हिवाळी भटकंती: ट्रिक्स आणि टिप्स !

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
2 Nov 2017 - 9:06 pm

नुकताच पावसाळा संपलेला असतो, सर्वांनाच उत्साहाचे टॉनिक पाजणारा दिवाळीचा मोठा सण ही झालेला असतो आणि अशातच एका प्रसन्न सकाळी अचानक गारवा जाणवु लागतो. ईतक्या दिवस न एकु येणारी कुठल्यातरी दुरवरच्या मंदिरातील काकड आरती आणि लांबवर धावणार्‍या रेल्वेची शिट्टी एकु येउ लागते. हळुवार थंडीची चाहुल लागते आणि जाणीव होते, आली एकदाची थंडी. मन प्रसन्न करणारा हा काळ. पावसाच्या रिपरिपीमुळे कंटाळलेले मन सुखावते. अगदी घरकोंबड्या मंडळींनाही उत्साहात मॉर्निंगवॉकसाठी घराबाहेर बाहेर काढणारा हा काळ. भरपुर सुकामेवा खाउन शरीराच्या बलाची वर्षभरासाठी बेगमी करायला लावणारा हा काळ. वर्षातले हे चार महिने मोठे प्रसन्न असतात. पावसामुळे होणारी चिकचिक नाही, रेनकोट विसरण्याची काळजी नाही. तर उन्हाने होणारी काहिलीही नाही. मला शक्य असते तर हा हिवाळ्याचा ॠतू मी वर्षभरासाठी सेट केला असता.
winter1
उगवते चैतन्य ( राजगडावरचा सुर्योदय)
जिथे मुलुखाच्या आळशी मंडळीना उत्साहाचे भरते आलेले असते आणि सहलीचे प्लॅनिंग सुरु झालेले असते तिथे आम्हा डोंगर भटक्यांसाठी तर पर्वणीच आलेली असते. पावसाने अनेक गडवाटा बुजलेल्या असतात, आता त्यावर वावर सुरु झालेला असतो. गवतामुळे गडावरचे अनेक अवशेष बुजलेले असतात, अनेक ठिकाणी जाणेही अवघड झालेले असते, आता तिथे जाता येणार असते. ढाक बहिरी, मदन, अलंग, गडगडा अश्या अनेक ठिकाणी अवघड रॉकपॅच आहेत, पावसात तिथे पाय ठेवणे मुष्किल तिथले प्लॅन एफ.बी. आणि व्हॉटस अ‍ॅपवर फिरु लागतात. नुकत्याच सरलेल्या पावसाने पाण्याची टाकी शिगोशीग भरलेली असतात, तेव्हा उगाच पाण्याच्या बाटल्यांचे ओझे सॅकमधे होणार नसते. मस्त मउ उन्हामुळे कितीही उंची असलेले राकट किल्ले चढले तरी दमणुकीची चिंता नसते. ( काका मंडळीसुध्दा अश्या वेळी फॉर्मात येउन पहिल्या तिन्हात गडावर पोहचतात बर का ;-) ) एकुणच सह्याद्रीमधे भटकण्यासाठी आदर्श काळ म्हणजे हिवाळ्याचे हे चार महिने.
winter2
( धुक्याची वाकळ घेतलेला तोरणा )
अनवट किल्ल्याच्या मालिकेबरोबरच मी पुढील चार महिने हिवाळी भटकंतीसाठी आदर्श किल्ल्यांवर लिहीणार आहे, यात सुधागड, सरसगड, चंदेरी, अलंग्,कुलंग, मदन ई किल्ल्यांवर लिहीण्यचा विचार आहे.
winter3
( सोनेरी किरणात स्नान करणारा सह्याद्री )
अर्थात कोठेही आणि कोणत्याही काळात ट्रेकला जायचे म्हणजे काळजी घेण आलंच. तेव्हा मी माझ्या समजुतीप्रमाणे मुध्दे लिहीतो आहे. मि.पा.वर भरपुर भटके आहेतच, ते योग्य ती भर घालतील.
winter4
( कातळकड्यांचे आव्हान पेलायचा काळ )
१ ) सह्याद्रीत हिवाळा चांगलाच कडाक्याचा असतो. प्रसंगी ४ ते ५ अंश से. पर्यंत तापमान घसरते. ( विशेषतः नाशिक भागात) तेव्हा कोणत्याही परिस्थितीत पुरेसे गरम कपडे जवळ बाळगावेत. या काळात शक्यतो पुर्ण बाह्याचे टि-शर्ट, जीन्स पँट ( शक्यतो पुर्ण लांबीची, थ्री-फोर्थ घातली तर गवताची कुसळे पायाला टोचतात ) स्वेटर, विंटर जॅकेट, कानटोपी, स्कार्फ या पैकी योग्य ते कपडे सोबत असावेत. हिवाळ्यात घामाचा फार त्रास होत नाही, त्यामुळे एक दिवसाचा ट्रेक असेल तर जादा कपड्याची आवश्यकता नाही, मात्र दोन किंवा अधिक दिवसाचा ट्रेक असेल तर शक्यतो एखादा जादा कपड्याचा जोड सोबत असावा. या काळात पावसाळ्यात वाढलेली झाडे, वेली बर्याचदा वाटेवर आडव्या येतात, यासाठी डोळ्यावर गॉगल असावा. फार तर ट्रेकसाठी स्वस्तातील गॉगल सोबत ठेवला तरी चालु शकते, कारण तो हरवला किंवा मोडला, तुटला तरी फार नुकसान होत नाही.
winter5
( बेलाग कडे आणि दव भरल्या वाटा )

