार मुलींना नाटकाचे भरजरी कपडे , दागिने , वेणी वगैरे चढविण्यासाठी मदत करत आहे ... त्यातली एक मुलगी माझी मैत्रीण आहे . तिथून पुढचा सिन - मी मागच्या रांगेतल्या एका खुर्चीवर येऊन बसते नाटक पाहण्यासाठी , ही जागा मला त्या दोघींपैकी कुणीतरी मिळवून दिली आहे नाहीतर गर्दीत जागा मिळणं शक्य नव्हतं ..... तिकीट बिकिट प्रकार नसावा .... जे आधी येऊन खुर्च्या अडवतील ते नाटक पाहू शकतील असा शाळा / कॉलेजच्या गॅदरिंग मधल्या नाटकासारखा प्रकार असावा . तर मी त्या खुर्चीवर बसल्यावर काहीतरी गडबड होते , मी तिथे बसणं अपेक्षित नसतं .. पुढच्या रांगेत डायरेक्टर मंडळींपैकी कोणीतरी बसलेले असतात ते वळून माझ्याकडे रागाने पाहू लागतात . मी विचारते मी जाऊ का इथून ? तर ते जा ... इथे का बसलीस व अजून काहीतरी म्हणतात ... मी दप्तर पाठीला लावून तिथून निघते ( शाळा संपून 7 - 8 वर्षं झाली पण शाळेचं दप्तर होतं ) आणि घरी येते . मला किंचित राग आलेला असतो . घरी आल्यावर मी घराच्या मागील अंगणात जाते ... तिथे एका उंचशा दगडावर चढते .... कसा कोण जाणे तो दगड एका मजल्याच्या उंचीचा असतो म्हणजे गच्चीवर गेल्यासारखं मला तिथून खालचं , लांबचं सगळं दिसू लागतं . तिथून मला ते नाटक , स्टेज, ऑडीयन्स सगळं दिसू लागतं .. थोडासा आवाजही पोहोचत असतो . मी मनात म्हणते आता छानपैकी पाऊस पडून यांचा सगळा शोच फिस्कटू दे .... ऑडियन्स बसले होते त्यावर छप्पर वगैरे काही नव्हतं . एव्हाना मला मैत्रीण त्याच नाटकात काम करत आहे हे मुळीच लक्षात नसतं . मी त्या दगडावरून उतरते आणि सहज वर आकाशात पाहते .... इथून पुढचं स्वप्न अतिशय विचित्र , विविड , सत्यतेचा आभास निर्माण करणारं होतं .

आकाशात शार्कची एक आकृती होती .... ढगांतून निर्माण झालेली नाही ... ढग नव्हतेच ... निरभ्र आकाशात पांढऱ्या ब्रशने काढावी तशी सुस्पष्ट आकृती.... चित्रच . पण पोकळ चित्र , आत कोणतेही डिटेल्स नाहीत .... एखाद्या लहान मुलाने पाटीवर पेन्सिलीने काढावं तसं शार्कचं चित्र .... अर्धा वीत जाडीची त्याची बाह्यरेषा होती .... आणि ते असं विचित्र थ्री डी पद्धतीत तिरकं तरंगत होतं आकाशात की दूरवरून तो शार्क पृथ्वीच्या दिशेने येत आहे असा भास होत होता , शेपटी धुक्यात दिसत नव्हती पण ती पाठी आहे असा आभास होत होता . प्रत्यक्ष गती / हालचाल नव्हती ... आणि सगळ्यात भयंकर गोष्ट या शार्कच्या चेहऱ्यावर एक प्रचंड भेसूर हास्य होतं .... सेम टू सेम फाईंडिंग निमो मधल्या शार्कच्या चेहऱ्यावरच्या हास्यासारखं . ही शार्कची आकृती अवाढव्य होती ... दिसत होती एखाद्या मोठ्या ढगाएवढीच पण प्रत्यक्ष आकार सूर्यापेक्षा लाखो पटीने मोठा असावा अशी कल्पना होत होती ....

ती आकृती आणि ते भयानक हास्य पाहून मी घाबरले . तर सूर्याची प्रचंड कडा दिसली ... म्हणजे सूर्य नेहमी दिसतो तेवढा मुठी एवढ्या गोळ्याच्या आकाराचा दिसला नाही तर खूप जवळ आला असावा तसा डोक्यावरचं अर्धं आकाश व्यापून टाकण्याएवढा जवळ आल्यासारखा वाटला पण उष्णता किंवा तेवढा उजेड नव्हता ... फक्त दोन्ही हातांच्या कवेत मावेल एवढी लखलखती तेजस्वी कडा डोळे दिपवत होती ... आरशात सूर्यप्रकाश घेऊन कवडसा डोळ्यावर मारल्यावर डोळे दिपतात तशी .... मग क्षणभर आकाशात भरदिवसा अनेक सूर्य , अनेक चंद्र आणि तारे दिसले ... संपूर्ण आकाश लखलखत होतं .... आणि दिवसाचा प्रकाश होताच ... साधारण सायंप्रकाश म्हणता येईल .

