आठवणीतील दिवाळी

शिवम काटे's picture
शिवम काटे in जनातलं, मनातलं
16 Oct 2017 - 9:35 pm

लहान असताना दिवाळीची चाहूल महिना-दीड महिना आधीच लागायची. हलकी हलकी गुलाबी थंडी पडायला सुरुवात झालेली असायची. शाळेत सहमाहीचा जवळपास सर्व अभ्यासक्रम शिकवून झालेला असायचा. शिक्षक मुलांची उजळणी घेण्याच्या उद्योगात गुंतलेले असायचे कारण सहामाही परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं असायचं. बच्चेकंपनीला तर कधी एकदाची परीक्षा होते आणि कधी मामाच्या गावाला आजी-आजोबांकडे पळतोय अस व्हायचं.
दीपावलीच्या ह्या 15-20 दिवसांच्या स्वर्गसुखासाठी एव्हाना संध्याकाळचं क्रिकेट खेळणं बंद झालेलं असायचं, कारण घरच्यांनी तशी तंबीच दिलेलं असायची ‘चांगला अभ्यास केला तर आणि तरच ह्यावर्षी मामाच्या गावाला जायचं नाहीतर नाही'. मग काय कशाला उगीचंच ‘रिस्क'! त्यापेक्षा थोडे दिवस क्रिकेट न खेळलेल बर असा समजुदारपणा बच्चे कंपनी दाखवायचे. आणि आईवडिलांनाही त्यामुळे सुटल्यासारखं वाटायचं. आणि मग मनात नसतानाही बॅट आणि बॉल सोडून हातात पुस्तक घेऊन बसावं लागायचं.
दिवाळीत मामाच्या गावी गेल्यावर काय करायचं, फटाके किती आणायचे, त्यासाठी कुणाकडून किती आणि कसे पैसे घ्यायचे, किल्ला कसा, कुठे आणि कोणता बनवायचा या आणि यांसारख्या अनेक गोष्टींचे आराखडे आधीच तयार असायचे. एकदा का सहामाही परीक्षा संपली कि मग प्लॅन्स वर actual work स्टार्ट व्हायचं आणि दिवाळीची मजाही इथूनच स्टार्ट व्हायची.
मामाचं गाव जर खरच टिपिकल ‘गाव' असेल तर मग विचारूच नका. दिवाळीत भाचे मंडळींना पोहायला शिकविण्याचं महान काम हे मामुलोक करायचे. सकाळी सकाळी साखरझोपेतुन उठवून हाडं गोठवणाऱ्या थंडीत विहिरीवर घेऊन जायचं आणि थारोळ्यातून भाच्यांना पाण्यात अक्षरशः फेकून द्यायचं! ह्यात ह्यांना कसला आनंद भेटत असे देव जाणे(अशा मामुलोकांचा त्रिवार निषेध). इतर वेळी प्रेमळ वाटणारे मामुलोक मात्र ह्यावेळी व्हिलन वाटायचे. आणि या व्हिलन ची घरी आल्यावर आजी-आजोबांकडे म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या हिरो कडे तक्रार केली जायची. मग हिरो व्हिलन ला मारल्यासारखं करायचा आणि व्हिलन लागल्यासारखा. काही का असेना पण उडी मारताना(बळजबरीने का होईना!)जाम फाटायची तेव्हा!
थंडीमुळे आधीच हाथ-पाय उकललेले असायचे त्यात मातीचा किल्ला म्हटलं कि विचारता सोय नाही. हाथ-पाय फुटायची बाकी राहायचे! पण एवढं असूनही आई बाबांनी कधी किल्ला बनवायला विरोध नाही केला. केलं ते कौतुकच! आणि का नाही करणार? आपलं छोटा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची प्रतिकृती बनवतोय म्हटल्यावर कुठल्याही माऊलीचा उर अभिमानाने भरून येणारच ना! पण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात हे सर्व मागे पडलं ही मात्र खंत! इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते ती म्हणजे ह्या संपूर्ण दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही मावस/मामे किंवा आते भावंड कधीही त्या इडियट बॉक्स समोर त्याला धरून बसलो नाही. याबाबतीत मी स्वतःला नशीबवान समजतो.
दिवाळी हा दिव्यांचा उत्सव. त्याची खरी मज्जा संध्याकाळीच येणार ना! दिवाळीची संध्याकाळ मात्र एकदम मस्त असायची. दिवस मावळतीकडे झुकला आणि अंधार आपले पाय पसरू लागला की फटाक्यांची आतषबाजी सुरु व्हायची. जास्त नसायचे पण जेवढे असायचे तेवढे पुरवून पुरवून पार तुळशीच्या लग्ना पर्यंत वाजवले जायचे. फटाक्यांचा हा कार्यक्रम संपल्यावर जाम भूक लागलेली असायची. मग सर्वजण एकत्र जेवायला बसायचे. गप्पा गोष्टी करत, हसत खिदळत जेवणं उरकायची. एकत्र जेवण्याची ती मजा काही औरच होती. आज काल तर खूपच दुर्मिळ झालीये. असो. एकदा का जेवण उरकली मग सर्व बच्चे कंपनी पेंगु लागायची. पडवीत सगळ्यांची अंथरुणं घातली जायची! सर्व भावन्डे एकमेकांना चिटकून गप्प पडायची. मामाचे किस्से व आजोबांच्या गोष्टी ऐकत आणि त्याबरोबर उद्याचे मनसुबे रचत!
वेळ गेला काळ बदलला. आम्ही मोठे झालो! जो-तो आपापल्या कामात व्यस्त झाला. एकत्र येणं जमेनास झालं. आता दिवाळीचे पाच दिवस सुट्टी भेटते, सर्वजण पाहुण्यासारखे स्वतःच्याच घरी जातात कशीबशी दिवाळी करून पुन्हा परत आपापल्या ठिकाणी रुजू होतात. कसली दिवाळी नि कसली मजा!
गेले ते दिवस, आता राहिल्या फक्त आठवणी!
#लेखनसीमा
- शिवम काटे

साहित्यिकअनुभव

प्रतिक्रिया

mayu4u's picture

16 Oct 2017 - 9:38 pm | mayu4u

पु ले शु!

दीपावलीच्या शुभेच्छा!

एस's picture

16 Oct 2017 - 11:17 pm | एस

छान लिहिलंय.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2017 - 11:22 pm | अत्रुप्त आत्मा

Okk.

ज्योति अळवणी's picture

16 Oct 2017 - 11:26 pm | ज्योति अळवणी

माझी लहानपणची दिवाळी आणि त्यावेळची गम्मत आठवली