२ ) सह्याद्रीत फारच थोड्या किल्ल्यांवर बंदीस्त जागी रात्रीचा मुक्काम करायची सोय आहे, एकतर एखाद्या कोरीव गुहेत रहावे लागते, एखाद्या उघड्या मंदिरात पथारी पसरावी लागते किंवा उघड्यावरच, "चांदणी मिली तो हम, चांदणीमे सो लिये" असे म्हणावे लागते. त्यादॄष्टीने अंथरुण, पांघरुण सोबत बाळगावे लागते. हल्ली बरेच जण स्लिपींग बॅग सोबत आणतात. सॅकमधे कमी जागेत बसते आणि भरपुर उब देणारा हा चांगला पर्याय, ज्यांना शक्य आहे त्यांनी स्लिपींग बॅग जरुर वापरावी. या शिवाय २५००/- पासून पुढे टेंट अथवा तंबु मिळतात, शक्य असल्यास तेही खरेदी करावेत. थंडी, किडे, जनावरे अश्या अनेक गोष्टीपासून संरक्षण होते.
winter6
( पावसात गढूळलेले पाणी आता निवळशंख झालेले आहे )

३ ) या काळात उन्हे कमी असल्याने टाक्यातील पाणी थोडी खात्री करुनच प्यावे. उत्तम उपाय म्हणजे मेडीक्लोरची बाटली सोबत बाळगून त्याचे थेंब आपल्या पाण्याच्या बाटलीत टाकणे. हल्ली गडावर लोकांचा वावर वाढलेला आहे, त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा पुरेलच असे नाही, शिवाय पाणी स्वच्छ ठेवले जाईलच याची खात्री नसते, तेव्हा मेडीक्लोरची बाटली सोबत बाळगणे हाच चांगला उपाय. साधारण जानेवारीचा शेवटचा काळ आणि फेब्रुवारी महिन्यात तहान खुप लागते, यासाठी प्रत्येक व्यक्तिमागे किमान तीन पाण्याच्या बाटल्या सोबत राहु द्याव्यात.
winter7
( लवकर ड्युटी संपवून निघालेले रवी भाउ )

४ ) हिवाळ्यात भुक भरपुर लागत असल्याने आणि डोंगरात चालण्याच्या श्रमामुळे, शहरात किंवा घरी लागते , त्यापेक्षा जास्त अन्न ट्रेकमधे जाते, यासाठी बाकरवड्या, चिवडा, चकली, मॅगी असे पदार्थ सोबत बाळगावेत. या शिवाय ईले़ट्रॉल हे सोबत बाळगणे आवश्यकच आहे. सवय नसल्याने थकवा आल्यास ईलेक्ट्रॉलचे द्रावण उपयोगी पडते. गुळाची चिक्की हे तर ट्रेकमधे सर्वोत्तम खाद्य. संक्रांतीच्या आसपास असल्यास तिळाची वडी हे ही उपयोगी पडते.
winter8
( पर्वतांची दिसे दुर रांग, काजळाची जणु दट रेघ )