मी चटकन घरात शिरले ... हा प्रचंड शार्क सूर्य चंद्र तारे आकाशगंगा गिळत या दिशेने येतो आहे याची खात्री पटली ... याबाबत काहीच करता येणार नाही ..... आता होणार तरी काय ? या भीतीने मी व्याकुळ झाले होते . आणि तेवढ्यात बाहेर पाऊस पडू लागला , बाहेरच नाही तर घरातही ... ऍसिडचा पाऊस ... लाल रंगाचा चिखल सदृश्य ऍसिडचा पाऊस ... क्षणभर मला वाटलं कुठून मघाशी पाऊस पडावा अशी दुष्ट इच्छा केली .... आता ते सगळे मरतील .... हे मला नको होतं ... असं काही मी चुकूनही इच्छिलं नसतं .. देवा ..... डोकं धरून बसायची वेळ आली ... पण पाऊस घरातही पडत होता ... त्यापासून वाचण्याकरता टेबलाखाली वगैरे लपावं लागलं तरी थोडा लाल पुंजका हातावर पडला आणि चटका लागला ..... आता एलिअन्स पृथ्वीवर आक्रमण करणार असं बोलणं सुरू झालं ... अशी अफवा पसरली आणि संरक्षण कसं करायचं याचा विचार करण्याआधी ते आले देखील ...

नुकताच ऍसिडचा पाऊस थांबला आणि एलिअन्स आले ... घरातल्या खोलीची दोन्ही दारं लावली होती मी आणि घरचे त्या खोलीत होतो ... आणि 2 किंवा जास्त एलिअन्स दोन्ही दारांकडे आले होते ... त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नाही पण ते काळ्या रंगाच्या जग्वार चित्त्यासारखे दिसणारे पण आकाराने लहान एखाद्या मोठ्या कुत्र्याएवढे प्राणी होते हे कळलं होतं .... कसं कोण जाणे ......

दारं उघडायला त्यांना फार वेळ लागणार नव्हता आणि आत आल्यावर ते आम्हाला मारून खाणार होते . भीतीने जीव अगदी गोळा झाला होता ... सुटकेचा कोणताच मार्ग नव्हता . आता फक्त एकच आशा होती की हे सगळच्या सगळं दुःस्वप्न असेल ... आणि मनापासून देवाची प्रार्थना केली . .. let it be a nightmare ...... Please let it be a nightmare...

आणि जाग आली ..... जाग आल्यावरही जगावर आणि आपल्यावर कोणतंही संकट आलेलं नाहीये , सगळं ठीक आहे , आकाशगंगा गिळणारा शार्कही नाही आणि माणसांना मारणारे काळे एलियन चित्तेही नाहीत ..... हे पटायला 2 - 3 मिनिटं जावी लागली .

आणखी कोणाला अशी साधारण सुसंगती असलेली , जाग आल्यावरही लक्षात राहणारी , विचित्र स्वप्नं पडतात / पडली आहेत का ? या स्वप्नांना अर्थ काहीच नसतो पण अगदी जिवंत अनुभवातून गेल्याचा भास होतो ..... अशी स्वप्नं कोणाला पडली आहेत ?

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

स्मिता.'s picture

7 Nov 2017 - 3:21 am | स्मिता.

लईच इंटरेस्टिंग स्वप्न पडलं!

मला तर नेहमी एकाच प्रकारचं स्वप्न पडतं. शिक्षण संपून दशक उलटून गेलंय पण स्वप्नात काही दिवसांनी परीक्षा असते आणि काही ना काही कारणाने मी पुस्तक उघडूनही पाहीलेलं नसतं, वाचन/अभ्यास तर फार दूरची गोष्ट! जसजसा परीक्षेचा दिवस जवळ येतो तसा मनावरचा ताण प्रचंड प्रमाणात वाढत जातो. मात्र परीक्षेचा प्रसंग कधीच दिसत नाही. नेहमी त्याआधीच जाग येते.