५ ) हिवाळा म्हणजे सर्दी आणि खोकल्याला निमंत्रण. तेव्हा आपआपल्या प्रकॄतीला योग्य अशी औषधे शक्यतो आपल्या डॉक्टरला विचारुन सोबत बाळगावीत. औषधे स्ट्राँग नसावीत, त्याची रिअ‍ॅक्शन कुठेतरी ट्रेकच्या मधेच आल्यास अवघड होईल. त्रिभुवनकिर्ती, त्रिशून, अडूळसा, लोमोटील, न्युमिलीड, युनिन्झाईम ( अपचनासाठी), नेसल ड्रॉप ( नाक चोंदल्यास ) अशी औषधे तज्ञाचा सल्ला घेउन सोबत ठेवावीत. या काळात शरीरातील वात वाढत असल्याने ईनोचा सॅशे सोबत असावा. ( ईतरांचे भटकंतीचे धागे वाचून घ्यायच्या ईनोचा याच्याशी संबध नाही ;-) ) तसेच स्नायुमधे क्रँप येण्याची शक्यता असल्याने, मुव्ह्ची ट्युब किंवा स्प्रे तसेच व्हिक्सची छोटी डबी असावी. किरकोळ जखमांसाठी बँडएडच्या पट्ट्या असल्या म्हणजे पटकन जखमेवर लावता येतात. या काळात किटक मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे किडे चावण्याची शक्यता खुप असते, कैलासजीवनची ट्युब किंवा डबी असणे श्रेयस्कर. याच काळातील आणखी एक डोकेदुखी म्हणजे वाळलेले गवत आणि काटे. सोनारकाम करताना एक चिमटा वापरतात किंवा डॉक्टरांकडेही असाच चिमटा ऑपरेशनसाठी असतो, असा चिमटा आपल्या मेडीकल किटमधे ठेवल्यास एनवेळी काटे काढण्यासाठी उपयोगी पडतो. या शिवाय रक्तस्त्राव झाल्यास, तो थांबविण्यासाठी नेफासल्फा पावडरची डबी सोबत ठेवावी, याशिवाय हळदिची पुडीही असेल तरी बरेच.
winter9
(श्याम रंगात वाटा बुडाल्या )

६ ) सध्या माणसाची अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच मुलभुत गरज म्हणजे मोबाईल. ट्रेकमधे आडवळण्या ठिकाणी जायचे असल्याने मोबाईल संपर्कासाठी महत्वाचा ठरतो. मात्र सध्या बहुतेकांकडे असणारे स्मार्ट फोन बॅटरीच्या बाबतीत मात्र स्मार्ट नसतात. झपाट्याने बॅटरी उतरल्याने अडचणीचे ठरू शकते. तेव्हा एकतर पॉवरबँक सोबत बाळगावी किंवा जुना बटणांचा फोन सोबत ठेवावा. हा फोन पुर्ण चार्ज करुन बंद करुन ठेवावा म्हणजे गरजेच्या वेळी चालु करुन बराच काळ वापरता येईल. आणखी एक मुख्य प्रश्न म्हणजे मोबाइल रेंजचा. शहरामधे एअरटेल, आयडीया, व्होडाफोन, जिओ कितीही चांगले चालत असले तरी ग्रामीण भागात फिरायचे तर बि.एस.एन.एल चे एक जादाचे सीम जवळ बाळगावे, त्याला पुरेसा टॉकटाईम असावा. एनवेळी काही अडचण आल्यास बराच काळ बोलता आले पाहिजे.

७ ) हिवाळ्यात कोणत्याही ठिकाणी ट्रेकसाठी जाताना जर सगळेच नवीन असतील तर सोबत वाटाड्या घ्यावा. एकतर नुकताच पावसाळा संपला असल्यास, वाटा मोडल्या नसतात, बर्याचदा दरडी कोसळून वाटा बंद झालेल्या असतात. तर काही वाटांवरचा वावर पुर्णपणे बंद झालेला असतो. तेव्हा स्थानिक गावकर्‍यांना विचारुन खात्री केल्यास पुढील मनस्ताप टळेल.

८ ) या काळातील मुख्य धोका म्हणजे उशिरा होणारा सुर्योदय आणि लवकर होणारा सुर्यास्त. जर योग्य नियोजन केले नाही तर अंधारात वाटचाल करावी लागेल. नेमका याच काळात गावकरी नेमकी वाट दाखविण्यास उपलब्ध झाले नाही तर चुकण्याची शक्यता असते. नोव्हेंबर हा बिबट्याचा विणीचा काळ. या काळात बिबट्या विशेष आक्रमक असतो. सह्याद्रीत हल्ली बिबट्याच्या वावराची जाणीव वारंवार होते. तेव्हा आडबाजुला जाण्यापुर्वी दक्षता घेणे आवश्यक. काही ठिकाणी माकडांचा त्रास होते, ( राजगड, हडसर ) अश्या वेळी सोबत फटाक्यांच्या एक दोन माळा सोबत बाळगलेल्या चांगल्या.

या शिवाय हि यादी बरीच मोठी करता येईल. अर्थात वाचक आणि मि.पा. कर त्यात भर घालतीलच. यासंदर्भात मला आलेले काही अनुभव सांगतो.
अंलगला जाताना घाई गडबडीत मी पांघरूण घरी विसरले होते. अलंग आणि कुलंगच्या वर्तुळाकार दरीत रात्री वारे गोल फिरते, तेव्हा गुहेत पार आत झोपलो असूनही थंडीने रात्रभर मी कुडकुडत होतो.
सर्दीमुळे किती त्रास होउ शकतो याचा अनुभव मी चंद्रगड ते ऑर्थरसीट या ट्रेकमधे घेतला आहे. प्रंचड सर्दी झालेली असूनही या ट्रेकचा मोह मला सोडवला नाही. मात्र सकाली नउ वाजता चंद्रगड उतरून आम्ही ऑर्थरसीट पॉईंटच्या दिशेने चढायला सुरवात केली. जवळपास संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चढत होतो. या काळात मला प्रचंड त्रास झाला. मात्र ऑर्थरसीटच्या सज्जावर उभारल्यानंतरची भावना सगळ्या त्रासावर मात करुन गेली.
मदन आणि कुलंग बघून आम्ही खाली उतरुन आलो तेव्हा सोबत्यांचे फोन पुर्णपणे बॅटरी डाउन झाल्यामुळे बंद पडले होते, तेव्हा सॅकमधून माझा व्हिंटेज ६६०० काढला आणि सगळ्यांचा दुवा घेतला. ;-)
नुकताच गेल्या डिंसेबरमधे औरंगाबाद रेंज ट्रेकमधे सुतोंड उतरताना बरेच माजलेले गवत वाटेवर होते. बर्‍याच जणांना काट्यानी प्रसाद दिला, तेव्हा माझ्या मेडीकल किटमधील चिमटयाने त्यांचे काटे काढले ( म्हणजे शरीरात घुसलेले ;-) ) तेव्हा कुठे या चिमट्याचे महत्व या भटक्यांना समजले.
अनुभवातून शहाणपण येत असे म्हणतात, ते अश्या ह्या प्रसंगातूनच येते.

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

3 Nov 2017 - 10:01 am | सुबोध खरे

आपल्या ताज महालाला आमची वीट
स्लीपिंग बॅग बरोबर ओडोमॉस किंवा तत्सम कीटक रोधक औषध आणावे आणि संध्याकाळ झाली कि चेहऱ्याला मानेला आणि उघड्या हाताला लावावे आणि झोपताना परत थोडेसे लावावे. मलेरिया डेंग्यू च्या डासांपासून संरक्षण चांगले होते.
जीन्सची पॅन्ट बरोबर जीन्सचे पूर्ण हाताचे जाकीट असेल तर उत्तम. कारण थंडीच नव्हे तर काटे आणि कीटकांपासून संरक्षण मिळेलआणि पडले झडले तरी कोपरा ढोपराला खरचटण्याचे प्रमाण खूप कमी होते. .