मलासुद्धा परीक्षा आहे आणि अभ्यास अजिबात केला नाहीये हे स्वप्न दर थोड्या दिवसांनी पडतंच ! पण काहीवेळा प्रत्यक्ष परीक्षाही दिसते .. पेपर मधले प्रश्न अत्यंत क्लिष्ट , अगम्य आणि प्रत्यक्ष शाळेत शिकवलेल्या अभ्यासक्रमाशी काडीचाही संबंध नसलेले असतात .... पेपर पॅटर्नही काहीतरी वेगळाच असतो .... मला काय लिहावं समजत नसतं आणि बाकीची सगळी मुलं व्यवस्थित पेपर सोडवत असतात .

परीक्षा आणि पेपर ही स्वप्ने हमखास सर्वांना, अगदी प्रौढ वयातही पडतात.
मला बरेचदा अजूनही स्वप्न पडते की मी पेपर द्यायला गेले आहे आणि परीक्षा हॉल रिकामा आहे. चौकशी केल्यावर समजले की पेपर कालच होता :)

मला बहुधा स्वप्न पडत नाहीत किंवा ते लक्षात राहत नाहीत. लक्षात असणारी बहुतेक स्वप्ने भीतीदायक आहेत किंवा विचित्र आहेत.
मला एकदा "चिता जळते आहे , मी तिथे उभा आहे बाकी कोणीच नाही. चिता पण माझीच आहे." हे स्वप्न पडले.
स्वप्न पडले तेव्हा मी झोपेत असून हे स्वप्न आहे याची मला कल्पना होती. एखाद्या आर्ट मुव्ही प्रमाणे त्या स्वप्नात पण पुढे काहीच झाले नाही. कंटाळून मी उठून बसलो आणि स्वप्न संपले.

हॅलोविन जोरदार साजरा झालेला दिसतोय तुमचा.
तुमचे स्वप्न म्हणजे शार्कनेडो + एलियन्स चा पुढचा भाग आहे.
एलियन्स वर फारएन्ड ने लिहावे.

मलाही बऱ्याचदा हे स्वप्न आहे याची कल्पना असते ... मला रोज स्वप्नं पडतातच आणि साधारण लक्षातही राहतात पण त्यातल्या त्यात सुसंबद्ध आणि व्यवस्थित लक्षात राहण्यासारखी स्वप्न क्वचितच पडतात ... ह्या वर लिहिलेल्या स्वप्नासारखी .... डॉक्टर हू सिरिअल पाहत असल्यामुळे एलियन्स , बॅकग्राउंड , ग्राफिक्स वगैरे मस्त 3d नि hd पाहता येतात स्वप्नात ... शिवाय प्रत्यक्ष धोका नाही

तुषार काळभोर's picture

7 Nov 2017 - 8:00 am | तुषार काळभोर

फुल्ल जव्हेरगंज स्टाईल स्वप्न!! :)

मला कायम हापिसात काहीतरी ब्रेकडाऊन झालाय असं स्वप्न पडतं. SAP, इंटरनेट, MES हे सगळं बँड पडलंय, असं नाईटमेअर लै वेळा असतंय.

nishapari's picture

7 Nov 2017 - 10:14 am | nishapari

☺️☺️

पगला गजोधर's picture

7 Nov 2017 - 9:10 am | पगला गजोधर

C

विनिता००२'s picture

7 Nov 2017 - 9:29 am | विनिता००२

ब्लू व्हेल विषयी जास्त वाचले की काय तुम्ही :)

थोडं फार वाचलं होतं .... ☺️

मलाही पडतात. उंचावर गेल्याची, पाण्यात असल्याची. पूर्वी आकाशत नक्षी वगैरे झालेली दिसायची.

प्रमोद देर्देकर's picture

7 Nov 2017 - 6:04 pm | प्रमोद देर्देकर

मला किमान रोज एक तरी स्वप्न पडतेच. आणि मला कोणी तरी अदृष्य शक्तीने पकड़लय , मी मदतीसाठी ओरडतो पण कुणी येत नाही कारण माझ्या तोंडून काहीच शब्द बाहेर पडत नाहीत (म्हणजे स्वप्नात). पण मग घरचे मात्र जोरात हलवून जागं करतात कारण अगदी शेवटी मी काही तरी असंबद्ध बडबड करत असतो (म्हणजे खरं .)अस ते म्हणतात.

नेहमी नेहमी असं होतं. कुणी सांगू शकेल काय कारण असेल.

पगला गजोधर's picture

7 Nov 2017 - 6:10 pm | पगला गजोधर

तुम्हाला स्ट्रेस आलाय (नोकरी/व्यवसाय/कर्ज/लग्नकार्य ... )
काळजी घ्या ..