पाटीलभाऊ's picture

3 Nov 2017 - 10:10 am | पाटीलभाऊ

उपयुक्त माहिती

सुबोध खरे's picture

3 Nov 2017 - 10:13 am | सुबोध खरे

वरच्या लेखातीलच जिन्नसांची सलग यादी केली आहे.
याची एक प्रत काढून ठेवा आणि आपल्या बॅ गेच्या आतल्या भागात चिकटवून ठेवा आणि प्रत्येक वेळेस भटकंतीला जाताना हि यादी पाहून घ्या काय घेतलंय आणि काय राहिलंय ?
पुरेसे गरम कपडे
पुर्ण बाह्याचे टि-शर्ट/जीन्सचे पूर्ण हाताचे जाकीट
पुर्ण लांबीची,जीन्स पँट
स्वेटर, विंटर जॅकेट, कानटोपी, स्कार्फ
अधिक दिवसाचा ट्रेक असेल तर शक्यतो एखादा जादा कपड्याचा जोड
अंथरुण, पांघरुण स्लिपींग बॅग, टेंट अथवा तंबु
मेडीक्लोर/क्लोरिवॅट ची बाटली
पाण्याच्या बाटल्य,, ईलेक्ट्रॉल
बाकरवड्या, चिवडा, चकली, मॅगी
त्रिभुवनकिर्ती, त्रिशून, अडूळसा, लोमोटील, नैम्युलिड/ व्हॉव्हेरान प्लस/ कॉम्बीफ्लाम मुव्ह्ची ट्युब किंवा स्प्रे तसेच व्हिक्सची छोटी डबी
, कैलासजीवनची ट्युब, नेबॅसल्फा/ नेओस्पोरीन पावडरची डबी ओडोमॉस किंवा तत्सम कीटक रोधक औषध
पॉवरबँक किंवा बिना बटणांचा फोन
मेडीकल किटमधील चिमटा, सूरी/ चाकू, कात्री, नेलकटर

चला पहिली घंटा झाली. लागा तयारीला. अलंग -मदन-कुलंग, गोरख,हरिहर अवघड श्रेणीतल्या गडांसाठी 'नेणाय्रा' गटाबरोबरच जातात त्यामुळे त्यात काही अडचण येत नसावी. मजेचे पर्यटन/डोंगर भटकंती माथेरान,राजमाची, सुधागड आणि भिमाशंकर या चार ठिकाणी वर्षभरात कधीही करता येते. रतनगड आणि हरिश्चंद्रासाठी थोडी तयारी आणि सवय असल्यास तेही तिन्ही ऋतूंत जमतात. माहुली आता मागे पडू लागलाय.

मोबाइलवर अवलंबून राहायचे नाही हे स्वत:ला बजावले तर त्रागा करायची वेळ येत नाही. डेटा कनेक्शन बंद ठेवल्यास बॅटरी फोटो काढण्यासाठी एक दिवस सहज पुरते. तळाला रूट ट्रेसिंग सुरू करावे. मॅपवर पोझिशन आली की डेटा बंद करावा.
काही काका लोकांना वरती जायची घाई नसल्याने ते हळू चालतात याची नोंद घ्यावी.

काही काका लोकांना वरती जायची घाई नसल्याने ते हळू चालतात याची नोंद घ्यावी. >>
:))

उत्तम माहिती. काड्यापेटी किंवा त्यापेक्षा उत्तम म्हणजे सिगरेट लायटर सोबत असू द्यावा. हिवाळ्यात कधीकधी दाट कारवीतून वाट काढावी लागते.त्यासाठी एखादा मोठा चाकू ट्रेकच्या टीमलीडरकडे असावा.

II श्रीमंत पेशवे II's picture

3 Nov 2017 - 12:49 pm | II श्रीमंत पेशवे II

लेख खूप माहितीपूर्ण आहे ...याचा नक्कीच गाईड म्हणून उपयोग होईल
बाकी दुर्गविहारी ........द ग्रेट रायटर

सिरुसेरि's picture

3 Nov 2017 - 1:56 pm | सिरुसेरि

लेख खूप माहितीपूर्ण आहे

प्रकाशचित्रे सुद्धा खासच!

वकील साहेब's picture

4 Nov 2017 - 9:20 am | वकील साहेब

उपयुक्त माहिती अन माहितीपूर्ण लेख. दुर्गविहारी द ग्रेट

Nitin Palkar's picture

4 Nov 2017 - 9:27 am | Nitin Palkar

अत्यंत सुंदर माहिती! डॉक्टरांनी दिलेली तयार यादी लगेच नकलून ठेवली.

दुर्गविहारी's picture

9 Nov 2017 - 8:42 pm | दुर्गविहारी

सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मनापासून धन्यवाद. ह्या धाग्यावर आणखी मिळेल तसे अपडेट टाकतो, ज्याचा सर्वच सह्यभटक्यांना उपयोग होईल.